मक्केतील उठाव ५

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
17 Oct 2016 - 8:45 pm

याआधीचा भाग ४
उलेमा मंडळींनी सौदी सरकारला प्रतिहल्ला करायची परवानगी दिली खरी पण त्याकरता कुराणामधील एका परिच्छेदाचा संदर्भ त्यांनी वापरला त्यात असे म्हटले होते की "त्या पवित्र मशिदीत लढाई करू नका जोवर ते तुमच्याशी लढत नाहीत, पण त्यांनी सुरवात केली तर मात्र तुम्ही त्यांना सोडू नका, अश्रद्ध लोकांना असेच शासन मिळते." आता इथे असे सुचवले आहे की मशिदीत उपस्थित अतिरेकी हे अश्रद्ध असले पाहिजेत. आता ह्या अतिरेकी लोकांना अश्रद्ध, धर्मभ्रष्ट ठरवणे हे मोठेच आव्हान होते. कारण त्यांचे अतिरेकी धार्मिकपण सगळ्यांना व्यवस्थित माहीत होते. अशांना धर्मभ्रष्ट कसे ठरवायचे? पण उलेमा लोकांनी ती सर्कस केली खरी. पण नंतर ह्या चालूपणाचा बिन लादेन आणि अन्य अतिरेकी संघटनांनी उत्तम वापर करून घेतला. सौदी सरकार आणि अन्य पश्चिम धार्जिणी सरकारे ह्यांना धर्मभ्रष्ट (हराम) म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा करून दिला गेला. निव्वळ वरकरणी धार्मिक मुस्लिम असणे हे खरोखरच धार्मिक असल्याचे लक्षण नाही अशी पळवाट ह्या उलेमांनी काढली आणि ती नंतर त्यांच्यावरच शेकली. सर्व काही नियम हे कुराणाचा वा हदीसचा आधार घेऊन बनवलेले असले पाहिजेत हा अतिरेकी आग्रह असल्यामुळे अशा पळवाटा काढून हवा तो सोयीस्कर अर्थ लावून त्यानुसार काम करणे हे इस्लामी इतिहासात अनेकदा घडलेले आहे.

दोन हल्ले निष्फळ आणि पोलिसांची मोठी जीवित हानी झाल्यावर सौदी सरकार थोडे जागे झाले. आता सैन्याला पाचारण केलेच पाहिजे हे त्यांना जाणवले. त्यानुसार सैन्याच्या अनेक तुकड्या बोलावल्या गेल्या. सगळ्या आधुनिक अस्त्रांची सैन्याच्या अनुभवी अधिकाऱयांकरवी तपासणी केली गेली आणि कुठली हत्यारे वापरायची ह्याविषयी खल झाला. सर्वप्रथम त्या मिनारातील नेमबाज लोकांचा निकाल लावायचा असे ठरवले गेले. हे लोक मोक्याच्या जागेवरून अचूक गोळीबार करून मोठे नुकसान करत होते. TOW (Tube-mounted, Optically tracked, Wire guided) ह्या नावाने ओळखली जाणारी क्षेपणास्त्रे वापरून मिनारातील बंडखोरांचा निकाल लावायचे ठरले. तसेच सैन्याला मशिदीच्या आवारात घुसायला सोपे जावे म्हणून छोटे रणगाडे (armored personal carrier) वापरायचे ठरले. त्यानुसार प्रथम क्षेपणास्त्रे डागली गेली. त्यांनी आपले काम व्यवस्थित केले. मिनारांचे फार नुकसान न करता त्यांनी त्यावरील सर्व बंडखोरांना ठार केले. एक मोठा अडथळा दूर झाला.

नंतर एम-११३ ह्या नावाने ओळखले जाणारे छोटे रणगाडे मागवले गेले. त्यांच्या छोट्या आकारामुळे ते इथल्या परिस्थितीत जास्त योग्य असतील असे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. चिलखती असल्यामुळे सुरक्षित आणि .५० कॅलिबर ची मशिनगन असल्यामुळे मारक अशी ह्या वाहनांची वैशिष्ट्ये. ओसामा बिन लादेनचा मोठा भाऊ आणि महम्मद बिन लादेनचा वारसदार ह्याला मशिदीचे नकाशे द्यायला सांगितले होते. पण त्यांचे ऑफिस जागा बदलत होते त्यामुळे कागदपत्रे कुठल्यातरी डब्यात बंद होती ती सापडत नव्हती. ती दोन चार दिवसांनी एकदाची सापडली आणि खुद्द सलीम ती घेऊन आला.
ह्या रणगाड्यांना चांगले यश मिळू लागले. चिलखतामुळे अभेद्य झालेले सैन्य जोरदार गोळीबार करून बंडखोरांचा निकाल लावत होते. एक रणगाडा मात्र एका गेटमध्ये अडकला. स्फोटाने ते गेट उध्वस्त केले होते पण त्या रणगाड्याचा अँटेना त्या गेटमध्ये अडकला आणि तो रणगाडा फसला. ते बघताच बंडखोर त्याच्यावर अल्ला हू अकबरच्या घोषणा करत तुटून पडले. मशिदीच्या आवारात झमझम नावाचा पवित्र झरा आहे. हिंदूंना गंगेविषयी जे वाटते तसेच मुस्लिमाना झमझम बद्दल वाटते त्याच्या आसपास यात्रेकरूंची रिकाम्या बाटल्या टाकून दिल्या होत्या. त्या बंडखोरांनी पेट्रोलने भरल्या. आणि ह्या मोलोटोव्ह कॉकटेलचा वापर करून त्यांनी त्या रणगाड्यावर हल्ला केला. वरचे झाकण उघडून आतील सैनिकांना त्या पेट्रोलने जाळून मारले. नंतर त्या रणगाड्याचा जाळून कोळसा केला. आणि ते धूड त्या फाटकात अडकून बाकी वाहनांना ये जा करू देईना. नंतर एका बुलडोझरच्या मदतीने कसेतरी त्या रणगाड्याला शनिवारी दुपारी ओढून बाहेर काढले. हे सोपे नव्हते कारण बंडखोर लोक नेम धरून गोळीबार करतच होते. पण तो अडथळा दूर झाल्यावर पुन्हा लढाई सुरु झाली.
ज्याला माहदी म्हणत होते तो महम्मद अब्दुल्ला स्वत:ला अमर समजत होता (नैनम छिन्दन्ति शस्त्राणि!). तो बिनधास्त कुठलीही भीती ना बाळगता हातघाईचे युद्ध करत होता. आश्चर्य म्हणजे अनेक दिवस तो काहीही दुखापत ना होता टिकून होता. त्यामुळे बंडखोरांना त्याच्या दैवी गुणांबद्दल खात्रीच होऊ लागली.

सौदीकरता एक मोठी अवघड समस्या म्हणजे काबाचा दगड. हा काळा दगड हा एक अत्यंत पवित्र स्थळ समजला जातो. बहुधा तो उल्केचा पाषाण असावा. हा तमाम मानवांची पापे शोषून घेतो म्हणून तो असा काळाकुट्ट झालेला आहे अशी मुस्लिमांची श्रद्धा आहे. तो एक मोठा ठोकळ्याच्या आकारात बांधलेला आहे. जर बंडखोरांनी त्याचा आडोसा घेऊन गोळीबार केला तर त्यावर उलट मोठा गोळीबार करणे अवघड होते. ह्या पाषाणाचे काही नुकसान झाले असते तर मोठीच पंचाईत झाली असती. सुदैवाने जुहेमान आणि त्याचे सहकारी ह्या पाषाणापासून दूर राहिले. त्यामुळे ते संकट टळले. शनिवारी संध्याकाळी सैन्याने मशिदीच्या वरच्या भागातून बंडखोरांचा बहुतेक निकाल लावला होता. मशिदीच्या भिंतींचे, जमिनीचे, खिडक्यांचे अफाट नुकसान झाले होते. पण निदान आतील आवारात बरीचशी मोकळीक झाली. बरेचसे बंडखोर मशिदीच्या प्रचंड मोठ्या तळघरात पळून गेले. तिथे शस्त्रे, अन्न आणि पाणी ह्यांचा मोठा साठा करून तेच हल्ल्याचे मुख्य ठाणे बनवले गेले होते. काही बंडखोर शरणही येत होते. पण एव्हाना सैन्याचा संताप इतका होता की कित्येकदा अशा शरण येणार्‍या लोकांनाही ते निर्दयपणे गोळ्या घालून ठार मारत होते. कित्येक यात्रेकरू आणि सैन्याचे लोक ज्यांना बंडखोरांनी बंदिस्त केले होते असेही लोक मारले गेले. सौदी राजाने असे जाहीर केले की अशा प्रकारे जे निष्पाप लोक इथे मरत आहेत ते थेट स्वर्गात जाणार आहेत त्यामुळे त्यांची फार पर्वा करू नका!

शनिवारी उशिरा आणि रविवारी सकाळी थोडी लढाई वरच्या भागात चालू होती. सौदी सैनिक हातबॉम्ब फेकून बंडखोरांना मारत होते. माहदी समजला जाणारा फारच पेटला होता. फेकलेले बॉम्ब उचलून तो उलटे सैन्यावर फेकत होता. त्याचे भाग्य थोर होते म्हणून अनेक बॉम्ब असे उलटे मारण्यात तो यशस्वी झालाही. पण सतत अशी विषाची परीक्षा केल्याचे फळ त्याला लवकरच मिळाले. एक बॉम्ब हातातच फुटला. त्याच्या कंबरेखालचा भाग स्फोटाने पार छिन्नविछिन्न झाला. सैन्याच्या आक्रमक गोळीबारामुळे बंडखोर सहकाऱयांना त्याला उचलून तळघरातही नेता आले नाही. तो इतका भयंकर जखमी होता की तो मेल्यातच जमा आहे असे मानून त्याचे साथीदार पळून गेले.

रविवारी सकाळी मशिदीचा वरचा भाग पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात आला. आता पहिल्यांदा सौदी राजपुत्र मशिदीच्या आवारात आले. त्यांनी मशिदीचा नकाशा पाहिल्यावर त्यांना जाणवले की ही अर्धीच लढाई आहे. अजून अर्धी बाकी आहे. तळघरातल्या बंडखोरांचा निकाल लावणे फार सोपे नाही. बंदर बिन सुलतान हा एक राजपुत्र (जो नंतर अमेरिकेतील राजदूत बनला) तो त्या सुमारास अमेरिकन राजदूताला काहीशा गमतीने असे म्हणाला होता की "बिन लादेनला ही मशीद बांधल्याबद्दल एक मेडल दिले पाहिजे आणि नंतर गोळी घालून मारून टाकले पाहिजे!" (इतकी भक्कम मशीद बांधून त्यांनी सैन्याची पंचाईत केली होती!).

खाली तळघरात माहदी च्या मृत्यूमुळे खळबळ उडाली. सगळ्यांना ही बातमी ठाऊक नव्हती. पण ज्यांना कळली त्यातले काही फार निराश झाले. आपला नेताच गेला मग आता बाकी अर्थ काय? खरे तर त्यांचा म्होरक्या हा जुहेमान हाच होता. माहदी हा त्यानेच घडवलेला होता. महम्मद अब्दुल्लाला पटवून पटवून त्याला माहदी बनवले होते. जुहेमानाने मोठे प्रभावी भाषण करून पुन्हा त्यांना लढायला तयार केले. तुम्हाला शरण जायचे असेल तर जा पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या धर्मभ्रष्ट लोकांशी लढणारच.

तथाकथित माहदी मरण पावल्यावरही सौदी सरकारला ह्याविषयीची नक्की माहिती नव्हती. ज्या बंडखोरांना जिवंत ताब्यात घेतले ते बरेचसे आपले नाव महम्मद अब्दुल्ला असेच सांगत होते. त्यामुळे नक्की माहदी कुठला ह्याबद्दल मोठाच गोंधळ होता. अशी एक अफवा होती की त्या माहदीच्या आईने सौदी राजाची गुप्तपणे भेट घेतली होती. त्या भेटीत ती त्याला असे म्हणाली की, "तो जर खरोखर माहदी असेल तर तो तुला नक्की ठार मारेल. पण तो जर माहदी नसेल तर मग तू त्याला खुशाल ठार मार!" हे खरे की खोटे ते अल्लाच जाणे!

आता सौदी सैन्य तळघरावर हल्ला करण्याची तयारी करू लागले. तळघरात ट्रक न्यायला एक दार होते. जुहेमानाच्या लोकांनी एक ट्रक तिथे उभा केला होता. शस्त्रे, अन्न, दारुगोळा भरून ट्रकने तो तळघरात पोचवला होता. लष्करी वाहने आत जाता यावीत म्हणून सैन्याने तो ट्रक हटवायचे ठरवले. एक छोटा रणगाडा आणला. त्याने त्या ट्रकला धडक मारून त्याला दुसरीकडे ढकलून जागा मोकळी करावी असे ठरले. त्याप्रमाणे धडक मारली. पण प्रचंड स्फोट झाला. असे काही होणार म्हणून जुहेमानाने तो ट्रक बॉम्बने भरलेला होता! प्रचंड स्फोट झाला. धुराने गुदमरलेले सैनिक रणगाड्याबाहेर पडून पळून जाऊ लागले. पण आत टपून बसलेल्या बंडखोरांनी अचूक गोळ्या मारून त्यातले बहुतेक सैनिक मारून टाकले. एकंदर तळघरातले अतिरकी डोईजड होत होते. दोन तीन दिवस झाले. बुधवार (२८ नोव्हे ) आला तरी परिस्थिती तशीच. सौदी सरकारला असे जाणवले की आता बाहेरून काहीतरी मदत मागवणे आवश्यक आहे. पण असे काही करायचे असल्यास कमालीची गुप्तता आवश्यक होती. इराणमधून नव्याने सत्तेवर आलेला उन्मत्त खोमेनी सौदी, मोरोक्को, जॉर्डन ह्या देशांच्या सरकारांवर जोरदार ताशेरे ओढत होता. "आपल्या संरक्षणाकरता पश्चिमी देशांचे पाय चाटणारे दुबळे राजे" अशी तो ह्यांची संभावना करत होता. रशिया शीतयुद्धातील डावपेच वापरून अपप्रचार करत होता. "सौदी अरेबियातील दारान (Dhahran) शहरात अमेरिकन कमांडोज दाखल झालेले आहेत जे ह्या मशिदीची मुक्तता करणार आहेत." सौदीने तात्काळ ह्याचा इन्कार केला. खरे म्हणजे त्या शहरात अमेरिकन मिलिटरी उपस्थित होती. पण त्यांचा मशिदीवरील हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता. शेजारचा जॉर्डन हा एक देश ह्याकरता योग्य होता. जॉर्डनच्या राजाही मदत करायला उत्सुक होता. त्याने प्रयत्न करून सौदी राजाची भेट ठरवली.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

वाचतोय. ओघवते आणि विस्तृत.

यशोधरा's picture

17 Oct 2016 - 8:52 pm | यशोधरा

वाचते आहे..

मोदक's picture

17 Oct 2016 - 8:57 pm | मोदक

APC - म्हणजे छोटे रणगाडे असतात का? या चिलखती गाड्या फक्त युद्धभूमीवर माणसे वाहून नेण्याच्या कामी आणि अगदीच एखादी बंदूक माऊंट केलेली असते.

लेख नेहमीप्रमाणे झकास..!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Oct 2016 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं ओघवता झालाय हा भाग !

APC उर्फ Armoured Personnel Carrier ला मराठीत चिलखती गाडी/वाहन म्हणतात. रणगाडा हिच्यापेक्षा खूप वेगळा असतो.

स्वाती दिनेश's picture

17 Oct 2016 - 9:44 pm | स्वाती दिनेश

आहे, हा भाग आवडला. पुभाप्र.
स्वाती

गामा पैलवान's picture

17 Oct 2016 - 11:46 pm | गामा पैलवान

हुप्प्या,

हाहाहा ! याला म्हणतात हलवायाच्या घरावर तुळशीपत्र :

सौदी राजाने असे जाहीर केले की अशा प्रकारे जे निष्पाप लोक इथे मरत आहेत ते थेट स्वर्गात जाणार आहेत

आ.न.,
-गा.पै.

चांदणे संदीप's picture

18 Oct 2016 - 7:29 am | चांदणे संदीप

वाचतोय!

Sandy

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2016 - 8:42 am | अत्रुप्त आत्मा

+1

सोत्रि's picture

18 Oct 2016 - 11:42 am | सोत्रि

झक्कास खिळवून ठेवणारी मलिका!

- (हाजी) सोकाजी

छान- सविस्तर आणि रोचक माहिती!

सतीश कुडतरकर's picture

18 Oct 2016 - 12:30 pm | सतीश कुडतरकर

छान लिहीताय. पुढील भाग पटापट टाका हो.

टर्मीनेटर's picture

18 Oct 2016 - 3:29 pm | टर्मीनेटर

मस्त चालू आहे मालिका. येउदेत लवकर पुढचा भाग.

रंगीला रतन's picture

18 Oct 2016 - 3:34 pm | रंगीला रतन

पाचही भाग सलग वाचले आज, छान लिहिताय.

रोचक. सर्व भाग एकत्रित वाचले.

हे असे आज घडले असते तर काय गहजब झाला असता.

बाकी सौदी अरेबियाविषयी वाचतो तेंव्हा एक फार जाणवते - लकी म्हणजे किती लकी असावे एखाद्या सत्ताधीश परिवाराने ! ह्या सौदी राजघराण्यावर जगभरातले राज्यकर्ते नक्की जळत असणार.

अगदी हाताने खणले तरी निघणारे तेल, त्यातून मिळणारे अब्जावधी पेट्रो डॉलर्स, जगभरातून मक्का मदिनेला येणाऱ्या भाविकांकडून मिळणाऱ्या पैश्याचा कधीही न आटणारा झरा, खूप कमी लोकसंख्या आणि तीसुद्धा राज्यकर्त्यांच्या मुठीत! संरक्षण आणि शस्त्रांचा खर्च परस्पर अमेरिकेच्या खात्यावर! और क्या चाहिये?

कधी स्वतःच्या जनतेने कुरकुर केलीच तर सगळा दोष-रोष 'पश्चिमेतल्या सैतानाच्या' दिशेला वळवण्याचे त्यांचे कसबही खासच.

पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

बबन ताम्बे's picture

18 Oct 2016 - 5:07 pm | बबन ताम्बे

मी तर वाचलेय की तिथे बहुतक पुरुषांना एकीपेक्षा जास्त बायका आणि डझनभर पोरे असतात ! तरी कमी लोकसंख्या ? कि क्षेत्रफळाच्या मानाने कमी असे असावे ?

श्रीगुरुजी's picture

19 Oct 2016 - 3:28 pm | श्रीगुरुजी

लादेनच्या बापाला कोणत्याही क्षणी ४ बायका असायच्या. काही बायकांना तो घटस्फोट देऊन लगेच नवीन बायको आणून ४ ही संख्या कायम ठेवायचा. त्याला एकूण ५८ मुले झाली होती (२२ मुले व ३६ मुली). लादेन या २२ मुलांमधला १८ वा. त्याला आपल्या सर्व मुलांची नावे देखील आठवत नसायची. दस्तुरखुद्द लादेनची एकूण ६ लग्ने झाली होती व त्यालादेखील एकूण २० मुले झाली होती.

ओसामा बीन लादेनला एकुण ३५ मुले झाली असे पेप्रात वाचले होते.
ओसामाच्या बापाला ८ बायका होत्या. ओसामाच्या आईने त्याच्या बापापासून घटस्फोट घेतला होता. (संदर्भ - ओसामाच्या दोन नंबरच्या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या कथनावरून लिहीलेले पुस्तक. खूप जबरदस्त पुस्तक आहे. नक्की वाचा )

हुप्प्या's picture

20 Oct 2016 - 4:08 am | हुप्प्या

हा माणूस कुणावर खूश झाला की आपल्या एका बायकोला घटस्फोट देऊन तो तिला बक्षिस म्हणून त्या माणसाला देत असे. अशा प्रकारे महंमदच्या ड्रायव्हरला महंमदची बायको भेट म्हणून मिळाली! खुद्द ओसामाची आई ओसामाच्या बापाने घटस्फोट देऊन आपल्या हाताखालच्या सहकार्‍याला भेट म्हणून दिली!

मला तरी हे ऐकूनच शहारे आले. एखाद्या हाडामासाच्या प्रौढ व्यक्तीला भेटवस्तू म्हणून कुणाला तरी देणे कसेसेच वाटते. हे करताना त्या स्त्रीला विचारले गेले असेल असे वाटत नाही!

श्रीगुरुजी's picture

20 Oct 2016 - 3:26 pm | श्रीगुरुजी

डॉ. उज्वला दळवी आणि त्यांचे डॉक्टर यजमान मागील ३० वर्षांपासून सौदीत आहेत. त्यांची मुंबईतील तरूण मुलगी एकदा त्यांना भेटायला सौदीत आली होती. स्वतः डॉक्टरीणबाई व त्यांची मुलगी या दोघीही संपूर्ण पायघोळ बुरख्यात होता. त्यांचा एक अरब पेशंट होता. त्याला ३-४ बायका व असंख्य पोरेबाळे होती. डॉकटरांच्याबरोबर त्यांची मुलगी बघून (ती पायघोळ बुरख्यात असूनसुद्धा) त्याने लगेच डॉक्टरांना ऑफर दिली की तुमची मुलगी मला देऊन टाका (बायको म्हणून) आणि माझ्या मुलींपैकी तुम्हाला आवडेल ती तुम्हाला घेऊन टाका. तो इतका पेटलेला होता की बुरख्यातील मुलगी न बघताच त्याला ती नवीन बायको म्हणून हवी होती आणि त्या बदल्यात आपल्या मुलीची आवडनिवड, वय, डॉक्टरांचे वय, वेगळा धर्म इ. चा विचार न करताच तो आपली मुलगी सौदा म्हणून द्यायला तयार होता. डॉक्टर उज्वला दळवींनी "सोन्याच्या धुराचे ठसके" या पुस्तकात हा प्रसंग सांगितलेला आहे.

त्यातले भर चौकात शिरच्छेद प्रकरण अंगावर शहारे आणते.

चित्रगुप्त's picture

20 Oct 2016 - 6:08 am | चित्रगुप्त

लादेनच्या बापाला ...... एकूण ५८ मुले झाली होती

छ्या... 'आपल्या' धृतराष्ट्रापुढे हा ला.बा. म्हणजे किस झाड की पत्ती. आंधळा असून सेंचुरी गाठली गड्यानं. हिंदू संस्कृती अखिल विश्वात सर्वश्रेष्ठ म्हणतात ते उगाच नाही. जय हिंद.

अनिंद्य's picture

22 May 2017 - 4:28 pm | अनिंद्य

होय, खूप कमी लोकसंख्या !

इराणची लोकसंख्या ७.९१ कोटी सौदी अरेबियाची ३.१५ कोटी, निम्म्याहून कमी.

प्रति वर्ग-किलोमीटर क्षेत्र आणि लोकसंख्येचे प्रमाण घेतले तरी अन्य देशांपेक्षा सौदी लोकसंख्या कमी आहे

इराण - प्रति वर्गकिलोमीटर मध्ये लोकसंख्या = ४८
पाकिस्तान - प्रति वर्गकिलोमीटर मध्ये लोकसंख्या = २३६
इंडोनेशिया - प्रति वर्गकिलोमीटर मध्ये लोकसंख्या = १३५
इराक - प्रति वर्गकिलोमीटर मध्ये लोकसंख्या = ८३
अगदी नेपाळ सारखे तुरळक वस्तीचे राष्ट्र - प्रति वर्गकिलोमीटर मध्ये लोकसंख्या = १९३
सौदी - प्रति वर्गकिलोमीटर मध्ये लोकसंख्या = १४

(सर्व आकडे २०१५ चे आहेत)

असंका's picture

18 Oct 2016 - 3:47 pm | असंका

सुरेख लिहित आहात..!

धन्यवाद...!

नरेश माने's picture

18 Oct 2016 - 5:12 pm | नरेश माने

छान सुरू आहे लेखमालिका. पुभाप्र...........

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Oct 2016 - 3:50 pm | अनिरुद्ध.वैद्य

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

गामा पैलवान's picture

20 Oct 2016 - 1:47 am | गामा पैलवान

हुप्प्या,

(इतकी भक्कम मशीद बांधून त्यांनी सैन्याची पंचाईत केली होती!)

ही मशीद आहे की आण्विक तळघर (= न्यूक्लियर बंकर)? हा बांधण्यामागे काय नियोजन असेल?

आ.न.,
-गा.पै.

हुप्प्या's picture

20 Oct 2016 - 4:12 am | हुप्प्या

सगळ्यात पवित्र स्थानाचे बांधकाम करताना सर्वोच्च दर्जाचे साहित्य सामग्री वापरली गेली असेल. प्रत्येकाने मन लावून काम केले असेल. आणि प्रचंड गर्दी झाली तरी कुठे काही पडछड होता कामा नये म्हणून मजबूत बांधकाम केले असेल. ते तळघर म्हणजे एखादे लहानसे शहर म्हणता येईल इतके भव्य होते.

शिवाय अशी पवित्र जागा असल्यामुळे सौदी सैन्य निर्दयपणे त्याची मोडतोड करु इच्छित नव्हते. एक सर्जिकल स्ट्राईक करुन फक्त त्या हल्लेखोरांना संपवावे अशी त्यांची इच्छा होती.

गामा पैलवान's picture

20 Oct 2016 - 12:27 pm | गामा पैलवान

हुप्प्या,

नियोजन हा शब्द चुकून वापरला. उद्दिष्ट म्हणायचं होतं. इतके लोकं आले तर अतिमजबूत तळघराची काय आवश्यकता? लोकांची व्यवस्था वेगळ्या तऱ्हेने करता येते. एव्हढं भक्कम आणि विस्तृत तळघर म्हणजे एकतर अणुयुद्धापासून बचाव करायला. संपत्ती साठवण्यासाठी इतकं भव्य तळघराची आवश्यकता नसावी.

तर प्रश्न असा आहे की आण्विक बचावार्थ मक्केत तळघर कशासाठी? सौदी अरेबियात इतरत्र जागा सापडल्या नाहीत का?

आ.न.,
-गा.पै.

अत्यंत रोमांचक मालिका. पुभाआवाबआ.तोलयेअआकआ.तीससहो,हीईचप्रा.
......(पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे. तो लवकरच येईल अशी आशा करत आहे. ती सत्वर सफळ होवो, ही ईशचरणी प्रार्थना).

माझीही शॅम्पेन's picture

20 Oct 2016 - 5:50 pm | माझीही शॅम्पेन

अत्यंत रोमांचक मालिका + १००

अप्रतिम लिहिता आहात _/\_

मी-सौरभ's picture

20 Oct 2016 - 6:25 pm | मी-सौरभ

मस्त लेखमाला

अत्रुप्त आत्मा's picture

21 Oct 2016 - 2:22 pm | अत्रुप्त आत्मा

पुढचा भाग कंदी लिवनार? लवकर लिवा नी टाका ना हुप्प्या भाव!

rahul ghate's picture

22 Oct 2016 - 4:51 pm | rahul ghate

हुप्प्या शेठ ,

आधीच्या भाग प्रमाणे हा भाग पण जबरी झाला आहे .
ह्या प्रकरण वर 1 द सिनेमा आला आहे का ? (हॉलिवूड किंवा बॉलीवूड )
तुमची लेखमाला वापरून पण 1 द सुंदर action सिनेमा बनवता यील

राहुल