पूर्वसूचना: या लेखातले सर्व अनुभव १००% सत्य घटना असून त्यात काल्पनिक असे काहीही नाही. त्यात काही काल्पनिक वाटल्यास ते आमचे दुर्दैव समजावे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कधी कधी असे अनुभव येतात की वाटते एखाद्या गोष्टीचा विचार करताना जर ती अयोग्य, चुकीची किंवा करू नये अशी वाटत असल्यास ती न केलेलीच उत्तम! तसा माझा शकुन-अपशकुन, दैवी संकेत, इ. गोष्टींवर विश्वास नाही पण जिथे आपलं मनच नाही म्हणतं तिथे उगाच शहाणपणा करूच नये. कारण नुकसान जरी होत नसलं तरी मनस्ताप मात्र होतोच. आता तुम्हाला वाटत असेल की नमनालाच घडाभर तेल वाहून ही सांगतेय तरी काय? तर सांगायचं असं की काही दिवसांपूर्वी इथे उटी-कोडाईचे फोटो बघून आमचा ३ वर्षांपूर्वीचा एक 'अविस्मरणीय' अनुभव आठवला, म्हणून हा लेखन प्रपंच.
माझ्या लग्नाआधी नोकरीनिमित्ताने मी बंगलोरला एकटीच राहत होते. काही दिवसांनी माझी शाळेतली जवळची मैत्रीणदेखील लग्न होवून तिकडेच आली. जुन्या मैत्रीला स्मरून आम्ही अधुनमधुन भेटत असू. एकदा तिचे आई-वडील बंगलोरला आले तेव्हा त्यांना कुठेतरी फिरायला न्यायचे होते. मे महिन्यातल्या एका शुक्रवारी सुटी होती त्यामुळे ३ दिवस सुटीचे आणि १ दिवस रजा काढून अशी तिने उटी आणि कोडाई कनालची ट्रीप ठरवली. मग मैत्रिणीच्या मनात माझा विचार आला. मी तिकडे एकटीच असते, मी कुणासोबत फिरणार, मला उटी, कोडाईकनाल कोण दाखवणार या भावनेपोटी तिने मलाही या ट्रीपकरता विचारले. आता त्यांच्या फॅमिली ट्रीपमध्ये माझी लुडबूड कशाला म्हणून मी तर आधी नाहीच सांगितले. मग तिने पुन्हा आग्रह करत सांगितले की आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय की तू यावस. एका खासगी ट्रॅव्हल एजंटकडून सगळी बूकिंग्स होणार होती. आपण फक्त पैसे द्यायचे आणि ट्रीपची मजा लुटायची. आता एवढा आग्रह आणि फिरण्याची संधी समोर असल्यावर मीसुद्धा तयार झाले आणि उत्साहाने जायच्या दिवसाची वाट बघत बसले.
गुरुवारी रात्री बंगलोरहून उटीला बसने जायचे होते. त्यामुळे संध्याकाळी ऑफिसनंतर मी मैत्रिणीच्या घरी गेले आणि कळले की तो ट्रॅव्हल एजंट आम्हाला जायचे दिवस बदलायला सांगत होता. आम्ही आज नाही तर मंगळवारी जावे असे सुचवत होता. मैत्रिणीचा नवरा त्याला समजावत होता की आम्ही सर्व नोकरी करणारे लोक आहोत आणि आम्ही सुटीचे ३ दिवस सोडून नंतर रजा काढून का जावू? शेवटी गुरुवारीच निघायचे नक्की झाले आणि आम्हाला म्हणजे मी, मैत्रीण, तिचा नवरा आणि तिचे आई-वडील अश्या ५ जणांना त्या एजंटने उटीला जाणार्या कोणत्यातरी बसमध्ये बसवले. आतापर्यंत मला वाटायला लागले होते की ट्रीप वर पाणी फिरतेय की काय... पण बसमध्ये बसल्यावर पुन्हा उत्साह आला.
शुक्रवारी सकाळी उटीच्या बसस्टँडवर उतरलो आणि रिक्षावाल्यासोबत मजल-दरमजल करत, तिप्पट भाडे देऊन हॉटेलच्या पत्त्यावर पोहोचलो. आम्हाला आधीपेक्षा मोठा धक्का आता बसला कारण हॉटेलवाल्याने सांगितले की इथे आमचे बूकिंगच नाही! पुन्हा बंगलोरच्या त्या एजंटला फोनाफोनी सुरू झाली. हे सर्व मैत्रिणीचा नवरा शांतपणे हाताळत होता त्यामुळे आम्ही बाकीचे सर्व एकीकडे जाऊन बसलो होतो. नंतर हॉटेलवाला आणि एजंट यांच्यात काहीतरी संगनमत होऊन त्यांनी सांगितले की आता तर एकही रूम रिकामी नाही. ९ वाजता त्या रिकाम्या झाल्या की देतो, तोवर वाट बघा. तिथल्याच एका रिसेप्शनवजा जागेत आम्ही वाट बघत बसलो होतो तेव्हा कळलं आमच्यासारखे वाट बघणारे इतरही बरेच आहेत. त्यात १-२ हनीमूनला आलेली जोडपीसुद्धा होती. त्यांची तर फारच दया आली. असो. तर ९-९:३० ला हॉटेलवाला म्हणाला तुमच्या रूम्स तयार आहेत.
आम्ही आनंदाने सामान उचलत निघालो पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. एजंटने ५ जणांना मिळून दोनच खोल्या बुक केलेल्या होत्या! आता मला फारच अवघडल्यासारखे व्हायला लागले. मी असाहाय्य नजरेने मैत्रिणीकडे बघितले. आता तीच वैतागून हॉटेलवाल्याशी बोलायला लागली की आम्ही आधीच सांगितलं होतं की ३ खोल्या हव्यात. त्याने निर्विकारपणे सांगितलं की हा 'पीक सीझन' आहे. तुम्हाला जास्तीत जास्त दोनच खोल्या मिळतील. पुन्हा उशीर होतच होता त्यामुळे मी सोडून बाकीच्यांना आणखी एका खोलीसाठी वेळ वाया घालवण्यात तथ्य वाटत नव्हतं. शेवटी एक रूम मी, मैत्रीण आणि तिच्या आईला तर दुसरी रूम मैत्रिणीच्या नवर्याला आणि वडिलांना अशी वाटणी करून आम्ही तयार व्हायला गेलो.
एव्हाना मला फारच नकोसं व्हायला लागलं होतं. पण फ्रेश होवून उटी बघायला निघाल्यावर मला जरा मोकळं वाटायला लागलं, छान मजा आली. संध्याकाळी परत येताना गाइडने गाडी हॉटेलपासून बरंच दूर थांबवली आणि तिकडून सगळ्यांना आपापले जायला सांगितले. इथे १०-१२ पावले चालून झाल्यावर माझी चप्पल तुटली. स्वतःच्या नशिबावर चरफडत, कशीतरी चालत हॉटेलवर पोहोचले. तरी एक बरं की आणखी एक बुटांचा जोड सोबत घेतला होता. नाहीतर पुन्हा चप्पल खरेदीसाठी पळावं लागलं असतं. हॉटेलमध्ये आलो की त्या दोनच खोल्यांमुळे मला जास्तच मनस्ताप व्हायचा. पण मी तेव्हा काहीही करू शकत नव्हते. परत निघून जाणेही शक्य नव्हते आणि आणखी रूम मिळणे तर त्याहून अशक्य होते. त्यामुळे नाईलाजाने 'आलिया भोगासी...' असा पवित्रा घेऊन उटीतला दुसरा दिवस म्हणजे शनिवार पार पडला.
रविवारी सकाळी १०-११ वाजता एका साध्या मिनीबसने कोडाई कनालला जायचे होते, हे मला अनपेक्षित होते. मी असेच गृहीत धरून होते की हा प्रवास रात्रीच्या वेळी असेल. असो. तर ही अतिशय अ-आरामदायी मिनीबस, ज्यात पुश-बॅक सीटस् नाहीत, तमिळनाडूच्या रणरणत्या उन्हात एसी नाही की पुढे पाय ठेवायला फूट-रेस्ट नाही, उटीहून साधारण ११ वाजेच्या आसपास निघाली. उटी आणि कोडाईच्या पर्वतरांगांमध्ये थोडा सपाट पठारी भाग आहे. उटीच्या घाटातून उतरताना छान वाटत होते पण जशी बस पठारी भागात आली, उन्हाची तीव्रता जाणवायला लागली. तापलेली बस, खिडकीतून येणार्या उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत होती. अश्यात दुपारी ३ च्या जवळपास बस एका ठिकाणी खडखडाट करत थांबली. इंजिनाचा कुठलासा पट्टा तुटल्याने बस बंद पडली होती. आसपास कुठेही गाव नाही की वस्ती नाही. ड्रायव्हर म्हणाला की तो जवळच्या गावात जाऊन पट्टा आणि मेकॅनिकला घेऊन येतो. तोवर आमची बस तिथेच उभी. बाहेर ऊन मी म्हणत होते आणि बस तापल्याने आत बसणेही शक्य होत नव्हते. अडीच-तीन तास उन्हाचा येथेच्छ आस्वाद घेऊन बस दुरुस्त झाल्यावर आम्ही कोडाईच्या दिशेने पुन्हा प्रयाण सुरू केले.
कोडाईचा घाट चढायला सुरुवात केली तोवर संध्याकाळ झाली होती आणि हवेत गारवाही आला होता. दिवसभराच्या दगदगीनंतर तो गार वारा छान आल्हाददायक वाटत होता. कोडाईला पोहोचेपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. बसने आम्हाला जेथे सोडले तेथून हॉटेलवर जाण्यासाठी एक टॅक्सी केली तर तिथल्या ८-१० टॅक्सी-ड्रायव्हर्स मध्ये भांडण सुरू झाले की आम्ही कुणासोबत जावे. त्यातले काही दारूही प्यायलेले होते. आता आमचा पेशंस संपत आला होता. शेवटी मैत्रिणीचा नवरा आणि वडिलांनी त्यांना काय सांगितले देव जाणे आणि आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो तिनेच हॉटेलवर पोहोचलो. कोडाईच्या हॉटेलातही उटीच्या हॉटेलसारखाच एपिसोड झाला. पुन्हा २००० रुपयांची दक्षिणा देऊन २ रूम्स घेतल्या, त्याही पुरेशी हवा नसलेल्या तळघरातल्या मिळाल्या. आताशा आम्हाला वारंवार येणारे प्रॉब्लेम्स अंगवळणी पडत चालले होते.
दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी, ट्रीपच्या शेवटच्या दिवशी सकाळी उठून तयार होवून आम्ही कोडाई कनाल बघायला निघालो. खरोखर ते अतिशय सुरेख ठिकाण आहे. उटीपेक्षा जरा कमी व्यवसायीकरण झालेले आहे. पूर्ण तमिळनाडूमध्ये जेथे हिंदीही ऐकायला मिळत नाही तेथे एका खानावळीत चक्क मराठी गाणी ऐकून सुखद धक्का बसला. दुपारपर्यंत फिराफीर करून आम्ही ट्रॅव्हल एजंटच्या कोडाईच्या ऑफिसात पोहोचलो. बंगलोरचे परतीचे तिकीट आम्हाला तेथूनच घ्यायचे होते. ४ दिवसांच्या इतक्या अनुभवांनंतर आम्ही सर्वच घरी परतण्यास अतिशय डेस्पेरेट झालो होतो. परंतु ऑफिसातला माणूस म्हणायला लागला की ति़किटाचे पैसे त्याल मिळालेच नाहीत. त्यामुळे ति़किट हवे असल्यास पैसे देऊन खरेदी करा. इथे माझा आणि मैत्रिणीचा पेशंस संपला आणि अतिशय संतापात त्या माणसाला आम्ही पोलिसात जातो अशी धमकी देऊन आम्ही दोघीच तेथून निघालो. थोडं जवळपास फिरून डोकं शांत झाल्यावर आम्ही परत आलो तर आधीच काढलेले ति़किट त्या माणसाने मैत्रिणीच्या नवर्याला दिले होते.
फायनली आम्ही KSRTC च्या volvo बसमधून परतीच्या वाटेला लागलो. रात्रभराच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या घरी पोहोचणार या आनंदात होतो. पण नियतीला हा आनंद मान्य नव्हता. कोडाईचा घाट उतरताना जरी आम्ही जीव मुठीत घेऊन बसलो असलो तरी तो यशस्विरीत्या उतरून आणलेल्या बस ड्रायव्हरने सरळ रस्त्यावर रात्री १० च्या आसपास, अंधारात एका दुचाकीवाल्याला ठोकले. त्या दुचाकीवाल्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागून रक्तस्त्राव होत होता आणि तो बेशुद्ध झाला होता. बस ड्रायव्हर तेथून फरार झाला. तासाभराने पोलिस तेथे पोहोचले. त्यांच्या फॉरमॅलिटीज पूर्ण झाल्यावर पोलिसांच्याच एका ड्रायव्हरने आमची बस जवळच्या एका बसस्थानकावर नेली. तिकडून एका ST टाईपच्या बसमधून आम्हाला तो तमिळनाडूमधला जो जिल्हा होता तिथल्या मुख्य बस स्थानकावर आणून सोडले आणि आता तुमचे तुम्ही कसेही जा असे सांगून टाकले.
मी मनातल्या मनात स्वतःला 'अलिफ लैला' मधील सिंदबाद, इ. सारखी हिरो समजायला लागले होते आणि त्याच स्पिरिटने एका पाठोपाठ एक समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत होते. त्याच स्पिरिटने त्या जिल्ह्याच्या बस स्थानकावर 'बस टू बंगलोर, बस टू बंगलोर' असे ओरडतही होते. आमच्याप्रमाणेच बसमधले बाकीचेही लोक होतेच. त्या स्पर्धेत जी पहिली बंगलोरला जाणारी बस मिळाली त्यात चढून २ सीटवर ३ जण बसून किंवा अगदी खाली बसून पण कसेही करून आम्हाला बंगलोरला पोहोचायचे होते. आणि शेवटी डोळ्यात झोप अनावर होत असताना रात्रभर धक्के खात कसेबसे आम्ही मंगळवारी सकाळी बंगलोरला पोहोचलो.
चार दिवसांपासून मी सतत बंगलोरला परतायचा विचार करत होते. पण मधल्या काळात आलेल्या या एकापेक्षा एक अनुभवांनंतर मी खरंच आता परतलेय यावर विश्वासच बसत नव्हता. बस स्थानकापासून रिक्शाने घरी येताना मनात भीती होती की आता या रिक्शाचा अपघात झाला किंवा ती बंदच पडली तर! रिक्षा जेव्हा घरापासून चालत जाण्याच्या अंतरावर पोहोचली तेव्हा हुश्श झाले. पण पुढच्याच क्षणी या सर्व गडबडीत आपण घराची किल्ली तर हरवली नाहीये ना या विचाराने अंगावर सर्रकन काटा आला. पटकन पर्स चाचपडून पाहिली, किल्ली होती...
घरात आल्यावर किती हायसं वाटलं ते शब्दापलीकडचं आहे. त्याचबरोबर दुखणार्या हाता-पायांची जाणीव व्हायला लागली. गेली ४-५ रात्री नीटशी झोपही झालेली नव्हती. त्यामुळे ऑफिसमध्ये फोन करून मंगळवारची रजा सांगून एक निवांत झोप काढली.
ती ट्रीप तर पार पडली पण तिच्या आठवणी मात्र मनात अगदी पक्कं घर करून आहेत. हेच बघा ना, मला आज ३ वर्षांनंतरही सगळं किती तपशीलवार आठवलं!
प्रतिक्रिया
16 May 2011 - 1:11 am | गोगोल
असेच म्हणतो.
16 May 2011 - 1:22 am | प्रभाकर पेठकर
खरेच अगदी अविस्मर्णीय आणि अत्यंत धक्कादायक अनुभव. असा प्रसंग कुणावरही न येवो.
दुर्दैवाने भारतातच नाही तर अमेरिकेतही पंचतारांकित हॉटेलच्या बाबतीत असा प्रसंग गेल्याच आठवड्यात माझ्या ओळखितल्या एका गृहस्थांबाबत झाला आहे. हातात त्या पंचतारांकित हॉटेलचे बुकिंग कन्फरमेशन असूनही आमच्याकडे तुमचे बुकिंग नाही आणि तुम्हास हवे असल्यास रॅक रेटने (म्हणजे बुकिंगच्या चौपट) रुम देतो असे सांगून पती-पत्नीस ८व्या मजल्यावर आणि मुलांना ५३व्या मजल्यावर बुकिंग दिले. नंतर पुढे तेच, एजंटशी ईमेल्स आणि फोनाफोनी. पण इथे एजंटची काहीच चुक नव्हती पेमेंट पोहोचले होते आणि हॉटेलने तसे कन्फर्मेशनही दिले होते. असो. त्यांचे पुढे काय झाले ह्याची मला कल्पना नाही पण एजंट आणि हॉटेलचे काही बोलणे होऊन काही तरी काँपेन्सेशन देऊन समजवासमजवी करण्यात आल्याचे ऐकले.
अशाने सर्व बुकिंग्ज २-३ महिने आधी करूनही असे काही अनुभवास आले म्हणजे सर्व टूरची मजा जातेच जाते, मनस्ताप आणि अतिरिक्त खर्च सोसावा लागतो.
16 May 2011 - 1:08 pm | स्मिता.
मला आता वाटायला लागलंय की एजंट आणि हॉटेल यांच्यात काहीतरी साटंलोटं नक्कीच असावं. एजंट कमी किमतीचे पॅकेज दाखवून पर्यटकांना भुरळ घालतो. एकदा का माणूस परक्या ठिकाणी पोहोचला की त्याला दुसरा पर्याय नसल्याने आणि त्या ठिकाणाची माहिती नसल्याने नाईलाजाने हॉटेलला जास्तीचे पैसे द्यावेच लागतात. त्यातले काही कमिशन एजंटला जातच असेल.
तुमच्या परिचयातल्या गृहस्थांबाबतचा अनुभवही असाच झाला म्हणायचा. पैसे उकळायचेच आहेत तर आधीच जास्त का नाही लावत काही कळत नाही. पर्यटक २ दिवसांच्या आराम/मजेसाठी येतात आणि अश्या अनुभवांनी ते सगळे तर सोडाच पण विकतचा मनस्ताप मिळतो.
17 May 2011 - 1:50 pm | प्रभाकर पेठकर
मला नाही तसं वाटंत. गिर्हाईकाला/पर्यटकाला काही तरी आश्वासन देऊन ते न पाळण्यात त्याची बाजारातील पत कमी करू शकते. एजंटची पत स्थानिय असते तर हॉटेलची पत देशभर किंवा जग भर असते. आपला एजंट आपल्या विभागातला असतो. आपण समाधानी नसलो तर आपल्या ओळखितल्या सर्वांना त्या एजंट बाबत सावध करतो. त्यामुळे त्याच्या व्यवसायावर परिणाम होतो. पण हॉटेलचे तसे नसते. त्यांचे गिर्हाईक देशभर/जगभर पसरलेले असते. काही ग्राहक/पर्यटक नाराज झाले म्हणून त्यांना विशेष फरक पडत नसावा.
अशा घटनांमध्ये एजंट फोनाफोनी आणि ईमेल्स करून 'पाहा मी तुमच्यासाठी किती धडपड केली' असे दर्शवून स्वतःची पत राखण्याचा दुबळा प्रयत्न करतो. दुसरे असे, आधी आरक्षण केलेल्या गिर्हाईकापेक्षा ऐनवेळी विनाआरक्षण आलेले गिर्हाईक चौपट पैसे द्यायला तयार असेल (आणि तसे येतातच) तर हॉटेलला तसा मोह होण्याची शक्यता जास्त.
तसेच एजंट आणि हॉटेलच्या संभाषणात काही गैर समजूत होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हॉटेलचे थेट आरक्षण कन्फरमेशन हाती असणे जास्त सुरक्षित.
मी ही अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. सुदैवाने अजून तरी कुठे वाईट अनुभव आलेला नाही.
पुढच्या महिन्यात अमेरिका, कॅनडा, यूके, जर्मनी, फ्रान्स, स्विट्झर्लंड असा पर्यटनाचा जंगी कार्यक्रम आहे. सर्व आरक्षणं झाली आहेत. सुदैव असे की माझा ट्रॅव्हल एजंट माझा मित्रच आहे आणि तो ही माझ्या समवेत आहे. त्यामुळे दिड महिन्याची ही पर्यटन यात्रा सुखरूप होईल अशी आशा आहे.
18 May 2011 - 6:57 am | स्मिता.
ऐनवेळी आलेल्या गिर्हाईकाकडून जास्त पैसे मिळण्याच्या मोहापायी हॉटेलने असे करणे शक्य आहे.
तुम्हाला युरोपच्या पर्यटन यात्रेकरता शुभेच्छा!
18 May 2011 - 9:46 am | प्रभाकर पेठकर
शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
16 May 2011 - 10:10 am | मृत्युन्जय
तुमच्याबद्दल सहानुभुती आहे. मला असे अनुभव आले असते तर माझी चिडचिड आणि ट्रॅव्हल एजंटचे बीपी गगनाला भिडले असते
16 May 2011 - 7:56 pm | गणेशा
असा प्रवास कोणाचाच न होवो ...
--
त्या एजंट ला अद्दल घडवण्यासारखे काही करता येवु शकते का?
18 May 2011 - 12:16 pm | धमाल मुलगा
काय अनुभव म्हणायचा का काय हो?
पार पार विचका झाला की सगळ्या ट्रीपचा. :(
त्या एजंटला शोधून तुडवला नाही का राव?
18 May 2011 - 2:51 pm | स्मिता.
एजंटला तुडवायच्या काय गोष्टी करता राव!
खरं तर अगदी कोडाईहून निघेपर्यंत त्या एजंटची वाट लावायची ठरवलं होतं. पण नंतर रात्रीच्या अनुभवांनंतर तर आणखी कुणाशी डोकं लावायची इच्छाच उरली नव्हती. आपल्या घरी येऊन पोहोचलो हेच भरपूर झाले होते.
बहुतेक लोक असेच वागत असतील आणि एजंटांचे फावत असेल.
एक समाधानकारक गोष्ट नमूद करायची राहिली, ते अशी की KSRTC ने कोडाई-बंगलोर चे भाडे पूर्णपणे परत दिले होते.
18 May 2011 - 4:08 pm | आत्मशून्य
आधी जरा घाइत होतो म्हणून पटदीशी फोटो कूठे आहेत असं टाकून सटकणार होतो.... पण आत्ता हे वाचून खरचं... भावना शब्दांपलीकडे गेल्या.... अशी ट्रीप खरच न घडो.