हा भाग लिहीताना मला आमच्या विद्द्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ श्री. करीम फ्रेडमन* (Kerim Friedman) यांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्यांचा मी आभारी आहे.
* ह्यांची बायको भारतीय आहे, आणि हे गुजरातेतल्या "छारा" जमातीवर भारतीय सरकार आणि पोलिसांकडून होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करतात. महाराष्ट्रातील रामोशी, पारधी जातींप्रमाणे या "छारा" जातीवर गुन्हेगार हा शिक्का ब्रिटीशांच्या काळापासून बसलेला आहे. तेव्हा गावात होणार्या प्रत्येक गुन्ह्यात ह्या जातीला दोषी मानले जाते, आणि पोलिस ह्या जातीतल्या लोकांना विनाचौकशी तुरुंगात टाकतात. श्री. करीम फ्रेडमन ह्यांनी ह्या जातीतील शिकलेल्या तरुणांना हातशी धरुन एक संस्था स्थापन केली आहे, जे त्यांच्यावर होणार्या अन्याय पथनाट्य, माहितीपट यांच्या माध्यमांतुन समाजापर्यंत पोहचवण्याचे काम करतात.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मागच्या भागात बिपिनदाच्या सुचवनीनुसार तैवानच्या मूलनिवासींच्या संस्क्रुतीत, जीवनात बाह्यशक्तिंच्या (युरोपियन, चायनिज आणि जापानी) आक्रमणांमुळे आलेल्या स्थित्यंताराचा लेखा-जोखा ह्या भागात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एकुण तैवानच्या मूलनिवासींच्या लिखित इतिहासाचा विचार करता ह्या कालखंडाचे ढोबळमानाने तीन भाग पाडता येतील.
१) चीनी राजवटीचा कालखंड
२) जापानी राजवटीचा कालखंड
३) वर्तमान सरकारचा कालखंड
यावेगवेगळ्या कालखंडंची माहिती करुन घेण्याआधी आपण तैवानमध्ये असलेल्या आदिवासी टोळ्यांची माहिती करुन घेणार आहोत.
सरकार दरबारी अधिक्रुतरित्या १४ मूलनिवासी गट्/आदिवासी टोळ्यांना मान्यता देण्यात आली आहे, त्या पुढील प्रमाणे- अमी (Ami), अत्याल (Atayal), बुनून (Bunun), कवालान (Kavalan), पायवान (Paiwan), पुयुमा (Puyuma), रुकाय (Rukai), सैसियात (Saisiyat), ताव (Tao), झो (Thao), त्सोउ (Tsou), त्रुकू (Truku), साकिजाया (Sakizaya) आणि सेडिक (Sediq).
त्याशिवाय अनेक टोळ्या अशा आहेत की ज्यानां अजुन मान्यता मिळालेली नाही, त्यापुढील प्रमाणे-
बाबुझा (Babuza), बसाय (Basay), होआन्या (Hoanya), केतागालान (Ketagalan), लुईलांग (Luilang), माकाताव (Makatao), पाझेह/काझाबु (Pazeh/Kaxabu), पापोरा (Papora), क्वाक्वात (Qauqaut), सिराया (Siraya), तावकास (Taokas), त्रोबिवान (Trobiawan).
तैवानमधील मूलनिवासी टोळ्यांचे वितरण एकुण भूक्षेत्राचा विचार करता खालीलप्रमाणे-
(हा प्रचि विकिपीडियावरुन साभार)
सरकारच्या धोरणानुसार, तैवानमधील आदिवासी टोळ्यांची गणना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, त्यामध्ये आपल्या टोळीला अधिक्रुत करण्यासाठी सबंधित टोळीकडून पुरावे सादर करण्यास सांगितले गेले, जेणे करुन त्यांना काही सामाजिक आणि आर्थिक सवलती देता येतील. याप्रयत्नांतुन २००८ पर्यंत एकुण १४ टोळ्यांना मान्यता देण्यात आली. पण तैवानचा इतिहास पहाता कालौघातात कमी झालेली किंवा नामशेष झालेल्या टोळ्यांची संख्या, पुरेश्या कागद्पत्रांची अनुपलब्धता पहाता काही टोळ्या आजही मान्यतेसाठी झगडत आहेत.
एवढया छोटया बेटावर १४ आदिवासी टोळ्या, १४ भाषा, १४ वेगवेगळ्या संस्क्रुती (यात मान्यता नसलेल्या ईतर टोळ्यांची गणती केली नाही) गुण्यागोविंदाने रहात होत्या, ही खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे (भारतासारख्या खंडप्राय देशाशी तुलना करता).
१६-१७ शतकात युरोपियन आक्रमकांनी (पोर्तुगिज, डच, फ्रेंच, आणि स्पॅनिश) तैवानमध्ये आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानां काही प्रमाणाच्यावर यश आले नाही. पोर्तुगिज लोकांनी या बेटाच्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडून याला "Ilha Formos" किंवा नुसते "फार्मोसा" असे नाव दिले. या युरोपियनांनी व्यापाराच्या हेतुने आपल्या वसाहती स्थापन केल्या परंतु स्थानिक आदिवासी आणि छिंग राजवटीच्या (Qing dynasty) विरोधापुढे त्यांना नमते घेउन आपला बाड-बिस्तरा गुंडाळावा लागला.
यापुढे आपण मुख्यविषयाकडे वळुन, वर नमूद केलेया वेगवेगळ्या कालखंडाची अनुक्रमे माहिती करुन घेउयात-
१) चीनी राजवटीचा कालखंड-
१६ व्या शतकात चीनी मुख्य भूमीवरुन (विशेषतः चीनच्या फुजियान (Fujian) आणि ग्वांगदोंग (Guangdon) प्रांतातुन) तैवानमध्ये स्थलांतरास सुरुवात झाली. मुख्यत्वे हे स्थलांतर झाले ते तैवानच्या पश्चिम किनार्यावर जो पूर्व किनार्याच्या तुलनेने जास्त सपाट आणि सुपिक होता. पण १८७४ च्या पूर्वी झालेले पूर्व किनार्यावर वसाहतीचे प्रयत्न अगदी मोजकी ठिकाणे (जसेकी व्हालियन (Hualien) आणि तायदोंग (Taidong)) सोडता निष्फळ ठरले. याला कारण तेथिल रोगराई आणि स्थानिक आदिवासींचा प्रतिकार. पण १८७४ मध्ये हे सर्व चित्र बदलले आणि हा भाग छिंग राजवटीच्या नजरेत भरला (या आधी राजवटीचे ह्या भागाकडे जाणुन-बुजून दुर्लक्ष करण्याचे धोरण होते, कारण एक तर हा सर्वात दुर्गम भाग होता, दुसरे म्हणजे येथे असणारे आदिवासी (यातल्या काही जमाती/टोळ्या नरभक्षकही होत्या) आणि त्यांच्या कडुन वेळोवेळी होणारे बंड आणि तिसरे म्हणजे मौल्यवान खनिजांचा अभाव, त्यामुळे राजवट ह्या भागापासुन शक्य तितके अंतर ठेवण्याचा प्रयत्न करी).
तीन वर्षांपूर्वी तैवानच्या दक्षिण-पूर्व भागात जापानच्या ओकिनावा भागातील एका जहाजाच्या वादळात झालेल्या मोडतोडीमूळे त्यातील सैनिकांनी/खलाश्यांनी तैवानच्या किनार्यावरिल मुदांशे (Mudanshe) गावात आश्रय घेतला पण त्याभागातील पायवान जमातीच्या हल्ल्यामध्ये ५४ जणांचा म्रुत्यू झाला, ह्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल जापानच्या राजाने ३००० सैनिकांची तुकडी तैवानवर पाठवली. तसे तैवानचे व्यापारी मार्गांच्या संरक्षणाच्याद्रुष्टीने महत्व पहाता जापानचे आधीपासुनच याभूभागावर लक्ष होते आणि तो फक्त संधीची वाट पहात होता. पण बळी गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबाला भरपाई आणि सैन्यमोहीमेचा खर्च देण्याच्या बोलीवर छिंग राजाने यशस्वी तह केला आणि जापानच्या राजाने आपले सैन्य तैवानमधुन काढून घेतले. पण ह्या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी छिंग राजवटीने सैन्याच्या जोरावर हा भाग नियंत्रणात ठेवन्याचा प्रयत्न सुरु केला, आणि याचबरोबर चीनीलोकांच्या याभागात स्थिरीकरणावर भर देण्यात आला. चीनी लोकांना याभागात येण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवण्यात आली, यामध्ये जनावरे, शेतीसाठी लागनारी साधने आणि तीन वर्ष करांमधून सुट दिली. पण एकुण परिस्थिती पाहता हे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाही. तेव्हा राजाने ह्या आदिवासी गावांना बी-बियाणे, शेतीची साधने आणि मदत देण्याचा प्रयत्न करुन पाहीला. यात गावाला गावप्रमुख (Toumu) नेमन्यात आला, जो गावाच्या प्रशासनात राजवटीची मदत करेल. खुपदा या गावप्रमुखाला राजवटीच्या ईतर संपन्न शहारांची सहल घडवली जात असे जेणे करुन ह्या संपन्नतेने डोळे दिपून तो त्या आदिवासी टोळीला राजाचे अंकित करेल (ही युक्ती नंतर जापानी लोकांनीही वापरली).
१८८५ साली छिंग राजाने तैवानला एका स्वतंत्र परगण्याचा दर्जा देत लिउ मिंगचुवान (Liu Mingchuan) या सैन्याची पार्श्वभूमी असलेल्या अधिकार्याची गव्हर्नर म्हणुन नियुक्ती केली, ज्याची नीती सैन्याच्या जोरावर आदिवासींचे बंड/उपद्रव मोडण्याची होती. यामध्ये त्याने स्थानिक चीनी निवासींचीही मदत घेतली. या सर्वामागे त्याचा एक छुपा हेतु म्हणजे ह्या भागात वाढणारी कापराची झाडे (Camphor Trees) आणि त्यावर वर्चस्व प्रस्थापित करुन याच्या निर्यातीवर सरकारची एकाधिकारशाही निर्माण करणे. कारण कापूर हे सोन्याइतकेच मौल्यवान होते ज्याचा उपयोग वेगवेगळ्या औषधींमध्ये, धार्मिक कार्यात, दारुगोळ्यात केला जात असे.
ह्यासर्व प्रयत्नात जागोजागी सैन्यचौक्या निर्माण केल्या गेल्या, आणि तथाकथित संस्कृतीकरणाच्या नावाखाली पोलिसांच्या देखरेखी खाली शाळा सुरु करण्यात आल्या. शाळेत कंन्फुशियन विचारसरणी आणि चीनी भाषा शिकवली जाउ लागली. पण मर्यादित आर्थिक मदत आणि कमी उपस्थिती यांमूळे या शाळा वर्षा दोन वर्षातच बंद पडल्या, आणि पुढे छिंग राजवटीच्या तैवान मधील पडावामूळे आदिवासींच्या या चीनीकरणाच्या प्रयत्नांना खीळ बसली.
२) जापानी राजवटीचा कालखंड-
१८९५ मध्ये छिंग राजाच्या पराभवानंतर तैवानवर जापान्यांचे राज्य प्रस्थापित झाले. त्यानंतरही १९०६ पर्यंत त्याना पूर्वकिनार्यावरील आदिवासींच्या संपूर्ण भागावर सत्ता काबिज करता आली नाही. यासाठी सरकारपुरस्क्रुत विकासाचा कार्यक्रम योजावा लागला (जसा छिंग राजवटीने राबवला होता), शतकाच्या तिसर्या दशकापर्यंत एकुण ३००० जापानी ह्या भागात निवास करु लागले, यासाठी त्यानां ५००० येन बक्षिशी देण्यात आली. या दरम्यान पश्चिम भागातील चीनी रहिवाश्यानांही ह्या भागात येण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले, या साठी पूर्व किनार्यावर दोन साखर कारखाने चालू करुन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या. बाजाराची हमी देउन त्यांना ह्या किनार्यावर उसाच्या शेतीसाठी जमिनींचे वाटप करुन तांत्रिक सहाय्य आणि खतांचा पुरवठा करण्यात आला. जापान सरकारने शेतीखाली नसलेल्या जमिनीची मालकी ही सरकारच्या नावाने घोषित केली आणि यावरुन स्थानिक आदिवासी आणि सरकार यांमध्ये असंतोष धुमसू लागला कारण या आदिवासींकडे त्यांच्या जमिनीच्या मालकीची कोणतीही कागदपत्रे नव्हती, आणि सरकारने देउ केलेल्या मुदतीतही आदिवासींनी आपल्या जमिनींच्या मालकीचा दावा केला नाही. (कारण जर दावा केला असता तर त्यांना त्याबदल्यात कर भरावा लागला असता). ह्यासर्व प्रकारामुळे आदिवासींकडून सरकारला प्रतिकार वाढू लागला. १९१५ मध्ये सैन्याच्या मदतीने हा उपद्रव मोडुन काढण्यात आला, ज्यात १०००० जापानी सैनिक, आणि अगणित आदिवासी युद्ध, भूकबळीने मारले गेले.
यानंतर छिंग राजवटीत वापरलेल्या युक्तीनुसार शिक्षणाच्या माध्यमातुन आदिवासींना आपलेसे करण्याचे धोरण अवलंबन्यात आले. यामध्ये त्यांना जापानी भाषा, अंकगणित, आणि जापानी संस्क्रुतीची तोंडओळख करुन दिली गेली. त्याचबरोबर शेती करण्यास शिकवले जेणेकरुन त्यामाध्यमातुन त्यांचा उपद्रव कमी करता येईल. जमातीतल्या जेष्ठांना जापानच्या सहलीवर नेण्यात आले (पुन्हा छिंग राजवटीची युक्ती).
जापानी राजवटीच्या काळात ख्रिश्चानीटीचा सहभाग अतिशय मर्यादीत होता. आदिवासींच्या श्रद्धांवर परिणाम करणार्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेशबंदीच्या सबबी खाली मिशनरींना त्याभागात जाण्यापासुन रोखण्यात आले. आदिवासींवर चाललेले अत्याचार कुणाही बाहेरच्या व्यक्तीने बघु नये हाही एक हेतु यामागे होता. तरीही बाहेरच्या जागाशी संबंध आलेल्या आदिवासी आणि आदिवासी युद्धबंदींच्या मार्फत थोडयाफार प्रमाणात ईसाइकरण चालुच होते (पुढे ह्याच मिशनर्यांच्या मार्फत चैग काय शेक अमेरिकेचा पाठींबा मिळवण्यात यशस्वी झाला).
पुढे १९३७ च्या चीन्-जापान युद्धानंतर आदिवासींच्या जापानीकरनाला वेग आला, कारण जापान्यांना पूर्ण तैवान आणि तेथील रहिवाश्यांना पूर्णपणे राजाचे मांडलिक करायचे होते. याधोरणा अंतर्गत प्रौढ साक्षरता वर्ग, सायंकालीन भाषा वर्ग सुरु करण्यात आले. इतकेच काय, त्यांना जापानी नावेही घेण्यासाठी, जापानी वेशभूषा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. जो जितका जापानी संस्क्रुतीनुसार वागेल त्याला तितक्या जास्त सवलती जाहीर करण्यात आल्या. दुसर्या महायुद्धातही तैवानी आदिवासींनी जापानच्या बाजुने एकदिलाने मदत केली. पुढे दुसर्या महायुद्धातील जापानच्या परभवानंतर तैवानवरील त्यांचे राज्य संपुष्टात आले.
३) वर्तमान सरकारचा कालखंड-
जापान्यांच्या पराभवानंतर आलेल्या चैंग काय शेक च्या सरकारने "माउंटन रिर्जव पॉलिसी" राबवून सर्व आदिवासींना मुख्य प्रवाहात सामिल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची सांस्क्रुतीक आस्मिता नष्ट करुन. एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्क्रुती हे धोरण अवलंबताना पद्द्तशीर पणे त्यांच्या सांस्क्रुतीक मुल्यांचे खच्चीकरण करण्यात आले. पण आदिवासींच्या अस्मितेचे पुनरुज्जीवन करण्यात मिशनर्यांचा खुप मोठा हातभार आहे. जापान्यांच्या राजवटीत धर्मप्रसारास पुरेसा वाव न मिळाल्यामुळे निराश झालेले मिशनरी, चैंग काय शेकच्या राजवटीत नव्या जोमाने कामाला लागले. १९५० मध्ये संख्येने ३० च्या घरात असलेले मिशनरी १९५७ मध्ये ७०० पर्यंत जाउन पोहोचले. स्थानिक आदिवासींच्या मध्ये काम करणार्या मिशनर्यांनी त्यांना स्थानिक भाषांमध्ये (काही भाषा रोमन लिपीध्ये लिहून) बायबल देण्यास सुरुवात केली, की जे आधी कधीही झाले नव्ह्ते. यामुळे आदिवासींच्या भाषेला एक नवी ओळख मिळाली.
चैंग काय शेकने त्याच्या कोमिंतांग पार्टी (Kuomintang Party) च्या नेत्रुत्वाखाली, तैवानमध्ये कन्फ्युशियन विचार्-प्रसार, चीनी भाषेचा प्रसार आणि जापानी भाषेचा दैनंदीन जीवनातील वापर नष्ट करण्याचा विडाच उचलला होता. नंतर लगेचच "मार्शल लॉ" लागू करण्यात आला त्यामुळेतर आदिवासी संस्क्रुतीची आणखीनच गळचेपी वाढली (हा "मार्शल लॉ" पुढे अंदाजे चार दशके चालू होता. हा जगातला सर्वाधिक काल चाललेला मार्शल लॉ आहे). पुढे १९८७ मध्ये "मार्शल लॉ" संपल्यानंतर पुन्हा एकदा आदिवासींच्या सांस्क्रुतिक चळवळीने उचल खाल्ली. एव्हाना खुपसे आदिवासी, उच्च शिक्षण घेवून आपल्या सांस्क्रुतिक मुल्यांच्या संपन्नतेची जाणीव झालेले आणि त्यासाठी काहीतरी करण्याचा विचार घेउन, त्यासाठी चळवळ उभारण्याच्या कामाला लगलेले होते (यात चर्चचा सिंहाचा वाटा आहे). त्यातुन १९८४ मध्ये "Taiwan Aboriginal People's Movement" चा जन्म झाला. याच्या माध्यमातुन आदिवासींना बरोबरीचे हक्क, सरकारने घेतलेल्या त्यांच्या जमिनी परत करणे, राजकारणात इतरांच्या बरोबरीने समावेश करणे, तैवानमध्येच प्रत्येक टोळीच्या संख्येच्या प्रमाणात स्वायत्त भूप्रदेश देणे यांसारख्या मागण्यांचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हा लढा चालू आहे.
माझ्या तैवानमधील वास्तव्यादरम्यान या आदिवासीं लोकांशी झालेल्या संवादामध्ये मला त्यांचा त्यांच्या संस्क्रुतीविषयी खुप अभिमान जाणवला. विद्द्यापीठातही संधी मिळेल तिथे संबंधित जमातीतले विद्द्यार्थी आपली वेशभूषा, न्रूत्य, खाद्य सादर करताना दिसायचे. अर्थातच त्यांच्यात आर्थिक संपन्नताही आहे, जर तुम्ही कोणा आदिवासीच्या घरी गेला तरी त्याचे रहाणीमान आपल्या इकडच्या उच्च मध्यमवर्गीयाला लाजवेल इतके चांगले आहे. पण अशा परिस्थितीतही ते आपल्या आदिवासी मूल्यांशी नाळ जोडून आहेत.
आता काही प्रचि-
१) एका आदिवासी खेडयात असलेला पुतळा-
२) आदिवासींनी बनवलेली काही भांडी-
३)
४) न्रुत्य करणारे काही आदिवासी-
५)
६)
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
पुढच्या भागात तैवानच्या एका बेटावर असलेल्या आदिवासी जमातीच्या "बोट ओपनिंग फेस्टीवल"ला उपस्थित राहाण्याचा योग आला होता त्याविषयी......................
क्रमशः
प्रतिक्रिया
23 Jan 2012 - 4:30 am | सुनील
नव्यानेच कळते आहे हे सगळे!
सुरेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
23 Jan 2012 - 6:19 am | मराठमोळा
माहितीपुर्ण लेख.
ईतक्या सार्या राजकीय/सत्ता बदलांनतरही तैवान इतक्या दृढपणे उभी आहे हे पाहून खरच नवल वाटते.
पु.भा.प्र.
23 Jan 2012 - 8:50 am | अन्या दातार
मस्त जमलाय भाग.
23 Jan 2012 - 9:52 am | मन१
वाचतोय.
23 Jan 2012 - 10:08 am | बिपिन कार्यकर्ते
खूप छान माहिती दिली आहेस. आवडली. प्रकाशचित्रेही उत्तम आहेत.
तैवानमधले हे आदिवासी हान किंवा इतर चिनी वंशाचे दिसत नाहीयेत. त्यांच्या चेहर्याची, शरीराची ठेवण आणि वर्ण साधारण ऑस्ट्रेनेशियन वंशाचे वाटते. म्हणजे, फिलिपिनो, इंडोनेशियन, मलाय इत्यादी लोकांच्या जवळचे. या अनुषंगाने असे वाटते की, १९५० नंतर जेव्हा या बेटाच्या चिनीकरणाला एक निश्चित वेग आणि स्वरूप प्राप्त झाले त्यावेळेस खूप संघर्ष झाला असावा. नसेल तरी, आजही आदिवासी आणि हान वंशाचे चिनी यांच्यातल्या संबंधांची कल्पना येऊ शकतेच. या सगळ्यावरच थोडं अधिक सविस्तर लिहिता येईल का?
लगे हाथ, यादवी युद्धानंतर कुओमिंतांगचे राज्य कसे आले, ते कसे स्थिर झाले वगैरे भागही आला तरी आवडेल.
24 Jan 2012 - 6:03 pm | हंस
<तैवानमधले हे आदिवासी .............मलाय इत्यादी लोकांच्या जवळचे>
अगदी खरे आहे! आणि ईतर चीनी चेहर्यांच्या भाउगर्दीत हे आदिवासी चेहरे लगेच ओळखु येतात.
<१९५० नंतर जेव्हा या बेटाच्या चिनीकरणाला एक निश्चित वेग आणि स्वरूप प्राप्त झाले त्यावेळेस खूप संघर्ष झाला असावा. >
जेवढा आधीच्या दोन कालखंडात विरोध झाला तेवढा १९५० नंतर नाही झाला, कारण इतक्या अत्याचारानंतर ते स्वत्वच हरवुन बसले होते. हो पण १९८० नंतर मात्र खर्या अर्थाने विरोध सुरु झाला, कारण ती पिढी उच्चविद्याविभूषित होती आणि आपण काय गमावून बसलो आहे याची जाणिव त्यांना व्हायला सुरुवात झाली त्याचबरोबर त्याचा संवर्धनाच्या द्रुष्टीने प्रयत्न सुरु झाले.
<लगे हाथ, यादवी युद्धानंतर कुओमिंतांगचे राज्य कसे आले, ते कसे स्थिर झाले वगैरे भागही आला तरी आवडेल.>
हो नक्की, पण माफ करा, सध्या कामात थोडा व्यग्र असल्याकारणाने, सवड मिळाली की लिहीन.
23 Jan 2012 - 11:39 am | जयंत कुलकर्णी
मराठीत ही माहिती आणल्याबद्दल आभार ! आणि मुख्य म्हणजे लिहायची स्टाईलही आवडली.
23 Jan 2012 - 12:38 pm | सागर
हंस हे नाव सार्थ आहे तुमचे
भेसळीतून नेमके दूध पिऊन पाणी ठेवतो तो हंस तद्वतच हा लेख अगदी वास्तव चित्र उभे करतो.
तैवानमधील आदिवासी टोळ्यांची कधी न वाचलेली माहिती तर मिळालीच पण चीनी, जपानी आणि सध्याच्या राजवटीबद्दल संक्षिप्त पण छान माहिती दिली आहे तुम्ही.
एका छान लेखाबद्दल आपले अभिनंदन.
तैवान सध्या चीनच्या पंज्याखाली तिबेटसारखे जाऊ नये म्हणून प्रचंड संघर्ष करतो आहे. त्यासाठी अमेरिका आपले आंतरराष्ट्रीय हिताचे राजकारण खेळत आहे तरी तैवान स्वतःचे सार्वभौमत्त्व जपण्यासाठी खूप कष्ट घेतो आहे हे कौतुकास्पद आहे. या पार्श्वभूमिवर आदिवासींची चळवळ तैवानची डोकेदुखी ठरु शकते कारण चीन अशा संध्या हेरुन त्यांतून स्वतःचा फायदा करुन घेण्यात पटाईत आहे. तिबेट चीनने ज्या पद्धतीने गिळंकॄत केला ते बघता चीन तैवानचा घास घेणार हे नक्की. कधी आणि केव्हा हा मुद्दा मंथन करण्याजोगा आहे.
असो..
पुढील भागाची उत्सुकतेने वाट पहातो आहे. खूप छान लेखन आहे तुमचे :)
24 Jan 2012 - 1:09 am | गणेशा
मस्त माहिती मिळाली
धन्यवाद
24 Jan 2012 - 7:35 am | मदनबाण
छान माहिती देत आहात...
वाचतोय... :)
24 Jan 2012 - 6:38 pm | ५० फक्त
खुप वेगळी अन छान माहिती, आता प्रत्येक वेळी 'मेड इन तैवान' वाचताना हे सर्व डोळ्यासमोर येईल.
25 Jan 2012 - 6:59 am | इन्दुसुता
चांगली माहिती.
चर्च चा सिंहाचा वाटा आहे असे लिहिलेत.... चर्च ला त्यांच्या श्रद्धा मान्य आहेत काय? सध्याच्या जनसंख्येत ख्रिस्ति लोकांचे प्रमाण काय आहे ? ज्यांनी खिस्ति धर्म स्विकारला आहे त्यांच्यात आणि ज्यांनी स्विकारला नाही त्यांच्यात ( एकाच आदिवासी जमातीचे असून ) काही संघर्ष आहे काय हे जाणून घ्यायला आवडेल.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....
25 Jan 2012 - 8:47 pm | हंस
सध्या साधारण ४.५ ते ५ % क्रिश्चन लोकसंख्या आहे तैवान मध्ये, आणि आदिवासींची श्रद्धा चर्चवरच आहे, पण ते त्यांची संस्क्रुती अनुसरुनच!. तैवानमध्ये धर्माला आपल्याइतके अवाजावी मह्त्व देत नाही, किंबहुणा ते शुन्य महत्व देतात. त्यामुळे कोणी क्रिश्चन धर्म स्विकारला आणि कोणी नाही त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. माझ्या प्रोफेसरला तर त्याच धर्म कोणता आहे हे ही माहीत नाही! ^_^
26 Jan 2012 - 3:03 pm | रमताराम
माझ्या प्रोफेसरला तर त्याच धर्म कोणता आहे हे ही माहीत नाही!
हे आवडलं. हा आत्मविस्मृतीचा आजार लवकर जगभर पसरावा ही सदिच्छा.
26 Jan 2012 - 5:43 pm | हंस
आमेन!