स्वामिनी

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जनातलं, मनातलं
1 Feb 2013 - 7:36 pm

गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं.

तिचे आणि माझे नाते, स्वामिनी आणि चाकराचे. पण ती खुप चांगली आहे, हिडीस-फिडीस नाही करत कधी. तिची अट एकचं असते निमुटपणे तिच्या आज्ञा पाळणे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही तिला. मला तिचे सगळे मुड सांभाळायला लागतात. कारण मुळातच ती फार लहरी आहे. आणि तिच्या या लहरीपणामध्ये प्रचंड ताकद असते. त्या लहरींवर मी लाटेवरील कागदाच्या होडीसारखा असतो. तितकाच असहाय्य, तितकाच बिचारा. दिशा ती देते, वेग ती देते, लक्ष ती ठरवते, मार्गही तिचाच असतो. मी फक्त हुकुमबरहुकुम वहायचे असते. किती खोल जायचे, किती उंची गाठायची, किती वेगाने खोल जायचे अन् किती वेगाने उंचावर पोहचायचे हे देखिल तिच ठरवते.

पण त्याचं काय आहे कि ती माझ्या नसानसांत भिनली आहे आता. त्यामुळे माझ्यापाशी काहीच पर्याय उरत नाही. म्हणूनच मगाशी म्हटले ना, मी खुपचं बिचारा होऊन जातो तिच्यापुढे. शिवाय असं आहे, तिच्यासोबत असतांना मी 'मी' होऊन जगत असतो. मला ती माझीचं स्वप्न दाखवते, माझ्या मनातल्या सर्व कल्पनांना मुर्त स्वरुप देते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला अगणित अन् अद्वितीय आनंद देते. या सगळ्या मोबदल्यासाठी मी तिचे सर्व हुकुम पाळायला तयार असतो. एका पायावर.

कधी कधी ती एखाद्या विजेच्या लोळासारखी कोसळते माझ्यावर. तेव्हा मी ठिकर्‍या ठिकर्‍यात विखुरला जातो. कधी मला अलगद उचलून चंद्रावर नेऊन बसवते, एकतर तो चंद्र जाळतो, किंवा थंड चांदण्याचा वर्षाव करतो. त्याचाही काही इलाज नसतो, तोही तिच्याच आज्ञेत असतो त्या क्षणाला. कधी कधी मान धरुन सरळ सागरतळ दाखवून आणते. तिथे मला कधी पोकळ शिंपले सापडतात तर कधी एखादा मोती हाती लागतो. असा मोती सापडला की ती सहजपणे माझ्या हातावर ठेवून ती निघून जाते. मग माझे मलाच कळत नाही, मोती मिळाल्याचा आनंद वाटायला हवा कि ती निघून गेल्याचे वाईट वाटायला हवे.

असं म्हणतात कि काही काही लोकांना भूतं झपाटतात. मला ती झपाटते, मी तिचे झाड आहे म्हणा नां. ;) पण एकदा तिने माझ्यात संचार केला की मी संपूर्ण तिच्या स्वाधीन असतो. माझ्यात प्रचंड ताकद असते. मी सगळ्या जगाचा स्वामी असतो. मी माझ्याच आत्म्याला बघू शकतो. माझेच मन माझ्यासमोर लख्ख असते. माझ्या सगळ्या चुका, माझे पाप-पुण्य, माझे गुणावगुण काचेसारखे चकाकतात माझ्याच डोळ्यांसमोर, एक अंधारी येते, काही वेदना कुस बदलतात, काही सुखं चटका देतात. तिचे डोळे हे सगळं अत्यंत अपूर्वाईने पाहत असतात. ते डोळे जणू सूर्योदयाच्या आधी पूर्वेच्या आकाशातील फुटलेले सोनेरी किरण असतात. जेव्हा तो चंद्र मला जाळत असतो, तेव्हा त्या डोळ्यांतून काही थेंब ओघळतात, खार्‍या पाण्याचे. ते जेव्हा माझ्या ओळंजीत पडतात तेव्हा ती मोहक पहाटेच्या आधीची सकाळ हातात आल्याचा आनंद उमटतो माझ्या चेहर्‍यावर. मग तिचाही चेहरा खुलतो आणि ती डोळे एकदा बंद करुन परत उघडते, तेव्हा तशीच शांतता असते मनात, जशी आरती नुकतीच संपल्यावर देवळात असते.

इतक्या वर्षांच्या परिचयानंतरही मला अजून हे माहीत नाही कि ती नक्की राहते कुठे. जेव्हा माझ्याकडे येते तेव्हाही ती माझ्या जाणिंवांमध्ये असते, तिला स्पर्श करायला गेलो तर फक्त धुके लागते हाताला. जाते तेव्हाही जसा एखादा आवाज दूर दूर जाऊन विरुन जातो तशी निघून जाते. तिला गाठतांना कधी कधी माझा छातीचा भाता होतो पण तिला गाठूचं शकत नाही तिला. आणि कधी कधी अनपेक्षितपणे ती मला, मी जिथे असेल तिथून उचलून तिच्या साम्राज्यात नेऊन ठेवते. तिथे मी स्वर्गसुखात असतो. पण मला हे माहीत नसते, ती कधी परत मला उचलून या शहाण्यांच्या जगात फेकून देईल. त्या क्षणाला मी मरणाच्या क्षणापेक्षाही जास्त घाबरुन आहे. आणि ती मला दरवेळेस या मरण यातना देते. काय करणार ती माझी स्वामिनी आहे, तिच्यापुढे मी अगदीच बिचारा असतो.

मला कधी कधी वाटते, ती आपल्या बटव्यात सगळं काही भरुन घेऊन घेते, रात्र, चंद्र, मद्ध्यांन्य, धुके, दव, लालभडक रक्त, रक्तवर्णी जास्वंद, काही तुळशीच्या मंजीर्‍या, थोडे गुलाब, काही श्वास, काही घोंगावणारी वादळं, थोडा एकटेपणा, काही जळणारे अश्रु, नाती, निरव शांतता, काही नाजूक वेळा, आणि खुप सारे प्रेम. आता इतक्या वस्तु समोर मांडल्यावर त्यातून काय निवडायचे हे ति तिच्या मनातल्या मनात ठरवून ठेवते आणि माझ्या झोळीत टाकते. त्या सर्व वस्तूंमधून मी काय निवडतोय यावर बारिक लक्ष ठेवते आणि फक्त इशार्‍यांनी माझ्याकडून तिला हवे ते करुन घेते. मीही चुपचाप तिला हवे ते करतो. कारण तेवढेच माझ्या हातात असते.

ती निघून गेल्यावर सुन्न असतो मी काही वेळ. हळूहळू जाणिवा परतल्यावर माझ्या मनात आनंद आकंठ भरलेला असतो. मी पुर्ण रिकामा आणि समाधानी असतो. मग मी माझा आनंद आणि समाधान घेऊन तुमच्या समोर येतो. अभिमानाने. मला व्वाह व्वाह मिळावे म्हणून नव्हे. माझा आनंद आणि समाधान तुमच्यासोबत वाटून घ्यायचे असते. हो वाटायलाच लागते मला. कारण तिच्या आणि माझ्या करारात तसेच मान्य केले आहे मी. आणि तिच्याशी झालेला करार मला पाळावाच लागतो नाहीतर ती माझ्यावर नाराज होणार आणि मी ते सग्गळ गमावणार जे ती म्हणजेच "माझी कविता", मला देऊन माझ्या जगण्याला अर्थ देते, मायने देते.

तश्या माझ्या या कवितेला तुम्ही आधीही भेटला आहात पण तिची अशी ओळख प्रथमच करुन देतोय. सांगा बरं कशी वाटली, माझी कविता.

इति लेखनसीमा.

कवितामुक्तकरेखाटनप्रकटनविचारआस्वाद

प्रतिक्रिया

फार सुंदर आणि प्रखर (इन्टेन्स) सचोटीचे मुक्तक. खूप आवडले.

आणि ती डोळे एकदा बंद करुन परत उघडते, तेव्हा तशीच शांतता असते मनात, जशी आरती नुकतीच संपल्यावर देवळात असते.

मी या ओळी वाचून जवळजवळ एका समाधीत पोचले.

ओह माय गॉड!!!
________________________________________

माझ्या आवडीच्या कवियत्रीचे "कविता" या विषयावरील मुक्तक/कविता पुढे -

Poetry Is....

how do I define, describe,
make it come alive so that you
might see what it is to me.....

poetry is an unfinished dream, a
thought given wings, and that
moment almost forgotten... it is

a reflection of self, a breath never
taken, and a memory I cannot
forget... poetry is a glimpse into

the past, vision of tomorrow,
and truth of today... it bleeds
sorrow and radiates joy, marks

time and remains timeless, is rich
tapestry and blank canvas, and
it is the music that fills my heart

and what it means to me is
....everything.

- Myrna D Badgerow

आणखी एका कवीचे "कवितेबद्दलचे" हे चिंतन (म्युझिंग) माझ्या अतिशय आवडीच्या पुस्तकातून -

Some narrations from book - The language of life - a festival of poets by Bill Moyers
Moyers - I am curious about how your description of the communal quality of poetry relates to your poem "How poetry comes to me" - what is it that you go to meet at the edge of the light?
How poetry comes to me
It comes blundering over the
Boulders at night, it stays
Frightened outside the
Range of my campfire
I go to meet it at the
Edge of the light
Snyder - I go to meet that blundering, clumsy, beautiful, shy world of poetic, archetypal, wild intuition that's not going to come into the broad daylight of rational mind but wants to peek in.
Moyers - Poetry is like a wild animal?
Snyder -You bet. Claude Levi-Strauss the great french anthropologist said that the arts & poetry in the 20th century are the "national parks of the imagination". I love that metaphore - the wilderness area of the mind.

कवितानागेश's picture

1 Feb 2013 - 8:28 pm | कवितानागेश

सुंदर अभिव्यक्ती.
तिच्याशी झालेला करार मला पाळावाच लागतो नाहीतर ती माझ्यावर नाराज होणार आणि मी ते सग्गळ गमावणार >
हे अगदी पटलं...
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले ...

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले ...

वा! वा! आज काही माझं खरं नाही.

दिवसाची सुरुवात इतक्या सुंदर चिंतनाने (मुक्तक) झाली. खरच भरुन पावले. (My cup runneth over!)

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले ...

अगदी अनुरुप ओळी.

उर्जिता's picture

1 Feb 2013 - 8:34 pm | उर्जिता

ईतकं सुंदर लिहिलय तुम्ही , की वाचताना एक दिर्घकाव्य\वाचण्याची प्राचीति आलि.! अप्रतिम..!

अग्निकोल्हा's picture

1 Feb 2013 - 8:52 pm | अग्निकोल्हा

कवितेबद्दल मनोगत होतं काय ? माझ्या मनात लेखाचा शेवट येइपर्यंत कल्पनाच होती. थोडासा मिसमॅच झाला... पण मग जाणवलं ती कविताच असणार कल्पना नाही. अभिमानाने आनंद आणि समाधान वाटता यायला कविताच हवी, नुसती कल्पना नको... :)

मला व्वाह व्वाह मिळावे म्हणून नव्हे. माझा आनंद आणि समाधान तुमच्यासोबत वाटून घ्यायचे असते!

शाब्बास!

स्पंदना's picture

2 Feb 2013 - 7:35 am | स्पंदना

तशीच शांतता असते मनात, जशी आरती नुकतीच संपल्यावर देवळात असते

.

या वाक्याला जणु सारा हलकल्लोळ विरला अन लेखाशी पूरी तादात्म्यता साधली गेली. नेमकं काय म्हणायच आहे ते सांगण्यासाठी समर्पक शब्द सुचणे हे ही कवितेचचं देणं!

५० फक्त's picture

4 Feb 2013 - 11:33 am | ५० फक्त

हा अनुभव दोन ठिकाणी आलेला आहे, पहिला बराच वर्षे, सोलापुरचं दातेंचं गणपतीचं देउळ,धुंडिराजशास्त्री दाते, आरती संपल्यावर एक दोन क्षण शांत उभे राहायचे, तेजपुंजतेची माझी कल्पना आजदेखील त्यांच्याजवळ संपते. आणि दुसरा अनुभव मालवणच्या साळगांवकरांच्या गणपतीच्या देवळातला. दोन्हीही अप्रतिम आणि अशक्य आहेत.

पण असे अनुभव तुळजापुरला कधीही आलेला नाही.

राही's picture

2 Feb 2013 - 7:54 am | राही

समर्पक शब्दांत समर्थपणे व्यक्त झालेली अनुभूती.
मुक्तक आवडले.

यशोधरा's picture

2 Feb 2013 - 8:00 am | यशोधरा

छान लिहिलं आहे.

किसन शिंदे's picture

2 Feb 2013 - 8:26 am | किसन शिंदे

वाह मिका!!
अतिशय सुंदर लिहलंय.

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2013 - 8:51 am | नगरीनिरंजन

छान, इन्टेन्स लिहीलंय.

मन१'s picture

2 Feb 2013 - 9:55 am | मन१

मस्तच.

क्या बात है! खुपच छान लिहिले आहे तुम्ही!

क्रान्ति's picture

2 Feb 2013 - 4:25 pm | क्रान्ति

अप्रतिम ललितकाव्य!

जेव्हा माझ्याकडे येते तेव्हाही ती माझ्या जाणिंवांमध्ये असते, तिला स्पर्श करायला गेलो तर फक्त धुके लागते हाताला. जाते तेव्हाही जसा एखादा आवाज दूर दूर जाऊन विरुन जातो तशी निघून जाते.

ही अनुभूती मिळणं ही दैवी देणगीच आहे!

चेतन माने's picture

2 Feb 2013 - 5:17 pm | चेतन माने

फारच सुंदर लिहिलं आहे, छान :) :) :)

तिमा's picture

2 Feb 2013 - 6:49 pm | तिमा

गविंचा आदेश मोडला आहे, कारण गद्यातूनही तुम्ही कविताच लिहिली आहे.

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:33 pm | पैसा

मस्त जमलेला लेख. पण त्या कवितेसारख्या वेदना दिल्यास तरी चालेल आम्हाला!

नक्शत्त्रा's picture

4 Feb 2013 - 11:58 am | नक्शत्त्रा

वा! वा!

पियुशा's picture

5 Feb 2013 - 4:36 pm | पियुशा

मस्त मिकाभौ :)