मी एक शेतकरी.....भाग १.... शेतीसाठी लागणार्‍या मुलभूत गोष्टी....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
4 Jul 2016 - 3:16 pm

डिस्क्लेमर : ह्या लेखांत शेती कशी निवडायची आणि कमीत कमी पैशांत शेतीची राखण कशी करायची? ह्या संबंधीच चर्चा केल्यास उत्तम.

पुढील भागा पासून आंबा शेती, काजू शेती, आवळा शेती, मत्स्य शेती, मधमाशा पालन असे विषयवार लेख घेवू या.जेणेकरून इतरांना विषयवार लेख शोधायला अडचण येणार नाही.

=====================================

थोडे स्वतः विषयी.

मी मारून मुटकून इंजिनियर झालेलो.म्हणजे ३ वर्षाचा डिप्लोमा करायला ९ वर्षे घेतलेला.(१९८१ ते १९९०)सुदैवाने डिप्लोमा झाल्यावर नौकर्‍या मिळत गेल्या आणि जसा-जसा अनुभव मिळत गेला तसा-तसा पगार पण वाढत गेला.

सुदैवाने म्हणा किंवा नशीबाने म्हणा, १४-१५ वर्षे खेडेगावाच्या आसपासच नौकरीचे ठिकाण असल्याने बरेच कर्मचारी , शेती करता करता, नौकरी करत असलेले.

जसे जसे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले आणि मग पुढे त्यांच्या शेतातच मन रमायला लागले.

त्यांच्या शेतात फुकट काम करतांना, (साधारण १९९३च्या सुमारास) जाणवले की, बाबा हेच तर आपले क्षेत्र.

१९९३ पासून २००६ पर्यंत जसा वेळ मिळेल तसा विविध शेतकर्‍यांना भेटायचा शिरस्ता चालू ठेवला.

१९९३ ते १९९९८ पर्यंत, वलसाडला , सतीश देसाई आणि १९९८ ते २००६ पर्यंत श्री. अण्णा पोटे (राहणार लोटे..खेड आणि चिपळूणच्या मध्ये) ह्यांच्या शेतावर पडीक असायचो.

२००६ नंतर आर्थिक घडी रुळावर यायला सुरुवात झाली आणि मग शेत विकत घेण्यासाठी शेती बघणे पण सुरु झाले.

त्यावेळी आलेले काही आर्थिक अनुभव.

२००६ मध्ये एकरी १ लाख रुपये असलेल्या जागेची (त्यात ५ वर्षे जूनी आंब्याची आणि काजूची झाडे) (एकूण किंमत १० लाख) आजची किंमत एकरी २० लाख.

२००६ मध्ये एकरी ५०,०००/- (एकही झाड नाही.पडीक जमीन.) असलेल्या जागेची आजची किंमत एकरी २५ लाख.

२०१२ मध्ये मी एक जागा बघीतली, एकरी १,२०,०००/- आजची किंमत एकरी २,४०,०००/-

अर्थात ह्या सगळ्या जागांना स्वतःचे पाणी असल्याने आणि वीज असल्याने आणि रस्ता लागून असल्याने किंमत वाढतीच राहणार. ज्या जागांना अशा सोई नाहीत त्यांनाही परतावा बँकेच्या व्याजापेक्षा जास्तच आहे.

ह्या आर्थिक फायद्याकडे बघत असतांनाच, विदर्भातल्या शेतकर्‍यांशी पण प्रवासादरम्यान बोलणे होत होतेच.(बादवे, ११ जुलै ते १६ जुलै ह्या दरम्यान विदर्भात शेती बघायला जात आहे.)

मध्यप्रदेशात शेकडो एकर शेती कसत असलेल्या एका शेतकर्‍या घरात पण ३-४ दिवस वास्तव्य झाले.

गेल्या २०-२२ वर्षांच्या अनुभवाने हाती आलेली काही मुलभूत माहिती.

१. स्वतः शेतात राहून शेती करत असाल तरच शेती करणे.

२. काम टाळणे ही प्रवृत्ती सगळ्याच शेती आधारीत कर्मचार्‍यांमध्ये थोड्या-फार प्रमाणात असते.

३. कुटुंबाची विशेषतः जोडीदाराची साथ नसेल तर शेती करणे हा आतबट्याचा व्यवहार ठरायची शक्यता जास्त.

४. शेतकर्‍याने अजिबात कर्ज काढू नये किंवा लग्न-मुंज इत्यादी कार्यात वायफळ खर्च करू नये.

५. शेती आधारीत पुरक उद्योग किंवा ३-४ लेयर शेती उपाशी मारत नाही.

=========

३-४ लेयर शेती म्हणजे.

शेत-तळ्यातले मत्स्य पालन.आंतर-पिक (आले-हळद,मिरच्या,पालेभाज्या) फलोत्पादन (नारळ,पपनस,फणस,आंबे) आणि तोंडली, दोडकी, दुधी,घोसाळे,पडवळ इ. मांडव-आधारीत फळभाज्या.

शेती आधारीत पुरक उद्योग. (जे मी करायचे ठरवले आहे, कारण तेच मला शकतील.त्यामुळे, वराहपालन किंवा शेळी पालन दिलेले नाहीत.)

१. कुत्रे.

२. कोंबड्या.

३. देशी गाई.

४. मधमाशी पालन.

==============

६. वर्षभर विकता येईल अशी जास्तीत जास्त उत्पादने घेणे.

जसे,नारळ,काजू आणि चिकू (चिकू सगळ्यात उत्तम आर्थिक फळ.नफा होवो की न होवो पण अजिबात तोटा नाही.२-३ बहार येतात आणि उन उत्तम असेल तर चिकू सुकवून ठेवता येतात.चिकू विषयीच्या लेखांत ती माहिती येईलच.)

७. कमीत-कमी ३ बाजारपेठा किंवा आठवडी बाजार जवळ असाव्यात.

८. सर्वात महत्वाची पदावली.....

१-२-३-५-७-१०-१५, ही पदावली साधारण प्रत्येक व्यवहारात उपयोगी पडते मग ती शैक्षणिक असो किंवा व्यावसाइक किंवा शेती.

१ ====> स्वतःच्या शेती बरोबर सुसंवाद आणि तिथल्या निसर्गाशी स्वतःला जुळवून घेणे आणि स्थानिक लोकां बरोबर संबंध स्थापित करणे आणि शेतीची पुर्व मशागत.

२ ====> शेतीला आणि बाजारपेठेला अनुकुल असे वृक्ष लावणे. (मी जरी कोकणात शेती करणार असलो तरी, आंबा किंवा सुपारी न लावता, आवळा,चारोळी आणि नारळ ह्याच वृक्षांची लागवड करणार आहे.आले-हळद ह्यांचे आंतर-पीक ह्या वृक्षांत घेता येते, असा अंदाज आहे.शिवाय ह्या सगळ्यांची बाजारपेठ २०-२५ किमीच्या आसपासच आहे.)

३ ====> वृक्षांची परत एकदा निगा राखणे आणि आढावा आणि कुत्र्यांच्या पिल्लांची विक्री.

५ ====> वृक्षांची परत एकदा निगा राखणे आणि आढावा.शक्य झाल्यास गोठा आणि गाईंची संख्या वाढवणे.

७ ====> आले आणि हळद ह्याचे सुंठेत आणि हळकुंडात रुपांतर करायचा घरगूती कारखाना.

१० ====> नारळच्या परताव्याला सुरुवात.

१५ ====> ही शेती मुलांच्या ताब्यात देवून दुसरी शेती विकत घेवून कसायला सुरुवात करणे किंवा शेती आधारीत पुरक व्यवसायाला उपयुक्त अशी दुसरी जागा घेणे.

जसे, गोठा जर उत्तम प्रकारे सांभाळत असाल तर, त्या व्यवसायाला मुख्य शेतीतून बाजूला काढणे.

===========

मी ज्या ज्या मोठ्या शेतकर्‍यांना भेटलो, त्या प्रत्येक शेतकर्‍याने, जसे जमेल तसे शेती वाढवायचाच प्रयत्न केला. किंवा ताब्यात असलेली अडीक जमीन फुलवायचा प्रयत्न केला.)

९. निदान ३ वर्षे तरी सर्व कुटुंबाचे भागेल इतपत पैसा गाठीशी असावा.

शेती उपाशी मारणार नाही पण निदान ३ वर्षे तरी नफ्याचे प्रमाण फार नसते. त्यामुळे आजारपणा साठी पैसा शिल्लक असावा.

१०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य.

११. सुरुवातीला टेंपो किंवा ट्रक अशा गाड्यांवर जास्त पैसे खर्च न करता, रिक्षा घेणे.

१२. शेती बाबत जितके ज्ञान मिळवाल तितके कमी आणि जितके प्रयोग कराल तितके कमी.

त्यामुळे ज्यांची वडीलोपार्जित शेती नसेल त्यांनी किमान १०० शेतकर्‍यांना भेटल्या शिवाय किंवा निदान २-३ वर्षे शेतात वेळ घालवल्या शिवाय शेती करू नये.अद्याप तरी स्वतःला सर्वज्ञ समजणारा शेतकरी, मला भेटलेला नाही.

१३. बर्‍याच ठिकाणी मजूर मिळत नसल्याने, जी कामे आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबियांच्या मदतीने करू शकतो त्याच प्रकारची शेती करावी.

उदा.

नारळाची सिंगापूरी जात. एखादी शिडी लावून नारळ उतरवता येतात.

१४. शेताला पाण्याचा बारमाही स्त्रोत फार महत्वाचा.

सुदैवाने माझे शेत धरणाच्या बाजूला असल्याने, मला ती चिंता नाही.पण जर शेतात पाणी नसेल तर, शेत तळे किंवा विहिर हाच एक पर्याय शिल्लक राहतो आणि मग पाण्याचे नियोजन करायला वीज पण लागतेच.

१५. शेतीच्या पिकाची फार अपेक्षा धरू नये किंवा पिका आधारीत आर्थिक नियोजन करू नये. चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे, ह्या प्रकारेच शेती होते.

अपेक्षा आल्या की ओघा-ओघानेच अपेक्षाभंग पण व्हायची शक्यता होते आणि मग कुटुंबकलह पण सुरु होतो.

त्यामुळे शेतीच्या उत्पन्नावर चैन करायच्या भानगडीत पडू नये.

स्वतः बघीतलेले एक उदाहरण.

मध्य प्रदेशातील एक धनाड्या शेतकरी.

३ पिढ्यांपुर्वी हजारो एकर शेती आणि त्यांच्या शेतात राबणारे असंख्य मजूर.इतके श्रीमंत की घराच्या बाहेर घोडे बांधण्याची पाग.

पण प्रचंड प्रमाणात असलेली चंगी-भंगी वृत्ती आणि सरंजामी प्रवृत्ती.

आज त्यांची परिस्थिती अशी आहे की, हातात जेमतेम ४०-५० एकर शेती आणि त्यांचे कालचे नौकर आज त्यांच्याच शेतीचे मालक.

शेतातला पैसा हा देवाचा.

त्याला पापाच्या वाटा फुटल्या की, अधोगती ही ठरलेलीच.

१६. शेतीला स्वतःचा रस्ता हा हवाच.

मुळात माणसाचा स्वभाव "माझे भले नाही झाले तरी हरकत नाही, पण तुझे भले होवू देणार नाही." ह्या वृत्तीचाच.

त्यामुळे, शेजार्‍याची पडीक जमीन असेल आणि तुम्हाला ती तुमच्या शेतात जायच्या वाटेवर असेल तरी तुमचा शेजारी ती तुम्हाला अजिबात विकणार नाही.

==========================

ही मुलभूत माहिती देणार्‍या असंख्य शेतकरी बांधवांची मदत झाली.त्यापैकी काही जणांचा उल्लेख करणे भाग आहे.

१. श्री. रानडे (अमरावतीत शेती.शेतीतले तोटे फार उत्तम रित्या समजावले.स्वतः शेती करण्याशिवाय पर्याय नाही, हे अनुभवलेला शेतकरी.)

२. स्व. अणा पोटे (पाटाच्या पाण्यावरची शेती आणि मजूरांच्या अनुपस्थितीत स्वतः शेतात राबणारे.नौकरी करता-करता पडीक जमीनीचे नंदनवनांत रुपांतर केले.)

३. श्री. गद्रे (टिमार्णी, मध्यप्रदेश.दहावीच्या मेरीट लिस्ट मध्ये आलेले.आई-वडील दोघेही डॉ. १२वीत उत्तम मार्क्स मिळवून देखील पुढील शिक्षण न घेता शेतीत रमणारे.मजूरा आधारीत आणि निसर्गा आधारीत शेती असल्याने, त्यातील तोटे फार उत्तम रित्या समजले.)

४. श्री. मारूती तिडके (नाशीक जवळील एका गावात आवळ्याची शेती.आवळ्याच्या शेतातले फायदे समजले.पुर्णवेळ मजूर लागत नसल्याने, मी आवळ्याची शेती करायची ठरवली आहे.)

५. सौ.निशिगंधा केळूस्कर (ह्या ठाण्याला राहतात.गेली काही वर्षे विविध शेतकर्‍यांना भेटून , शेतकर्‍यांना नैस्र्गिक शेती करायची माहिती देतात. ह्यांच्याकडे झिरो बजेट शेती विषयी माहिती मिळाली.)

६. श्री. राजू भट (हे बदलापूरला राहतात.केवळ ५ एकर शेती मध्ये विविध पिके घेणारे आणि शेती विषयक तज्ञ.)

७. श्री. विजय केळकर (हे खेरशेत, आरवली, चिपळूण-संगमेश्र्वर रोडवर, राहतात.नविन पिढीतले शेतकरी.स्वतःची राईसमिल असणारे.निव्वळ केळकर पिता-पुत्रच नाही, तर त्यांचे सर्व कुटुंबच शेती कामात व्यस्त असतात.)

८. श्री. श्रीकृष्ण जोशी (रत्नागिरी-गणपती पुळे रोडवर बसणी गावात शेती करतात.वय वर्षे ७५.पण अद्याप रोज रत्नागिरी ते बसणी प्रवास करतात आणि स्वतः शेतीत रमतात.)

९. स्व.सतीश देसाई (मी मगोध-मंदिर, वलसाड इथे रहात असतांना मला त्यांनी त्यांच्या शेतात प्रवेश पण दिला आणि आंबा व्यवसायाची तोंड-ओळख पण करून दिली.)

१०. श्री. व सौ.कामत (मुक्काम लांजे, गेली १५-२० वर्षे सात-साडेसात एकर शेती करतात.झोपडी ते बंगला असा आर्थिक प्रवास स्वतः शेतात राबून केलेले कुटुंब.भयंकर हरहून्नरी.व्हॅक्यूम-क्लीनरचा वापर करून घराचे रंगकाम स्वतः केले.काजूच्या अर्थकारणाची माहिती करून दिली.)

११. श्री व सौ. पटवर्धन (नागाव, अलिबाग इथे शेत असल्याने, कोकणातील भाजी-पाला ह्याविषयी माहिती दिली.शेती उपाशी मारत नाही, हे स्वतः अनुभवलेले.)

१२. श्री. चिकूवाले.(२००३ मध्ये ह्यांना भेटलो होतो आणि ह्यांचे नांव आता विसरलो.चिपळूण ते कराड ह्या रस्त्यावर रहात होते.धाकटा मुलगा जुगारी आणि इतर २ही मुलांना शेती करण्यात रस नाही.पण त्यांच्या वयाच्या ७०व्या वर्षी देखील एकदम टुणटूणीत.चिकूची बाग, आंबा, नारळ आणि गाई-म्हशींचा गोठा असे सगळे एक-हाती सांभाळणारा.सुकलेले चिकू करणारा आणि ते स्वतः रस्त्यावर फतकल मारून विकणारा करोडपती.शेतकर्‍याने माल विकतांना लाजू नये, हे शिकवणारा.त्या दिवशी मी पण त्यांच्या जोडीने रस्त्यावर उभा राहिलो.फुकटात आयुष्यभराची शिकवण मिळाली.)

१३. नाशिकला जातांना प्रवासात एक, आई-वडील नसलेला, तरूण भेटला.१२वी नंतर इंजिनियरिंगचे शिक्षण काकांच्या शेतात राबून आणि गाई-गुरांना सांभाळून पुर्ण करत असलेला.पाठीवरच्या बहीणींच्या लग्नासाठी एक-एक पैसा जमवत असलेला.

त्याने द्राक्षाच्या शेताचे अर्थकारण समजावून सांगीतले.

आता ह्या तरूणाला पोरके तरी कसे म्हणायचे?

काही मिपाकर......

१४. सुरंगी (आता ह्यांच्याविषयी काय बोलणार? जिथे-जिथे मला त्यांच्या सल्ल्याची गरज पडली, त्या-त्या प्रत्येक वेळी त्यांनी व्यवस्थित सल्ला दिला.)

१५. नाखू काकांचे शेतीविषयक लेख.

१६. पैसा (कधीही आणि केंव्हाही फोन केला तरी, काजू पिका विषयी पूर्ण माहिती दिली.)

१७. जेपी (नवा आय.डी. काय असेल तो असेल.लातूर विभागात चालणार्‍या फसवणूकीची माहिती दिली.)

आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे, ह्यापैकी कुठल्याही व्यक्तीने एकही पैसा न घेता, किंवा कुठल्याही प्रकारे परतफेडीची अपेक्षा न धरता, भरपूर ज्ञान दिले आणि शेती घेण्याच्या आत्मविश्वास पण दिला.

सांगायला अतिशय आनंद वाटतो की, भारतातील शेतकरी असेल त्या परिस्थितीत, आदरातिथ्य करतो.अद्यापतरी मला किंवा माझ्या बायकोला, कुठल्याही शेतकर्‍याने उपाशीपोटी ठेवले नाही.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारमाहिती

प्रतिक्रिया

इरसाल's picture

4 Jul 2016 - 3:26 pm | इरसाल

आणी ग्रेट मुवी !!!

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 3:27 pm | टवाळ कार्टा

पुभाप्र

उल्का's picture

4 Jul 2016 - 3:29 pm | उल्का

छान माहितीपूर्ण धागा.
पुलेशु. पुभाप्र.

जेपी's picture

4 Jul 2016 - 3:31 pm | जेपी

वाचतोय..

प्रफुल्ल's picture

4 Jul 2016 - 3:42 pm | प्रफुल्ल

खरच खुप सुंदर माहिती आहे !! मु वि रॉक्स !!

माहितगार's picture

4 Jul 2016 - 3:43 pm | माहितगार

रोचक अनुभवावर आधारीत लेख, वाचतोय. माझा शेती क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंध नाही पण तरीही खेळतं भांडवल या संकल्पनेशी एक व्यावसायीक या नात्याने शेतकरी कुटूंबे परिचीत असावित असे वाटते म्हणून दूवा शेअर केला आहे.

पु.ले.शु

वृक्षा आधारीत तर जास्तच काळजी पुर्वक.

कारण कुठलीही फळ झाडे पुर्ण वाढ झाल्याशिवाय उत्पन्न देत नाहीत आणि प्रत्येक फळझाडाची फलधारणा करण्याचा वेळ वेगवेगळा असतो.तो पर्यंत तग धरून राहणे, हे महत्वाचे.

म्हणूनच मी सुरुवाती पासूनच बिन-पैशाच्या किंवा फिक्स मधील व्याजावरच शेती करयाचे ठरवले आहे.

एखाद्या वर्षी जर झाडे नाही लावता आली तर मुद्दाम एफ.डी. मोडून तो अट्टाहास करायचा नाही.

शिवाय पुढे मागे जर फळझाडांपासून अपेक्षित उत्पन्न मिळायला लागले की, सरळ मंथली इन्कम स्कीम मध्ये पैसे गुंतवायला सुरुवात करायची.

शेतातल्या उत्पन्नावर हौस-मौज करू नये, असे माझे मत.

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 3:54 pm | मुक्त विहारि

जे मिपाकर शेतकरी आहेत, त्यांनी पण माहिती दिल्यास फार उत्तम.

कारण मी अद्यापही शिकत असल्याने, मी दिलेली माहिती तोकडी असल्याचे मला माहीत आहे.

नाखु's picture

4 Jul 2016 - 3:56 pm | नाखु

पुलेशु

पुशेशु (पुढील शेतीला शुभेच्छा) एक शेतीविषयक लेख फारा पुर्वी लिहिला आहेच तुम्ही.

सांगायला अतिशय आनंद वाटतो की, भारतातील शेतकरी असेल त्या परिस्थितीत, आदरातिथ्य करतो.अद्यापतरी मला किंवा माझ्या बायकोला, कुठल्याही शेतकर्‍याने उपाशीपोटी ठेवले नाही.

त्याच शेतकर्याला उपाशी.अर्धपोटी ठेवायला त्यांच्याच शहरी स्नेहांच्या/नातलगांचा आणि बिलंदर धोरणी/नतद्र्ष्ट पुढार्यांचा हिरिरीने सहभाग आहे हे कटु असले तरी सत्य आहे.
आपल्याच गाववाल्या शेतकर्याला व्यवहार निपुण आणि तंत्रज्ञानाचा विधायक ऊपयोग,त्याच्या उत्पादनाला उठाव देण्यासाठी प्रतवारी/गुणवत्ता आवश्यक आहे हे सोदाहरण पटवून देणे आणि स्थानीक (शहरतली/संकुलातली) जागा उपलब्ध करून देणे अश्या गोष्टींसाठी किती प्रामाणीक प्रयत्न होतात ते पाहणे रोचक्/विस्मयकारक(केविलवाणे) आहे.

शेतकरीही अश्याबाबत बरेचसे परावलंबी व अनुदानप्रिय झाल्याचे दिसते (अपवाद असतीलही, नव्हे आहेतच).

शहरात दुरदैवाने (शहरालगतेचे) गुंठामंत्री (संपत्तीची सूज आलेले) दिसत असल्याने हेच खरे शेतकरी असे वाटू लागते आणि खर्या सुदुर खेड्यातलया शेतकर्याबद्दलही खरे चित्र/वस्तुस्थीती समजत नाही.शालेय जीवनात वसतीग्रुहात अस्सल शेतकर्याची मुले वर्गमित्र्/सहाअध्यायी असल्याने वस्तुस्थीती तेव्हांपासून माहीती आहे.सफ्धन शेतकर्यांचे संपत्तीचे ओम्गळवाणे प्रदर्शन आणि घराण्याचा (फुकाचा) माज हाही एक पैलू आहेच.शहरी माणसांचा शेतकर्याशी(त्याच्या गंभीर समस्यांशी) नाळ नीट न जुळण्याचा..

तुमचा प्रकल्प यशस्वी होणारच (म्हणजे मला व्यक्तीशः हक्काने कुणाला विचारायचे याचा फार विचार करावा लागणार नाही)

माझा उल्लेख केला तर पुन्हा एकदा सांगतो "मी तो हमाल भारवाही" हे धन दुसर्या कुणाचे आहे ते तुम्हापर्य्म्त पोचवणारा साधा पोष्टमन आहे मी.

मिपाच्याच मातीतला शहरी (भावी शेतकरी) नाखु

मुक्त विहारि's picture

4 Jul 2016 - 4:24 pm | मुक्त विहारि

अहो,

पण बरेच जण स्वतः पाशी असलेले ज्ञान इतरांना द्यायला काकू करतात.(मिपाकर ह्या काकू करणार्‍यात मोडत नाहीत.) म्हणूनच तर तुमचे,जेपीचे.सुरंगी ताई आणि पैसा ताई अशांचे कौतूक वाटते.

तुम्ही सर्वचजण कुठल्याही प्रकारे परतफेडीची अपेक्षा न करता, स्वतःचा वेळ खर्च करून माहिती देता, मग निदान आम्हाला आभार तरी मानू द्या.

आणि खरे सांगायचे तर, शेतकर्‍याला अर्धपोटी ठेवणारे शहरी माणसे नसतात तर दलाल असतात.

आमच्याकडे विना दलाल, काही शेतकरी अननस किंवा पपई किंवा द्राक्षे विकतात.

आता एक साधे हळदीचे उदाहरण घेवू. एक तर हळद हे आंतरपीक. नारळ-आवळा ह्यांच्या लागवडीत हे पण पीक घेता येते.खूप मोठा खर्च पण नाही आणि वर्षभर विकता येते.

ओल्या हळदीपेक्षा हळकूंड जास्त भावात विकल्या जाते आणि हळदपूड तर कितीतरी जास्त.

ओल्या हळदी पासून हळद पूड बनवायला फार खर्च पण येत नाही.

पण मधले दलाल ह्या व्यापारात जास्त पैसे कमावतात.

आणि फक्त हळदच कशाला?

मिरचीच्या बाबतीत पण तसेच आणि मिरी,लवंगा,दालचिनी,जायफळ्,तमालपत्र ह्या बाबतीत पण तसेच.

थोडे अजून कष्ट आणि सहकारी तत्वावर किंवा महिला बचत गटा तर्फे कारखाना उभारून पण हे शक्य आहे.

शिवाय आता नविन कायद्यानुसार, शेतकर्‍याला थेट माल विकायला, सरकारने परवानगी पण दिली आहेच की.

माझी २०० किलोची हळदीची आणि तितकीच तिखटाची बाजारपेठ (चिपळूणची) आज हातात आहे.

जर मी, ज्याची वडीलोपार्जित शेती नाही, तो जर बाजारपेठ शोधू शकत असेल तर, शेतकर्‍यांना पण ते सहज शक्य होईल.

माझी एक मैत्रीण गेली ३-४ वर्षे स्वतःच्या शेतातले आंबे स्वतः ट्रकमधून आणून डोंबिवलीत बाजारभावापेक्षा २५% कमी किमतीत विकते.

एका स्त्रीलाच हे जमू शकते ते पण एक कटू सत्य.

शेतकरी आत्महत्या करतो पण शेतकरीण नाही, हे पण दुसरे कटू सत्य.

आणि

महिला बचत गट जे करू शकतात ते पुरुषांच्या सहकारी संस्था करू शकत नाहीत, हे तिसरे कटू सत्य.

म्हणूनच मी म्हणालो, की शेतीच्या व्यवसायाला स्त्रीची साथ नसेल तर शेतीतला पैसा पाण्यात जायची शक्यता जास्त.

बोका-ए-आझम's picture

5 Jul 2016 - 9:48 am | बोका-ए-आझम

एका स्त्रीलाच हे जमू शकते ते पण एक कटू सत्य.

कटू नाही, हे निर्विवाद सत्य आहे. आज माझ्या काकांच्या शेतात जर काही पीक येत असेल (मुंबई - गोवा महामार्गाजवळ लोणेरे येथे, तालुका माणगाव, जिल्हा रायगड) तर त्यामागे काकूचे श्रम आहेत.

सुनील's picture

5 Jul 2016 - 9:57 am | सुनील

शेतीचा शोध हा स्त्रियांनीच लावला असे समाजशात्रज्ञ माननात.

लेखमाला छान सुरू आहे.

असेलही,

मोठे शेतकरी सोडले तर, अल्प आणि मध्यम आकाराची शेती कसण्यात, घरच्या स्त्रियांचा बराच हातभार असतो. असे माझे निरिक्षण.

अनुप ढेरे's picture

4 Jul 2016 - 4:14 pm | अनुप ढेरे

छान लेख!

प्रचेतस's picture

4 Jul 2016 - 5:31 pm | प्रचेतस

उत्तम लिहिलंय.

आमच्याकडनं शुभेच्छा आहेतच.

दापोली >>गव्हे गावात जाऊन अमृतकर यांची शेती पाहा.हा माणूस कोकणी नाही देशावरचा आहे.आज पन्नास लोक कामाला ठेवून आहे.गेल्या वीस वर्षातली कमाल आहे.
दुसरी गोष्ट आपल्या हातात नाही पण आपल्यावर परिणाम करते ती म्हणजे सहकार.तो कोकणात नाही हे सत्य पचवावे लागते.

+ १

पण....पण....पण....भविष्यात सहकाराचा स्वाहाकार व्हायला पण वेळ लागत नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Jul 2016 - 7:55 pm | कैलासवासी सोन्याबापु

१०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य.

तुती हा एक वेगळ्या वाटेवरचा पर्याय सुचवतो ह्याला जोडून, पानफुटी नंतर कोवळे खोडवे रेशीमउत्पादक मंडळीला विकले जाऊ शकतात (आधी बोलणी केल्यास) नाहीतर जर बंदिस्त शेळीपालन केल्यास हिरव्या चाऱ्याचा उत्तम प्रबंध होईल एरवी चाऱ्याकरता राखिवात जाणार एक दोन गुंठे तुकडा नगदी लागवडी खाली आणायला वाचवला जाऊ शकतो,

विदर्भात शेतकरी मंडळीला वरदान ठरेल असा एक फळ अधिक तेलबिया शेती प्रकल्प डोक्यात आकार घेतोय काका, जमेल तसे व्यनि वर चर्चा करूयात

अन्या दातार's picture

4 Jul 2016 - 10:15 pm | अन्या दातार

१०. कुंपणावर कमीत कमी खर्च करावा.निवडूंग आणि बांबू ह्यासाठी एकदम योग्य.

याव्यतिरिक्त सागवानाचा विचार करण्यास हरकत नाही. २५-३० वर्षांनी उत्तम परतावा मिळण्याची अपेक्षा करण्यास हरकत नसावी. आम्ही नुकतीच याची लागवड बांधावर केली आहे. त्यामुळे सध्यातरी परताव्याबद्दल निश्चित सांगू शकत नाही. जनावरे तोंड लावत नाहीत. सरळसोट वाढत असल्याने व काटे नसल्याने रिस्क नाही. बांबूतील उष्णतेमुळे जमिनीचा पोत खराब होतो असे ऐकून आहे.

काटेरीच हवे असेल तर सागरगोटा हा दुसरा पर्याय.

पण मी शक्यतो सागवान लावणार नाही.

७२ गुंठे जागेत रोजची मीठ-भाकरी आधी आणि मग जमेल तसे, रोख उत्पन्न देणारी झाडे, असा बेत आहे.

पुढे-मागे जर १०-१२ एकर जागा घेऊ शकलो, तर मात्र साग/खैर अशा लाँग टर्म झाडांचा विचार करीन.

जेणेकरून,

७२ गुंठे = मंथली इन्कम स्कीम

१०-१२ एकर = २०-२५ वर्षांनी, पण पुढे दर-वर्षी मिळणारा बोनस. (दर वर्षी अर्धा एकर सागवान लावायचा.अर्ध्या एकरात साधारण १५० ते २०० साग लागवड होवू शकते.आजच्या भावाने अर्ध्या एकराचे ७ ते ८ लाख उत्पन्न दरवर्षी मिळू शकते.नाशीकला श्री.मारुती तिडके, ह्यांनी पण हाच प्रयोग केला आहे.पण त्यांच्या कडे बर्‍यापैकी शेती असल्याने ते २०-२२ वर्षे वाट बघू शकतात.माझी शेती कमी असल्याने, सध्या तरी रोजची फक्त मीठ-भाकरी.)

पैसा's picture

5 Jul 2016 - 11:27 am | पैसा

तो बरोबर सांगतोय. मुख्य लागवड म्हणून नव्हे तर कुंपणाच्या कडेने, जी जागा एरवी फुकट जाते तिथे तुम्ही साग लावू शकता. आणि त्याला जर पाण्याची सोय चांगली असेल (ती तुमच्याकडे आहे) तर २० नव्हे तर ८/१० वर्षात ही झाडे कापण्यायोग्य होतात. तेव्हा पूरक उत्पन्न चांगले मिळेल.

मुक्त विहारि's picture

5 Jul 2016 - 11:47 am | मुक्त विहारि

बांधावर सागच लावतो.

कपिलमुनी's picture

5 Jul 2016 - 4:04 pm | कपिलमुनी

साग , चंदन या सातख्या रोख उत्पन्न देणार्‍या झाडांची चोरी होण्याचा संभव असतो . तुम्ही ५-६ वर्ष वाट पाहिलेले झाड एखाद्या दिवशी गावी गेलात की गायब होता . मशोन कटर ने तासाभरात काम होता. ( अनुभवाचे बोल आहेत).
त्यामुळे
१.गुरे आणि माणसे तोंड लावणार नाही
२. ज्या झाडांची सावली आणि मुळे पसरणार नाही
३. पक्षी जास्त घरटी बांधणार नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 5:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

कपिलमुनींशी सहमत आहे,

एकेकाळी आमच्या सवा एकर प्लॉट मध्ये सागवान होता, बेटा 9 10 वर्षे भरलाच नाही (फक्त 12-17 इंच व्यास सरासरी) हा वेगळाच मुद्दा झाला, त्याचे कुटाने लैच असतात मुवि काका, कापताना मनात आले कापले असे करता येत नाही, कापताना वनविभाग सामाजिक वनीकरण शाखा ह्याच्या वनअधिकाऱ्याची सही लागते, त्याचे percentage असते झाडांच्या संख्येवर, ते खाऊनही वेळेवर देत नाहीत परवानगी, दिलीच तर पुढे झाडांचे नंबरिंग करायला येणाऱ्या मुकादमाला चिरीमिरी अलग, एखादे झाड साहेबाच्या बहिणीच्या घरी फर्निचरला गृहीत धराच,लावलेल्या सागवनांचे निबंधन राज्य हरीत लवादात सुद्धा होते (ही ऐकीव आहे माहिती) ते कमी घेराचे झाड कापायचे म्हणले की कुरकुर करतात, आमच्या शेतात शेवटी ते वांझ पीक पाहून डोके उठत असे सागवानाच्या बुडाशी काहीच उगत नाही, आम्ही भाजीचे वाफे करायचे घाट घातले होते पण सागाच्या पत्रावळीइतक्याल्या पानाखाली सूर्यप्रकाशच झिरपतच नाही उगवणार डोंबल तिच्यायला अगदी कडवळ किंवा बरसीम सारखे चारेही उगवत नाही, आमचे सागवान कापायचे होते तेव्हा ते कापून मग चोरीला गेल्याचे एफआयआर करून मग ते नियमित करायचे वगैरे प्रताप एका मध्यस्थाने करून प्रताप आमच्याच अंगाशी आणले होते, त्यात परत वकिलाचा भुर्दंड वेगळा लागला (मध्यस्थाने 50% घेतले वकिलाच्या फी मधले),

तेव्हा अवोईड सागवान हा माझा सल्ला असेल, तुम्ही जरी सागवान बांधावर लावायचे म्हणत असले तरी तुम्ही बांधावर लावताय म्हणून सागवान अशोक होणार नाही, घेर होणारच, तो घेर पूर्ण चतुःसीमेच्या भोवती म्हणला तरी आतल्याबाजुने 5 एक फूट जागा खाणारच चारही बाजूने म्हणजे अंदाजे एखाद गुंठा जमीन बरबाद होणारच होणार असे वाटते

माहितगार's picture

6 Jul 2016 - 3:42 pm | माहितगार

अवघड आहे !

त्याचे कुटाने लैच असतात मुवि काका, कापताना मनात आले कापले असे करता येत नाही, कापताना वनविभाग सामाजिक वनीकरण शाखा ह्याच्या वनअधिकाऱ्याची सही लागते, त्याचे percentage असते झाडांच्या संख्येवर, ते खाऊनही वेळेवर देत नाहीत परवानगी, दिलीच तर पुढे झाडांचे नंबरिंग करायला येणाऱ्या मुकादमाला चिरीमिरी अलग, एखादे झाड साहेबाच्या बहिणीच्या घरी फर्निचरला गृहीत धराच,लावलेल्या सागवनांचे निबंधन राज्य हरीत लवादात सुद्धा होते (ही ऐकीव आहे माहिती) ते कमी घेराचे झाड कापायचे म्हणले की कुरकुर करतात,

खरं जर असं असेल तर भीक नको पण कुत्रं... अस्म म्हणावं लागतयं.

ही शेतकर्यांना नडणार्या पिलावळीला एकदा जन्माची अक्कल घडली पाहिजे (मंत्र्यांच्या आशीरवादाने आणि गुंडाच्या अभयाने ती मिळणार नाही हेच खरे.)

मागे किमान दोन वर्षामगे आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या विधवेकडून राऊत नावाच्या जिल्हाधिकारी बाईंनी पैसे मागीतले,देऊ शकत नसल्याने त्या विधवेला घरच्या शेळ्या विकून पैसे दे असेही सांगीतले अशी लोकसत्तात बातमी वाचली होती कुणाला सापडली तर दुवा द्या.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Jul 2016 - 5:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

ही शेतकर्यांना नडणार्या पिलावळीला एकदा जन्माची अक्कल घडली पाहिजे (मंत्र्यांच्या आशीरवादाने आणि गुंडाच्या अभयाने ती मिळणार नाही हेच खरे.)

एक निरीक्षण आहे, म्हणजे अगदी शास्त्रोक्त वगैरे नाही पण माझ्या पाहण्यात 'हे निरीक्षण आहे' हे म्हणण्यालायक डोळ्यात भरावेत इतके अनुभव आलेत, ते निरीक्षण म्हणजे असे बळीराजाला नाडणाऱ्या अधिकाऱ्यांचे सपशेल तळपट वाजलेले पाहिले आहे मी सहा सात वेळा किमान, कोणी लंगडा झाला कोणी आंधळा, कोणाची अख्खी फॅमिली अपघातात दगावली तर एक पैसेखाऊ अधिकारी स्त्रीला आलेले वंध्यत्व इतपत भयानक उदाहरणे पाहिली आहेत, देव आहेत का नाहीत हे मला माहिती नाही पण जर असलेच तर ते घाम गळत्या मेहनतीपेक्षा वेगळे नसावेत असे वाटते, अश्या श्रमदेवाचा अपमान केल्यास असे न तसे अंगावर शेकतेच शेकते, हरामाचा पैसा राखेतच जातो मयतात तरी किंवा इस्पितळात तरी

धनंजय माने's picture

6 Jul 2016 - 5:42 pm | धनंजय माने

तुमच्यावर अंधश्रद्धा वाढवत आहात असा आरोप करण्यात येत आहे. ;)
बाकी असले प्रकार पाहिले आहेत त्यामुळे देईन पण घेणार नाही या निष्कर्षाशी आलो आहे.

सहमत. वाटते तसे सोपे कांही नसते.
आणि अशी झाडे बांधावर लावण्यापेक्शा एकत्र लावणे सोयीचे असते.
पाणी घालायला बांधावर फिरुन दमायला होते. रोजगारावरचा माणूस टाळाटाळ करतो, हा अनुभव आहे.
त्याऐवजी पपई, सीताफळ अशी झाडे त्या मातीत/ परिसरात येत असतील तर लावणे जास्त फायदेशीर- तेही स्वतः तिथे रहात असाल तरच..!

चंपाबाई's picture

4 Jul 2016 - 11:13 pm | चंपाबाई

छान

शि बि आय's picture

5 Jul 2016 - 9:40 am | शि बि आय

सहीच... खूप शुभेच्छा

बोका-ए-आझम's picture

5 Jul 2016 - 9:45 am | बोका-ए-आझम

याबद्दल भेटून सविस्तर चर्चा करायला पाहिजे! वाखूसाआ!

मुक्त विहारि's picture

5 Jul 2016 - 9:49 am | मुक्त विहारि

मस्त गप्पा मारू.

शेतीसाठी एकच गोष्ट लागते,
चिकाटी

फार कौतुकास्पद. माझ्या शुभेच्छा कायम तुमच्यासोबत राहतील.

चौकटराजा's picture

5 Jul 2016 - 5:14 pm | चौकटराजा

शेतीची आवड हा एक खास पैलू मुवि कडे आहे हे कळले आनंद वाटला. बांधावर मुवि झाडाखाली बसलेयत . सौ मुवि, मुवि च्या आवडीचे काहीतरी फार्म हाउस मधून घेऊन आल्यात. मुवि " ट्रॅकटर माझा गुणवान ... या गीताची धुन शीळेतून साकरतायत. हे
चित्र डोळ्यासमोर आले.

नूतन सावंत's picture

5 Jul 2016 - 7:05 pm | नूतन सावंत

शेतकरी मुवि,शुभेच्छा.
छान संकलित करता आहात माहिती.
आभार कसले मानता.तुम्हाला त्यातून फायदा झाला म्हणजे झाले.
कपिलमुनी आणि सोन्याबापू यांच्या सल्ल्याकडे विशेष लक्ष द्यावे.चोरी,आणि सरकारी परवानगीबाबत.
जागा मिसेसच्या नावावर असेल तर तुम्हाला ठिबकसिंचनासाठी ९०% सबसिडी मिळू शकते,तुमच्या नावावर असेल तर

माझी एक मैत्रीण गेली ३-४ वर्षे स्वतःच्या शेतातले आंबे स्वतः ट्रकमधून आणून डोंबिवलीत बाजारभावापेक्षा २५% कमी किमतीत विकते.

मीही रत्नागिरीच्या बाजारपेठेत उभे राहून आंबे विकले आहेत.त्यात गैर काहीच नाही.

महिला बचत गट जे करू शकतात ते पुरुषांच्या सहकारी संस्था करू शकत नाहीत, हे तिसरे कटू सत्य.

हे मात्र खरे आहे आणि कोकणात आता महिला बचत गटांनी चांगले मूळ धरले आहे त्यातल्या काही मसाले वगैरे बनवतात.त्यांचा उपयोग करून घेण्यासाठी मिसेस मुविंना त्याचे सदस्य बनावे लागेल इतकेच.
हळद लागवडीसंदर्भात डॉ. जितेंद्र कदम ः९८२२४४९७८९. प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, क. डिग्रज, सांगली.यांच्य्शी संपर्क करा.
नारळाच्या एक एकर बागेत मसाला पिके घेऊन त्यातून उत्पन्न घेण्याबाबत नारळ संशोधन केंद्र,भाट्ये,रत्नागिरी इथे भेट द्या.तिथे नारळाची पाच रोपे प्रत्येकी व इतरही रोपे त्याच्याकडे अव्हेलेबल असल्यास फुकट मिळतात.

विवेकपटाईत's picture

5 Jul 2016 - 7:47 pm | विवेकपटाईत

लेख आवडला

रातराणी's picture

5 Jul 2016 - 7:52 pm | रातराणी

वाचतेय. पुभाप्र.

स्नेहल महेश's picture

6 Jul 2016 - 3:34 pm | स्नेहल महेश

वाचतेय

चिगो's picture

6 Jul 2016 - 5:53 pm | चिगो

तुमच्या शेतीप्रकल्पाकरीता शुभेच्छा, मुविकाका..

आजानुकर्ण's picture

6 Jul 2016 - 6:43 pm | आजानुकर्ण

चांगली माहिती आणि लेख.


त्यामुळे ज्यांची वडीलोपार्जित शेती नसेल त्यांनी किमान १०० शेतकर्‍यांना भेटल्या शिवाय किंवा निदान २-३ वर्षे शेतात वेळ घालवल्या शिवाय शेती करू नये.

वडिलोपार्जित शेतजमीन नसेल तर शेतकरी होता येते का?

होता येते.

पण कशा प्रकारे? ह्यासाठी वेगळा धागा काढणार आहे.

आपल्या मायबाप महाराष्ट्र सरकारच्या कृपेने , महाराष्ट्रात तरी "शेतकी सर्टिफिकेट" नसेल तर शेत-जमीन घेता येत नाही.

पण राजस्थान, कर्नाटक, आंध्र, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश ह्या राज्यात हा नियम नाही.

ह्या कायद्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटे पण आहेतच.

तुम्हाला जर इच्छा असेल तर व्य.नि. केलात तर फार उत्तम.

शेतजमीन घेताना कागदोपत्री कोणत्या गोष्टी महत्वाच्या ते पण सांगा प्लीज कोकणात आता १-२ लाखात १एकर जमीन कुठेच नाही
तुम्ही वर उल्लेख केलेली २-३ लाख जमीन साधारण कुठे मिळेल

त्यासाठी आधी माणसांची शेती करावी लागते. योग्य मशागतीनंतर असे समाधानाचे अन फायद्याचे पीक मिळते.

मुक्त विहारि's picture

7 Jul 2016 - 10:15 am | मुक्त विहारि

+ १

दृष्ट्या सक्षम असाल आणि "इदं न मम", ह्या वृत्तीचे असाल तर आणि फक्त तरच, शेतीच्या मागे लागणे उत्तम.

"शेतजमीन घेताना कागदोपत्री कोणत्या गोष्टी महत्वाच्या" ====> हे पुढील भागात पाहू या.

"कोकणात आता १-२ लाखात १एकर जमीन कुठेच नाही." =====> आहेत. तशाही जमिनी आहेत.पण त्या लागवडी साठी योग्य करतांना, अफाट श्रम, पैसा आणि वेळ खर्च होतो. शिवाय अशा जमिनी आणि फार्म हाऊस, वेगळे नसते.

"तुम्ही वर उल्लेख केलेली २-३ लाख प्रति एकर, जमीन साधारण कुठे मिळेल?" ====?

तशी जमिन बर्‍याच ठिकाणी मिळेल.पण.... त्या आधी मुलभूत गोष्टी परत एकदा नीट वाचल्यात तर उत्तम.

शेती घेतली, नौकर ठेवला आणि आपण त्या पिकावर चैन केली, असे होत नाही.

कृषी देवतेला, मालकाच्या घामाचा नैवेद्य द्यावाच लागतो.

स्नेहल महेश's picture

7 Jul 2016 - 10:36 am | स्नेहल महेश

कृषी देवतेला, मालकाच्या घामाचा नैवेद्य द्यावाच लागतो.
सहमत आहे

मनिमौ's picture

6 Jul 2016 - 7:46 pm | मनिमौ

तुमच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा

अर्धवटराव's picture

7 Jul 2016 - 9:10 am | अर्धवटराव

:)
काय काय एक अवलीये आहेत इथे राव. मुवी साहेब... तुमची जय हो.

रघुनाथ.केरकर's picture

7 Jul 2016 - 10:27 am | रघुनाथ.केरकर

धागा आणी येउ घातलेली मालीका खुपच उपयुक्त ठरणारी आहे.

या साठी मुवी यांचे खुप खुप आभार.

कपिलमुनी, बापुसाहब, नाखु, खेडुत, सुरंगी
यांचे पण खुप धन्यवाद.

यानीमीत्ताने मिपा चे सुद्धा आभार.

एकंदरच ही मालीका सुधा वाचनीय होणार,

नंदन's picture

7 Jul 2016 - 11:31 am | नंदन

लेख. वाचनखूण साठवली आहे. उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा!

जागु's picture

7 Jul 2016 - 1:13 pm | जागु

छान माहीती.
पुढच्या वाट्चालिसाठी शुभेच्छा.

मुक्त विहारि's picture

7 Jul 2016 - 1:45 pm | मुक्त विहारि

तुमचे पण अनुभव सांगीतलेत तर फार उत्तम.

(मला वाटते की, मध्यंतरी "माबो" वर विहिरीवर एक लेख आला होता.

http://www.maayboli.com/node/30374 तो तुमचाच का?)

हो. विहीरीवरचा लेख माझाच. माझा एक लेख आहे बीज अंकुरे अंकुरे त्यात मी पूर्ण शेती ची प्रक्रिया लिहीली आहे.

तुम्ही वर लिहिलयत ते तंतोतंत बरोबर आहे. जर घरातील माणूस शेती पहाणार असेल तरच शेतीत रस घ्यावा. दुसर्‍यावर अवलंबून चालत नाही. माझ्या माहेरी शेती होती ५ एकर. तेव्हा आई-वडील जातीने लक्श घालायचे. पण नंतर मजूर, खते न परवडणारी झाली. कारण आमच्याकडे ओ.एन.जी.सी. प्रकल्प आहे. त्यात सगळे मजूर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर कामाला लागले. त्यामुळे त्यांची मजूरी कंपनीप्रमाणे आकारायचे. शिवाय एक दोनदा हवामानाने दगा दिला. त्यानंतर वडीलांनी शेती करण सोडून दिल. पण मी जी लहानपणी शेती अनुभवली ती माझ्यासाठी अजुनही खुप आनंददायी आठवणींची पुंजी आहे.
मी तुम्हाला लिंक शोधून देते किंवा माझ्या ब्लॉगचा अ‍ॅडरेस देते.

अप्पा जोगळेकर's picture

7 Jul 2016 - 2:02 pm | अप्पा जोगळेकर

जस्ट ग्रेट. अत्यंत प्रेरणादायी लेख.
असा कलंदरपणा हवा.
नाहीतर 'मी रिटायरमेंट नंतर एक रिसोर्ट काढणार आहे' वगैरे वाक्ये ऐकून अगदी उबग आलाय.
शुभेच्छा.
'ला़ख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे'.

बीज अंकुरे अंकुरे http://www.misalpav.com/node/28089

माझा ब्लॉग http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in/

प्रसाद गोडबोले's picture

7 Jul 2016 - 3:56 pm | प्रसाद गोडबोले

निव्वळ अप्रतिम ! धाग्याचे एवाचनखुण साठवत आहे !

मुवी तुम्ही म्हणजे एकदम रोल मॉडेल आहात आमच्या शेतीप्रेमींसाठी!

अवांतर : तशी माझीही शेती आहे ४० -४४ गुंठे ! मी गहु मका गाजर उस नीळ कापुस भोपळा इत्यादी पिके घेतो . १० गायी आहेत , १० डुकरांचे फार्म आहे , १८ कोंबड्या आहेत. १० मेंढ्या पाळायला सुरुवात केली आहे पण ते गणित जरा नीट जमत नाहीये. बाकी छोटे मोठ्ठे कारखाने १ डेअरी, १ उस गाळप यंत्र , शिवण यंत्र, केक ओव्हन आहेत. नुकतेच शेतावर एक रीट्रीव्हर कुत्रे पाळले आहे. बघु पुढे मागे एक दोन घोडे घ्यायचाही मानस आहे !

मध्यंतरी घरी इन्टर्नेट नसल्याने हे डे खेळताच येत नव्हते , २८व्या लेव्हल वर अडकलो होतो, आता परत प्रगती सुरु आहे :))))

मुक्त विहारि's picture

7 Jul 2016 - 4:35 pm | मुक्त विहारि

आणि

त्यातच गहु,मका,गाजर,उस,नीळ,कापुस,भोपळा, इत्यादी पिके अधिक गुरे.

मस्तच.

तुमचे शेत बघायला कधी येवू?

अभ्या..'s picture

7 Jul 2016 - 9:48 pm | अभ्या..

हेहेहे
मुविकाका तुम्ही नुसते एक पार्टि आयोजित करा, ते सगळे शेत लॅपटोपात घेऊन येतील दाखवायला.
त्यांचा सातबारा फक्त मागू नका. मातीची नाही तर टायमाची माती करणारी शेती हाय ती.

नाखु's picture

8 Jul 2016 - 8:36 am | नाखु

देखरेख+नियंत्रण ठेवायला एक मुख्यमंत्री (महिला) पण नेमण्यात आली आहे आणि सध्या मुख्यालय चिंचवडला आहे.

दैनीक मिपा पिंचि वार्तापत्रसाठी मोरया गोसावी मंदीराजवळून कॅमेरामन वल्लींसह नाखु.

हा हा हा

खरय

चतुरंग's picture

7 Jul 2016 - 9:04 pm | चतुरंग

शेती करायला चिकाटी हवी, डोळे आणि कान उघडे हवेतच. मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये..

माझे दोन वर्गमित्र त्यांच्या नोकर्‍या सांभाळून शेती करतात. पैकी एकाची वडिलोपार्जित आहे. त्याच्या एकट्याच्या वाट्याचीच ४०-५० एकर असेल. परंतु माज न करता त्याने अतिशय मन लावून शेती जपली आणि फुलवली आहे. ऊस, गहू पिकं घेतो. घरचं दूध दुभतं आहे. आठवड्यातून किमान एकदा शेतीवर प्रत्यक्ष जातोच. बाकी रोजचे अपडेट्स असतातच. नांगरणीसकट सगळी कामे त्याला स्वतःला येतात. एकदम डाऊन टु अर्थ माणूस. शिवाय अतिशय घट्ट नेटवर्क आहे.
दुसर्‍याची वडिलोपार्जित नाही. नुकताच शेतकरी झालाय. हा देखील नोकरी सांभाळून रोज शेतावर चक्कर मारतोच. एकेक एकर करत आता ४ एकरापर्यंत पोचलाय. केळी पिकवतो.
मागल्या भारतवारीत दोघांच्याही शेतावर भेट देऊन त्यांचा पाहुणचार घेऊन आलो! दोघांचंही फर कौतुक वाटतं. :)

(शेतीप्रेमी)रंगा

नूतन सावंत's picture

8 Jul 2016 - 10:00 am | नूतन सावंत

सगळी कामे स्वत: करता आली पाहिजेत हेही खरंच.

मितानच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.मराठवाड्यात मोठी शेती सांभाळून आहेत.शिवाय प्रयोगशील.
वेळ मिळेल तेव्हा नक्की लिही मितान.

छोटी शेती सांभाळून करत आहोत ! पेरण्या चालू आहेत त्यामुळं आत्ता वेळ नई. वेळ मिळाला की नक्की लिहिते.
बाकी परवाच्या पावसानं शेततळं किमान ओलं तरी झालंय. मे मध्ये बांधलेल्या बंधार्यामुळे पाणी जिरत आहे ही एक छान बातमी.

(अज्ञानी) मुवि

अजया's picture

8 Jul 2016 - 10:19 am | अजया

:)
आमच्या बागेपेक्षा मोठी म्हणजे खूप मोठीच ;)
बंधार्याबद्दल पण लिही.लिहिशील तेव्हा.

मातीचे खरे प्रेम असल्याशिवाय शेतीत उतरुच नये. अगदी

मितान तुमच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत.

मुक्ता विहारी तुमच्याकडे गाय आहे का?

मुक्त विहारि's picture

9 Jul 2016 - 7:58 am | मुक्त विहारि

गाय नाही आहे पण....

भाकड असली तरी गाय नक्कीच घेणार.

झिरो बजेट शेतीसाठी, गोमूत्र आणि गोमय, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

दोन एकर कांदा लागवड करायची आहे.भाव वाढेल का कांद्याचा.

मुक्त विहारि's picture

10 Jul 2016 - 12:03 am | मुक्त विहारि

कांद्याचा भाव. लसूणची भाव आणि आंब्याचे उत्पन्न, एक वर्षा आड येते.

कांदा लागवड ३ ते ५ वर्षे करा. आतबट्याचा व्यवहार करा. (कांदा, लसूण, आंबा, काजू एकदम बेभरवशी.भरपूर पैसा, विशेषतः बापजाद्यांचा, असेल तर हा जुगार खेळावा. एकतर करोडपती किंवा निदान कर्जबाजारी तर नक्कीच नाही इतपतच खेळावा. ह्या आणि इतर बर्‍याच पिकांसाठी आधी पोट आणि मग जुगार, हेच धोरण ठेवावे.)

बाजाराचा अंदाज घ्या.

आणि मग ठरवा.

कांदा, आंबे, काजू, लसूण, संत्री, डाळिंबे, ई. पिके देवाची.

तर,

हळद, मिरची, मिरे, लवंगा, दालचिनी, जायफळ, चिंच, आवळा, कोकम, नारळ इ. ही मनापासून आणि स्व-कष्टाने शेती करणार्‍यांची.

साग हा सरकारी नौकरांसाठी.उरलाच तर आपल्यासाठी.

असे माझे मत.

मस्त मालिका मुवि. जरूर वाचणार.
>>शेती बाबत जितके ज्ञान मिळवाल तितके कमी आणि जितके प्रयोग कराल तितके कमी.>>>
अगदी खरं. या धाग्यांमधून ते मिळवायला उत्सूक..

आगाऊ म्हादया......'s picture

9 Apr 2018 - 3:23 pm | आगाऊ म्हादया......

पण आता पुढील भाग वाचतो.

मुवि तुम्ही तुमच्या ढ असण्याची कबुली दिलीत हे आवडलं.म्हणजे माणूस नावडत्या क्षेत्रात ढ असु शकतो पण तोच माणूस आवडत्या क्षेत्रात कितीही उंच भरारी घेतो. एक कृषि पदवीधर म्हणून शेतकरी नातेवाईक, गावकरी जादुगारासारखी अपेक्षा ठेवताना बघतो आहे. निसर्गविरोधी शेती न आवडल्यानं स्वांतसुखाय शेती सुरू आहे. जमीन व जनावरांचे Exploitation बघवत नाही. जमीन पाणी हवा नासत आहे. शेतकरी राजा जागा हो.

सोन्याबापू ते कैलासवासी पहिले काढून टाका.