मेसोअमेरिका (३) - झापोतेक (The People)
जगाच्या पाठीवर एकाच वेळी ठिकठीकाणी अनेक संस्कृती नांदल्या, बहरल्या. काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही आपला वारसा पुढच्या पिढीला देऊन लुप्त झाल्या. मेसोअमेरीकेच्या इतिहासातील माया संस्कृती ही अशीच एक. ‘२०१२ - जगाचा अंत – माया कॅलेंडर“ या तीन गोष्टींच्या परस्पर संबंधामुळे आजच्या जगाला माहित असलेली. बरीचशी गूढ आणि रहस्यमय अनेक दंतकथांमधून अजरामर झालेली.
युरोपात रोमन साम्राज्य लयास जात असताना जगाच्या दुसर्या टोकाला अमेरीका खंडात प्रगत “माया” संस्कृती” बहरास येत होती. “माया” हे नावच आपल्याला किती जवळचं. अगदी आपल्या भाषेमधून उचलल्यासारखं. आपल्या पुराणात पाताळाचा देव माया किंवा मयासुराचा उल्लेख आहेच. "माया" या नावाबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत. कुणी म्हणत अचाट शक्ती असलेले हे परग्रहवासी माया नावाच्या नक्षत्रावरून आले. त्या काळी “मायापान” हे शहर फार महत्त्वाचं. त्यामुळे या लोकांना माया असं नाव मिळालं असंही म्हणतात. या लेखात प्रामुख्याने आपण माया समाजजीवन, कुटुंबव्यवस्था, धर्म , रितीरिवाज याबद्दल जाणून घेऊया.
माया संस्कृती ही साधारपणे मेक्सिकोच्या काही राज्यात (Chipas, Tabasco) तसेच युकातान (१) , मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला, बेलीसे, होन्डुरास या भागात अस्तित्वात होती.

ढोबळमानाने माया कालखंड तीन भागात विभागात येतो. त्यापैकी क्लासिक काळ (इ.स.२५० – इ.स. ९००) हा महत्त्वाचा मनाला जातो. अगदी सुरवातीच्या काळात मायन्सवर ओल्मेकांचा प्रभाव होता. ओल्मेकांप्रमाणेच प्राथमिक स्वरूपाची शेती या काळात मायन्स करीत. हळूहळू जशी लोकसंख्या वाढू लागली तसतसे नवीन शोध, ओल्मेकांकडून शिकलेल्या अनेक बांधकाम, शेतीतंत्राचा विस्तार व विकास करणं चालू झालं. नवीनवी शहरं उदयास आली. प्रगतीच्या अत्त्युच्च शिखरावर असताना तिकाल, चिचेन इत्सा, मायापान, कोपान, पालेंके सारखी ४० माया राज्ये अस्तित्वात होती.
समाजजीवन : माया स्वतंत्र राज्यात रहात. समाजाची रचना साधारणपणे पिरॅमिड सारखी असे. सगळ्यात वरती राजा आणि त्यानंतर उतरत्या भाजणीत इतरांना स्थान मिळे. हे काहीस असं वर्गीकरण होतं.

राज्याच्या सर्वोच्च अधिकार्याला Halach unic (True Man) संबोधले जाई. तो राज्याचा शासक तसेच पालनकर्ता, सल्लागार असे. राजाला देवदूत मानले जाई. राजा युद्धनीती ठरवत असे. राजाच्या मृत्युनंतर वारसाहक्काने त्याच्या मुलाला किंवा जवळच्या नातेवाईकास राजा बनविण्यात येई.
राजानंतर महत्त्व असे ते त्याच्या अधिकारी वर्गाला व धर्मगुरूंना. हे एकमेव लोक ज्यांना लिहिता वाचता येत असे. राज्यात लागणार्या धान्याची व्यवस्था बघणे, बांधकामास लागणारे सामान, कामगार गोळा करणे इत्यादी कामं अधिकारी करत. राज्याचा सैन्याच्या अधिकार्यास Sahal असे संबोधले जाई. हे महत्त्वाचे पद बरेचदा राजाच्या खास जवळच्या नातेवाईकास मिळे.
धर्मगुरू हेही फार महत्त्वाचे कारण त्यांचे देवाशी लागेबांधे. हे ही पद वारसाहक्काने मिळे. धर्मगुरू प्रामुख्याने भविष्यकथन, नरबळी देणे, युद्धप्रसंगी मुहूर्त सांगणे इत्यादी कामे करीत. धार्मिक कामांबरोबर ते गणित, अवकाश संशोधन या बाबीतही पारंगत असत.
माया लोक निरनिराळ्या शहरांबरोबर व्यापार करीत. हा व्यापार बरेचदा, जेडचे मौल्यवान दगड, शंख, copal(2), quetzals (3) अशा वस्तूंचा चाले. कलाकार मंडळी नानाविविध शिल्पे, मुर्त्या , आकर्षक भित्तीचित्रे बनवीत. मायन्स विणकाम व कुंभारकामातही तरबेज होते.
बळीराजा हा माया समाजाचा कणा. मका, स्कॉश, बिन्स याबरोबर इतर काही पिके शेतकरी घेत असत. शेतीच्या मोसमात पूर्ण वेळ शेतकरी शेतात असे तर बायका घरात राहून घरकाम, शिवणकाम करीत असत. बदलत्या ऋतुनुसार जेव्हा शेतीची काम कमी होत तेव्हा शेतकरी स्वत:ला बांधकामास जुंपत असत.युद्धासाठी सैनिक म्हणूनही त्यांचा वापर केला जाई.
माया समाजात सर्वात शेवटी स्थान गुलामांचं. गुलाम मुख्यत्वे आपल्या मालकासाठी शारिरिक मेहनतीची काम करीत. गुलाम बरेचदा युद्धकैदी, पालकांनी पैशासाठी विकलेली मुले असत. गुलामांना मुक्त जीवन जगता येत नसे. बरेचदा मालकाच्या मृत्युनंतर त्यांना मारून टाकण्यात येई.
कौटुंबिक जीवन : माया शेतकरी छोट्या झोपडीत रहात. स्वयंपाकघर साधारणपणे मुख्य घराला लागून असे. माया शेतकर्याचं आयुष्य फार खडतर असे. बायका सहसा पहाटे लवकर उठून दिवसभरच्या कामासाठी आग तयार करीत. बरेचसे पदार्थ मक्यापासून बनत. दगडाच्या सहाय्याने मका दळून पीठ तयार करीत व त्यापासून Tortila बनवीत. घरातल्या स्त्रिया दिवसभर घरकाम, मुलांना, पाळीव प्राणी सांभाळणे इत्यादी कामे करीत. पुरुष व मुले दिवसभर शेतात राबत असत, शेतीच्या कामांव्यतिरिक्त वन्य पशूंची शिकार, बांधकाम, लढाईच्या वेळी सैनिक म्हणून काम करीत.
अशा या खडतर जीवनातही काही समारंभाचे क्षण थोडा विसावा देऊन जात. बाळाचा जन्म हा आनंदाचा क्षण. बाळाच्या जन्मानंतर लागलीच धर्मगुरुंना पाचारण करण्यात येई. धर्मगुरू बाळाचे नामकरण करुन भविष्य कथन करीत. तसेच त्याच्या पालकंना त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सल्लाही देत.
वयाच्या तिसर्या वर्षी मुलींसाठी एक समारंभ आयोजित केला जाई. वयाचं तिसरं वर्ष चुलीच्या तीन दगडचं प्रतिक त्यामुळे महत्त्वाचं. या समारंभात मुलीला स्वयंपाकासाठी लागणार्या वस्तू, विणकाम शिवणकामाचे साहित्य, मका दळण्यासाठी लागणारे दगड अशा तिला आयुष्यभर साथ देणार्या वस्तूंची ओळख करून दिली जाई. पुढे याचं वस्तू तिच्या सुखदु:खाच्या सोबती बनून जात असत.
अशाच प्रकारचा समारंभ मुलांसाठी वयाच्या चौथ्या महिन्यात करीत. चार हा आकडा मुलांसाठी महत्त्वाचा. जिथे त्याला आयुष्यभर राबायचं अशा शेताच्या चार दिशांचं प्रतिक. या सामरंभात मुलाला कुर्हाड, चाकू इत्यादी शेतकीच्या औजारांची ओळख करून दिली जाई.
या पुढाचा समारंभ वयात येण्याचा तो मुलींसाठी वयाच्या १२ व्या वर्षी तर मुलांसाठी वयाच्या १४ व्या वर्षी. या समारंभात पाण्याने शुचिर्भूत होणे, आपल्या दोषांचा स्वीकार करणे, पुढील आयुष्यात उपयोगी पडणारे आचरण याची ओळख मुलांना करून दिली जाई.
आयुष्यातला अजून एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे विवाह. मुलांचा विवाह २०व्या वर्षी तर मुलींचा १४ व्या वर्षी करीत. लग्न बरेचदा गावातील atanzahab(match maker) जमवित. लग्न जमवताना मुलाला बायकोच्या कुटुंबासाठी अन्न, कपडे द्यावे लागत. तसेच मुलाला होणार्या बायकोच्या कुटुंबासाठी काम करावे लागे. तो किती वर्ष काम करणार आणि किती कपडालत्ता देणार ही बोलणी लग्न ठरायच्या आधी करीत. एकदा का ही बोलणी ठरली की धर्मगुरू लग्नाला मान्यता देत त्यानंतर सारा गाव मिळून नवदांपत्यासाठी घर बनवीत . हे चित्र एका माया लग्नाचं.

धर्म व रितीरिवाज :
“This is the account: All was at rest. Not a breath, not a sound, The world was motionless and silent. And the expanse of the sky was empty. This is a first account, the first world. There was not yet any man or animal. There were no birds, fishes, crabs, trees, stones, caves or ravines. No grass, no forest. Only the sky was there. The face of the earth has not yet revealed itself. There was only the calm sea and the great expanse of the sky”
(Popol Vuh – The book of the community )
Popol Vuh या माया धर्मग्रंथातला हा उतारा सृष्टीनिर्मितीचं वर्णन करणारा. त्याची कथा कहिशी अशी.
सृष्टीची निर्मिती होण्याआधी ना मनुष्य होता, ना पशु होते ना पक्षी. अस्तित्त्व होते ते फक्त आकाश आणि अथांग समुद्राचं. समुद्राचा देव Gucumatz (Sovereign Plum Serpent )आणि Huracan( Heart of Sky) हा आकाशाचा देव. दोघेही महान तत्त्वज्ञानी. Huracan आकाशातून खाली समुद्रादेवातेला भेटायला आला. त्याने पृथ्वीच्या सृजनाची संकलना मांडली. दोघांनाही ही कल्पना आवडली असली तरी प्रत्य्क्षात ती कृतीत आणणं फार काठीण वाटत होतं. कारण त्यांना सुरवात कुठून करायची हेच कळत नव्हतं. मग दोन्ही देवांनी मिळून यावर बराच काळ सल्लामसलत केली. बराच काळ चाललेल्या या चर्चेनंतर दोघांनी मिळून एक योजना आखली. सगळ्यात आधी त्यांनी पृथ्वीवर सर्वत्र पसरलेलं पाणी दूर करायच ठरलं. त्यामुळे सर्व सजीवांना राहायला जागा तयार होइल. यानंतर त्यांनी पशु , पक्षी, वनस्पती तयार करायचं ठरलं आणि मग आपण केलेल्या कार्याची प्रशंसा करायला कुणीतरी हवं. त्यातून माणसाची निर्मिती करायचं ठरलं. माणूस जो कालमापन करू शकतो, स्वत:ला भाषेच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो.
या दोघांच्या योजने प्रमाणे पृथ्वीवरील पाणी दूर झालं. पहिल्या टप्प्यात त्यांनी पर्वत, जंगल, पशु, पक्षी निर्माण केले. पाणी गोळा करून तळी बनवली, काही पाणी डोंगरावरून सोडलं. एक पायरी पूर्ण झाल्यावर दोन्ही देव खुश झाले. समुद्र देवाने आकाश देवाची स्तुती केली. आणि मग सरतेशेवटी त्यांनी माणूस बनवला.
माया जवळ जवळ १६० हुन अधिक देवांची पूजा करीत . यातले बरेचसे देव हे नैसर्गिक शक्तींशी निगडीत असत. जसे पर्जन्यदेव, मक्याचा देव, मृत्यूची देवता. Xibalba म्हणजे पाताळ आणि या पाताळात १२ दैवी शक्ती राहतात. त्यातल्या २ मृत्युच्या देवता आणि बाकी सगळे राक्षस. हे बारा रक्षस जोड्याने फिरत आणि अधून मधून पृथ्वीवर येऊन माणसांना आजारी पाडणं , त्रास देणं हे त्यांचं काम.. Xiquiripat (Flying Scab) आणि Cuchumaquic (Gathered Blood) माणसांच रक्त दुषित करण्याचं काम करीत. Ahalmez (Sweepings Demon) आणि Ahaltocob (Stabbing Demon) हे दोघे कचर्याच्या ठिकाणी रहात आणि वेळ मिळताच माणसाचा खून करत. House Corner व Blood Gatherer हे दोघे रक्तपिपासू.
देवाने सृष्टी निर्माण केली तशी तो ती नष्ट पण करू शकतो. त्यामुळे देवाला खुश ठेवणं, त्याचा मान राखणं महत्वाचं. त्यासाठी देवाला अन्न, फुले, जेडचे मौल्यावान दगड, पिसे, शंख अशा अनेक भेटी दिल्या जात. मायन्सच्या मते रक्त देवाला शक्ती देत त्यामुळे पशुबळी व नरबळी देणं क्रमप्राप्त. नरबळी सहसा, गुलाम व युद्धकैद्यांचे दिले जात असत.
आता ओळख एका माया राजधानीची : पालेंके
मायन्सच्या अनेक राजधनींपैकी एक "पालेंके". या शहराचं मूळ माया नाव माहित नसल तरी स्पॅनिशांनी या शहराला पालेंके म्हणजे fortification असं नाव दिलं.. तिकाल आणि कोपानपेक्षा थोडी छोटी अशी ही माया राजधानी. तिचा राजा “पाकाल” आणि "The Temple of the Inscriptions" या दोन गोष्टींमुळे जगप्रसिद्ध आहे. पाकाल राजाचा कार्यकाल हा मायांचा सुवर्णकाळ मानला जातो. पाकाल एका पायाने अधू असला तरी अतिशय पराक्रमी, धुरंधर. अगदी अल्प वयात त्याचा राज्याभिषेक झाला आणि जवळ्जवळ ७० वर्ष त्याने राज्य केलं. त्याला सूर्याचा अवतार मानीत आणि तो लोकांमधे अतिशय प्रिय होता.
पालेंकेवर जवळजवळ ७० वर्षे राज्य करणार्या पाकाल (K'inich Janaab' Pakal) या राजाने स्वत:च्या चिरनिद्रेसाठी बांधून घेतलेला हाच तो जगप्रसिद्ध पिरामिड “The Temple of the Inscriptions"
आतली रचना :

पायर्यापायर्यांनी बनलेला हा पिरॅमिड आज मेक्सिको मधल्या चीआपास (Chiapas) या राज्यात आहे. या पिरॅमिडचं मूळ माया नाव माहित नसलं तरी याला “The Temple of the Inscriptions" म्हणण्याचं कारण इथले अक्षर कोरलेले खांब. साधारणपणे आपल्या देवळाच्या आकारासाराखा असणार्या या त्रिकोणी पिरॅमिडला पायर्यांचे ८ स्तर आहेत.पाच प्रवेशद्वार असून ही प्रवेशद्वारे खांबांनी वेढली आहेत. त्यावर माया लिपीतील अक्षरे कोरली आहेत.या ६ खांबाना A ते F अशी नावं दिली आहेत . यापैकी खांब A हा पूर्णपणे चित्रलिपीत सजवलेला असून B खांबावर हातात बाळ पकडलेली मनुष्याकृती आहे. C खांबावर पाकालच्या आईचं म्हणजेच Lady Zac-Kuk. चा चित्र कोरलं असल्याचा अंदाज आहे.
या पिरामिड मधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खुद्द राजा पाकलचं थडगं. साधारणपणे १९४५ च्या सुमारास आल्बेर्तो रूस या मेक्सिकन संशोधकाच्या अचाट जिज्ञासेमुळे या थडग्याचा शोध लागला. या ठिकाणी त्याला एका फरशीवर ४ भोक दिसली आणि त्याची जिज्ञासा चाळवली. त्याने ती फरशी बाजूला करून घेतली. त्या फारशीच्या खाली भुयारात काही पायर्या त्याला दिसल्या. भुयार साफ करायला ३ वर्ष लागली आणि ती वाट थेट पाकाल राजाच्या थडग्याकडे जात होती. हे पाकाल राजाच थडगं.

पाकाल हा सूर्याचा अवतार मनाला जाई. त्याच्या मृत्युनंतर पुर्नजन्म घेऊन तो परतणार अशी माया लोकांची अशा होती. त्यानुसार त्याला या अशा सुरक्षित ठिकाणी पुरलं होतं. या ठिकाणी पूर्वी राजवंशातील काही लोकांनाच प्रवेश होता.
पाकल राजाला ज्या शवपेटीत ठेवलं होत ती दगडी शवपेटी कोरीव काम केलेली आहे. या शावापेटीचं वैशिठ्य म्हणजे तिच्यावर असलेल दगडी झाकण. या झाकणावर अतिशय सुंदर असं कोरीव काम केलं आहे. या कोरीव कामावर अनेक संशोधकांनी संशोधन केलं, पुस्तकं लिहिली, प्रत्येकाने आपल्या परिने या कोरीव कामाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला. हेचं ते सुप्रसिद्ध दगडी झाकाणावरील कोरीवकाम :

या चित्राला Pacal’s Tomb of the Astronaut असही म्हणतात. चित्रातला हा माणूस स्वत: राजा पाकाल असल्याचा अंदाज आहे. आणि तो अवकाश यान चालवीत असल्याचा दावा डॅनिकेन या स्वीस संशोधकाने आपल्या 'चॅरिएट्स ऑफ द गॉड' या पुस्तकात केला आहे आणि अर्थातच जगभरातील संशोधकांनी तो फेटाळून लावला. या पिरॅमिडशेजारी असलेला हा पाकालचा राजवाडा.

या जगप्रसिद्ध पुराणकालीन वास्तुपाशी एक छोटीशी विश्रांती घेऊ. पुढील भागात माया - The Mathematicians
पाकलच्या थडग्यात मिळालेला जेड मुखवटा :

पाकलच्या थडग्यात मिळालेली जेड आभूषणे :

Huracan

पाकलची आई राज्याभिषेक करताना:

पाकालचा दगडी पुतळा :

***
टीपा :
अनेक दंतकथा, रितीरिवाज यांनी समृद्ध अशी ही माया संस्कृती एका भागात संपवणं अशक्य. त्यामुळे लेखाचे ढोबळमानाने भाग करून लिहीण्याच प्रयत्न केला आह
१) युकातान : हे नाव त्या प्रदेशाला गैरसमजातून मिळालं. स्पॅनिश प्रथम मेक्सिकोच्या आसपास उतरले तेव्हा भटकत असताना त्यांनी तेथील लोकांना हा प्रदेश कुठचा असं विचारलं असता उत्तर आलं. “Ci-u-than” (“We can not understand you”) आणि त्याचा अपभ्रंष पुढे “युकातन” असा झाला.
२) Copal : झाडाचा रस जो माया धार्मिक कार्यक्रमांकरिता धुपासारखा वापरीत.
3) Quetzalls : हिरव्या रंगाचा एक पक्षी , ज्याच्या पिसांचा वापर शिरोवास्रासारख्या वस्तू बनविण्यासाठी करीत.
प्रस्तुत लेखात उल्लेखलेली शहरे, गावे यांची मूळ आस्तेकांच्या भाषेतली नावे उच्चारायला कठीण असल्याने ती इंग्रजीत लिहिली आहेत. या नावांचा उच्चार त्या काळी कसा होता हे सांगणे कठीण आहे. तसेच स्पॅनिश वळणची नावं शक्य तिथे स्पॅनिश उच्चाराप्रमाणे लिहिली आहेत.
संदर्भ :
१) मेक्सिकोपर्व : मीना प्रभू
२) The lost history of aztek and maya – Charles phillip and Dr. David M jones
३) Ancient Wisdoms - Gayle Redfern
३) Lost Civilization (Parragon Books)
४) आंतरजालावर उपलब्ध असलेले या विषयाशी संबधित तज्ज्ञांचे White Papers
५) सनावळी व काही संदर्भ आंतरजालावरून.
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)
प्रतिक्रिया
3 Jun 2012 - 12:04 am | मुक्त विहारि
जमेल तसे लिहित रहा.वाचत आहे.
3 Jun 2012 - 1:42 am | शकु गोवेकर
माया संस्कुती च्या इतिहासाचे ३ विभाग करता येतील
१) पुर्व काल -प्री क्लासिक - ई.पु.३०० ते ई.स.२००
२)मध्य काल- क्लासिक -ई.स.२५० ते ई.स.९००
३) अंतिम काल - पोस्ट क्लासिक - ई.स.९०० पर्यंत चा काळ
साधारण पणे सन ७५० नंतर ही संस्कृती लोप पावण्यास सुरवात झालि त्याचि कारणे अशी असावित
१) तत्कालीन म्होर के किंवा Leaders यांनी ईतर ठिकाणी स्थलांतर कर ण्याचा निर्णय घेतला
२) मुख्यत्वे करुन मोठे हवाबदल - major climatic change
३) लोक संख्या वाढ - Over Population होय्,त्या काळी देखिल हिच सम स्या होती
४) अंतर्गत भांड्णे - Internal Warfare
संदभ्।र - References
१) J. Eric S. Thompson. Rise and Fall of Maya Civilization. University of Oklahoma Press,1954, Norman
२) Robert Raul Miller. Mexico: A History. University of Oklahoma Press, 1985, Norman
३)George Stuart and Gene Stuart. The Mysterious Maya. National Geographic Society, 1977, Washington, DC
४) साभार Miranda Nelson,Greg Sandford,Reed H. Larson , September 21, 1999
3 Jun 2012 - 8:47 am | प्रचेतस
हा भाग पण वाचनीय आणि माहितीपूर्ण.
3 Jun 2012 - 10:13 am | अर्धवटराव
मस्त सुरु आहे लेखमाला.
कधि कधि विचार येतो, मायन्स वगैरे मनुष्याचे जीवन आणि आजचे प्रगत मनुष्य जीवन यात एव्हढी तफावत आहे आणि आपण उपलब्ध साधनांवरुन त्याकाळचे अंदाज बांधतो ... प्रगतीचा एव्हढाच डेल्टा पार केलेला भविष्यकालीन मनुष्य आजच्या युगाबद्दल काय काय अंदाज बांधेल... कदाचीत ते फार अचुक असतील, कारण माहितीची साठवण खुप जास्त चांगल्याप्रकारे केलेली असते आता...
अर्धवटराव
3 Jun 2012 - 11:04 am | यकु
माया संस्कृतीतले लोक काय करायचे आणि कसे वागायचे वगैरे जगातल्या इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये असतात तसेच तपशील आहेत, त्यात तेवढा अर्थ नाही - त्यात शिरण्याचं कारण नाही.
माया संस्कृती हे आजही अनुभवाला येणारं उघड सत्य आहे. त्या संस्कृतीच्या राजाला काय म्हणायचे? Halach unic (True Man) ट्रू मॅन म्हणजे आदिपुरुष, परमात्मा. हा विदेही असतो, याला देहधारी असण्याची आवश्यकता नाही - कारण तो हवा तेव्हा कोणताही देह धारण करु शकतो. देहाचं एक महत्त्वाचं बंधन आहे - तुम्ही देहधारी झालात रे झालात की 2 अस्तित्वात येतात - 'तु' आणि 'मी', कारण देहाचं संचालनच मुळी डाव्या आणि उजव्या मेंदूने होतं. समोरचा माणूस 'तो' म्हणजे दुसरा कुणीतरी आहे आणि मी 'मी' आहे - आम्ही दोघेही वेगळे आहोत हे आयडेंटिफिकेशन सुरु होणं म्हणजे माया संस्कृतीचा उदय.
“This is the account: All was at rest. Not a breath, not a sound, The world was motionless and silent. And the expanse of the sky was empty. This is a first account, the first world. There was not yet any man or animal. There were no birds, fishes, crabs, trees, stones, caves or ravines. No grass, no forest. Only the sky was there. The face of the earth has not yet revealed itself. There was only the calm sea and the great expanse of the sky”
हे समजून घेण्यासाठी आदीशंकराचार्याचं सायटेशन घेऊ -
शंकराचार्य का अद्वैत वेदान्त में ब्रह्म ही एक अद्वितीय सत्ता है। उसमें सजातीय, विजातीय या स्वांगत कोई भेद नही है। जीव अपने वास्तविक रूप में ब्रह्म ही है। जगत् मायामय आभास मात्र है अत: ब्रह्म के अतिरिक्त कहीं कुछ नही है। इस सिद्धान्त में परमतत्व को ब्रह्म कहते है। वह सत् , चित् और आनन्द स्वरूप है। ये उसके स्वरूप लक्षण है। शुद्ध चेतना ही ब्रह्म है। वह अनादि, अनन्त और नित्य होने के कारण सत् है। वह पूर्ण होनें के कारण आनन्दस्वरूप है। सत् और चित् दोनो आनन्द के अंतर्गत आ जाते है। ये तीन नही एक है। सत् , चित् और आनन्द किसी पदार्थ के धर्म या गुण नहीं है। ब्रह्म जगत का कारण भी है। यह उसका तटस्थ लक्षण है। तटस्थ लक्षण वस्तु के आगन्तुक और परिणामी धर्मों का वर्णन करता है। ब्रह्म से ही जगत की उत्पत्ति होती है, उसी में स्थित रहता है और उसी में विलीन हो जाता है। ब्रह्म इस जगत् का उपादान और निमित्त दोनों कारण है।
http://vedantijeevan.com:9700/lekh/vedantdarshan.htm
मग माया संस्कृती आजही अनुवाला येते की नाही? कधी संपणारे म्हणतात हे लोक जग?
‘२०१२ - जगाचा अंत – माया कॅलेंडर.“
देखेंगे अभी बहोत देर है, सहा महिने आहेत अजून खरंखोटं व्हायला.
3 Jun 2012 - 11:38 am | किलमाऊस्की
‘२०१२ - जगाचा अंत – माया कॅलेंडर.“
देखेंगे अभी बहोत देर है, सहा महिने आहेत अजून खरंखोटं व्हायला. >>>>>>>>
जनसामान्यांना मायन्सबद्द्ल माहीती असण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे असं मला या वाक्यातून सुचवायचं होत. याचा अर्थ असा नाही की २०१२ ला जगाचा अंत होणार आहे. मुळात मायन्सनी कुठेही असा दावा केलेला नाही. त्यांचं कॅलेंडर साधारणपणे २१ डिसेंबर २०१२ च्या सुमाराची तारिख शेवटची दाखवत एवढ्या पुराव्यावरुन काही लोकांनी काढ्लेला हा तर्क आहे.मी या किंवा आधीच्या कुठ्ल्याही लेखात तसा उल्लेख केलेला नाही. मुळात ही गोष्ट मलाही पटत नाही.
<<<<<<<<<<<<<माया संस्कृतीतले लोक काय करायचे आणि कसे वागायचे वगैरे जगातल्या इतर कुठल्याही संस्कृतीमध्ये असतात तसेच तपशील आहेत, त्यात तेवढा अर्थ नाही - त्यात शिरण्याचं कारण नाही. >>>>>>>>>>>>>>>>>
बाकी जगातल्या सर्व संस्कृतींमधे जगाच्या उत्त्पतीचा उहापोह केलेला आहे.
नासदासीन्नो सदासित्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत |
किमावरीव: कुह कस्य शर्मन्नम्भ: किमासीद्गहनं गभीरं ||
हे आपल्या ऋग्वेदातही आहेच नाही का? त्यापैकीच एक हा माया संस्कॄतीमधला. आपली संस्कॄती महान आहेच पण दुसर्या संस्कॄतींबद्द्ल जाणून घेण्यात फार फायदा नसला तरी तोटाही नाही. एक गंमत म्हणून तरी.
3 Jun 2012 - 12:34 pm | यकु
मलाही ही गोष्ट पटत नाहीच. सो नो ऑफन्सेस आर मेन्ट.
सहमत.
4 Jun 2012 - 4:13 am | अर्धवटराव
आज पहिल्यांदा यकुचा प्रतिसाद आदिभौतिकावरुब सरळ आध्यात्मावर छलांग मारुन गेला... थोडक्यात काय, तर मित्र बाटला हो आमचा :(
अर्धवटराव
4 Jun 2012 - 11:05 am | यकु
हॅहॅहॅ
3 Jun 2012 - 11:23 am | शिल्पा ब
तुमची लेखमाला आवडली आहे. लिहित रहा.
3 Jun 2012 - 5:07 pm | तिमा
लेखमाला चांगली चालली आहे. ती चालूच ठेवा. इतिहासावर काहीही लिहिलेत तरी आम्ही वाचू.
3 Jun 2012 - 5:23 pm | पैसा
माहितीपूर्ण, वाचनीय आणि चित्रांमुळे प्रेक्षणीय!
3 Jun 2012 - 7:13 pm | मन१
भारिच.
सुंदर लेखमालिका सुरु आहे.
.
.माया लोकांच्या पिरमिड बघून मला तर दक्षिणे भारतातल्या उंच उंच गोपुरांच्या बांधकाम शैलींचा भास होतो. बरचसं मिळतंजुळतं वाटतं.
4 Jun 2012 - 10:32 am | बिपिन कार्यकर्ते
एक अतिशय सुंदर लेखमाला अगदी उत्तमरित्या चालवत आहात या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. पुढचे भागही असेच मस्त असतील याची खात्री आहेच.
4 Jun 2012 - 10:57 am | प्यारे१
तंतोतंत...!
4 Jun 2012 - 6:37 pm | किलमाऊस्की
प्रतिसादासाठी धन्यवाद !!
4 Jun 2012 - 6:54 pm | स्मिता.
हा लेख देखील छान माहितीपूर्ण आहे. लेखमाला अशीच चालू राहू द्या, वाचायला मजा येतेय.
5 Jun 2012 - 11:07 am | ऋषिकेश
वाटच बघत होतो.. छान माहिती. वेळ मिळाला तर भर घालेन
5 Jun 2012 - 12:27 pm | किलमाऊस्की
नविन माहिती असेल तर नक्की लिहा. माया हा विषय एका भागात संपवण्यासारखा नाही म्हणून वेळ मिळेल तसा २-३ भागात लिहायचा विचार आहे. पुढचा भाग माया गणितावर लिहित आहे.
5 Jun 2012 - 11:25 am | मृत्युन्जय
पुढच्या भागाची वाट बघतो आहे यातच सगळे आले :)
6 Jun 2012 - 5:19 pm | किलमाऊस्की
पुढचा भाग : मेसोअमेरीका(४.२) - माया (The Mathematicians)