टेडी (भाग-२)

एकजटा अघोरी's picture
एकजटा अघोरी in जनातलं, मनातलं
2 Nov 2015 - 12:09 pm

टेडी (भाग -१)

टेडी (भाग-२)

दुसर्‍या दिवशी वीणाला पहाटेच जाग आली. डोळे चुरचुरत असून देखील तिला नाईलाजाने उठावं लागलं. गळ्यात हात घालून झोपलेल्या दियाचा हात तिनं अलगद बाजूला ठेवला. स्वतःची आह्निके आटोपून झाल्यावर तिने लगेच पोळी भाजी करायला घेतली. दोन्ही तयार झाल्यावर डब्यात भरण्यापूर्वी निवायला म्हणून बाजूला उघडी ठेवली. दियाला उठवणं थोडं मुश्किलच होतं. पण “मी तुला भूर नेते” म्हटल्यावर ती लगेच उठून बसली. तिचं आवरु-आवरु पर्यंत साडेआठ वाजत आले.

एका खांद्यावर पर्स आणि दुसर्‍या हातात तिचं बोट धरुन घाईघाईने कुलूप लावून ती बाहेर पडली. सरत्या मे महिन्याचे दिवस होते. आभाळ चांगलंच भरून आलेलं. आता हा पाऊसबाबा येऊ नये म्हणजे मिळवली, तिच्या मनात विचार चालू होते. सुदैवाने एक रिक्षावाला पटकन तिच्या हाकेला थांबला. बरोबर सव्वानऊला ती एजन्सीच्या समोर उतरली. चव्हाण महाराज तिथं अगोदरच हजर होते. तिला बघितल्यावर त्याने लगेच त्याच्या गाडीचा पुढील डावा दरवाजा उघडला. दिया पुटुक्कन आत जाऊन बसली. वीणानं देखील आत बसत तिला मांडीवर घेतलं.

गाडी सुरु झाल्यावर चव्हाण महाराजांनी डाव्या हाताने सी.डी. प्लेयरचं बटण दाबलं. कुठल्यातरी ग्रामीण गायकाच्या भसाड्या आवाजात एक अगम्य भजन सुरु झालं. “हॅ हॅ हॅ. माझा देवावर फार विश्वास आहे. अहो, तो नाही तर काहीच नाही.” या माणसाचा तिला खरेतर पहिल्यापासून रागच येत होता. सारखं ते लाचार, लोचट हसू पसरलेलं आहेच तोंडावर. त्यात भर म्हणून तो कानठळ्या बसवणारा भजनाचा आवाज आणि गाडीत लावलेल्या स्वस्त दर्जाच्या उदबत्तीच्या धूर. तिचं डोकं आता दुखायला लागलं.
“मॅडम, तुमचे मिस्टर काय करतात?”
“आमचा घटस्फोट झालेला आहे.”
“ओह, सॉरी!”

यानंतर चव्हाण एकदम शांत बसला. कदाचित सकाळी सकाळी आपण नको तो प्रश्न विचारला, असं त्याला वाटलं असावं. हातचं गिर्‍हाईक एखाद्या निष्काळजी शब्दानं दुखावलं जाणं त्याला परवडणार नव्हतं. तेवढ्यात पावसाची मध्यम सर सुरु झाली. खिडकीतून अगदी सुखावणारी गार हवा आत येऊ लागली. दियाच्या कपाळावरचे केस भुरुभुरु उडत होते. क्वचितच एखादं माणूस रस्त्यावर दिसत होतं. शहराचा हा भाग बर्‍यापैकी कमी वस्तीचा आणि शांत होता. झाडीझुडोरा देखील या भागात जास्तीच होता जरा. तिला नकळत ते वातावरण आवडू लागलं. बंगले आणि अपार्टमेंट्स सुद्धा अगदी ऐसपैस पसरलेले होते.

तिचे विचार जणू ओळखूनच चव्हाणने टेप चालू केली, “मॅडम, हा भाग तुम्हाला नक्कीच आवडेल. अगदी शांत भाग आहे शहरातला. इथं दुसरीकडच्यासारखी गर्दी पण नाही दिसून येत. आपण बघायला चाललोय तो स्वर्गलोक अपार्टमेंट. अगदी योगायोगानेच तिथं तुम्हाला फ्लॅट मिळतोय. गेले सात आठ महिने गेला नाही. पण ते बरंच झालं. तुमचीच वाट बघत होता असं म्हणायचं. हॅ हॅ हॅ.”

अचानक गाडी डावीकडच्या एका फाटकाकडे वळली. फाटक उघडंच होतं. सेक्युरिटी गार्ड लांब निवांत तंबाखू चोळत उभा होता. चव्हाणला बघून त्याने हात केला. त्यांची ओळख असावी. फाटकाच्या डावीकडेच जरा आत चव्हाणने गाडी उभी केली. त्या दोघी उतरल्या खाली. तिथं फारसा मेंटेनन्स ठेवला जात नसावा. जागोजागी खुरटं गवत वाढलेलं होतं. काही ठिकाणी पाणी देखील साचलेलं होतं. पावसाच्या चुकार थेंबांनी त्यात वलयं निर्माण होत होती. दिया त्यात उड्या मारण्याचा खेळ खेळू लागली. वीणाने दियाला दटावलं.

मग हळूहळू तिची नजर त्या स्वर्गलोक अपार्टमेंटवर फिरु लागली. चारमजली, दोन विंग, मध्यम जुनी इमारत. मूळचा पांढरा रंग आता दुधी, मातकट, शेवाळलेला दिसत होता. पहिलंच दर्शन काही खास नव्हतं. तिनं नाक मुरडलंच थोडं. दिया सुद्धा आता थोडी सावध होऊनच बघू लागली ‘स्वर्गलोक’ला. त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव ओळखून चव्हाणने लगेच बडबड चालू केली, “मॅडम, बाहेरच्या दिसण्यावर जाऊ नका. तुम्हाला दाखवतोय तो फ्लॅट एकदम उत्तम आहे. दोन बीएचके असून पण तुम्हाला वन बीएचकेच्या भाड्यातच मिळतोय. काळजीच करु नका. चला आत.”

तिघेही लिफ्टपाशी आले. लिफ्ट अगदी काळोखं. ग्रिलचा दरवाजा थोडासा गंजलेला. कुणीतरी भिजलेल्या माणसानं नुकतीच लिफ्ट वापरली असावी. खाली पाण्याचं थारोळं साचलेलं होतं. ग्रिलच्या मुठी देखील अजून ओल्याच होत्या. आत उंदीर मेल्यासारखा एक विशिष्ट वास, का कुणास ठाऊक, येत होता. चव्हाणनं दरवाजा लाऊन घेतला आणि चारचं बटण दाबलं. लिफ्ट धडधडत वर जाऊ लागली.

चौथ्या मजल्याच्या अंधार्‍या कॉरीडॉरपाशी लिफ्ट थांबली. बाहेर एक रोगट पिवळसर दिवा जळत होता. त्यामुळं तिथला अंधार कमी होण्यापेक्षा अजूनच जास्त जाणवत होता. कॉरीडॉरच्या दोन्ही बाजूंना बंद घरे. क्वचित एखाद्या घरातून एखाद्या अगम्य टी.व्ही. प्रोग्रॅमचा आवाज येत होता. चव्हाण ४१० पाशी जाऊन उभा राहिला. खिशातून त्याने एक मळकट बाहुली जोडलेली चावी बाहेर काढली. आता तिघेही आत शिरले.

आत पूर्ण अंधार होता. दियाने नकळत आईचा हात घट्ट पकडला. चव्हाणने डाव्या बाजूला हाताने चाचपडत बटण लावलं. तिथं बरेच दिवस कुणी राहिलेलं नसावं. बंद घरात येणारा एक कुबट, उष्ण वास जाणवत होता. चव्हाणने पुढे होत सवयीने खिडक्या उघडल्या. बाहेरच्या मोकळ्या हवेनं व सूर्यप्रकाशामुळं घर जरा माणसात आल्यासारखं वाटू लागलं. फ्लॅट होता मात्र प्रशस्त, हवेशीर व छान. ‘थोडीशी साफसफाई करावी लागेल’ वीणाच्या मनाने सूचना दिली.

“मॅडम या इकडे, किचन बघा किती मस्त आहे.”, चव्हाण वीणाला बोलवत होता. वीणा उत्सुकतेनं उजवीकडे वळली. नकळत दियाने तिचा हात कधी सोडून दिला ते कळलंच नाही तिला. किचन खरोखरच मस्त होतं. पूर्वी कोण राहिलं होतं कुणास ठाऊक, पण अतिशय स्वच्छ ठेवलेलं होतं. आताशा धुळीची पुटं जमलेली होती, पण ते तर कुठेही होणारच. नकळत तिला तिच्या कॉलेजच्या दिवसात राहिलेले वेगवेगळे फ्लॅट्स आठवले. अरेरे, बेशिस्त आणि उनाड पोरांनी अगदी वाट लावलेली असायची. लॅफ्ट तर हमखास दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या थोटकांनी भरलेला. बेसिन कायम गुटख्याच्या पिंकांनी घाण केलेलं. अजूनही त्या आठवणीने तिला मळमळलं.

तेवढ्यात

“आSSSSई!!!”

दियाच्या किंचाळीनं तिच्या हृदयाचा जणून ठोकाच चुकला. कुठे होती ती?

***

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

2 Nov 2015 - 12:56 pm | बाबा योगिराज

देर से आये, मगर दुरुस्त आये....
भेष्ट. एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आहे. मजा येतेय.
पुढील भाग लवकर येऊ द्या.
पुलेशु.

अवांतर:- नाव शोभतय.

पद्मावति's picture

2 Nov 2015 - 4:34 pm | पद्मावति

मस्तं...वाचतेय.
पुढचा भाग प्लीज़ लवकर टाका.

आदूबाळ's picture

2 Nov 2015 - 5:05 pm | आदूबाळ

वाचतोय!

दमामि's picture

2 Nov 2015 - 6:04 pm | दमामि

पुभाप्र

दिवाकर कुलकर्णी's picture

2 Nov 2015 - 6:54 pm | दिवाकर कुलकर्णी

मिपा नारायण धारप, क्रमश्हा राहिलं

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2015 - 8:50 pm | सानिकास्वप्निल

वाचतेय.

स्रुजा's picture

3 Nov 2015 - 3:37 am | स्रुजा

लवकर येऊ द्या पुढचा भाग ..

शित्रेउमेश's picture

3 Nov 2015 - 11:27 am | शित्रेउमेश

लवकर येऊ द्या पुढचा भाग ..

संजय पाटिल's picture

3 Nov 2015 - 11:46 am | संजय पाटिल

पुढचा भाग लवकर टाका..

लवकर येवू द्या हो पुढचा भाग . किती दिवस झाले मि पा वर भयकथा आलीये

एक एकटा एकटाच's picture

5 Nov 2015 - 11:42 pm | एक एकटा एकटाच

लवकरच घेउन येतोय........

एक एकटा एकटाच's picture

5 Nov 2015 - 11:34 pm | एक एकटा एकटाच

मस्त जमलीय

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2015 - 12:52 am | स्वाती दिनेश

दोन्ही भाग आत्ताच वाचले, पुढे काय? ची उत्सुकता वाढली आहे.
पुभाप्र.
स्वाती

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2015 - 2:27 am | डॉ सुहास म्हात्रे

वाचतोय. पुभाप्र.

रेवती's picture

6 Nov 2015 - 2:48 am | रेवती

वाचतिये.

नाखु's picture

6 Nov 2015 - 4:14 pm | नाखु

पुढच्या भागाची उत्सुकता.