सफर तैवानची-भाग-१-व्हालियन आणि माझे विद्यापीठ - http://www.misalpav.com/node/20357
सफर तैवानची-भाग-२-मूलनिवासींची सांस्कृतीक स्थित्यंतरे - http://www.misalpav.com/node/20492
सफर तैवानची-भाग-३-लान्-यू बेट - http://misalpav.com/node/20667
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
याजागी मी अनेक वेळा गेलो आहे. पुण्यात आलेल्या माणसाने जसा शनवारवाडा आणि पर्वती पाहिली नाही तर पूणे दर्शन पूरे होत नाही, तसे व्हालियनला आलेल्या माणसाने थारोको राष्ट्रीय अभयारण्य/उद्द्यान (Taroko National Park), लियु लेक (Liyu Lake) पाहणे अगदी मस्टच्! :)
थारोको राष्ट्रीय अभयारण्य हे तैवान मधल्या एकुण आठ अभयारण्यांपैकी एक आहे. बाकी सात यांप्रमाणे १) केंटींग राष्ट्रीय अभयारण्य (Kenting National Park) २) युसान राष्ट्रीय अभयारण्य (Yushan National Park) ३) यांगमिंगसान राष्ट्रीय अभयारण्य (Yangmingshan National Park) ४) श्ये-पा राष्ट्रीय अभयारण्य (Shei-Pa National Park) ५) किनमेन राष्ट्रीय अभयारण्य (Kinmen National Park) ६) दोंगशा आतोल समुद्री राष्ट्रीय अभयारण्य (Dongsha Atoll Marine National Park) ७) तायज्यांग राष्ट्रीय अभयारण्य (Taijiang National Park) तैवानच्या एकुण क्षेत्रफळापैकी ८.६४% क्षेत्र अभयारण्यांनी व्यापलेले आहे.
थारोको राष्ट्रीय अभयारण्य हे जापानी राजवटीच्या काळात १२ डिसेंबर १९३७ साली तैवानच्या गव्हर्नर जनरलकडून घोषित करण्यात आले. पुढे १९४५ साली तैवानच्या स्वातंत्र्यानंतर त्याचा राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा काढुन घेण्यात आला कि जो पुन्हा २८ नोव्हेंबर १९८६ साली बहाल करण्यात आला.
"थारोको" चा त्रुकु जमातीच्या (कि जी थारोको च्या परिसरात आढळते) भाषेमध्ये अर्थ होतो "भव्य आणि सुंदर/रुबाबदार". हे अभयारण्य ९२० वर्ग किमी मध्ये पसरलेले असुन, एकुण तीन परगण्यांमध्ये {तायचुंग, नानताव आणि व्हालियन (Taichung, Nantou, Hualian)} चा विस्तार आहे. आपली राष्ट्रीय अभयारण्याची कल्पना, जसे की प्राणीसंपदेने भरपूर, येथे लागू होत नाही. कारण आदिवासींनी केलेल्या अतिरिक्त शिकारीमुळे अनेक प्राणी एक तर नामशेष झालेले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे काही प्रकारची हरणे, खारी, माकडे, कशी-बशी तग धरुन आहेत. पण निसर्गाने भरभरुन दिलेले सौंदर्य, संगमरवरी घळ्या (या अभयारण्यात संगमरवर मुबलक प्रमाणात मिळते), त्यांतुन वाहणार्या नद्या हे सर्व पाहुन डोळ्यांचे पारणे फिटते. नदीप्रवाह खडकाच्या क्षरणाला कारणीभूत ठरुन अनेक शिलाशिल्पे तयार झाली आहेत, निसर्गाची ही अनोखी किमया बघुन तर आपण स्तिमित झाल्याशिवाय राहत नाही.
अभयारण्यात तीव्र उताराच्या घळई, उत्तुंग शिखरे, त्यातुन वाहणार्या नद्या आपल्याला ठायी ठायी दिसतील. पण हे सर्व तयार व्हायला लागले ते २०० दशलक्ष वर्ष!. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळचे समुद्रतळाशी एकवर एक थर बसत गेले आणि वर्षानुवर्ष साचलेल्या गाळावर वरुन पडणारा विलक्षण दाब आणि भूगर्भिय उष्णता यांमुळे त्याचे रुपांतर चुनखडक आणि नंतर संगमरवरात झाले. या दरम्यान फिलीपिन्स प्लेट आणि युरेशियन प्लेटच्या आपआपसातील टक्करींमधुन हा भाग वर उचलला जाउन समुद्राच्यावर आला. (आजही तैवान आणि खासकरुन व्हालियन भाग भूगर्भिय हलचालींच्या दृष्टीने फारच संवेदनशील आहे. व्हालियन मध्ये ५-५.५ रिश्टर स्केलचा भुकंप हा सर्वसामान्य किंवा "किस झाड कि पत्ती" समजला जातो. मला आठवते एके दिवशी साधारण ३-५.५ रिश्टर स्केलच्या १९ भुकंपांची नोंद झाली होती. आजही हा भूभाग दरवर्षी अर्धा सेंटीमीटर या वेगाने वर उचलला जात आहे)
थारोको मध्ये अनेक प्रागैतिहासिक खुणा आणि स्थळे सापडली आहेत. त्याच बरोबर हा प्रदेश त्रुकु जमातीचे प्रमुख वसतिस्थान राहिलेला आहे. तसे पाहता अत्याल जमातीतून एक गट फुटुन बाहेर पडला आणि त्यांनी सेडीक जमातीची/टोळीची स्थापना केली. कालांतराने सेडीक जमातीतून आणखीन एक गट बाहेर पडला आणि तो या थारोको प्रदेशात स्थायिक झाला आणि त्यांनी स्वत:ला त्रुकु म्हणायला सुरुवात केली. नावाबरोबरच त्यांनी स्वतःचे रितीरिवाज, भाषा विकसित केली. ही जमात प्रामुख्याने भटकी शेती, शिकार आणि मासेमारी करणारी होती. ह्या जमातीत शत्रुचे मुंडके कापण्याची प्रथा होती कि जी नंतर जबरदस्तीने नामशेष करवली गेली. त्रुकु जमातीत सर्वांना ७-८ व्यावर्षी कपाळावर जमातीच्या ओळखीसाठी गोंदवून घेणे आवश्यक होते. १४-१५ व्या वर्षी पुरुषाला त्याच्या प्रथम यशस्वी हेड हंटींग नंतर हनुवटीवर गोंदवले जात तर स्त्रीला साधारण १५ व्या वर्षी तिच्या विणकामावरच्या प्रभुत्वानंतर गालावर.
हे अभयारण्य पाहण्यासाठी आपण व्हालियन रेल्वेस्थानकावरुन सरकारी थारोको दर्शनच्या बसेस मधुन जाउ शकता किंवा स्थानकावरच मिळणार्या टॅक्सीने पण जाऊ शकाता. अर्थातच स्वतःच्या गाडीने किंवा टॅक्सीने जाणे सर्वात उत्तम.
आता आपण प्रचिंकडे वळूयात, काही माहिती आपण प्रचि पाहता पाहता घेउयात.
अभयारण्याचे प्रवेश्द्वार
अभयारण्याचे माहितीकेंद्र
या माहितीकेंद्रात अभयारण्यात असणार्या शिखरांची, प्राण्यांची, वनस्पतींची माहिती दिलेली आहे आणि छोटी प्रदर्शनी पण आहे
अभयारण्यात शिरल्यानंतर सुरुवातीला लागते ते ईटर्नल स्प्रिंग श्राइन (Eternal Spring Shrine), थारोकोमधुन जाणार्या महामार्गाच्या निर्माणात ज्या मजुरांचा जीव गेला त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे थडगे बांधण्यात आले. लोकांनी येथे येउन प्रार्थना करुन त्यांच्या-त्यांच्या देशाच्या चलनात पैसे दान करण्याची प्रथा आहे.
त्यानंतर लागतो हा झुलता पुल
जंगलात आत दुरपर्यंत चालत जाण्यासाठी उजव्याबाजुला दिसतात तश्या खडक खोदुन ट्रेलस् बनवलेल्या आहेत
जागोजागी वाहणारे निर्झर झरे, पाण्याचे प्रवाह आपले मन प्रफुल्लित करतात
अभयारण्यात असे सुंदर आकृतीबंध असणारे अनेक पुल आहेत
ह्या प्रचित दिसणारी नदी आणि तिने खडकांचे केलेले क्षरण. यात दिसणारा खडक म्हणजे संगमरवर आहे. आणि डाव्याबाजुला खडक खोदुन केलेला रस्ता दिसत आहे
त्यानंतर आपण पोचतो ते "टनेल ऑफ नाइन टर्नस्" ला (Tunnel of Nine Turns) इथे आपण गाडीतुन उतरुन साधारण १ ते १.५ चालत जाउ शकता. हा मार्ग नदीच्या काठाने, कधी बोगदयातुन जातो. ईथे भूस्खलनाचे प्रकार वरचेवर घडत असतात त्यामुळे हल्ली बांधकामावर वापरतो तश्या टोप्या घालण्याची सक्ती केलेली आहे.
नागमोडी वळण घेणारा रस्ता, हा संपूर्ण घाटरस्ता असूनही आपल्याला विनाखड्डा रस्ता दिसेल. किंबहुना सगळीकडेच अश्याप्रकारचे रस्ते दिसतील.
याच "टनेल ऑफ नाइन टर्नस्" च्या दुसर्या टोकाला हा गोरिलाचा आकार असणारा डोंगर आहे. निसर्गाची किमया अगाध आणि तितकीच विस्मयकारी आहे.
त्यानंतर लागते ते "इंडियन हेड रॉक" ह्याला इंडियन हेड रॉक का म्हणतात याचे आतापर्यंत कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही, पण ते आहे. इथे नदीच्या पहिल्या वळणाच्या उजव्या बाजुला खाली खडकामध्ये एक मानवी चेहरा दिसतो आहे (अर्थातच त्याचा जबडा नदीच्या गाळामुळे दिसत नाही).
असेच खडकांमध्ये सापडलेले चित्रविचित्र चेहरे नि आकृत्या
हा अजुन एक मानवी चेहरा
हे व्याघ्रमुख
जागोजागी अशी विश्रांतीस्थाने केली आहेत जेणेकरुन पर्यटक विश्रांती, खाणे-पिणे करु शकतील
त्याठीकाणी असणारी विविध शिल्पे
नंतर आपण पोचतो ते थियेनशांगला (Tiansiang), हा थारोको दर्शनाचा शेवटचा टप्पा, इथे उंच डोंगरावर सुंदर बुद्धमंदीर आहे
इथे नजरेत भरते ते उलटे स्वास्तिक, बौद्ध धर्मात उलटे स्वास्तिक पवित्र मानले गेले आहे
मंदीराचे प्रवेशद्वार
तिथे असलेली ही बुद्धाची सुवर्णमूर्ती
वरुन मंदीरातुन दिसणारा थियेनशांगचा नजारा
मंदीराच्या सुविनियर शॉप मध्ये असलेली "अवलोकितेश्वराची मूर्ती"
आता आपण पाहू "लियू लेक". हे तळं नैसर्गिक रित्या तयार झालेले तळं असून याला "कार्प लेक" (Carp Lake) ही म्हणतात. हे आमच्या विद्द्यापीठाच्या अगदी जवळ आहे. यात बोटींगचीपण सुविधा आहे.
तळ्याशेजारच्या डोंगरावरुन (Liyu shan) विद्द्यापीठाचे दिसणारे दृश्य
या तळ्यात दरवर्षी "ड्रॅगन बोट फेस्टीवल"ला बोटींच्या शर्यतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
ह्या "ड्रॅगन बोट फेस्टीवल"च्या बक्षिस वितरण समारंभाला सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमाची चलचित्रफीत आपल्याला इथे पाहता येइल
भाग-१ http://www.youtube.com/watch?v=a7LiacRgKhs&feature=context&context=C3649...
भाग-२ http://www.youtube.com/watch?v=sgOy_roqE_4&feature=context&context=C3649...
भाग-३ http://www.youtube.com/watch?v=qQVbL-r9K6g&feature=context&context=C3649...
दर जुलै महिन्यामध्ये व्हालियनमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी या तळ्यात प्रकाश-ध्वनी योजनायुक्त कारंज्यांचा कार्यक्रम केला जातो. हा सर्वांसाठी खुला असतो आणि ईतकेच नाही तर व्हालियन रेल्वेस्थानकापासुन या तळ्यापर्यंत मोफत बसेसची सोय केली जाते. हा कार्यक्रम साधारणतः महिनाभर असतो. यात कारंज्याच्या पाण्याच्या तुषारांचा पडदयासारखा वापर करुन लेजर शो तसेच काही चलचित्रेही दाखवली जातात.
ह्या कारंज्यांच्या कार्यक्रमाची संपूर्ण चलचित्रफीत आपल्याला इथे पाहता येइल
http://www.youtube.com/watch?v=bZvpL8jedl0&feature=related
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
पुढच्या भागात हव्हानसान (Hehuanshan)......................
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Feb 2012 - 2:04 pm | गणेशा
सुंदर . ..
चित्रे पाहतच बसावेत असे वाटते आहे..
प्रत्यक्ष कदाचीत कधी या भागाकडे जाणार नसलो तरी तुमच्या शब्द आणि चित्रांच्या मार्फत आम्हीच तेथे आहोत असे वाटले..
धन्यवाद
26 Feb 2012 - 2:39 pm | अन्या दातार
निसर्गाने काय भरभरुन दिलंय या भागाला!! पण त्याचे सुनोयजन ज्या पद्धतीने केले आहे, त्यालाही आपण मानले ब्वा! नुसतेच रिसोर्सेस असून चालत नाही, त्याला जोड हवी शिस्त व नियोजनाची.
केंदाळमुक्त तलाव बघून मस्त वाटले.
27 Feb 2012 - 10:45 pm | हंस
एक तर देश छोटा, त्यात संसाधनं मर्यादीत, त्यामुळे असलेल्या गोष्टींमध्ये कलात्मकता पुरेपुर ओतुन त्यांनी हे साधलं आहे. तैवानची अर्थव्यवस्था बहुतांशी पर्यटनावर अवलंबून असल्यामुळे मिळेल तिथे, मिळेल त्याचे अक्षरशः "वंडर" उभे केले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ते पुरेपुर प्रयत्न करत असतात.
26 Feb 2012 - 2:44 pm | पैसा
सगळीच माहिती आणि चित्रं अप्रतिम आहेत! एका वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटलं. ते व्याघ्रमुख नैसर्गिक आहे का?
27 Feb 2012 - 10:48 pm | हंस
ते पूर्णतः नैसर्गिक आहे, बिचारा एका ओढयात पडलेला सापडला. वर्षानुवर्षे पाण्यामुळे झीज होउन त्याला हा आकार प्राप्त झाला आहे.
27 Feb 2012 - 7:29 am | ५० फक्त
सुंदर माहिती अन फोटो, अतिशय धन्यभार, तुमची ही मालिकाच अतिशय सुंदर होते आहे.
27 Feb 2012 - 12:31 pm | अमृत
सगळी छायाचित्रे आणि वर्णन मस्तच. पुढील भागच्या प्रतिक्षेत.
अमृत
27 Feb 2012 - 4:05 pm | प्यारे१
खूपच छान प्रकाशचित्रं
27 Feb 2012 - 8:41 pm | Manish Mohile
अफाट निसर्ग सौंदर्य लाभले आहे या देशाला आणि तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद हे सगळे आमच्या पर्यंत पोचवण्यासाठी. अप्रतिम फोटोज आणि सुरेख माहीती.
27 Feb 2012 - 9:56 pm | मराठे
सगळेच फोटो मस्त आहेत. विशेषतः झर्यांच्या पाण्याचा नितळ निळा रंग फारच सुरेख (असं स्वच्छ पाणी बघायची सवय नाहीये अजिबात!) निसर्ग सौंदर्य तर प्रेक्षणीय आहेच पण त्याच बरोबर ते ज्या प्रकारे जपलंय तेही तितकंच कौतुकास्पद! अतिशय स्वच्छ आणी पर्यटकांच्या सोयींनी युक्त! कागदाचा एक कपटाही कचरा दिसत नाही. खरंच खूप छान!
27 Feb 2012 - 10:16 pm | जाई.
नेहमीपेक्षा वेगळ्या प्रदेशाची ओळख आवडली
28 Feb 2012 - 9:57 am | मदनबाण
तुम्ही अतिशय सुंदर माहिती देत आहात्,आणि फोटो तर फारच सुंदर आहेत. :)
आधीचे भाग वाचायचे राहिले आहेत... सवड मिळताच ते वाचतो.
28 Feb 2012 - 11:39 am | उदय के'सागर
अप्रतिम....
व्वा.... मन प्रसन्न झालं हे फोटो पाहुन..... :)
४ नबंरच्या फोटतलं दृश्य म्हणजे जणु परीकथेत किंवा टिपीकल राजा-राणीच्या गोष्टींमधे दिलेलं वर्णनच.... :)
आणि त्या 'निर्झर' झर्यां मधलं ते पाणि काय स्वच्छ हो.... कमाल, तो अस्मानी रंग त्या पाण्याचा... सगळं कसं जणु ... मयानगरीच....
भारतातही (खरंतर प्रत्येकच देशात) अशी बरीच ठीकाणं आहेत निसर्गाने भरभरुन दिलेली.. पण .................असो... कमित कमी सामन्य जनतेने/पर्यटकांनी पर्यटन स्थळांवर कचरा जरी टाकला नाही तरी ती भारतीय पर्यटनाला, त्या नैसर्गिक सौंदर्याला खुप मदत होईल....
28 Feb 2012 - 3:22 pm | नरेंद्र गोळे
हंस,
आपणास जीवनाने सृष्टीदर्शनाची अपूर्व संधी दिली असून आपण त्या संधीचे अक्षरश: सोने करत आहात.
आपले सर्वच (चार?) लेख आता वाचून झालेत. त्यातील मजकूर आणि प्रकाशचित्रे एका न पाहिलेल्या अद्भूत जगाची ओळख आम्हाला करून देत आहेत. वर्णन आणि प्रकाशचित्रांचा दर्जा, मूळचे जग आणि देखावे ह्यांच्या इतकाच सरस आणि सुरस आहे.
हे सर्वच लिखाण (आणि प्रचि) मला बेहद्द आवडले आहे.
अतिशय देखण्या आणि नितांतसुंदर प्रवासवर्णनास आमच्यापर्यंत पोहोचवण्याखातर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
आपणास पुढील सर्व लेखनाकरता हार्दिक शुभेच्छा!
28 Feb 2012 - 9:20 pm | हंस
सर्व प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद!
28 Feb 2012 - 9:37 pm | अन्नू
हिरवळीने नटलेला निसर्ग पाहुन ड्वाळ्यांचे पारणे फिटले!
शेवटच्या फोटोंमधील कारंज्यांद्वारे वर केलेली लाईटींगची उधळण तर माईंड ब्लोईंग!