झड श्रावणाची
अचानक श्रावणाची झड ती आली
अंग अंग भिजवून गेली
ओल्या केसातून बट ही ओघळली
चिटकून बसली गोऱ्या गाली
मोहक हालचाल सुखावून गेली
नकळत डोळे विस्फारून गेली
कवेत घेता काया ही थरथरली
चित्तवृत्ती मोहरून गेली
त्रेधातिरपीट उडवून गेली
यौवनास माझ्या खिजवून गेली
जेव्हा जेव्हा आठवते रात्र ती ओली
श्रावणात होते पापणी ही ओली
राजेंद्र देवी
प्रतिक्रिया
3 Oct 2016 - 9:05 pm | मिसळपाव
राजेंद्र,
सुरेख कल्पना आहे कवितेतली. थोडे टोचणारे कोपरे घासलेत! हे कसं वाटतं बघ;
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
श्रावण सर ती अवचित आली,
तव अंगांगे भिजवून गेली
हळूच भिजली बट ओघळली
खुणावीत ती गोर्या गाली
मोहक विभ्रम तुझिया तनूचे
अवघे ओसंडती मम नयनी
कवेत काया मग मोहरली
चित्तवॄत्ती त्या सुखावतीही
खळबळ मनी उमटवूनी गेली
यौवनास मम डिवचून जाई
आठव येता ओल्या रात्री
अश्रू आणी माझ्या नयनी...
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
4 Oct 2016 - 8:16 am | राजेंद्र देवी
अप्रतिम... धन्यवाद....