जवळपास चार वाजता एस. टी. भेटली. मधल्या शिटावर बसुन माझा प्रवास सुरू झाला. खिडकीतुन बाहेर बघत बसलो. कंटाळा आला. हेडफोन कानात घालुन मस्त ताणुन दिली.
"फुल मांगुना बहार मांगु......" वाह! काय मस्त गाणं आहे अगदी तिनचं गायल्यासारखं. गाडीने वेग घेतला. हायवेवरचा वेग. तुफान.
तासाभरानं एक गाव आलं. तिथ उतरायचचं होतं. कसलं हे गाव 'थिरडी'. अजुन इथनं आठ-दहा किलोमीटर लांब होतं म्हणे. एकतर संध्याकाळची वेळ. तिथं काही खायला भेटणं अवघडचं. एका गाड्यावर भुर्जी-पाव हाणली, डब्बल. एक पार्सल पण घेतली.
मग टमटमनं निघालो 'थिरडी' कडं. महामार्गापासुन आत जाणारा गावठी रस्ता आता सुरु झाला. खाचगळगे, प्रवांश्यांच्या गावरान गप्पा, हिरवाईला सोबत करत हाही अनुभव घेतला. सगळचं अनोळखी, काहीच माहीती नाही.
मध्येच एक वेगळच गाव लागलं. 'पाचुरी' म्हणे.
टमटमवाल्यानं तिथचं सोडलं. आणि गेला निघुन.
आता त्या अनोळखी खेड्यात मी असा एकटा. बरं जायचयं कुठं हे विचारणार तरी कसं? यायचं 'कारण' कोणी विचारलं तर बोंबच.
तरी एकाला धाडस करुन विचारलचं " हे थिरडी कुठं आलं?". त्यानं हात दाखवुन लांबवर रस्ता दाखवला. मी निघालो, एकटाचं.
मातीच्या कच्च्या रस्त्यावरुन चालायला कित्ती छान वाटतं ना! हातात एक काठी घेतली आणि उगाच रस्त्यावर डोकावणारे झुडपांचे शेंडे छाटत चाललो. अगदी उंडग्या पोरांसारखा.
चालतं चालतं पुढं आलो तर एक नदी दिसली. पलिकडच्या काठावर गर्द झाडीतुन डोकं वरं काढत असलेलं एक प्राचीन मंदिरही दिसलं. सुंदर. हा तर बोनसचं की. एखाद्या झाडावर कैरी शोधायला जावं आणि पिकलेला हापुसचं भेटावा असं काहीसं.
काठावर एक होडी होती. बहुदा नेहमी येजा करणाऱ्या गावकऱ्यांसाठी. नुकतीच पाण्यात शिरत होती. धावत धावत जाऊन चढलो. पाच रुपयांत नदी पार केली. हा तर अजुन एक बोनस. हापुस तोही कोकणातला असल्यासारखा.
अवाढव्य मंदिर पुढं ऊभं होतं. भिंती शेवाळानं रंगवलेल्या, नानाप्रकारची झुडपं आणि वेली तिच्यात शिरलेल्या. आतमध्ये देव कुठला होता काय माहित, पण आकर्षण आणि गुढ यांनी ठासुन भरलेला एकंदर परीसर. इच्छा असुनही मंदिराकडे न जाता तसाच चालत राहिलो. शेवटी आपलं ध्येयं महत्वाचं. दिवसाउजेडी ते गाठलचं पाहिजे.
नाही म्हणायला आता डांबरी लागला, खड्याखड्यांनी भरलेला. जुनाट छपरी घरं, एखादा टुमदार बंगला, रानभर पसरलेलं जोंधळ्याचं पिक हे या रस्त्याशेजारी दिमाखानं मिरवत ऊभं होत. डोळ्यांनी ही सौदर्य सृष्टि टिपत घेत पावलं झपाझप टाकत होतो. एखादी शेतावरुन परतनारी बैलगाडी, सायकलवर दुध घालायला चाललेलं एखादं मिसरुड फुटलेलं पोर, गुराढोरांच शेण काढणारी एखादी म्हातारी हे रस्ताभर भेटत राहिले. तरी मी आपला थोडा भीतभीतचं चालत राहिलो. शक्यतो संवाद टाळायचा प्रयत्न केला.
शेवटी एकदाचं ते 'थिरडी' आलं. गाव कसलं वाडीच म्हणा. पाच पंधरा घरांची. एक हाळी मारली तर समद्या गावाला ऐकु जाईल अशी.
उगचं नुसतं ताटकळत ऊभं राहणं बर दिसलं नसतं. सरळ फाट्यावर गेलो. बसस्टॉप शेजारी एक टपरी दिसली. शेजारी म्हणण्यापेक्षा टपरी हीच बसस्टॉप होती. किंवा उलट. तिथचं एका बाकड्यावर बसलो. टपरीवाल्या म्हाताऱ्याला चहा मागितला. कधी पित नाही पण वातावरणाचा परिणाम म्हणुन एक सिगारेट ही मागवली. चहा सिगरेटचा आस्वाद घेत तिनं सांगीतलेल्या खाणाखुणा आठवुन बघितल्या. हो, पहिल्यांदा फाटा, तिथेच बसलो होतो मी. फाट्यापासुन जरा आत गेल्यावर जि. प. प्रा. शाळा. आहे, दिसतेय, ती काय समोर.
शाळेला पाठीमागं लागुनचं एक टुमदार घर, थोडं पुढं जाऊन बघतो, पिवळसर दिव्याचा प्रकाश निलगीरीच्या झाडांतुन बाहेर येतोय, पाठीमागे घराचं अस्पष्ट चित्र समोर आलयं. हो तेच. तेच आहे माझं ध्येय.
अंधार पसरत चाललाय. निटसं दिसतही नाहीये. आणि मी फाट्यावर ऊभा ठाकलोय. एकटाच. हातातल्या बँगेत भुर्जीपावचं पार्सल घेऊन.
एव्हाना त्या टपरीवल्याला काहीतरी बिनसल्याची चाहुल लागली. दुरुनचं त्यानं विचारलं " नवीन दिसताय गावात, कुणाकडं आलाय?".
आता आली का पंचाईत, थोडा गडबडलोच.
"ते मोहीते नाहीत का, त्या नदीजवळच्या मंदिरापाशी राहतात, त्यांच्याकडेचं" मनाला येईल ते फेकलं.
"म्हादबाकडं का?, त्याचं घर तर वरतीकडं ऱ्हायलं, देवळापाशी होळकर राहत्यात" नसती कटकटं.
"हा तिकडचं, पाहुणा म्हणुन आलोय, पाय मोकळं करायला ईकडं फाट्यावर आलतो" ही थाप बहुतेक पचली किंवा त्याला कळुन चुकलं असावं की मला त्याच्याशी जास्त काही बोलण्यात स्वारस्व नाही. कारण म्हातारं नुसतं "बरं" म्हणुन आपल्या कामाला लागलं. त्याचे पैसै चुकते करुन शाळेकडे निघालो.
रस्त्यावर शुकशुकाट होता. मघाशी बघितलेली शाळेची ईमारत अंधारात गुडुप झाली होती. पायवाटेवरचे दगडधोंडे नीट बघत कसाबसा तिथपर्यंत पोहोचलो.
शाळेची ईमारत सरकारी. दगडी बांधकाम. तिन वर्ग. बाहेर मोकळा व्हरांडा. समोरचं माळरान हेच मैदान. तिथुनच मी आलो होतो.
आजुबाजूला जाऊन थोडा कानोसा घेतला. सगळीकडं सामसुम होती. दगडी भिंत आणि भव्य खांब यांच्या मधोमध बॅगेवर डोकं ठेऊन थोडावेळ पडलो.
पिवळसर दिव्याचा प्रकाश ईथेही येऊन पोहोचला होता. निलगिरीच्या झाडाआडं लपलेलं घर अजुनही अंधुकच दिसत होतं. एक वयस्कर बाई ओट्यावर भांडी घासत होती. बहुदा यांची जेवणं झाली असावीत. एक तरुण स्त्री घासलेली भांडी घरात नेऊन ठेवत होती. एकदोनदा तिने सरळ माझ्याकडे पाहीले. या काळोखात मी तिला दिसणे तसे अवघडचं होते. तरीही मी जरा भिंतीच्या आडोश्याला सरकलो. घाबरतचं एखादा कटाक्ष घराकडे टाकायचो. वयस्कर बाईचं भांडी घासुन आता झालं असावं कारण ती तरुण स्त्री एकटीच बाहेर घुटमळत होती.
हीच असावी ती रुपगर्विता जिच्याशी माझे काम होते. जरा ईकडे तिकडे करुन तीही आत गेली. बराच वेळ बाहेर आली नाही. आता मी ही कंटाळलो. नसतं धाडस अंगलट येणार होतं. तसाच पडुन राहीलो. डोळ्यावर झापड येऊ लागली. जबर झोप लागली.
किती वेळ गेला कुणास ठाऊक. कोणीतरी मला हलकेच हलवुन उठवत असल्याची जाणीव झाली.
" ल...य उशी...र ला...वला... याय...ला" खुप दुरुन कोणीतरी मोठ्यांदा बोलल्यासारखा आवाज. डोळे सताड उघडले तरी परीस्थितीचं भानचं लवकर आलचं नाही. एक तरणीताठी स्त्री समोर दिसत होती. अरे ही तिच की रुपगर्विता.
"लय ऊशीर लावला हो यायला, मला वाटलं दुपारीच याल" आता आवाज जवळुन आला खडबडुन जागा झालो. ऊठुन बसत तिला म्हणालो "हो जरा ऊशीरच झालाय, पण तुम्हाला मी ओळखलं नाही". अंधारात तिचा चेहराही पुसटसा.
"अहो मीच अंजू, मलाच भेटायला आलायला ना तुम्ही, एक काम करा पाय न वाजवता घरामध्ये या, दरवाजा उघडाच ठेवते" तिचा आवाजही नाजुक, धाप लागल्यासारखा, आतले शब्द बाहेर यायला बघताहेत पण त्यांना ती रोखू पाहतेयं असं काहीसं.
"ठिक आहे" माझे उत्तरही तिने ऐकले नसावे. तशीच लगबगीने घराकडं गेली.
खरतर एवढ्या अपरात्री एखादी अनोळखी स्त्री आपल्याला घरात बोलावतेय हे जरा विचित्रचं वाटलं. पण तितकचं मोहक ही.
जराही पाय न वाजवता मी घरात शिरलो.
तिनं दार लावुन घेतलं. माझ्याकडं बघत अगदी लाजल्यासारखं हसली. "बापू आणि माय वर झोपलेत, गच्चीवर, तेव्हा जरा हळु बोला"
मी एका खुर्चीवर बसलो. ट्युबलाईटच्या ऊजेडात तिचा चेहरा नीटसा पारखला. खरच ती रुपगर्विता होती. अगदी गावरान सौदर्य. माझ्याकडे अवखळ बघत तीही पलंगावर बसलेली. एकतर या गावातलं वातावरण उगाचचं रहस्यमय वाटत होतं, त्यातुन काळोख्या रात्रीची ही चोरटी भेट, समोर एक लावण्यवती, आणि मीही असा, रोमांचकारी प्रवासाच्या शोधात स्वत:ला झोकुन दिलेला. अशा नाजुक क्षणी तोल जाण्याची दाट शक्यता.
"एवढ्या लांबुन आलात, काही आणलयं का माझ्यासाठी?"
"हो आणलयं ना" बॅगेतलं भुर्जीपावचं पार्सल तिच्याकडं सोपवलं.
मोठ्या ऊत्सुकतेने तिने ते उघडलं. पण भुर्जीपाव बघुन तिचा चेहरा पडला.
" हे काय? येडेच आहात तुम्ही, काहीही आणता."
मीही जरा ओशाळलोच. अशा रुपगर्वितेला आपण भेट म्हणुन भुर्जीपाव देतोय? छ्या! गपगुमान ते पुन्हा बॅगेत टाकले.
"तुम्हाला एक गंमत सांगते, ईथं एक मंदिर आहे, जायचं का?" एवढ्या मध्यरात्री ही मला मंदिरात घेऊन चाललीय. आता यात काय गंमत आहे. ही तर विचित्रपणाची हद्द झाली. पण मीही या प्रवासात स्वत:ला झोकुन द्यायचे ठरवले होते. विशेष म्हणजे जोपर्यंत ही रुपगर्विता सोबत आहे तोपर्यंत हा प्रवास भलताच रोमांचकारी असणार होता.
काळोख्या रातीचा सन्नाटा चिरत रुपगर्विता पुढे चालली. झपाझप. सोबतीला मीही. सावध.
या निशब्द संवादात कितीतरी शब्द रातीच्या गारव्यात गाडले गेले.
काय गं तु ईतकी धाडसी कशी? तुझ्या अल्लड नभातले चांदणे डोळ्यात खुपते आहे. त्या अर्वाचीन मंदिरात नेऊन तु कोणता डाव खेळणार आहे? जीवाची भिती ईथे आहेच कुणाला!.
अस्ताव्यस्त मंदिराच्या पायऱ्यांवरुन रुपगर्विता आत शिरली. वेलीवेलींच्या भिंती मनात किंचाळत आहेत. दुर तु जाऊ नकोस. त्या अनाम मुर्तीला मी नमस्कार करतोय. झाडपाल्याच्या सळसळाटानं बाहेर काहुर माजलयं. सोबतीला तु आणि हे प्राचीन दगड.
"हे घ्या मंगळसुत्र, लग्न करा माझ्याशी" डावाला सुरवात केलीस तर. अशा ओसाड जागी तुझ्या कपाळावर कुंकू ठेऊन या पवित्र बंधनाची सत्यता पडताळायला हा अंधारच तर आहे.
मी एक वाटसरु या आकर्षणाला तगादा लावणारा. मी बघतोय तुझ्या डोळ्यात पसरत चाललेली लालेलाल रक्तिमा. किती झेललयं तुझ्या डोळ्यांनी. पुनवेचा चंद्र कधी पाहीलाय का त्यांनी?
या गारठल्या मुहुर्तावर तु माझी सौभाग्यवती झालीस तर. निरव नदीही आता दुथडी भरलीय.
परतीची वाटही अवघडच. रुपगर्विता सराईत पावले टाकतेय. सोबत मीही. जिवंत.
या विस्तीर्ण ढगांनी काही पाहिले असेल काय? देशोदेशींच्या चाळ्यांत त्यांना कसला आलाय रस.
पहाटेचा वारा झोंबतोय आणि ती शाळेच्या व्हरांड्यात बसलिये. किर्र किड्यांच्या सोबतीला मीही बाजुलाच पसरलेला.
"ऐक ना, तुझं ते आवडीचं गाणं म्हण ना एकदा"
लाजु नकोस तु एवढी. ही पहाट आहे साक्षीला.
"फुल मांगु ना ... बहार मांगु..." हे चैतन्य झेपण्याबाहेरचं. तुझा अस्फुट आवाज घशातचं अडकतोय.
"आपला मधुचंद्र?" मधुनच आलेला तुझा हा प्रश्न आणि माझ्या मनाच्या गाभाऱ्यात गडगडत गेलेले कित्येक सुमधुर हुंकार. ही पहाट आता संपुच नये.
प्रतिक्रिया
27 Sep 2015 - 7:56 pm | कविता१९७८
नायकाच स्वप्न होत का हे?
28 Sep 2015 - 9:05 am | अमृत
एकदम डोळ्यांसमोर घडत असल्याप्रमाणे पण....... कथा नीट कळली नाही...:-(
28 Sep 2015 - 12:37 pm | तुषार काळभोर
पण शेवटाचा अर्थ डोस्क्यावरनं ग्येला.
30 Sep 2015 - 4:14 pm | शित्रेउमेश
वाचायला छान-छान आहे... पण काहीच कळलं नाही....