कविता - अमृतप्याला
प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0
www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html
----------------------------------------------------------------
अमृतप्याला
आज ऐकुनि रुचले नाही
काय म्हणावे सुचले नाही
दिला ठेवुनि फोन तसाचि
जे झाले ते पचले नाही
दिशाहीन मी चालत सुटलो
विचार मागे रेटत सुटलो
दगडा दगडा मधे तरीही
तुलाच वेडा भेटत सुटलो
जावे वाटे घरी नकोसे
हवे हवे ते जरी नकोसे
विचार होती लाखो गोळा
माझे असले तरी नकोसे
इथेच बसुनि राहिन आता
जलाशयाच्या या काठाला
बुडत्या सूर्या पाहिन आता
हाती घेऊन अमृतप्याला
लोक चांगले सोडून जाती
लाटांपरि ही विरती नाती
बघेच असतो आपण सारे
बसून बघतो काठावरती
उद्या कसे हे असेल सारे
कुणास ठाऊक काय कसे
आजच्या परि दु:खावरती
उपाय आता करू कसे
इथेच बसुनि राहिन आता
जलाशयाच्या या काठाला
बुडत्या सूर्या पाहिन आता
हाती घेऊन अमृतप्याला
मला वाटते बरेच काही
तुझे आता पण ठाऊक नाही
आहे प्याला रोजचाच पण
पूर्वीची त्या गोडी नाही
तुझी आठवण येते फिरुनि
मावळतीला इथेच बसुनि
असायचो या काठावरती
अमृतप्याला हाती धरुनि
तसाच मी प्रत्येक दिसाला
येईन तुजला भेटायाला
अढळ स्थान देऊन टाकतो
तुला आणि या सूर्यास्ताला
जावे वाटे घरी नकोसे
हवे हवे ते जरी नकोसे
विचार होती लाखो गोळा
माझे असले तरी नकोसे
इथेच बसुनि राहिन आता
जलाशयाच्या या काठाला
बुडत्या सूर्या पाहिन आता
हाती घेऊन अमृतप्याला
(छायाचित्र जालावरून साभार)
- अपूर्व ओक
प्रतिक्रिया
30 Nov 2015 - 12:42 pm | मांत्रिक
मस्तच!!!
सुंदर!!!
30 Nov 2015 - 12:47 pm | एस
सुंदर आहे कविता. आवडली!
30 Nov 2015 - 10:55 pm | शार्दुल_हातोळकर
छान!!
1 Dec 2015 - 12:55 pm | विशाल कुलकर्णी
ज्जे ब्बात
1 Dec 2015 - 1:22 pm | वेल्लाभट
धन्यवाद
विशाल, एस, शार्दुल, मांत्रिक
2 Jan 2016 - 2:24 pm | शार्दुल_हातोळकर
आज पुन्हा एकदा ही कविता वाचली, खरोखर अतिशय अर्थपुर्ण आणि उत्कृष्ट आहे !!
म्हणुन परत एकदा प्रतिसाद...।.
7 Jan 2016 - 3:55 pm | वेल्लाभट
धन्यवाद शार्दुल :)
7 Jan 2016 - 5:52 pm | चांदणे संदीप
वाचनलिस्टात ॲडवली आहे
इतकी आवडली आहे!
Sandy
12 Jan 2016 - 2:38 pm | वेल्लाभट
थँक्स अ लॉट संदीप
12 Jan 2016 - 2:52 pm | कविता१९७८
छान कविता