ती आणि तो : भाग १

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
17 Mar 2015 - 12:50 pm

रात्रीचे १० वाजून गेले होते. तो एक फिल्म बघत बसला होता. आता थोड्यावेळात तिला एक कॉल करायचा, थोडा वेळ गोड गप्पा मारायच्या आणि झोपायचं असा त्याचा बेत होता. पण तिच्या आईचाच कॉल आला आणि तो दचकला. आईंचा कॉल आणि तोसुद्धा यावेळी. तसं त्या दोघांबद्दल दोघांच्याही घरी माहित होतं. घरचं वातावरणपण मोकळं होतं. दोघांच्या आईवडिलांनी त्यांच्या नात्याला मंजुरी देऊन टाकली होती. आता त्या दोघांनी तयारी दाखवल्यावर पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता.

आता तिची आई साखरपुड्याची घाई करायला सांगेल कि काय या शंकेने त्याने फोन उचलला.

"अरे तुम्ही दोघं सोबत आहात का? हि अजून घरी नाही आली. फोन करून सांगत तरी जा रे. काळजी वाटते."

"नाही काकू. मी तर घरी आहे माझ्या. ती ऑफिसमध्ये असतानाच आमचं बोलणं झालं. कुठे जायचं बोलली तर नव्हती. तिला फोन करून बघतो कुठे आहे."

"अरे तिचा फोन कधीचा बंद लागतोय. म्हणून तर तुला केला मी."

"ठीके काकू. काळजी करू नका. मी तिच्या टीममधल्या लोकांना फोन करतो. त्यांना माहित असेल ती ऑफिसनंतर कुठे गेली असेल तर."

त्याने लगेच त्याच्याकडे तिच्या ऑफिसमधले जेवढे नंबर होते त्या सगळ्यांना कॉल करून पाहिला. तिच्या जवळच्या मैत्रिणी, ग्रुपमधले सगळे झाले. कोणालाच माहित नव्हतं. एव्हाना ११ वाजून गेले होते. आता त्यालापण काळजी वाटायला लागली होती. तो तडक तिच्या घरी गेला. ती अजून पोचलेली नव्हतिच. तिचे आईबाबा दोघे प्रचंड टेन्शनमध्ये होते. सांगून गेली असती तर त्यांना काही काळजी वाटली नसती. पण तिने काही सांगितलं सुद्धा नव्हतं, आणि कोणाला तिच्याबद्दल माहित सुद्धा नव्हतं. आतापर्यंत त्यांचापण शहरातल्या सगळ्या नातेवाईकांना फोन करून झाला होता.

तो आणि तिच्या बाबांनी पोलिसात जायचं ठरवलं. तिची आई रडायलाच लागली, आणि मीपण येते म्हणून हट्ट धरून बसली. कसंबसं त्यांनी तिला शांत केलं. ती घरी आली तर, काही फोन आला तर कोणी तरी घरी असायला हवं असं तिला समजावून सांगितल. तिला सोबतीला म्हणून शेजारच्या वहिनींना झोपेतून उठवून आणलं. आणि ते निघाले.

पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांचे सर्व प्रकारचे वाकडेतिकडे तिरकस प्रश्न विचारून झाले. तो चिडला होता, पण बाबांनी त्याला शांत केलं. काही कळलं कि सांगतो हे पोलिसांचं आश्वासन ऐकून ते निघाले. पोलिसांशी अजून बोलून उपयोग नव्हता.

त्याला अचानक सुचलं, आणि त्यांनी जवळपासच्या हॉस्पिटल मध्ये शोध घेतला. रात्रीच्यावेळी कसलीही माहिती लवकर मिळत नव्हती. त्यांनी पोलिसांकडे परत चौकशी केली. पण एखाद्या मुलीच्या अपघाताची कसलीही बातमी त्यांच्याकडे पोचली नव्हती.

जाताना ते तिचं ऑफिस ते घर, त्याचं घर असं सगळंच फिरून आले. पण उपयोग शुन्य. तो त्यांच्यासोबत त्यांच्याच घरी गेला. रात्रभर कोणालाही झोप आली नाही. सकाळी शेजारच्या काकू धीर देऊन घरी गेल्या.

तो आणि बाबा चहा नाश्ता जबरदस्ती पोटात ढकलून बाहेर पडले. दोघांनी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती. त्यांनी पुन्हा एकदा जवळपासचे हॉस्पिटल पालथे घालायला सुरुवात केली. तिचा कुठेच ठावठिकाणा नव्हता. घरी बसून आई आणखी त्यांच्या,तिच्या सगळ्या ओळखीच्या लोकांची यादी करून फोन करत होत्या.

शेवटी अकरा-बाराच्या सुमारास पोलिसांचाच फोन आला. एक मुलगी शहराच्या बाहेरच्या भागात बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिला तिकडच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं. तिचं वर्णन त्यांनी दिलेल्यासारखंच होतं. ती मुलगी पूर्ण शुद्धीवर आली नव्हती. त्यामुळे ओळख पटवायला त्यांनी तिकडे बोलावलं होतं. मनोमन प्रार्थना करत ते तिकडे निघाले.

कालपासून ज्या ज्या लोकांना फोन केले होते, त्या सगळ्यांचे फोन चालुच होते. त्यांना उत्तर देता देता ते कंटाळले होते. घरी आईंची पण तीच परिस्थिती होती.

तिकडे पोचले तेव्हा रूमच्या बाहेरच डॉक्टर आणि पोलिस भेटले. त्यांनी तिला पाहताक्षणीच ओळखलं. अंगभर जखमा दिसत होत्या. त्यांना नुकतीच मलम पट्टी केलेली दिसत होती. तिला तसं पाहूनच ते व्यथित झाले. हि आमचीच मुलगी असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, कि ती अशा जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. लोकांनी तिला इथे दाखल केलं. आणि तिला अगदी थोडा वेळ शुद्ध येउन गेली. पण ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्यावर प्राथमिक उपचार आणि चाचण्या करून झाल्या होत्या. तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्टच होतं. त्यांनी तिला झोपेचं औषध देऊन झोपवलं होतं. तिला जाग आल्यावर सर्व काही ठीक वाटलं तर ते तिला घरी जाऊ देणार होते.

पोलिसांना आतापर्यंत तिचा जबाब नोंदवता आला नव्हता. पण डॉक्टरांनी त्यांचे निष्कर्ष त्यांना सांगितले होते. आणि तिचे रिपोर्ट्स आले कि त्याची प्रत पोलिसांना पण पाठवली जाणार होती. तिला जाग यायला बराच वेळ असल्याने पोलिसांनी तिचा जबाब नोंदवायला घरी यायची तयारी दाखवली. आणि ते गेले.

त्यांनी आईला फोनवर ती सापडल्याचं तेवढं सांगितलं. आणि हॉस्पिटलचा पत्ता देऊन तिचे कपडे घेऊन यायला सांगितलं. त्या ताबडतोब निघाल्या.

आता हळू हळू त्यांना काय झालंय याची जाणीव व्हायला लागली. आई पोचल्या तेव्हा हि बातमी ऐकून त्या कोसळल्याच. बाबांनी त्यांना सावरलं खरं. पण आतून ते पण खचले होते. तो तर इथे आल्यापासून एक शब्द सुद्धा बोलला नव्हता.

कथाविचार

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

17 Mar 2015 - 3:32 pm | कपिलमुनी

काही महिन्यांपूर्वी हिंजवडीमधली मुलगी पिंचि भागात अशा अवस्थेत सापडली होती. त्याची आठवण झाली.
अतिशय भयंकर प्रसंग !

स्पंदना's picture

21 Mar 2015 - 9:37 am | स्पंदना

:(