फोर्ट स्टिकिन १२ एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास मुंबईला पोहोचली. मुंबई बंदराच्या जवळच या जहाजाने नांगर टाकला. सकाळी दहाच्या सुमारास या जहाजाला व्हिक्टोरीया बंदरापर्यंत घेऊन जाणारी बोट आली. यावेळी मुंबई बंदरावरील कोणालाही या बोटीत असणा-या धोकादायक अणि संहारक सामुग्री बाबत काहीही कल्पना नव्हती कारण विस्फोटक सामुग्री असणा-या जहाजांना लाल रंगाचा झेंडा बोटीवर फडकवणे आवश्यक असते त्यामुळे आजुबाजूच्या सर्वांनाच जहाजात धोकादायक माल आहे हे समजते मात्र युध्द काळात असा लाल बावटा फडकवत प्रवास करणे म्हणजे शत्रूला हल्ल्यासाठी आमंत्रण देण्यासारखे ठरले असते म्हणुन त्याकाळात ही अट शिथिल करण्यात आली होती. व्हिक्टोरीया गोदीत धोकादायक जहाजांना सर्वात कडेच्या रांगेत जागा देऊन लायटर (मालवाहू जहाजातून सामान उतरवतांना वा चढवतांना वापरले जाणारे सपाट तळ असणारे लांब जहाज) मध्ये सामान उतरवून घेतले असे.
विस्फोट्क सामुग्री ए,बी,सी अशा तीन दर्जामध्ये विभागली जाते. सर्वात कमी धोकादायक सामुग्री 'सी' दर्जाची; ती नेहमीच्या साध्या सामुग्री प्रमाणे उतरवून गोदामात साठवली जाते आणि योग्य त्या वाहतुकीच्या साधनांमधून वाहून नेण्याची वाट पाहिली जाते. 'बी' दर्जाची सामुग्री तुलनेने अधिक धोकादायक मानली जाऊन सरळ मालवाहू रेल्वे डब्यात भरून तिची पाठवणी केली जाते तर 'ए' दर्जाची सर्वाधिक धोकादायक आणली जाऊन या प्रकारची सामुग्री उतरवण्यासाठी लायटर त्या जहाजाजवळ नेऊन त्यामध्ये ताबडतोब माल भरला जातो अशा जहाजांना माल उतरवण्यासाठी रांगेत अजिबात वाट पहावी लागत नाही. फोर्ट स्टिकिनच्या पाचही कप्प्यांची आवरणे काढतांच त्यातील धोकादायक माल लक्षात घेऊन या जहाजाला गोदीवर माल उतरवण्याची जबाबदारी असणा-या मेजर हौकिन्स यांनी तात्काळ 'ए' प्रमाणपत्र दिले. त्यामुळे हा माल लायटर मध्ये उतरवणे आवश्यक होते. अतिशय धोकादायक माल लगेचच उतरवणे आवश्यक असूनही दुस-या दिवशी दुपारपर्यंत लायटर उपलब्ध झाला नाही.
१२ एप्रिल, १९४४ जहाजांची स्थिती दाखवणारा नकाशा
मात्र इतर सामान उतरवण्याचे काम सुरु झाले. वंगण तेलाचे काही पिंप धक्क्यावर उतरवण्यात आले. हे पिंप उतरवतांना या कामावर देखरेख करणारे कंत्राट्दार शापोरजी देसाई यांच्या लक्षात आले की एक आणि दोन क्रमांकाच्या कप्प्यांतुन उतरवल्या जाणा-या काही पिंपाना थोडी गळती लागली आहे. ही बाब उपकप्तान हैरीसच्या लक्षात आणून देतांच टरपलाईनचे (प्लस्टिकच्या कागदासारखे) आवरण घालून हे पिंप बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. याचवेळी जहाजावरील मासळीच्या खताच्या दुर्गधीमुळे जहाजावरील सर्वांनाच काम करणे अशक्य झाल्यामुळे हे खत ताबडतोब उतरवण्यासाठी अधिक मजूर बोलावले गेले. पिंप उतरवण्याचे काम मध्येच सोडून खत उतरवण्याच्या कामाला प्राधान्य दिले गेले. हे मजूर संपूर्ण रात्र (दिनांक १३ एप्रिल) काम करीत होते. या घटनेनंतरच्या चौकशी आयोगा समोर या मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा झाली. दोन नंबरच्या कप्प्याचे दार उघडे राहून त्याद्वारे या कामगारांपैकी एखादा कामगार धुम्रपान करण्यासाठी आत गेला असावा आणि सिगारेटचे/ बिडीचे जळते थोटूक तेथेच राहून गेले असावे या शक्यतेवर विचार करण्यात आला.
सेकंड ऑफिसर हैरीसला पूर्ण खात्री होती की दोन नंबरच्या कप्प्याकडे जाणारे दार कुलुपबंद होते. थर्ड ऑफिसर एडवर्ड चे म्हणणे होते की या दरवाजांच्या किल्ल्या रात्री काम करणा-या कामगारांच्या सोयीसाठी त्यांच्या मुकादमाकडे देण्यात आल्या होत्या आणि संपूर्ण रात्रभर हे दरवाजे उघडेच होते. त्यामुळे हा प्रश्न संपूर्ण चौकशीत अनुत्तरीतच राहिला.
तेरा एप्रिल ला जहाजाच्या इंजिन कक्षातील कर्मचारी मुख्य अभियंत्याकडे जहाजाच्या मुख्य इंजिनाच्या आवश्यक अशा दुरुस्तीची परवानगी मागीतली. ही दुरुस्ती परतीच्या प्रवासासाठी वेळेत होणे आवश्यक असल्यामुळे मुख्य अभियंत्यनेही लगेचच मंजूरी दिली त्यामुळे जहाजाच्या मुख्य इंजीनाच्या कामाला सुरुवात झाली परिणामत: आता हे जहाज स्वत:हून कोणतीही हालचाल करू शकत नव्हते आणीबाणीच्या प्रसंगी या जहाजाला ओढून बाहेर काढावे लागले असते.
दिनांक १४ ला सकाळी भारतीय दारुगोळा विभागातील सार्जंट माकॅफे सामान उतरवून घेणा-या कामगारांचा मुकादम देसाईशी चर्चा करून विस्फोटक सामुग्री नेमकी कोठे उतरवून घ्यावी याबाबत चर्चा करून गेला. दुपारी बाराच्या सुमारास विस्फोट्क सामुग्री उतरवण्यासाठी आवश्यक असणारी लायटर येऊन दाखल झाली. त्याच सुमारास दुपारच्या जेवणाच्या सुट्टीसाठी सर्व कामगार आजुबाजूला निघून गेले. बोटीवर कप्तान, त्याचे अधिकारी हजर होते, बाहेर सामान्य सुरक्षा रक्षक जहाजाच्या मागेपुढे गस्त घालत होते, सशस्त्र सुरक्षा रक्षक देखील जहाजाच्या आजूबाजूला पहारा देत होते.
यापैकी कोणालाही जहाजावर काही विपरीत घडत आहे याची कल्पना नव्हती दुपारी साडेबाराच्या सुमारास फोर्ट स्टिकिनच्या विरुध्द बाजूला अकरा क्रमांकाच्या धक्क्यावर उभ्या असणा-या फोर्ट क्रेव्हीयर या जहाजाच्या मुख्य अधिका-याला आणि इतर दोन कर्मचा-यांना फोर्ट स्टिकिनच्या दोन क्रमांकाच्या कप्प्यातील वरच्या तावदानातून धूर येतांना दिसला. सशस्त्र सुरक्षारक्षक इराण यानेही धूर पाहिला. दुपारी दीडच्या सुमारास मुंबई पोलिस दलातील एक उपनिरीक्षकानेही या जहाजातून धूर येतांना पाहिला. मात्र धूर इतका विरळ होता की यापैकी एकालाही फोर्ट स्ट्किनवर काही गंभीर घटना घडत आहे याविषयी शंका आली नाही. जहाजावर माल उतरवण्याचे काम करीत असलेल्या महम्मद ताकी या कामगारने दुपारी पावणेदोनला कप्पा क्र. २ मधून मोठ्या प्रमाणात धूर येतांना पाहून इतर कामगारांना सावध करण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. याचवेळी फोर्ट स्टिकिन वरील कर्मचा-यांनी देखील धूर पाहून धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली. आगीची सूचना मिळतांच मुख्य अभियंता अलेक्स गोह याने तत्काळ इंजीन रूम मध्ये जाऊन आग विझवणारा पाण्याचा पंप सुरु केला. लगेचच जहाजावरील इतर कर्मचारी देखील पाण्याचे पाईप घेऊन क्रमांक दोनच्या कप्प्याकडे धांव घेतली. काहीतरी भयंकर घडत आहे हे पाहून बोटीवर सामान उतरवण्याचे काम करणा-या कर्मचा-यामध्ये धावपळ सुरु झाली.
जहाजावर आग लागल्यास जहाजावरील सर्व कर्मचा-यांनी आग विझवणाच्या कामात सक्रीय सहभाग घ्यावा अशी नेहमीची पद्धत आहे. या सर्वसाधारण नियमाचे पालन करण्याचे आदेश तेथे उपस्थित असणा-या अधिका-याने आपल्या कर्मचा-यांना दिले. जहाजावर मोठ्या प्रमाणात स्फोटके आहेत हे लक्षात घेऊन दुय्यम अधिका-यांना ताबडतोब अग्निशमन दलाला फोन करून क्रमांक दोनचा धोक्याचा इशारा देण्याचेही आदेश दिले. मात्र या गोंधळात फोन वरून अग्निशमन दलाशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र आगीची सूचना देणारी घंटा वाजवली गेली तो संदेश अग्नीशमन दलाला पोहोचला परंतु 'एक साधारण आग लागली आहे' असा संदेश पोहोचला होता त्यामुळे केवळ दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जहाजावरील पाच पाईप आग विझवण्यास अपुरे पडु लागले होते. आगीच्या केंद्रस्थानी पाण्याचा मारा करण्याच्या दृष्टीने जहाजावरील एक अधिकारी आणि अग्निशमन दलाचा एक अधिकारी असे दोघे जण आग लागलेल्या कप्प्यात गेले मात्र अतिशय गडद धुरामुळे ते फार आतापर्यंत न पोहोचतांच परतले आणि पाचही पाईपातून अंदाजाने पाण्याचा मारा चालू राहीला. पुढच्या आठच मिनिटांत आगीच्या दोन बंबांनीही पाण्याचा मारा सुरु केला आणि आधीच्या पाच पाईपांबरोबरच आणखी सहा पाइपांनी काम करण्यास सुरुवात केली. जहाजावर स्फोटके आहेत याची कल्पना अग्निशमन अधिकारी मुबारक सिंग समजतांच नियंत्रण कक्षाला संपर्क साधून ही दोन क्रमांकाच्या धोक्याची स्थिती असून आणखी मदत पाठवण्याची सूचना दिली.
पाच मिनिटांत लेखाच्या सुरुवातीला लिहिल्या प्रमाणे मेजर ओब्रेस्ट जहाजावर दाखल झाले त्याबरोबरच मदतीसाठी नौदलाचे इतर अधिकारी, बंदराचे अधिकारी ही तेथे दाखल झाले .मेजर ओब्रेस्ट्ने कप्तानासह जहाजाच्या इतर सर्व अधिका-यांची चर्चा करून जहाजावरील विस्फोटकांचा विचार करता १५० शक्तिशाली बॉम्ब एवढी संहारक क्षमता या जहाजात आहे हे जहाज ताबडतोब नष्ट करणे किंवा बुडवून टाकणे हा एकच पर्याय असल्याचे ठासून सांगीतले. दुरुस्तीच्या कामांमुळे जहाज मागे समुद्रात नेणे अशक्य होते आणि जहाज जेथे आहे त्याठिकाणी एवढे प्रचंड जहाज बुडवता येईल एवढी समुद्राची खोली नव्हती. जहाजाचे सर्वच अधिकारी जहाज वाचवले जावे असे प्रयत्न करीत होते. फोर्ट स्टिकिनवर मेजर ओब्रेस्टचा कोणताही अधिकार नव्हता तो केवळ सल्ला देऊ शकत होता. हा दारुगोळा जमिनीवर पोहोचल्यानंतर त्याच्या वापराविषयी तो निर्णय घेऊ शकत होता. मात्र त्याने पुन्हा एकदा इशारा दिला की आग वेळीच आटोक्यात आली नाही तर संपुर्ण बंदर नष्ट होईल. सर्व चर्चेनंतर १५० बॉम्बची क्षमता असणारे जहाज मुंबई शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या गोदीत जहाज जेथे आहे तेथेच राहू द्यायचा निर्णय घेतला गेला
दरम्यान धोक्याचा क्रमांक दोनचा संदेश मिळताच अग्निशमनदलाचे आणखी आठ बंब दाखल झाले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने दलाचे प्रमुख नार्मन कुम्ब्स यांना देखील कळवले तेही काही मिनिटात घटनास्थळी पोहोचले. आता एकुण ३२ पाईप आगीवर पाण्याचा मारा करीत होते. कुम्ब्स जहाजाच्या डेकवरुन आगीचे केंद्र्स्थान शोधत होते. काहीही कळत नव्हते म्हणुन त्यांनी कोणीतरी आत जावून आगीचा उगम शोधू शकेल का अशी विचारणा करतांच मुबारक सिंग आणि बंदरावरील अग्निशमन दलाचा अधिकारी ओर्थर रेनोल्ड्स हे दोघेजण खाली जाणास तयार झाले. धूर विरोधी मुखवटे घालून ते खाली गेले मात्र त्यांना लगेचच परत यावे लागले धुरामुळे नाही तर खाली या दोन्ही कप्प्यात अतिशय उष्णता निर्माण झाली होती. त्यात टिकाव धरणे मानवी शक्तीच्या बाहेरचे काम होते. वाढता धोका लक्षात घेऊन जहाजावरील अधिकारी हैरीस त्याच्या सहका-यांसह एक क्रमांकाच्या कप्प्यातील डिटोनेटर दूर हलवण्याचा प्रयत्न करू लागले. २.४५ पर्यंत एक आणि दोन क्रमांकाच्या विभाजन करणा-या भिंती मध्ये फारच उष्णता निर्माण होऊ लागली. एक क्रमांकाच्या कप्प्यात काम करणा-यांना दोन क्रमांकाच्या कप्प्यातून लहान स्फोटाचे आवाज येवू लागले. आग आटोक्यात आणण्याचे विविध उपायांबद्दल डेकवर चर्चा सुरु होत्या कुम्ब्स यांनी बंदराचे महाव्यवस्थापक जे.आर. सल्डर यांना जहाजावर बोलाऊन घेतले.
यावेळेपर्यंत कुम्ब्स यांना जहाजावर नौदालाचे अधिकारी आणि विस्फोटक तज्ञ मेजर ओब्रेट जहाजावर आहेत याची कल्पना नव्हती. जहाज नष्ट करण्याच्या कल्पनेला कप्तान नैमस्मिथ ने पुन्हा एकदा असमर्थता दर्शवली.
कर्नल साल्डर दुपारी २.५० ला जहाजावर पोहोचले. सर्व परीस्थितीचा अंदाज घेताच त्यांनी हे जहाज ताबडतोब बंदरावरुन खोल समुद्रात पुन्हा घेऊन जायला सांगीतले. मात्र कप्तानाने दुरुस्तीमुळे जहाज ओढून घेऊन जाण्याशिवाय पर्याय नाही हे ही सांगितल्यावर हा उपायही कुचकामी ठरला शिवाय कुम्ब्स यांच्या मते खोल समुद्रात पोहोचण्यापुर्वीच या जहाजावर विनाशकारी स्फोट होईल असे समजल्यावर ही सूचना सोडून देण्यात आली. कुम्ब्स अजूनही आशावादी होते की आगीवर नियंत्रण मिळवून जहाज वाचवता येईल गेल्या पांच वर्षात ६० जहाजे त्यांच्या कर्मचा-यानी वाचवली होती. म्हणजेच सरासरी महिना एक जहाज त्यांनी आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचवले होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या मदतीला डोरिस आणि पानवेल या बोटी दुपारी ३.०० वाजता आल्या डोरिस वरून ३ तर पानवेल वरून ६ पाईप आगीवर पाण्याचा मारा करीत होते. जहाजावर असलेल्या विविध विभागाच्या उच्च अधिका-यांपैकी कोणालाही परिस्थितीवर संपुर्ण नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणता येईल अशी परिस्थिती नव्हती. या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतील अशा दोन व्यक्तींशी या आणीबाणीच्या काळात संपर्कच केला गेला नाही त्या म्हणजे कमाडर रॉयल नेव्ही, मुंबई आणि नौदल मुख्याधिकारी मुंबई. त्यामुळे तीन वेगवेगळ्या अधिका-यांची तीन वेगवेगळे मतप्रवाह दुपारी ३.०० च्या सुमारास होते. कप्तान नैमस्मिथला आपले जहाज वाचवायचे होते, महाव्यवस्थापक साल्डर यांना जहाजापासून आपले बंदर वाचवायचे होते आणि कुम्ब्स यांना जहाज जेथे उभे आहे तेथेच उभे ठेऊन आगीवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करायचा होता. फोर्ट स्टिकिनवर विस्फोट झाला तर तो किती विनाशकारी असेल याची यांच्या पैकी कोणालाही कल्पना नाही आणि हळूहळू ही शक्यता अटळ घटना ठरू पाहत आहे असा विचार करीत मेजर ओब्रेट सर्वांपासून दूर उभा होता.
दुपारी तीन नंतर काही वेळातच आगीचे केंद्रस्थान शोधून काढण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले. जहाजाचा पोलादी पत्रा कापून तेथे मोठे छिद्र पाडून आगीच्या मुळावरच पाण्याचा मारा करण्याचा कुम्ब्स यांचा पहिला विचार होता. मात्र यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री वेळेत न मिळाल्याने हा विचार सोडुन द्यावा लागला. जहाजावरील परीस्थिती वेगाने बिघडत चालली होती. वरच्या डेकवरील तळाचा भाग अतिशय गरम होऊ लागला होता म्हणुन कुम्ब्स यानी त्यांच्या माणसांना तेथे पाण्याचा मारा करायला सांगीतले. त्यामुळे अग्निशामाक दलाचे कर्मचारी आता पाण्यात उभे राहून काम करीत होते त्या पाण्यालाही आता उकाळ्या फुटू लागल्या होत्या. गेल्या सुमारे दोन तासांत आग विझवण्यासाठी फवारले गेलेले सुमारे ९०० टन पाणी जहाजात जमा झाले होते. परिस्थिती अशी होती कि या पाण्यात आता कापसाच्या गासड्या तरंगू लागल्या होत्या त्यामुळे नवीच दहशत निर्माण झाली होती.
अग्निशमन दलाचे बहुसंख्य कर्मचारी आता जहाजाबाहेरून पाण्याचा मारा करीत होते. कुम्ब्स जहाजाच्या पुढिल भागाच्या उजव्या बाजूला आपले लक्ष केंद्रित करीत होते. कापसाच्या गासड्यांना आग लागली होती आणि पाण्यावर तरंगत या कापसाच्या गासड्या विस्फोटकांच्या पेट्या ठेवलेल्या भागातील बांधलेल्या सामानाला जाउन चिकटल्या होत्या. त्यामुळे दुपारी ३.वाजून १५ मिनिटांनी विस्फोटकांना आग लागली. त्यातून निघणा-या गडद काळ्या धुरात अजुनही आगीवर पाण्याचा मारा करणारे अग्निशमन दलाचे जवान बुडुन गेले. या मागोमाग लगेचच संपूर्ण जहाजात आगीच्या ज्वाळा पसरल्या कापसाच्या जळत्या गासड्या जहाजातून आकाशात उडाल्या. त्यामुळे गोदीत उभ्या असणा-या इतर जहाजांना आगीचा धोका निर्माण झाला. धावपळीत इकडे तिकडे विखुरल्या गेलेल्या आपल्या कर्मचा-यांना अग्निशमन दलाच्या आणि गोदीच्या अग्निशमन सेवेच्या अधिका-यांनी पुन्हा एकत्रीत केले. जहाजाच्या आग लागलेल्या भागावर पाण्याचा मारा करण्यासाठी ते पुन्हा सज्ज झाले आणि आपले काम करू लागले. पुढची काही मिनिटे कधी आगीच्या ज्वाळा वाढत होत्या तर काही मिनिटे पाण्याच्या माराने कमी होत होत्या. हा प्रकार ३ वाजून ५० मिनीटांपर्यत चालू राहीला.
३.५० मिनिटांनी प्रचंड आगीचालोळ निघून जहाजाच्या धुराड्याच्याही वर गेला. कुम्ब्स आपल्या अग्निशामक जवानांना उद्देशून ओरडला "जहाजावरून दूर व्हा, जहाज सोडा". गोदीचा अग्निशमन अधिकारी पामर आणि त्याच्या सहका-यांनी जहाजावरून धक्क्यावर उड्या मारल्या त्यांच्यापैकी अनेकांचे हात खांद्यापासून निखळले. पामर आणि त्याचे हालचाल करणे शक्य आहे असे सहकारी जळत्या कापसाच्या गासड्यामुळे गोदीच्या एक क्रमांकाच्या शेडला लागलेली आग नियंत्रणात आणायचा प्रयत्न करू लागले. कुम्ब्स आणि बचावलेले त्याचे सहकारी गोदीच्या चौदा क्रमांकाच्या शेडची आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले.
इकडे जहाजावर ज्यावेळी कुम्ब्स यांनी आपल्या कर्मचा-यांना जहाज सोडण्याचे आदेश दिले त्याचवेळी कप्तान नैमस्मिथनेही आपल्या सहका-यांना जहाजाचा निरोप घ्यायचे आदेश दिले. आतपर्यंत आगीत सर्वचजण जहाज वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. सर्वजण त्यांच्यामागे उपकप्तान आणि कप्तान जहाजातून बाहेर येत असतांना अचानाक कप्तान नैम्स्मिथला सर्वच कर्मचारी आले आहेत किंवा नाही याची खात्री करावी असे वाटले म्हणून खात्री करून घेण्यासाठी शेवटची फेरी जहाजात मारण्यासाठी आपले पाय मागे खेचले. त्याच्या बरोबर त्याचे सहकारी स्टीव्हन आणि हनडर्सन हे देखील मागे फिरले. ते जहाजावर काही पावले जाताच जहाजावर अतिप्रचंड विस्फोट झाला. स्टीव्हन अंगावरील सर्व कपडे जळलेल्या अवस्थेत बाहेर पोहोचला. नैमस्मिथ आणि हनडर्सन यांचा पुन्हा कधीही काहीच मागमूस लागला नाही.
महाविस्फोट
या क्षणी प्रचंड आवाजांनी मुंबईच नाही तर कित्येक मैल पर्यंतचा परिसर हादरला. फोर्ट स्टिकिनमधून जळत्या कापसाच्या गासड्या, तेलाचे पिंप बंदुकीतून गोळी सुटावे असे उंच हवेत उडाले आणि आजुबाजूच्या जहाजांवर, गोदीतल्या विविध गोदामांवर, इमारतीवर, बंदरा बाहेरच्या घरांवर झोपडपट्टीवर पडून आग या सर्वच जागी आगीचे लोळ उठले. व्हिक्टोरिया बंदरात उभ्या असलेल्या २४ जहाजांपैकी अकरा जहाजांवर भयंकर आगी लागल्या. चार जहाजे एक तर बुडाली किंवा ती पूर्णत: नष्ट झाली. ३९०० टन वजनाची आणि ४०० फूट लांब ब्रिटिश नौदलाची जलपद्मा या जहाजाचा मागचा भाग नष्ट होऊन बुडाला पुढचा भाग ६० फूट उंच उडून गोदीच्या गोदामांना पार करुन एका शेडवर जाऊन पडला. पहिल्या स्फोटामुळे धक्क्याशेजारील चार क्रमांकाच्या शेडमध्ये लागलेल्या आगीचे अवशेष पडुन ब्रिटिश इंडिया कंपनीच्या बरोडा या जहाजाला आग लागली दुस-या स्फोटामुळे हे महाकाय जहाज शेजारच्या धक्क्याकडे फेकले गेले होते. यामुळे बरोडा जहाजाला आग लागली. जहाजाचा मुख्याधिकारी, मुख्यभियंता, एक अधिकारी, आणि एक कर्मचारी आगीशी स्वत:च झुंजत राहिले बाकीचे सर्व कर्मचारी हे जहाज सोडून गेले. मुख्य अभियंता स्टुअर्ट आगीत गंभीर जखमी झाला त्याला वाचवण्यासाठी मदत आली परंतु तोपर्यंत अतिशय उष्णतेमुळे त्याचा मृत्यू झाला. इतर तिघांना वाचवण्यास मदत पथकाला यश मिळाले. आणखी एक जहाज शिराळाचा कप्तान देखील होरपळून मृत्युमुखी पडला. स्फोटाच्या धडाक्याने आजूबाजूची माणसे हवेत उंच उडून १०० यार्ड दूरपर्यंत जाऊन जिवंत अथवा मृत अवस्थेत पडली.
या स्फोटाने आणखीही काही विचित्र गोष्टी घडल्या कुम्ब्स हवेत उंच उडून एका कापसाच्या गठ्यावर पडले. त्यांची विजार पूर्ण जळून गेली होती कमरेचा पट्टा आणि विजारीचे खिसे फक्त शाबूत होते. दारुगोळा विभागातील कर्मचारी मोटर सायकल वरून जात होता तो मोटार सायकल वरून उडून बाजूच्या कच-याच्या ढीगावर फेकला गेला. बाजूने जाणा-या एका मोटर गाडीच्या किल्ल्या जागेवर होत्या इंजीन मात्र उडून दूरवर फेकले गेले होते. गोदीच्या मागच्या बाजूला राहणारे अभियंता मोतीवाला यांनी त्याच्या बाल्कनीत जोरात आवाज येऊन काहीतरी येऊन पडल्याचे पाहिले तर ती सोन्याची वीट होती (त्यावेळी त्या सोन्याच्या विटेची किंमत ९०००० रुपये इतकी होती ती त्यानी सरकारला परत केलीच त्यबद्दल इनाम मिळालेले ९९९९ रुपये त्यांनी मदत निधीला देऊन टाकले).
या प्रचंड विस्फोटामुळे व्हिक्टोरीया गोदीच्या मनो-यावरील घड्याळ दुपारी ४ वाजून ६ मिनिटांनी बंद पडले. पुढचे अनेक महिने हे घड्याळ हीच वेळ दाखवत होते. मेजर ओब्रेट स्फोटाच्या धक्क्याने उडून सामान बांधण्याच्या सामुग्रीच्या गट्ठ्य्यावर येऊन पडला होता. त्याला शुध्द आली तेव्हा जाणवले की त्याच्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडले आहेत त्यांच्या अंगावरील त्वचा जळून गेली आहे. आगीच्या जवळपास असणारे सर्व अग्निशमन कर्मचारी जागच्या जागी ठार झाले होते. महाकाय पोलादी अशा फोर्ट स्टिकिनचे या महास्फोटात दोन तुकडे झाले होते. जहाजाचा बॉयलर आर्धा मैल दूर एक क्रमाकाच्या धक्क्यापाशी जाउन पडला होता आणि अजुनही चांगल्या अवस्थेत होता. स्फोटामुळे समुदात एक मोठी लाट निर्माण झाली आजूबाजूला असलेली सर्व जहाजे त्यांच्या मुळ जागेवरून दुरवर फेकली गेली. एक जहाज तर बाजूच्या गोदामावर फेकले गेले. फोर्ट स्टिकिनच्या मागे उभे असणारे जालपद्मा पुर्ण नष्ट होऊन फोर्ट स्ट्किन बरोबर विसावले होते. ४.३३ वाजता कुम्ब्स यांनी स्फोटाच्या क्षणी झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली.
-क्रमशः
प्रतिक्रिया
14 Apr 2013 - 5:15 am | श्रीरंग_जोशी
हे लेखन करने अतिसंवेदनशील माणसाचे काम नोहे.
समर्थपणे उतरले आहे तुमच्या लेखणीतून.
गविंच्या विमान अपघातांवरील लेखांमध्ये पुन्हा पुन्हा येणारे एक वाक्य आठवले - अपघात म्हणजे अनेक चुकांची / अनपेक्षित घटनांची साखळी असते.
14 Apr 2013 - 10:21 am | लाल टोपी
पूर्वतयारी करुन लिहिण्यापूर्वी सर्व माहिती एकत्रीत केल्यानंतर अगदी गविंचे हेच गविंचे आठऊन गेले!!
14 Apr 2013 - 10:22 am | लाल टोपी
गवींचे हेच वाक्य आठऊन गेले
14 Apr 2013 - 6:15 am | आतिवास
माहितीपूर्ण लेखन. घटना साधारणपणे माहिती होती (वाचून) पण इतके सविस्तर कधी वाचले नव्हते.
14 Apr 2013 - 10:35 am | अमोल खरे
असेच म्हणतो. हा स्फोट भयंकर होता हे ऐकले होते, पण किती भयंकर होता हे आता कळत आहे. अतिशय दुर्दैवी घटना. त्या परिस्थितित, जेथे उकळत्या पाण्यात उभे राहुन अग्निशमन दलाचे जवान आपले कर्तव्य करत होते, शेवटपर्यंत करत राहिले, त्यांना मानाचा मुजरा. २६-११ हल्याच्या वेळीही मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ताजच्या आत गोळीबार चालला असुनही गुपचुपपणे मागील बाजुस जाऊन अनेक लोकांना बाहेर काढले. नशिबाने हे टीव्ही वर लाईव्ह दाखवले गेले नाही, अन्यथा ते अनर्थ झाला असता. आत गोळीबार चालला असताना आणि स्वतःची सुरक्षा करायला काहीही साधन नसताना त्यांनी घेतलेली रिस्क अतुलनीय होती. ओंबाळे, करकरे, कामटे, साळस्कर ह्यांच्यासारखेच अग्निशमन दलाचेही कौतुक व्हायला हवे होते. लेखात लिहिल्याप्रमाणे गोदीत त्या दिवशी जे शौर्य फायर ब्रिगेडने दाखवले, ते पाहुन ताज हल्ल्याच्या वेळी फायर ब्रिगेडने दाखवलेल्या शौर्याची पुन्हा एकदा आठवण झाली. असा सुंदर लेख लिहिल्याबद्दल लाल टोपी ह्यांना अनेक धन्यवाद. पुढील भाग लवकर टाका.
14 Apr 2013 - 12:39 pm | लाल टोपी
अग्निशमन दलाच्या बहादुरी वर्णन याभागात वाचलेत पुढील भागातही त्यावर चर्चा करणार आहोत. परंतु आजचा दिवस हा अशाच अनाम वीरांना आदरांजली वाहण्यासाठी अग्निशमन दिन म्हणून साजरा केला जातो कारण ६९ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वर उल्लेखलेला प्रसंग घडला.
अग्निशमन दलाच्या सर्व वीरांना मानाचा मुजरा!!
14 Apr 2013 - 10:33 am | लॉरी टांगटूंगकर
अशक्य वर्णन!!! आधी काहीच माहिती नव्हते, पण पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहिलंय.
पुभालटा
14 Apr 2013 - 10:42 am | अभ्या..
+१
सुरेख वर्णन. अगदी व्यवस्थित विज्युअलाइझ होतंय.
14 Apr 2013 - 10:53 am | मोदक
चित्रमय वर्णन करीत आहात..
पुढील लेखनास शुभेच्छा!!
14 Apr 2013 - 10:59 am | परिकथेतील राजकुमार
लेखणीची ताकद खतरनाक आहे. प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर घडत असल्यासारखे वाटत आहेत.
14 Apr 2013 - 12:18 pm | रमताराम
असेच बोल्तो.
14 Apr 2013 - 11:32 am | एस
वाचत आहे.
14 Apr 2013 - 1:10 pm | गणपा
या प्रसंगाबद्दल पुर्वी कधी ना ऐकले ना वाचले.
मती गुंग करणारं वास्तववादी चित्रण.
पुर्वी तुमच्या धाग्यांवर कधी प्रतिसाद दिले नव्हते बहुतेक, पण आवर्जुन वाचत होतोच.
तुमचा अभ्यास अन लेखन शैली आवडली.
पुभाप्र.
14 Apr 2013 - 3:14 pm | प्यारे१
काही व्यक्तींच्या मूर्खपणामुळे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचं समर्थ वर्णन.
14 Apr 2013 - 4:15 pm | प्रभाकर पेठकर
ह्या घटनेच्या वेळी माझ्या एका मित्राचे वडील गोदीतील एका कचेरीत कारकून म्हणून काम करीत होते. भयंकर स्फोटाने त्यांच्या कचेरीला आग लागली. छताची एक तुळई तुटून खाली कोसळली, त्या खाली ते सापडले. आग वाढत होती तुळई तापलेली होती. जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने त्यांनी स्वतःला सोडविण्यासाठी जोर लावला. ते सुटले परंतु त्यांचा एक हात तुटला. तशाच तुटक्या हाताने ते बाहेर पडले. त्यांना कांहीच ऐकू येत नव्हतं.... त्या स्फोटाच्या आवाजात त्यांनी त्यांचे कानही गमावले.
आकाशात उडालेल्या सोन्याच्या विटा आजूबाजूच्या झोपडपट्टीतही पडल्या. कांही जणांच्या छातीवर विट पडूनही त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. अनेकांनी प्रामाणिकपणे विटा परत केल्या तर बाकीच्या विटांचा शोध मुंबई पोलिसांनी आजूबाजूला धाड सत्र घालून शोधून काढल्या. (माझी ऐकीव माहिती.).
14 Apr 2013 - 6:39 pm | पैसा
अगदी माहितीपूर्ण आणि वाचकाला खिळवून ठेवणारे.
14 Apr 2013 - 11:34 pm | मुक्त विहारि
मस्त..
15 Apr 2013 - 10:06 am | मदनबाण
पुढच्या भागाची वाट पाहतोय !
15 Apr 2013 - 4:11 pm | रोहन अजय संसारे
असेच काही जुने अजून माहिती असेल तरी खूप चं छान वाचायला
18 Apr 2013 - 11:40 pm | लाल टोपी
प्रतिसाद देऊन उत्साह वाढवणा-या सर्वांचे धन्यवाद..
18 Apr 2013 - 11:46 pm | खटपट्या
आजही मुम्बई आणि ईतर अग्निश्मन दले १४ एप्रिल हा दीवस अग्निशम्न दीन म्ह्णून पाळतात
19 Apr 2013 - 2:52 am | लाल टोपी
http://www.misalpav.com/node/24485