किचनमध्ये भांडी पडल्याचा आवाज आला. आता तर पाय लटपटायला लागले होते. आत कोणीतरी होतं, नक्कीच.
"कोण आहे आत?" मी घाबरुन बरळलो. हसल्यासारखा आवाज आला. आत जाऊ नको कि नाही? असहाय झालो होतो. बाजुला उभी केलेली एक मोडकी छत्री हातात घेतली, बुडत्याला काडीचा आधार. एक एक पाऊल टाकत आत शिरलो. किचनमध्ये भांडी पडलेली होती, बाहेर विजांचा नंगानाच सुरु होता
आणि..........
आणि खिडकीत हिरव्या डोळ्यांची दोन काळी मांजर जिभल्या चाटत बसलेली होती....
******************************************************************************************
आईशप्पथ..!!
इतकी भयानक मांजर कधीच पाहिली नव्हती. हिरवेगार डोळे ते सुध्दा माझ्याकडे टक लावुन पाहणारे. कसतरी त्यांना पिटाळून लावलं आणी थरथरत बेडरूममध्ये आलो. उरलेल्या चारी मेणबत्त्या पेटवुन सगळीकडे उजेड केला, कंदिल पेटवुन त्याचीही वात मोठी केली.
नंतर कधी झोप लागली ते कळलंच नाही. झोपेतही एकदम विचित्र स्वप्न पडलं, एक माणूस आरोपीच्या पिंजर्यात रडतोय, मग नंतर त्याचीच प्रेतयात्रा. शीsss!!! अभद्र सगळं.
सकाळी सातलाच जाग आली. उत्साह तर अजिबात जाणवत नव्ह्ता. काल रात्रीचं सावट मनावरून अजुनही गेलेलं नव्हतं. रात्रभर पाऊस धोधो कोसळत होता आणी आजची सकाळही तशीच उदासवाणी. अंघोळ आटपली आणी कोर्टात आलो. रंगा भेटला.
"सायेब, काल काय तरास नाय ना झाला?"
"नाही, नाही" माझा घाबरटपणा लपवण्याचा प्रतत्न करत मी बोललो.
"पाटील सायेब काल रातीला अचानक हुबळीला गेले, त्येंचा मेवणा वारलाय. यक आठवडा तरी येनार नाय." रंगाने माहिती दिली.
आता आला प्रश्न, सगळ्या केस तश्याच पेडिंग होत्या. संपुर्ण दिवस मी तसाच बसून घालवला. येणार्या रात्रीची भितीही वाटत होती. मग स्वतःलाच समजावलं, आपण या गावात नवखे, त्यात हा बगंला पुर्णपणे रिकामा. आपण एकटेच, आजुबाजूला रहदारी, गजबजाट नाही, लाईटचा लखलखाट नाही, माणसांचा कोलाहाल नाही, आपल्याला अंधाराची सवय नाही. पण त्या मांजराची आठवण होताच परत जीव कासावीस झाला. काम काहीच नव्हतं, म्हटलं जरा गावात चक्कर मारून येवु. रंगासोबत जाऊन गावातून सामान आणलं. रंगा काय काय बडबडत होता पण माझं लक्ष ठिकाणावर नव्हतं.
शेवटी त्याला विचारलं "रंगा, अरे रात्री सोबतीला येत जा कि! तुला पण बरं, नाही का."
भुत पाहावं तसं माझ्याकडे पाहत तो बडबडला "नाय ब्वॉ, माही म्हतारी घरी एकलीच अस्ते, आपल्याला नाय जमनार."
आता आली पंचाईत. असो, रात्री जे पहार्याला असतात त्यांच्यापैकी एकाला बोलावायचं मनात ठरलं. गावातच सात वाजले. पावसाने थैमान घातलं होतं. बाजरपेठेत पाणी तुंबलं होतं. कसाबसा रिक्षाने कोर्टापर्यत आलो. गेटवर दोघेजण होते. त्यांची चौकशी करून आत शिरलो. अंधार दाट होत चालला होता.
शंभर पावलावर बंगले सुरू होत होते. आणी मी थबकलो.! माझ्या बंगल्यासमोर जो बंगला होता त्याच्या पुढ्यातल्या तुटक्या खुर्चीवर 'तो' बसला होता.
कोण होता तो??
पांढर्या रंगाचा शर्ट, कोणतरी राहायला आलयं का? आणी इतक्या पावसात तो बाहेर तुटक्या खुर्चीत का बसलाय?? अनेक प्रश्न मनात निर्माण झाले, कि रखवालदार आहे??
तेव्हढयात जोरदार सोसाट्याचा वारा सुटला, माझी छत्री उलटी झाली. कसाबसा सावरून पुढे पाहिलं तर.........
छे.!!! असं कसं होईल??? तिथं कोणीच नव्हतं. मला भास झाला? समोर मिट्ट काळोख होता, मी खिशातली बॅटरी शोधायला लागलो.
...मिळाली.
टॉर्च पेटवून पुढे बघणार, तेव्हढ्यात समोरचं ते एकदम अंगावर आलं.....
बापरे!! काय होतं ते? त्याला डोळेच नव्हते, मुंडकं? हात पाय? नक्की काय होतं ते? मला स्वप्न तर पडलेलं नव्हतं ना. जे काय होत ते हवेत!.....अधांतरी!!
छाती जोरजोरात धडधडू लागली होती. डोळे फाडून मी पाहत होतो. अतिधक्क्याने माझा पुतळा झाला होता. काही कळायच्या आत ते सावट घशातुन विचित्र आवाज करत माझ्या शरीरातून आरपार निघून गेलं . आजबाजूचं वातावरण भयानक झालं होतं. शरीरातली उर्जा जणू संपली होती. त्या भयानक प्रकाराने हुडहूडी भरून मी खाली कोसळलो.
केव्हतरी डोळे उघडले. अजुनही रात्रच होती. आजुबाजूला ते चौघे जमलेले होते. त्यांनी मला घरात झोपवलं होतं. मी जागा झालेला पाहुन त्यांच्या जीवात जीव आला. एकाने पाणी आणून दिलं. हुडहुडी भरून जबरदस्त ताप आला होता. एकजण म्हणाला.
"सायेब, इत काय खर नाय, कोनाकोनाला काय बाय दिस्तं, झपाटलेली वास्तु हाय सम्दी, तुमी इतं राऊ नका."
मी त्यांना थांबायची विनंती केली, पण ते सर्वच इतके घाबरलेले होते कि पटापट दरवाज्याच्या बाहेर पडले. आजची रात्र मला इकडेच काढायची होती हे निश्चित. दहा वाजून गेलेले, मला खुप भिती वाटत होती. इथे रहायची कुठून अवदसा सुचली कोणास ठाऊक. बरोबर रेडिओ आणला होता त्यावर गाणी सुरू केली. डोक्यावरचा जरा ताण कमी झाला. हॉलमधून बेडरूममध्ये गेलो. मनात सतत देवाचा धावा सुरूच होता. वार्याने खिडकी थडथडत होती, ती आधी बंद केली. बेडरूमचा दरवाजा लावून घेतला. मला आत बसवत सुध्दा नव्हतं. दुध गरम करून घेतलं, खायची इच्छाच नव्हती.
आता जरा डोकं ठिकाणावर आलं. नक्की आपल्याला काही दिसलं की भास झाला? नीटसं आठवत नव्हतं. घाबरट जरी असलो तरी भुत वैगेरे भ्रामक कल्पनांवर कधीच विश्वास नव्हता. मग तो दिसलेला माणूस(?) किंवा तो घाणेरडा प्रकार काय असावा?
समोरच्या बंगल्यातली ती मोडकी खुर्ची वार्याने अजुनही किरकिरत होती. माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. लहान मुलासारखा मी खिडकीचा पडदा बाजुला सारून बाहेर पहायला लागलो. ती बंगली भयानक दिसत होती, विचित्र हिरवट काळं शेवाळं जमलं होतं. बंगल्याचा दर्शनी भागावर वेली भयानक माजल्या होत्या. बाहेरच्या बाजुस रानटी गवत वाढलं होतं. मागच्या बाजुला दोन्ही कड्या अतिशय गंजलेल्या अवस्थेत एक झोपाळा वार्याच्या झोताने पुढे मागे झुलत होता. वार्याच्या फर्राट्या आवाजाबरोबर गंजलेल्या कड्यांची किर-किर स्पष्ट ऐकायला येत होती.
मी पडदा झर्रकन ओढून घेतला. अंगावर चार पाच पांघरूणं घेतली. त्याच्या आत मला आता बर्यापैकी सुरक्षित वाटत होतं निदान माझा स्वतःचा तरी तसा समज होता. मी झोपेत होतो कि जागा?? क़ळायला मार्ग नाही. पण मी आता भर पावसात बंगलीमधल्या मोकळ्या रस्त्यावर नखशिखांत भिजत उभा होतो...
एकटाच...
मी इथे कसा आलो?? आणी समोर झोपाळ्यावर दोन मुली झुलत होत्या....मी हादरून बघायला लागलो तसं दोघींचही माझ्याकडे लक्ष गेलं. पांढर्या कापसासारखं फटफटीत शरीर त्या अंधारातही व्यवस्थित दिसत होतं, ती लालभडक डोळ्यांची माझ्यावर रोखलेली नजर....
मी किंकाळी फोडण्याचा प्रयत्न करतोय, पण हे काय? घशातुन आवाजच बाहेर पडत नाही...
पळण्यासाठी गर्रकन मागे फिरलो तर अजुन एक आकृती..रांगत, मध्येच उठत, पाय मोडल्यासारखी खुरडत...माझ्याकडे सरकतेय.....
पाण्याने टम्म फुगलेलं ते शरीर.....केस पिंजारलेले...चेहरा असा नव्हताच....तोंडातून काळी काळी जीभ वळवळत बाहेर येत होती...
मी मागे मागे सरकतो..मागे त्या मुलींच्या आकृत्याही गरागरा माझ्याभोवती फिरतायेत...
मी दचकन जागा होतो. डोक्यावरचा पंखा करकरत फिरत असतो. म्हणजे हे स्वप्न होतं, असं?? उठुन बसलो.
डोक्यापासुन पायापर्यंत पुर्ण भिजलेला होतो, कशाने? पाण्याने कि घामाने?? काही कळायला मार्ग नाही. जे काही घडतयं ते खुप विचित्र घडतयं हे नक्की.!
आता पडदा सरकवून बाहेर पहायची हिम्मत नव्हती. कधीतरी डोळा लागतो. दुसर्या दिवशी थेट सकाळी दरवाजा ठोठावण्याच्या आवाजानेच जाग आली. घड्याळात बघतो, चक्क दहा वाजलेले.
"कोण आहे?" मी विचारलं.
"सायेब म्या रंगा! आज इठ्याने बाहिर सांगितलं, तुमी काल चक्कर यिवुन पडलात. म्हनुन म्या बघाया आलूय."
कसाबसा अंथरूणातून उठलो. फणफणून ताप आलेला होता. रंगा आल्या आल्या कामाला लागला. हि आपुलकी शहरात क्वचितच पहायला मिळते. त्याच्या हातचा गरम गरम चहा पोटात गेल्यावर जरा बर वाटलं. रात्रीच्या त्या भयानक प्रकाराच आज सावटही दिसत नव्हतं. समोरची ती बंगली तशीच शांत दिसत होती, काहिही न घडल्याच्या अविर्भावात.
घाबरत घाबरत थोडक्या शब्दात त्याला रात्रीचा झाला प्रकार सांगितला. क्षणाक्षाणाला त्याचा चेहरा काळवंडत होता. सगळी हकिकत ऐकल्यावर त्याने बोलायला सुरूवात केली.
"मला माईत न्हाई, तुमचा इशवास बसल कि न्हाई पर सादारन वरसापुरवी हित यक भयंकर घटना घडली हाय. त्येचा शेवट कसा झाला कोनाला ठावं न्हाय. यकच मानुस व्हता, हनम्या!! त्याला बी नंतर याड लागलं."
रंगाला ती घटना विस्तृतपणे सांगायला लावली.
सरपंचाच्या सुनेचा खुन...किसनावरचा खोटा आरोप...शेळक्यांनी दिलेला चुकीचा निकाल..किसनाचा कोर्टात मृत्यू...त्याच्या बायकोने दोन्ही मुलींसकट केलेली आत्महत्या...काही दिवसांनी दादासाहेबांचा झालेला विकृत खुन..आणी सर्वात शेवटी शेळक्यांच समोरच्या बंगलीतल्या गच्चीवर सापडलेलं प्रेत..
हे सर्व ऐकता ऐकता माझं डोकं सुन्न झालं होतं. रंगा म्हणत होता "सायेब असं म्हनत्यात, ती गंगी न त्यो किसना आन त्येंच्या त्या दोन पोरी, समद्या.! नंतर दादासायबांना नी शेळक्यांना दिसायच्या."
"त्येंच पाप त्येंना तर नडलंच पर आता हि समदी जागा पछाडलीये. आपलं पाटील सायेब तर कसबसं यक रात राहिलं हित. म्हनून तुमास्नी सांगत हुतो, हि जागा सोडून द्या."
पण अशा तापात मला दोन पावलं टाकणंही मुश्किल होतं. मी गयावया करत आजची रात्र रंगाला थांबायची विनंती केली. पहिल्यांदा त्याने थेट नकारच दिला पण नंतर माझ्या अशा अवस्थेला बघुन कसाबसा तयार झाला.
"सायेब, मी सांच्याला गड्याला घिवुन येतो, त्यो जेवान बनवल आजपास्नं." एवढं बोलुन रंगा बाहेर पडला. पाऊस तर अजुनही तुफान कोसळत होता. संपुर्ण माळरान धुक्यात लपेटलं गेलं होतं पागोळ्यांचा एकसुरी आवाजच काय तो येत होता बाकी सगळी निरव शांतता. अजुनही अंथरूणातुन बाहेर पडलो नव्हतो. रंगाने सांगितलेली गोष्ट भयानकच होती आणी खोटी म्हणावी तर काल स्वप्नात त्या गंगीच आणी त्या दोन मुलींची प्रेतं दिसली होती, सगळच अनाकलनीय.
तेव्हढ्यात म्यॅsssव असा आवाज किचनमधून आला. मी टरकलो. सगळ्या दारे-खिडक्या तर काल व्यवस्थित लावलेल्या होत्या. तरीही ती मांजर घरात कुठून घुसली कळतच नव्हतं. जागेवरूनच किचनमधला अंदाज घेऊ लागलो.
आतमध्ये एक मोठी सावली हलत होती. कसली सावली होती ती? हळुहळू ती सावली माझ्या दिशेने सरकत होती. अचानक खोलीतलं वातावरण बदललं. एक सडका वास खोलीभर पसरला. किचनमधुनही कसलासा आवाज येवू लागला. मी थरथर कापायला लागलो. देवा...! माझ्यामागचे हे दुर्दैवी ग्रहण कधी सुटणार? संपुर्ण खोली गार पडली होती. आतमधला आवाज टिपेला पोहचला होता. बर्याच वेळानंतर तो आवाज बंद झाला. पाऊसही बंद झाला. जे सावट आलं होतं ते निघुन गेलं होतं. खोलीतलं तापमानही पुर्वव्रत झालं. आता इथुन बाहेर पडायलाच हवं होतं. घाबरत घाबरत दोन तीन शर्ट अंगावर चढवले, वर स्वेटर घालुन बाहेर पडलो. इकडे तिकडे न पाहता सरळ सरळ कोर्ट गाठलं.
ती जी काही शक्ती होती. माझं तिथं येणं तिला अजिबात आवडलेलं नव्हतं हे नक्की. पण यात माझी काय चुक?
कोर्टाच्या आवरातली गर्दी पाहुन जीवात जीव आला. तशाच कडाक्याच्या गारठ्यात कुडकूडत कोर्टाबाहेरच्या टपरीवर आलो. एक दोन टपर्या आणी एखादी गाडी सोडली तर बाकी काहीच नव्हतं. एक सिगारेट शिलगावली. शेळक्यांच निधन झालेलं ही बातमी मुंबईत असताना कानावर आलेली पण त्या मागे इतका भयानक इतिहास असेल असं वाटलं नव्हतं.
गारठयावर जास्त वेळ उभं राहणं जमत नव्हतं आणी बंगल्यात परतायला भिती वाटत होती. पण तसाच धीर केला आणी परतलो. वेळ जाण्यासाठी आणलेली पुस्तके बाहेर काढून वाचयला लागलो. बराच वेळ व्यवस्थित वाचन केलं. मन संपुर्ण एकाग्र झालं होतं पुस्तक वाचण्यात. तेव्हढ्यात दारावर टकटक झाली, मी दचकलो.
आता कोण आलं असेलं? रंगा आला असेल गड्याला घेऊन.! मनात विचार आला.
उठुन दार उघडलं आणी पुर्ण शरिराचा थरकाप उडाला...
जणू काही वेगळ्याच मितीत पोचलो होतो
समोर अतिशय किळसवाणा माणूस उभा होता....त्याने तोंड न उघडताच आवाज आला...
मी..!!...शेळके!!!
क्रमशः
प्रतिक्रिया
20 Sep 2011 - 5:29 pm | मी ऋचा
आई गं ! भीती वाटतेय..
20 Sep 2011 - 5:33 pm | अन्या दातार
शेळक्यांची वेंट्री झालीच तर!
वाचतोय. आहटचा फील देणारा पहिला फोटो चांगला इफेक्ट करतो रे स्पावड्या.
20 Sep 2011 - 5:34 pm | सुहास झेले
बाब्बो.. लैच भारी लिवलंय राव...!!
पुढचा भाग लवकर येऊ द्या.... :)
20 Sep 2011 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा
स्पावडु रे स्पावडु,तुझी कथा लागली अवडु
चांगला जमला हा(ही)भाग,पुढचा अता ल्हिवडु ... :-)
हम्म्म्म...जमलय...हे ही छान जमलय...मुख्य म्हणजे सस्पेन्स अजुनही तुटलेला नाही,,अणी थरारही कायम आहे...
हा भाग वाचताना जरा गहिरे पाणी ची अठवण झाली,,,अर्थात कथा पूर्ती होण्यात एक सुसंगती येताना जाणवतीये,,ती जर छान सांभाळली गेली...अगदी शेवटा पर्यंत ....तर क्रमशः ;-) ...... हा शब्द सार्थ होइल... :-)
20 Sep 2011 - 5:50 pm | मृत्युन्जय
झ्याक जमले आहे. आजपासुन तु मिपाचा रामसे. :)
20 Sep 2011 - 11:18 pm | शाहिर
का शिव्या घालत आहत स्पावड्याला....
20 Sep 2011 - 5:52 pm | जाई.
हाही भाग उत्तम
20 Sep 2011 - 6:04 pm | क्राईममास्तर गोगो
थरकाप....
20 Sep 2011 - 6:21 pm | शुचि
बाप रे!!! सॉलीड.
20 Sep 2011 - 6:33 pm | श्यामल
पुढे काय झालं ते लवकर येऊ दे.
20 Sep 2011 - 7:14 pm | प्रचेतस
स्पावड्या, तुझे लिखाण खूपच ताकदवान आहे. सर्व प्रसंग अगदी मूर्तीमंत डोळ्यांसमोर उभे राहात आहेत.
पुढच्या भागाची प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. लवकरात लवकर पुढचा भाग टाक.
'ग्रहण' चा समावेश मिपावरच्या आजवरच्या सर्वोत्तम कथांमध्ये होणार यात काहीच शंका नाही.
20 Sep 2011 - 7:21 pm | रेवती
नाय हां! हा भाग जरा जास्तच घटनांनी भरलेला वाटला.
जराही उसंत नाही. भीती वाटतिये हे कबूल, पण दोनेक घटना कमी कर की लेका!
20 Sep 2011 - 8:11 pm | स्पा
ह्म्म्म रेवती आज्जी...
भरपूर वेगवान झालाय खरा हा भाग
बर्याच घटना एकदम घडत आहेत .
पण मला वाटल थोडी गोष्ट लांबवली तर पाणी घातल्यासारख होईल
20 Sep 2011 - 8:39 pm | अत्रुप्त आत्मा
@--पण मला वाटल थोडी गोष्ट लांबवली तर पाणी घातल्यासारख होईल.... भट्टी बरोब्बर जमली आहे...अता पुढील भाग टंकल्यावर तळाला क्रमशः ...असं न लिहिता ते ट्रकच्या मागे लिहिलेल असतं ना ते वाक्य लिहायचं---''हे असच चालायचं''... :-)
21 Sep 2011 - 12:17 am | रेवती
जा तर मग....
हवं ते कर.
20 Sep 2011 - 7:54 pm | प्राजु
हम्म!! स्पावड्या....
काय रे ही हिरव्या डोळ्याची मांजर कुठे मिळाली??
पुढचा भाग लवकर टाक हां.
20 Sep 2011 - 8:54 pm | पैसा
शेळक्यावर काय कादंबरी लिहायचा विचार आहे की काय? किती घाबरवशील?
20 Sep 2011 - 11:03 pm | lakhu risbud
आमच्या बालबुद्धीला योक प्रश्न पडला हाये बरं का, हि भुतं नेमी मांजरी च्या रूपातच येत्यात का ? नै म्हंजी एकाद्या येळला फॉर अ चेंज म्हून म्हशीच्या,कुत्र्याच्या,गाढवाच्या,डुकराच्या रुपात का येत न्हाई ?
20 Sep 2011 - 11:20 pm | शाहिर
भुते मांजराच्या नाही तर डु आय डी च्या स्वरूपात येतात...
20 Sep 2011 - 11:23 pm | शाहिर
वाचतानच एक थंड लहर माझ्या मणक्यापासून डोक्यापर्यंत गेली...
21 Sep 2011 - 12:11 am | शिल्पा ब
मस्त...छान जमतेय कथा. तुझी कल्पनाशक्ती आणि लेखनशैली दोन्ही झकास.
21 Sep 2011 - 6:19 am | ५० फक्त
मस्त रे स्पावड्या, पण आता तुझ्याकडुन एका परवानगीची अपेक्षा आहे, व्यनितुन बोलुच.
21 Sep 2011 - 8:43 am | किसन शिंदे
परवानगी कशाबद्दल असु शकते याचा थोडासा अंदाज येतोय ५०राव. :)
21 Sep 2011 - 8:44 am | किसन शिंदे
द्विरूक्ती..
प्र.का.टा.आ.
21 Sep 2011 - 9:55 am | गवि
बोबडी वळवलीस स्पावड्या.. काल रात्री झोपताझोपता वाचली. एकटाच होतो काल घरी.. झोप चांगलीच उडाली तुझ्यामुळे..
21 Sep 2011 - 1:21 pm | विनीत संखे
आता किती वेळ शेळक्यांचं भूत दारातच उभं ठेवणार आहेस?
21 Sep 2011 - 2:20 pm | सविता००१
चांगलीच भीती वाटायला लागली आहे. आता पुढचे भाग वाचताना आधी घरात आपण एकटेच नाही हे पहाणार बाबा आपण.........
21 Sep 2011 - 3:44 pm | इष्टुर फाकडा
कथा वाचू गा वर गा आली...पण हा भाग तुम्ही कथा आणि 'अनुभव' या सदरात टाकलेला पाहून अजून एक थंड ओघळ निसटून गेला ;)
21 Sep 2011 - 3:41 pm | शैलेन्द्र
लयच भारी.. मस्त्च..
21 Sep 2011 - 4:47 pm | सूड
काहीशी अशी आहे.
21 Sep 2011 - 5:35 pm | सोत्रि
स्पावड्या,
लेका, फा** ना वितभर :(
पु. भा. प्र. घाबरत... घाबरत...
- (घाबरलेला) सोकाजी
21 Sep 2011 - 6:42 pm | प्रचेतस
घाबरताय कशाला?
एक मस्त कॉकटेल घ्या, धीर येउन सगळी भिती पटदिशी पळून जाईल बघा.
(घाबरलेल्यांना धीर देणारा) वल्ली.
21 Sep 2011 - 6:57 pm | यकु
मस्त जमलंय रे.
21 Sep 2011 - 7:51 pm | गणेशा
अप्रतिम लिहिले आहे रे स्पा ...
दोन्ही भाग आजच वाचुन काढले...
मस्त एकदम..
लिहित रहा ... वाचत आहे
21 Sep 2011 - 7:54 pm | मराठे
मस्त!
21 Sep 2011 - 8:51 pm | इंटरनेटस्नेही
चांगली कथा, हाही भाग आवडला. मात्र ते भूत लवकरात लवकर आणावे ही लेखकाच्या चरणी नम्र विनंती. ;)
-
(भूताची वाट बघणारा) इंट्या देवचार.
22 Sep 2011 - 10:26 am | पियुशा
स्पावडया !
लिही पटापट , वाचत आहे :)
22 Sep 2011 - 2:28 pm | प्यारे१
स्पावड्याचे डोळे थोडे हिरवट घारे आहेत नै....
आणि लोक म्हणतात स्पा माणूस आहे....!!!