मेसोअमेरिका (६.२) - आस्तेक

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
31 Jan 2013 - 11:58 am

या लेखमालिकेतील हा शेवटचा भाग. त्यानिमित्ताने थॊडंसं मनातलं....
माझ्या पहिल्याच लिखाणाला भरपूर प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व प्रतिसादक आणि वाचक यांना मनापसून धन्यवाद. मलाही लेखमालिका लिहितांना खूप समाधान मिळालं. तुमच्या प्रश्नांची उत्तर देतांना माझ्याही ज्ञानात बरीच भर पडली. पुन्हा एकदा मनःपुर्वक धन्यवाद. :-)
***********************************************************************************************
मागील भाग : मेसोअमेरिका (६.१) - आस्तेक

इसवी सनातलं १५ वं शतक जागतिक इतिहासात मैलाचा दगड मानलं जातं. एकीकडे अतिपूर्वेला याच शतकात बांधलेल्या 'फॉरबिडन सिटी" ने कित्येक अश्राप मुलींचं आयुष्य देशोधडीला लावलं तर भारतभूमीत विजनगरचं राज्य बहरलं, इकडे युरोपात विज्ञानाची कास धरून अनेक संशोधक प्रयोगात गुंतले असतांना स्पेन व पोर्तुगाल या दोन देशांमध्ये झालेल्या कराराने या दोन्ही देशांना युरोपाबाहेरच्या भूमीचे दरवाजे उघडे झाले. कॉन्स्टिंटीनोपलच्या पाडावामुळे युरोपियन देशांना नवीन व्यापारी मार्गाची गरज भासू लागलीच होती. तिकडे दक्षिणेकडे इंका माचूपिचु बांधण्यात गर्क होते.

इसवी सन १५ व्या शतकात संपूर्ण जगात अनेकानेक घडामोडी घडत असतांनाच १४९२ साली कोलंबसने स्पॅनिश राजाश्रयाखाली अमेरिका खंडाचा शोध लावला आणि स्पेनसाठी या नव्या जगाचे दरवाजे उघडे झाले. त्यानंतर स्पॅनिशांनी अनेकानेक योजना आखून या भागाकडे आपला मोर्चा वळवला. स्पेनमधून नवीन जगाच्या शोधार्थ निघालेल्या सैन्यात एक सैनिक होता. "अर्नान कोर्तेस". अर्नान कोर्तेस म्हणजे संधिसाधू, कावेबाजपणा, अत्यंत टोकाची महत्त्वकांक्षा, कॅथलिक धर्मावर अतोनात श्रद्धा पण त्याचबरोबर हुशारी, धाडस, चिकाटी या गुणांचं एक अनोख मिश्रण असणारं व्यक्तिमत्त्व. सन १५११ साली क्युबाबरोबर झालेल्या लढतीत अतुलनीय कामगिरी करून तो सेनाधिकारी झाला. पुढे सात वर्ष क्युबाचा अधिकारी म्हणून काम केल्यावर सन १५१९ मध्ये त्याने आपला मोर्चा नुकताच शोध लागलेल्या मेक्सिकोच्या दिशेने वळवला.

https://lh3.googleusercontent.com/-vMspD3IFa0M/UQn-QI1dVhI/AAAAAAAAA2U/t4iluowNsDw/s234/200px-Cortes.jpg

(अर्नान कोर्तेस)

याच सुमारास आस्तेकांचं राज्य प्रगतीच्या अत्त्युच्य शिखरावर होतं. लढावय्या, पराक्रमी आस्तेक राजांनी जीवाची बाजी लावून आपलं राज्य मोठं केलं. खडकाळ जमिनीत शेती फुलवली. अंगभूत कलागुणांचा वापर करून विविध शिल्प, इमारती घडवल्या. आस्तेक राजांना 'मोंतेझूमा' म्हणत. पंधराव्या शतकाच्या सुमारास मोंतेझुमा दुसरा हा अतिपराक्रमी पण देवभोळा आस्तेक राजा राज्य चालवित होता. स्पॅनिशांनी अनेक ठिकाणी त्याची वर्णन लिहून ठेवली आहेत. आस्तेक यशाच्या अत्युच्च शिखरावर असतांना त्याच्याकडे अगणित सोनं, रत्ने, हिरे, माणकं होती. त्याला ८ मुली व ११ मुलं होती. त्याची 'केत्झलकोइत्ल' या नागदेवावर अपार श्रद्धा. आपल्याला पडणारर्‍या प्रश्नांची उत्तरं धर्मात शोधायची सवय धर्मभोळ्या आस्तेकांना होती. त्यातूनच अनेक आख्यायिका तयार झाल्या.

https://lh3.googleusercontent.com/-G1VoyWTLhvA/UQn-QzCS27I/AAAAAAAAA2o/5AEwnspMCIU/s320/montezuma.jpg

(आस्तेक राजा - मोंतेझुमा दुसरा)

केत्झलकोइत्ल देवाची ही अशीच एक आख्यायिका. केत्झलकोइत्ल हा महत्त्वाचा देव असला तरी Tezcatlipoca नावाच्या अजून एक लढाऊ देवाची उपासना चाले. या दोन देवांच्या उपसाकांमध्ये आपापसात वैर होतं. त्यांच्या आपापसात बरेचदा लढाया होतं. अशाच एका लढाईत अखेर 'तोपित्ल्झीन' या केत्झलकोइत्ल भक्त राजाचा पराभव झाला आणि त्याला आपलं राज्य सोडावं लागलं. राजाने नाईलाजाने राज्य सोडलं. त्याने सापांचा तराफा केला आणि समुद्रामार्गे पूर्वेस पळून गेला. पण जाताना "मी नाईलाजाने जात असलो तरी भविष्यात परत येईन आणि माझं राज्य काबीज करेन" असं आश्वासन प्रजेला दिलं. पुढील कित्येक पिढ्या या आख्यायीकेचा प्रभाव लोकांवर होता. पुढच्या अनेक राजांनी तोपित्ल्झीनची वाट पाहिली. आस्तेकांचा तत्कालीन राजा मोंतेझुमा दुसरा हा ही आपल्या राजाची आतुरतेने वाट बघत होता.

इकडे अर्नान कोर्तेसने ६०० सैनिक व काही घोडे असं तुटपुंजं सैन्य व प्रचंड महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून मेक्सिकोच्या दिशेने प्रवास चालू केला. तो सर्वप्रथम मेक्सिकोच्या पूर्व किनाऱ्यावर उतरला. त्याने तिथे येशूच्या नावाने क्रॉस उभा केला आणि तो प्रदेश स्पॅनिश राजाच्या नावे घोषित केला. त्याच नाव त्याने वेरा क्रुझ (Vera Cruz – अर्थ : True Cross) असं ठेवलं.

त्यानंतर त्याने आस्तेक राजधानी तेनोचीत्लानच्या दिशेने कूच करण्यास प्रारंभ केला. वाटेत मोठ्या हुशारीने आस्तेक शत्रू राज्यांशी त्याने मैत्री केली. आस्तेक नेहमीच बळींसाठी आसपासच्या राज्यांबरोबर लढाई करीत. सततच्या लढाईने ही राज्यं बेजार झाली होती. त्यांनी ही लागलीच मदतीचा हात पुढे केला. त्यातलं एक महत्त्वाचं नाव Tlaxcala या राज्याच्या राजाने कोर्तेसला सैन्य व इतर बऱ्याच गोष्टीची मदत देऊ केली.

हळूहळू आस्तेक राजाच्या कानावर या बातम्या तसंच कोर्तेसचं वर्णन कानी पडू लागलं. अर्नान कोर्तेस हा स्पॅनिश रक्ताचा गौरवर्णी, शरीरयष्टी कमावलेला, रुबाबदार सैनिक. तसंच तो घोड्यावर मांड टाकून फिरत असे. एकतर आस्तेकांसाठी घोडा हा कधीही न पाहिलेला प्राणी त्यात भर म्हणून कोर्तेस व स्पॅनिश सैन्याची रुबाबदार देहयष्टी. त्यातून द्रष्ट्या कोर्तेसने मेक्सिकोच्या भूमीत प्रवेश केला तो पूर्वेच्या दिशेने - ज्या दिशेला आस्तेकंचा राजा पळून गेला होता. या सगळ्याचा यथोचित परिणाम मोंतेझुमावर झाला आणि त्याला कोर्तेस म्हणजे वर उल्लेख केलेल्या आख्यायिकेतला राजा वाटू लागला. घोडयावर बसलेलं स्पॅनिश सैन्य आस्तेकांना माणसाचं डोक असलेलं जनावर वाटे. हा अजब प्रकार शूर आस्तेकांच्या मनात धडकी भरु लागलं.

आस्तेक राजा घाबरला तर होताच पण त्याला आपला राजा आता परतून आपलं राज्य परत घेणार असंही वाटू लागलं. त्याला लढाई टाळायची होती. त्याने लागलीच कोर्तेस व त्याच्या सैन्याच्या स्वागतार्थ संदेश व अमूल्य अशा भेटी आपल्या सेवकांच्या हाती पाठवल्या. त्याची उत्तम बडदास्त ठेवली. हुशार कोर्तेसनंही त्याच्या अंधश्रद्देला स्वत:ला राजाचा अवतार भासवून चांगलंच खतपाणी घातलं. मोंतेझुमाने कोर्तेसला आपला राजा समजून पाठवलेल्या संदेशातला हा देवाचं गुणगान गाणारा हा आस्तेक भाषेतला काही भाग.

"Our lord, thou hast suffered fatigue, thou hast endured weariness. Thou hast come to arrive on earth. Thou hast come to govern thy city of Mexico; thou hast come to descend upon thy mat, upon thy seat, which for a moment I have guarded for thee. For thy governors are departed - the rulers Itzcoatl, Montezuma the Elder, Axayactl, Tizoc, Auitzotl, who yet a very short time ago had come to govern the city of Mexico. O that one of them might witness, might marvel at what to me now hath befallen, at what I see now that they have quite gone. I by no means merely dream, I do not merely dream that I see thee, that I look into thy face. I have been afflicted [troubled] for some time. I have gazed at the unknown place whence thou hast come - from among the clouds, from among the mists. And so this. The rulers departed maintaining that thou wouldst come to visit thy city, that thou wouldst come to descend upon thy mat, upon thy seat. And now it has been fulfilled; thou hast come. Thou hast endured fatigue, thou hast endured weariness. peace be with thee. Rest thyself. Visit thy palace. Rest thy body. My peace be with our lords...."

आस्तेकांच्या मानाने स्वत:जवळ असलेल्या तुटपुंज्या लष्करी ताकदीची कोर्तेसला पूर्ण कल्पना असूनही अफाट महत्त्वाकांक्षेच्या जोरावर कोर्तेस मिळालेल्या भेटी स्वीकारून पुढे मार्गक्रमण करीतच राहिला. आस्तेकांच्या नृशंस रुढींचा बिमोड करून ख्रिश्चन धर्म प्रस्थापित करण्यासाठी आपली देवाने योजना केली आहे असा त्याचा समज होता. त्याने कधी वाटेतले आस्तेकांचे शत्रू जिंकून घेतले तर कधी त्यांच्याशी तह केला. जिंकून घेतलेलं सैन्य आपल्या सैन्याला जोडलं. आपण दिलेल्या भेटी स्वीकारून सुद्धा कोर्तेस चाल करून येताना दिसल्यावर मोंतेझुमाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्याने आपलं सैन्य शहराच्या वेशीवर तैनात केलं. चतुर कोर्तेसने चाल करून येण्याआधी या भागाचा चांगलच अभ्यास केला होता. सीमेवर राजा सैन्य तैनात करणार याची थोडीफार कल्पना होती. यावर उपाय म्हणून त्याने Popocatepetl पर्वताच्या खिंडीतून मोठ्या धाडसाने आपलं सैन्य शहरात उतरवलं.

https://lh4.googleusercontent.com/-bRRZMRCAsb4/UQn-QqKAHfI/AAAAAAAAA2k/mHznq5RL5Fw/s400/CortesTenochtitlan.jpg

(कोर्तेस जवळ असणार आस्तेक राजधानी तेनोचित्लानचा नकाशा)

राजधानीत उतरल्यावर कोर्तेसने मोंतेझुमाची भेट घेतली. यावेळी ही राजा गाफील राहिला आणि पुन्हा कोर्तेस आणि त्याच्या सैन्यासाठी अमूल्य भेटी आणल्या.

https://lh6.googleusercontent.com/-g3j45EAphqw/UQn-QFNcjcI/AAAAAAAAA2Q/gGoyAWMvu4k/s350/350px-Cortez_%2526_La_Malinche.jpg

या चित्रात अर्नान कोर्तेस आणि मोंतेझुमा भेट आपल्याला दिसेल .कोर्तेसच्या मागे उभी असलेली स्त्री म्हणजे "मालिंचे" अर्नान कोर्तेसची दुभाषी, सल्लागार, विश्वासू सेवक. तिचं खरं नाव Malinalli. कोर्तेसला चढाई करण्यापूर्वी या भूभागाची माहिती मिळवण्यासाठी आस्तेक भाषा नौवात्ल जाणणारा विश्वासू सेवक हवा होता. त्यातूनच कुणीतरी मालिंचेचं नाव पुढे केलं. कोर्तेसने तिची हुशारी बघुन स्वत:ची दुभाषी म्हणुन नियुक्त केलं. या आस्तेक मुलीला कोर्तेसने मोठ्या हुशारीने जवळ केलं. तिचं नाव त्याने बदलून 'मरिना' असं केलं. मरिनानेही आपल्या मालकावर जीव ओवाळून सर्वतोपरी मदत केली. तिच्याच मदतीमुळे कोर्तेसला आस्तेक रुढी, अंधश्रद्धा, शहरातल्या खाचाखोचा समजल्या.

मोंतेझुमाने आपल्या भेटीत कोर्तेसला आक्रमण थांबवून परत जायची विनंती केली. कोर्तेसनंही ती मान्य केली. परंतु लागलीच काही दिवसात राजवाड्यावर स्वारी करून त्याने राजाला बंदी केलं. त्याबदल्यात जनतेकडून त्याने पुन्हा अनेक मौल्यवान भेटी लुटल्या. वर्षभर राजाला कैदेत ठेवल्यावर आस्तेक जनतेचा प्रतिकार तुटपुंज्या सैन्यासमोर भारी पडू लागल्यावर त्याने राजाला सोडलं. पण अतिमहत्त्वाकांक्षा आणि आस्तेकांची संपत्ती त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने आसपासच्या स्पॅनिश वसाहतींमधून मदत घेऊन पुन्हा एकदा आस्तेकांवर चढाई केली. या वेळेस त्याने राजाला बंदी केलं. Bernal Diaz del Castillo या कोर्तेसच्या सैन्यातील सैनिकाने लिहिल्याप्रमाणे कोर्तेसने राजाला १ जुलै १५२० ला आपल्या राजवाड्याच्या सज्जात नेऊन प्रजेला मागे हटण्याचं आवाहन करायला सांगितलं. आस्तेकांसाठी राजा म्हणजे देवाचा अवतार. त्यांचा रक्षणकर्ता. राजाने अशी हार मानणं त्यांना रुचलं नाही आणि त्यांनी त्याच्यावर दगडांचा वर्षाव केला. या मारामुळे राजा जबर जखमी झाला व तीनच दिवसात त्याचा मृत्यू झाला. आस्तेक जनतेने Cuauhtémoc हा नवीन राजा नेमला. त्यालाही कोर्तेसने मारून आस्तेकांची सत्ता काबीज केली

अत्यल्प लष्करी ताकद असतांना ही कोर्तेसने चतुराईने आस्तेकांचा पाडाव केला. मुळात आस्तेक युद्ध राज्यविस्तारासाठी न करता युद्धकैदी मिळवण्यासाठी करीत. युद्धात हारजीत महत्त्वाची नसून जास्तीत जास्त युद्धकैदी पकडून आणणाचा मान मोठा. त्यामुळे त्यांच्या सैन्यात शिस्त, विजीगिषु वृत्ती कमीच. त्याउलट स्पॅनीश सैन्य शिस्तबद्ध. आस्तेक धनुष्यबाण वैगेरे प्राथमिक स्वरूपातील हत्यारं वापरीत तर युरोपात बंदुकीचा शोध तोवर लागला होता. अर्नान कोर्तेस सारखा चतुर आणि धाडसी नेता स्पॅनिश सैन्याला लाभला होता. कोर्तेसच्या धाडसाची एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे. आस्तेकांशी लढतांना जेव्हा दारुगोळा संपत आला तेव्हा तो पूर्वेकडून ज्या Popocatepetl पर्वताच्या ज्वालामुखीच्या रस्त्याने आला त्या ज्वालामुखीत त्याने ५ धाडसी सैनिक पायाला दोर बांधुन १३ वेळा उतरवले आणि गंधक गोळा करुन दारुगोळा बनवला.

सत्ता हातात आल्यावर कोर्तेसने सर्वप्रथम धर्मप्रचार हाती घेतला. स्पॅनिश धर्माप्रचाराकांनी मेसोअमेरिकन लोकांचा मूळ धर्म धाब्यावर बसवला. मंदिरे मोडून त्याठिकाणी चर्च उभी केली. लोकांना ख्रिश्चनन धर्माची सामुदायिक दीक्षा घ्यायला लावली. ज्यांनी विरोध केला त्यांची कत्तल केली. त्यांच्या नरबळी सारख्या प्रथा हिंस्त्र मानून साम-दाम-दंड-भेद हरतऱ्हेचा वापर करून त्यांच्या ग्रंथांची, हस्तलिखितांची धूळधाण उडवली. जगाच्या पाठीवरील एक जुनी संस्कृती हळूहळू लोप पावू लागली.

संपूर्ण अमेरिका खंडावर या घटनेमुळे निश्चीतच परिणाम झाला. पुढे स्पॅनिश अजून खाली दक्षिणेत उतरले. अशाच युक्त्याप्रयुक्त्या वापरून त्यांनी 'इंकां' चं राज्य घशात घातलं. उत्तरेला त्याने कॅलिफोर्निया आणि मेक्सिको किनाऱ्यालगतचा प्रशांत महासागराचा भाग शोधून तो भाग स्पॅनिश अधिपत्याखाली आणला. सन १५३६ साली स्पॅनिश संशोधक Francisco Vásquez de Coronado ने मेक्सिकोतला काही भाग शोधकार्यासाठी स्वत:च्या हातात अधिकर घेतले आणि वैतागलेला कोर्तेस स्पेनला परतला. त्याने कोर्टात आपल्या हक्कसाठी केस ठोकली. स्पेनच्या राजाने त्याच्या कामगिरीबद्दल त्याचा यथोचित गौरव केला परंतु त्याने जिंकलेल्या भागावर त्याचा मालकी हक्क नाकारला. नाराज कोर्तेसने निवृत्ती घेऊन आपलं उर्वरित आयुष्य स्पेनमध्ये व्यतीत केलं.

१९ व्या शतकात फादर मिगेल हिदाल्गोच्या नेतृत्वाखाली मेक्सिकन जनतेने उठाव करून ३०० वर्षांची स्पॅनिष सत्ता उलथवून लावली. ३०० वर्ष स्पॅनिशांनी ज्या संस्कृतीचा नायनाट करण्यात आपली शक्ती खर्च केली त्या संस्कृतीचे जमिनीत गडप झालेले अवशेष आपल्या पाउलखुणा कधीच विसरू देणार नाहीत. जगातल्या इतर महान संस्कृतींप्रमाणेच मेसोअमेरिकेची संस्कृती थोडी कमी लोकप्रिय का होईना पण खचितच महान होती.

समाप्त.
***********************************************************************************
थोडं अवांतर.....

(१) तेओतिव्हकान : मेसोअमेरिकेच्या इतिहासाची ओळख करुन घेतांना 'तेव्होतिव्हाकान"ला टाळता येणं अशक्य. मेक्सिकोला भेट देणार्‍या पर्यटकांची ही पहिली पसंती.

तेओतिव्हकान या शब्दाचा अर्थ 'जिथे देवाची भेट घडते अशी जागा' (where man met the gods) किंवा 'माणूस देव बनतो अशी जागा'. आस्तेक राजधानी तेनोचीत्लान (आजची मेक्सिको सिटी) पासून अगदी जवळच असलेलं हे ठिकाण सुमारे इ.स. पूर्व २०० वर्ष अस्तित्त्वात होतं. या शहराचा निर्माता जरी अज्ञात असला तरी आस्तेकांना ते साधारणपणे इ.स १३०० व्या शतकाचा आसपास सापडलं. या शहरातील भव्यदिव्य बांधकाम डोळे दिवपवून टाकणार होतं. आस्तेकांना तर ते कुण्या दैवी शक्तीनेच बांधलं असावं असं वाटलं. तेओतिव्हकानची रचाना इतर मेसोअमेरिकन शहरांसारखीच. केत्झालाकोएत्ल आणि त्लातोक देवाची देवळं, राजा व धर्मगुरुंचे राजवाडे. पण नजरेत भरण्यासारखे आहेत ते इथले अतिभव्य चंद्र व सूर्य पिरॅमिड. तेओतिव्हकान आस्तेकंचं सर्वात मोठं धार्मिक ठाणं होतं. या शहरात साधारण २००० निवासी घरं, ६०० छोटेमोठे पिरॅमिड्स, अनेक देवळं, अनेक चौक, सरकारी कचेर्‍या होत्या. ५०० छोटी मोठी घरं व्यापारी आणि कलावंतांसाठी राखून ठेवलेली होती.

हा सूर्य पिरॅमिड.

https://lh5.googleusercontent.com/-vy8eVb5j_R8/UQgZ8fP3FrI/AAAAAAAAAyE/AROycIIh9Uc/s800/277666_247956545222141_6473805_o.jpg

(२) कोर्तेसला भेटी देणारे आस्तेक :
https://lh5.googleusercontent.com/-Slm4eWyK9ag/UQoHmrIUqYI/AAAAAAAAA3Q/VgDNnWLUCuw/s465/cortes_gifts.jpg

(३) नुकताच वाचनात आलेला मेसोअमेरिकेबाबच्या माहीतीचा आंतरजालावरील दुवा

संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व : मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Everyday Life of Aztecs - Warwick Bray
४) Lost Civilization (Parragon Books)
५) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
६) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

इरसाल's picture

31 Jan 2013 - 12:16 pm | इरसाल

लेखमाला चालुच रहावी असे वाटत आहे.(पण संपली)

एक सुंदर, संग्राह्य लेखमाला!!! मिपा अशा लेखांनी समृद्ध होतेय खूपच :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2013 - 11:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक सुंदर, संग्राह्य लेखमाला!!! मिपा अशा लेखांनी समृद्ध होतंय.

सहमत आहे. आणि मनःपूर्वक आभार.

मला सर्वच भाग आवडले पण मेसोअमेरिका (६.१) - आस्तेकजरा स्पेशलच होता.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

1 Feb 2013 - 12:03 am | कवितानागेश

अतिशय आवडली लेखमाला.
आता पुढचा विषय कुठला घेणार? :)

अग्निकोल्हा's picture

1 Feb 2013 - 2:54 am | अग्निकोल्हा

मिपा अशा लेखांनी खूपच समृद्ध होतेय. एक सुंदर, संग्राह्य लेखमाला!!!

मुक्त विहारि's picture

2 Feb 2013 - 8:15 am | मुक्त विहारि

छान..

फार मस्त लिहिलं तुम्ही, खुप खुप धन्यवाद.

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:16 pm | पैसा

सगळी लेखमालिकाच मस्त झाली. खूप नवी माहिती मिळाली.

श्रीरंग_जोशी's picture

2 Feb 2013 - 8:48 pm | श्रीरंग_जोशी

मेक्सिकोच्या वैभवशाली इतिहासाबद्दल यानिमित्ताने प्रथमच वाचायला मिळाले. शक्य असल्यास मेक्सिकोच्या सद्यस्थितीवर एखादा लेख लिहावा हि विनंती.

बाकी भाग ७ व ८ ऐवजी ६. १ व ६. २ असे करण्याचे काही विशेष कारण?

अवांतर:
१- मेक्सिकोमध्ये कुणी मिपाकर राहतात का?
२- मी राहतो त्या राज्याचे माजी गव्हर्नर अमेरिकन विमानतळांवरील सुरक्षा तपासणीच्या धोरणांना कंटाळून मेक्सिकोमध्ये स्थायिक होणार होते.

किलमाऊस्की's picture

3 Feb 2013 - 12:05 am | किलमाऊस्की

शक्य असल्यास मेक्सिकोच्या सद्यस्थितीवर एखादा लेख लिहावा हि विनंती.

नक्कीच आवडेल लिहायला. आजचा मेक्सिको मला बराचसा इतर विकसनशील देशांसारखाच वाटतो. बदलत्या जागतिकीकरणामुळे होणारे हवेहवेसे वाटणारे सांस्कृतीक बदल, अमेरिकेबद्द्ल प्रचंड आकर्षण पण आपल्या संस्कृतीचा रास्त अभिमान या संभ्रमात पडलेली नवी पिढी. (भारत आणि चीन ही याच संक्रमणातून जात आहेत असं मला वाटत.) एका बाजूला न्यूमेक्सिको, कॅलिफोर्निया, टेक्सास, नेवाडा आणि कोलोरॅडोचा काही भाग गिळंकृत केल्याने अमेरि़केबद्द्ल राग पण अर्थव्यवस्थेचा बराचसा भाग हा अमेरिकेवर अवलंबून. जबरदस्तीने लादण्यात आलेला स्पॅनिश धर्म धरावासा ही वाटत नाही आणि सोडावासाही नाही. त्यामधून निर्माण होणारा धार्मिक संभ्रम. खरंतर मेक्सिको स्वातंत्र्यलढा आणि सद्यस्थिती हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. ही लेखमालिका मेसोअमेरिकन संस्कृतीची तोंडओळख असल्याने त्यामधे हा विषय घुसवणं मला रास्त वाट्लं नाही.

बाकी भाग ७ व ८ ऐवजी ६. १ व ६. २ असे करण्याचे काही विशेष कारण?

Process Oriented कंपनीत काम करत असल्याचा परिणाम. :-) जोक्स अपार्ट. विशेष असं काही नाही.
मेसोअमेरिकेतल्या बर्‍याच संस्कृतींपैकी निवडक संस्कृती निवडून प्रत्येक संस्कृतीला क्रमांक दयायचा प्रयत्न केला.(यापैकी चिचिमेक, तोतोल्नाक यांना फार लांबण नको म्ह्णून काट दिली) त्यापैकी समृद्ध अशा माया, आस्तेकांबद्द्ल एका भागात संपवणं अशक्य. त्यामुळे लेखाचे ढोबळमानाने भाग करून लिहीण्याचा प्रयत्न केला.