मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी
आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय?
काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. !
नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा. देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर!
सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच !
असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी. पण च्यायला, एका रात्रीत जाऊन तो सिंहगडचा गाडीरस्ता खोदून यायला पाहिजे.
पाऊस चालू झाला की, लोकांमध्ये विशेतः अमराठी लोकांमध्ये काय खाज सुटते कळत नाही. सगळे निघाले उंडारायला सिंहगडावर वा भूशी तलाव. तेही एक बरेच आहे म्हणा, सगळे तिकडे गेल्याने बाकीची ठिकाणे चांगली राहतात.
हे हि असो, आपले काय त्यांच्याशीही वैर नाहीये. जाऊदे बापड्यांना, घेऊदे आनंद त्यांनाही, एका छोट्या डबक्यात १०-१५ जणांचा घोळका करून आणि डोक्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या अर्ध्या क्षेत्रफळा एवढे मोठाले गॉगल घालून एवरेस्ट सर केल्याच्या आविर्भावात फोटो काढण्याचा.
आता आपण मूळ भजी वर येऊयात म्हणजे मूळ मुद्द्यावर येऊयात.
आमचा एक मुंबई चा मित्र बरेच दिवस मागे लागलाय की सिंहगडावर जाऊयात म्हणून.
"तुझ्या घरापासून किती जवळ आहे रे ! चल जाऊन येऊ !"
त्याची ही मागणी आजपर्यंत मी नानाविध कारणे देऊन थोपवून धरली आहे.
कारण असे की, जेव्हा मी पहिल्यांदी मुंबई फिरायला गेलो तेव्हा याने मला पहिल्यांदाच 'हाजी आली' ला नेले होते. म्हणजे तो नेतच नव्हता. म्हणत होता की, "आता येशील तिथे पण "कुठे पण नेतो' म्हणून हेच आयुष्यभर ऐकवशील मला". तरीही मीच हौसेने गेलो होतो. पण ते जे काही होते ते कहर होते. त्याचे वर्णन मी आता इथे लिहितं नाही ( त्यासाठी दुसरा लेखच लिहीन, विनोद आणि अपमान एकाच लेखात नको म्हणून !)
त्यानंतर तेव्हापासून ते आजतागायत त्याला आम्ही ज्या अमाप शिव्या दिल्या आहेत, त्याची साभार परतफेड तो एकाच ट्रेक मध्ये करू शकतो. तो म्हणजे सिंहगड !
त्याने बरेच कौतुक करून म्हणजे प्लस पॉइंट सांगून मला तयार केले किल्ल्यावर जायला की मी त्याला तेवढीच स्ट्रॉंग कारणे देतो. पण जेव्हा जेव्हा कोण सिंहगडावरील भजी पिठलं आणि दही याबद्दल बोलते तेव्हा मग आमची फ़ेमस रेसिपी चालू होते. ती म्हणजे "मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी "!
कोणी पिठलं भाकरी, भजी च्या नावाने मिटक्या मारल्या तर आम्ही "ती भजी कशी बनते?" हे रसग्रहण त्याला इतके आक्रमकपणे, पूर्वग्रहदूषितपणे, विरोधात्मक पटवून देतो की तो माणूस सिंहगड जाणे रद्द करतो. त्यातही तो अजून चिकट असेल तर गडावर जातो पण भजी मात्र खात नाही.
अजून कोणी कहरच असेल तर भजीही खातो, पण मग आम्हाला त्याचा सुगावा लागू देत नाही. उदा. म्हणजे तेवढे भजीचेच फोटो वैगरे कॉम्पुटर वरून हाईंड वैगरे करणे वैगरे.
काय म्हणता, "भजीचे फोटोज"??
अहो हो, पहिल्यांदाच जो तिथे गेलेला असतो तो नुसते भजीचेच काय तर वरून प्रदूषणाने अंधुक दिसणाऱ्या खडकवासला धरणापासून ते देव टाक्यांतले अंधारातील पाणी आणि दूरदर्शन च्या टॉवर पासून ते 'या चटई वर आम्ही बसलो होतो' इथपर्यंत फोटो काढतो.
( तरीही एकदा एकाने घेतलेल्या भजी चे फोटो दाखवले होते तेव्हा त्याला मी " हि भजी जर जास्त पिवळी वाटतीये नाही? " अशी कमेंट दिली होती. त्यानंतर बरेच दिवस आमचे संभाषण बंद होते. कारण कळेल लेखाच्या शेवटी!)
असो तर ती समजुतीची वाक्ये ( भजीची रेसिपी) अशी काहीतरी असतात.
"अरे नको जायला सिंहगडावर! तो काय गड आहे का ? दुकान आहे ते शिवकालीन इतिहासाचे!
"नाही रे चल मला जायचे आहे रे खूप दिवसापासून. "
"अरे मग दुसरीकडे जाऊ ना , राजगड चल बेस्ट आहे. "
"नको रे तो हेक्टिक होईल हा निवांत आहे. प्लस जेवणाचीही सोय होईल. "
"अ पळ हा, तिथे एकतर जायचेच नाहीये आणि वरती जेवायचे बिवायचे तर अजिबातच नाहीये. "
"मला भजी आणि पिठले भाकरी खायचीये तिकडची"
"अरे गंडला आहे का तू, किल्ल्यावर जाऊन कसली भजी वैगरे खातोस? घरी कधी भाकरी खात नाहीस!"
"अरे तिकडची 'भारी ssssssss' असते म्हणे. "
( आता आमची गाडी मेन गियर वर येते. पण जरा वेगळ्या वळणाने जाते. )
"कसली भारी असते? काही भारी बिरी नसते.
पण एक खरे आहे. ती विकणारी लोक हि तिथेच गावात राहणारी लोक आहेत. गरीब बिचारी! खूप कष्ट करतात रे ती ! रोज सकाळी लागणारा शिधा गोळा करायचा. तो गावातून वाण्याकडून घरी आणून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तब्बल तीन तास गड चढून वर जायचे ते पण सामान घेऊन. अरेरे किती कष्ट !
नुसते एकटे नाही तर कुटुंबासहित वरती यायचे. बाया योग्य जागी 'चूल' आणि अयोग्य जागी 'मूल' मांडून ठेवतात. तर बापडे गडाच्या प्रवेशद्वाराशीच सावज टिपत असतात. तू त्यांच्याकडे नुसते बघून भूतदयेने हसलास जरी, तरी तू त्यांचा(च) 'गिऱ्हाईक'(च) होऊन(च) जातोस(च). मग तुला नो ऑप्शन. तुला त्यांच्याकडे नसले खायची भजी तरी गप्प गुमाने खायला लागणारच."
"असू दे की मी नाही म्हणेन त्यांना !"
"नाही, मग तू ज्यांच्याकडे भजी खाशील त्यांच्या 'भज्या' म्हणजे त्यांनी बनवलेल्या 'भज्या' तुझ्या तोंडात असतानाच त्यांच्याशी ती पहिली बाई आणि बापडा इतकी सुमधुर भांडणे करतील की ज्याने तुझी मराठी भाषा अजून प्रगल्भ तर होईलच. पण भजी तोंडात असल्याने तू एक अवाक्षर बोलू शकणार नाहीस.आणि हे प्रकरण इथे न संपता तुला त्या पहिल्या बाई कडे 'सर्दी झाली असली तरी' वा 'पाऊस असला तरी' कमीत कमी 'दही' नामक पाणी तरी प्यायलाच लागेल."
"असू दे रे, चालायचेच!. कोणाकडे तरी खायचीच आहे भजी. कोणाला तरी द्यायचेच आहेत न पैसे मग पहिलीलाच देऊ. काय फरक पडतोय. "
एवढा चिकट माणूस असला तरी त्या समोर पराभूत झालो तर पुणेकर कसले? मग पराभवाचे सूतोवाच होऊ लागले की हुकमी अस्त्र बाहेर काढतो.
"नाही रे चांगली नसते तिच्याकडची भजी म्हणूनच ती गिऱ्हाईक भांडून मिळवते ना. हे बघ ती सकाळी उठून किल्ला चढून येते. माहीत पण नाही अंघोळ वैगरे केलीये का नाही. घाईने येते म्हणून स्वयंपाक करताना आवरते केस वैगरे ! ते जाऊदे !
खालून येताना फक्त शिधाच आणते म्हणजे भांडी इथेच असतात पर्मनंट, कधी धूत असेल ती काय माहीत?
तिच्याकडे फक्त १ पातेले, १ जग आणि ४-५ प्लेट्स आणि पेले असतात. ज्या पातेल्यात ती तुझे पिठले करते त्यातच ती दुसऱ्यांचे पिठले करते. भाकरी सांगितलीस तर पीठही त्यातच मळते. हात धुतले असतीलच याची खात्री नाही. हे पण जाऊदे !
कोणी नॉन व्हेज सांगितले तर अंडीही त्या पातेलीतच फोडते. याउप्पर कोंबडी हि त्यातच कापते. ज्याने कोंबडी कापते त्यानेच कांदे, बटाटे कापते. म्हणूनच भजी थोडीशी लालसर असते. हे ही असो.
ज्या 'जगात' तुला पाणी देते त्यातच सरबत करते, ताक करते. तोच काहीजण तोंड लावून पितात. एकानी तर त्या 'जगा'मध्ये बेडूक पकडून आणला होता एकदा. तर काही तंबाखू खाल्लेली माणसे तोच 'जग' घेऊन गुळण्या करतात. काही तर त्यानेच तोंड धुतात.
यातच कहर म्हणजे जर 'जगा'च्या मालकांना निसर्गाची हाक आली तर तोच जग घेऊन .............. !"
"हरामखोरा, गप्प बस आता ! नाही न्यायचेय तर नको नेऊस ! पण तोंड बंद कर !"
या त्याच्या उत्स्फूर्त दादेने सिंहगडावर जायचा विषय त्याच्यापुरता तरी कायमचा संपतो!
प्रतिक्रिया
2 Dec 2013 - 6:36 pm | राही
लेख आवडला. ' चे कंस भारी आहेत.
2 Dec 2013 - 6:49 pm | मृत्युन्जय
सगळा लेख दोनदा वाचुन काढला. आता एकदा गडावर जाउन मनसोक्त भजी खाउन आले पाहिजे. गडावरच्या भजीची चव नाही कशालाच.
2 Dec 2013 - 7:16 pm | अनिरुद्ध प
'पुणेरी पुणेकर' ही व्युत्पत्ती मात्र खरी आहे हे,मात्र या धाग्याने प्रकर्षाने जाणवले.
2 Dec 2013 - 8:01 pm | राजेंद्र मेहेंदळे
कालच जाउन पिठले-भाकरी हाणली ब्वॉ...आता भैय्यांच्या हातची पाणीपुरी खाउन पोट immune झालेय त्याला काय करणार
2 Dec 2013 - 9:33 pm | तुमचा अभिषेक
खूप मागे आणि एकदाच सिंहगडावर जाणे झाले होते, तेथील पिठले-भाकरी आणि भज्यांचे कौतुक ऐकून होतो, पण काही खास वाटणे तर दूर, फारशी आवडलीही नाही, दमल्याभागल्याने पोटभर खाणे झाले एवढेच. मित्राने त्या अन्नदात्याला काहीही खाऊ घातलेस का बे म्हणून आरडाओरडा केला, तर तो म्हणाला की काय करणारे भाऊ इथे गडावर सोय करायचे म्हटल्यास हेच मिळणार..
असो, पण त्यानंतर देखील बरेच जणांकडून कौतुक ऐकतच होतो, त्यावरून मला वाटायचे की कदाचित आम्हीच चुकीच्या माणसाचे गिर्हाईक झालो असू....
आणि आज हा लेख..
2 Dec 2013 - 10:50 pm | किसन शिंदे
या वल्ल्याने नेलं होतं ब्वॉ त्या देवटाक्यापाशी भजी खायला आणि बर्यापैकी बरीही लागली होती, बाकी मग ती कशीही का बनवली असोत. :)
3 Dec 2013 - 2:10 am | प्रभाकर पेठकर
सिंहगडावरील झुणका भाकर, कांदा भजी, मडक्यातील दही (फार महाग विकतात) इ.इ.इ. माझे विक पॉईंट आहेत.
स्वच्छतेबाबत तक्रार करण्यासारख्या आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, जसे पाणीपुरीच्या पुर्या (पर्वती खालील झोपडपट्टी), तांदूळाच्या पिठाच्या तळलेल्या नळ्या (कुर्ला झोपडपट्टी), शाळेबाहेर विकला जाणारा पेप्सीकोला नामक चोखण्याचा पदार्थ (दहिसर झोपडपट्टी), बोरीवली ते गोरेगाव पर्यंतच्या अनेक पाणीपुरी (फुटपाथवरील) विक्रेत्यांकडील पाण्याचे सँपल्स घेऊन माझ्या मायक्रोबॉयॉलॉजिस्ट भाचीने प्रयोगशाळेत तपासले असता (तो त्यांचा प्रोजेक्ट होता) ९९% टक्के सँपल्स ही 'अशुद्ध' आणि 'न पिण्यायोग्य' अशीच होती.
3 Dec 2013 - 10:42 am | सुहासदवन
राहिलेला १% कोणत्या पाणीपुरीवाल्याचा होता, काही विदा असेलच.
त्याच्याकडेच जायला पाहिजे पाणीपुरी खायला. निदान त्याला काही बक्षिस तरी मिळायला हवे.
3 Dec 2013 - 4:40 pm | राजेंद्र मेहेंदळे
आमच्या घराजवळ आहे एक भेळवाला..."पाणीपुरीसाठी बिस्लेरीचे पाणी वापरतो" अशी पाटी लावलीये बुवा दुकानाबाहेर
पण लोक म्हणतात थोडी घाण अॅड केल्याशिवाय चव येत नाही म्हणे..किमानपक्षी अस्वच्छ हात त्या पाण्यात बुचकळणे वगैरे
3 Dec 2013 - 5:49 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!! पानवाल्याचा पाने पुसायचा फडका जितका कळकट तितके पान रंगते आणि त्यात चौपाटीवरच्या भेळेची चव येते असे पुलंनीच एके ठिकाणी म्हणून ठेवले आहे =))
3 Dec 2013 - 4:56 pm | ऋषिकेश
अर्र इतक्या (साध्या) कारणाने ते सिंहगडावर जाणे क्यान्सल करतात!!!!!!
हातेज्या काय पण ती नाजूक जन्ता! ;)
5 Dec 2013 - 1:15 am | अग्निकोल्हा
मग भजी अप्रतिमच असणार!
5 Dec 2013 - 7:14 am | वेल्लाभट
क्लास !
5 Dec 2013 - 8:49 am | आनंदराव
अछा, तरीच ....
दुसर्या दिवसाची सकाल अविस्मरनीय होती.
5 Dec 2013 - 1:00 pm | कंजूस
मागणी तसा पुरवठा आणि भाव इकडेही लागू होतो .
कोणी जर प्लास्टीक मोजे हातात घालून ,
फक्त चमचे ,पेपर नैपकिन ,
कागदाच्या प्लेटस् वापरून
दुप्पट दराने भजी देऊ लागला तरीही त्याच्याकडेच गिऱ्हाईक जाऊ लागले तर इतरजणही ती पध्दत आणतील .
परंतु तसे पुण्याच्या सिंहगडावर होणार नाही .
6 Dec 2013 - 5:52 pm | पैसा
मस्त लिहिलंय! ट्रेकर्सच्या बाकी जमाती आणि सवयींबद्दलही लिहा!