फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते. आपले चिमुकले पाय घेवून तो तिथल्या खुर्चीवर बसला खरा, पण चेहर्यावर कसलेच भाव नव्हते,......
त्याच्या वेदना जणू काही थिजून गेल्या होत्या. त्यावेळी त्याच्या मनात काय चाललं असेल याची कल्पनाच करवत नाही. त्याची निशब्दता अजूनच मन विषण्ण करून जाते. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मरण पावलेल्या चिमुकल्या
'आयलन कुर्दी' आणी आता हा 'ओमरान दानीश' हे दोघेही जगाच्या षंढ होत चाललेल्या मनोवृत्तीचे बळी आहेत. ओमरान नशीबवान होता म्हणुन वाचला पण आयलन दुर्दैवी होता, तुर्कस्तानच्या किनार्यावर त्याचं शव असं पडलं होतं कि, पाहण्यार्याला वाटेल हि एवढा निरागस जीव कधीही उठेल आणी आपल्याकडे पाहून हसेल..... काय चूक आहे या निष्पाप जिवांची, जे त्यांना असे हाल भोगावे लागतात. ऐन खेळण्या- बागडण्याच्या वयात जीव वाचवत देशातून परागंदा व्हाव लागतंय. आयलन आणि ओमरान यांची झालेली वाताहत जगासमोर आली म्हणून माहीत तरी पडली, असे कित्येक आयलन ना जीव वाचवत समुद्र पार करताना त्याच्या उदरात जल समाधी मिळाली. असंख्य ओमरान दहशतवाद्यांच्या गोळ्यांना, लष्कराच्या बॉम्ब हल्ल्यात मृत्युमुखी पडले, आईबापांना मुकले आहेत. घरा-दारांपासून आपल्या गावापासून निर्वासित होत छावण्या मध्ये आश्रय घेत आहेत. सीरियात राहणार्या लोकांची अवस्था खालच्या फोटोत अगदी सही-सही दाखवली आहे.
दहशतवाद हा सगळ्या जगाला लागलेला रोग आहे, याचा नायनाट जगतल्या सर्वानी मिळून केला तर हा रोग दूर होणं शक्य आहे नाहीतर असे कित्येक निष्पाप जीव जातील याची गणती नाही.
फोटो : गुगल साभार
प्रतिक्रिया
20 Aug 2016 - 11:06 am | बोका-ए-आझम
.
20 Aug 2016 - 11:25 am | मृत्युन्जय
युद्ध जेव्हा दारापर्यत पोचतो तेव्हाच त्याची भीषणता कळते. भारतासारख्या खंडप्राय देशात सगळी युद्धे सीमेवरच थांबवली जातात त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अजुन आपल्याला कळालेले नाही. बाकी ओमरानच्या चेहर्यावर निरागसपणा अजुनही शिल्लक आहे पण भावना थिजल्यात हे जाणवते. त्याचे आईवडील अजुन जिवंत असावेत अशी आशा करतो अन्यथा त्याचे बाल्य संपल्यात जमा आहे. इथे बसुन आपण त्याच्याबद्दल काहिच करु शकत नाही याचे अजुन वाईट वाटते.
20 Aug 2016 - 12:22 pm | निओ
:(
20 Aug 2016 - 1:31 pm | नरेश माने
या मुलाचा फोटो जेव्हा जेव्हा पाहतो तेव्ह मन एकदम सुन्न होऊन जाते. हसण्याबागडण्याच्या वयात त्यांना जे भोग भोगावे लागत आहेत ते खरंच वेदनादायक आहेत. दहशतवाद आणि सत्तालोलपूपणामुळे सिरियन जनतेला खुप काही भोगावे लागत आहे. याचा लवकरात लवकर अंत होवो एव्हढीच अपेक्षा करण्यापेक्षा आपण काहीही करू शकत नाही याची खंत जाणवत राहते.
20 Aug 2016 - 1:33 pm | अमितदादा
एकदम सुन्न...निशब्द..
20 Aug 2016 - 1:41 pm | पद्मावति
:(
20 Aug 2016 - 4:32 pm | शिव कन्या
राजकारण निर्ढावलेल्यांचे होते. पण बळी मात्र छोट्यांचा! :(((
20 Aug 2016 - 5:16 pm | अस्वस्थामा
या मुलांबद्दल सहानुभुती आहेच (जे घडतंय ते वाईटच्च आहे त्याबद्दल दुमत नाही) पण.
हा पण महत्त्वाचा आहे कारण हे फोटो राजकीय हेतूंनी प्रसारित केले गेलेले फोटो आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागतं (तुर्कीच्या किनार्यावरच्या फोटोबद्दल नंतर. इथे फक्त या ओमरानच्या फोटोबद्दल बोलू).
बहुतेक पाश्चात्य वृत्तपत्रांनी ह्या बातमीचे वार्तांकन करताना एका गोष्टीवर भर दिलाय तो म्हणजे, "(दुष्ट) असाद रेजीमसमर्थक (दुष्ट दुष्ट) रशियन हवाईदलाने केलेल्या बाँबहल्ल्यात झालेली वाताहत" पण हळूच सोईस्करपणे सांगतात की हल्ला अमेरिकेच्या पाठिंब्याने लढत असलेल्या बंडखोरांच्या ठिकाणांवर होता.
दॅट्स द रब.
अमेरिकेच्या पाठिंब्याने लढणारे बंडखोर हे साव नव्हेत. खरंतर ते कंपनी स्विच केल्यासारखे आयसिसमध्ये ये-जा करत असतात हे सातत्याने समोर आलेय तरीही त्यांच्यासाठी जागतिक समर्थन वाढवण्यासाठी हे फोटो वगैरे मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जातायत. त्यावर अगदी इमोशनल कहाण्या, लेख लिहिले जातायत.
मेलेल्यांच्या टाळूवरच लोणी खाणार्यांची चीड येते आणि लोकांची दु:खं विकून ऐश करणार्यांची तर अजूनच.
या युद्धात कोण बरोबर कोण चूक हे कधीच मागे पडलंय. सामान्यांची दैनाच उरलीय फक्त. :(
(कुर्दी, इराकीं रेफ्युजींकडून तिथल्या "युद्ध" कथा ऐकलेला )
20 Aug 2016 - 5:30 pm | यशोधरा
+1
20 Aug 2016 - 6:07 pm | उडन खटोला
अगदी अगदी.
ट्रोजन हॉर्सेस आहेत असले फोटो म्हणजे. भिकारी अर्थ/+सत्ता.
20 Aug 2016 - 7:35 pm | अभ्या..
अगदी अगदी.
परफेक्ट अस्वस्थाम्या.