आधिचे भाग : (भाग १) (भाग २) (भाग ३) (भाग ४)
सकाळी सकाळी दार वाजलं. त्याने उघडलं, तर आई बाबा दारात उभे होते. ते आनंदात होते.
"काय रे प्रमोशन झालं तर पार्ट्या करतोस, पण आम्हाला सांगत सुद्धा नाहीस?" बाबा आत येता येता म्हणाले.
"तुम्हाला कसं कळालं?"
"अरे तुझ्या पार्टीचे फोटो तुझ्या मित्रांनी टाकले फेसबुक वर. बाबांनी मला दाखवले. आम्ही किती फोन केले तुला. पण तू उचलले नाहीस."
"अगं, कालच बातमी कळली. लगेच मित्रांनी पार्टी द्यायला लावली. नंतर घरी येउन झोपलो होतो. आज तुम्हाला सांगणार होतो."
"तोपर्यंत आम्हाला थोडी राहवणार होतं. तसाही तू आजकाल आमच्याशी नीट काही बोलत नाहीस."
मागच्या खेपेस त्यांनी लग्न मोडायला सांगितलं तेव्हापासून तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतच नव्हता.
"ते जाऊ दे. आम्हाला लगेच यायचं होतं. आम्ही पहाटेच निघून आलो. आणि हे काय? प्रमोशनचा, आम्ही आल्याचा काहीतरी आनंद दिसतोय का तुझ्या चेहऱ्यावर?"
"असं काही नाही ग आई. बसा तुम्ही जरा. मी चहा टाकतो."
"मला कळतंय ना सगळं. ते लग्न मोडल्यापासून तू हा असा आहेस. अरे किती दुःख करशील? आपण तरी काय करणार होतो. जनरीतच पाळली फक्त आपण. तिची पण चूक नाही आणि आपली पण नाही."
"आई तो विषय नको बरं."
"बरं तो नको. पण दुसऱ्या मुलीतरी बघशील कि नाही? तुझं लग्न झाल्याशिवाय काही तुझं चित्त थाऱ्यावर येणार नाही. मी येताना फोटो घेऊनच आले आहे. तू बघ सावकाश. पसंत कर. मग आपण पुढचं बघू."
"मी बघणार नाही. मी तिच्याशीच लग्न करणार आहे." याच क्षणी त्याचा निर्णय झाला होता.
"हा मूर्खपणा आहे. झालंय ना आपलं बोलणं यावर?"
"एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीबद्दल अशी कशी वागतेस आई? तिची काय चूक आहे यामध्ये?"
"काही चूक नसेल. पण ती मला सून म्हणून चालणार नाही."
"माझं प्रेम आहे तिच्यावर. मी तिला नाही विसरणार."
"विसरावं लागेल."
"मला एक सांग आई, सॉरी, पण समजा तुझ्यावर आज बलात्कार झाला."
"वाट्टेल ते बडबडू नकोस. मोठा झालास तू, पण असं काही बोलायला लागलास तर थोबाडून काढेन तुला."
"वाट्टेल ते नाही. तुला काय वाटतं बलात्कार फक्त तरुण मुलींवर होतात? चार वर्षांच्या चिमुरडीवर पण होतात, आणि सत्तर वर्षांच्या थेरडीवर सुद्धा. आज तुमच्या लग्नाला सत्ताविसेक वर्ष झाली असतील, तुला मी एवढा मोठा मुलगा आहे. उद्या तुझ्या वर समजा बलात्कार झाला, तर मी आणि बाबांनी काय करावं?"
आईच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा सुद्धा धर्मसंकटात पडले होते.
"बाबांनी तुझ्याशी नातं तोडावं का? त्याचं आणि तुझं तरी लग्नाचं नातं आहे. तू तर माझी आई आहेस. बलात्कार झाला म्हणून मी तुला आई म्हणून नाकारावं का? आपलं प्रेम संपेल?"
आई बाबा दोघेही या सडेतोड प्रश्नामुळे निरुत्तर झाले होते.
"मग सांग आई. तिच्यावर बलात्कार झाला, म्हणून मी तिला माझं प्रेम देऊ नये?"
आई आता पश्चातापाचे अश्रू गाळत होती. त्याला तिचं उत्तर मिळालं होतं. त्याने बाबांकडे पाहिलं.
"मी असं काही झालं तरी तुझ्या आईला सोडणार नाही. तूपण तुझं प्रेम सोडू नकोस."
त्यांचं पाठबळ घेऊन तो तिच्या घरी निघाला. थोड्याचवेळात ती ऑफिसला निघेल, म्हणून घाई करत तो तिच्या घरी पोचला. आणि दारातच थांबला. तिची मावशी घरी आलेली होती. आणि समजावणीच्या सुरात तिला सांगत होती.
"हे बघ आता आपली बाजू अशी आहे. आपल्याला थोडं जुळवून घ्यावाच लागेल. जे पर्याय समोर आहेत त्यातूनच निवड करावी लागेल ना?"
"पण करूच का मी निवड? नाही केलं लग्न तरी काय बिघडणार आहे? आपली बाजू अशी आहे म्हणे. काय तर माझ्यावर बलात्कार झाला. माझ्या इच्छेविरुद्ध सेक्स झाला. आता हे जे स्थळ तू सांगत आहेस. तो माणूस घटस्फोटीत आहे. त्याने काय सेक्स केलाच नसेल? त्याचं प्रकरण होतं म्हणून त्याची बायको त्याला सोडून गेली. आता हा माणूस ह्या लायकीचा. पण त्याच्या घरी तो मला उपकार केल्यासारखं ठेवेल. कारण माझ्यावर बलात्कार झाला ना. का जाऊ मी अशा घरी?" ती संतापून बोलत होती.
"जाऊ दे. हवं ते कर. मदत करायला गेले तर ह्या असल्या भाषेत मला ऐकवतेय. मी जाते. ज्याचं करायला जावं भलं…" मावशी पुटपुटत बाहेर निघाली.
"हेच तर. तुम्हाला असे स्थळ आणून वाटतंय कि तुम्ही माझं भलं करताय. अरे अशा घरी जाऊन कुजण्यापेक्षा मी एकटीच राहीलेलं काय वाईट मला सांग ना?"
तिने बाहेर निघालेल्या मावशीला ऐकवलं. आणि मग त्यांचं दारात उभ्या असलेल्या त्याच्याकडे लक्ष गेलं.
मावशी त्याच्याकडे फणकाऱ्यात पाहून निघून गेली. ती मावशी जाईपर्यंत थांबली. आणि मग त्याच्यावर बरसली.
"कशाला आला आहेस आता? तू सोडल्यानंतर माझे काय हाल झाले ते पाहायला आलास का?"
"नाही. माफी मागायला आलोय. तुला पुन्हा मागणी घालायला आलोय."
"कशाला? सहानुभूती वाटतेय का. कि तू नाही केलंस लग्न तर कोण करेल माझ्याशी? नको मला तुझी सहानुभूती. आणि उपकार तर बिलकुल नको."
"नाही गं. तुझ्यावर उपकार करावेत म्हणून नाही आलो मी. आणि सहानुभूती पण नाही. काही असेल तर तो माझा गिल्ट, आणि माझं तुझ्यावरच प्रेम."
तिला काय बोलावं ते समजलं नाही. पण तिला त्याला आणखी रागवायचं होतं.
"शांत हो तू. काका, काकू, तुम्ही पण बसा. मला तुमची पण माफी मागायची आहे."
"मी जे केलं, त्यानंतर मी कधीच शांतपणे झोपू शकलो नाही. माझ्या चुकीचा सल माझ्या मनात होता. तुला मी तुझ्या कठीण परिस्थितीमध्ये एकटीच सोडून दिलं. आपण नेहमी सोबत राहू, अशी आपण एकमेकांना कमीटमेंट दिली होती. त्याला जागलो नाही."
"तुझ्यावर बलात्कार झाला. तुला असं स्वीकारलं तर आईबाबा नाराज होतील. नातेवाईक नाक मुरडतील हे तर माहित होतंच. पण माझं मला काय वाटतंय हेच मला कळत नव्हतं."
"मी खूप विचार केला. कि तुझ्यावर बलात्कार झाला तर तुझी काही चूक नसूनपण तुला का शिक्षा व्हावी? मी तुला का सोडावं? तुझी अब्रू गेली असा सगळ्यांनी आणि मी का विचार करावा? त्या हरामखोराला याचे परिणाम भोगायला हवेत, पण ते तुला भोगायला लागतायत."
ती गुढघ्यात मान घालून रडतरडत सगळं ऐकत होती. तिचे आईबाबा पण ऐकत होते. या विषयावर तेसुद्धा तिच्याशी इतकं थेट बोलत नव्हते. कधी बोललेच तर, फार वाईट झालं, पण आता इलाज नाही, भोगावं लागेल. अशा स्वरूपाचं. तिची काहीच चूक नाही, आणि तिच्या सन्मानाला धक्का पोचलेला नाही हे त्यांनीसुद्धा कधी तिला सांगितलेलं नव्हतं. त्यांना स्वतःची पण लाज वाटत होती. बाकी सगळ्यांनी नाक मुरडली तेव्हा ते ताठ मानेने का नाही वावरले? आमच्या मुलीची काही चूक नाही, आणि आम्ही तिच्या पाठीशी आहोत ह्याची जाणीव त्यांनी तिला आणि सर्वांनाच करून द्यायला हवी होती.
तो बोलतच गेला.
"त्या लोकांनी तुला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं. आणि तुझा वापर करून सोडून दिलं. पण नंतर मी तुला सोडलं, तेव्हा कृती मध्ये नाही पण विचारांमध्ये मी पण त्यांचीच पातळी गाठली होती. मला हे लक्षात आलं तेव्हा माझी मलाच शरम वाटली."
त्याच्या डोळ्यातून पण पाणी यायला लागलं होतं. तो तिच्या जवळ जाउन बोलायला लागला.
"तू वस्तू नाहीस. माणूस आहेस. माझ्या अगदी जवळची. मी चुकलो. खूप खूप चुकलो. मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एक माणूस म्हणून. एक मित्र म्हणून. माझ्याशी लग्न करशील?"
ती काही न बोलता रडतरडतच त्याच्या मिठीत शिरली. तिच्या आईबाबांसमोर. आजवर पहिल्यांदाच. पण त्यांनाही काही वाटलं नाही. त्यांनीसुद्धा एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता.
प्रतिक्रिया
17 Mar 2015 - 1:17 pm | एस
एका टॅबू विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. सर्व भाग वाचून काढले. एक प्रश्न विचारावासा वाटतो समाजाच्या मानसिकतेला - एखाद्याच्या घरी चोरी होते तेव्हा बातमीचा मथळा काय असतो? "जबरी चोरी. अमुक एक रक्कम लंपास." तिथे असे म्हणतो का की "अमुक एका व्यक्तीच्या घरात चोरी?" मग "महिलेवर बलात्कार" असा मथळा का देतात? इथे ती महिला का बरं केंद्रस्थानी असते? नुकत्याच झालेल्या प. बंगालमधील चर्चमधील बलात्काराची बातमीदेखील अशीच दाखवली गेली. ननवर सामूहिक बलात्कार. का बरं? ही मानसिकता काय दर्शवते? अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींवर समाजाचं लक्ष केंद्रित होण्याऐवजी गुन्ह्याच्या बळीवर होते. बदनामी आरोपींची झाली पाहिजे. लोक त्यांच्या तोंडावर थुंकले पाहिजेत इतकी अशा आरोपींची समाजाला घृणा वाटायला हवी. इथे होते उलटेच. घृणा कुणाची वाटते? तर त्या महिलेची. आणि शेवटी तिलाच तिचीच घृणा वाटू लागते....
असह्य आहे हे सगळं!
17 Mar 2015 - 4:12 pm | विनि
सहमत.बलात्काराची बातमी देताना ज्याने केला त्याचे नाव मथळ्यात आणि फोटोसाहित दिले पाहीजे.
17 Mar 2015 - 5:59 pm | आनन्दा
बाकीच्या गोष्टींशी सहमत, पण हे काही पटले नाही.
दोष महिलेवर बलात्कार अशी बातमी देणार्याचा नसून त्या महिलेला वाळीत टाकणार्या समाजाचा अहे.
17 Mar 2015 - 1:40 pm | सस्नेह
कथा खूप सुंदर आहे.
पण भाग का केले बरं ? एकत्र टाकली असती तरी चाललं असतं.
17 Mar 2015 - 2:12 pm | आकाश खोत
एकत्र खूपच मोठी पोस्ट दिसत होती. म्हटलं दडपण येऊ नये वाचणाऱ्यावर लांबी बघून. :D
17 Mar 2015 - 4:15 pm | तुषार काळभोर
किती तरी कथा लांबी बघूनच सोडून दिल्या आहेत अन् नंतर प्रतिसाद वाचून कथा वाचून काढल्या आहेत.
17 Mar 2015 - 1:50 pm | जेपी
नव्या नजरेन घटनेकडे पाहण्याचा प्रयत्न आवडला.
17 Mar 2015 - 1:54 pm | अत्रन्गि पाउस
एका महत्वाच्या विषयावर इतके आवश्यक लिखाण केल्याबद्दल...
..जमल्यास ह्याचा उपोद्घात लिहा ...
सर्व भाग एक्दम टाकल्याने एक विशिष्ट असा मानसिक ताण आला नाही त्याबद्दल धन्यवाद ..
17 Mar 2015 - 2:00 pm | पदम
कथेचा शेवट आवडला.
17 Mar 2015 - 2:46 pm | बोका-ए-आझम
आपल्या कथेचा नायक हा खूप प्रगल्भ आणि समंजस आहे. दुर्दैवाने समाजात असं घडत नाही. मावशीच्या मनोवृत्तीचीच माणसं जास्त असतात.
17 Mar 2015 - 3:00 pm | सस्नेह
दुर्दैवाने !!
17 Mar 2015 - 3:59 pm | एक एकटा एकटाच
सहमत
17 Mar 2015 - 4:16 pm | तुषार काळभोर
अन् "त्या"च्या आईच्या मनोवृत्तीची सुद्धा!!
17 Mar 2015 - 3:14 pm | प्रियाजी
कथा फार आवडली.शेवटी तुम्ही नायकाची जी स्पष्ट विचारसरणी चितारली आहे त्यामुळे कथा वेगळ्याच उंचीवर गेली आहे. अश्या विचारांच्या लोकांची सन्ख्या वाढल्यास असे प्रसंग कमी होत जातील.
17 Mar 2015 - 3:18 pm | प्रियाजी
असे प्रसंग म्हणजे या कारणामुळे लग्न मोडण्याचे वा अजिबात लग्न न होण्याचे प्रसंग.
17 Mar 2015 - 3:37 pm | कपिलमुनी
संयत हाताळणी आणि संवेदनशील विषयाची कथा दिल्याबद्दल धन्यवाद !
17 Mar 2015 - 3:59 pm | एक एकटा एकटाच
मस्त लिहिलीय
शेवट आवडला.
17 Mar 2015 - 4:33 pm | पिलीयन रायडर
बलात्कार करुन आपण एखाद्याच आयुष्य किती लेव्हलवर उद्ध्वस्त करत असतो हे त्या नराधमांना कधी तरी जाणवेल का? क्षणिक आनंद ओरबाडुन घेऊन दुसर्याला अगदी जीवानीशी पण जावं लागतं...
तुम्ही फार छान लिहीलं आहे..
17 Mar 2015 - 4:42 pm | अर्चिस
सुरेख ... कथा आवडली
17 Mar 2015 - 4:46 pm | सभ्य माणुस
कथा आवडली. भाषाही एकदम लाघवी वापरलीय.
17 Mar 2015 - 5:10 pm | सिध्दार्थ
आत्ताच सर्व भाग वचुन पुर्ण केले. सुंदर लिखाण आहे.
कथेतील नायका प्रमाणे आपला समाज सुजाण होवो हीच इच्छा.
कथेसाठी धन्यवाद.
17 Mar 2015 - 6:00 pm | बहुगुणी
कथेतील नायकाप्रमाणे आपला समाज सुजाण होवो हीच इच्छा.
अवघड विषयावरील उत्तम लेखन.
17 Mar 2015 - 5:12 pm | चिनार
कथा फार आवडली...मस्त लिहिलीय
17 Mar 2015 - 6:18 pm | आनंदराव
छान लिहिली आहे कथा.
17 Mar 2015 - 7:34 pm | सौन्दर्य
अतिशय संयत शब्दात कथा लिहिली आहे. सर्व संबधित व्यक्तींच्या स्वभावाचे चांगले चित्रण केले आहे. कथेतल्या नायकासारखे, तरुण वागले तर बलात्कारासारख्या घटनेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलू शकेल. शेवट आवडला.
17 Mar 2015 - 8:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सगळे भाग वाचले. मस्तं लिहिलयं.
17 Mar 2015 - 8:52 pm | जुइ
शेवट जास्त आवडला. एका गंभीर विषयावर खुप चांगले लिहिले आहे.
17 Mar 2015 - 9:23 pm | स्वाती२
छान कथा. सगळे भाग आवडले.
18 Mar 2015 - 9:33 am | आकाश खोत
कथा वाचून चांगले अभिप्राय देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार.
आपापल्या स्वभाव आणि विचारसरणी प्रमाणे प्रत्येक जण वेगळ्या दृष्टीने जग बघतो.
त्यामुळे सगळ्यांनी या विषयावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर मत मांडलेलं आहे.
काही जणांनी म्हटल्याप्रमाणे या कथेचा नायक प्रगल्भ आहे. आणि असे लोक जास्त नसतात.
मुळात याच कारणाने मला हि कथा लिहायला प्रवृत्त केलं.
माझ्या मते बलात्कार हा त्या स्त्रीच्या आयुष्यातल्या कठीण काळाची फक्त सुरुवात असते.
एक नराधम बलात्कारी येउन कुकर्म करून निघून जातो.
बऱ्याचदा तो कोण हेही माहित नसतं, आणि सापडत सुद्धा नाही. तो छळ करून निघून जातो.
पण त्यानंतर त्या स्त्रीवर तिच्या माहितीचे, जवळचे, ओळखीचे लोक म्हणजेच आपला समाज,
दीर्घ काळ तिलाच दोषी आणि भ्रष्ट असल्यासारखी वागणूक देतात. तिचा हा मानसिक छळ चालूच राहतो.
अशा सामाजिक मानसिकते मुळे आधीच क्रूर आणि भयानक असलेल्या या घटनेची तीव्रता वाढते आणि आयुष्यभर राहते.
काही दुर्दैवी मुली यात आत्महत्या करतात. मला वाटतं, समाजाने अशी वागणूक बदलली, त्या स्त्रीचा सन्मान त्या बलात्कारामुळे गेलेला नाही अशा प्रकारची, आणि बटबटीत सहानुभूती न दाखवता वागणूक दिली, तर बऱ्याच मुली या थराला जाणार नाही.
मी दाखवल्यासारखे लोक कमी असतील. पण ते असावेत आणि वाढावेत या अपेक्षेने मी हि कथा लिहिली.
हि कथा वाचताना वाचकाने सुद्धा विचार करावा, कि आपल्या प्रियजनांपैकी कोणावर हा प्रसंग ओढवला तर आपण कसे वागू.
त्यामुळेच या कथेतले लोक समजूतदार असले तरी अगदी आदर्श नाहीत. ते चुकीच्या मार्गावर जाऊन, स्वतःच्या विचारांशी लढून पुन्हा बरोबर ते निर्णय घेतात. आधी आपल्याला हि पातळी गाठावी लागेल. मग आदर्श म्हणजे आपल्या समोर या बाबतीत कुठलं द्वंद्वच नको.
18 Mar 2015 - 11:33 am | कपिलमुनी
मागे एका क्ष गावात एका कॉलेजमध्ये शिकणार्या मुलीचा एमएमएस प्रकरण पोलिसांकडे होते.
तर बातमीदाराने त्या अ गावातील मुलगी क्ष शहरामध्ये ढ कॉलेजच्या प वर्षाला आहे . ती हॉस्टेलला रहाते. ण वर्षाची आहे.
एवढा लिहिला होता . आता एवढ्या माहितीवरून जवळ्च्या - आसपासच्या लोकांना सहज अंदाज होतो आणि याप्रमाणे मिळत्या-जुळत्या माहितीच्या मुलींना सुद्धा त्रास होतो . काही वर्षांपूर्वी जळगाव प्रकरणानंतर तिथल्या मुलींची लग्ने जुळायला फार त्रास झाला होता हे प्रत्यक्ष उदाहरण
18 Mar 2015 - 4:42 pm | नगरीनिरंजन
कथा आवडली.
18 Mar 2015 - 5:25 pm | बॅटमॅन
कथा आवडली. सडेतोड विचार असले की नेहमीच कंडका पडायला बरे असते.
18 Mar 2015 - 5:37 pm | अजया
कथा आवडली पण वस्तुस्थितीत पण अशी कथा घडु शकेल का याची शक्यता खूप कमी वाटते दुर्दैवाने.
19 Mar 2015 - 1:22 pm | उमा @ मिपा
कथा आवडली. अतिशय संयतपणे लिहिलीय.
19 Mar 2015 - 3:00 pm | चिनार
संवेदनशील विषय संयत पणे हाताळला आहे !!
माझ्या मते बलात्कार हा त्या स्त्रीच्या आयुष्यातल्या कठीण काळाची फक्त सुरुवात असते.
१००% सहमत !
शारीरिक बलात्कार एकदाच होतो . मानसिक बलात्कार रोज होतात ..ते सुद्धा बघणार्याच्या नजरेने
'निर्भया' च्या मृत्युचं सगळ्यांना दु :ख झालं..पण जगली असती तर सन्मानाने जगू शकली असती का ?
25 Mar 2015 - 1:49 pm | मी_आहे_ना
असेच म्हणतो. निदान त्या केसमध्ये तरी लवकर निकाल लागून शिक्शेची अम्मलबजावणी जलदगतीने व्हायला हवी होती. शिवाय त्या 'ज्युव्हेनाईल' (अल्पवयीन) गुन्हेगारीच्या मुद्द्यावर कडक पावले उचलली जातील असे वाटलेले. (त्या डॉक्युमेंटरीवरून राळ उठण्यापेक्शा योग्य संदेश समाजात जायला हवा होता)
21 Mar 2015 - 9:58 am | स्पंदना
...!