त्या गुर्जरनगरी: ओळख

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
24 May 2008 - 1:05 am

नुकताच कुठे अमेरिकायण संपवून मायदेशी परतलो होतो. बर्‍याच दिवसांनी आईच्या हातचं रुचकर जेवण नशिबी येत होतं. त्याशिवाय मित्रांबरोबरचं पूर्ववत फिरणं (खरंतर भटकणं- अगदीच खरं सांगायचं तर उंडारणं), विकेंडला १-२ चित्रपट, हळूहळू येऊ लागलेले आंबे वगैरे गोष्टींचा आनंद मनापासून घेत होतो. अमेरिकेत राहून ज्या स्थळांच - व्यक्तींचं - प्रसंगांचं महत्त्व नव्याने कळलं होतं त्या सार्‍या स्थळांना-व्यक्तींना-क्षणांना नव्याने भेटत होतो. लोकलची गर्दी , धूळ, कचरा या गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग मोठ्या सहजतेने बनू लागल्या होत्या.

थोडक्यात सारं काही आलबेल होतं. आणि हेच कदाचित ऑफिसातल्यांना पाहवलं नाही की काय देव जाणे. आल्याबरोबर तीन आठवड्यात मला महिनाभर गांधीनगरला धाडण्याचा त्यांनी कट रचला. गांधीनगर!! आणखी एक नवं शहर! आता खरंतर नव्याला भिडण्याचा एवाना सराव झाला आहे. त्यातही गांधीनगर हे काही न्यूयॉर्कइतकं प्रसिद्ध नाव नसल्याने मी तिथे जायचं म्हणून इतका काही रोमांचित नव्हतो. खरंतर नुकतेच सगळे भेटताहेत आणि हे मध्येच आल्याने खट्टूच होतो. पण रोमांचित नसलो तरी उत्सुक मात्र होतोच. कसं असेल हे शहर? तेथील लोकं, तेथील खाणं-पाणी-हवा, तेथील वातावरण, नवं ऑफिस-लोकं, नवा प्रांत, नवी भाषा आणि मुख्य म्हण़जे नवा समाज.

मुंबईत राहत असल्याने गुजराती सतत कानावर पडत असतं. ते बरचसं समजतंदेखील. त्यामुळे भाषेचा फारसा प्रश्न येणार नाही असा अंदाज होता. अर्थात हे दक्षिणी शहर नसल्याने इथे सगळ्यांना हिंदीदेखील येतं त्यामुळे तो प्रश्न फारसा डोक्यात नव्हता. आणखी एक गोष्ट होती ज्यावरून जो तो घाबरवत होता तो म्हणजे तेथील उन्हाळा! शिवाय आता काय रोज गोड गोड जेवणच जेवावं लागणार इथपासून ते गुर्जरकन्यका सून म्हणून घरी येणार इथपर्यंत लोकांचे पतंग माझ्यावर आलेल्या या संक्रांतीला उडत होते.

फार वेळ न दवडता, ऑफिसने विमान तिकिटे हातात ठेवली. विमान सकाळी होतं. ही वेळ पाहून मला बरं वाटलं. कारण मुंबईवरून मी आतापर्यंत केवळ रात्री उडालो आहे. त्यामुळे शहरातल्या दिव्यांनी सजलेल्या मुंबईचा गालिचा रात्री जरी नितांत सुंदर दिसत असला तरी मुंबई दिवसा बघण्याची मनीषा बरेच दिवस बाळगून होतो. ती या निमित्ताने पूर्ण होणार होती. शेवटी तो दिवस आला आणि मी मुंबई हवाईअड्ड्यावरून गांधीनगरसाठी रवाना झालो.

विमान उडाले आणि सरळ समुद्रावर स्थिरावले. त्या उंचीवरून क्षितिजावर दिसणारी मुंबई पाहून मी सुखावलो. मुंबईची आकाशरेषा मी आतापर्यंत समुद्रातून अनेकदा पाहिली होती . मात्र हवेतून नरिमन पॉईंट ते मढपर्यंत दिसणारी ही सम्यक आकाशरेषा पाहून (जरी माघ नसला हिवाळा नसला तरी) मला मर्ढेकर आठवले:

न्हालेल्या जणू गर्भवतीसम, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर ...

माझ्या ह्या मुंबईच्या रूपानेच ही ट्रीप सुंदर होणार अश्या खुणा दिसू लागल्या. पुढे "अमदाबादमा स्वागत छे" असं एका सुहास्यवदनेने स्वागत केलं आणि आपण एका "सुंदर" प्रदेशात दाखल झाल्याची मला मनोमन खात्री पटली. 'ही' अशी "सुंदर" प्रेक्षणीय स्थळे मला महिनाभर दिसणार होती. ट्रीप चांगली होणार याचा हा शुभसंकेतच होता...

पण खरंच ही ट्रीप कशी झाली?.. काय काय अनुभव आले?.. तिथली माणसं.. समाज.. प्राणी.. पक्षी.. शहर मला कसे भेटत गेले हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.. त्या गुर्जरदेशी मी फार काळ नसलो तरी शांत तरीही शहरी जीवनाचा आनंद त्या शहराने मला दिला. तिथल्या मजा, किस्से, प्रसंग, आनंद, आश्चर्य यांत मिसळप्रेमींना सहभागी करायच्या निमित्ताने हा ४-५ भागांचा प्रपंच!

संस्कृतीप्रवाससमाजजीवनमानमौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

24 May 2008 - 2:32 pm | शैलेन्द्र

येउन्द्या लवकर...

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2008 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर

पुढील रंजक भागांच्या प्रतिक्षेत.......

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 4:50 pm | विसोबा खेचर

पण खरंच ही ट्रीप कशी झाली?.. काय काय अनुभव आले?.. तिथली माणसं.. समाज.. प्राणी.. पक्षी.. शहर मला कसे भेटत गेले हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.. त्या गुर्जरदेशी मी फार काळ नसलो तरी शांत तरीही शहरी जीवनाचा आनंद त्या शहराने मला दिला. तिथल्या मजा, किस्से, प्रसंग, आनंद, आश्चर्य यांत मिसळप्रेमींना सहभागी करायच्या निमित्ताने हा ४-५ भागांचा प्रपंच!

येऊ द्यात साहेब, आम्ही वाचायला उत्सुक आहोत...:)

आपला,
तात्या पटेल.

भडकमकर मास्तर's picture

25 May 2008 - 12:06 am | भडकमकर मास्तर

उत्तम इंट्रो....
मस्त ...आता दिसला भाग की वाचणार...
येउंद्यात लवकर...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

25 May 2008 - 4:18 pm | स्वाती दिनेश

ऋषिकेश,
सुरुवात झकास झाली आहे,गुर्जरनगरीतले अनुभव ऐकायला उत्सुक!
स्वाती

सुधीर कांदळकर's picture

25 May 2008 - 8:25 pm | सुधीर कांदळकर

सरुवात छे. मजा आवसे.

आवी दे.

सुधीर कांदळकर.

सुमीत's picture

27 May 2008 - 3:08 pm | सुमीत

वाट पाहात आहे पुढील भागाची, सुरुवात तर छानच झाली आहे.

शितल's picture

28 May 2008 - 1:03 am | शितल

वाचायला आवडेल.

ऋषिकेश's picture

28 May 2008 - 9:33 am | ऋषिकेश

प्रकट-खरडींतून-व्यनीतून अभिप्राय पोहोचवणार्‍या सगळ्यांचे प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार!
जमेल तितक्या लवकर पुढील भाग टाकेनच..

-('मिसळ'लेला) ऋषिकेश