"भारतीय - कसा मी? असा मी!"
प्रकरण दुसरे, भाग-८
"सत्ता:लोकशाहीचा अनपेक्षित विजय"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत
--------------------------------------------------------------------------
थोडेसे वैयक्तिकः आज बर्याच दिवसांनी ही लेखमाला परत चालू करत आहे. मध्यंतरी बर्याच लोकांनी ही मालिका मी बंद का केली व पुन्हा कधी सुरू करणार अशी विचारणा केल्यामुळे नाहीं म्हटले तरी मी कांहींसा सुखावलोच.
न लिहिण्याचे कारण होते विश्वचषक स्पर्धेचे सामने पहाण्यात जाणारा वेळ आणि क्रिकेटवर खरडलेले कांहीं लेख!
आता विश्वचषक स्पर्धेची 'नशा' उतरलेली आहे आणि मी पुन्हा या मालिकेला सुरुवात करत आहे.
मध्ये बराच खंड पडल्याने कुणाला मागचा संदर्भ पहावासा वाटल्यास सोपे जावे म्हणून आधीच्या भागांचे दुवेही शेवटी दिले आहेत!
वाचा तर पुढे.....
----------------------------------------------------
भारतीय राजकारण्यांना आपण हास्याचा विषय बनलेले आवडत नाहीं, त्यांना अवघडलेल्या अवस्थेत दाखविणारे लेख प्रसिद्ध झालेले आवडत नाहींत. मीडियानेसुद्धा जणू त्यांच्या खासगी आयुष्यावर कांहींही न लिहायचा करारच केलेला आहे. असा करार करण्यामागील कारणे लक्षात येतात पण असा करार करणे कांहींसे विलक्षणच वाटते. राजकीय भ्रष्टाचाराबद्दल सतत भाष्य चालू असते, पण वैयक्तिक बाबींवर-त्यात त्यांनी वारंवार केलेले लैंगिक दुराचरणही आले-कांहींही भाष्य करणे बलवान लोकांना सदैव आदर देण्याच्या सर्वसाधारण नियमाशी विसंगत असल्याने अपायकारक आहे असेच भारतीयांत मानले जाते. बलवान लोकांना सत्तेवर नीट अंमल करता यावा म्हणून कांहीं हद्दीपर्यंतची गुप्तता मिळायला हवी असेही मानले जाते. लोकशाही व्यवस्थितपणे रुजलेल्या अमेरिकेत मात्र लैंगिक लफडी कायमच उघडकीस येत असतात. या उलट लोकशाही पद्धतीची पावले नव्यानेच टाकू लागलेल्या भारतात मात्र अशा तर्हेच्या बातम्या देणे हे कमरेखाली वार करण्यासारखे समजले जाते. आणि या दोन पद्धतीतला विरोधाभास ठळकपणे दिसतो.
भारतीयांना सत्तेच्या विचाराने भुरळ घातलेली असल्याने सत्तास्पर्धेत भाग घेऊन निवडणुका लढवून कोण जिंकला आणि कोण हरला हे ठरवणे हे मानसिक दृष्ट्या गरजेचे होऊन बसले आहे. सामान्य भारतीयांची राजकारणाबद्दची उत्कट ओढ बर्याचदा परदेशी लोकांना बुचकळ्यात टाकते. या उत्कट ओढीमुळेच भारतात वारंवार होणार्या निवडणुका, रोज उदयास येणारे नवे-नवे राजकीय पक्ष आणि त्यांचे नवे-नवे राजकीय नेते याबाबत भारताने विश्वविक्रमच केलेला आहे. भारतेतर जगातील अशा घटनांची बेरीज केली तरी भारतात अशा घटना या बेरजेपेक्षा जास्त घडतात! भारतीय लोक कुठेही राजकारणाची चर्चा करतात: बसेसमध्ये, आगगाड्यांत, धाब्यासारख्या जागी जेवताना आणि आपापल्या घरी! आणि सत्तेवर कोण आहे, कोण होता, कोण येणार, कोण येऊ शकेल आणि कोण कधीही सत्तेवर येऊ शकणार नाहीं यासारख्या या सत्तेच्या समीकरणाच्या चर्चेत हिरीरीने भाग घेत असतात. सत्तेसाठी केलेला विश्वासघात, हिशेब, कट-कारस्थाने या सारख्या गोष्टीत भारतीय पूर्णपणे गढून जातात. सतत चालणार्या या कट-कारस्थानांबद्दल आणि डावपेचांबद्दल भारतीय लोक निषेध किंवा संताप व्यक्त करतील, पण सत्तेच्या समीकरणातील महत्वाचा 'तात्विक' मुद्दा आणि डावपेचांमागील कारणे यांचे मुद्देसूद मूल्यमापन करण्यापेक्षा एकाद्या नेत्याचा उदय आणि अस्त याबाबतच त्यांना प्रचंड कुतुहल आणि गोडी असते.
परंपरेनुसार चालत आलेल्या निष्ठेमुळेच सत्ता टिकून असते हे खरे असले तरी सत्ता मिळविणे हे भारतीयांचे इतर सर्व उद्दिष्टांवर कुरघोडी करणारे "धर्मनिरपेक्ष उद्दिष्ट" असते. उदाहरणार्थ, सत्तेसाठी जातीय भावनांचा सोयीनुसार कंचाउपयोग केला जातो तर कधी जातीय भावनांकडे दुर्लक्ष केले जाते. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार ठासून आपल्या जातीचा उपयोग करून घेतात. पण नंतर सत्तेच्या समीकरणात इतर पक्षांशी जुळवून घेताना जातीचा विषय बाजूलाही ठेवतात. आपल्या "Mistaken Modernity" या पुस्तकात दिपंकर गुप्ता जातीय तत्वांवर झालेल्या एकजूटीचा उगम धर्मनिरपेक्षतेच्या आणि राजकीय कारणांमुळे कसा झाला आहे आणि परंपरागत आणि आदि कालापासून चालत आलेल्या एकनिष्ठेच्या मुद्द्यांवर कसा अवलंबून नाहीं याची अनेक उदाहरणे देतात. जातींच्या एका प्रकारच्या संघटनेतून सत्ता मिळाली नाहीं किंवा अशा संघटनेची उपयुक्तता संपल्याचे आढळून आल्यास एकादी नवी संघटना निर्माण केली जाते. क्षत्रीय, हरिजन, अहिर आणि मुसलमान (KHAM) किंवा अहिर, जाट, गुजर आणि राजपुत (AJGAR) या तर्हेच्या संघटनांना जातीय परंपरेच्या निकषांवर कांहींच तर्कसंगती नाहीं. तसेच "अखिल भारतीय कुर्मी सभे"त अयोध्या, धनुक, महातो, कुर्मी आणि कोएरी यासारख्या भिन्न-भिन्न जाती एकत्र बांधल्या गेलेल्या आहेत. या जातीत आपापसात विवाह होणे तर बाजूलाच राहिले, त्या एकत्र भोजनसुद्धा करत नाहींत. पण सत्ता मिळाल्यामुळे अलिप्ततेला आतून संरक्षण देणार्या पण बाहेरून अशा सहकाराने धर्मनिरपेक्षतेचे फायदे मिळवून देणार्या अशा तर्हेच्या एकजुटींची अनेक उदाहरणे आहेत आणि ती स्वातंत्र्यापूर्वीचीसुद्धा आहेत. १९२०च्या अवध शेतकरी चळवळीचे उदाहरण दिपंकर गुप्ता देतात. या चळवळीत कुर्मी, अहिर, पसी, ब्राह्मण आणि मुसलमान जमीनदारीच्या विरोधात एक झाले होते, पण संपूर्ण चळवळीच्या दरम्यान मुदपाकखाने मात्र प्रत्येकाचे स्वतंत्र होते.
ब्रिटिश पद्धतीच्या सांसदीय लोकशाहीच्या रोपाचे भारतीय भूमीवरील केलेले 'कलम' अगदीच विसंगत होते. या पद्धतीची लोकशाही एका वेगळ्याच परंपरेतून आली होती आणि एका ऐतिहासिक अनुभवातून परिपक्व झाली होती. स्वातंत्र्यानंतर १५-२० वर्षे नेहरूंच्यासारखा लोकशाहीशी संपूर्णपणे बांधिलकी असलेला राज्यकर्ता भारताला मिळाला हे भारताचे भाग्य होय. भारताच्या घटना समितीतील बहुसंख्य लोक इंग्लंडमध्ये शिकलेले आणि ब्रिटिश संस्कृतीची छाप असलेले सुखवस्तू लोक होते आणि त्यांच्यावर नेहरूंसारख्या आंग्लविद्याविभूषित नेत्याची छाप होती. ब्रिटिश पद्धतीची लोकशाही भारतात स्वीकारली जाईल असा नेहरूंना ठाम विश्वास होता. पण भारतीय नेत्यांच्या भाषणबाजीतील आणि इथल्या राजकारणातील प्रत्यक्ष पद्धतीतील प्रचंड विरोधाभास स्पष्ट दिसून येऊ लागला. इतर ब्रिटिश वसाहतींत जसा लोकशाहीचा लगोलग आणि अकाली पाडाव झाला तसा भारतात झाला नाहीं कारण भारतीयांचा तडजोड करून घेण्याचा स्वभाव. या स्वभावामुळे परस्परविरोधी भारतीय परंपरांनी कुणा एकाचे वर्चस्व रहाणार नाहीं आणि सारे एकत्र राहू शकतील असा एक मार्ग शोधून काढला.
अशा तर्हेने हे परदेशी कलम भारताच्या मूळ वृक्षावर वाढूही लागले पण त्याची वाढ कांहींशी खुरटलीही. भारतातील लोकशाहीची उत्क्रांती झाली पण त्यात कांही कांहीं गोष्टी वेड्यावाकड्या झाल्या. तरीही लोकशाही भारतीयांच्या सहिष्णुतेमुळे इथे जगली. भारतीयांना आपले उमेदवार देवदूत किंवा फरिश्ते नसणार याची जाणीव होती. निवडणुकीतील गैरप्रकारामागच्या कारणांबद्दल भारतीयांना कल्पना होती. नैतिक मार्गच्युतींना ते क्षमा करू शकत होते. "रंगे हाथ" पकडले गेलेले आणि संशयातीत भ्रष्ट असलेले नेते पुढच्याच निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याची अनेक उदाहरणे आहेत. हिमाचल प्रदेशातील एक प्रथितयश नेते सुखराम यांचे उदाहरण खूपच उद्बोधक आहे. काँग्रेस पक्षाचे सुखराम हे ९०च्या दशकात केंद्रीय दूरसंचार मंत्री होते. व त्यांच्यावर त्यांच्या खात्याच्या उपकरणांच्या खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल आरोप केले गेले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांच्या मंडी येथील आणि दिल्लीतील घरावर धाड घातली असता गादीखाली, प्लॅस्टिकच्या थैल्यांत आणि सूटकेसेसमध्ये भरलेल्या नोटांच्या थप्प्या सापडल्या! त्यांच्यावर रीतसर आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि काँग्रेस पक्षाने तत्परतेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. पण सुखरामना जणू त्याचे कांहीं सोयरसुतकसुद्धा नव्हते. लगोलग त्यांनी "हिमाचल विकास काँग्रेस" नावाचा नवा पक्ष उभा केला आणि फेब्रूवारी ९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते मंडी येथून विधानसभेवर प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांना ६४ टक्क्याहून जास्त मते पडली तर त्यांच्या निकटतम प्रतिस्पर्ध्याला सुमारे १७ टक्के मते पडली. केवळ इतकेच नाहीं तर काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना निर्णायक बहुमत न मिळाल्यामुळे सुखरामना हे दोन्ही पक्ष लाडीगोडी लावू लागले. भाजपाने सुखराम यांच्या याच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लोकसभेच्या कामकाजात अनेक दिवस व्यत्यय आणला होता पण आता त्यांनी सुखराम यांचे स्वागत केले आणि त्यानंतर स्थापन झालेल्या भाजपा सरकारात सुखराम जणू उपमुख्यमंत्री नसले तरी त्याच तोर्यात वागत असत.
ही घटना खूपच बोधप्रद आहे कारण या तर्हेचे आचरण हे अपवादात्मक नसून जणू प्रमाणच झाले आहे. आपण कांहीं चूक केली असे सुखराम यांनी कधीच कबूल केले नव्हते. ते एक व्यावसायिक राजकारणी होते आणि विधानसभेतील एक आमदार म्हणून सुरुवात करून राज्यस्तरावरील मंत्री, मग खासदार आणि शेवटी केंद्रीय मंत्री असा हा निसरड्या वाटेवरचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे केला होता. त्यांना एकाग्रतेने सत्तेची उपासना करण्याची विद्या अवगत होती आणि टीकाकारांच्या संधीसाधू नैतिकतेला ते किंमत देत नसत. आधी काँग्रेसने त्यांची नैतिकतेच्या मुद्द्यावर हकालपट्टी केली आणि नंतर सत्तेच्या समीकरणातील त्यांचे स्थान पाहून त्यांच्याशी जवळीक करायचा प्रयत्न केला या दोन्ही गोष्टी काँग्रेसने अपेक्षेप्रमाणेच केल्या होत्या. दिल्लीत संतापून नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांना सुळी द्यायला तयार असलेल्या भाजपानेही सत्तेसाठी गरज पडताच त्यांच्याबरोबर परंपरागत व्यवहारी वृत्तीचे आचरण केले होते! मंडीच्या मतदारांनाही त्यांच्या भ्रष्टाचाराची पर्वा नव्हती. कारण भारताच्या दूरसंचाराच्या नकाशावर मंडीला आणून स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणारा आणि स्थानिक लोकांचे उत्पन्न वाढविणारा एक समर्थक, एक आश्रयदाता याच नजरेने मंडीचे मतदार त्यांच्याकडे पहात होते.
राजकारण्यांनी हवी तशी भ्रष्ट वागणूक केली तरी भारतीय मतदार त्यांना धारेवर धरत नाहींत ते सर्वत्र पसरलेल्या गरीबीमुळे आणि अशिक्षितपणामुळे असा एक समज आहे, पण तो खरा नाहीं. सुशिक्षित भारतीयसुद्धा सत्तेसाठी अशाच मार्गाचा अवलंब करतात. फरक इतकाच कीं सुशिक्षित लोक नैतिकतेवर झालेल्या अशा अत्याचाराविरुद्ध खूप संताप व्यक्त करतात. कारण दुसर्यांमधील अनैतिकतेवर हल्ला करून आपच्या नैतिकतेचा ठासून देखावा करण्याची एकही संधी भारतीय सोडत नाहींत. पण व्यक्तिगत पातळीवर आणि खास करून वैयक्तिक खर्चाने मूळ मूल्यांच्या पद्धतीत अमूलाग्र बदल करण्याच्या निर्धारात या संतापाची परिणती होत नाहीं. सुखवस्तू आणि गरीब या दोघांना एकाद्या 'तत्वनिष्ठ राजकारण्या'पेक्षा एकादा 'परिणामकारक समर्थक'च जास्त मौल्यवान वाटतो. कारण समर्थक नेत्यांनी आपली काळजी घ्यावी अशीच अनुयायांची अपेक्षा असते. जोपर्यंत नेत्यांकडून अशी काळजी घेतली जाते तोपर्यंत नेत्याच्या अनैतिकतेशी अनुयायांना कांहींच देणे-घेणे नसते. आणि म्हणूनच भारतीय राजकारणाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहे. "हिंदुस्तान टाइम्स"चे संपादक वीर संघवी यांनी एकदा वैतागून असे लिहिले होते कीं एकाद्या सराईत खुन्याने अमेरिकेच्या सिनेटची निवडणूक लढवली तर तो हरेल. एकाद्या लैंगिक विकृतीमुळे बलात्कारावर बलात्कार करणार्याने इंग्लंडच्या House of Commons ची निवडणूक लढवली तर त्याची अनामत रक्कमही जप्त होईल. कारण बहुतेक सर्व यशस्वी लोकशाही पद्धतीत मतदार बदमाषांना, दरोडेखोरांना, खुन्यांना मते देत नाहींत. पण भारतीय मात्र अशांना पुनःपुन्हा मते देतात!
भारतीय लोकांच्या या स्वभावाचे किंवा नैसर्गिक प्रवृत्तीचे कारण म्हणून भारतीय समाजाच्या सर्व थरात पसरलेल्या "चारित्र्याबाबतच्या पेचप्रसंगा"ला (किंवा आणीबाणीला-Crisis of Character) संघवी जबाबदार धरतात आणि ते बरोबरच आहे. गरीबांना किंवा राजकीय नेत्यांना दोष देण्याचा एकाद्याला मोह होईल पण या समस्येचे मूळ केवळ तिथे नसून ते सर्वच भारतीयांत आहे, आपणा सर्वांत आहे. आपण जेंव्हां पेचप्रसंग किंवा आणीबाणी असे शब्द वापरतो तेंव्हां असा एक समज होतो कीं अशी वागणूक ही अलीकडील काळात नव्याने उद्भवलेली समस्या आहे, अचानकपणे उफाळलेला नवा रोग आहे. पण आपण भारतीय लो़क "एका अपेक्षित पद्धतीनेच वागणारे आहोत" ही गोष्ट आपण स्वीकारत नाही हीच खरी आणीबाणी आहे! जोवर आपण सर्व समस्यांचे मूळ असलेल्या सत्य परिस्थितीचे पृथःकरण करून ती स्वीकारत नाहीं आणि त्यावर इलाज करत नाहीं तोवर केवळ अशा परिस्थितीबदल शोक करण्याने कांहींही मिळणार नाहीं. आपल्या देशात साधनसंपत्तीची कमतरता आहे व प्रगतीच्या वाटा आणि संधी मर्यादित आहेत पण राजकीय सत्ता या दोन्ही गोष्टींवर मात करते. सरकारकडे असलेली साधनसंपत्ती सर्वात मोठे समर्थन, आश्रय आहे आणि ते समर्थन अत्यंत किमती आहे. राजकारणातल्या यशाने या साधनसंपत्तीची किल्ली हाती लागते. म्हणूनच नेते या सत्तेच्या मागे लागतात आणि जनता ती मिळविण्याची आशा धरून असते. अशा तर्हेच्या आनंदी गोंधळात सत्ता, सामाजिक पातळी आणि पदक्रम याबाबतच्या पारंपारिक प्रवृत्ती जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीत आणखीच समर्थ झालेल्या आहेत.
आधीच्या लेखांचे दुवे:
http://www.misalpav.com/node/16878 (प्रकरण २-भाग ७)
http://www.misalpav.com/node/16784 (प्रकरण २-भाग ६)
http://www.misalpav.com/node/16641 (प्रकरण २-भाग ५)
http://www.misalpav.com/node/16553 (प्रकरण २-भाग ४)
http://www.misalpav.com/node/16328 (प्रकरण २-भाग ३)
http://www.misalpav.com/node/16221 (प्रकरण २-भाग २)
http://www.misalpav.com/node/16141 (प्रकरण २-भाग १)
http://www.misalpav.com/node/16025 (प्रकरण १-भाग१ब)
http://www.misalpav.com/node/15799 (प्रकरण १-भाग १)
http://www.misalpav.com/node/15674 (प्रस्तावना)
प्रतिक्रिया
26 Apr 2011 - 1:41 am | आत्मशून्य
एकूणच भारतीयांवर बर्यापैकी वास्तवादी संशोधन झाले आहे तर...
24 Apr 2011 - 7:44 pm | नरेशकुमार
वाचत आहे,
खुपच इंट्रेस्टींग आहे हे सगळं प्रकरण.
24 Apr 2011 - 8:16 pm | तिमा
चांगली लेखमाला. वाचत आहे.
भारतीय हा भ्रष्ट आणि चोर लोकांना क्षमा करणारा का बनला ? याचे उत्तर मिळत नाही. पण सर्वसाधारण भारतीयाचे वागणे हे ढोंगी तर असतेच. जो नियम इतरांना लावतात तोच स्वतःची वेळ आली की बदलतो आणि काहीतरी सोईस्कर पळवाट तयार केली जाते. स्वार्थ तर रोमारोमात भिनलेला असतो. तो मोठेपणी फक्त लपवण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रजाच अशी असताना त्यातूनच येणारे नेते तसेच असणार. निस्पृह, प्रामाणिक लोक नाहीत असे मला म्हणायचे नाही पण ते अत्यंत अल्पसंख्येत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
25 Apr 2011 - 3:01 pm | सुधीर काळे
धन्यवाद, तिशिंमाघा-जी,
मी जेंव्हां हे पुस्तक पहिल्या वेळी वाचले तेव्हां मला वाटले कीं कुणी माझ्यासमोर आरसाच धरला आहे. इतके हे पुस्तक मला आवडले व मग मी भाषांतर करायचे ठरवले. ज्यांना आवड असेल त्याने मूळ पुस्तक जरूर वाचावे. भाषा जरा बोजड आहे (भाषांतर करताना घाम निघतो!), पण मस्त आहे.
24 Apr 2011 - 8:17 pm | कौशी
वाचत आहे,
25 Apr 2011 - 2:18 pm | निनाद मुक्काम प...
मूळ लेखकाचे कौतुक की ज्याने हे सत्य प्रभावी पणे आपल्या जनतेसमोर मांडले आहे .
'' १०० मी से ८० बेईमान ,फिर भी मेरा देश महान'' '' असे नाना जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला प्रचंड टाळ्या मिळतात .प्रत्यक्षात जैसे थे .
माझ्या भारतातील अल्प पंचतारांकीत होटेलात नोकरीच्या काळात वरिष्ठ अधिकार्यांनी ग्राहकांची बिले मारणे व असे अनके प्रकार माझ्या डोळ्यासमोर केले .ह्या विरुद्ध बोलायचे म्हणजे नोकरी गमवायची .
आणी ती घेण्यासाठी भारतात अनेक जण वाट पाहत होते .
इंग्रजी म्हण आहे .''इफ यु कान्ट बीट देम , देन जोईंत देम ''
साला ''लहानपणी पुरंदरे ,सावरकर काहीच वाचले नसते तर समाजात किती सहज रीत्या मिसळून गेलो असतो मी ''.
''वाचाल तर वाचाल '' ही म्हण खोटी ठरते .येथे
25 Apr 2011 - 8:14 pm | सुधीर काळे
''इफ यु कान्ट बीट देम, जॉईंन देम ''
वा क्या बात है!
पण 'विविध भारती'च्या पंचरंगी कार्यक्रमावर झुमरी तलय्याहून आलेली आजची फर्माइश काय आहे माहीत आहे काय?
आजची आहे, "मुझे कहते हैं कल्लू कवाल, कल्लू कवाल, तेरा मेरा साथ रहेगा|" हा चित्रपट आधुनिक पुणेरी भामट्यावर आधारित आहे!
उद्याची फर्माइश आहे, "माय नेम ईज शीला, शीलाकी जवानी". चित्रपटाचे नांव आहे "दिल्ली की ठग"
आता अण्णा हजारेंच्या नैतिक बळाने मारलेल्या ढुशांमुळे आणखी कुठली-कुठली गाणी 'विविध भारती'वर लागतील ते वेळो-वेळी कळेलच.
असो! जय हिंद!!
25 Apr 2011 - 3:08 pm | सहज
वाचत आहे. लेखमाला छान सुरु आहे.