डॉक्टर डॉक्टर

आनंद भातखंडे's picture
आनंद भातखंडे in जनातलं, मनातलं
26 Jul 2012 - 2:24 pm

नेहेमी प्रमाणे ऑफिस मधून उशिरा न येता वेळेवरच आलो …. जरा चेंज म्हणून बरं असतं कधी कधी. थोडा घसा पण दुखत होता. तरल पदार्थाव्यतिरिक्त कुठलीही इतर खाद्य वस्तू घश्याखाली उतरताना आतून चिमटे काढत जात आहे असे वाटत होते. कदाचित आत्ताच गावी जाऊन आल्यामुळे तेथील पाण्याचा त्रास झाला असावा. तेथील पाण्या मध्ये घालून काही द्रव पदार्थ घेतला असल्याचे शल्य घशात डसत असेल असा मौलिक निष्कर्ष माझ्या बायकोने काढला होता. बऱ्याच बाबतीत आमचे जसे एकमत होत नाही ते या बाबतीत देखील झाले नाही हे उघड झाले. माझ्या असंख्य मित्रांच्या मते ‘मि बऱ्याच गावचे पाणी प्यायले असल्या कारणाने मला कुठल्याही पाण्याचा त्रास होणे निव्वळ अशक्य आहे’. असो …. या मत मतांतरात न शिरता सद्य परिस्थिती म्हणजे माझा दुखरा घसा आणि त्यामुळे कुठल्याही पट्टीत न बसणारा खर्जातला आवाज.

बायको स्वयंपाक घरातील भांड्यांची अवराआवर (आदळआपट) करता करता तार सप्तकात ओरडली “ती नवीन डॉक्टरीण आलीये ना तिला फोन करा आणि घसा तपासून या”. बायकोची आज्ञा शिरसावंद्य मानून त्या नवीन डॉक्टरीणबाईला फोन लावला. या नवीन डॉक्टरीणबाईचा जास्त भर डिस्पेन्सरी मध्ये रांगेत बसलेल्या पेशंटना तपासण्या पेक्षा ”होम विझिट’ वरच जास्त …. फी जास्त मिळते ना, म्हणून असेल कदाचित. चांगला चार पाच वेळा एंगेज लागल्यावर एकदाचा फोन लागला. पलीकडून “हलो, कोण बोलतंय” इतका गोड आवाज ऐकून मि जरा ‘हललोच’ …. मि आपलं माझं नाव गाव सगळं थोडक्यात सांगितलं. “ओह म्हणजे त्या भातखंडे काकुंचे मिस्टर का? काय होतंय??? थ्रोटचा त्रास होतोय का काका तुम्हाला?” हे बहुदा माझ्या खरखरीत आवाजावरून केलेलं निदान असावं. मि म्हटलं “हो, कालपासून जरा घसा दुखतोय आणि गिळताना त्रास होतोय. केंव्हा येऊ तपा….” माझे पुढील वाक्य अर्धवट ठेवत डॉक्टरीणबाई मंजुळ आवाजात म्हणाल्या “नको नको … तुम्ही कशाला त्रास घेताय मीच येते तिथे.” “अहो. माझा घसा दुखतोय. पाय शाबूत आहेत अजून” मि नाराजीनेच म्हणालो. कारण केवळ घसा तपासण्यासाठी या बयेला जास्त फी देण्याची माझी इच्छा नव्हती. डॉक्टरीणबाई कृतज्ञता पूर्वक म्हणाल्या “काका, मि शेजारच्याच बिल्डिंग मध्ये शरद कुलकर्णी कडे आलेली आहे. जाता जाता तुमच्याकडे येते” चायला …. तो कुलकर्ण्या माझ्याच वयाचा आणि मि “काका”. असो, मि या म्हटलं आणि फोन बंद केला. आत मधून बायको त्या डॉक्टरीणबाईची तारीफ करत होती …. गुणाची आहे, घरी येउन तपासून गेली तरी तितकेच पैसे घेते … वगैरे वगैरे. तितकेच पैसे घेते हे वाक्य माझ्यादृष्टीने महत्वाचे.

दहा मिनिटात डॉक्टरीणबाई बाई दारात हजर. आल्या आल्या मला बेड वर झोपण्याची आज्ञा केली. आपल्या ब्यागेतून स्टेथोस्कोप काढून कानाला लावला आणि त्याची ती ठोके ऐकायची चकती छाती वर ठेवली. मग तीच चकती न उचलता सरकवत सरकवत पोटावर ठेवली. पोटावरून सरकवत सरकवत थेट घश्यावर दोन्ही बाजूला लावली. चकतीच्या प्रत्येक हालचाली वर मि चकित होत होतो. आज पर्यंत कुठल्याही डॉक्टरने ती चकती माझ्या हृदयाव्यातिरिक्त कुठल्याही अंगाला टेकवली नव्हती. मि माझ्या कापऱ्या आवाजात म्हटलं “डॉक्टर …. तिथे ती चकती लावून काय कप्पाळ कळणारे …. त्याने हृदयाचे ठोके तपासतात” तसं ती गोड आवाजात म्हणाली “तुम्ही शांत राहा. मि डॉक्टर आहे मला माहित आहे कुठे चेक करायचं ते. आणि हा स्पेशल स्टेथेस्कोप आहे. यातून सगळं कळत” माझी बायको ती डॉक्टर मला कशी तपासत आहे हे बघून बाजूलाच हसत उभी होती. त्यामुळे पाहिजे तिथे ती चकती फिरवून झाली आणि तिने माझे ब्लडप्रेशर चेक करण्या करता वेगळंच काहीतरी उपकरण बाहेर काढले. माझ्या मनगटावर ते ठेवून एका हाताने माझी नाडी हातात धरली. आता या बाईला माझी नाडी तळहातावर कुठे सापडली ते तो धन्वंतरीच जाणे.

कुठलीशी छोटी बाटली बाहेर काढून त्यातले दोन थेंब माझ्या घशात टाकले आणि विचारलं “आता कसं वाटतंय?” परिस्थितीत काहीही फरक पडला नसला तरी “जरा बरं वाटतंय” असं म्हणावं लागतं कधी कधी. परत एकदा तो स्टेथोस्कोप माझ्या घश्यावरून फिरला. स्टेथेस्कोप बाजूला काढून ठेवून ती बया म्हणाली “घसा कापावा लागेल” मि त्या आवाजात देखील किंचाळलो “घसा कापावा लागेल?? अहो काही तरीच काय डॉक्टर??” बायको बाजूला उभी राहून हसतच होती. डॉक्टरीणबाईने हातात एक छोटी कात्री घेतली आणि मला दाखवत म्हणाली “काळजी करू नका. अजिबात दुखणार नाही, रक्त पण येणार नाही” मि म्हटलं “निदान अनेस्थेशिया तरी द्या”. “ते काय असतं?” डॉक्टरच्या या प्रश्नाने मला भूल द्यायची अजिबात गरज पडली नाही. डॉक्टरीणबाईनी घश्याला कात्री लावली. खरंच दुखलं नाही …. “मि म्हणालो रक्त येतंय का बघा जरा” तर त्या बयेने कापसाच्या ऐवजी माझाच कळकट रुमाल जिथे कात्री लावली होती तिथे ठेवला आणि मला म्हणाली “५ मिनिटे धरून ठेवा …. सोडू नका अजिबात … आता झालं … मि जाते” मि म्हटलं “अहो जे कापलं आहे ते निदान शिवा तरी”. डॉक्टर माझ्या पत्नी कडे बघून म्हणाल्या …”तुम्ही मशीन वर शिवता ना? मग यांचा घसा तुम्हीच शिवून टाका. आता माझी फी द्या … १५० रुपीज.”

तिच्या हातावर ते पैसे ठेवले आणि तिला तशीच उचलून मांडीवर घेतलं … बायको बाजूला उभी राहून हसतच बघत होती. मि तिचे दोन चार मस्त पापा घेतले तशी ती माझ्यावर ओरडली “सोड मला…. मम्मा सांग ना बाबाला …. आत्ताच मि त्याला तपासलं आणि त्याच्या घशाचे ऑपरेशन केलं … मग ठरल्या प्रमाणे त्याने मि जाई पर्यंत झोपून राहायला हवं ना? …. याला ‘डॉक्टर डॉक्टर’ खेळताच येत नाही.” असं म्हणून मि आणि माझी बायको, आम्ही दोघे आमच्या अवघ्या ६ वर्षाच्या डॉक्टर लेकीवर प्रचंड हसलो. बायको म्हणाली “चला आता नेहेमी प्रमाणे तुमची मस्ती झाली असेल तर जेवायला बसूया. तिला काय …. तिची सुट्टी चालू झाली आहे तुला ऑफिसला जायचंय उद्या.”

मित्रांनो, अश्या असंख्य गमती जमती या लहान मुलांबरोबर होत असतात. ऑफिस मधून दमून भागून आल्यावर अशी द्वाड मुलगी असेल तर शीण कुठल्या कुठे निघून जातो. जसा आमरस कितीही गोड असला तरी चवीपुरता मिठाचा दाणा लागतोच तसंच या गमती जमाती मध्ये देखील चवीपुरते काही काल्पनिक संदर्भ जोडले आहेत ते चाणाक्ष वाचकांच्या नजरेत आलेलेच असतील.

कथाऔषधोपचारविनोदमौजमजाप्रकटनअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Jul 2012 - 2:56 pm | स्पा

आनंद साहेब लेख खूप आवडला..
मस्त किस्सा

यावरून परा ने मला तो लहान पणी डॉक्टर,डॉक्टर कसा आणि कोणाबरोबर खेळायचा याचा ऐकवलेला किस्सा आठवला =))

मन१'s picture

26 Jul 2012 - 2:45 pm | मन१

निखळ्..निरागस.

इरसाल's picture

26 Jul 2012 - 2:50 pm | इरसाल

आवडले हे वेगळे सांगायला नको.

किसन शिंदे's picture

26 Jul 2012 - 2:57 pm | किसन शिंदे

घसा कापावा लागणार हे वाचुन चपापलोच होतो. :D

तुमची गोड डागदरीन बै आवडली. :)

आवडले ......
आमच्या कडे पण हिच परिस्थिती... फक्त वय २ १/२ वर्ष...
बरेच प्रयोग होतात...

विजुभाऊ's picture

27 Jul 2012 - 12:35 pm | विजुभाऊ

आमच्या कडे पण हिच परिस्थिती... फक्त वय २ १/२ वर्ष...
हे मी "वय २१ वर्षे." असे वाचले.......... = =)) खुर्चीतून उताणा पडायचाच राहिलोय

अहो भाउ २ १/२ आणी २१ हयात काहीतरी फरक आहे की नाही ??????

तितकेच पैसे घेते हे वाक्य माझ्यादृष्टीने महत्वाचे.

:D

लेख मस्तच!

चैतन्य दीक्षित's picture

26 Jul 2012 - 3:33 pm | चैतन्य दीक्षित

आवडला.

टवाळ कार्टा's picture

26 Jul 2012 - 3:36 pm | टवाळ कार्टा

मी वेगळेच खेळलो होतो मग ;)

जाई.'s picture

26 Jul 2012 - 3:54 pm | जाई.

लेखन आवडले

किचेन's picture

26 Jul 2012 - 3:58 pm | किचेन

भारी.....लय आवडला किस्सा तुमचा....

पैसा's picture

26 Jul 2012 - 4:00 pm | पैसा

छान किस्सा!

मित्रांनो, अश्या असंख्य गमती जमती या लहान मुलांबरोबर होत असतात. ऑफिस मधून दमून भागून आल्यावर अशी द्वाड मुलगी असेल तर शीण कुठल्या कुठे निघून जातो.

एकदम बरोबर ...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Jul 2012 - 8:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुला रे काय माहिती ?

पिंगू's picture

26 Jul 2012 - 7:51 pm | पिंगू

हाहाहा.. चिमुकल्या डाक्टरीनबाई आवडल्या... :)

बॅटमॅन's picture

26 Jul 2012 - 8:18 pm | बॅटमॅन

दाक्तरीणबै लैच गोड आहेत :)

मदनबाण's picture

26 Jul 2012 - 8:38 pm | मदनबाण

मस्त लेखन ! :)
लहानपणीच्या गोष्टी आठवल्या ! ;)

अमितसांगली's picture

26 Jul 2012 - 8:44 pm | अमितसांगली

शेवटपर्यंत उत्सुकता कायम होती.........

खासंच!
आवडले लेखन.

-(लहानपणी डाॅक्टर डाॅक्टर खेळलेला) सोकाजी

सुनील's picture

26 Jul 2012 - 10:31 pm | सुनील

छान.

मस्त लिहिलं आहेस रे, धन्यवाद.

शिल्पा ब's picture

27 Jul 2012 - 6:47 am | शिल्पा ब

गोड !

दिपक's picture

27 Jul 2012 - 9:22 am | दिपक

गोंडस ले़ख.

अक्षया's picture

27 Jul 2012 - 9:36 am | अक्षया

गोड....:)

स्मिता.'s picture

27 Jul 2012 - 4:17 pm | स्मिता.

छान लेखन, मजा आली वाचायला.

RUPALI POYEKAR's picture

27 Jul 2012 - 4:35 pm | RUPALI POYEKAR

मस्त, मस्त आणि मस्तच...........

मयुरा गुप्ते's picture

27 Jul 2012 - 8:37 pm | मयुरा गुप्ते

छान खुसखुशीत लेख.

आमची पण एक दागतर बाई आहे. वय वर्ष सहा. ती सारखी कॉन्फरन्स ला जात असते, त्यामुळे तिची अपॉइंट्मेंट मिळ्ताना खुप वेळ लागतो. मधल्या वेळात तिचा असिस्टंट डॉक्टर ...डॉ.बंबल ..वय वर्ष दीड्,ह्याच्यावर जबाबदारी सोपवुन डॉ.बाई अभ्यास संमेलनाना जातात त्याची आठवण झाली.

-मयुरा

शेवटपर्यंत कळल नाही. म्हण्टल खरच कापला का काय गळा दोघी बायकांनी मिळुन...

असो. चला एकुण आता घसा दुखायचा थांबला तर. ..भारीच.

मॅन्ड्रेक's picture

31 Jul 2012 - 6:20 pm | मॅन्ड्रेक

वाहवा..

मॅन्ड्रेक's picture

31 Jul 2012 - 6:20 pm | मॅन्ड्रेक

वाहवा..

मॅन्ड्रेक's picture

31 Jul 2012 - 6:23 pm | मॅन्ड्रेक

वाहवा..