नुकतेच एक स्तोत्र ऐकण्यात आले. त्याची गेयता, नादमधुरता, त्यातल्या रमणीय कल्पना ऐकून ते आदि शंकराचार्यांचे असावे असा अंदाज बांधला, तो खरा निघाला.
त्यांचेच हे स्तोत्र 'शिवमानसपूजा' ह्या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्ष खरोखरीच पूजा करणे जरी शक्य नसेल तरी ह्या स्तोत्राच्या पठणाने खर्या पूजेचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे.
तो भाग जरी क्षणभर सोडून दिला तरी ऐकताक्षणीच मनाचा कबजा घेणारे हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित करायचेच असा चंग बांधला. माझा संस्कृतचा अभ्यास वगैरे नाही अंदाजाने अर्थ लागू शकतो इतपतच समजते. त्यामुळे जालावर जरा भटकंती करुन इंग्लिश अनुवाद वाचून अर्थ समजावून घेतला, आणि आज भाषांतर इथे सादर करीत आहे.
(संस्कृतच्या अभ्यासू लोकांना मोकळेपणाने छिद्रान्वेष करण्यास अनुमती आहे! ;) )
(स्वगत - रंग्या, लेका तुझ्या अनुमतीशिवाय छिद्रान्वेष करण्याचे सोडतील असे वाटले की काय तुला! हे मिपा आहे, आवडले तर 'रोख' नाहीतर 'ठोक'! ;) )
------------------------------------------------------------
(एकेका श्लोकाचा अनुवाद लगेच खाली देत आहे - अर्थानुसारी समजणे सोपे जावे म्हणून.)
शिवमानसपूजा - आदि शंकराचार्य.
रत्नै: कल्पितमासनं हिमजलै: स्नानं च दिव्याम्बरं
नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चंदनम्
जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा
दिपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्
स्वैर अनुवाद -
हिमजलाच्या तुझ्या स्नानानंतर तुला दिव्यवस्त्र आणि कल्पनेतलेच रत्नांचे आसन अर्पण करतो आहे
नाना रत्नांची आभूषणे तुला अर्पून त्याबरोबरच कस्तुरिगंधित थंड चंदनाचा लेप तुला लावतो आहे
बिल्वपत्रासह सुरेख अशा जाई-चाफ्याची शुभ्र फुले वाहिल्यानंतर मी मनात धूप-दीप लावतो आहे
हे प्रभो, हे देवाधिदेवा, माझ्या हृदयातल्या भावाने अर्पिलेल्या ह्या मानसपूजेचा तू स्वीकार कर!
सौवर्णे नवरत्नखण्ड रचिते, पात्रे घृतं पायसं
भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानक म्
शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं
ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु
स्वैर अनुवाद -
नवरत्नांच्या गंधाने आभूषित केलेल्या सुवर्णपात्रातून मी तुला तूप, भाताची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करतो आहे
दही-दूध यांनी बनवलेली, फलरसांनी, भाज्यांनी युक्त रंभाफलादि पंचपक्वान्ने मी तुला अर्पण करतो आहे
कर्पूरात न्हाऊन निघालेले अत्यंत सुगंधित आणि रुचिपूर्ण असे जल मी तुला पेयपानासाठी अर्पण करतो आहे
माझ्या मनातून मी तुझ्यासाठी बनविलेला तांबूलही अर्पण करतो आहे, हे प्रभो त्याचा स्वीकार कर!
छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं
वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा
साष्टाङ्गं प्रणति स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया
सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो
स्वैर अनुवाद -
सुशोभित छत्र, चामरं, पंखा अर्पण करतो आहे, तुझ्याच दर्शनासाठी तुला निर्मल असा आरसाही देतो आहे
वीणा, भेरि, मृदंग अशा वाद्यांसहित विविध प्रकारचे नृत्य आणि संगीतही मी तुला अर्पण करतो आहे
तुला साष्टांग नमन करत असतानाच बहुविध अशा स्तुतिपूर्ण प्रार्थनाही मी तुझ्याचरणी अर्पण करतो आहे
पण हे सर्व माझ्या संकल्पातूनच मी देत असल्यामुळे हे प्रभो माझ्या मानसपूजेचा स्वीकार कर!
आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणा: शरीरं गृहं
पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थिती:
सञ्चार: पदयो: प्रदक्षिणविधि: स्तोत्राणि सर्वा गिरो
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्
स्वैर अनुवाद -
हे प्रभो तूच माझा आत्मा, तुझी सहचरा पार्वती माझी बुद्धी आणि माझे शरीर हे तुझे मंदिर आहे
कर्मेंद्रियांनी चालवलेला विषयोपभोग ही तुझी पूजाच आहे, माझी निद्रा ही तुझ्या ध्यानात लावलेली जणू समाधीच
माझ्या पायांनी केलेला संचार ह्या तुला घातलेल्या प्रदक्षिणा आणि मुखातून बाहेर पडणारे शब्द ह्या प्रार्थना आहेत
त्याचप्रमाणे जे जे कर्म मी करतो आहे ते ते कर्म हे शिवशंभो तुझीच आराधना आहे, तिचा स्वीकार कर!
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो
स्वैर अनुवाद -
माझ्या हातांनी, पायांनी, कृतींनी, बोलण्याने, शरीराने वा कर्माने केलेले अपराध मला क्षमा कर
माझ्या ऐकण्यातून, बघण्यातून, मनातल्या विचारातून झालेल्या अपराधातून मला मोकळे कर
ती योग्य असोत वा अयोग्य, चांगली असोत वा वाईट, सर्व कर्मांसाठी मी शरण आलोय क्षमा कर
हे देवाधिदेवा, करुणासागरा, महादेव शंभो सर्वतोपरी जयजयकार असो, माझी पूजा स्वीकार कर!
चतुरंग
प्रतिक्रिया
24 May 2008 - 1:49 am | llपुण्याचे पेशवेll
चतुरंगराव आपण सांगितल्या प्रमाणे उत्तमच आहे स्तोत्र. म्हणायला पण सोपे वाटले. आपण इतके छान स्तोत्र संपूर्ण उतरवून दिल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद.
पुण्याचे पेशवे
24 May 2008 - 4:37 am | विसोबा खेचर
हिमजलाच्या तुझ्या स्नानानंतर तुला दिव्यवस्त्र आणि कल्पनेतलेच रत्नांचे आसन अर्पण करतो आहे
वा! हिमजलाचं स्नान! लै भारी...!
नवरत्नांच्या गंधाने आभूषित केलेल्या सुवर्णपात्रातून मी तुला तूप, भाताची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करतो आहे
दही-दूध यांनी बनवलेली, फलरसांनी, भाज्यांनी युक्त रंभाफलादि पंचपक्वान्ने मी तुला अर्पण करतो आहे
माझ्या पायांनी केलेला संचार ह्या तुला घातलेल्या प्रदक्षिणा आणि मुखातून बाहेर पडणारे शब्द ह्या प्रार्थना आहेत
त्याचप्रमाणे जे जे कर्म मी करतो आहे ते ते कर्म हे शिवशंभो तुझीच आराधना आहे, तिचा स्वीकार कर!
वा रंगा! सुंदर लिहिलं आहेस. आपल्याला संस्कृत काहीच कळत नाही, परंतु तुझं मराठी काव्य मात्र वाचायला छानच वाटलं!
एकंदरीतच काव्य हा तुझा श्रद्धेचा भाग दिसतो आहे त्यामुळे इथे तू मांडलेली काव्याची मानसपूजा आम्हाला आवडली! :)
आपला,
(शंकरभक्त) तात्या.
24 May 2008 - 4:47 am | मदनबाण
हे सुंदर संस्कृत स्तोत्र मराठीत अनुवादित केल्याबद्दल धन्यवाद.....
(जय भोलेनाथ)
मदनबाण.....
25 May 2008 - 11:24 am | कलंत्री
अनुवाद चांगलाच जमला आहे.
याला गद्याऐवजी पद्यस्वरुप दिले तर अजून बरे होईल. ( गद्य = लेखस्वरुप आणि पद्य = कवितास्वरुप). बरेच दिवसानंतर हे शब्द वापरत असल्यामूळे माझाच गोंधळ झाला आहे.)
25 May 2008 - 5:28 pm | पुष्कर
असेच म्हणतो. (असेच म्हणजे "बरेच दिवसानंतर हे शब्द वापरत असल्यामूळे माझाच गोंधळ झाला आहे" सोडून उरलेले.... भावनाओं को समझो.)
-पुष्कर
27 May 2008 - 9:52 pm | चतुरंग
सुरुवातीला पद्य अनुवाद करण्याचाच विचार होता.
थोड्या प्रयत्नानंतर शंकराचार्यांच्या विलक्षण प्रतिभेच्या शब्दांसमोर माझे क्षीण काव्य दुबळे वाटू लागले त्यामुळे नाद सोडून दिला. ;)
मी पुन्हा कधीतरी प्रयत्न करुन पाहीनही पण तूर्तास हे स्तोत्र माहीत करुन देण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देईना म्हणून गद्य का होईना अनुवाद केला.
चतुरंग
26 May 2008 - 8:59 am | पिवळा डांबिस
वा, चतुरंगजी!!
एका सुंदर स्तोत्राचा तितकाच सुंदर अनुवाद!!
मस्त जमून आलंय!!
हे स्तोत्र वाचतांना ते स्वतःच कधी पुट्पुटू लागलो ते समजलंच नाही. आज जवळ जवळ वीस वर्षांनी हे स्तोत्र म्हटलं.....
डोळ्यापुढे माझे शिवभक्त आजोबा आले....
त्यांना प्रसन्न करण्यासाठी लहानपणी मुद्दाम हे आणि शिवमहिम्न स्तोत्र पाठ केलं होतं.....
लहानपणी आजोळी गेल्यावर पहाटेच्या अंधारात देवघरातून येणारा तो निरांजनाचा मंद उजेड (तेंव्हा आजोळी वीज नव्हती).....
अगरबत्ती आणि फुलांचा येणारा मंद सुगंध....
देवघरात सोवळं नेसलेले, पूजेत मग्न झालेले प्रेमळ आजोबा....
त्यांचे खर्जातल्या स्वरातले, स्वच्छ शब्दांतले बोल....
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो
ओम नमः शिवाय! ओम् नमः शिवाय!! ओम् नमः शिवाय!!!
ते माणूस आता राहिलं नाही पण तुम्ही आठवण मात्र ताजी करून दिलीत....
खूप खूप आभारी आहे....
कधीकाळी कुणाचातरी नातू असलेला,
डांबिसकाका
26 May 2008 - 10:35 am | अजय जोशी
करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो
हा श्लोक पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी त्रिकालसंध्या म्हणून रात्री झोपण्यापूर्वी म्हणावयास सांगितला आहे. दिवसभरात कळत नकळत होणारे अपराध देवाने क्षमा करावेत असा अर्थ आहे.
लिहितं अलिहितं वा सर्वमेतत्क्षमस्वं
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
26 May 2008 - 10:47 am | विसोबा खेचर
दिवसभरात कळत नकळत होणारे अपराध देवाने क्षमा करावेत असा अर्थ आहे.
नकळत अपराध झाल्यास एक वेळ ठीक आहे, परंतु कळत किंवा जाणूनबुजून अपराध झाल्यास त्याला देवाने क्षमा करावी असे म्हणणे हा भिकारचोटपणा आहे. अपराधास क्षमा नाही! भारतीय दंड विधान संहितेनुसार जी शिक्षा असेल ती भोगायची तयारी हवी! संध्याबिंध्या करून देवाकडे क्षमा मागण्यात काही अर्थ नाही.
लेको, जाणूनबुजून अपराध केलात ते काय देवाने सांगितलं म्हणून? :)
तात्या.
26 May 2008 - 7:34 pm | चतुरंग
चोरी मारी असे नव्हे. तसले अपराध करुन क्षमा मागणे दरवेळी क्षम्य असेलच असे नाही.
एक उदाहरण देऊन मुद्दा अधिक स्पष्ट होईल.
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे||
पर्वत हे जणू स्तनमंडल आहेत अशा समुद्रवस्त्रांकित,
विष्णुपत्नी (पृथ्वी), तुला पाय लावतो आहे त्याबद्दल क्षमा असूदे!
हा श्लोक पृथ्वीला उद्देशून आहे. सकाळी झोपेतून उठून जमिनीला पाय लावून उभे राहण्यापूर्वी पृथ्वीची क्षमा मागितली आहे. तू पवित्र आहेस, विष्णुपत्नी असे तुझं स्थान आहे पण चालण्यासाठी तुला पाय लावणे आवश्यक आहे त्यासाठी मला क्षमा कर.
निसर्गाशी आपले ऋषि किती एकरुप होते ह्याचा असे श्लोक हा पुरावा आहे. निसर्ग हा महान आहे त्याला नतमस्तक होऊन सामोरे जा हा विनम्र भाव ह्यात दिसतो.
चतुरंग
26 May 2008 - 10:05 pm | विसोबा खेचर
चोरी मारी असे नव्हे. तसले अपराध करुन क्षमा मागणे दरवेळी क्षम्य असेलच असे नाही.
हो पण आठवले शास्त्र्यांनी 'असले अपराध', 'तसले अपराध' अशी कुठलीही वर्गवारी केलेली नाही. त्यांनी सरसकट अपराध असे म्हटले आहे, त्यात भारतीय दंड संविधान मध्ये अंतर्गत अपराधही आले. आठवले शास्त्र्यांनी लिहितांना नीट काळजी घेऊन शब्द जपून वापरायला हवे होते!
ते म्हणतात त्याप्रमाणे कुठली ती त्रिकाल संध्या करून भा दं संविधानाखाली येणार्या अपराधाबद्दलही देवाकडे क्षमा मागितली पाहिजे असे म्हणायचे आहे का? उलटपक्षी भा दं संविधानाखाली येणार्या अपराधाबद्दल कुठली संध्याबिंध्या करून देवाकडे क्षमा न मागता जी काही असेल ती सजा भोगली पाहिजे या अर्थाचा श्लोक त्यांनी लिहिला असता तर ते ठीक होतं!
तू पवित्र आहेस, विष्णुपत्नी असे तुझं स्थान आहे पण चालण्यासाठी तुला पाय लावणे आवश्यक आहे त्यासाठी मला क्षमा कर.
यात क्षमा कसली मागायची ते कळलं नाही रे रंगा! च्यामारी, माणूस जन्माला आल्यावर तो पृथ्वीवर नाही उभा राहणार तर कुठे? :)
असो...
या बाबतीत आपले विचार पटतील असे वाटत नाही! :)
आपला,
तात्याशास्त्री आठवले.
26 May 2008 - 11:08 am | अजय जोशी
नकळत अपराध झाल्यास एक वेळ ठीक आहे, परंतु कळत किंवा जाणूनबुजून अपराध झाल्यास त्याला देवाने क्षमा करावी असे म्हणणे हा भिकारचोटपणा आहे.
आपण ज्याला अपराध म्हणत नाही (जसे राग येवून थोबडीत मारणे. अर्धवट ज्ञानाने आरोप करणे, ढेकूण, उंदीर, झुरळे मारणे इ. कोणत्याही प्राण्यास मारण्याचा कोणेलाही अधिकार नाही.), परंतु नाईलाजाने करावे लागणा-या अनेक गोष्टी निसर्गाचा अपराध ठरू शकतात. म्हणून कळत नकळत.
संध्याबिंध्या करून देवाकडे क्षमा मागण्यात काही अर्थ नाही.
संध्या देवाकडे क्षमा मागण्यासाठी करीत नाहीत. असे कोणी समजत असेल तर त्याबद्दल लवकरच मी निवेदन देईन. ऋषींनी दिलेली त्रिकालसंध्या समजून घ्या.
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी
27 May 2008 - 9:52 pm | चतुरंग
चतुरंग
28 May 2008 - 1:22 pm | शशांक
अनुवादाचा प्रयत्न चांगला जमला आहे.
शंकराचार्यांचे महिषासुरमर्दिनिस्तोत्रम् बर्याच ठिकाणी आरतीच्या वेळी म्हणतात तेही काव्य रचनेच्या दृष्टीने पाहिले तर अतिशय सुंदर आहे. इथे पाहा. हे स्तोत्र आवेशपूर्ण चालीत म्हटले जाते त्यामुळे ऐकताना अधिकच प्रभावी वाटते. ध्वनिमुद्रण कुठे मिळाले तर पाहतो.
28 May 2008 - 5:30 pm | वरदा
माझी आजी म्हणायची हे स्तोत्र मी तेव्हा शिकलेही होते आणि विसरलेही....अर्थ मात्र अजिबात माहित नव्हता जेव्हा संस्क्रुत शिकले तोपर्यंत विसरले होते स्तोत्र्....खूप छान शिकायला मिळालं आता अर्थ समजून पाठ करता येईल...धन्यु!
29 May 2008 - 12:30 am | विकास
स्तोत्र आणि अनुवाद आज शांतपणे वाचला. अनुवाद पण चांगला आहे. पद्य अवश्य करा वाचायला आवडेल. शंकराचार्यांचे शंकराचार्यांपाशी आणि रंगाचार्यांचे रंगाचार्यांपाशी - थोडक्यात तुलना करण्याची गरज नाही! बाकी आधी मला वाटले की आपण पद्यच केलेत त्यामुळे पहीले संस्कॄत कडवे ठेक्यात वाचले आणि तसाच अनुवाद वाचायचा प्रयत्न केला :-)