आपण सर्वांनी 'अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र' कधी ना कधीतरी वाचले असेलच, ज्यात एका पालकाच्या भूमिकेतून शिक्षकांकडून असलेल्या सर्वच श्रेयस अपेक्षा व्यक्त झाल्या आहेत. पण ज्याच्याबद्दल ह्या सर्व अपेक्षा आहेत, तो केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी, त्याच्या मनोव्यापाराचं काय? त्यालाही असाच संवाद साधावासा वाटतोय, त्यासाठी हा पत्रप्रपंच.
ज्युनियर लिंकनचे हेडमास्तरांस पत्र.
प्रिय गुरुजी,
बाबांनी तुम्हाला लिहिलेलं पत्र वाचलंय मी
तुम्ही मुद्दामच तुमच्या खोलीत
समोर फ्रेम करुन ठेवलंय ना ते?
फारच अपेक्षा आहेत हो आमच्याकडून
त्यांचा अजूनही विश्वास आहे
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधुचरित पुरुषोत्तम
आणि स्वार्थी राजकारण्यांमागे असतात
अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही
पण जेव्हा उडतात चिंध्या
सामान्य माणसांच्याच बाँबस्फोटांनी
आणि स्वार्थी राजकारणी कैवार घेऊन धाव घेतात
केवळ एक दिवस घटनास्थळी
खटले चालतात वर्षानुवर्षे
तेव्हा हरवून बसतो श्रद्धा सत्यावरची, न्यायावरची
तरीदेखील तुमची शिकवायची तयारी आहे
दाद देतो तुमच्या सहनशक्तीला, इच्छाशक्तीला
चांगल्या गोष्टी झटपट शिकवता येत नाहीत
पण ह्या इंस्टंट्च्या जमान्यात
आम्हाला कसं सर्व झटपट हवं
झटपट मिळवता येतं ते घबाड
पण घाम गाळून समजा मिळवला
एक मौल्यवान छदाम
तर ह्या महागाईमध्ये मिळणार नाही
एक साधा घास
हार स्वीकारावी कशी
विजयाचा आनंद संयमाने घ्यावा कसा
सगळ्याच अगम्य गोष्टी
कारण हार म्हणजे आमच्यासाठी असते
एक बंद दार आणि त्यापुढे निव्वळ अंधार
आम्हाला दिसतो तो विजयाचा उन्माद
घोषणा, फटाक्यांच्या आवाजात, गुलालाच्या रंगात
आणि कर्कश वाद्यांच्या जल्लोषात
गुंडांचं तर समांतर विश्वच निर्माण झालंय
अलिकडे त्याला अंडरवर्ल्ड म्हणतात
त्यांना नमवणं तितकंसं सोपं नाही
अभ्यासाची पुस्तके, मार्गदर्शके, व्यवसाय, पेपरसंच
हेच आमचं ग्रंथभांडार
ज्यात असतो दहा गुणांचा शेक्सपियर
सीइटी, पीएमटी, आयआयटी, जीआरई, टॉफेल
या सगळ्या परीक्षांमध्ये कसला आलाय निवांतपणा?
मानवाची अस्मान भरारी दिसते
आकाशात उडणार्या विमानाकडे पाहून
आणि घडतं सृष्टीचं वास्तव दर्शन
खुराड्यासारखी घरे, मुंगीसारखी जनता,
धुराचे काळे लोट आणि
वाहणार्या गटाराकडे पाहून
स्पर्धेच्या ह्या जगात
अॅडमिशनच्या बाजारात यश महत्वाचे
बेहत्तर आहे जरी
वापरले साम दाम दंड आणि भेद
कुणीच नाही करत आता खंत आणि खेद
निकष सत्त्व हे शब्दच झाले आता फोल
दिसतो इथे बाजार हृदयाचा आणि आत्म्याचा
तेव्हा जमीनच सरकते पायाखालची
आणि तिथेच शिकतो कानाडोळा करायला
भल्यांशी भलाईनं वागेन मी
टग्यांना अद्दलही घडवेन मी
पण ते समोरुन आले तर.
राष्ट्रोद्धारकाचे सोंग घेऊन त्यांनी
जर केले छुपे वार
तर तुम्हीच सांगा
संयमाने कशी घ्यायची हार
मानवजातीवर श्रद्धा ठेवायलाही शिकेन मी
मानवजात टिकेल याची जर दिली कुणी ग्वाही तर
कसं बिंबवू मनावर
हसत राहावं; उरातलं दु:ख दाबून
पण हरकत नाही
एकदा पाहावं म्हणतो करून
कारण तुम्ही आश्वासन दिलंय बाबांना
आणि प्रेरणा दिलीय आम्हाला
म्हणून जे जे उत्तम आहे, उदात्त आहे
ते ते सर्व शिकणार आहे
दुबळ्यांच्या 'दयेला' आणि दीनांच्या 'अहिंसेला'
तसा नसतो फारसा अर्थ
हे दोन्ही गुण सिद्ध करण्यासाठी
आधी मिळवायचं आहे सामर्थ्य
माफ करा गुरुजी! मी ही फार बोलतो आहे
पण तुमच्याचवर आता विसंबून आहे
क्षणिक ढळली असली जरी माझी श्रद्धा
तरीही खात्री आहे मला
अंतिम विजय आपलाच आहे
कारण प्रत्येक काळ्या ढगाला असते एक रुपेरी किनार
आणि इवलीशी पणतीही भेदू शकते अंधार
__________________________________तुमचाच,
__________________________________गोड विद्यार्थी.
प्रतिक्रिया
10 Nov 2011 - 5:29 am | शिल्पा ब
"ते " पत्र कालातीत वाटतं ...हे कैच्या कै!!
10 Nov 2011 - 5:53 am | अन्या दातार
सहमत.
ज्युनिअर लिंकननी भारतात तेही लई म्हणजे लईच उशिरा जन्म घेतल्याप्रमाणे लिवलंय
10 Nov 2011 - 7:42 am | नगरीनिरंजन
पत्र एका सामान्य माणसाच्या मुलाचे वाटले. कोणत्याही अगदी लिंकन इतक्या महान नसलेल्या राष्ट्राध्यक्षाचा मुलगा असे पत्र लिहील असे वाटत नाही. :)
सामान्य भारतीयाच्या मुलाने लिहीलेले पत्र या दृष्टीने पाहिले असता, पत्र बहुतेकांच्या रोजच्या भावना मांडणारे, नावीन्य नसलेले वाटले. विशेषतः आधीच्या निराशेच्या सुरानंतर भाबडा निराधार आशावादी शेवट बळेबळेच केलेला वाटला.
तुमचे हे मिपावरचे पहिलेच लेखन आहे, त्या मानाने प्रयत्न चांगला आहे.
पुढे स्वतःच्या कल्पनेने नवे काही लिहीण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!
10 Nov 2011 - 11:20 am | चेतन सुभाष गुगळे
फारच छान कविता आहे. एकाच वेळी वाचली आणि ऐकलीही. लेखन आणि स्वर दोन्ही उत्तम.
10 Nov 2011 - 11:35 am | तिमा
असेच ज्यु. क्लिंटनचे पत्र वाचायलाही आवडेल.(मिपावरचे नव्हे)
10 Nov 2011 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार
माफ करा पण दिपालीप्रतिक, ह्यातल्या प्रतिकचा नक्की उलगडा झाला की मग सविस्तर प्रतिक्रिया देईन.
*उगा आजी आणि भावी संपादकाशी पंगा नको. ;)
12 Nov 2011 - 4:24 pm | मी-दिपाली
सर्वप्रथम माझ्या पहिल्यावहिल्या जालीय लेखनाची दखल घेतल्याबद्दल सर्व वाचकांचे-प्रतिसादकांचे आभार.
लेखाबद्दल थोडासा खुलासा.
हे पत्र जरी काल्पनिक असलं तरी त्यातले संदर्भ मूळ पत्रातीलच असुन आजच्या काळानुसार बदललेले आहेत. त्याची आजी आजोबांच्या काळाशी सांगड घालणे संयुकतीक वाटत नाही.
ज्यु. लिंकन हे नावही विद्यार्थ्यांसाठी प्रातिनिधीक स्वरुपात घेतलेले आहे. मुळ पत्रावर बेतलेले असल्याने ते नाव अपरिहार्य झालं. (इथे विद्यार्थ्यांदशा ही थोडी व्यापक स्वरुपातली आहे. फक्त शाळेपुरताच मर्यादित नाही.)
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला"
असा दुर्दम्य आशावाद ज्या कुसुमाग्रजांनी व्यक्त केला आहे, त्यांनीच असही म्हटलं आहे की
"ध्येय, आशा, प्रेम यांची होतसे का कधी पुर्ती; वेड्यापरि पूजितो आम्ही या भंगणार्या मूर्ती"
शेवटी आशा आणि निराशा या भावना व्यक्ती आणि परिथितीसापेक्ष असतात. जसे काहिंना पेला अर्धा भरलेला दिसावा तर काहींना तोच अर्धा रिकामा.
उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.