(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे).
पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते... कधी वृक्षवल्लींच्या रूपात, कधी चित्र-शिल्प कलेच्या तर कधी भव्य-दिव्य वास्तूंच्या स्वरूपात....अश्याच एका भ्रमंतीत टिपलेली, वास्तवदर्शी शिल्पांची काही प्रकाशचित्रे:
........या सर्व शिल्पात मानवी शरिराची आदर्श प्रमाणबद्धता, अवयवांचे, वस्त्रप्रावरणांचे यथातथ्य चित्रण, भाव- भंगिमेतील कल्पकता, संगमरवर वा अन्य माध्यमावरील प्रभुत्व, असे अनेक गुण दिसून येतात......
कलावंताच्या प्रतिभेला मृत्यूतील भीषणता वा जीवनातील उत्फुल्लता, सारख्याच कुतुहलाचे चित्रविषय वाटतातः
या सौन्दर्यनगरीने आपल्या थोर सुपुत्रांची स्मृतीदेखील अनोख्या विलाप-शिल्पातून जपलेली आहे:
आणि शेवटी 'कानोवा' चे हे अद्भुत प्रणयशिल्पः
प्रतिक्रिया
25 Aug 2011 - 3:54 am | आत्मशून्य
शेवटचे शिल्प प्रणय वाटत नाही... ते बाणवालं व्यक्तीमत्व क्यूपीड वाटत आहे... ???
25 Aug 2011 - 4:33 am | धनंजय
शिल्पे छानच. पण एवढी मोठी जंत्री जरा जास्तच झाली.
पुढचा लेख म्हणून चारपाच चित्रेच पण तुलनात्मक रसग्रहण करत द्यावी, अशी विनंती.
मला खुद्द फक्त आदर्श प्रमाणबद्धतेचे दर्शन करवणारी शिल्पे थोडीशी कंटाळवाणी वाटतात, हे कबूल करतो. उदाहरणार्थ पाचवे चित्र घ्या : हंसाशी प्रणय करणारी युवती - बहुधा ग्रीक मिथकांतली लीडा.
जितपत या चित्रात तिच्या चेहर्यावरचा भाव कळतो, तो साचेबद्ध "आदर्श" कामना आहे. त्या मानाने त्याच कथेचे मायकलँजलोने केलेले चित्रण भावनांच्या दृष्टीने गुंतागुंतीचे वाटते :

(चित्र विकिपेडियावरून साभार)
- - -
पहिल्या चित्रातल्या शिल्पामध्ये कुरळे केश शिल्पिण्याच्या कौशल्यापेक्षा, आणि वस्त्राच्या चुण्यांपेक्षा मला तर्जनीच्या शेवटच्या पेरातला बाक अधिक अर्थपूर्ण वाटतो. (अर्थात, त्या हातामध्ये ते नाजुक नाट्य शोभून दिसण्याकरिता वस्त्रे, केस वगैरे बारकाईने शिल्पिणे आवश्यकच आहे, हे मान्य आहे.)
- - -
जुन्या काळात संगमरवराच्या शिल्पांवर रंगरंगोटी करत, असे अनेक ठिकाणी ऐकलेले आहे. पांढर्या संगमरवरावरचे बिनबुब्बुळाचे डोळे सुंदर वाटणे ही मागच्या काही शतकांत उद्भवलेली गमतीदार अभिरुची आहे.
25 Aug 2011 - 11:43 am | श्रावण मोडक
सहमत!
25 Aug 2011 - 3:08 pm | चित्रगुप्त
....... पुढचा लेख म्हणून चारपाच चित्रेच पण तुलनात्मक रसग्रहण करत द्यावी.....
चांगली कल्पना आहे. अवश्य प्रयत्न करेन.
आपल्याइकडली अजिंठा, पहाडी, राजस्थानी वगैरे शैलीतील चित्रे बघताना त्यातील कथाप्रसंग बहुतांशी आपल्याला ठाऊक असतात, बरेचदा ते रामायण, महाभारत, बुद्ध् चरित्र वगैरेतीलच असतात. त्यामुळे त्यासाठी आपल्याला फारसे प्रयास करावे लागत नाहीत.
पाश्चात्य यथार्थदर्शी चित्रे बघत संग्रहालयातुन फिरताना येशु व मेरीची शेकडोंच्या संख्येतील चित्रे कंटाळवाणी वाटू लागतात, पायपीट करून थकवा येतो... मात्र तिथली ग्रीक पुराणकथांवर आधारित चित्रे मात्र लक्ष वेधून घेतात. ती बघताना जरा गोंधळल्या सारखे होते, कारण चित्रकारांचे असाधारण कौशल्य जरी जाणवत असले, तरी चित्रविषय, त्यात रंगवलेल्या पौराणिक कथा फारश्या ठाऊक नसतात.
अश्या काही निवडक पुराणकथा थोडक्यात देऊन त्यावर आधारित चित्रे व शिल्पकृतींचा परिचय, अशी एक लेखमाला करता येइल... यात अप्रत्यक्षपणे चित्रकलेचा इतिहास, चित्रकलेचे तंत्र इ. पण ओघाने येइल....
काय म्हणता ?
25 Aug 2011 - 5:07 pm | मी_ओंकार
अश्या काही निवडक पुराणकथा थोडक्यात देऊन त्यावर आधारित चित्रे व शिल्पकृतींचा परिचय, अशी एक लेखमाला करता येइल... यात अप्रत्यक्षपणे चित्रकलेचा इतिहास, चित्रकलेचे तंत्र इ. पण ओघाने येइल....
काय म्हणता ?
वाचण्यास उत्सुक. नक्की लिहा.
- ओंकार.
25 Aug 2011 - 5:58 pm | धमाल मुलगा
हे एकदम झकास होईल. :)
आवडेल वाचायला. नक्की वाट पाहू आम्ही.
ह्यामध्ये येशू आणि मेरी ह्यांच्या ठराविक काळाचेच चित्रण आहे आणि ग्रीक पुराणकथांमध्येही भारतीय पुराणकथाशिल्पांप्रमाणॅच भरपूर वैविध्य आणि मोठा काळ/इतिहास उपलब्ध आहे ह्यामुळे तर असा फरक पडत असेल का?
25 Aug 2011 - 10:33 pm | धनंजय
हे फार छान होईल. वाचण्यास उत्सूक आहे.
एका बाबतीत थोडेसे वेगळे मत :
मी वर उल्लेखलेला कंटाळ्याचा मुद्दा हा नव्हे. माझ्या प्रतिसादातल्या उदाहरणातच बघा : हंसाशी संभोग करणार्या लीडा या युवतीची कथा मला ठाऊक आहे. तरी तुम्ही दिलेले शिल्प मला कंटाळवाणे वाटले. कारण त्यातील (जितपत मला दिसतात) भावना आणि शरीररचना साचेबद्ध सौष्ठवाची आहे.
माहीत असलेल्या कथेतसुद्धा नवीन जाणीव उत्पन्न करून दिली, तर त्या कलाकृतीचे (त्या रसिकापुरते) यश आहे. नाहीतर नाही.
याचे स्पष्टीकरण म्हणून त्याच कथेचे मायकेलँजेलो याने केलेले चित्रणही मी दिलेले होते. ते मला कंटाळवाणे वाटत नाही. युवतीच्या हावभावात साचा नसून काहीतरी गुंतागुंत आहे. ती बघून लीडाची कथा ऐकून मला कल्पना करता आली होती, त्यापेक्षा तिची वेगळीच मनःस्थिती कळली. म्हणून माझ्यापुरते त्या सौष्ठवयुक्त शिल्पापेक्षा चित्र कलाकृती म्हणून भावले.
26 Aug 2011 - 2:57 am | चित्रगुप्त
.....माहीत असलेल्या कथेतसुद्धा नवीन जाणीव उत्पन्न करून दिली, तर त्या कलाकृतीचे (त्या रसिकापुरते) यश आहे. नाहीतर नाही.....
अगदी खरे.
माझा एक अनुभवः
गेल्या चाळीसेक वर्षात शेकडो हजारो चित्रे बघताना बहुतेकदा असे व्हायचे, की समजा मी अमुक एका चित्रकाराचे चित्र बघत असेन, तर तेंव्हा मला त्या प्रकारच्या अन्य महान चित्रकारांची चित्रे आठवायची, आणि त्यांच्या तुलनेत आत्ता समोर असलेले चित्र सामान्य वाटू लागायचे. आता मी हे शिकलो आहे, की ज्यावेळी जे समोर आहे, त्याचा आस्वाद इतर गोष्टी मधे न आणता घेणे बरे. त्या त्या कलाकृतीत जे काही आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा, जे नाही, त्याचा विचार सोडून द्यायचा...
.... थोडक्यात म्हणजे तुलनात्मक समिक्षेत न शिरता निव्वळ आस्वादाचा आनंद लुटायचा.... हेच अन्य बाबतीत ही करायचे. असे करू लागल्यावर एकंदरित जीवनातला आनंद कैक पटीने वाढला.
26 Aug 2011 - 3:06 am | प्राजु
लवकर लिहा.
वाट बघतेय.
25 Aug 2011 - 8:06 am | स्पंदना
खुप सारी शिल्पे दाखवण्या ऐवजी थोडी फार दाखवुन त्यावरच्या तुमच्या दृष्टीकोणाची टिप्पणी जास्त संयुक्तीक झाले असती.
25 Aug 2011 - 10:48 am | चित्रगुप्त
.....आता थोडी कमी केली आहेत.
25 Aug 2011 - 7:55 pm | चित्रा
शिल्पे आवडली, तरीही वरच्या अनेकांशी सहमत. अशी शिल्पे कोणी आणि कधी तयार केली असे तपशील उपलब्ध असले तरी चालतील.
25 Aug 2011 - 8:07 pm | मदनबाण
चि तै शी स ह म त... :)
27 Aug 2011 - 12:03 am | पैसा
पण प्रत्येकाची नीट ओळख करून द्यायची तर जरा जास्त लिहावं लागेल, तेव्हा एका वेळी खूप कलाकृति घेऊ नका रसग्रहणासाठी... असंच म्हणते..
27 Aug 2011 - 11:23 am | चित्रगुप्त
मलासे वाटते की विविध प्रकारचे संगीत लहानपणापासून आपसूकच जसे आपल्या कानावर पडत असते, तसे चित्र-शिल्प कलेच्या बाबतीत घडत नाही. उदाहरणार्थ शिक्षण पूर्ण होइपर्यंतच्या काळात भारतातल्या सर्वसामान्य मुलांनी चांगल्या कलाकृती फार कमीच बघितलेल्या असतात.
युरोप-अमेरिकेत शाळेतून मुलांना आवर्जून संग्रहालये दाखवायला घेऊन जात असतात, व कलाकृतींबद्दल माहिती देत असतात. काही मुलांना त्यात फारशी रुची नसली, तरी निदान नजरेखालून तरी गेलेले असते. मी काही काळ दिल्लीतील अमेरिकन एम्बसी स्कूलमध्ये चित्रकला शिकवायचो, तेंव्हा बघितले की तिथे मोठ्या आकारची, महान कलाकृतींची छापील चित्रे असायची, ती दाखवून त्या चित्रांमागे छापलेली माहिती वाचून दाखवणे, व त्यावर मग प्रश्नोत्तरे, चर्चा, हा अगदी लहान वर्गांपासूनच्या अभ्यासक्रमाचा भाग होता.
आपल्याइकडे असे काहीच घडताना दिसत नाही. उत्तर भारतातील हरियाणा, उ.प्र. वगैरे मधील सर्वसामान्य विद्यार्थी तर अभिजात चित्रकलेशी अगदीच अनभिज्ञ असतो (माझ्या मुलांच्या हरियाणात झालेल्या शिक्षणावरून कळले)
म्हणून म्हणतो की कलेच्या बाबतीत आधी खूप बघितले पाहिजे. नजरेखालून खूप काही गेले पाहिजे. प्रत्येकवेळी त्याविषयी काही कळलेच पाहिजे, माहिती मिळालीच पाहिजे, समिक्षा केली गेलीच पाहिजे, असे नसावे.
अर्थात सर्वच मिपाकर बहुश्रुत, विद्वान, बुद्धीमान आहेत हे मान्य. तरीसुद्धा त्यांनीपण खूपश्या कलाकृती बघाव्यात, असे मला वाटते, म्हणून लेखात चित्रे जास्त, व माहिती कमी.