बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
23 Feb 2016 - 9:00 am

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १
.....या सर्व कारणाने जर्मनीने ऑपरेशन बार्बारोसा आखले आणि अमलात आणले....

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जाता जाता या मोहिमेचे नाव हिटलरने बार्बारोसा का ठेवले हे पाहणे मनोरंजक ठरेल. बार्बारोसा या जर्मन शब्दाचा अर्थ होतो लाल दाढीचा किंवा लाल केसांचा (रानटी ?) माणूस. (ज्यांना जर्मन भाषा येते त्यांनी हे बरोबर आहे का ते सांगावे) १२ व्या शतकात होहेनस्टौफन घराण्यात ‘फ्रेड्रिक-पहिला’ नावाचा एक क्रूर, शूर आणि अत्यंत महत्वाकांक्षी सरदार होऊन गेला त्याचे टोपण नाव बार्बारोसा होते. हा नंतर रोमन सम्राटही झाला. याच फ्रेड्रिकने तिसऱ्या धर्मयुद्धात सलादिनविरूद्ध लढण्यासाठी ११८८ साली कूच केले होते पण त्याच्या उतावळेपणामुळे त्याने एका वाहत्या नदीत घोडा घातला आणि तो त्यात बुडाला. या अत्यंत लोकप्रिय बार्बारोसाबद्दल अनेक जर्मन लोककथा काळाच्या ओघात तयार झाल्या त्यातील एका कथेमुळे हिटलरला या मोहिमेचे नाव ऑपरेशन बार्बारोसा ठेवण्याचा मोह झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिटलरचे दुसरे घर हे उबरसॅल्झबेर्ग नावाच्या निसर्गरम्य गावात होते. हे गाव बव्हेरियन आल्प्समधे बेश्टेगाडेनबर्ग नावाच्या शहराजवळ आहे. स्थानिक दंतकथेनुसार तेथे असलेल्या बेश्टेगाडेन पर्वत रांगातील सगळ्यात उंच उंटर्बर्ग नावाच्या शिखराखाली फ्रेड्रिक-१ विश्रांती घेत आहे आणि संकटसमयी जर्मनीने मदतीला बोलावण्याची वाट बघतो आहे. असो.

२२ जूनला हिटलरने आदेश क्र. २१ जारी केला त्यात काय लिहिले आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
‘.....रशियन सैन्याचा मोठा भाग पश्चिम रशियामधेच नष्ट करायचा आहे. यासाठी काही धाडसी मोहिमा आखाव्या लागतील.

शत्रूच्या बचावफळीत चिलखती दलांच्या मदतीने खोलवर पाचर मारून हे साध्य करता येईल. हे जर साध्य करायचे असेल तर रशियाच्या विस्तीर्ण प्रदेशातून कुठेही माघार घेणे नाही हे लक्षात ठेवावे लागेल. रशियाच्या वायुदळाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी त्याचा बंदोबस्त अगोदरच करावा लागेल. या युद्धात आपल्याला रुमानिया अणि फिनलँडचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रिपेटच्या दलदलीने या युद्धभूमिचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडले आहेत असे समजले तर उत्तर युद्धभूमिवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. या कामासाठी दोन आर्मीग्रुप उपलब्ध करण्यात येतील. यातील एकाला म्हणजे दक्षिण आर्मी ग्रुपला वॉर्साच्या उत्तरेकडून हल्ला करून बेलारूसमधे असलेल्या शत्रूसैन्याचा नाश करण्याची कामगिरी देण्यात येईल. यासाठी त्यांना चिलखती दले व वेगवान हालचाली करणाऱ्या फौजा लागतील व त्या उत्तरेत केव्हाही हलविण्याची त्यांना तयारी करावी लागेल. या हालचाली त्यांनी पूर्व प्रशियामधून लेनिनग्राडवर आक्रमण करणाऱ्या आर्मी ग्रुप नॉर्थशी समन्वय राखून कराव्यात. या संयुक्त हालचालीत त्यांनी बाल्टिकमधील शत्रूसैन्याचा नाश करायचा आहे. ही महत्वाची कामगिरी पार पाडल्यावर लेनिनग्राड व कॉनस्टाटवर कब्जा केल्यावर मॉस्कोकडे लक्ष द्यावे. तोपर्यंत नाही हे लक्षात ठेवा. अर्थात जर रशिया अपेक्षेपेक्षा लवकर कोलमडला तर ही दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी पार पाडता येतील का नाही हे ठरवता येईल. प्रिपेट दलदलीच्या दक्षिणेला असलेल्या आर्मी ग्रुपने निपरच्या पश्चिमेला असलेल्या युक्रेनमधील रशियन सैन्यावर लक्ष केंद्रीत करून ते सैन्य नष्ट करावे. प्रिपेटच्या दोन्ही बाजूच्या या लढाया जिंकल्या की डॉनेट्स बेसीन व तेथील उद्योग ताब्यात घेण्यासाठी जलद हालचाली करून शेवटी मॉस्कोवर धडक मारावी. मॉस्को काबीज केल्यावर त्याचा दूरगामी परिणाम शत्रूवर होईलच पण तेथे असलेले रेल्वेचे जाळेही नष्ट होईल....’’

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जर्मनीच्या मुख्यालयाने या विशाल युद्धभुमीचे तीन भाग केले. उत्तर भाग, मध्य भाग व दक्षिण भाग. आर्मी ग्रुप नॉर्थवर बाल्टिकमधील रशियाच्या फौजांचा नाश करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. या ग्रुपमधे दोन आर्मी, (डिव्हिजन्स) एक हवाईदलाची डिव्हिजन, एक पँझर ग्रुप एवढे सैन्य सामिल केले गेले. याचे नेतृत्व होते फिल्ड मार्शल रिटर फॉन लिब या अधिकाऱ्याकडे.

रिट्रर फॉन लिब
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
हे आक्रमण पूर्व प्रशियामधून झपाट्याने मेमेल नदी पार करुन करायचे होते.

आर्मी ग्रुप सेंटर या ग्रुपचा प्रमुख होता फिल्ड मार्शल फॉन बॉक.
फिल्डमार्शल बॉक.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या ग्रुपमधे दोन आर्मी, दोन पँझर ग्रुप व केसेलरिंगचे दोन क्रमांकाचे एअर फ्लिट. यांना रोमिनटेनेर हाईडंपासून ब्रेस्ट-लिटॉस्कच्या दक्षिणेला धडक मारायची होती. केसेलरिंगच्या स्टुकाच्या स्क्वाड्रन्समुळे ही आर्मी या तिन्हीमधे सगळ्यात ताकदवान होती असे समजण्यास हरकत नाही. वाटेत येणाऱ्या रशियन सैन्याचा विध्वंस (म्हणजे खरोखरचा विध्वंस) करत या आर्मीला स्मोलेन्स्क काबिज करायचे होते व त्यानंतर मॉस्कोच्या दिशेला आक्रमण करायचे होते.

आर्मी ग्रुप साऊथचा प्रमुख होता प्रसिद्ध फिल्ड मार्शल रुनस्टेड.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सैन्यात तीन आर्मी, एक पँझर ग्रुप व एक एअर फ्लिट एवढे सैन्य होते व या सैन्याने प्रिपेटची दलदल व कारपाथिअन पर्वतरांगांमधून गॅलिशिया व युक्रेनवर आक्रमण करायचे होते. निएपर नदी पार करुन मग त्यांनी किएव्हवर मोर्चे बांधायचे होते. या जर्मन सैन्याचे हे आक्रमण चालू असताना फिनलँडच्या सैन्याने उत्तरेत उतरायचे होते व दक्षिणेत रुमानियाचे सैन्य युद्धात उतरणार होते.

जर्मनी पश्चिमेकडे वापरलेलेच यशस्वी डावपेच परत वापरणार होता म्हणजे त्यांचे मधल्या भागात जे सैन्य होते (सेंटर ग्रुप सेंटर) ते पुढे जोरदार मुसंडी मारणार होते. त्या काळात सॅटेलाईट नव्हते व विमानांना खालचे स्पष्ट दिसत नसे. शिवाय कॅमेरेही एवढ्या ताकदीचे नव्हते की खाली लपलेल्या सैन्याचे फोटो खेचू शकतील. दुर्दैवाने रशियन गुप्तचर खात्याला प्रिपेटच्या दलदली पलिकडच्या उंच गवतात व मक्याच्या शेतातील लपलेल्या रणगाड्यांचा सुगावा लागला नाही. स्टॅलिन व त्याच्या सेनाधिकाऱ्यांना जर्मनीचे आक्रमण दक्षिणेकडून होईल असे वाटत होते नव्हे खात्रीच होती कारण हा प्रदेश सपाट व येथील हवामानही तुलनेने उष्ण होते. म्हणजेच जर्मन ब्लिट्झक्रिगला अनुकूल. म्हणून त्यांनी त्यांच्या सैन्याच्या ६४ डिव्हिजन व चिलखती दलाच्या १४ ब्रिगेड जर्मनीच्या आर्मी ग्रुप साऊथसमोर आणून उभ्या केल्या होत्या. याउलट मध्यभागी फक्त ४५ डिव्हिजन सैन्य व १५ चिलखतीदलाच्या ब्रिगेड आर्मीग्रुप सेंटरसमोर उभ्या होत्या तर उत्तरेकडे फक्त ३० डिव्हिजन सैन्य व ८ चिलखती दलाच्या ब्रिगेड तैनात करण्यात आल्या होत्या. एकूण या आघाडीवर रशियाने ४,५००,००० सैनिक या आघाडीवर तैनात केले होते. अर्थात यातील काही पिछाडीवर राखीव म्हणूनही ठेवले होते. त्याची अचुक संख्या मला माहीत नाही.

जर्मन सैन्याचा रशिया-जर्मनी कराराबद्दल जो भ्रम होता तो अखेरीस २१ जुनला रात्री नष्ट झाला. बरोबर रात्री १० वाजता हिटलरने त्याच्या सैनिकांना उद्देशून खालील संदेश प्रसारीत केला....
‘‘गेले कित्येक महिने तणावात काढल्यावर मी आज तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतो... माझ्या प्रिय व शूर सैनिकांनो, रशियन सैन्याच्या १६० डिव्हिजन्स आज आपल्या सीमेवर उभ्या ठाकल्या आहेत. गेल्या काही दिवसात रशियन सैन्याने या सिमेचा भंग अनेक वेळा करुन करार धुळीस मिळविण्याचे दुष्कर्म केले. रशियाच्या अनेक गस्त घालणाऱ्या तुकड्यांनी आपल्या हद्दीत प्रवेश केला पण शेवटी तुमच्या प्रतिकाराने त्यांना परत जावे लागले आहे. सैनिकांनो याक्षणी तुमच्या आघाडीवर मी अभूतपूर्व सैन्य जमा केले आहे. आजवर असे सैन्य कोणी पाहिले असेल ना कोणी भविष्यात पाहील. एवढेच नाही तर अजूनही सैन्य तैनात करण्याचे काम जारी आहे. फिनलँडच्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून आमचे सैन्य रशियन सैन्याचा पराभव करण्यासाठी आतूर झाले आहे याची मला कल्पना आहे...... तुम्ही लवकरच अशा युद्धात भाग घेणार आहात जे युरोपचे, जर्मनीचे व जगाचे भवितव्य ठरविणार आहे. आता या युद्धातील विजय तुमच्या हातात आहे. या युद्धात तुम्हाला यश मिळो अशी मी देवाला प्रार्थना करतो.’’

दुसऱ्या दिवशी पहाटे सव्वातीन वाजता जर्मन सैन्याचे रशियावरील आक्रमण सुरु झाले. ७००० वेगेवेगळ्या आकारांच्या तोफा त्यांनी निश्चित केलेल्या लक्ष्यावर आग ओकू लागल्या. त्यांच्या मदतीला १००० बाँबफेकी विमाने आकाशात अवतीर्ण झाली आणि त्यांनी रशियाच्या अंतर्भागातील विमानतळावर तुफान बाँबवर्षाव केला. ज्याठिकाणी नद्या आडव्या येत होत्या उदा. बग नदी, तेथे सव्वातीनच्या आधीच काही पूल ताब्यात घेण्यात आले होते. त्या पुलांच्या रक्षणासाठी रशियन सैन्याच्या ज्या तुकड्या होत्या त्यांचा मशिनगनने खातमा करण्यात आला. ज्याठिकाणी पूल नव्हते तेथे त्या पहाटेच्या शांततेत रबरी बोटीत सैनिकांनी नदी पार केली तर काही ठिकाणे अँफिबियस रणगाडेही वापरण्यात आले. जे युद्धसाहित्य खास ब्रिटनच्या चॅनेलमधे वापरण्यासाठी तयार केले होते ते सर्व साहित्य तेथे हजर होते.

थोड्याच काळात पँझरच्या तुकड्यांनी रशियाच्या संरक्षणफळीची विल्हेवाट लावत पुढे जोरदार मुसंडी मारली व ते मिन्स्क व स्मोलेन्स्कच्या रस्त्यावर धावताना दिसू लागले. अर्थात हे मधल्या भागातील आक्रमण तुलनेने सोपे होते कारण या भागात रशियन सैन्य एकवटले नव्हते. दक्षिणेला मात्र फिल्ड मार्शल रुनस्टेडच्या सैन्याला जोरदार प्रतिकार झाला. लिथुआनियाच्या सरहद्दीवरही आर्मी ग्रुप नॉर्थला येथे अत्यंत कडवेपणाने लढणाऱ्या मंगोलियन सैन्यापुढे थांबावे लागले. या आघाडीवर ३४ तासात जर्मन सैन्याने रशियन भूभागात ३४ मैल मुसंडी मारली. या सैन्याचा प्रमुख जनरल फॉन मानस्टिनला कल्पना होती की हे युद्ध जिंकायचे असेल तर रशियन सैन्याचा नाश हा लवकरात लवकरात होण्याचे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मॉस्को ताब्यात घेऊन तेथील सरकार उलथवल्याशिवाय हे युद्ध जिंकता येणार नाही. आणि त्याला हे असे झाले नाही तर जर्मनिचा विनाश टळू शकत नाही याचीही खात्री होती. हे माहीत असल्यामुळे जनरल मानस्टिनने त्याच्या सैन्याला विश्रांती न देता पुढे रेटले. त्याने त्याच्या सैन्याला पहिले लक्ष्य दिले होते ते म्हणजे डाऊगावपिल्स हे शहर व डाऊगाव नावाच्या नदीवरील पूल. रशियन सैनिकांच्या कडव्या विरोधापेक्षा जर्मन सैनिकांच्या ह्रदयात धडकी भरविली ती जर्मन पँझर कोअरच्या डाव्या बाजूला भूतासारख्या अवतीर्ण झालेल्या रशियन महाकाय रणगाड्यांच्या एका कोअरने. ही होती सोव्हिएट ३-आर्मड कोअर. यात दोन प्रकारचे रणगाडे होते एक होता केव्ही-१ आणि दुसरा केव्ही-२. यांची वजने पाहिल्यास आपल्याला यांच्या अचाट शक्तीची कल्पना येईल. पहिल्याचे होते ४३ टन आणि दुसऱ्याचे होते ५२ टन. अर्थात याचे चिलखत जाड असल्यामुळेच यांची वजने एवढी होती. ८८ मिमी व १२० मिमि च्या प्लेटचे याचे चिलखत होते. (रशियन शास्त्रज्ञांचे धातू शास्त्राच्या अभ्यासाबद्दल मी लिहिण्याची गरज नाही. मॉस्कोच्या संग्रहालयात (बहुधा) एक केव्ही-२ रणगाडा ठेवला आहे त्यावर जर्मन रणगाड्याने अगदी जवळून तोफ डागली होती. पण त्यामुळे त्याच्या चिलखतावर फक्त एक पोचा आलेला दिसतो.

केव्ही-१ व केव्ही-२
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या रणगाड्यामधे एक मोठी कमतरता होती ती म्हणजे त्याच्या वजनामुळे त्याचा वेग अत्यंत कमी होता. शेवटी याचे उत्पादन बंद करण्यात आले.) तर या कोअरमधे असे ४०० रणगाडे होते. जर्मनीच्या पॅंझर-४१ कोअर व सोव्हिएट ३-आर्मड कोअरमधे दोन दिवस घनघोर युद्ध झाले. त्यात जर्मनीने शेवटी हाय-व्हेलॉसिटी ८८ मिमीच्या रणगाडाविरोधी तोफा उतरविल्यावर अखेरीस ही लढाई जर्मन सैन्याने जिंकली. जर्मन वेगवान रणगाड्यांनी जंगली कुत्री जशी सावजाला घेरुन त्याचे लचके तोडतात तसे या अवाढव्य रणगाड्यांवर चहूबाजूने हल्ले चढविले व त्यांचे फिरणारे पट्टे उध्वस्त करुन त्यांची हालचाल बंद केली. याचवेळी जर्मन सैनिकांनीही बराच पराक्रम गाजवला. त्यांनी त्या रणगाड्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या फिरत्या पट्ट्याला चिकटणारे बाँब चिकटवले व ते उध्वस्त केले. युद्ध संपेपर्यंत रशियन सैन्याच्या २०० रणगाड्यांचा नाश झाला होता. २६ जूनला जर्मन सैन्याची आगेकूच परत सुरु झाली.

२६ तारखेच्या पहाटे जर्मन सैन्य डाऊगावपिल्सपासून चार पाच मैल अंतरावर पोहोचले. एखाद्या लोण्यातून तप्त सुरी फिरावी तसे हे सैन्य गोंधळलेल्या रशियन सैन्यातून पुढे सरकत होते. पकडलेल्या ट्रकमधून रशियन सैनिकांचा गणवेष चढवून जर्मन सैनिकांनी डाऊगाव नदीवरील महत्वाचा पूल काबीज केला. मग त्याच रस्त्याने जनरल मानस्टिनच्या रणगाड्यांनी धडधडत ती नदी पार केली. गोंधळलेल्या रशियन मुख्यालयाला जर्मन सैन्य कुठवर पोहोचले आहे याची खात्री नव्हती. मानस्टिनला खरेतर त्याच धडाक्याने लेनिनग्राड गाठायचे होते पण असे म्हणतात आरंभीच मिळालेल्या या विजयाने हिटलर भांबावून गेला व त्याने जनरल मानस्टिनचे सैन्य सहा दिवस तेथेच थांबवून ठेवले. या सहा दिवसात रशियन सैन्याला सावरायला बराच अवधी मिळाला. त्यांनी तेवढ्या काळात स्टॅलिन लाईनची संरक्षणव्यवस्था जरा मजबूत केली. (रशियन-इस्टोनिया सरहद्द).

लेनिनग्राड आणि मॉस्कोच्या दिशेने जर्मन सैन्याची वाटचाल वेगाने चालू असताना दक्षिणेला मात्र त्यांना कडवा विरोध होत होता. या आघाडीवर रशियाचे चार डिव्हिजन सैन्य तैनात केले गेले होते. तुलनेने ही व्यवस्था बरी होती. मुख्य म्हणजे त्यांनी तेथे अगणित पिलबॉक्सेस उभ्या केल्या होत्या व त्यांनी त्यांचा तोफखाना मोठ्या कल्पकतेने लपविला होता. या येथे मात्र जर्मन सैन्याचा खरा कस लागला व त्यांचे जबरी नुकसान झाले. फिल्ड मार्शल क्लिस्ट याच्या सैन्याचा लुवॉव्हचा मार्ग मोकळा झाला खरा पण रशियन सैन्याने अचानक प्रतिहल्ला चढविला. यात केव्ही-१ व केव्ही-२ या रणगाड्यांबरोबर जर्मन सैनिकांना रशियाच्या अधिक चपळ टी-३४ या प्रकारच्या रणगाड्यांशी सामना करावा लागला. याचेही चिलखत ८८ मिमी जाड व उतरते होते. याचा बंदोबस्त करण्यासाठी जर्मन सैन्याला परत त्याच रणगाडाविरोधी तोफा मैदानात आणाव्या लागल्या. जर्मन सैनिकांना याच वेळी एका अनोख्या रणगाड्याचे दर्शन झाले. हा रणगाडा केव्ही-२ जातीचा होता पण विचित्र दिसणाऱ्या या रणगाड्यावर पाच टरेट होते. या कडव्या प्रतिकाराने जर्मन सैन्याला या आघाडीवर फक्त ६० मैलच मुसंडी मारता आली.

पण सगळ्यात नेत्रदिपक यश मिळाले ते आर्मी ग्रुप सेंटरला. या सैन्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गुडेरियन आणि हॉथच्या रणगाड्यांनी विस्कळीत झालेल्या रशियन बचावफळीतून मॉस्कोच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली. याच संधीचा फायदा उठविण्यासाठी जर्मन मुख्यालयाने आर्मी ग्रुप नॉर्थमधील कर्नल जनरल हुपनरच्या चौथ्या पॅझर ग्रुपला सेंटर ग्रुपमधे हलविले. आता १६०० रणगाडे मधे येणाऱ्या रशियन सैन्याचा फडशा पाडत मॉस्कोच्या दिशेने धावू लागले. त्यांना थोडाफार विरोध झाला तो ब्रेस्ट-लिटोस्क येथील किल्ल्याजवळ. रशियन सैन्याला वळसा घालून वेगाने जाणाऱ्या या ब्लिट्झक्रिगकडे हताशपणे पाहण्याशिवाय हे सैन्य काही करु शकत नव्हते. शेवटी ३० जून रोजी या ठाण्याने जर्मनीपुढे मान टाकली.

रशियन सेंट्रल फ्रंटमधे आता गोंधळ माजला. त्यांच्या विरोध करणाऱ्या प्रत्येक सैन्याला जर्मन सैन्य रणगाड्यांच्या मदतीने वेढत होते. वरुन स्टुका विमाने आग ओकत होती तर चिलखती गाड्यांमधून जलद हालचाल करणारे पायदळ त्यांचा निर्दयपणे नाश करीत होते. बविस्टन चर्चिल यांनी स्टॅलिनला वारंवार इशारे देऊनही रशियाच्या सैन्याची ही अवस्था झाली होती आणि त्याला जबाबदार होता स्वत: स्टॅलिन. रशियन सैन्यात त्याकाळी अनुभवी सेनाधिकाऱ्यांचा प्रचंड तुटवडा होता आणि त्यालाही कारण होते स्टॅलिनच. १९३७-१९३८ या काळात स्टॅलिनने ३५००० अधिकाऱ्यांचे मुडदे पाडले होते. ९० % जनरल्सचा निर्घृणतेने काटा काढण्यात आला होता...

२२ जूनला पहाटे तीन वाजून १५ मिनिटांनी वेअरमाख्टने रशियाला जो आश्चर्याचा व्यूहात्मक धक्का दिला त्याबद्दल हिटलरचे कौतुकच केले पाहिजे कारण जे स्पष्ट होते, उघड गुपित होते त्यात हे यश मिळविणे सोपे नव्हतेच. त्या पहाटे जर्मन सैन्य एखाद्या लोण्यातून तापलेली सुरी फिरावी तसे रशियन हद्दीतून पुढे गेले. कसे ते आपण वर पाहिलेच. रांगेने उभी केलेली रशियाची १२०० विमाने जागेवरच नष्ट करण्यात आली. या सबंध युद्धात ब्रिटनची जेवढी विमाने जर्मनीने नष्ट केली त्यापेक्षाही बार्बारोसाच्या पहिल्या दिवशीची ही संख्या जास्त होती. रशियाच्या बाँबर कमांडचा प्रमुख ले. जनरल इव्हान कोपेटने दुसऱ्या दिवशी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली अर्थात स्टॅलिनच्या काळात त्याने जे केले ते शहाणपणाचेच होते असे म्हणावे लागेल.

जोसेफ स्टॅलिन
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आठवड्याच्या आत रशियन लाल सेनेच्या नवीन कोऱ्या मेकनाईझ्ड कोअरचा ९/१० भाग नष्ट झाला होता. स्टॅलिनला हा हल्ला अपेक्षितच नव्हता हे अजून एका गोष्टीवरून सिद्ध होते. जनरल झुकॉव्हने जेव्हा त्या पहाटे ३.३० वाजता त्याला ही कटू बातमी सांगण्यासाठी फोन केला, तेव्हा तो घेतला गेला खरा पण लगेचच त्याला दुसऱ्या टोकाला घोरण्याचा आवाज ऐकू आला. त्याने परत तेच सांगितले आणि शेवटी स्पष्टच विचारले मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुम्हाला ? पण समोरून काहीच उत्तर आले नाही. ४.३० वाजता पॉलिटब्युरोची बैठक बोलावण्यात आली तेव्हा स्टॅलिनचा चेहरा पांढरा फटक पडला होता व त्याला त्यावेळीही जर्मनीने रशिया विरूद्ध युद्ध पुकारले आहे हे खरे वाटत नव्हते. त्याने घाईघाईने अत्यंत हास्यास्पद असे ‘सबंध सीमेवर जर्मन सीमेचा भंग न करता’ प्रतिकार करण्याचे आदेश दिले. जरा सावरल्यावर मात्र त्याने पहिलाच अत्यंत योग्य असा, सक्तीच्या लष्करभरतीचा आदेश दिला. या आदेशानुसार १९०५ ते १९१८ या काळात जन्मलेल्या सर्व नागरिकांना व ८ लाख स्त्रियांना हजर होण्यास सांगितले गेले. सगळे मिळून एकूण ५० लाख नागरिकांना बोलाविण्यात आले आणि डिसेंबरपर्यंत, युद्धाला तयार अशा २०० नवीन डिव्हिजन्स उभ्या करण्यात आल्या. पन्नाशीत आणि साठीत असलेल्यांसाठी वेगळ्या डिव्हिजन्स उभ्या करण्यात आल्या.

रशियाच्या प्रतिकाराचा एक आठवडा स्टॅलिनमुळे वाया गेला. जर्मनीचे आक्रमण होऊन एक आठवडा होतो न होतोय तोच मानसिक संतुलन बिघडून तो २९ जूनच्या पहाटे गायब झाला. त्याच्या या काळातील अवस्थेचे वर्णन मोलोटोव्हने असे केले आहे, ‘हे सात दिवस त्याला त्याच्या कपड्याची, खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती. मॉस्कोच्या बाहेर असलेल्या त्याच्या छोट्या घरात तो सतत येरझारा घालत होता. अर्थात त्याची ही अवस्था फार काळ टिकली नाही कारण तो नसल्यामुळे रशियाची सरकारी यंत्रणा ठप्प झाली. स्टॅलिनला त्याचे सहकारी इतके घाबरत की त्याच्या संमतीशिवाय त्यांनी कोणीही कसलाही निर्णय घेतला नाही. जेव्हा पॉलिटब्युरोचे एक शिष्ठमंडळ त्याला भेटण्यास गेले तेव्हा स्टॅलिन घाबरला कारण त्याला वाटले की हे शिष्टमंडळ त्याला अटक करण्यासच आले आहे. खरंतर ते त्याला पक्षप्रमुख पदाबरोबर संरक्षणमंत्रिपदही (Head of State Committee of Defence - ST­VK­) स्वीकारावे अशी विनंती करण्यासाठी आले होते. दोन दिवसांनी स्टॅलिन महाराजांनी जनतेला उद्देशून रेडिओवर आपला भला मोठा पहिला संदेश जारी केला. त्यात त्याने जनतेला विजयाची खात्री दिली होती. ‘आपल्या उद्दाम शत्रूला लवकरच आपल्या अफाट सैन्याची कल्पना येईल..... या भाषणाचा शेवट त्याने ‘विजयाकडे आगेकूच’ या शब्दांनी केला.

१० जुलैला तो सेनादलाचा सर्वोच्च सेनानी झाला तोपर्यंत जर्मन फौजा रशियामधे ४०० मैल आत घुसल्या होत्या आणि रशियाचे ४८०० रणगाडे, ९४८० तोफा, १७७७ विमाने एवढे युद्धसाहित्य नष्ट झाले होते. हे रेडिओवरचे भाषणही वाचण्यासारखे आहे..
कॉम्रेडस्, नागरीक, बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या शूर सैनिकांनो !
मी हे माझे भाषण आपल्या सगळ्यांना उद्देशून करीत आहे.आपल्या पितृभूमिवर २२ जून रोजी पहाटे हिटलरच्या जर्मनीने विश्वासघातकी आक्रमण केले व अजूनही त्यांच्या सेना आपल्या भूमिवर आहेत. आपल्या रेड आर्मीने केलेल्या प्रतिकाराने त्यांच्या सर्वोत्तम सैन्याचा फडशा पाडला असला तरीही जर्मनी अधिकाधिक सैन्य व युद्धसाहित्य युद्धात ओतत आहे. हिटलरच्या फौजांनी लिथुआनिया, लॅट्व्हियाचा बराचसा भाग, युक्रेन व बायलोरशियाचा पश्चिम भाग काबीज केला आहे. फॅसिस्ट विमानांनी आता मरमान्स्क, ओर्शा, मोघिलेव्ह, किव्ह, ओडेसा, सेवास्टपूल या भागात हल्ले सुरु केले आहेत. अर्थात परिस्थिती गंभीर आहे हे नाकारण्यात अर्थ नाही.
असे कसे झाले हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. फॅसिस्ट प्रचारयंत्रणा म्हणते त्यांची सेना अजिंक्य आहे. काय हे खरे आहे का?
मुळीच नाही ! इतिहास हाच दाखला देतो की आत्तापर्यंत अपराजित सैन्य जन्माला आले नाही व यापुढेही येणार नाही. नेपोलियनच्या सैन्याचा पराभव करणे ही अशक्य गोष्ट आहे असे मानले जात होते पण त्या सैन्याचाही पराभव रशिया, इंग्लंड व जर्मनीच्या सैन्याने केलाच होता. कैसरचे सैन्य पहिल्या महायुद्धात अजिंक्य मानले जात होते पण त्याच सैन्याचा अनेक वेळा पराभव झाला. हिटलरच्या फॅसिस्ट सैन्याला आजही तेच लागू होते. या फॅसिस्ट सैन्याला अजून युरोपमधे खऱ्याखुऱ्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागलेले नाही. फक्त आपल्याच भूमिवर त्यांना लाल सैन्याने प्रखर प्रतिकार करुन त्यांचे आक्रमण थोपविले असेल तर आपल्या हे लक्षात येईल की हिटलरचा पराभव अटळ आहे.

आज आपला मोठा प्रदेश फॅसिस्ट सैन्याच्या ताब्यात आहे याचे कारण हे युद्ध त्यांच्या सोयीने, त्यांना योग्य अशा वेळी सुरु झाले आहे कारण हे युद्ध त्यांनी सुरु केले आहे. जर्मनीने १७० डिव्हिजन सैन्य या युद्धात उतरवले आहे हा याचाच पुरावा आहे. रशियन फौजा अजून युद्धआघाडीवर पोहोचलेल्या नाहीत हे लक्षात घ्या. शिवाय अनाक्रमणाचा करार असताना त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे.

हिटलर व रिबेन्ट्रॉपसारख्या विश्वासघातकी माणसांबरोबर अनाक्रमणाचा करार केलाच कसा गेला? हाही प्रश्न बरेचजण विचारतील. ही सरकारची चूक नव्हे काय, असेही विचारले जाईल. याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. अनाक्रमणाचा करार हा दोन देशातील शांतता करार असतो. या काळात काय करायचे हे त्या त्या देशांवर अवलंबून असते. या कराराचा प्रस्ताव जर्मनीने आमच्यासमोर १९३९ साली ठेवला. हा प्रस्ताव रशिया नाकारु शकला असता का ? कुठल्याही शांतीप्रिय देशाला तसे करणे शक्य नाही हे लक्षात घ्या. या कराराने आपल्या सीमा सुरक्षित राहतील की नाही एवढाच विचार आम्ही त्यावेळेस केला. हा करार याचसाठी होता हे आपल्या लक्षात आले असेलच.

या कराराने आपला काय फायदा झाला ? एका वर्षासाठी तरी आपल्याला लष्करी ताकद वाढविण्यासाठी वेळ मिळाला. हा करार टरकावून, आपल्यावर आक्रमण करुन फॅसिस्ट जर्मनीला काय फायदा झाला असेल ? झाला असेल तर तो तात्कालिकच असेल याची मी आपणास ग्वाही देतो. जर्मनीला अचानकपणे आक्रमण करुन थोडाफार फायदा झाला असेल पण जगात त्यांची नाचक्की झाली आहे. त्यांचे खरे स्वरुप उघडे पडले आहे. याक्षणी जो फायदा शत्रूला झालेला आहे, ते या युद्धतील फक्त एक छोटे प्रकरण आहे त्या तुलनेत रशियाचा आतोनात राजकीय फायदा झाला आहे आणि हा फायदाच आपल्याला अंतिम विजय मिळवून देणार आहे.

आज आपली शूर रेड आर्मी, आरमार, हवाईदल आणि रशियन जनता, युरोप, अमेरिका व एशियामधील सभ्य स्त्रीपुरुष फॅसिस्ट राजवटीचा धिक्कार करीत आहे. एवढेच काय जर्मनीतील सभ्य स्त्रीपुरुषही या राजवटीचा मनापासून धिक्कार करत असतील याची मला खात्री आहे. जगातील सर्व जनता आपल्या बाजूने आज उभी आहे कारण आपली बाजू न्यायाची आहे हे त्यांना चांगले माहीत आहे. यात फॅसिस्ट जर्मनीचा पराभव अटळ आहे याची सगळ्यांनाच खात्री आहे.

आमच्यावर लादलेल्या या युद्धामुळे आपली गाठ एक अत्यंत धूर्त व लबाड शत्रूशी पडली आहे...जर्मनीची फॅसिस्ट नाझी राजवट. रणगाडे आणि विमानांनी उन्मत्त झालेल्या शत्रूशी आपले सैन्य मोठ्या वीरश्रीने लढत आहे. एकेक इंच लढविण्यात येत आहे. शत्रूने आजवर न पाहिलेले आपले प्रचंड सैन्य लवकरच रणागंणावर उतरेल तेव्हा वेगळेच चित्र जगाला पाहण्यास मिळेल.

या आक्रमकांचा नाश करण्यासाठी काय केले पाहिजे ? आपली कर्तव्यं काय आहेत ?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे रशियन जनतेने परिस्थितीचे गंभीर स्वरुप लक्षात घेणे अत्यंत जरुरीचे आहे. याआधीचा सौम्य दृष्टिकोन आता चालणार नाही. युद्धामुळे पूर्वीच्या परिस्थितीत अमूलाग्र बदल झाला आहे. शत्रू क्रूर व त्याची घोडदौड रोखणे अवघड आहे पण अशक्य नाही. आपल्या श्रमातून निर्माण झालेले तेल, धनधान्य, आपली भूमि बळकावण्यासाठी शत्रूने हे आक्रमण केले आहे. त्याला सरंजामशाही, झारशाही परत एकदा प्रस्थापित करायची आहे. आपली संस्कृती नष्ट करायची आहे. आपल्या संघराज्यातील स्वतंत्र जनतेला परत एकदा गुलामगिरीत ढकलायचे आहे. त्यांना रशियन जनतेला जर्मन राजेराजवाड्यांचे, सरदारांचे गुलाम बनवायचे आहे. हाच जीवनमरणाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य की गुलामगिरी ! आपण सर्वांनी आळशीपणा झटकून या नवीन उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी जोमाने कामास लागले पाहिजे. शत्रूला दयामाया दाखविण्यात अर्थ नाही.

तसेच आपल्या सैनिकात भ्याडांना, अफवा पसरविणाऱ्यांना, पळून जाणाऱ्यांना जागा नाही हे लक्षात घ्या. फॅसिस्ट जर्मनीविरुद्धच्या लढाईत भीतीला थारा नाही. आपले थोर नेते लेनिन म्हणाले होते त्याची मला आज येथे आपल्याला आठवण करुन द्यावीशी वाटते. ते म्हणाले होते, ‘सोव्हिएटचे स्त्रीपुरुष हे युद्धात कधीच डगमगून जात नाहीत. ते धिराने निर्भयपणे आपल्या शत्रूशी लढण्याची तयारी करतात. कोट्यावधी रशियन जनतेचे हेच गुण उजळून निघतील याची मला खात्री आहे.
सर्व काम हे युद्धपातळीवर उरकले गेले पाहिजे. युद्धासाठी लागणाऱ्या कुठल्याही सामानाच्या उत्पादनाला प्राथमिकता द्यायची आहे. आत्तापर्यंत रशियन जनतेच्या हे लक्षात आलेले आहे की हा फॅसिस्ट पशू माणसाळणे शक्य नाही. रशियन जनतेला आपले हक्क आणि भूमिच्या रक्षणासाठी आता पेटून उठले पाहिजे........इ. इ.’’

स्टॅलिन कधीच त्याच्या भाषणासाठी प्रसिद्ध नव्हता पण प्रसंगच असा होता की रशियन जनता त्या साध्यासुध्या शब्दांनी पेटून उठली. पुढे काय झाले ते आपल्याला माहीत आहेच....
क्रमश:
जयंत कुलकर्णी

इतिहासलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Feb 2016 - 9:25 am | प्रचेतस

युद्धस्य कथा रम्यः|

महासंग्राम's picture

23 Feb 2016 - 9:29 am | महासंग्राम

वाह खूब सही वाचताना 'Enemey at the Gates' ची आठवण झाली …. त्यातली vasili बद्दल पण नक्की लिहा…

सुबोध खरे's picture

23 Feb 2016 - 9:38 am | सुबोध खरे

अतिशय सुंदर

बोका-ए-आझम's picture

23 Feb 2016 - 10:18 am | बोका-ए-आझम

KV हे रणगाडे स्टॅलिनच्या मर्जीतल्या क्लिमेंती व्होरोशिलोव्ह नावाच्या फील्ड मार्शलच्या नावाने बनवलेले होते. जर्मनांच्या टायगर रणगाड्यांपुढे ते टिकू शकले नाहीत. १९४३ मध्ये स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर रशियन सैन्याने स्टॅलिनच्या नावे बनवलेल्या IS (Iosif Stalin - त्याचं मूळ नाव Iosif Vissariovitch Dzugashvili असं होतं) या रणगाड्यांनी टायगर्सना अटकाव केला आणि पुढच्या निर्णायक लढाया जिंकल्या. हा सगळा रोमहर्षक इतिहास जर जयंतकाकांच्या लेखणीतून वाचणं यासारखा दुसरा आनंद नाही.

जयंत कुलकर्णी's picture

23 Feb 2016 - 11:55 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2016 - 12:24 pm | गॅरी ट्रुमन

मस्त लेख. खूपच आवडला.

स्टॅलिन कधीच त्याच्या भाषणासाठी प्रसिद्ध नव्हता पण प्रसंगच असा होता की रशियन जनता त्या साध्यासुध्या शब्दांनी पेटून उठली. पुढे काय झाले ते आपल्याला माहीत आहेच....

सुरवातीला स्टालिनच्या अत्याचारांना कंटाळलेल्या लोकांनी (विशेषतः युक्रेन, बेलारूस येथील) जर्मन सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्वागतही केले होते.पण किएव्हसारख्या ठिकाणी जर्मनांनी स्टालिन परवडला असे अत्याचार केले त्यामुळे परत लोकांनीही तिखट प्रतिकार केला असे काहीसे वाचल्याचे आठवते. ते बरोबर आहे का?

जवळपास मॉस्कोपर्यंत पोहोचलेल्या जर्मन सैनिकांना रशियन मागे रेटू शकले याचे कारण रशियातील बर्फ आणि हाडे गोठविणारी थंडी. मला वाटते की हिटलरला बार्बारोसा आधीच सुरू करायचे होते (१५ मे च्या आसपास) पण युगोस्लाव्हिया जिंकताना तिथे अपेक्षेपेक्षा कडवा प्रतिकार झाला आणि त्यामुळे ती आघाडी बंद करून रशियाकडे लक्ष द्यायला उशीर लागला.इतिहासात जर-तरला अर्थ नसतो.पण तरीही असे म्हणावेसे वाटते की युगोस्लाव्हिया लवकर शरण आला असता तर कदाचित नाझी भस्मासूर मॉस्को जिंकू शकला असता!!

असो. रशियन आघाडीवरील युद्ध, विशेषतः लेनिनग्राडचा वेढा आणि स्टॅलिनग्राड ची लढाई यात अगदी अतोनात इंटरेस्ट वाटतो. शेवटी आपल्यासारख्यांना लांब बसून युध्दस्य कथा नेहमीच रम्य वाटणार.पण त्या लोकांना किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले असेल याची कल्पनाही करवत नाही.

बोका-ए-आझम's picture

23 Feb 2016 - 12:29 pm | बोका-ए-आझम

ग्रीसमध्येही. ग्रीसची लढाई अनाठायी होती. पण तिथे ग्रीकांनी इटालियन सैन्याला चोप दिला आणि जवळपास सगळा अल्बानिया मुक्त केला. त्याचा बदला म्हणून जर्मनांनी ग्रीस आणि युगोस्लाव्हिया यांच्यावर एकाच दिवशी हल्ला चढवला आणि जून १९४१ पर्यंत दोन्ही देश आपल्या नियंत्रणाखाली आणले.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2016 - 4:23 pm | गॅरी ट्रुमन

हो बरोबर ग्रीसमध्येही हिटलरचा बराच वेळ मोडला.

ग्रीसची लढाई अनाठायी होती.

ग्रीसमध्ये घुसलेल्या इटालियन सैन्याला ग्रीकांनी मस्त चोप दिला. ग्रीकांनी त्यांना चोप देत देत पार अ‍ॅबिसिनियामध्येही हरविले होते.ग्रीसची लढाई पूर्ण अनाठायी होती का? मे १९४० मध्ये फ्रान्सचा पाडाव झाल्यानंतर इटली अधिकृतपणे युध्दात उतरल्यावर ग्रीसमधून ब्रिटिश खुद्द इटलीला आणि इटलीच्या ताब्यातील लिबियाला लक्ष्य बनवतील अशी भिती कदाचित इटलीला वाटली असावी.म्हणून इटलीने ग्रीसवर हल्ला केला.खरे तर दोन्ही देशांच्या सैनिकी सामर्थ्याचा विचार करता इटलीने ग्रीसला सहज हरवायला हवे होते.पण अर्थातच तसे झाले नाही.

ग्रीस, युगोस्लाव्हिया यासारख्या देशांना लाँचपॅड वापरून आपल्या प्रभावक्षेत्रावर हल्ला करू नयेत ही तजवीज रशियावर आक्रमण करण्यापूर्वी हिटलरला वाटली असावी.त्यापैकी ग्रीसचा बंदोबस्त मुसोलिनीकडून होईल ही अपेक्षा मात्र धुळीला मिळाली आणि प्रत्यक्ष जर्मन सैन्यालाच ग्रीसविरूध्दही युद्धात उतरावे लागले.

एकूणच मुसोलिनीविषयी वाचल्यावर मला अनेकदा रामायणातील सुग्रीवाची आठवण येते. 'देखो मेरी शक्ती का चमत्कार' असे म्हणत सर्वांवर तुटून पडायचे--मग तो कुंभकर्ण असो, इंद्रजीत असो की खुद्द रावण असो आणि सगळ्यांकडून सपाटून मार खायचा!! इटलीने इंग्लंडविरूध युध्द जाहीर केल्यावर इटलीच्या ताब्यातील लिबियावर ब्रिटिश सैन्याने इजिप्तमधून हल्ला केला.त्यातही इटालियनांची डाळ शिजली नाही आणि शेवटी जर्मन जनरल रोमेलवरच अवलंबून राहावे लागले.

बोका-ए-आझम's picture

23 Feb 2016 - 4:43 pm | बोका-ए-आझम

अॅबिसिनिया म्हणजे आजचा इथिओपिया. ग्रीक सैन्य तिथपर्यंत गेलं नव्हतं. अल्बानियामध्ये त्यांनी इटालियनांना चोप दिला होता.

गॅरी ट्रुमन's picture

23 Feb 2016 - 4:46 pm | गॅरी ट्रुमन

अरे हो. गलतीसे मिश्टेक हो गया :)

जेपी's picture

23 Feb 2016 - 4:48 pm | जेपी

वाचतोय..

जव्हेरगंज's picture

23 Feb 2016 - 7:30 pm | जव्हेरगंज

सगळं अगदी डोळ्यासमोर घडतयं असं वाटलं!

मस्त लिखाण !

पुढल्या मिठाईच्या अपेक्षेत.

(भुकेला) मुवि

पैसा's picture

24 Feb 2016 - 11:27 am | पैसा

खिळवून ठेवणारे लिखाण! अप्रतिम लिहिताय!

बर्बर शब्द आपल्याकडे वापरला जातो. शक बर्बर हूण वगैरे क्रूर असभ्य, हिंसक, असंस्कृत, आक्रमक. बहुधा टोळीवाले भटके लोक असावेत.

बोका-ए-आझम's picture

24 Feb 2016 - 12:00 pm | बोका-ए-आझम

https://en.m.wikipedia.org/wiki/Berbers
मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया हे देश - ज्यांना माघरेब (Maghreb) म्हटलं जातं तिथले हे मूळ रहिवासी आहेत. रोमन काळात हाच भाग कार्थेज म्हणून प्रसिध्द होता आणि हन्निबल आणि हसड्रूबल या दोन भावांचं तिथे राज्य होतं. १९ व्या शतकापासून ते दुस-या महायुद्धापर्यंत हा भाग फ्रेंच साम्राज्याचा भाग होता.

नया है वह's picture

24 Feb 2016 - 4:12 pm | नया है वह

अप्रतिम लिखाण!