भटका कुत्रा
.
पाळीव प्राण्यांचा विषय निघाला की आमच्या चंपीची आणि तिच्या पिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.. वेळी मी ५-६ वर्षांची असेन. आमच्या घरा समोरच्या उमराच्या झाडाखाली चंपीने भला मोठा गुहेसारखा खड्डा खणला होता. [ कुत्री स्वतःसाठी गुहा बनवतात का? माहीत नाही! परत कधी कोणत्याच कुत्रीने घर बांधताना पाहील किंवा ऐकलं नाही. ] चंपीने मात्र तिच घर उभारताना आम्हाला पाहायला मिळाल. तिला पिल्ल होणार होती.. आम्ही सगळी बच्चे कंपनी खूप आतुरतेनं त्या येऊ घातलेल्या सवंगड्यांची वाट बघत होतो..
रोज उठल्या पासून शाळेत जाण्या आधी प्रत्येक जण चंपीच्या घरात डोकावून यायचा काही दिवस अशा खेपा मारल्यावर एका दिवशी आम्हाला चंपीच्या वेटोळ्यातली ती इवलाली पिल्ल दिसली.. सगळीच्या सगळी काळी कुट्ट.. चंपी सारखं दिसणार त्यात एकही नव्हत. चंपीचा रंग कसा पांढरा शुभ्र एकही डाग नसलेला, तिचे डोळेही अतिशय सुरेख पाणीदार होते. [ फक्त गायींचेच डोळे पाणीदार असतात अस थोडंच आहे. ] आणि कान तर अगदी हरणी सारखे!.. चंपी अगदी मोगली मधल्या चमेली सारखी दिसायची मायाळू कारुण्य मूर्ती प्रेमळ आई. ही सगळी पिल्ल मात्र उंदराच्या पिलांसारखी काळी कु़ळकुळीत होती. आणि चंपीच्या वेटोळ्यातून नीट दिसत ही नव्हती, की किती पिल्ल आहेत तेही कळत नव्हत. पुढचे दहाबारा दिवस घराभोवती चंपीचा सक्त पहारा होता.. ती कुणालाच घराच्या आजू-बाजूलाही फिरकूदेत नव्हती. त्या शनीवारी शाळेतून आल्यावर तर आम्ही साडेसाती पाठी लागल्या प्रमाणे तिला हैराण करून सोडले.. ती पठ्ठी ही खिंड लढवत राहिली.. आमच्या बालसेने पुढे मात्र तिचा निभाव लागला नाही. तिला थोडावेळ खाण्यापिण्यासाठी तिच घर सोडणं भाग होत. आम्ही त्याच वेळेची वाट बघत जवळच खेळत होतो. सगळं लक्ष्य होत ते चंपीच्या पिल्लांकड. चंपी अंग झटकत उठली.. आमचे कान उभे, हालचाली स्तब्ध.. रोखलेला श्वास, आम्हाला आता ही संधी घालवायची नव्हती.. चंपी दूर दिसेनाशी होई पर्यंत आम्ही चिडीचूप.. आणि मग ज्या काही उड्या मारल्या की काय विचारता! आमच्या इतक्क्या दिवसांच्या प्रतीक्षेला यश आला होत, आता आम्ही चंपीची पिल्ल पाहू शकणार होतो! हूर्रे..
चंपीला एकूण ९ बाळे झाली होती. त्यातली आठ काळी कुळकुळीत, आणि एकच तांबूस तपकिरी रंगाच त्या सगळ्यांहून वेगळं दिसणार.. या पिलाचं आणखीनं एक वैशिष्ट्य म्हणजे.. ते या इतर पिल्लां पेक्षा चांगलाच धष्टपुष्ट होत. त्यामुळे ते तेव्हाच आम्हा सगळ्यांच्या नजरेत भरला.
प्रत्येकाच्या आईने पिल्लांना हात न लावण्या बद्दल कित्येकदा बजावल्या मुळे त्या दिवशी पिल्लांना उचलून घ्यायचा मोह आवरून धरला.. पिल्ल डोळेभरून बघून झाल्यावर कोणाला तरी चंपी आता कोणत्याही क्षणी परतेल याची जाणीव झाली.. तसंही आता आपापल्या घरी पिल्लांच्या खुशालीची बातमी पोहचवण्याच खूप खूप महत्त्वाचं काम प्रत्येकाला लवकरात लवकर पूर्णं करायचं होत त्यामुळे तेव्हाचा कौतुक सोहळा आवरता घेऊन आम्ही आपापल्या घरी पळालो..
खरंतर चंपीने उंबराखाली खड्डा खणायला सुरुवात केल्या पासून आमच्या बोलण्यातला तोच मुख्य विषय होता, आणि आता तर काय विचारता.. पिल्ल पिल्ल आणि पिल्ल या पलीकडे कोणी हाहीच बोलत नव्हत. आता चंपीला तिच्या खाण्यासाठी जागा सोडून जावं लागत नव्हत.. एखाद्या बाळंतिणीची कोण काय काळजी घेईल आशी आम्ही चंपीची काळजी घेत होतो. त्यामुळे आता तिही जरा निवळली, आता ति आम्हाला तिच्या घराजवळ जाण्यापासून रोखत नव्हती, आमच्या वर भंकून आमची त्रेधा तिरपीट करीत नव्हती.. तरी अजून ही तिच्या समोर तिच्या पिल्लांना हात लावण्याची हिंमत काही आम्ही केली नाही. हां आता ति नसताना त्या भुऱ्या पिल्लाला उचलून घेण्यावरून आम्ही हमरी-तुमरीवरही यायचो.
आता या पिल्लांचं बारसं करण्याची जवाबदारी आमच्यावर होती.. आता बाकी पिल्लांना ठेवलेली नाव आठवत नाहीत पण त्या तपकिरी रंगाच्या पिल्लाला आम्ही मोती म्हणू लागलो.. [त्याचे नाव मोतीच का आणि कुणी ठेवले ते काही आता मला आठवत नाही. म्हणजे त्यावर फारशी हमरी तुमरी न होता ते निवडलं गेलं असावं. ] मोत्या जन्मा पासूनच चांगलाच दणकट होता आता तर त्याला उचलणेही आम्हाला अवघड वाटायचे.. आणि मोत्याचे भाईबंध ते कधी कुठे गेले ते कळलंच नाही. बहुतेक त्या अशक्त पिलांतली एक दोनच पुढे वाचली असतील.. मोत्यासारखा त्यांचा लळा आम्हाला लागू शकला नाही याला फक्त मोत्याच दिसणंच कारण नव्हत तर मोत्या खरंच तेव्हडा लाघवी होता. त्याच आमच्याशी खेळणं, आमच्या मागोमाग येणं.. एखादी गोष्ट शिकवली तर ती लगेच आत्मसाद करणं, असे बरेच गुण त्याच्यात होते. पुढे तो खरो खर आमचा सवंगडीच बनला. तो आमच्या बरोबर पकडा पकडी, फ्लाइंग सॉसर.. असे खेळ ही खेळायचा. त्याच नाव ठेवलं त्या दिवसा पासूनच आम्ही त्याला शेक हॅंड करायला उडी मारून आमच्या हातातल्या वस्तू घ्यायला शिकवायला लागलो आणि तोही फटाफट शिकत गेला.
मोत्या खूप खूप हुशार होता.. आमच्या पेक्षा हुशार आणि शहाणा. त्याची अशीच एक कृती मला खूप आठवते, त्याला भुक लागली की तो आमच्या दारात यायचा दार बंद असलं तर दाराला धरून उभा राहून कडी वाजवायचा, कोण आहे विचारलं की भुंकण्या सोबत दारावर नख्यांनी आवाज करायचा. त्याला येतो म्हटलेलं थांब सांगितलेलं कळायचं, आमच्या घरी तर खास मोत्यासाठी म्हणून पोळ्या केल्या जायच्या. ज्या दिवशी तो आमच्या घरी जेवायचा त्या दिवशी रात्रभर तो आमच्याच दारात बसून राहायचा. जणू खाल्ल्या अन्नाला जागायचा. पण त्याला तेव्हडासा आहार पुरत नसावा. तसा तो जास्त करून बागबान काकांच्या घरी असे ते त्याला अगदी मुला प्रमाणे सांभाळत. [तरी तो फक्त त्यांचा असा नव्हता.. तो आम्हा सगळ्यांचा होता आम्ही सगळेच त्याच्यावर खूप माया करायचो. ] बागबान काकांच्या घरीच तो मास मटण खायला शिकला. तशी चंपीही त्याला कधी मधी जंगलातून ससे मारून आणून द्यायची, तीन त्यालाही शिकारीची सवय लावली. आणि मोत्यातर शिकवू ते शिकण्यात पटाईत त्यात अंगा पिंडाने हे दांडगा शिकार करणे त्याच्या साठी अवघड नव्हते. पुढे पुढे तर त्याला शिकारीचा छंदच लागला.. तो पुरा करण्या इतके ससे त्याला बहुतेक मिळत नसावेत त्यामुळे मग त्याने पारवे मारायला सुरुवात केली. आम्हाला त्याच्या शिकारी असण्याचे ही खूप कौतुक वाटे.
आणि एक दिवस अचानक आम्हाला कळले की कोणी तरी मोत्याला गोळी घालून मारले.. कोणी असे कसे करू शकतो? आमच्या मोल्याला कोणी का मारव? आम्हाला अजिबात सहन होत नव्हत.. पूर्णं बातमी आम्हाला कळली नव्हती तो कुठे आहे कसा आहे काहीच माहीत नव्हते.. आम्ही सगळी बच्चे कंपनी मोत्याला शोधत फिरू लागलो.. तो रेस्टहाऊस जवळ एका खोल खड्यात पडून तळमळत होता. रक्त काही कुठे दिसलं नाही.. खड्डा खूप खोल होता आम्हाला खड्यात उतरणे शक्य नव्हते. आणि मोत्याला त्यातून बाहेर निघणे.. ज्या कोणी त्याची ही अवस्था केली त्याचा खूप खूप राग येत होता.. पण ते कोण माहीत नव्हते.. कोणी आमच्या मोत्याला का मारावे? ते ही कळत नव्हते.. आम्ही तिथेच खड्याच्या कडेला उभे राहून रडत होतो.. कोणी तरी डॉक्टर काकांना ही बोलावून आणले पण त्यांनी ही आपण काही करू शकत नसल्याचे सांगून वर आम्हालाच खड्या जवळून पिटाळून लावले. त्यांना आम्ही खड्यात उतरू आणि मोती आम्हाला इजा करेल असे वाटत होते. पण मोत्याने आज पर्यंत कधीच असे काही केले नव्हते तो आमचा खूप चांगला सवंगडी होता. आणि आता त्याला आमच्या मदतीची गरज होती. आम्ही मदत मिळवण्यासाठी घरी गेलो. पण कोणीच मोत्याला वाचवायला पुढे आले नाही बागबान काका ही नाही. निदान त्यांनी तरी त्याला वाचवायला हवे होते. पण तेही काहीच करू शकले नाहीत
तो दिवस ढळता ढळता आम्हाला आमच्या सवंगड्याला असा वेदनामय मृत्यू देणाऱ्याचे नाव कळले, आणि ते होते आमचे तितकेच आवडते क्लिनर काका ( बाबू टांगेवाला) हे ऐकून जणू मोत्याच्या अवस्थेमुळे झालेल्या जखमेवर मीठ चोळले गेले. हे काका आम्ही बालवाडीत असताना आम्हाला शाळेत नेत घरी पोहचवत व येता जाताना धम्माल गाणी ऐकवत अश्याच एका गाण्यावरून आम्ही त्यांना बाबू टांगेवाला म्हणायचो ते आमचे क्लिनर काका इतके निर्दयी कसे असू शकतात असे बऱ्याच गोष्टी त्या दोन-चार दिवसात आमच्यावर आघात करून गेल्या. त्यातलीच आणखीन एक गोष्ट म्हणजे.. मोत्याला अशा अवस्थेत पोहचवणारे कारण मोत्या सशे, पारवे यांची शिकार करता करता कोंबड्यांची शिकार करू लागला होता. त्याने काही दिवसां पूर्वी क्लिनर काकांची कोंबडी पळवली होती त्याचीच ही शिक्षा.. [पण मग आता क्लिनर काकांना कोण शिक्षा करणार ] आम्हा सगळ्यांच्या लाडक्या मोत्याच्या गळ्यात कोणीच पट्टा बांधला नव्हता . त्या मुळे शेवटी तो एक भटका कुत्रा होता.
मोत्याच्या कोंबडी चोरी बद्दल आम्हाला कळल असत तर.. आम्ही कोणीही त्याला पट्टा घालून दारात बांधायला नक्किच तयार झालो असतो मोत्याचे प्राण वाचवू शकलो असतो. पण तसे व्हायचे नव्हते . आमच्या सोबतचा चार वर्षांचा सहवास संपवून मोत्या आम्हाला सोडून गेला. आम्ही आमचा लाडका सवंगडी गमावला.
समाप्त
============================================
स्वाती फडणीस ............................. १७-०७-२००८
प्रतिक्रिया
17 Jul 2008 - 9:04 am | सुचेल तसं
कुत्रा मला देखील खुप आवडतो. त्याचं आपल्याकडे धावत येणं, प्रेमानं चाटणं, अंगावर उड्या मारणं....सगळच खुप मस्त वाटतं. भटक्या कुत्र्यांना खरोखरच धोका असतो. महानगरपालिकावाले त्यांना पकडून नेऊ शकतात (त्यामुळे गळ्यात पट्टा बांधणं कधी पण 'सेफ') किंवा कधी कधी फासेपारधी लोकांची (हे लोक मांजरांना पळवून नेतात. मी तर अस ऐकलय की ते मांजरांना खातात) तगडी कुत्री त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी करतात.
असो, कुठलाही पाळीव प्राणी खुप जीव लावुन जातो. तुमचा अनुभव छान शब्दबद्ध केलाय तुम्ही.
http://sucheltas.blogspot.com
17 Jul 2008 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे
मला हि माझे भुभारडे दिवस आठवतात. स्वाती, मी ही तुमच्यासोबत भुतकाळात जाउन रडलो. त्या क्लिनरकाकांचा मृत्यु ही असाच यातनामय व्हावा असा दुष्ट विचार मनात येउन गेला. पण लगेच भानावर आलो.
त्या मानान आमचा बिट्टु भाग्यवान . इथे पहा. या वर्षी सोडून गेला आम्हाला. कायम आठवण येते.
प्रकाश घाटपांडे
17 Jul 2008 - 11:17 am | स्वाती फडणीस
तुम्ही दिलेली लिंक मला बघता येत नाही आहे
17 Jul 2008 - 3:38 pm | स्वाती फडणीस
मोत्याला भेटून जाणार्या आणि प्रतिसाद देणार्या सर्वांचे :)
17 Jul 2008 - 4:33 pm | प्रमोद देव
स्वाती आपण कुत्र्यासंबंधीची आठवण खूपच छान लिहिलेय. त्यामुळे माझ्याही काही आठवणी चाळवल्या.
मीही माझ्या बालपणातल्या कुत्र्यांसंबंधीच्या आठवणी कधी तरी जरूर लिहीन.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
17 Jul 2008 - 5:03 pm | प्रकाश घाटपांडे
मी १९८७-८८ मध्ये सांताक्रुझला जायचो. आमच्या बिनतारी विभागाच्या कंपाउंड मध्ये एक भुभी व्याली होती. मी गेट मधुन आत आलो कि ती दुगाण्या झाडल्यासारखे करुन पित असलेली पिल्ले मागच्या पायांनी झटकून माझ्या स्वागताला शेपटी हलवत ,पळत पळत यायची. मग मी तिची पोरे गोळा करुन तिला परत झोपवुन त्यांना लुचायला द्यायचो. त्यावेळी तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव असायचे. तिच्याशी मी लपंडाव खेळायचो. मी एक टाळी व एक पाय आपटून इशारा केल्यावर ती लांब पळे. त्यानंतर मी अरुंद पॆसेज मध्ये दार व दगडी भिंत या गॆपमध्ये दाराकडे चिकटुन तोंड व पॆसेजकडे पाठ करुन पुतळ्यासारखा स्तब्ध होउन लपत असे.माझे शरीर जणु भिंतीचाच भाग बनत असे. मग ती भुभी मला शोधायला येत असे. व्हरांड्यातून अनेक चक्कर ती टाकी. वास तर येतोय पण सापडत तर नाही. मग ती शोधुन गारगार नाक माझ्या टाचेला लावी मग गुदगुल्या होउन मी हलत असे व मग ती मला पकडे.
आजही भुभुंचे गार गार नाक कानाला लावले कि माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात.
प्रकाश घाटपांडे
17 Jul 2008 - 5:15 pm | सहज
खूपच वाईट वाटले जरी मला भटकी कुत्री नकोशी वाटत असली तरी.
:-(
17 Jul 2008 - 5:28 pm | अजिंक्य
'सहज' शी सहमत आहे.
जरी मला(ही) भटकी कुत्री आवडत नसली, तरीही असा एखादा अनुभव मनाला चटका लावून जातो.
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
17 Jul 2008 - 7:25 pm | स्वाती फडणीस
या गोष्टीत त्याला भटका ठरवण्यात आल आहे.
खर तर त्याला अख्या कॉलनीने पाळले होते..
17 Jul 2008 - 8:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुक्या प्राण्यांवरचे प्रेम माणसाला वेडे करते याचा अनुभव मी घेतलाय. आम्ही पाळलेले एक कुत्रे आजारी पडून मरण पावले होते. जिथे तिथे मी कुत्र्याबद्दलच बोलायचो, पण ऐकणा-याला आपल्या भावना पोहचत नाही, हा माझा अनुभव. असो,कुत्र्याचं आम्हाला भयंकर वेड आहे. आमचं हे वेड पाहुन मिपाचे सन्माननीय सदस्य श्री घाटपांडे साहेबांनी आम्हाला एक पुस्तक भेट दिले 'संरक्षक सोबती' आम्ही त्याचा आधार घेऊन आमच्या भू-भू ची काळजी घेतो.
(माझा 'सॅन्डी')