शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते. खरे तर एखादी शाल ओढून आपले स्टेशन येईपर्यंत मस्तपैकी ताणून द्यावी अशी ती थंडी, पण तीच शाल नसली की झोपही लागू नये अशी ती थंडी. एका शालेची कमतरता गुलाबी आणि बोचरी थंडीतील फरक उघड करून जात होती. पण तसाही माझ्याकडे झोपण्याचा पर्याय नव्हताच. मध्ये काही कामासाठी पाचच मिनिटांसाठी का होईना वाशी स्टेशनला उतरायचे होते.
वाशी स्टेशन ! शनिवार असो वा रविवार, गरमी असो वा थंडी, एक गजबजलेला परीसर ! पण स्टेशनबाहेरचा भलामोठा पटांगणासारखा आवार त्याच वेळी तितकाच मोकळा वाटणारा. स्टेशनबाहेर पडल्यावर समोरच्या रिक्षा वा बस स्टॅंड पर्यंत जाईस्तोवर याच मोकळ्या पटांगणातून थंडीशी लढत जायचे होते. पण जायचेच होते. माझे काम तिथेच होते. पाचच मिनिटांचे काम, पाचच मिनिटांत उरकले. आता पुन्हा त्या पटांगणातूनच परतायचे होते. पण त्याआधी शरीराला काहीतरी रसद पुरवणे गरजेचे समजले.
हि तेथील आणखी एक तुफान गर्दीची जागा. रिक्षास्टॅडला लागूनच. कित्येक चहा वडा सामोश्याच्या टपर्या. झालेच तर ऑमलेट अन भुर्जीपाव. चायनीज वा मसाला डोसे खायचे असल्यास त्याचीही सोय. उभे राहणे जीवावर आले असल्यास बसण्याजोगे ओपन रेस्टॉरंटस. जे सभोवतालच्या मॉल्सच्या फूडकोर्टमध्ये मिळते ते थोड्याफार फरकाने इथेही उपलब्ध. एक गर्दीची टपरी मी देखील पकडली. भूक अशी नव्हतीच, किंबहुना काहीतरी गरमागरम तोंडात पडावे एवढीच इच्छा. इथे चहाला पर्याय नसतो. वाफाळलेली गरमागरम कटींग चहा. सोबत वडापाव नुसता तोंडी लावण्यापुरता. पण मला त्याचीही गरज नव्हती. तरीही सवयीने सर्वांच्या किंमतीवर नजर टाकली. अन अखेर बोर्डाच्या तळाशी ठळक खडूने लिहिलेल्या चहापाशी येऊन स्थिरावली. ठळक खडू, म्हणजे किंमत नुकतीच वाढवलेली दिसत होती.. कटींग चहा - ६ रुपये.. फुल्ल चहा - १० रुपये..
आजूबाजुला दिसणार्या चहाच्या गिलासांवर नजर टाकली तर कटींग चहाला छोटा ग्लास तर फुल्ल चहाला मोठा. छोट्या ग्लासाचा आकार दोन बोटांच्या चिमटीत लपून जावा इतपत. कधी दोन घोटांत संपून जावी समजू नये. घरी असताना बरेचदा यापेक्षा जास्त चहा मी आज मूड नाही, जात नाही, म्हणत मोरीत ओततो. तेवढी चहा आज बाहेर सहा रुपये झालीय हे समजले. नाहीतर मी अजूनही कॉलेजला मिळणार्या दोन रुपये कटींगच्याच विश्वात होतो.
फुल्ल चहा घ्यायचे ठरवून पाकीटातले दहा रुपये काढायला हात बाहेर काढले, जे एवढावेळ जीन्सच्या पुढच्या खिशात खोचले होते. अन पुन्हा त्यांना गार वारा झोंबला तसे कधी एकदा पटकन पैसे ढिले करून चहा घेतोय असे झाले. पण चहा होता खरा दहा रुपये वसूल करणारा, हे त्याला हातांत घेताच समजले. दोन्ही हातांना एक छानसा चटका बसला. काठोकाठ भरलेला तो गरम काचेचा ग्लास माझ्या थंड हातांना जास्त वेळ धरवणे कठीण व्हायच्या आत खिशातून रुमाल काढून त्यात तो धरला. त्याच्या बाहेरच्या बाजूने काही चहाचे ओघळलेले डाग तर नाहीत ना याचा विचार न करता. त्या वाफाळणार्या चहाचा आस्वाद घ्यायला आता मी तयार होतो. ओठाला लावायच्या आधी मी तोंडाजवळ आणून त्यातून निघणारी वाफ नाकांत भरून घेतली. एवढावेळ प्रत्येक श्वासागणिक थंड वाराच आत शिरत होता. श्वास घेणे गरजेचेच असल्याने त्याला रोखायचीही सोय नव्हती. पण आता मात्र श्वासांमार्फत त्या चहावर दरवळणारी वाफ जितकी प्राशन करता येईल तितकी करून घेतली. पण पिण्यास एकदा सुरुवात करताच झरझर संपू लागली. शेवटचा घोट किंचित कोमटच भासला, अन अजून एक चहा प्यायची इच्छा झाली. चहापेक्षाही त्या वातावरणात अजून थोडावेळ वावरायची इच्छा होती. तेथील सिगारेटचा धूरही आज फारसा त्रासदायक न वाटता वातावरण गरमच करत होता. मूड बदलला तसे भोवतालचे जग अनुभवायची नजर बदलली. नेहमीच्या तरुणाईच्या हिरवळीला आज मफलरीचा साज चढल्याने ती वेगळ्याच रुपात खुलून आली होती. आता मी स्वताही तिचाच एक हिस्सा झालो होतो. पुनश्च लागलेल्या चहाच्या हुक्कीला न्याय द्यायला दहा रुपये जड नव्हतेच.
दुसरी चहा संपताच मात्र मी तडक तिथून निघालो. चहाने अंगात आलेल्या उबेचा इफेक्ट ओसरायच्या आधी पाऊले झपाझप उचलत. दोन्ही हात खिशांत टाकून, अंगाचे मुटकुळे करून. अन आजूबाजुला माझ्यासारख्याच अवस्थेत दिसणार्या जीवांना न्याहाळत. ईतक्यात एक नजर एका वृद्ध जोडप्यावर पडली. सदरा लेंगा अन लुगडे असा मराठमोळा पोशाख म्हणून साहजिकच वाटणारा एक आपलेपणा. एका मळलेल्या गाठोड्यात संसार बांधून एक आडोसा पकडून बसले होते. मात्र दुसर्या बाजूने येणारी वार्याची लाट थोपवायला उपाय नव्हता. याआधी कधी असे कोणाला रस्त्याच्या कडेला पाहिले नव्हते असे नाही, पण या वातावरणात.. अन या वयात.. कसे सहन करत असतील हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. लांबून पाहता कुडकुडताना दिसले नाहीत, कदाचित त्यांच्या वेदना मेल्या असाव्यात वा माझी नजर. माझा स्टेशनवर जायचा रस्ता थोडाफार त्या कडेनेच जात होता. त्यांच्यावर पडलेली नजर आता त्यांना पार केल्याशिवाय फिरवणे शक्य नव्हते. आणि म्हणूनच मी माझी पावले जरा जास्तच झपझप उचलू लागलो. त्यांना मदत न करता पुढे जातोय हि टोचणी जास्त वेळा सहन करावी लागू नये हा एकच हेतू. मदत करायची म्हटली तरी त्यांना द्यायला एखादी शाल वा चादर बरोबर नाही असे स्वताच्या सोयीने अर्थ काढत मी माझी वाट धरली. पण अखेरच्या क्षणाला, मनात काही आले आणि थोडीशी वाट वाकडी करून त्यांच्यासमोर दहा रुपयांची नोट सरकवून पुढे गेलो..
ते तिथे भीक मागायला बसले होते की नाही हे माहीत नव्हते. त्यांना मदतीची गरज होती की नव्हती हे ही माहीत नव्हते. अन असली तरी काय येणार होते त्या दहा रुपयांत.. दोघांत एक फुल्ल चहा.. की वाफाळलेली एकेक कटींग. पोटाची आग त्यापेक्षा जास्त असल्यास कदाचित त्या दहा रुपयांत एखादा वडापावच घेतला गेला असता. अन तो ही कदाचित थंडगार.. पण मला मात्र एवढा विचार करायची गरज नव्हती. माझे काम झाले होते, मला समाधान मिळाले होते. आता मनाला कोणतीही टाचणी लागणार नव्हती. पण जर तेच दहा रुपये सरकवले नसले तर कदाचित रात्री झोपताना मला चादरीतून ऊब मिळाली नसती. स्साला कुणाला मदत करतानाही आपण आपलाच स्वार्थ बघतो. स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदत करतो. स्वताला थंडी वाजली तरच दुसर्याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्याच्या पोटाची आग कळते. ती सरकवलेली दहा रुपयांची नोट म्हणजे माझी स्वतासाठीच एक वाफाळलेली गरमागरम कटींग चहा होती, जी मला स्वतालाच उब मिळावी म्हणून खर्च केली होते. बाकी मुंबई म्हटले की बस्स चार दिवसांची थंडी.. त्यानंतर ना मला थंडी वाजणार होती ना कोणाला वाजतेय याची मी पर्वा करणार होतो..
- तुमचा अभिषेक
प्रतिक्रिया
12 Jan 2014 - 3:56 pm | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO:
12 Jan 2014 - 3:57 pm | वडापाव
:)
अगदी अस्सेच विचार हल्ली डोक्यात घोळत असतात. आवडला अनुभव!!
12 Jan 2014 - 4:50 pm | बर्फाळलांडगा
स्वताच्या वाट्याचे सुखं उपभोगताना मनात कसलीही अपराधीपणाची भावना उपजू नये म्हणून आणि ईतपतच मदतकरणे वारंवार घडते आहे. यात बदल कसा करावा ?
13 Jan 2014 - 11:19 pm | तुमचा अभिषेक
हा बदल कसा करावा हे समजले तर मलाही कळवाल :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
12 Jan 2014 - 11:15 pm | खटपट्या
आवडलं !!!
13 Jan 2014 - 8:43 am | मुक्त विहारि
आर्थिक मदत कुणालाही करू नये...
असे माझे मत आहे.
13 Jan 2014 - 11:23 pm | तुमचा अभिषेक
हे मत आपण नक्की का कसे बनवले याचा अंदाजा नाही, पण सध्याच्या जगात आर्थिक मदतीलाच सर्वश्रेष्ठ मदत समजले जाते हे हि एक आहेच.. :)
13 Jan 2014 - 10:28 am | प्रभाकर पेठकर
एक अनुभव चांगल्या पद्धतीने मांडला आहे.
>>>>स्वताला थंडी वाजली तरच दुसर्याच्या थंडीची जाणीव होते, स्वताला भूक लागली तरच दुसर्याच्या पोटाची आग कळते.
ह्यालाच संवेदना असे म्हणतात. 'संवेदना' म्हणजे 'सम वेदना' दुसर्याला होणारी वेदना आपल्यालाच होते आहे असा विचार करणे. अशा वृत्तीला संवेदनशीलता म्हणतात. ती फार महत्त्वाची असते. त्याच बरोबर 'स्वता' नाही 'स्वतः'.
बाकी कांही प्रश्न पडलेतः
>>>> हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने
हा थंडीचा प्रताप म्हणून डबा रिकामा होता की डबा रिकामा असल्याने..असा स्वच्छ मराठी शब्दप्रयोग का नाही? हिन्दी आणि इंग्रजी भाषेच्या मराठीवरील आक्रमणाला आपणच हातभार का लावावा?
>>>>स्टेशनबाहेरचा भलामोठा पटांगणासारखा आवार....
'तो' आवार की 'ते' आवार????
>>>>वाफाळलेली गरमागरम कटींग चहा.
'ती' चहा की 'तो' चहा?
>>>>चहा होता खरा दहा रुपये वसूल करणारा,
जर चहा 'ती' असेल तर इथे 'तो' कशासाठी?
13 Jan 2014 - 12:35 pm | विटेकर
श्री. पेठ्कर काकांशी सहमत !
पण चहा मात्र उभयलिगी आहे ( " ते" उभयलिंग नव्हे.. दोन्ही लिगी असणारे ) स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी ही !
पुण्यातला " तो " चहा , मुंबईला ती " चाय " होतो हा स्वानुभव आहे !
13 Jan 2014 - 5:54 pm | आदिजोशी
ती चाय होते. ती चहा होत नाही.
जन्मापासून मुंबईकर,
आदि जोशी
13 Jan 2014 - 8:20 pm | मी-सौरभ
हाच तो नवी मूम्बई ईफेक्ट आसेल काय?
13 Jan 2014 - 8:36 pm | प्रभाकर पेठकर
>>>>पुण्यातला " तो " चहा , मुंबईला ती " चाय " होतो हा स्वानुभव आहे !
माझा अनुभव उलटा आहे. मुंबईत तो चहा म्हणतात पुण्यात ती चहा. मुंबईत, चहा प्यायलो म्हणतात तर पुण्यात सर्रास चहा पिली म्हणतात.
मुंबईतही विशिष्ट जाती जमातीत आणि चाळ संस्कृतीत ब्राह्मणेतरांमध्ये असा शब्दप्रयोग केला जातो. तर पुण्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर सर्वच जणं चहा पिली म्हणतात.
14 Jan 2014 - 1:35 am | संजय क्षीरसागर
कुठल्या पुण्यात ऐकलंय हे?
पुण्यात हमखास `तो चहा' आणि `चहा प्यायलो' असंच म्हणतात
14 Jan 2014 - 3:05 am | प्रभाकर पेठकर
>>>>कुठल्या पुण्यात ऐकलंय हे?
अशी किती पुणी ठाऊक आहेत तुम्हाला? यादी द्या त्यात असेल तर 'सिलेक्ट' करून सांगतो.
14 Jan 2014 - 8:52 am | ज्ञानव
प्रतिसाद....
चहा उभयलिंगी आहे?....हा शोध पुणेकरांचाच...आणि पुणेकरांचे व्याकरण हा शोधाचा विषय.
(बाकी लाख लोकांत पुणेकर ओळखणे सहज जमते )
14 Jan 2014 - 11:08 am | संजय क्षीरसागर
हा शोध तुम्ही कुठून लावला?
पुण्याची मराठी ही प्रमाण मराठी आहे अशी सार्वत्रिक मान्यता आहे. तुम्ही मानता की नाही हा तुमचा प्रश्न.
संपूर्ण सहमत, कारण त्याला `किती पुणी आहेत' वगैरे प्रश्नच पडत नाहीत!
14 Jan 2014 - 11:12 am | प्रभाकर पेठकर
>>>>कारण त्याला `किती पुणी आहेत' वगैरे प्रश्नच पडत नाहीत!
पण 'कुठल्या पुण्यात?' असले तद्दन बालसुलभ प्रश्न त्याला पडतात.
14 Jan 2014 - 11:38 am | ज्ञानव
दुर्दैवाने हि सार्वत्रिक मान्यता पुणे हद्दीच्या बाहेर जात नाही.
हा उपरोध ही कौतुकाने घेणे "म्हणले" पुणेकरांनाच "ठऊकय "
14 Jan 2014 - 11:36 am | विटेकर
अहो ते कंसातील वाचा हो , वाचण्यासाठी लिहिल्यं ते !
(" ते" उभयलिंग नव्हे.. दोन्ही लिगी असणारे ....)
.
.
.
.
.
अक्षरें गाळून वाची| कां तें घाली पदरिचीं |नीघा न करी पुस्तकाची| तो येक मूर्ख ||२-१-७०|
14 Jan 2014 - 11:40 am | ज्ञानव
ह.घ्या.
पुणेकरांवर नितांत प्रेम आहे माझे...पण....
14 Jan 2014 - 11:28 am | विटेकर
"रोज-मरा" या शब्दात फक्त रोज हा शब्द नाही , दैनंदिन शब्द फक्त रोज हाच अर्थ ध्वनित करतो.. रोज- मरा या शब्दात जे दैन्य आहे ( रोजच्या मरणातले ) ते दैनंदिन शब्दात ध्वनित होत नाही ! " दैन्य्-दिन" असा म्रराठी शब्द नाही अन्यथा त्यातून अर्थ सूचित होऊ शकतो.
16 Jan 2014 - 12:03 pm | प्रभाकर पेठकर
'रोजमर्रा' असा शब्द आहे त्याचा शब्दकोषिय अर्थ 'दैनंदिन' असाच दिला आहे. संदर्भासाठी इथे पाहा.
'रोजमरी' हा, 'रोझमरी' ह्या काँटिनेंटल मसाल्यातील सुगंधी पानांच्या, नांवाचा भ्रष्ट उच्चार होऊ शकतो.
14 Jan 2014 - 1:37 pm | मैत्र
२५-३० वर्षात पुण्यात एकदाही चहा पिली असा शब्द प्रयोग ऐकलेला नाही.
पेठांमध्ये नाही, परंपरागत घरात नाही, बर्या वाईट अमृततुल्यांमध्येही नाही, नवीन उपनगरांमध्येही नाही.
चहा घेतला असाच शब्द प्रयोग केला जातो.
सर्रास चहा पिली असं म्हणतात हे तर १००% खरं नाही.
यात पुणेरीपणा आणि तथाकथित जाज्वल्य अभिमान वगैरे काही नाही. जो अनुभव आहे तो आहे.
कुठल्या विशिष्ट ठिकाणि नियमित पणे ऐकला असल्यास जरूर सांगा, जाऊन खात्री करण्याचा प्रयत्न करेन.
किती पुणी आहेत वगैरे वाद जे खाली चालू आहेत त्यात पडण्याची बिलकूल इच्छा नाही. त्यावर प्रतिसादही दिला जाणार नाही.
14 Jan 2014 - 1:56 pm | गवि
"चहा पिली" आणि "चहा प्यायला" यापैकी कोणतेही वाक्य मी पुण्यात ऐकलेले नाही.
माझ्या तेथील वास्तव्यात फक्त "चहा पाज" हेच वाक्य ऐकलेले आहे.
14 Jan 2014 - 1:58 pm | मैत्र
पाय काढून ठेवा.. दर्शन घ्यायचं आहे
--/\--
14 Jan 2014 - 1:59 pm | विटेकर
माझ्या तेथील वास्तव्यात फक्त "चहा पाज" हेच वाक्य ऐकलेले आहेहे सत्याच्या अधिक जवळ जाणारे आहे !
14 Jan 2014 - 2:02 pm | अभ्या..
सत्य मात्र नुसते "पाज" एवढेच आहे. ;-)
14 Jan 2014 - 2:07 pm | प्यारे१
>>> चहा पाज.
हाताला नुकतीच मेंदी लावलेली असल्यास असं फर्मान येऊ शकते!
गविं ना पुण्यात असे विविध अनुभव वारंवार आले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
मित्राद्वारे चहा पाज असं वाक्य ऐकल्यावर शांतपणे 'मी पाजतो तू पैसे दे' असे म्हटल्याशिवाय पुणेकर म्हणवून घेऊ नये.
-सरळ विचारकर्ता प्यारे ;)
14 Jan 2014 - 2:30 pm | विटेकर
विविध अनुभव मेंदी लावण्याचे की चहा पाज म्हणून घेण्याचे ?
काहीही असू शकेल नाही का ? ... पुरुषस्य भाग्यं... यापेक्षा अधिक काय बोलू?
(संभ्रमित)
14 Jan 2014 - 2:38 pm | गवि
केसांना मेंदी लावण्याच्या वयातल्या मनुष्याबद्दल कायकाय कल्पना करतात लोक.. ;)
अहो मेंदीचा काही संबंध नाही. तो प्यारे बोलतो आणि तुम्ही ऐकता..
14 Jan 2014 - 10:39 pm | अजया
=))
14 Jan 2014 - 4:53 pm | प्रभाकर पेठकर
श्री. मैत्र,
माझा मूळ प्रतिसाद हा श्री. विटेकर ह्यांच्या 'स्वानुभव' मांडणार्या प्रतिसादाला उद्देशून होता. त्यांच्या अनुभवाला मी आव्हान दिलेले नाही तर माझा अनुभव मांडला आहे. त्यातही मुंबई आणि पुण्यात वेगवेगळ्या परिस्थितीत आणि जमातीत दोन्ही शब्दप्रयोग ऐकले आहेत असे म्हंटले आहे. म्हणजेच त्यांचे मत, स्वानुभव अंशतः स्विकारला आहे.
आता सर्रास शब्दाबद्दल.
माझ्या नात्यात आणि मित्रांमध्ये मी 'चहा पिली' हा शब्दप्रयोग सर्रास ऐकला आहे. मी कधीच पुण्यात सलग अनेक वर्षे (४-५च्या वर) राहिलेलो नाही पण पुणे शहराशी आणि अनेक माणसांशी माझा गेल्या ६० वर्षात अनेकदा संबंध आला आहे. पूर्वीच्या काळी हा शब्द मीही कधी ऐकला नव्हता. पण हल्ली (गेल्या १०-१५ वर्षात) हा शब्दप्रयोग मी वर उल्लेखिलेल्या व्यक्तींकडून अगदी अनेकदा ऐकला आहे. असो.
जसा श्री. विटेकरांचा अनुभव तसाच माझा ही अनुभवच. पण म्हणजे सर्व इतरांनाही तोच अनुभव यावा असा माझा आग्रह नाही. तुमचा अनुभव माझ्यापेक्षा वेगळा असू शकतो.
तुम्हाला नसेल पटला तर सोडून द्या. असेही, आपल्याला न पटणारे अनेक मुद्दे येतच असतात. अगदी सर्वांनी हिरीरीने विरोध केला तरीही माझेच खरे, मीच सर्वद्यानी, तुमच्या भल्यासाठीच माझा जन्म आहे असे भासविणारे कित्येक पोकळ मुद्दे मांडणारे कांही महाभाग आहेत. त्यांच्याकडे जसे आपण दुर्लक्ष करून पुढे जातो. तसेच, माझा मुद्दा पटला नसेल तर सोडून द्यावा, ही नम्र विनंती.
14 Jan 2014 - 6:06 pm | मैत्र
हा विटेकर काकांच्या प्रतिसादातून आलेला मुद्दा माझ्या लक्षात आला नव्हता.
" तर पुण्यात ब्राह्मण-ब्राह्मणेतर सर्वच जणं चहा पिली म्हणतात.
पुण्यात सर्रास चहा पिली म्हणतात. "
यातून जे एक सरसकटपणे केलेलं विधान वाटतं त्यावरच मी माझं मत मांडलं -- त्याच पद्धतीने की हा माझा अनुभव आहे. तुमचा वेगळा असेल तर कुठल्या भागात / ठिकाणी असेल तर ऐकायला उत्सुकता वाटेल.
ही वरची मूळ प्रतिसादातली दोन्ही वाक्ये पाहता -- "पुण्यात वेगवेगळ्या परिस्थितीत आणि जमातीत दोन्ही शब्दप्रयोग ऐकले आहेत असे म्हंटले आहे." असं वाटलं नाही म्हणून प्रतिवाद केला.
इत्यलम..
17 Jan 2014 - 3:46 pm | अभ्या..
चहाने मित्र मिळतात हे म्हैते पण चहाने (कसा/कशी का असेना शुध्द किंवा अशुध्द) ढिगभर प्रतिसाद पण मिळतात हे कळले. ;)
22 Jan 2014 - 12:53 pm | तुमचा अभिषेक
आपला प्रतिसाद नेहमीच आवडतो :)
13 Jan 2014 - 10:47 am | ब़जरबट्टू
मस्तच..
13 Jan 2014 - 11:34 am | सूड
तुम्हाला 'वाफाळलेला कटिंग चहा' म्हणायचंय का?
13 Jan 2014 - 12:26 pm | तुषार काळभोर
शीर्षक अन् दुसरं वाक्यः
हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही.
याच्यात अंमळ वेळ गेला.
(होय.. आमची टुपलाईट जरा उशीरा पेटते.)
बाकी वाचतो आता...
13 Jan 2014 - 12:32 pm | विटेकर
उत्तम अनुभव !
ही संवेदना मरु देऊ नका .. रोजमरी ( पेठकर काका.. मराठी शब्द ?) आयुष्यात आपल्या संवेदना बोथट होत जाण्यासारखा शाप नाही .. ! प्रत्येकवेळा त्यासाठी काही करायलाच हवे असे नव्हे पण त्याची "जाणीव" होणे महत्वाचे ! तसे झाले नाही तर "दु:ख माझं दु:ख माझ हुंड्या- झुंबरा" टांगलं जातं !
अर्थात त्यातही स्वार्थ आहेच .. आपल्यापेक्षा कुणीतरी अधिक दु: खी आहे हा विचारसुद्धा माणसाला नकळत सुखावून जातो....किती क्रूरपणा आहे हा !
अस्तु .. छान लिहिता तुम्ही !
13 Jan 2014 - 8:39 pm | प्रभाकर पेठकर
>>>>रोजमरी ( पेठकर काका.. मराठी शब्द ?)
तुमच्या वाक्यात 'दररोज' हाच शब्द चपखल बसतो.
रोज मरे त्याला कोण रडे? मराठीत असे म्हणतातच.
13 Jan 2014 - 9:19 pm | सूड
रोजमरी आयुष्यात= दैनंदिन(?) आयुष्यात
14 Jan 2014 - 10:57 am | प्रभाकर पेठकर
>>>>रोजमरी आयुष्यात= दैनंदिन(?) आयुष्यात
१००% सहमत.
13 Jan 2014 - 12:51 pm | अनिरुद्ध प
आवडले.
13 Jan 2014 - 8:24 pm | शुचि
तुमचे लेख खूप आवडतात .... नेहमीच. हा तर इतका आवडला. वर कोणीतरी म्हटले तसेच म्हणते ही संवेदनशीलता मरु देऊ नका शिवाय - शेअर इट!! शेअर युअर ट्रुथ!!! इट मेक्स अ दिफरन्स इन द वल्ड!!!
13 Jan 2014 - 11:27 pm | तुमचा अभिषेक
शेअर इट!! शेअर युअर ट्रुथ!!! इट मेक्स अ दिफरन्स इन द वल्ड!!! >>>> अगदी हेच अश्याच अर्थाचे काल माझी बायको हा लेख वाचल्यावर पुटपुटली होती.. प्रयत्न नेहमी हाच राहतो :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
13 Jan 2014 - 8:54 pm | सिद्धेश महजन
शॉलिड अभ्या ......
13 Jan 2014 - 11:28 pm | तुमचा अभिषेक
अबे तू आपला ऑर्कुटवरचा सिद्धेशच का?
13 Jan 2014 - 11:12 pm | रामपुरी
पहिल्या वाक्यापासून हिंदी टोचायला लागल्यामुळे दोन-चार वाक्यांपुढे जाऊ शकलो नाही.
पु.(मराठी)ले.शु.
13 Jan 2014 - 11:34 pm | तुमचा अभिषेक
मला माहीत आहे, जे लोक असे म्हणतात त्यांनी शब्दन शब्द वेचून वाचला असतो :)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, मराठी इतकेही चांगले नाही की आपसूकच फूलप्रूफ व्याकरण लिहिले जाईल, बरेचसे प्रूफरीडींगमध्ये दुरुस्त करतो. सूचना कराल तर सुधारणाही घडेल..
14 Jan 2014 - 11:45 pm | रामपुरी
मला माहीत आहे, जे लोक असे म्हणतात त्यांनी शब्दन शब्द वेचून वाचलेला असतो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, आपसूकच फूलप्रूफ व्याकरण लिहिले जाईल इतकेही मराठी चांगले नाही. बरेचसे प्रूफरीडींगमध्ये दुरुस्त करतो. सूचना कराल तर सुधारणाही घडेल...
यातील इंग्रजी शब्दाना पर्यायी शब्द आहेत पण आता कंटाळा आला.
असो... लेख पूर्ण वाचल्याशिवाय लेखात दुरूस्ती करणे शक्य नाही पण लेख वाचणं सुद्धा शक्य नाही. तस्मात पु ले शु (अर्थातच मराठी).
15 Jan 2014 - 11:50 pm | तुमचा अभिषेक
प्रतिसाद वाचत आहात, हे ही नसे थोडके.
किंबहुना याचा अर्थ प्रतिसादांमध्ये तरी मी शुद्ध व्याकरणप्रूफ मराठीत लिहितोय तर :)
16 Jan 2014 - 11:14 am | संजय क्षीरसागर
`शुद्ध व्याकरणप्रूफ' नाही *stop*
17 Jan 2014 - 3:31 pm | बॅटमॅन
कधी नव्हे ते संक्षीशी सहमत.
13 Jan 2014 - 11:32 pm | तुमचा अभिषेक
आणि हो, मराठीची बोंब आहे खरी.. लिखाणामुळे सुधारतेय हे विशेष, अन्यथा बोलायला फुल्ल टू बंबैय्याच आहे.. इथेही सांगायचे तर मी अजूनही कन्फ्यूज आहे की तो चहा की ती चहा :)
बाकी एवढे जण म्हणताहेत तर तो चहाच असेल !
14 Jan 2014 - 8:58 am | ज्ञानव
"तो चहाच" आहे.
21 Jan 2014 - 9:10 pm | पैसा
लिखाण आवडलं. पण तुमच्या लिखाणावरचा बंबय्या हिंदीचा प्रभाव कमी करायचा प्रयत्न केलात तर छान! त्यासाठी जुनी मराठी पुस्तकं वाचा.
21 Jan 2014 - 10:52 pm | तुमचा अभिषेक
कधी कधी भरभर कागदावर उतरवताना तसा विचार करत नाही. मूळ विचार ज्या बंबैय्या भाषेत येतात तीच भाषा जपली नाही तर विचारांशी प्रामाणिक राहणे होणार नाही ही त्या मागची भावना.
मात्र बरेचदा लिखाणांत शुद्ध भाषेचा बाज राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतोच. आता हे मला वैयक्तिक ओळखणार्यांनाच पटू शकेल.
खरे सांगायचे तर या लिखाणाच्या सवयीमुळे माझी नेहमीची चॅटींगची शैली सुद्धा अशी बदलली आहे की समोरचे जुने मित्र बोलतात अरे ए ते तुझ्या आता लिखाणाच्या स्टाईलमध्ये बोलू नकोस, माहिती आहे मोठा आहेस लिहिणारा, सरळ बोलायचे तर बोल, शहाणपत्ती करू नकोस वगैरे वगैरे..