पोटपाल

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
20 Apr 2011 - 7:56 pm

कोणा एका राज्यात भ्रष्टाचार अतोनात माजला होता. राजा देखील या मलिन प्रतिमेमुळे अतिशय त्रस्त झाला होता. पण त्याच्या भोवतीचे कोंडाळे, प्रधानजी, राजाच्या पूर्वजांनी अनेक वर्षे पोसलेले वतनदार या सगळ्यांपुढे तो काहीच करु शकत नव्हता. स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता. प्रजा ही एके काळी साधी होती. परन्तु सततच्या भ्रष्टाचारामुळे तीही अशा गोष्टी गृहीत धरु लागली होती. संपूर्ण लोकसंख्येमधे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे फारच थोडे लोक राहिले होते. ज्यांना कुठे ना कुठे हात मारता येत होता ते यथेच्छ ओरपत होते. ज्यांना संधीच मिळत नव्हती ते नाईलाजाने प्रामाणिक राहिले होते. तर संधी असूनही स्वच्छ रहाणारे अत्यल्प संख्येमधे विखुरले होते.
राजाला मनापासून वाटे की परिस्थिती सुधारली पाहिजे, पण सुरवात कुठून करावी तेच कळेनासे झाले होते. भ्रष्टाचार्‍यांनी तरुण पिढीला चंगळवादाचा नाद लावला होता त्यामुळे ते त्याच नशेत वावरायचे. जुन्या पिढीला जुन्या गोष्टी आठवून नुसते उसासे टाकण्याशिवाय काहीच करता येत नव्हते.
अशा परिस्थितीतही काही देशप्रेमी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलू पहात होते. त्यातीलच एका आबाने या सगळ्या व्यवस्थेविरुध्द रणशिंग फुंकले. तो थेट उपोषणालाच बसला. पूर्वीही त्याने अशी अनेक उपोषणे केली होती. पण भ्रष्ट व्यवस्थेने दरवेळेस त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत त्याला गुंडाळून टाकले होते. पण म्हणतात ना , काळवेळ कधीतरीच जुळून येते. यावेळेस सर्वांना त्याची दखल घेणे भाग पडले. सर्व अधिकारातील व्यक्तिंवर अंकुश ठेवण्यासाठी एक 'ठोकपाल' नेमावा ही त्याची मागणी होती. राजालाही इष्टापत्ति वाटली. त्याने आबांना चर्चेसाठी बोलावले. प्रधानजी व मंत्रिमंडळ क्षणभर चिंतेत पडले. पण प्रधानजी सावरले आणि त्यांनी लगेच एक व्यूह रचला. राजाने आबांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. एका उच्चस्तरीय गुप्त बैठकीत प्रधानजी राजाला म्हणाले, " अहो तुम्ही हे काय कबूल करुन बसलात ? उद्या असा ठोकपाल खरोखरीच अमर्यादित अधिकार वापरु लागला तर तो तुम्हालाही धोका ठरु शकतो. आणि तोच जर भ्रष्ट झाला तर या राज्याला वाचवणार कोण ? त्यापेक्षा तुम्ही त्या आबाच्या लोकांना प्रस्ताव मांडा की आपण ठोकपाल न नेमता त्याजागी 'टोकपाल' नेमावा. टोकपालही जवळजवळ तेच काम करेल. पण तो फक्त व्यवस्थेला टोकू शकेल ठोकू शकणार नाही. राजाला प्रधानजीचे म्हणणे पटले नाही पण बाकी सर्व मंत्र्यांनी प्रधानजीच्या सुरात सूर मिसळल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. प्रधानजीने एकट्या आबांना राजाची भेट घेऊच दिली नाही.
ठरल्याप्रमाणे आबा आपले दहा प्रतिनिधी घेऊन राजवाड्यात पोचले. कावेबाज प्रधानाने आपली पांच माणसे तयारच ठेवली होती. चर्चेला सुरवात झाली. आबांनी दहा प्रतिनिधींची ओळख करुन दिली. प्रधानजीने दोन्ही बाजूची पांच पांच माणसे समितीत रहातील हे स्पष्ट केले. चर्चेच्या गुर्‍हाळाला सुरवात झाली. ठोकपाल न नेमता टोकपाल नेमावा या युक्तीला आबा बळी पडले. पुढचं मग फारच सोपं होतं. प्रधानजींनी सर्व सूत्रे हातात घेतली. अशा बैठकी चालूच रहातील असे जाहीर केले. अनेक भोळ्याभाबड्या जनतेला आता खरच काहीतरी होणार असे वाटू लागले. इकडे प्रधानाने समितीतल्या बिनराजकीय लोकांची बदनामी मोहिम जोरात चालू केली. त्यातच समाजवादी लोकांप्रमाणे प्रामाणिक माणसांत पण मतभेद सुरु झाले.
अनेक बैठका, मुदतवाढ अशा अडथळ्यांची मालिका पार करत एकदाचा मसुदा तयार झाला. पण राजदरबारातल्या अनेक मान्यवरांनी त्याला दुरुस्त्या जोडत तो इतका निरुपद्रवी केला की प्रत्यक्षात त्या टोकपालाच्या हातात काहीच अधिकार राहिले नाहीत. हे गुर्‍हाळ अनेक वर्षे चालू राहिल्यामुळे प्रजेचेही त्यातले स्वारस्य निघून गेले.
महाराजांच्या दरबारातला एक मातब्बर सरदाराने जो 'जाणता राजा या नांवाने ओळखला जायचा , यावर मार्मिक भाष्य केले. त्याने या टोकपालाला 'पोटपाल' हे नांव देऊन अनेक प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोलण्याचे काम केले.

कथाविडंबनप्रकटनविचारमत

प्रतिक्रिया

सूर्यपुत्र's picture

20 Apr 2011 - 8:06 pm | सूर्यपुत्र

स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता.
????

-सूर्यपुत्र.

बर्याच नागरीकांचे हेच/असेच म्हणने आहे .. पण फक्त म्हणने आणि निवडनुकेच्या वेळी असलेली उदासिनता हीच भ्रष्टाचाराची खरी साथीदारीन वाटते ....

अवांतर : ( या लेखाला अनुसरुन खालील खंत नाही.. कृपया गैरसमज नसावा)
एक खंत :
लोक गप्प बसण्यापलिकडे काहीच करु शकत नाहीयेत , आणि कधी काळी साहित्यिक.. हातातील लेखनिला शस्त्राचे रुप देवुन सार्‍या समाजाला जागृत करुन क्रांतीकारी विचार पेरत असे..
आणि आजकाल साहित्यिक एक तर आपापसात भांडत तरी आहेत किंवा स्वताचे कसे बरोबर हे स्वताच्याच बरोबरच्या लोकांना पटवुन देत आहेत ...

टंकपाल होउ शकणारा माणुस मात्र उगाच पोटपाल होउन राहिलाय

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 9:07 pm | स्पंदना

प्रसंगोचित तिमा!

बिचारे अण्णा!

स्पंदना's picture

20 Apr 2011 - 9:07 pm | स्पंदना

प्रसंगोचित तिमा!

बिचारे अण्णा!

तिमाराव एकदम प्रसंगानुरुप केलेले भाष्य आवडले. नाही तरी जे रोखठोक लिहिले आहे, तेच घडणार आहे.

- पिंगू

प्राजु's picture

20 Apr 2011 - 10:00 pm | प्राजु

हम्म!!

पैसा's picture

20 Apr 2011 - 10:09 pm | पैसा

पण या साठा उत्तरांच्या कहाणीला काही पाचां उत्तरं नाहीत का?

१००+ कोटी लोकसंख्येच्या देशात एका तथाकथित समाजसेवक माणसानं आपण पुढं होउन एक कायदा करु आणि सगळं काही सुरळित करुन दाखवु अशी आशा निर्माण करणं ही जनतेची फसवणुक आहे.

उदा. श्री. टि.एन. शेषन, हे एक प्रचंड कायदेशीर ताकद हातात बाळगुन असणारे अधिकारी होते त्यांना या व्यवस्थेला थोडा लगाम घालणं, चांगलं वळण लावणं शक्य होतं ते त्यांनी केलं. तसेच किरण बेदी, त्यांनी तिहार जेल सुधरवला, पण जेंव्हा त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत होतं तेंव्हाच.

कोणत्याही व्यवस्थेत काहीही बदल, चांगले / वाईट बदल करायला प्रचंड ताकद लागते, अशी ताकद मागे नसताना उगाच मी तुम्हा सगळ्यांचं भलं करतो अश्या हाकाट्या मारणं ही फसवणुक आहे.

सावंत आयोगाच्या फाईलच्या कॉप्या काढणे चालु आहे, सुरु होतील एकएक कागद मिडियाला मिळायला, मग अण्णांनाच एक दिवस अटकपुर्व जामिन घ्यायची वेळ आणतील. अर्थात याला काही अंशी स्वःत अण्णाच जबाबदार आहेत.

@ गणेशा, अरे लोक गप्प बसत नाहीत, बसणार पण नाहीत. प्रश्न आहे जर पेटुन उठले तर पुढच्या महिन्यात इएमाय कोण भरणार? अण्णा हजारे का शांतिभुषण, दोघंही येणार नाहीत बँकवाले आपल्या घरी येतील तेंव्हा. यांना हे सुचते कारण एक तर यांचे इएमाय नाहीत किंवा संपले आहेत म्हणुन.

>>>>यांना हे सुचते कारण एक तर यांचे इएमाय नाहीत किंवा संपले आहेत म्हणुन.
>>>> ठोकपाल...टोकपाल...अन पोटपाल...
क ड क !!! टाळ्या...

मराठमोळा's picture

21 Apr 2011 - 10:38 am | मराठमोळा

हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म......
(यापलीकडे काय करणार..)

किसन शिंदे's picture

21 Apr 2011 - 11:22 am | किसन शिंदे

कोणत्याही व्यवस्थेत काहीही बदल, चांगले / वाईट बदल करायला प्रचंड ताकद लागते, अशी ताकद मागे नसताना उगाच मी तुम्हा सगळ्यांचं भलं करतो अश्या हाकाट्या मारणं ही फसवणुक आहे.
हर्षद यांच्या या वाक्याशी सहमत..
आताच परिस्थिती इतकी वाईट आहे मग पुढे येणारया काळात काय होईल??

विनीत संखे's picture

21 Apr 2011 - 6:23 pm | विनीत संखे

हजार आबा की अण्णा ह्या सिस्टीमला निर्मळ करू शकणार नाहीत... प्रयत्न स्वत:पासूनच व्हायला हवेत.