१४ एप्रिल १९४४ या तारखेचे महत्व मुंबईच्या इतिहासात अनन्य साधारण आहे यात शंकाच नाही. जे महत्व पुण्याच्या इतिहासात १२ जुलै, १९६२ ला आहे ज्या दिवशी पानशेत धरण फुटल्याने जुन्या पुण्याचा चेहरा बदलला पण त्यावेळी शहरात असणा-या लोकांच्या मनात खोलवर आघात करून गेला असाच दिवस मुंबई ने अनुभवला १४ एप्रिल, १९४४ ला. हा दिवस अग्निशमन सुरक्षा दिन म्हणूनही पाळला जातो.
काय होती ही दुर्घटना? पाहुया..
कॅप्टन ब्रेन्ली ओब्रेस्ट हा ब्रिटिश आर्मीचा आणि भारतीय सैन्याच्या दारुगोळा विभागाशी संलग्न असणारा अधिकारी दुपारच्या जेवणासाठी नुकताच आपल्या कुलाब्यातील घरी पोहोचला होता. तो जेवायला बसणार तेवढ्यात त्याच्या घरातील फोनवर निरोप मिळतो की, व्हिक्टोरीया गोदीमध्ये सामान उतरवत असतांना एका जहाजाला आग लागली आहे. कोणत्या जहाजाला आग लागली आहे? या प्रश्नाला, काही कल्पना नाही हे उत्तर मिळतांच त्याच्या काळजाचा ठोका चुकतो. कारण गोदीत उभ्या असणा-या किमान चार जहाजात विस्फोटक सामुग्री होती. परमेश्वर करो आणि त्यांच्यैकी एखाद्या जहाजावर ही आग न लागो किमान फोर्ट स्टिकिन वर तरी लागली नसली तर बरे होईल. मात्र व्हिक्टोरिया गॊदीत पोहोचताच त्याची सर्वात मोठी भितीच खरी ठरल्याचे दिसून आले कारण आग लागलेली बोट फोर्ट स्टिकिनच होती. हे मालवाहू जहाज एक क्रमांकाच्या धक्क्यावर उभे होते या जहाजा बरोबरच इतर १४ जहाजांतून माल उतरवण्याचे काम चालू होते. शेजारीच असलेल्या प्रिन्स गोदीत आणखी दहा जहाजे उभी होती. ही जहाजे बंदरातील मुख्य धक्क्यावर उभी होती त्यांच्यामागे भर समुद्रात आणखी दोन जहाजे उभी होती.
जहाजावर प्रवेश केल्यावर कॅप्टन ओब्रेस्टला फारशी मोठी आग लागल्याचे चिन्ह दिसले नाही. जहाजावर फारच थोड्या व्यक्ती उपस्थीत होत्या, दोनजण आग विझवण्यासाठी पाण्याचे पाईप लावत असलेले त्याला आढळले. क्रमांक दोनच्या सामान्याच्या कप्प्यात हे प्रयत्न चालू असलेले त्याला दिसले. त्याने आपली ओळख करून देतांच जहाजाचा दुय्यम अधिकारी त्याला आपल्या केबिनमध्ये घेऊन जातो तेथेच कोठे कोठे काय समान ठेवले आहे याचा नकाशा पाहून थोड्याफार चर्चेवरुन कॅप्टन ओब्रेस्ट उपस्थित सर्वांनाच जाणीव करून देतो की आग ताबडतोब आटोक्यात आणली नाही तर संपुर्ण बंदरच उध्वस्त होण्याचा धोका आहे.
फोर्ट स्टिकिन हे जहाज जुलै ,१९४२ बांधून ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथे बांधून तयार झाले होते. अमेरिकेच्या एका जहाज कंपनीच्या मालकीचे हे जहाज ब्रिटिश सरकारने लीजवर घेतलेले होते. त्याकाळातले हे सर्वोत्तम मालवाहू जहाज म्हणून ओळखले जात होते. कॅप्टन नैस्मिथ हा सुरुवातीपासूनच या जहाजाच कप्तान होता. त्याची कप्तान म्हणून ही पहिलीच नेमणूक होती आणि मुंबईच्या या फेरीपर्यंत तोच या जहाजाचा कप्तान होता. या प्रवासापूर्वी त्याच्या अधिपत्याखाली या जहाजाने चार पूर्ण फे-या पूर्ण केल्या होत्या आणि या जहाजाची ही पांचवी फेरी होती कराची आणि मुंबईची.
सामान साठवण्याच्या कप्प्यांमधुन एकदम अंतर्भागात १३९५ टन विध्वंसक विस्फोटक पदार्थ ठेवण्यांत आले होते. यात बॉम्बचे कवच, पाणसुरुंग, युद्धांत वापरला जाणारा विविध प्रकारचा दारुगोळा यांचा समावेश होता. हा विध्वंसक दारुगोळा मुंबई बंदरावर उतरवला जाणार होता. त्यानंतरच्या कप्प्यांध्ये कराचीला उतरवण्यासाठी आणखी दारुगोळा भरण्यात आला होता. वरच्या डेकवर पुन्हा पाण्यात पेरण्याचे सुरुंग ठेवण्यांत आले होते. थोडक्यात जहाजाच्या कप्पा क्र. दोनमध्ये दोन्ही मजल्यावर आणि जहाजाच्या तीन बाजूंना अतिशय संवेदनाशील आशा "ए" दर्जाच्या स्फोटकांची साठवणूक केली होती. चवथ्या बाजूला ५ फूट x ४ फूट x ४ फूट आकाराचा स्टिलचा पेटारा ठेवण्यात आला होता. त्यामध्ये ३१ लाकडी पेट्यांमध्ये एका पेटीत चार अशा प्रत्येकी १३ किलो वजनाच्या १२४ सोन्याच्या विटा ठेवण्यात आल्या होत्या. या विटा युध्दकाळात रुपयाचे घसरते मूल्य स्थिर करण्यासाठी भारतीय बॅंकेत जामा करण्यासाठी ब्रिटिश सरकारी खजिन्यातून आलेल्या होत्या. त्यावेळचे त्यांचे मूल्य १० ते वीस लाख पौंड इतके असावे असे मानले जाते कारण वेगवेगळे अभ्यासक या किंमती बाबत वेगवेगळी मते मांडतात. तरीही १९४४ च्या काळात दहा ते वीस लाख पौंड ही रक्कम लहान नव्हती. जहाजाच्या उपकप्तान Haaris ने या संबंधीत कागपत्रांवर स्वाक्षरी करून या सर्व ऐवजाचा ताबा घेतला होता. सोन्याच्या स्टीलच्या पेटा-याला विशेष संरक्षण दिली गेले होते.
२४ फेब्रुवारी १९४४ ला फोर्ट स्टिकिन ब्रिटनच्या ब्रिकनहेड बंदरावरुन आपल्या नियोजित प्रवासासाठी रवाना झाली. फोर्ट स्टिकिन बरोबरच या मार्गावरून प्रवास करणारी इतरही २० जहाजे मिळून २० जहाजांचा एक जथा तयार झाला. लवकरच या ताफ्यात ग्लासगो आणि बेल्फ़ास्ट येथून निघालेली काही जाहाचे दाखल झाली आणि आता हा ताफा सुमारे पन्नास जहाजांच्या गटाने मार्गक्रमण करू लागला. यावेळी दुसरे महायुध्द सुरु होते त्यामुळे या जहाजांच्या या ताफ्याला संरक्षण देण्यासाठी दोन विमानवाहू युद्धनौका, युध्दात भाग घेतलेल्या आणखी काही नौका, शेल अमास्त्रा ही आणखी एक युध्दनौका या मालवाहू जहाजांबरोबर मार्गक्रमण करू लागल्या.
जिब्राल्टर पर्यंतचा प्रवासाच पहिला टप्पा ब-याच घडामोडींचा ठरला. अतिशय खराब वातावरणात आपल्या नौकेवर उतरण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन दोन वैमानिक ठार झाले. जिब्राल्टरच्या आखातात पोहोचताच जहाजांचा हा जथा दोन भागात विभाजित होऊन एक गट पश्चिम आफ्रिकेकडे रवाना होतो तर फोर्ट स्टिकिनचा गट मेडीटेरियन कडे वळतो काही तासांतच स्टिकिन्स ला अमेरिकेहून भारताकडे निघालेले एक जहाज येवून मिळते. फोर्ट स्टिकिनवर असलेल्या स्फोटक सामुग्रीमुळे या जाहाजाला सर्वात बाहेरच्या रांगेत ठेवण्यात आले. उत्तर आफ्रिकेच्या बंदरातून प्रवास करतांना युध्दकाळातील हवाई हल्ल्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून फोर्ट स्टिकिनसह इतर जहाजांनी आपल्यावर संरक्षक फुग्यांचे कवच धारण केले होते. यामुळे या सर्वच जहाजांचा प्रवास अतिशय संथ गतीने चालू होता. अल्जेरीस सोडतांना या जत्थ्यावर जर्मनीचा जोरदार हवाई हल्ला झाला मात्र सुदैवाने फोर्ट स्टिकिन पासून एक रांग सोडून हा हल्ला झाल्यामुळे हे जहाज या हल्ल्ल्यातून बचावते. संध्याकाळी सुरु झालेले हे आक्रमण रात्र झाली तरी चालूच होते. मात्र काही काळाने इंधन संपत आल्याने हल्लेखोर विमाने आपल्या तळाकडे परतात. मेडीटेरियन मधील पुढील प्रवास फारशा काही घडामोडी न घढता सुखरूप पार पडतो. दक्षिण सिसिली ला पोहोचतांच हा ताफा पुंन्हा एकदा दोन गटात विभागाला जाऊन मोठा ताफा उत्तरेकडे इटलीच्या दिशेने वळतो तर फोर्ट स्टिकिनसह ११ जहाजांचा ताफा पोर्ट सैद कडे रवाना होतो. येथे इंधन भरून जहाज पुढिल प्रवासाठी रवाना होऊन रेड समुद्र, एडनच्या आखातातून फोर्ट स्टिकिन आपल्या नियोजित प्रवासाच्या पहिल्या बंदरावर कराचीला दाखल होते.
३० मार्च, १९४४ च्या दुपारी तीन वाजता हे जहाज कराची बंदरात दाखल झाल्यावर तेथे उतरवण्याचे सामान उतरवल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेत मुंबईकडे रवाना करण्यात येणारे सामान भरण्याचे काम सुरु होते. या सामानात ८७०० कापसाच्या गासड्या (गठ्ठे), वंगणाच्या तेलाचे पिंप, लाकूड, टाकावू लोखंड, सल्फर, माशांचे खत, सल्फर, तांदूळ, बेदाणे यांचा समावेश होता. हे सर्व सामान एकत्रितपणे वाहून नेणे प्रचंड धोकादायक होते. अशा धोकादायक संमिश्र सामानाच्या वाहतुकीच्या विरोधात कप्तान नैमस्मिथ आपल्या कंपनीकडे तक्रार नोंदवतांच त्याला उत्तर मिळते की, 'तुला माहित नाही का, की सध्या युध्द सुरु आहे? हे सर्व सामान वाहून नेण्याशिवाय काहिही पर्याय नाही." या सर्वांवर कळस म्हणजे ७ एप्रिलला अतिशय ज्वालाग्रही अशा टर्पेंटाईनची ७५० पिंप जहाजाच्या वरच्या डेकवर कोळसा साठवण्याच्या बंकरच्या वर ठेवण्याच्या सूचना त्याला जहाज कंपनीकडून मिळतात. मात्र ही सूचना स्पष्टपणे फेटाळून लावून नैमस्मिथ ही वाहतूक करण्यास नकार देतो. त्याचे सर्व सहकारी अधिकारी कापसाच्या गासड्या आणि वंगणाचे तेल एकाच कप्प्यात साठवण्यातला धोका लक्षात आणून देतात. मात्र जहाजावर अथवा कराची बंदरात या सामानाची वाहतूक करण्यासंबंधी काही नियमावली उपलब्ध नसल्यामुळे या दोन ज्वालाग्रही पदार्थांची साठवण पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केली जाते. वास्तविक दोनच वर्षांपूर्वी (१९४२ मध्ये) अमेरिकन सरकारने अशा सामानाच्या वाहतुकीची नियमावली तयार केलेली होती. इतरही पुस्तक प्रकाशीत झालेले होते त्यामध्ये अतिशय विस्तृतपणे यांच्या साठवणुकीच्या सूचना दिलेल्या होत्या. मात्र त्या वेळीच उपलब्ध न झाल्यामुळे कापूस आणि वंगणाचे तेल एकाच कप्प्यात फारशी काळजी न घेता २५० पेक्षा अधिक वंगण तेलाचे डबे एका वेळी वाहतूक करू नये अशा स्पष्ट सूचना असतांना अनवधानाने फोर्ट स्टिकिनवर हजारो डबे वंगण कापाच्या गासड्यांच्या अगदी वर साठवण्यात आले. खरे तर या दोघांचा एकमेकांशी जराही संपर्क होता कामा नये अशा स्पष्ट सूचना अमेरीकन नियमावलीत होत्या.
फोर्ट स्टिकिनच्या दुस-या, तिस-या आणि चौथ्या कप्प्यातील विस्फोटक शस्त्रांस्त्रांचा साठा, विविध ज्वालाग्रही पदार्थांचा संमिश्र साठा यामुळे कप्तान नैमस्मिथ त्याच्या सहाय्यकाला म्हणाला, 'आपण अशा सर्व वस्तू घेऊन प्रवास करीत आहोत की ज्यामुळे एकतर या जहाजाला प्रचंड आग लागेल किंवा भयानक विनाशकारी स्फोट होईल.' सहाय्यक कप्तानाने त्याच्यापरीने सर्व काळजी घेत सर्व सामानाची व्यवस्थित जहाजावर भरले. त्याच्या सहका-यांनी अथक परिश्रम करून समाधानकारकारकपणे काम पूर्ण करून एका संरक्षक जहाजासह फोर्ट स्टिकिनने ९ मार्च, १९४४ ला मुंबईच्या दिशेने प्रयाण केले.
फोर्ट स्टिकिन १२ एप्रिलच्या पहाटे सुमारास मुंबईला पोहोचली. मुंबई बंदराच्या जवळच या जहाजाने नांगर टाकला.
- क्रमशः
प्रतिक्रिया
12 Apr 2013 - 3:49 pm | मनराव
मस्त सुरुवात......नविन माहिती मिळाली.....
12 Apr 2013 - 4:52 pm | राही
छान लिहिले आहे.जुन्या वाचनस्मृती ताज्या झाल्या...
पण माझ्यामते मुम्बईवरचे सर्वांत भीषण अरिष्ट म्हणजे २६ जुलै २००५ चा प्रलय. यात एक हजारच्या वर लोकांनी जीव गमावला.बाकी इतर हानी तर प्रचंड होती.
12 Apr 2013 - 7:25 pm | मी-सौरभ
या बद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे पु.भा.प्र.
13 Apr 2013 - 9:44 am | मोदक
वाचतोय. पुभाप्र.
13 Apr 2013 - 10:02 am | चावटमेला
नवीनच माहिती. पुभाप्र
13 Apr 2013 - 10:07 am | किसन शिंदे
नविन माहिती मिळाली.
पुढचा भाग येऊद्या लवकर.
13 Apr 2013 - 10:19 am | चिरोटा
जुन्या पिढीतल्या लोकांकडून ही घटना ऐकली होती.
13 Apr 2013 - 11:14 am | अमोल खरे
सुंदर लेख. ह्या बोटीवरील आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाचे अनेक जवान ही आग विझवताना शहिद झाले. ह्या बोटीवरील सोन्याच्या का चांदिच्या विटा उंच उडुन जवळपासच्या एरियात पडल्या आणि अनेक लोकांना अनपेक्षित धनलाभ झाला. स्फोटाचा आवाज खुप दुरपर्यंत ऐकु गेला होता असं म्हणतात.
पुढील भाग लवकर टाका.
13 Apr 2013 - 6:37 pm | मुक्त विहारि
पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत..
13 Apr 2013 - 6:44 pm | प्यारे१
पु ले शु
14 Apr 2013 - 3:08 am | लाल टोपी
प्रतिसाद देणा-या सर्वांना मनापासून धन्यवाद!!
14 Apr 2013 - 12:04 pm | रमताराम
चांगला विषय निवडला आहे. वाचतोय. पुलेशु.
15 Apr 2013 - 3:46 pm | रोहन अजय संसारे
मी आता हि मुंबई पोर्ट जवळ राहतो . त्यामुळे खूप छान माहिती मिळाली