बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
26 Feb 2016 - 11:02 am

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

.......स्टॅलिन कधीच त्याच्या भाषणासाठी प्रसिद्ध नव्हता पण प्रसंगच असा होता की रशियन त्या साध्यासुध्या शब्दांनी पेटून उठली. पुढे काय झाले ते आपल्याला माहीत आहेच....

भाग-३

स्टॅलिनला आता या पेचप्रसंगातून सुटण्यासाठी एका लष्करी नेतृत्वाची गरज भासू लागली. त्याने जनरल आंद्रे येर्मेंको नावाच्या जनरलला पाचारण केले.

आंद्रे येर्मेंको
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हा अनुभवी सेनाधिकारी १-फार इस्टर्न आर्मीचा प्रमुख होता. हा जनरल कर्तव्यकठोर, अत्यंत शूर, व एक कल्पक युद्धव्युहतज्ञ होता. रशियन क्रांतीच्या दरम्यान त्याने जे व्युह राबवले होते त्यावरुन स्टॅलिनला खात्री वाटत होती की या पेचप्रसंगातून हाच मार्ग काढू शकेल. जेव्हा आंद्रे मॉस्कोला आदेश घेण्यासाठी पोहोचला तेव्हा सेंट्रल फ्र्ंटवर परिस्थिती खरोखरच दारुण होती. या आघाडीवर रशियाच्या तीन डिव्हिजन्सने शरणागती पत्करली होती. शरणागती समजू शकते पण त्यांनी राजकीय प्रतिनीधी जे प्रत्येक रशियन सेनेबरोबर असत ते सैनिकांना लढण्यासाठी उद्द्युक्त करीत असत, त्यांची हत्या करुन शरणागती पत्करली होती. जर्मन पँझर तुकड्या मिन्स्क व स्मोलेन्स्कच्या दिशेने जात रशियन सैन्याभोवती आपला पोलादी पाश आवळत होत्या. पोलादी हा शब्द मुद्दाम योजला आहे कारण हा पाश खरोखरीच पोलादाचा म्हणजे रणगाड्यांचा होता. जनरल गुडेरियनचे आघाडीवरचे कार्यालय मिन्स्कपासून ५० मैलावर पोहोचले होते.

सतराव्या पँझर डिव्हिजनने मिन्स्कच्या दक्षिणेकडून पाश आवळला तर उत्तरेकडून कर्नल जनरल हॉथच्या तिसऱ्या पँझर ग्रुपने वेढा घालून तो फास आवळला. २६ जूनला या दोन्ही फौजांची गाठ पडली. चार रशियन आर्मी या सापळ्यात अडकल्या म्हणजे जवळजवळ ५०,००० सैनिक. या सैन्याने दक्षिणेकडे येथे वेढ्यामधील काही भगदाडे हेरुन त्यातून निसटायचा प्रयत्न केला. झेल्बा गावाच्या आसपास असलेल्या दाट जंगलात त्यांनी शिल्लक राहिलेले रणगाडे व तोफांसह आसरा घेतला. त्यांच्यापुढे आता जिंका किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण झाली. या रशियन सैनिकांनी एक शेवटचा एल्गार केला. त्यांनी त्या जंगलातून जर्मन सैन्यावर प्रतिहल्ला चढविला. त्यांनी आपल्या बंदुकींवर आपल्या संगिनी चढविल्या व जीवावर उदार होत त्यांनी ‘उर्रा ! उर्रा’ असे ओरडत हल्ला चढविला पण अर्थातच ते जर्मन मशिनगनच्या माऱ्यात ठार झाले. थोड्याच वेळात आजुबाजुंच्या शेतामधे रशियन सैनिकांच्या प्रेतांचे ढीग साठलेले दिसू लागले. रात्र पडण्याआधी त्यांनी परत एकदा निकराचा प्रयत्न केला. या वेळी मात्र त्यांनी त्यांच्याकडे उरलेल्या चिलखती रेल्वेगाडयांचा वापर केला पण जर्मन सैन्यातील अभियांत्रीकी विभागाने रेल्वेचे रुळ अगोदरच उधवस्त केले होते. जर्मन तोफखान्याने त्या आगगाडीचे अक्षरश: तुकडे केले. वेढा काही उठला नाही पण आत अडकलेले रशियन सैनिक मात्र हकनाक मारले गेले.

जनरल येर्मेंकोला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो हादरलाच. त्याला ही परिस्थिती बदलायची होती म्हणे. हताश होत त्याने विचारले, ‘या आघाडीवर करण्यासारखे आता काय राहिले आहे ?’ रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी उत्तर दिले, ‘जर्मन सैन्याचे आक्रमण थोपव ! नाहीतर मॉस्को गेल्यातच जमा आहे.’ यावेळीच स्टॅलिन मॉस्कोमधे नव्हता. ब्रिटिश लष्करी प्रतिनिधीमंडळ रशियाला मदतीचे आश्वासन देण्यासाठी आलेले असताना या माणसाने त्यांची गाठही घेतली नाही.

मध्यभागी, म्हणजे सेंट्रल फ्रंटवर, जर्मन रणगाडे दोन रस्त्यावरुन मॉस्कोच्या दिशेला धडधडत होते. त्यांच्यामागून त्यांना युद्धसाहित्यांचा पुरवठा करणारे २७००० ट्रक आले व त्यानंतर ६०,००० वाहनांमधून पायदळ व इतर रेजिमेंटस् नेण्यात आल्या. त्यांना कसलाच विरोध झाला नाही कारण रशियाच्या विमानदलाची काय अवस्था झाली होते ते आपण वर पाहिलेच आहे. शिवाय रशियन सैन्यामधे संदेशदळणवळणावची बोंबच होती. त्यामुळे त्यांच्यात कसलाही समन्वय नव्हता. उदाहरणार्थ रशियाच्या पश्चिम आघाडीचा कमांडर जनरल पाव्हलो याला १० व्या आर्मीशी संपर्क न साधता आल्यामुळे, त्याने प्रत्यक्ष तेथेच जाण्याचा निर्णय घेतला व त्याने त्या आर्मीच्या विभागात विमानातून उडी मारली. त्याच्या बरोबर जे त्याचे सहाय्यक होते त्यांना आदल्याच दिवशी बदललेला संकेतशब्द माहीत नसल्यामुळे ठार मारण्यात आले होते. अशा अनेक घटना घडत होत्या. (यातून हा वाचला पण नंतर स्टॅलिनने त्याला ठार मारले.)

मॉस्कोपासून ४२० मैल असलेल्या मिन्स्क शहरावर २८ तारखेला जर्मनीच्या विसाव्या पँझर डिव्हिजनने हल्ला चढवला. हे रणगाडे मिन्स्कमधे शिरण्याआधीच स्टॅलिनच्या आदेशानुसार सर्व शहर पेटवून देण्यात आले होते जेणेकरुन जर्मन सैन्याला कसलीही मदत होणार नाही. याला त्याने ‘‘स्कॉर्च द अर्थ पॉलिसी ’’ असे नाव दिले होते. जनरल येर्मेन्कोला या सगळ्या गोंधळाची बातमी कळली जेव्हा तो जनरल पाव्ह्लॉव याच्या मुख्यालयात पोहोचला तेव्हा. त्याने लगेचच पाव्हलॉवच्या हातात त्याच्या बडतर्फीचा आदेश ठेवला. त्याने बरीच कारणे देण्याचा प्रयत्न केला की त्याला क्रेमलिनच्या मुख्यालयातून या हल्ल्याबद्दल काहीच माहिती मिळली नव्हती इ. इ. पण अर्थातच त्याचा उपयोग झाला नाही. युद्धस्थितीमधे कारणे कोणालाच चालत नाहीत. जे काही होईल त्याची जबाबदारी कमांडरचीच असते. जिंकते ते सैन्य हारतो तो कमांडर हेच सत्य असते ! त्याने तो आदेश स्वीकारला व मॉस्कोला परत गेला. तेथे त्याला कोर्टमार्शल किंवा आत्महत्येचा पर्याय देण्यात आला. त्याने अर्थातच दुसरा पर्याय स्वीकारला.

२९ जूनला मिन्स्कचा वेढा आवळला गेला व बिआलीस्टॉक व गोरोडिश येथे रशियन सैन्याला घेरून २९०००० सैनिकांना बंदी बनविले गेले. यांच्याबरोबर २५०० रणगाडे व १४०० तोफाही हस्तगत करण्यात आल्या. जर्मनीने रशियाचे रसदमार्ग बाँबिंग करून उध्वस्त केले, त्यांच्या गोगलगायीसारख्या हालचाली करणाऱ्या पायदळाच्या मागे जाऊन त्यांना वेढले, त्यांचा अपमानास्पद पराभव केला यामुळे रशियाच्या सेनाधिकाऱ्यांमधे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले.

नवीन कमांडर-इन-चिफने त्याचा पहिला आदेश प्रसारित केला. त्या आदेशानुसार जर्मन सैन्याला बारसिना नदीच्या काठावर जर्मन सैन्याला थोपवायचे होते. पण येर्मेन्कोचे आदेश पाळायला सैन्य होते कुठे ?

इकडे अठराव्या पँझर डिव्हिजनचे रणगाडे जर्मन पायदळापुढे जवळजवळ ५० मैल पुढे असल्यामुळे ते ३० जूनलाच बेरेसिनावर असलेल्या बॉरिसॉव्हच्या वेशीवर पोहोचले. त्यांना तेथे पोहोचण्यास फक्त ३० तास लागले. अर्थात याला मुख्य कारण होते प्रतिकाराचा अभाव व त्यांचे न थांबता आक्रमण ! तेथे त्यांना मुकाबला करावा लागला तो एका रणगाड्यांच्या लष्करी ॲकॅडमीच्या छात्रांशी. या छात्रांची व तेथे असलेल्या इतर सैनिकांची मरेपर्यंत प्रतिकाराची तयारी होती. येथे जर्मन सैन्याला बरेच नुकसान सोसावे लागले.

या नदीवर कुमक पोहोचविण्यासाठी आता दोन्ही सैन्यदलात अत्यंत तीव्र स्पर्धा लागली. जनरल येर्मेंकोला तासातासाने निराश करणाऱ्या बातम्या मिळत होत्या. हाताशी कुठलेही मोठे सैन्य नसताना त्याने मिळेल तेथून सैनिकांच्या तुकड्या तेथे जमा केल्या. त्याच्या दुर्दैवाने वेगवान हालचाली करणाऱ्या अठराव्या पँझर डिव्हिजनचे रणगाडे तेथे आधी पोहोचले. जुलैच्या १ तारखेला तेथे जमलेल्या रशियन सैन्याची कत्तल झाली. या नदीवर अजूनही काही सैन्य पुलाचे रक्षण करीत होत्या. जर्मन रणगाडे व मोटरसायकल तुकड्यांनी तोफांच्या संरक्षणाखाली त्या पुलावरुन मुसंडी मारली व ती नदी पार केली. याच ठिकाणाहून दक्षिणेकडे ५० मैलावर असलेल्या बॉब्रूस्क नावाच्या पुलावरुन जनरल मोडलच्या रणगाड्यांनी ती नदी पार केली. त्याच्या मागोमाग अजून दक्षिणेकडे चौथ्या पँझर डिव्हिजनच्या रणगाड्यांनीही ती नदी पार केली.

जर्मनीचे हे तुफानी आक्रमण चालू असताना मार्शल टिमोशेंकोने सेनादलाचा सर्वोच्च प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारली व त्याने येर्मेंकोला दुसऱ्या स्थानावर नेमले.

मार्शल टिमोशेंको
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तासातासाला जर्मनीचे मॉस्कोवरील आक्रमण जवळ येत होते. रणगाडे, चिलखती दलांच्या गाड्या, ट्रक, पायदळ, तोफखाने मोठ्या वीरश्रीने पुढे सरकत होत्या. जणू काही त्यांना थोपवण्याची साक्षात परमेश्वराकडेही ताकद नव्हती. पण ज्याने परमेश्वरालाच जन्माला घातले आहे अशा माणसाकडे ती ताकद योग्य वेळेस येते हा इतिहास येथे परत एकदा पाहण्यास मिळणार होता.

८ जुलैला फिल्ड मार्शल बॉकने आत्तापर्यंत मिळालेल्या विजय साजरा करण्यासाठी आर्मी ग्रुप सेंटरच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली. त्यात त्याने भाषण केले, ‘‘मिन्स्कची लढाई संपल्यात जमा आहे.’’ हे भाषण करताना त्याने रशियन सैन्याच्या नुकसानीचे आकडेही सादर केले. ‘‘रशियाच्या चार आर्मीपैकी ३२ पायदळाच्या डिव्हिजन्स, ८ चिलखती दलाच्या डिव्हिजन्स, ६ मेकनाईझ्ड ब्रिगेड व तीन कॅव्हलरी डिव्हिजन एवढ्या सैन्याचा खातमा झाला आहे. किती रशियन सैनिक मेले त्याची गणती नाही. २८७,७०४ सैनिकांना युद्धबंदी बनविण्यात आले असून २५८५ रणगाडे, १५०० वेगवेगळ्या आकाराच्या तोफा व २५० विमाने ताब्यात घेण्यात आली किंवा निकामी करण्यात आली. छोट्या हत्यारांचे ढीग तोडण्यात आले तर दारुगोळा, इंधन, व हजारो ट्रक काबीज करण्यात आले आहेत.’’

या विजयामुळे जर्मन सैनिकांमधे उत्साही वातावरण पसरले तर रशियन गोटात जिद्दीचे. रशियन सेनानी व सैनिक हार मानण्याच्या मनस्थितीत मुळीच नव्हते. रशियाची सगळ्यात मोठी जमेची बाजू होती ती म्हणजे त्यांची लोकसंख्या. त्यावेळी त्यांची लोकसंख्या होती अंदाजे १९०,०००,०० आणि मुख्य म्हणजे लष्करी सेवा करु शकणारे त्यात १६,०००,००० होते. त्यांचे लष्करी साहित्याचे उत्पादन करणारे महाकाय कारखाने अजूनही उरलच्या पर्वतरांगांमागे सुरक्षित होते. त्यांना फक्त थोडा वेळ हवा होता. जनरल तिमोशेंकोने जनरल येर्मेंकोला आदेश दिला तो फक्त दोन ओळीचा होता.

‘कुठल्याही परिस्थितीत, पडेल त्या किंमतीत जर्मनीच्या रणगाड्यांना निपर व विना नदीपाशी अटकाव करावा जेणे करुन ते स्मोलेन्स्क काबीज करु शकणार नाहीत व आम्हाला सावरायला थोडा वेळ मिळेल.’’

स्मोलेन्स्कपासून मॉस्को फक्त २३० मैल दूर आहे. रशिया एकसंध राहिला होता तो मॉस्को येथे असणाऱ्या प्रबळ केन्द्रीय सत्तेमुळे. जर मॉस्को पडले असते तर रशियाचे (संघराज्याचे) तेव्हाच तुकडे पडले असते. गोर्बाचेव्हने जे केले ते त्याचवेळी झाले असते.

टिमोशेंकोच्या दृढ निश्चयाचा परिणाम लगेचच दिसून आला. जर्मनीच्या आर्मी ग्रुप सेंटरच्या टेहळणी विमानांना ज्या रस्त्यावर ते होते त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने रशियन रणगाडे दिसले. ही होती रशियाची कडवी, अनुभवी १-मॉस्को मोटोराईझ्ड रायफल डिव्हिजन. यांच्याबरोबर होते काही वेगवान टी-३४ रणगाडे व एक केव्ही-२ रणगाडा. त्यातील टी-२६ व बीटी रणगाड्यांचा जर्मन रणगाड्यांनी ताबडतोब समाचार घेतला व रस्त्याच्या दोन्ही बाजूस जळणाऱ्या रणगाड्यांचा खच पडला पण महाकाय केव्ही-२ रणगाडा मात्र पुढे येत होता व त्याच्या माऱ्यात येणारे जर्मन रणगाडे बाजूला सरकत होते. शेवटी या रणगाड्याला सर्व बाजूने घेरण्यात आले. त्यातून निसटताना त्या रणगाड्याअचे एंजिन बंद पडले व रशियन सैनिकांना तो तेथेच टाकून पळ काढावा लागला. हे येथे सांगण्याचे कारण म्हणजे हे रणगाडे महाकाय होते, त्याचा मारा भयंकर होता पण केवळ त्याच्या जास्त वजनामुळे तो कमकुवत झाला होता. या रणगाड्यांच्या गच्छंतीमुळे हे आक्रमण थंड पडले. तज्ञांनी या प्रतिआक्रमणाचा अभ्यास नंतर केला त्यात त्यांना असे आढळून आले की त्यांचे डावपेच चुकीचे होते. त्यांनी त्यांचे मोठे रणगाडे व इतर रणगाडे एकत्रच हलवायला पाहिजे होते म्हणजे ते एकमेकांना सहाय्य करु शकले असते. रशियन सैनिक लढत होता व त्यांच्या कडव्या प्रतिकाराने जर्मन आक्रमण थोडेसे थंड पडले पण फारच कमी वेळ. त्याचा उपयोग नव्हता.

जनरल येर्मेंकोने मग एकोणीसाव्या आर्मी दक्षिणेकडून व्हिटेक्सजवळ एकटविली. जसे सैनिक येत होते तसे त्यांना ताबडतोब युद्धात उरतरविण्यात येत होते. जनरल येर्मेंकोला हे योग्य नाही याची पूर्ण कल्पना होती पण त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. त्याच्याकडे तयारीसाठी वेळच नव्हता.

जर्मन सैन्याचे सध्यातरी नशीबच जोरदार होते हेच खरे. रशियन तोफखान्याचा एक अधिकारी काही जर्मन सैनिकांच्या हाती लागला. रशियाच्या दुर्दैवाने या अधिकाऱ्याकडे प्रतिआक्रमणाच्या योजनेचे सगळे नकाशे सापडले. जर्मनांनी त्वरित त्यांचे सैन्य रशियन सैन्याच्या मागे आणले. त्यांनी व्हिटेक येथे जमलेल्या सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर जर्मन सैन्याच्या रणगाड्यांनी त्यांचे लक्ष स्मोलेन्स्कवर वळवले.

रशियावरील आक्रमण सुरु होऊन आता १९ दिवस झाले होते. आर्मी ग्रुप सेंट्रलने जवळजवळ स्मोलेन्स्कवर धडक मारली होती तर आर्मी ग्रुप नॉर्थने ऑस्ट्रॉव्हच्या दक्षिणेस असलेले स्कॉव्ह काबीज केले होते व आता ते इशान्येला लेनिनग्राडचा विचार करत होते. जनरल गुडेरियनच्या सैन्याने बेरेझिना पार करुन निपर नदीवर रशियन सैन्याच्याआधी पोहोचण्याचा अटोकाट प्रयत्न चालविला होता. त्याला ती रशियन सेना तेथे पोहोचण्यापूर्वी ती नदी पार करायची होती. येथेही हवाई टेहळणी विमानांनी या भागात रशियन फौजा जमा होत आहेत अहवाल दिला होता. फिल्डमार्शल क्लुगं आघाडीला दिलेल्या भेटी दरम्यान जनरल गुडेरियनला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला,
‘‘फास्ट हाईन्झ ! मला या मोहिमेत यश मिळण्याची आता खात्री वाटते.’’ गुडेरियनने उत्तर दिले,
‘‘जर आपण मॉस्कोवर पटकन हल्ला चढविला तर या वर्षाअखेर हे युद्ध संपुष्टात येऊ शकते.
( जनरल गुडेरियनला त्याच्या डिव्हिजनमधे सगळे ‘फास्ट हाईंझ या नावाने संबोधत. ) फिल्ड मार्शल क्लुगला गुडेरियनचा आक्रमणाचा वेग व शत्रूच्या मागे जाऊन त्यांना वेढण्याचे डावपेच एवढे पसंत नसत पण यावेळीही तोही मिळालेल्या यशाने चकित झाला. त्याने गुडेरियनच्या म्हणण्याला होकार दिला. जनरल गुडेरियनच्या सैन्याने निपर नदी तीन ठिकाणी पार करण्याची योजना आखली. रोगोचेव्ह, मॉगिलेव्ह व ऑर्शा. या ठिकाणी रशियन सैन्यानेही संरक्षणाची मजबूत व्यवस्था केली होती व ते तेथे अखंड कुमक पाठवीत होते. रशियन सैन्याने नवीन व आत्तापर्यंतच्या युद्धातून वाचलेल्या सैनिकांमधून तयार झालेल्या अशा ४२ डिव्हिजन्स या युद्धात गुडेरियनच्या रणगाड्यासमोर उभ्या केल्या.

अर्थात जनरल गुडेरियनला, ज्याने वॉर्सा आठ दिवसात गाठले होते त्याला निपरच्या काठावर असलेल्या रशियन फौजांची तमा नव्हती. त्याला मॉस्कोपासून आता कोणी रोखू शकणार नव्हते. त्याच्या टेहळणी करणाऱ्या तुकड्यांनी निपरवरील संरक्षण व्यवस्था कमकुवत असलेल्या अनेक जागा हेरल्या. उदा.. बिकॉव्ह, क़ोपिस व क्लॉव्ह. बिकॉव्ह येथे मोटरसायकल्च्या तुकड्यांनी बोटीतून पाणी पार केले. त्यांनी तेथे असलेल्या रशियन सैनिकांचा समाचार घेतल्यावर जर्मन सैन्याच्या अभियांत्रीकी विभागाने तोंडात बोटी घालायला लावणाऱ्या वेगाने पॉंटून पूल बांधला. (तरंगणारा पूल).

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

केवळ दोन तासात दोन पँझर डिव्हिजनचे रणगाडे इकडून तिकडे गेले. कॉपीस येथे मोटरसायकल डिव्हिजनने रशियन तोफखान्याला मोठ्या शौर्याने तोंड देत नदी पार केली तर क्लाँव्ह येथे जर्मन तंत्रज्ञांनी पहिल्यापेक्षाही वेगाने पूल बांधला ज्यावरुन दहावी पँझर डिव्ह्जनचे रणगाडे धडधडत गेले. हा असला वेग आजवर कोणी पाहिला नव्हता. ऑर्शा, मॉहगिलेव्ह इत्यादींकडे दुर्लक्ष करत गुडेरियनने स्मोलेन्स्कलाच हात घातला. त्यांना थोपविण्याच्या प्रयत्नात टिमोशेंकोने दक्षिणेकडील २० डिव्हिजन्स त्या युद्धभूमिवर हलविल्या. हे प्रतिआक्रमण चौथ्या पँझर डिव्हिजनच्या रणगाड्यांनी व् जर्मन कॅव्हेलरी डिव्हिजनने उधळून लावले.

या युद्धात जर्मनीच्या स्टुका विमानांनी चांगली कामगिरी बजावली. त्यांनी या वेळेस खाली आक्रमण करण्याऱ्या रणगाड्यांशी समन्वय साधण्यासाठी खुपच कष्ट घेतले व त्याचे फळ त्यांना मिळालेही. रशियाचे १५ डिव्हिजन सैन्य वेढले गेले व शरण आले किंवा मारले गेले. मॉस्कोवर हल्ला चढविण्याआधी स्मोलेन्स्क नेपोलियनच्या काळात महत्वाचे होते आणि आत्ताही तेवढेच महत्चाचे होते. स्मोलेन्स्कच्या रशियन सैन्याला शेवटचा सैनिक मरेपर्यंत इंच इंच भूमि लढविण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक धडधाकट माणसाला हातात बंदुक घेण्यास सांगण्यात आली. स्मोलेन्स्कच्या रस्त्यारस्त्यावर, इमारती इमारतींमधे ही लढाई लढण्यात आली.

३९० मैल लांब अशा विस्तृत आघाडीवर स्मोलेन्स्कची लढाई ६३ दिवस लढली गेली व त्यात रशियन फौजांनी १५० मैल माघार घेतली. त्यांच्या एकूण ५७९४०० सैनिकांपैकी ३०९९५९ सैनिक मारले गेले तर १५९६२५ जखमी झाले किंवा आजारी पडले म्हणजे जवळ जवळ ८० % सैन्य बरबाद झाले. मॉस्कोच्या युद्धसंग्रहालयाला जर आपण भेट दिली तर तेथे अनेक शाळांचे हजेरीपट ठेवलेले आहेत ज्यातून अशी माहिती मिळते की १९४१ साली जी मुले पास झाली त्यातील फक्त ३% युद्धानंतर जिवंत राहिली. अर्थात हे सैनिकांच्या मृत्युचे प्रमाण रशियाच्या दृष्टीने काहीच नव्हते कारण त्यांची जागा घ्येण्यास दुसरे तरूण तयार होते. जर्मन सेनेला मात्र सैनिकांचा तुटवडा भासत होता. गणित मांडायचे झाले तर तीन जर्मन आर्मी ग्रुपचे ३१ जुलैपर्यंत २१३३०१ सैनिक ठार झाले व त्यांना मिळाले फक्त ४७,००० सैनिक त्या उलट रशियाचे ३० सप्टेंबरपर्यंत २,१२९,६७७ ठार झाले किंवा लढाईबाहेर फेकले गेले आणि तरीसुद्धा सैन्यबळ कमी पडले अशी वेळ त्यांच्यावर कधीही आली नाही.

११ ऑगस्टला जनरल हाल्डरने त्याच्या रोजनिशीत नोंद केली -
‘या सगळ्या परिस्थितीने स्पष्ट केले आहे की आम्ही रशियाच्या सैन्याला बरोबर जोखले नव्हते..... आम्ही त्यांच्याकडे २०० डिव्हिजन सैन्य असेल असे गृहीत धरून चाललो होतो पण आम्ही आत्ताच त्यांचे ३६० डिव्हिजन सैन्य मोजलेले आहे. अर्थात हे सैन्य आमच्या सैन्याइतके तयारीचे नाही आणि त्यांची शस्त्रेही आमच्या शस्त्रांइतकी आधुनिक नाहीत. त्यांचे डावपेचही आमच्या डावपेचांइतके प्रगल्भ नाहीत. पण बघावे तिकडे तेच दिसतात. त्यांच्या डझनावारी डिव्हिजन्स आम्ही नष्ट केल्या की ते त्या जागी परत डझन डिव्हिजन्स आणून ठेवतात आणि पुरवठा केंद्रं जवळ असल्यामुळे त्यांना हे करायला वेळ लागत नाही. आम्हाला मात्र आता यासाठी बराच वेळ लागतोय.’ जनरल हाल्डरचा हाही अंदाज चुकीचा होता कारण त्यावेळी रशियाने एकूण ६०० डिव्हिजन सैन्य उभे केले होते.

स्मॉलेन्स्कनंतर आता जर्मनीच्या सेना आणि मॉस्को यांच्यामधे म्हणावा तसा कुठलाही अडथळा उरला नाही. मुख्य म्हणजे आता वाटेत कुठल्याही नदीचा अडथळा नव्हता. २१ जुलैला मॉस्कोवर जर्मन विमानांची बाँबफेक चालू झाली. या बाँबफेकीमुळे राजधानीत मोठा गोंधळ उडाला व जनता सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धडपडू लागली. हा गोंधळ थांबवण्यासाठी स्टावकाच्या प्रमुखाने, बेरियाने बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यावर अडथळे उभे केले व जो पळून जाण्याचा प्रयत्न करेल त्याला गोळ्या घातल्या पण याच वेळी लेनिनचे शव व क्रेमलिनवरचे लाल तारे मात्र सैबेरियामधे सुरक्षितपणे हलविण्यात आले होते.

मॉस्कोमधे आता पावही रेशनवर मिळू लागला होता. शारिरीक कष्ट करणाऱ्यांना दररोज ८०० ग्रॅम पाव मिळे तर इतर कामगारांना ६०० ग्रॅम मिळे. इतरांना ४०० ग्रॅम व रक्तदात्यांना जास्त पाव मिळे. याच क्रमाने मांसही २.२ किलो, १.२ किलो व ६०० ग्रॅम या प्रमाणात मिळे. ज्याचे रेशन कार्ड हरवेल किंवा चोरीला जाईल त्याला उपासमारीलाच सामोरे जावे लागे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना मात्र या सगळ्यातून सूट होती. त्या काळातही ऐषारामाचे आयुष्य जगण्यात ते धन्यता मानत होते. मॉस्कोला वेढा पडला तेव्हा तर खाण्यास मिळणे आणि न मिळणे हा जीवन मरणाचा प्रश्न झाला. हे जे अधिकारी होते ते कोणाला किती खाण्यास मिळेल हे ठरवत, थोडक्यात म्हणजे कोण मरणार हे अप्रत्यक्षपणे ते ठरवत.

स्मोलेन्स्क १५ जुलैला जनरल गुडेरियनने जिंकले पण त्याची लढाई अजून संपली नव्हती कारण सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जनरल टिमोशेंको व झुकॉव्हच्या फौजांनी स्मोलेन्स्क काबीज करण्यासाठी निकराचा हल्ला चढविला. (या हल्ल्याने जर्मन सेनेची आगेकूच थांबली हा रशियासाठी एक मोठाच विजय प्राप्त झाला असे मानण्यास हरकत नाही. हवामान बदलण्याचा काळात जर्मनीची ही थांबलेली आगेकूच रशियन सेनेच्या दृष्टीने फार महत्वाची होती. काही इतिहासकारांचे तर असे म्हणणे आहे की स्मोलेन्स्कची ही लढाई ही या युद्धाला कलाटणी देणारी पहिली घटना आहे.)

मॉस्कोवर रोस्लाव्ह, क्रिचेव्ह व गॉमेल या तळावरुन हल्ले चढविण्याची योजना आखली गेली. रणगाड्यांच्या तेलपाण्यासाठी व किरकोळ दुरुस्तीसाठी थोडी विश्रांती घेऊन गुडेरियनने रोस्लाव्हवर १ ऑगस्टला भीषण हल्ला चढवला. रशियन सैन्याने या हल्ल्याला तेवढ्याच प्रखरतेने तोंड दिले. त्या दलदलीच्या जंगलाची त्यांना चांगली माहीती होती. त्या जंगलात ते बिळांमधून चुपचाप दडून रहात व जर्मन रणगाडे त्यांच्या समोरुन जाईपर्यंत हालचाल करीत नसत. नंतर ते बाजूने त्यांच्यावर हल्ला चढवीत. काही ठिकाणी स्वत: गुडेरियनला युद्धस्थळी (काझाकी येथे) जावे लागले यावरुन ही लढाई किती अटीतटीने लढली गेली असेल याची आपण कल्पना करु शकतो. रोस्लाव्हची लढाई एका आठवड्यात संपली. या लढाईत रशियाची अठ्ठाविसाव्या आर्मी पूर्णपणे नामशेष झाली. मुख्य म्हणजे मॉस्कोच्या संरक्षण फळीला मोठे भगदाड पडले. ब्रायन्स्कपर्यंत तुरळक सैनिकांच्या तुकड्या सोडल्यास आता एकही रशियन सैन्य दृष्टीक्षेपात नव्हते. आपली बाजू सुरक्षित करण्यासाठी गुडेरियनने क्रिच्शेव्ह काबीज करण्याचा निर्णय घेतला व अमलात आणला. आता धोका फक्त गॉमेल येथे असणाऱ्या रशियन सैन्याचा होता. मॉस्कोवर हल्ला चढविण्यापूर्वी २१ ऑगस्टला गॉमेलच्या रशियन सैन्याचा समाचार घेण्याचा त्याचा विचार होता.

यावेळी एक अतर्क्य गोष्ट घडली....

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मार्गी's picture

26 Feb 2016 - 11:11 am | मार्गी

वा! अतिशय जोरदार! एक जिव्हाळ्याचा ज्वलंत विषय जीवंत करताय! वाचतोय! धन्यवाद.

अत्रन्गि पाउस's picture

26 Feb 2016 - 11:25 am | अत्रन्गि पाउस

पटकन पुढचा भाग टाका बघू ....

जखमी आणि मृत्युमुखींचे आकडे सुन्न करणारे आहेत. विवेचन नेहमीप्रमाणेच उत्तम!
पुभालये :)

बोका-ए-आझम's picture

26 Feb 2016 - 11:29 am | बोका-ए-आझम

वाचतोय.

गॅरी ट्रुमन's picture

26 Feb 2016 - 11:42 am | गॅरी ट्रुमन

नेहमीप्रमाणेच जबरदस्त लेख.

एक सूचना करू का?लेखात मधूनमधून नकाशे टाकता येतील का?म्हणजे मिन्स्क, स्मोलेन्स्क इत्यादी शहरे नक्की कुठे आहेत आणि मॉस्कोपासून किती लांब आहेत याचा अंदाज यायला ते चांगले पडेल.मी शाळेत असताना वि.स.वाळींबे यांचे वॉर्सा ते हिरोशिमा हे पुस्तक अगदी झपाटल्यासारखे वाचले होते.पण त्यावेळीही मला हीच अडचण आली होती. किएव्ह, खार्कोव्ह,स्मोलेन्स्क इत्यादी शहरांची नावे तर वाचत होतो पण नुसत्या नावांमधून दिशेचा आणि अंतरांचा काहीच बोध होत नव्हता.नंतर एकदा लायब्ररीमधून बार्बारोसावर पुस्तक वाचले होते.त्यावेळी मी बाजूला गुगल मॅप उघडूनच ठेवला होता.कोणत्याही शहराचे नाव आले की ते नक्की कुठे आहे हे त्या नकाशामधून कळल्यावर अधिक चांगले समजून यायला मदत झाली.

लहान तोंडी मोठा घास घेत आहे याबद्दल क्षमस्व.तुम्ही लिहित आहात त्याच्या १% ही मला या विषयावर लिहिता येणार नाही.तरीही जर हे सहजासहजी जमले तर करावे ही विनंती.

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2016 - 11:45 am | जयंत कुलकर्णी

हा जो नकाशा टाकला आहे तो पुरेसा आहे असे वाटल्याने मी अजून काही टाकले नाही व प्रत्येक भागात हा नकाशा टाकायचा असे ठरवले होते. पण हे पुरेसे नसल्यास जून नकाशे टाकेन. शेवटी हे युद्ध समजावे अशी माझी व प्रत्येकाची इच्छा आहे....

गॅरी ट्रुमन's picture

26 Feb 2016 - 11:58 am | गॅरी ट्रुमन

शेवटी हे युद्ध समजावे अशी माझी व प्रत्येकाची इच्छा आहे....

नक्कीच.

माझी विनंती आहे की अजून एखादा नकाशा केवळ दिशेचा आणि अंतराचा बोध यायला देता आला तर ते अधिक चांगले होईल. वर दिलेल्या नकाशात नक्की कुठल्या सेनानीचे सैन्य किती तारखेला कुठे होते अशी माहिती आहे.आणि त्यातूनही स्मोलेन्स दोनदा झूम केल्यानंतरच दिसले.म्हणून वरील प्रतिसाद लिहिला.

धन्यवाद

सहमत. हा नकाशा तसा पुरेसा नाही वाटत.

नेत्रेश's picture

26 Feb 2016 - 12:44 pm | नेत्रेश

." जर्मन तोफखान्याचा एक अधिकारी काही जर्मन सैनिकांच्या हाती लागला. रशियाच्या दुर्दैवाने या अधिकाऱ्याकडे प्रतिआक्रमणाच्या योजनेचे सगळे नकाशे सापडले."

इथे "रशियन तोफखान्याचा एक अधिकारी काही जर्मन सैनिकांच्या हाती लागला" असे असावे

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत

जयंत कुलकर्णी's picture

26 Feb 2016 - 1:38 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

नया है वह's picture

26 Feb 2016 - 3:36 pm | नया है वह

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत

रोहित गोसावी's picture

26 Feb 2016 - 3:43 pm | रोहित गोसावी

कृपया...कोणाकडे पेशवेकाळातील विश्रामबागवाडा एेतिहासिक महत्व असेन तर कृपया मला whtsapp करा...8421060808

मुक्त विहारि's picture

26 Feb 2016 - 3:58 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

प्रतिसाद द्यायला पण शब्द सुचत नाहीत.

जव्हेरगंज's picture

26 Feb 2016 - 7:40 pm | जव्हेरगंज

वाचतोय !

पुभाप्र

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Feb 2016 - 12:32 am | लॉरी टांगटूंगकर

जबरदस्त लेख!

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2016 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे

रोचक इतिहास आणि त्या युद्धाच्या वेगाइतकेच वेगवान वर्णन ! पुभाप्र.

खूपच उत्कंठावर्धक लिहित आहात. पुभाप्र.

मराठी कथालेखक's picture

14 Mar 2016 - 5:35 pm | मराठी कथालेखक

एक डिवीजन म्हणजे किती सैन्य ?

जयंत कुलकर्णी's picture

15 Mar 2016 - 6:06 pm | जयंत कुलकर्णी

खाली दिलेले आहे तसे असतेच असे नाही संख्या कमी जास्त होऊ शकते...
Simple, Free Image and File Hosting at MediaFire