“पता नहीं. कुछ हो रहा हैं अन्दर...”

पथिक's picture
पथिक in जनातलं, मनातलं
12 May 2016 - 11:54 am

अकोल्याला (माझं शहर) आलो कि मी नं चुकता शहरातल्या त्या भागात फिरायला जातो जिकडे शहरातले मोठे मार्केट, भाजी बाजार आणि बरीच दाट वस्ती आहे. हिंदू, मुसलमान, सिंधी, मारवाडी असे प्रामुख्याने काही ना काही व्यवसाय करणारे लोक तिकडे राहतात. तिकडली दाटीवाटीने उभी असलेली दुकानं, होटेलं, लोकांची गर्दी, गोंगाट, खरेदी-विक्रीची, जाणाऱ्या-येणाऱ्यांची गडबड, ई सगळं फिरून फिरून, त्या गर्दीत मिसळून पाहायला फार आवडतं मला. मारवाड्यांची, सिंध्यांची मोठी मोठी दुकानं – कपड्यांची, सराफाची, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची, धान्याची आणि ईतर; मुसलमान लोकांच्या फळांच्या गाड्या, रोजच्या गरजेच्या लोखंडी, लाकडी, पत्र्याच्या स्वस्त वस्तू; फटाके, हार्डवेअर, गाड्यांचे पार्ट, टायर, इत्यादी ची दुकाने; गोरगरिबांची भाजी, स्वस्त खेळणी, ई ची दुकाने. सणासुदीला लागणाऱ्या मूर्ती, मडकी-गाडगी, लाह्या-फुटाणे ईत्यादी रस्त्याच्या कडेलाच विकत बसणारे; हातगाड्या, टपऱ्या, ठेले आणि रस्त्याच्या कडेला खालीच पोती वगैरे अंथरून त्यावर ठेवलेला ‘माल’; पाणीपुरी, पावभाजी, कुल्फी, उसाचा रस, सोडा, लस्सी, आइसक्रीम, बर्फाचा ‘गोला’ आणि अशीच कितीतरी! हा सगळं देखावा, तिथले वेगवेगळे आवाज, रंग, वास, सगळं मिळून एक वेगळंच रसायन तयार होतं.

काल रात्री असाच एकटा धान्य बाजारात एका पानपट्टीवर तंबाखूची मळत (खातो कधी कधी :) उभा होतो. अचानक बाजूला उभा असलेला एक मळके, कुठे कुठे फाटलेले कपडे घातलेला एक मजूर जवळ आला (थोडा पिलेला होता) आणि मला म्हणाला, "तंबाकू खिलाओ". मी त्याला पुडी दिली. तंबाकू मळता मळता तो बोलला,
“आज मरनेवाला हुं मैं, मेरी मौत बुला रही हैं मेरेको”
मी - “क्या हुआ?”
तो – “पता नहीं. कुछ हो रहा हैं अन्दर” अणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
मी – “पैसेका प्रोब्लेम है क्या?”
तो – “नही. मै आदमीही ऐसा हुं”
आणि एवढं बोलून ती पुडी परत करून तो समोरच्या अंधार उजेडातल्या माणसांच्या गर्दीत मिसळून गेला…

मला मजाज लखनवी या शायराच्या या ओळी आठवल्या –

ये रुपहली छाँव ये आकाशपर तारों का जाल,
जैसे सूफी का तसव्वूर जैसे आशिक़ का ख़याल
आह! लेकिन कौन समझे कौन जाने जी का हाल?

इकडे आलो कि हटकून असं काही ऐकायला येतं – अमुक मुलीने जाळून घेतलं, तमुक माणूस आता पन्नाशीत दारूच्या आहारी जाऊन विचित्र वागू लागलाय, त्या तरुण मुलाने वेड लागून 'फाशी घेतली', दुसरा एक मुलगा अचानकपणे तोल जाऊन लोकांना मारझोड करू लागला. आणि व्यसनाचे, त्यामुळे कर्जबाजरी होण्याचे, कुटुंबाचे हाल होण्याचे किस्से तर अगदी आम ! आणि आमचा मुलुखाही कसा शुष्क, माणसे उदासीन - आपल्या प्रगतिबद्दलही. बस दिवस काढत असतात असे पाहून वाटते.

फिरत फिरत शहरातल्या एका चौकात आलो. तिथे एका थोर पुरुषाच्या पुतळ्याच्या पायाशी कचरा साठलेला आणि एक रिकामी दारूची बाटली पडलेली. जणूकाही आजच्या परिस्थितीचं सार! मूल्य, सत्वयुक्त जे होतं ते निघून गेलेलं; जुनं जाऊन नवं येताना काळाच्या या मंथनातून बाहेर फेकला जाणारा निरर्थकत्वाचा, फोलपणाचा सगळा कचरा आणि गरिबी, वैफल्य, निराशा, क्रोध, घुसमट ई च्या हलाहलाचं प्रतिक म्हणजे ती दारूची बाटली!

गर्दीत मिसळून गेलेल्या त्या मजुराचं वाक्य जणू सर्वांचीच अवस्था सांगतंय -
“पता नहीं. कुछ हो रहा हैं अन्दर...”

(व्याकरणाच्या चुकांसाठी क्षमा करावी)

संस्कृतीमुक्तकसमाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

12 May 2016 - 12:18 pm | कानडाऊ योगेशु

मनस्वी लिखाण. पण आटोपते घेतल्यासारखे वाटले. "त्या" चे पुढे काय झाले ही उत्सुकता आहे?(सर्व काही ठिक व्हावे अशीच देवाजवळ प्रार्थना.)

मराठी कथालेखक's picture

12 May 2016 - 12:25 pm | मराठी कथालेखक

थोडक्यात पण चांगलं जमलंय..

एस's picture

12 May 2016 - 12:31 pm | एस

छान मांडलंय.

नीलमोहर's picture

12 May 2016 - 4:01 pm | नीलमोहर

व्यथा आणि घुसमट अचूक मांडलीय,
लिहा अजून..

यशोधरा's picture

12 May 2016 - 4:24 pm | यशोधरा

चांगलं लिहिलंय कसं म्हणू ह्याला.. घुसमट पोहोचते आहे.

नाखु's picture

12 May 2016 - 4:34 pm | नाखु

पण नेमके.

काही वेळा पुतळा आणि काही माणसे अगदी एक समान असतात्,लोकार्थाने सजीव पण जाणीवा-भावना लुप्त झाल्याने पुतला झालेल्या.

पाहणीतल्या एका अभागी माऊलीची आठवण आली.

पिलीयन रायडर's picture

12 May 2016 - 4:40 pm | पिलीयन रायडर

आह! लेकिन कौन समझे कौन जाने जी का हाल?

ह्म्म्म्म... खरंय...

मनाला भीडेल असं लिहीलय..

मीत्रा फार सुंदर लिहिला आअहेस , तुझी घुसमट लिखाणातून जाणवतेच पण शायरी ने अजूनच ठळक केली आहे . मी पण अकोल्या मध्ये (माझ शहर ) गेलो कि गांधी रोड वर चक्कर होतेच व सर्वत्र पसरलेला कचरा व त्यातून उठून दिसणारा बकालपणा जाणवतो .
तुझ्या लिखाण शी बाडीस

पथिक's picture

13 May 2016 - 2:56 pm | पथिक

धन्यवाद राहुल.

सुनील's picture

12 May 2016 - 7:15 pm | सुनील

छान लिहिलय.

ये रुपहली छाँव ये आकाशपर तारों का जाल,
जैसे सूफी का तसव्वूर जैसे आशिक़ का ख़याल
आह! लेकिन कौन समझे कौन जाने जी का हाल?

ए गमे दिल क्या करू? ए वहशते दिल क्या करू?

हे संपूर्ण गीतच फार सुंदर आहे. कुठलाशा चित्रपटात याची दोन कडवी घेतली आहेत.

बोका-ए-आझम's picture

13 May 2016 - 1:29 am | बोका-ए-आझम

शायर - मजाज लखनवी (जावेद अख्तर यांचा सख्खा मामा).
पडद्यावर चक्क शम्मी कपूर आहे.

पथिक's picture

13 May 2016 - 2:52 pm | पथिक

मजाज ची हि 'आवारा' नावाची गाजलेली नज्म आहे. 'कहकशा' नावाची tv serial होती जिला जगजित सिंग च संगीत होत. त्यामध्ये पण हि नज्म फार सुंदर स्वरबद्ध केलेली आहे.

सीनेमें जलन आँखोमे तूफ़ानसा क्यूं है आठवलं! :(

बोका-ए-आझम's picture

13 May 2016 - 1:32 am | बोका-ए-आझम

चला, अजून एक अकोल्याचे भाऊ आलेले आहेत. मिपावर अकोल्याचे बरेच पोट्टे आहेत. सोन्याबापू, मंदार भालेराव, संदीप डांगे, होबासराव - माझं पण मूळ गाव अकोलाच.
लिहिलंय छान भौ! तेवढं खर्रा सोडून छान वाटलं.

पथिक's picture

13 May 2016 - 2:46 pm | पथिक

धन्यवाद.
एवढे जण अकोल्याचे आहेत पाहून छान वाटलं. सर्वांना रामराम !
तंबाखू मुळेच तो माझ्याशी बोलला. तेव्हा ते सांगणे महत्वाचे वाटले.

रेवती's picture

13 May 2016 - 2:35 am | रेवती

रारास्गी सहमत. अगदी हेच म्हणते. सिने में जलन आठवलं.
लेखन आवडलं.

राराशी सहमत असं लिहायचं होतं.
आता बघुया माझा हा पुरावा स्रुजा येथून नष्ट करतिये का. मेदूवडा सांबार तर आम्हीही देऊ शकतो.

स्रुजा's picture

13 May 2016 - 8:24 am | स्रुजा

लोल अगं पण प्रतिसादातले पुरावे उडवायची आम्हाला पावर नाय. धाग्यातले पुरावे नाहीसे करु शकतो ;)

नाखु's picture

13 May 2016 - 8:51 am | नाखु

पुरावे पण कीर्ती(धागा)रुपी उरावे असे म्हणावे काय?

मिपा वाचक चळवळ क्रियाशील सदस्य नाखु

कंजूस's picture

13 May 2016 - 7:07 am | कंजूस

????

पथिक's picture

13 May 2016 - 2:53 pm | पथिक

???

नंदू's picture

13 May 2016 - 10:19 am | नंदू

या 'आतल्या काहीतरी होण्याला' चांगली वाट करून दिलीत!

पैसा's picture

13 May 2016 - 10:34 am | पैसा

ऐ गमे दिल क्या करूँ

पथिक's picture

13 May 2016 - 2:44 pm | पथिक

धन्यवाद मंडळी!