झाडी बोली (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
1 Mar 2015 - 2:50 am

प्रत्येक भाषेचे "प्रमाण" किंवा "ग्रांथिक" व "बोली" असे दोन भाग आढळून येतात. मराठीत पुण्याच्या आसपास बोलली जाणारी ’पुणेरी" भाषा ही ग्रांथिक मानली जाते. मराठीतील विविध बोली भाषा उदा. कोल्हापुरी, वायदेशी, नगरी, बागलाणी, खानदेशी, अहिराणी, बालेघाटी, वर्‍हाडी, गंगथडी, बैतुली, नागपुरी, मालवणी, कोंकणी, कारवारी इ. आपल्याला (निदान ऐकून तरी) माहीत असतात.व याचीही कल्पना असते की या बोली भाषा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत व त्यांची नावे त्या त्या भागांवरून पडली आहेत. उदा. मालवणच्या आसपास बोलली जाते ती मालवणी बोली. आज आपण सर्वसाधारण मिपाकराला माहीत नसण्याची शक्यता आहे अशा "झाडी बोलीची" माहिती करून घेऊं. प्रथम ग्रांतिक व बोली भाषांमधील फरक जाणून घेऊं व मग झाडी बोलीकडे वळू.

कोकणातील मालवण भागात रहाणारा माणुस जी मराठी बोलतो तीत तेथील काही विशिष्ट शब्द, क्रियापदे, जास्त प्रमाणात वापरली जातात. ही झाली मालवणी बोली. आता नागपुरमध्ये राहणारा माणुस तेथील नागपुरी बोली बोलतो. त्याला मालवणी बोली कळणारच नाही. ही थोडी अडचण झाली पण त्याने फारसा फरक पडत नाही. पण जेव्हा एखादा ग्रंथ लिहला जातो तेव्हा पंचाईत होते. इथे प्रमाण किंवा "ग्रांथिक" भाषेची गरज निर्माण होते. सर्वांकरता एक समान भाषा गरजेची आहे. ती गरज "ग्रांथिक" भाषा पुरवते. एखाद्या ग्रंथात बोलींमधील दोनचार शब्द आले तर आपल्याला अचूक अर्थ कळला नाही तरी मागच्या पुढच्या संदर्भात आपण "भागवून" घेतो. पण सगळा ग्रंथ मालवणी बोलीत असेल तर घाटावरील सगळ्यांना वैताग येईल. "पुणेरी" मराठी ग्रांथिक भाषा म्हणून मान्य झाली. असो.

आता बोली" कडे वळू. बोली ही लोकभाषा. ग्रांथिक ही गरज म्हणून स्विकारलेली. ग्रांथिक भाषेला व्याकरणाचे नियम कडकपणे पाळावेच लागतात. पण बोली जास्त लवचीक असते व्याकरण असतेच, पण त्याचा फार बुवा केला जात नाही. आपण रोज बोलतांना ह्रस्व-दीर्घ उच्चार शब्दकोशात दिल्याप्रमाणे थोडेच करतो ? तसेच थोडेफार.

उच्चारांचे सुलभीकरण, कठोर वर्ण टाळावयाचा प्रयत्न, शब्दांचे वेगळेपण, ध्वनिप्रक्रियेवरील प्रभाव, इ. बोलीचे वेगळेपण दाखवितात. या सर्वांची दखल "झाडी बोली"चे संदर्भातच बघूं.

विदर्भातील वैनगंगा नदीच्या पूर्वेकडील तीन जिल्हे भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या महाराष्ट्राच्या अतिपूर्व कोपर्‍याला "झाडीपट्टी" म्हणतात. भरपूर पाऊस, शेकडो लहान-मोठी तळी, उद्योगधंद्यांचा अभाव, यामुळे इथे मोठमोठाली जंगले आहेत. त्यामुळे हा भाग "झाडीपट्टी" व येथील मराठी बोली "झाडीबोली". हा प्रदेश बाबा आमटे, ताडोबाचे अभयारण्य व नक्षलवाद्यांचे हल्ले यांनी हळुहळु आपल्या ओळखीचा होऊं लागला आहे.
.
या बोलीवर संस्कृत, हिंदी, तेलगू, गोंडी भाषांचा परिणाम झालेला दिसतो. आता थोडाफार इंग्रजीचाही.

भवभूती व दंडी येथीलच. महानुभाव साहित्य व ज्ञानेश्वरीत झाडी शब्द आढळतात. लीळाचरित्रातील "डाकरामी व्याघ्र बीद्रावण" व "झाडी रामद्रणेचा भेटी" या दोन लीळा झाडी भाषेतील. म्हणजे मराठील ग्रंथलेखनाची सुरवात झाली त्यावेळीच झाडी बोलीतील लेखन मिळते. तुकारामाच्या गाथेतील झाडी शब्दांचा अर्थ विद्वानांना लागणे अवघड पण ते शब्द झाडीपट्टीतील खेडुतांच्या जिभेवर खेळत असतात..काही शब्द बघा, चोकट, कोटा, ठानई,आंबील, सेजी, सिदोरी, पाड, रांड, कव्तिक, गारा, बिराड, चाटू, सुरवाडा, चौबारा, बांदोडी

आता प्रत्यक्ष झाडी बोलीकडे बघूं.

(१) मराठीसारखे झाडीत नपुंसकलिंग नाही.

(२) दाट झाडीमुळे जवळचा माणुसही दिसणे अवघड. तेव्हा मोठ्याने ओरडणे स्वाभाविक. त्यामुळे पहिले अक्षर जोरात उच्चारतात. अंतीम अकारांत वर्ण व्यंजनांत झाले. उपांत्य वर्णाचा उच्चार दीर्घ झाला.तसेच गाय, पाय, सवय इ.तील य चा लोप झाला गा, पा, सव इत्यादी नवीन पर्याय तयार झाले. तर मधील र चा लोप होऊन (इंग्रजी प्रमाणे) त झाला.

(३) ध्वनिशास्त्राचे वेगळेपण ळ ऐवजी र, ण ऐवजी न आणि छ, श, ष ऐवजी स. जेवण चे झाले जेवन आणि हळद चे झाले हरद (संस्कृतमधील हरिद्रा शी जास्त जवळचे !)

(४) अनुनासिके :अनुनासिकापासून जवळ असणार्‍या "ग" वर्गातील व्यंजनांपूर्वी पूर्वी अनुनासिकाचा स्विकार जसे : उंगवना, मुंग, नंगारा, नंजर, या विरुद्ध क वर्गातील व्यंजनांच्या बाबतीत त्याग उदा. इच, उच, काकन, खुट, बिरदावन, सीप, सिपी वगैरे.

(५) वेगळा शब्दसंचय प्रत्येक वस्तूच्या तुकड्यातुकड्याला भिन्न शब्द उदा. सुपारीचे खांड, भेंडीची चानी, भाजीचा गडा, मांसाचा ठुसा, लाकडाचा बाड, काठीचा गेड तर फळाची फाक फांदीचा फोक उसाचा खोटा, जमिनीची चिरोटी.
मराठीतील कवींनी संस्कृतपेक्षा मराठी श्रेष्ठ असे दाखवण्याकरिता म्हटले आहे कीं एका "घट" करिता आमच्याकडे १५ शब्द आहेत. झाडीही तेच दाखविते. बुरुडाकडील बांबूच्या टोपल्यांची नावे पहा : करंडी, कुसेरी, गनेरी, गंपा, चुर्की, झाल, झिपनी, दवडी, दारधुनी, पट्टा, बडी, बडगा हारा ....तर कुंभाराकडच्या मातीच्या वस्तू : अतार, करुले, कसारा, कसुरली, कुंडा, कोरोबा, गंगार, टांगसी, ठकुली, डेरुला, नांद, पांतोना, पारा, नांद ....

(६) प्रयोजक रूपे : ग्रांथिक मराठीप्रमाणे झाडी बोलीत चरणे-चारणे, मरणे-मारणे अशी प्रयोजक क्रियापदे सिद्ध होतात पण मराठी गाडणे, ताणणे यांना मराठीत मूल क्रियापद नाही तर झाडी बोलीत गडना, तनना ही प्रचलित आहेत. संस्कृतशी नाते टिकवून ठेवल्याची खुण.

(७) इंग्रजीतील let प्रमाणे झाडी बोलीत "उली" हा लघुत्वदर्शक प्रत्यय वैशिष्टपूर्ण आहे. पुल्लिंगी नामांना हा प्रत्यय लागून ते स्त्रीलिंगी शब्द बनतात. उदा. आंबा-आंबूली, कोटा-कोटूली, गाडा-गाडुली

(८) महाप्राणांचा कमी वापर झाडी बोलीत ख आणि घ वर्गीय व्यंजने त्यागून त्या ऐवजी क आणे ग वर्णीय व्यंजने वापरली जातात उदा. साखर -साकर, वाघ-वाग, साधा-सादा, काथ-कात, गाभा-गाबा..
ह व्यंजन शब्दाच्या अंतस्थानी येत नाही.मध्ये आल्यास सहवर्णाचा स्वर घेऊन येते उदा. चेहरा-चेहेरा, कोहळा-कोहोरा, कहाणी-काहानी

(९) अभ्यस्यता : झट, सट इत्यादी ध्वनींना "कन" प्रत्यय लागून मराठीत झटकन, सटकन इत्यादी अभ्यस्त शब्द झाले आहेत. झाडी बोलीत कन ऐवजी ना व नारी हे प्रत्यय लागून नवीन शब्द तयार होतात तसेच त्या ध्वनीला ओकारांत रूप देऊन त्याच्या पुनरावृत्तीने आणखी एक अवीन शब्द तयार होतो. म्हणजे मराठीतील एका शब्दाला झाडीत तीन शब्द होतात. उदा. बदना-बदनारी-बदोबद(बदकन)सरोसर-सरना-सरनारी (सरकन) "ओ" उर्दूतून आलेला दिसतो (ओ=आणखी). दोन समानार्थी व विरुद्धार्थी शब्द जवळ घेऊनही अनेक शब्द तयार होतात. गीरागोटा, तन्नाफन्ना, सुकासुरवाडा, बजारहाट, डिंगमस्ती, लिपापोती, इकुनतिकुन, देनाघेना, येनारजानार, जोडतोड, वगैरे.

(१०) झाडी बोली व नागपुरी-वर्‍हाडी बोली शेजारच्या बोली असल्याने या तीन बोलीत साम्य आहेच. थोडे फरक बघू. झाडीप्रमाणे नागपुरीत ष, ळ. ण ही व्यंजने नाहीत तसे ऐ व औ हे स्वरही नाहीत. नागपुरी छ आणि श ही व्यंजने वापरतात पण झाडीमध्ये त्यांचे रुपांतर स मध्ये होते त्यामुळे नागपुरीतील छत्री, छलांग, छाट, शरम, शक, शिडी हे शब्द झाडीत सस्त्री, सलांग, साट, सरम, सक, सिडी असे उच्चारले जातात. एक महत्वाचा भेद म्हणजे नागपुरी महाप्राण व्यंजनांचा जास्तीत जास्त वापर होतो तर झाडीत कमीतकमी. सामासिक शब्द सोडल्यास ख, घ, झ, ठ, द, थ, ध, फ, भ यांऐवजी क,ग, ज, ट, ड, त, द घ, प, ब यांची योजना होते, उदा. आखाडा-अकाडा; अधली-अदली; दिमाख-दिमाक; पाथ-पात; डंढार-डंडार इत्यादी. नागपुरी च, ज, आंणि झ चे दंत्य व दंततालव्य असे दोनही उच्चार वापरले जातात तर झाडीत फक्त दंत्य.. नागपुरीत मराठी प्रमाणे नपुंसकलिंग असते; झाडीत नाही. वर्‍हाडीत ण व ही व्यंजने वपरली जातात , झाडीत नाहीत. वर्‍हाडीत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन होतांना मुळ रूप कायम असते. झाडीत आकारांत होते. उदा. गाव, केस, कागद वर्‍हाडीत अपरिवर्तनीय असतात, झाडीत ती गावा, केसा, कागदा अशी होतात.

(११) हिंदी, गोंडी, तेलगू व इंग्रजी भाषांचा परिणाम : झाईपट्टीच्या उत्तर व पूर्व सीमा हिंदीने (खरे म्हणजे छत्तिसघरी हिंदी या बोलीने) वेढल्या आहेत, त्या मुळे त्या भाषेतील शब्द, वाक्प्रचार झाडी बोलीत आले आहेत. दहाव्या शतकापासून जवळजवळ ५-६ शतके गोंड राज्यकर्ते झाडीपट्टीत राज्य करत होते, त्यामुळे गोंडी भाषेचा बोलीवर प्रभाव पडावयास पाहिजे होता (जसा फारशीचा मराठीवर पडला) पण गंमत म्हणजे गोंड राजांनी गोंडी ही घरगुती भाषा व मराठी ही राजभाषा म्हणून स्विकारली व त्यामुळे गोंडीचा मराठीवरील प्रभावापेक्षा मराठीचा गोंडीवरचा प्रभाव जास्त दिसतो ! श्री. खैरे यांनी दाक्षिणात्य भाषांचा मराठीवरचा सुरवातीपासूनचा पगडा
दाखविण्याचा उपक्रम बराच नेटाने केला आहे. पण मराठीपेक्षा झाडी बोलीवर त्यांचा नक्कीच जास्त प्रभाव आहे. इंग्रजांचे राज्य आल्यावर इंग्रजीचा प्रभाव भारतातल्या इतर भाषांवर पडला तसा झाडीवरही पडला आहे. पण विस्तारभयास्तव इथे त्याची जास्त चिकित्सा करता येत नाही.

चिकार (खरे म्हणजे कंटाळवाणेच) झाले नां ? या बोलीतला एखादा लेख, एखादी गोष्ट देता आली असती तर बरे झाले असते. असो. थोडे वाक्प्रचार व म्हणी बघून थांबू.

वाक् प्रचार
(१)अ इन् चैन् रायना ...सुखात असणे
(२) अक्सेदा देना ....आमंत्रण देणे
(३) अड्सून् भाव घेना .... अधिक दर घेणे
(४)अन् खावाच्या टोंडाना सेन् खाना ....खोटे बोलणे
(५)आनाकानी करना ...टाळाटाळ करणे
(६)उंबर् फोडून् सांगना ....गौप्यस्फ़ोट करणे
(७)कनपुटीत् देना ... मारणे
(८) खान् खान् करना/सुटना ...खाण्यासाठी तोंड वेंगाडणे
(९) गांडीचा सोडून् डोक्सील् गुंडना ....निर्लज्जपणे वागणे
(१०)चुलील् आवतन् रावना ... सर्वांना जेवणाचे आमंत्रण असणे

म्हणी
(१) आप् राबे, घोडा चाबे ....आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते
(२) खाईन् त हांडी रितीना हगीन् त् पोट् रिता .... कृपणतेचा अतिरेक
(३) गरा कापला, खोकला गेला .... अनर्थाचे मूळ नष्ट करणे
(४) गोस्टीत् गोस्टी, मेला कोस्टी ....गप्पांमध्ये मूळ हेतु विसरणे
(५) नाई तुल्, नाई माल्, घाल् कुत्याल्
(६) मांज् रीच्या दैवाना सिका टुटुला.... शिंक्याचे तुटले, मांजरीचे फावले
(७)मा तसी लेक्, मसेला येक् .....एका माळेचे मणी
(८)मुकील् झवला, हाक् ना बोंब् ... दुबळ्याला वाली कोणीच नसतो
(९)मोट्याघरी पल्ली ना पोतासाटी अल्ली .... नाव मोठे दर्शन् खोटे
(१०) सोल्ला त् परते धरला त् चावते

(डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी करता लिहलेल्या प्रबंधावरून (१) झाडी बोली :भाषा आणि अभ्यास व (२)झाडी बोली शब्दकोश ही दोन पुस्तके लिहली आहेत. साभार उपयोग.)

शरद

भाषाव्युत्पत्तीसमाजप्रकटनविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

1 Mar 2015 - 8:53 am | श्रीरंग_जोशी

माझे आजोळ नागपूरचे आहे त्यामुळे लेखातील काही उदाहरणे फार ओळखीची वाटली. माझी आई अनेकदा गोष्टी गोष्टीत मेला कोष्टी या म्हणीचा वापर करते.

या विषयावर एवढे तपशीलवार प्रथमच वाचले. हे लेखन इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

एस's picture

1 Mar 2015 - 9:15 am | एस

अतिशय उपयुक्त लेख.

बर्‍याचशा म्हणी आणि वाक्प्रचार हे इकडच्या बोलीभाषांमध्येही थोड्याफार फरकाने आढळतात. ही साम्यस्थळे शोधताना मजा आली. गोंड राजांनी गोंडी ही घरची बोली आणि मराठी ही राज्यकारभाराची भाषा म्हणून स्वीकारली हे विधान पाहून आश्चर्य वाटले. याबाबत अधिक माहिती घ्यायला हवी.

विशाखा पाटील's picture

1 Mar 2015 - 9:30 am | विशाखा पाटील

अभ्यासपूर्ण लेख. एका वेगळ्या बोलीची ओळख झाली. धन्यवाद!
वाक्प्रचार आणि म्हणींमधून लोकजीवन कळतंय - उंबर फोडणे, गप्पा मारणारा कोष्टी, घोड्याने खाऊन टाकणे.
मा तसी लेक्, मसेला येक् - 'मसेला'चा अर्थ काय आहे ?

शरद's picture

1 Mar 2015 - 10:52 am | शरद

मसेला
मसेला म्हणजे मसाला, स्वयंपाकघरातला मसाला. मुलगी स्वयंपाक आई करते तसाच करावयास शिकणार, तेव्हा तिचा मसाला आईच्या मसाल्यासारखाच असणार, थोडक्यात दोघींचा स्वयंपाक एकाच तर्‍हेचा, म्हणून एका माळेचे मणी
शरद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2015 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झाडीबोलीबद्दलचा लेख आवडला सर. काल वर्ध्याला एका परिसंवादात होतो तेव्हा झाडीबोलीवर लै चर्चा झाली आणि आज मिपावर लेख वाचुन आनंद वाटला.

-दिलीप बिरुटे

पिशी अबोली's picture

1 Mar 2015 - 12:06 pm | पिशी अबोली

'बोली व भाषा' या विवेचनातील बरेच मुद्दे पटले नाहीत. सविस्तर नंतर लिहेन. दुसरे, 'कोंकणी' ही स्वतंत्र भाषा म्हणून मान्य झालेली आहे(भाषा आणि बोलीच्या व्याख्यांमधील गोंधळ लक्षात घेऊनसुद्धा, कोंकणी आणि प्रमाण मराठीमधे बऱ्यापैकी भेद आहेत हे मान्य करायला हरकत नाही). त्यामुळे केवळ भौगोलिक दृष्टया महाराष्ट्रात असल्याने मराठीची बोली म्हणवल्या जाणाऱ्या'कोकणी' आणि 'कोंकणी' मधील भेद कृपया लक्षात घ्यावा.
झाड़ी बोलीची उदाहरणे आवडली. हिंदीचा प्रभाव अतिस्पष्ट दिसून येत आहे. लेखाबद्दल धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2015 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोकणी ही मराठीची बोली कशी नाही, ते साधार लिहा वाट पाहतोय.

कोंकणी आणि प्रमाण मराठीमधे बऱ्यापैकी भेद आहेत हे मान्य करायला हरकत नाही
मान्य.

- दिलीप बिरुटे

एसेम कत्र्यांनी पुस्तक लिहून गोची केली हो, नैतर कोकणी ही मराठीची बोलीच. ;)

तदुपरि- एखादी भाषा ही दुसर्‍या एखाद्या भाषेची बोली आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अगदी खात्रीशीर मार्ग अ‍ॅज़ सच उपलब्ध नाहीत असे आमच्या तोकड्या वाचनावरून कळते.

सुनील's picture

2 Mar 2015 - 1:34 pm | सुनील

ग्रियर्सनचा शब्द प्रमाण मानला तर कोंकणी ही मराठीची बोली हे मान्य करता यावे. मात्र मग अहिराणीला गुजरातीची बोली म्हणूनही मान्यता द्यावी लागेल! ;)

एखादी भाषा ही दुसर्‍या एखाद्या भाषेची बोली आहे किंवा नाही हे ठरवण्याचे अगदी खात्रीशीर मार्ग अ‍ॅज़ सच उपलब्ध नाहीत

खात्रीशीर ह्या शब्दाबद्दल +१

ना गो कालेलकरांचे एक पुस्तक घरी आहे. पुन्हा चाळून बघायला हवे. तरीही जेवढे आठवते त्यानुसार, सदर प्रश्न हा केवळ भाषाशात्रावर सोडता येत नाही. त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पदरदेखिल असतात. त्यांनी पोर्तुगीजचे उदाहरण दिले आहे. जर पोर्तुगाल हे स्वतंत्र राष्ट्र नसते तर, कदाचित पोर्तुगीज ही स्पॅनिशची बोली म्हणूनही गणली गेली असती!

असो. पूर्व विदर्भाला झाडीपट्टा म्हणतात हे ठाऊक होते. तेथील बोलीचा परिचय आवडला.

मात्र मग अहिराणीला गुजरातीची बोली म्हणूनही मान्यता द्यावी लागेल! Wink

चालतंय की. एक देऊ, एक घेऊ ;)

तरीही जेवढे आठवते त्यानुसार, सदर प्रश्न हा केवळ भाषाशात्रावर सोडता येत नाही. त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पदरदेखिल असतात. त्यांनी पोर्तुगीजचे उदाहरण दिले आहे. जर पोर्तुगाल हे स्वतंत्र राष्ट्र नसते तर, कदाचित पोर्तुगीज ही स्पॅनिशची बोली म्हणूनही गणली गेली असती!

यग्जाक्टलि!!!!!!! कोकणीची चळवळ झाली नसती तर कदाचित मराठीची बोली म्हणून झालीच असती.

पिशी अबोली's picture

2 Mar 2015 - 3:37 pm | पिशी अबोली

कोणतीही बोली ही एका कुठल्यातरी स्पेसिफिक भाषेचीच असं म्हणण्याला माझा विरोध आहे. बोली ती बोली. ती या भाषेची, त्या भाषेची या फक्त काही वेगवेगळ्या कारणासाठी केलेल्या सोयीच्या व्याख्या आहेत. सामाजिक भाषाशास्त्रात आता 'ही या भाषेची बोली' असे न म्हणता, 'लेक्ट' अशी एकच संकल्पना वापरली जाते. कोणत्याही प्रकारच्या बोलीला कुठच्यातरी एका वर्गीकरणात केवळ सोयीसाठी न ढकलता, प्रत्येक बोलीचं स्वतंत्र अस्तित्व या संकल्पनेत ठसवता येतं.

याशिवाय, dialect continuum ही संकल्पनाही या प्रकारचे वर्गीकरण फोल ठरवते. एका 'अ' या बिंदूला एक भाषा मानून तिच्यापासून सुरुवात करून 'इ' या बिंदूला दुसरी वेगळी भाषा मानलं, तर मधल्या ब आणि क या अ च्या बोली, आणि ड ही इ ची बोली इतकं सरळसोट ठरवता येत नाही. या मधल्या पट्ट्यात राहणार्‍या भाषकांच्या बोलण्यात अ आणि इ यांचा बर्‍याचदा सारखाच प्रभाव दिसून येतो. मग हे असं कोण कुणाची बोली ते कसं ठरवणार? म्हणून मग 'अ' ते 'इ' हे सगळेच 'लेक्ट'. त्यात डायलेक्ट, सोशोलेक्ट असले काही प्रकारच नाहीत.

आता कोकणीची गोष्ट. कोकणीला मराठीची बोली असं ठामपणे म्हणण्याला माझा विरोध आहे तो या dialect continuum मुळे. प्रमाण मराठी ही जर ढोबळ मानाने पुणे भागात बोलली जाणारी बोली असेल, तर कोकणी ही या मराठीपेक्षा गोअन कोंकणीशी जास्त साधर्म्य दाखवते (ग्रियर्सनने या भागातील नमुने दिले आहेत). पण महाराष्ट्रात असल्याने तिला मराठीची बोली असं नाव दिल्यामुळे, ती बोलणार्‍या सामान्य भाषकांच्या मनावर प्रमाण मराठीपासून तिचं अंतर असण्याचं दडपण कायम राहत असेल. आता याला आत्तातरी काही पर्याय नाही. पण 'बोली आणि भाषा' यात असे भेद आणि त्यामुळे बोलींची लयाला जाणारी समृद्धी, याचं मला वैयक्तिकरित्या वाईट वाटतं.

पण महाराष्ट्रात असल्याने तिला मराठीची बोली असं नाव दिल्यामुळे, ती बोलणार्‍या सामान्य भाषकांच्या मनावर प्रमाण मराठीपासून तिचं अंतर असण्याचं दडपण कायम राहत असेल.

मग गोव्यात असायला पाहिजे होता का हा प्रदेश?

पिशी अबोली's picture

2 Mar 2015 - 3:53 pm | पिशी अबोली

वाटलंच होतं मला हे कुणीतरी बोलणार..

नाही. तो आहे तिथेच राहूदे. त्याच्याशी माझं देणंघेणं नाही. पण तिला मराठीची बोली असं डोळे झाकून म्हटलं ना, की पाठ्यक्रमात 'प्रमाण मराठी' म्हणून मुलांवर मानसिक ताण वाढवणारं बुजगावणं तयार करायचं, आणि शेवटी भाषेवरून आलेला एक न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण करून ठेवायचा हे परिणाम आपोआप येतात.

बॅटमॅन's picture

2 Mar 2015 - 3:59 pm | बॅटमॅन

मानसिक ताण होण्याइतका फरक मुळात या भाषांत आहे का? गोवेतर कोकणातील- मोर स्पेसिफिकली महाराष्ट्रीय कोकणातील भाषेबद्दल बोलतोय. आणि असला फरक तरी किमान रत्नांग्रीतील लोकांना तरी असा ताणबीण होत असल्याचे दिसले नाही.
कोकणी ही स्वतंत्र भाषा आहे हे सांगण्याच्या अट्टाहासाचे हे टोक दिसतेय म्हणून हे अर्ग्युमेंट अधोरेखित करावे वाटले इतकेच.

कोकणी ही स्वतंत्र भाषा आहे, ग्रांटेड. शेवटी कत्र्यांनी अख्खे पुस्तक लिहिलेय त्यावर. पण हे बाकीचं जरा अतीच आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ विदा पहायला आवडेल.

पिशी अबोली's picture

2 Mar 2015 - 4:12 pm | पिशी अबोली

किमान रत्नांग्रीतील लोकांना तरी असा ताणबीण होत असल्याचे दिसले नाही.

तो ताण होतोय मला, असं कुणीही ओरडून सांगत नसतं बॅटमॅना. मला प्रमाण भाषा येत नाही, हा न्यूनगंड असतो. मिरवण्याची गोष्ट नसते. आणि असा ताण न झालेले कोणत्या स्तरातील लोक माहीत आहेत तुला? निम्नस्तरीय विद्यार्थ्यांना शाळेत प्रमाण मराठी शिकताना ताण येत नसेल? असे वाटत असेल तर मी काय बोलू? असो.

कोकणी ही स्वतंत्र भाषा आहे हे सांगण्याच्या अट्टाहासाचे हे टोक दिसतेय म्हणून हे अर्ग्युमेंट अधोरेखित करावे वाटले इतकेच.

मुळात मी कधीपसून सांगतेय की 'कोकणी' आणि 'कोंकणी' यात फरक आहे. भाषा म्हणून 'कोंकणी' ला मान्यता आहे, 'कोकणी' ला मराठीची बोली मानले जाते. असो. तर तुला माझ्या वरच्या अर्ग्युमेंटमधे कसला अट्टाहास दिसला हे मला खरोखर कळलेलं नाही. समजावून सांगितल्यास बरे होईल.

अजून एक. कत्रेसर महान होते. पण त्यांच्या पुस्तकात लिहिलंय म्हणून मी काहीही मान्यपण केलेलं नाही. त्यामुळे आंधळी भाषासमर्थक मी नाही हेसुद्धा लक्षात असू द्यावे.

जणू मँडारिनसारखी पूर्णच वेगळी भाषा शिकताना होईल तसला तरी ताण आजिबातच दिसला नाही. तस्मात ताण होतोय हा अट्टाहास वाटला, दुसरे काही नाही. मराठीपेक्षा कोंकणीशी तिचे साम्य जास्त असणे आणि ताण जास्त येणे यांचा परस्परसंबंध किती? तेसुद्धा कोकणात ग्रांथिक मराठीचा प्रभाव इतक्या जुन्या काळापासून असताना?

वैसे तो मग प्रमाण मराठी शिकताना सर्वच बोलीभाषा बोलणार्‍यांवर ताण येतो. कोकणीचं काय पेश्शल? आणि म्हटलं समजा कोंकणीची बोली तर तेवढ्यामुळं फरक काय पडणारे? सिलॅबसातलं मराठी जाऊन कोकणी येणारे की अजून काय होणारे? शेवटी हे अर्ग्युमेंट नाही म्हटले तरी या प्रश्नाशी कुठे तरी निगडित आहेच. जरा हा प्रदेश महाराष्ट्रातच राहणार असेल तर कोंकणीची बोलीच का, उद्या कोकणी ही मराठी अन कोंकणीपेक्षा वेगळी तिसरी भाषा म्हटले तरी काय फरक पडणारे? सॉफ्ट पॉवर ज्या भाषेची जास्त तिचा प्रभाव हा पडणारच. भाषिक सर्व्हायव्हलच्या दृष्टीने पाहू गेल्यास काय लेबल लावतो हे तस्मात इथे इर्रिलेव्हंट आहे. भाषाशास्त्रीय अचूकतेसाठी कोंकणीची बोली हे लेबल जास्त योग्य ठरेल म्हणून मराठीची बोली असे म्हणू नका म्हटले तर चालेल- पूर्ण सहमत. पण हे बाकीचं झेंगाट नको सोबत. त्याला कै अर्थ नाही.

पिशी अबोली's picture

2 Mar 2015 - 5:10 pm | पिशी अबोली

वैसे तो मग प्रमाण मराठी शिकताना सर्वच बोलीभाषा बोलणार्‍यांवर ताण येतो.

असा ताण येत नाही असं मी कुठे म्हटल्याचं दाखवून देशील का? का तुमच्या पेश्शल लॉजिक ने 'कोकणीला काही नियम लावला की बाकी बोलींना तो नियम लागत नाही' असे आपोआप काही होते? विषय कोकणीचा चालू होता माझ्या अल्पमतीप्रमाणे.

जणू मँडारिनसारखी पूर्णच वेगळी भाषा शिकताना होईल तसला तरी ताण आजिबातच दिसला नाही.

मी कुठेही न लिहिलेल्या गोष्टी मला आणून चिकटवण्याचा अट्टाहास कळला नाही. मँडरीनसारखा ताण येतो असं मी कुठे क्लेम केलंय का?

आणि म्हटलं समजा कोंकणीची बोली तर तेवढ्यामुळं फरक काय पडणारे?

माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचावा अशी सल्लावजा विनंती. बर्‍याच गोष्टी अज्यूम करुन तुझे प्रतिवाद चालू आहेत. मी सरळ सरळ म्हटलंय की कोणत्याही बोलीला 'ही या भाषेची बोली' असं म्हणायलाच माझा विरोध आहे. मराठीची बोली नाही म्हणजे मी त्याला कोंकणीचीच बोली म्हटलं हे आततायीपणे का मानून घ्यायचं आपलं आपणच?

त्याला कै अर्थ नाही.

तुझ्याइतका काही माझा भाषाशास्त्र, कोंकणी इत्यादींचा अभ्यास नसल्यामुळे ठीक आहे तर!

:)

माझा साधा सरळ सवाल इतकाच होता की कोकणीला मराठीची बोली म्हणणे वा न म्हणणे याचा त्या बोलीच्या सर्व्हायव्हलशी कितपत संबंध आहे? कोकणीभाषक प्रदेश महाराष्ट्रात आहे तोवर तत्रस्थांच्या भाषेवर मराठीचा प्रभाव हा पडतच राहणार. बरं, हे आजच घडत नसून गेली शेकडो वर्षे घडते आहे.

कोकणीला मराठीची बोली म्हटल्याने कोकणी टिकणार नाही वगैरे सूर दिसला तो चुकीचा आहे असे वाटले म्हणून हा प्रतिसादप्रपंच. कोकणीला

-मराठीची बोली
-कोंकणीची बोली
-एक स्वतंत्र भाषा

असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. भाषिक फरकांमुळे मराठीची बोली असे कोकणीला म्हणू नये हा मुद्दा मला मान्य आहे त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले दिसते. ते एक असो. मुख्य मुद्दा असा की यापलीकडे जाऊन जर ती बोली टिकावी असे वाटत असेल तर त्या टिकण्या-न टिकण्यावरती निव्वळ भाषिक लेबलाचा फरक पडणार नाही- प्रोव्हायडेड मराठी राजभाषा असलेल्या प्रदेशात हा भाग आहे तोपर्यंत.

यात अभिनिवेश कुठे दिसला तेवढे सांगावे. बाकी वाईड बॉल्स सोडून दिलेले आहेत.

पिशी अबोली's picture

2 Mar 2015 - 5:49 pm | पिशी अबोली

माझ्या कुवतीप्रमाणे मला जे उत्तर द्यायचं ते देऊन झालेलं आहे. उगाच वाद घालत बसायला मला वेळही नाही आणि वाईड बॉल कोणते याचे माझेपण काही निकष असल्यामुळे मला इथे याउपर काहीही सिद्ध करायचं नाही.

बॅटमॅन's picture

2 Mar 2015 - 5:53 pm | बॅटमॅन

उत्तर = अनुत्तर हे समीकरण दिसल्यावर आपण तरी काय बोलणार म्हणा. चालूद्यात औटसैड द ऑफस्टंप.

रत्नागिरीत लोक कोकणी अगदी जुजबी बोलत असतील अस्लेच तर. मला थोडं कुणी सांगावं म्हणून विचारतो तर सगळेच म्हणतात कि इक्डे कोकणी नाय कुणी बोलत , खाली राजापूर पासून पुढे बोलत असतील....

मराठीची श्रीमंती दाखवणारा हा लेख आवडला. ओळखीच्या खुणा शोधत शोधत वाचताना विशेष मजा आली. धन्यवाद!!

वेल्लाभट's picture

2 Mar 2015 - 12:49 pm | वेल्लाभट

वा ! नवीन बोली कळली.

क्या बात !

रोचक आहे.

झाडीबोलीच्या ओळखीबद्दल अनेक धन्यवाद!

अप्रतिम.. प्रथमच वाचतोय या बोली बद्दल.
धन्यवाद.

आता पर्यंत आपल्या जवळ असणारे असंख्य प्राणी असतात, पण आपल्याला ते पहिल्यांदाच माहीती होतात तेंव्हा जे कुतुहुल असते तसेच
आपल्या आजुबाजुला असणार्‍या या बोली भाषेबद्दल वाटते आहे.

आनखिन लिखान आल्यास आवर्जुन वाचले जाईन या बद्दल

नविनच माहिती कळली ,ती पण रोचक स्वरुपात.धन्यवाद.