अर्पणओळ - नववर्षात व्यायामाचा संकल्प सोडलेल्या सर्वांना!
बाहेर मस्त थंडी पडलिये, पहाटे उठून आलं घातलेला वाफाळता चहा प्यावा, दिवस लवकर सुरु करावा, डोंगरामागून येणार्या सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं असं मला अजिबात वाटत नाही........ म्हणजे लहानपणापासून कधी वाटलंच नाही, पण तसं वाटावं म्हणून मी प्रयत्न भरपूर केले. आई, आज्जी बरेचदा जवळच्या देवळात काकडआरतीला जात असत. किती मस्त वाटतं वगैरे वर्णनंही करत्.....तरीही पहाटे उठणं हा माझा घास नव्हे. मुलांना पहाटे उठण्याची चांगली सवय लावावी असं आईला नेहमी वाटत असे. तिला त्यात कधी यश मात्र आलं नाही. आम्ही ऐकायला तयार नव्हतो म्हणून नंतर आईनंच तिचं मत बदललं आणि "मुलांनी आत्ता नाहीतर कधी झोपायचं? तेवढंच सुख!" अश्या विचारापर्यंत ती आली. आजीचं मत मात्र बरंच वेगळं होतं. निदान मुलींनी तरी पहाटे उठावं असं तिला वाटे. यासाठी 'संस्कृत सुभाषितं पाठ कर' म्हणून ती बरीच मागं लागत असे. पहाटे काही लोकांना कविता, लेखन असं काय काय सुचतं.......मला साधं दात घासायलाही सुचायचं नाही. शनिवारी मात्र शाळेसाठी न उठून सांगते कोणाला? त्यात आपल्याकडची म्हण आहेच 'न कर्त्याचा वार शनिवार'! आता शनिवारऐवजी दुसर्या कोणत्याही वारी सकाळची शाळा असती तरी मी तेवढाच आळस केला असता हे काय सांगायला हवं! तसेही पहाटे उठून मला फारसे दिव्य अनुभव कधी आले नाहीत.
बाहेरच्या अंधारलेल्या वातावरणात मला नको नको त्या आकृत्या दिसायच्या. आता तुम्हीच सांगा, अंधारात कधी कासव, साप, विचित्र आकाराची माणसं, झाडाच्या हलत्या पानातून तयार होणारे आकार्.......काय म्हणून दिसत नाही? असो, तर माझी, आई आणि आज्जीची ही शाब्दीक झटापट पाहून बाबांनी माझ्या मनावर व्यायामाचं महत्व बिंबवायचं ठरवलं. दोन दिवस सक्काळी लवकर उठून त्यांनी सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक दाखवलं. एक तक्ता भिंतीवर चिकटवण्यात आला. मीही दोन दिवस नेमानं सूर्यनमस्कार घालून विक्रम केला आणि 'आरंभशूर' ही पदवी प्राप्त केली.
दिवाळीच्या सुट्टीत मला बाहेर पळण्यासाठी पाठवावं असं सर्वानुमते ठरलं. आत्या, ताई आणि माईला घेऊन दिवाळीत येणार होती. मग आम्ही तिघींनी व्यायामानं दिवस सुरु करण्याचा घाट घातला. पहिल्याच दिवशी माईनं आमच्यावर बहिष्कार घातला आणि रजईत गुरफटून झोपून गेली. ती नंतर दिवसभरात कधीतरी व्यायाम करेल असं ठरलं.ताईचा आणि माझा निश्चय पक्का असल्यानं दोघी निघालो. बाहेर बराच अंधार असल्यानं एकमेकींच्या साथीनं पळायला सुरुवात केली आणि पाच मिनिटातच मला विविध आकारांबरोबरच फक्त ज्योत हवेतून हेलकावत येताना दिसली. ताईला दाखवल्यावर तीही त त प प करू लागली. एखाद्या मिनिटात पांढरे कापड हवेतून गेलं आणि आम्हाला थंडीतही घाम फुटला. झाडामागे थोडावेळ थांबून आम्ही घराकडे धूम ठोकली. रात्रपाळीचा धोतर नेसलेला वॉचमन हातात कंदील घेऊन परत घरी जात होता हे सत्य फार काळ आमच्यापासून लपून राहिलं नाही. त्यानंतर दिवाळीच सुरु झाली आणि पळणं बारगळले. पहाटे नाही तरी दिवसभरात एकदा व्यायाम करायचाच असं ठरलं.
एकदा माईला आणि मला कोकणात काकांकडे रात्रीच्या एस. टी. ने पाठवावं असं ठरलं तेंव्हा आजीच्या भाषेत आम्ही 'मोठ्या' झालो होतो. रात्रभर गाडीनं प्रवास करून पहाटेच कणकवलीस उतरलो आणी पुढची आचर्याची एस. टी पकडली. आता अडीच तास छान झोपता येणार होतं. वाटेत उखडलेल्या रस्त्यामुळे जाग आली. अंधारात खिडकीबाहेर लक्ष गेलं. गाडीच्या हेलकाव्यासरशी एक जाडजूड साप खिडकीवर शेपटीचा फटका देवून पुन्हा वर जात होता. माझी भीतीनं गाळण उडाली पण काच बंद होती म्हणून डोळे गच्च मिटून बसून राहिले. थोड्याच वेळानं बसवर सामान बांधायचा तो सापासारखा दोर आणखी खाली आला आणि माझा गैरसमज दूर झाला. उजेड असता तर असं झालं असतं काय मंडळी? अश्याप्रकारे पहाटेच्या अंधाराशी माझं सूत काही जमत नव्हतं. काकांकडून परत येताना आमची कोल्हापूर गाडी होती आणी तेथून खासगी बसने पुणं गाठायचं होतं. झोपेत माईचं डोकं काचेवर टण् टण् आपटतं म्हणून नेहमी मलाच खिडकीची जागा मिळते. यावेळीही मनाचा मोठेपणा दाखवून मी खिडकीशेजारी बसले. रात्रीची छान झोप लागली. पहाटेचे चारेक वाजले असतील, अर्धवट जागी होऊन बघते तर अगदी आठदहा फुटांवर एक उदास चेहेरा हवेत तरंगताना दिसला आणि मी खाडकन् जागी झाले. चहासाठी चालकसाहेब ढाब्यावर थांबले होते. शेजारी विरुद्ध दिशेला जाणारी बस थांबली होती. एक झोपाळलेला मनुष्य त्याच्या खिडकीतून बाहेर एकटक पहात बसला होता. त्याच्या बसमधील दिवे लागल्यामुळे मला हे दृष्य दिसलं होतं. व्यायामानं मनाची शक्तीही वाढती......दिवसभरात कधीतरी व्यायाम करायलाच हवा.
तर्हेतर्हेचे आकार दिसणं बरोबर की चूक तेच कळेनासं झालं पण मी धीर सोडला नाही. सालाबादप्रमाणे शाळेची सुट्टी आली. पहाटे पळायला जायचं मनावर घेतलं तर यावेळी आज्जीनेच नापसंती दाखवली. मुलीच्या जातीला असं निर्मनुष्य रस्त्यावरून पहाटे पाठवणं तिला मान्य नव्हतं. "काऽऽऽही होत नाही, जाऊ दे तिला!" असं व्यायामप्रेमी बाबांचे म्हणणं पडल्यामुळे मी मैत्रिणींना घेऊन जायचं ठरवलं. मला कधी झाडांच्या पानांमधून भूत दिसत असे तर कधी दगडधोंड्यातून माणसाचा चेहरा! धीर देवून गीता आणि सविता कंटाळल्या. रस्त्यांवरच्या दिव्यांमुळे माझीच सावली भस्सकन् पायाखालून पुढे जायची आणि भीती दाखवायची. आमचं पळणं नेमाने अठवडाभर चालूच होतं. माझ्या शंका कुशंकाही चालूच असत. अश्या एका पहाटे नेहमीच्या गुलमोहरासमोरून जाताना मी एका माणसाची आकृती हवेत असल्याचे दोघींना दाखवलं तर पुन्हा मला वेड्यात काढून मार्गक्रमणा सुरु राहिली. घराजवळच्या मैदानाला दोन फेर्या मारून आम्ही परत येताना चांगलं उजाडत आलं होतं. रहदारी, लोकांच्या एकत्र जमून गप्पा सुरु होत्या. गुलमोहराशेजारून जाताना गर्दीतून आवाज कानावर पडला,"बॉडी खाली घेऊ, साहेब?" आम्ही क्षणभर गोठलो. तिथे आत्महत्या केल्यामुळे एका मनुष्याचा देह झाडाला लटकत होता. सविता आणि गीताने माझ्याकडे पाहिले आणि जी मॅरेथॉन सुरु झाली ते घरी येऊनच थांबलो. प्रसंग ऐकून घेतल्यावर आजीनं लगेच दृष्ट काढून टाकली आणि रामरक्षा पुटपुटत राहिली. "बास झाले ते व्यायम अन् फियाम! काय दिवे लावायचेत ते घरीच लावा." आज्जी रागावली होती. "पोरीच्या मनावर परिणाम झाला तर उद्या तिला कोण पत्करील?" हे वाक्य बाबांसाठी होतं. मग आम्ही पहाटेचा व्यायाम थांबवला आणि दिवसभरात कधीतरी नक्की करायचा असं ठरवून टाकलं.
रेवती
प्रतिक्रिया
19 Jan 2011 - 8:18 am | प्राजु
हेहेहे!! भारी आहे हा भास आणि आभासांचा खेळ.
मलाही लहानपणी असे वेगवेगळे आकार दिसायचे.. ! भिती वगैरे वाटली नाही कधी.. पण असे आकार मात्र दिसायचे.
19 Jan 2011 - 10:27 am | भीडस्त
कसला हसत होतो वाचताना..
19 Jan 2011 - 10:45 am | टारझन
अरे वा ? अरे वा ? एकंच नंबरी :) खरपुस लेख :)
19 Jan 2011 - 10:55 am | गवि
खूप आवडलं.
लहानपणीच काय, अजूनही असं होतं कधीकधी. भित्यापाठी ब्रम्हराक्षस.. :)
19 Jan 2011 - 11:08 am | नरेशकुमार
खुसखुशित लेख.......
मला अंधाराची खुप भ्या वाटते,
त्यामुळं मी रात्रिच्याला झोपतो.
19 Jan 2011 - 12:50 pm | स्पंदना
लय भारी!
उठुबिठु नका ह! अगदी गडद झोपायच काय?
19 Jan 2011 - 11:39 am | यशोधरा
लेख मस्त. मज्जा वाटत असताना शेवटाने घाबरवले खरंच :)
19 Jan 2011 - 12:22 pm | अनामिका
एकदम झक्कास!
काही वर्षापुर्वी आलेला वास्तुशास्त्र हा चित्रपट अहोशी पैज लावून घरात एकटीने बघितला......दुसर्या दिवशी सकाळी सहलीला जायचे म्हणून रात्रीच तयारी करुन ठेवली .......पहाटे ३ वाजता सगळ आटपण्यासाठी उठले असता अंधारात आणि अर्धवट झोपेत दिव्याची कळ काही सापड्ली नाही .बाहेरुन येणार्या उजेडात समोरचे दृष्य पाहून किंचाळलेच .थंडीतही घाम फुटला पाहिले काय तर..............
खुर्चीवर कुणी तरी पाय पसरुन बसलय आणि शेजारी पिवळा चेंडु पडलाय(पिवळा चेंडू चित्रपटात हवेतच उडतो असे दाखवले आहे)..झाल होत अस आमच्या ह्यांची जिन्स थोडी दमट होती म्हणून खुर्चीवर पसरवून वाळत घातली होती आणि त्यातच चिरंजीवांनी स्वतःचा चेंडू सकाळी घाईत राहून जायला नको म्हणून काढून ठेवला होता....अजुनही हा किस्सा आठवला की हसू येते...
शाळेत असताना भुगोलाच्या तासाला जे काही शिकवत त्याचीच स्वप्न पडत असत.मग अगदी पुर,ज्वालामुखी ,भुकंपापासुन सगळ्या आपदांमधे आपण सापडलोय अश्या प्रकारचे भास होत....
21 Jan 2011 - 4:16 am | निनाद मुक्काम प...
लेख एकदम खतरनाक आहे .
तसा मी निस्सीम हॉर्रोर शिणेमे पाहणारा आहे .
पण लंडनला आमच्या खोलीत हॉल मध्ये वास्तुशास्त्र हा शिणेमा पहिला. नि मग मित्र मैत्रिणी समवेत भुतांच्या गप्पागोष्टी सुरापान करत कधी तरी डोळा लागला नि सोफ्यावर आडवा झालो.
.अचानक पाहते समयी जाग आली .नि काळोखात हॉल मध्ये मी एकटाच...
हळूच जमिनीवरील पडलेल्या बाटल्या चुकवत खोली प्रकशित करण्यासाठी कळ शोधत होतो.
.तेवढ्यात जिन्यातून...
( होलला एक जिना होता तो पहिल्या माळ्यावर आमच्या ३ बेड रूम पाशी संपत होता जिथे आम्ही ४ मित्र आणि २ मैत्रिणी सगळे मुंबईकर राहत होतो .जो पर्यत आमच्या आयुष्यात आमचे कुटुंब आले नव्हते तो पर्यत )
एक सावली खाली आली.
नि कुजबुज कानी पडली मी जोरात ओरडलो .
मग सगळा कुटुंब कबिला जागा झाला .
ती आकृती आमचे मित्र निघाले व शाल अंगावर घेऊन साहेब भ्रमण ध्वनीवरून मायदेशातील प्रियतमेशी गुजगोष्टी करत होते
व तहान लागली म्हणून खाली आले .कारण खाली हॉल ला लागून आमचे किचन होते
.(रात्रीचा कमीतकमी ३ ते ४ तास ह्यांचा चिवचिवाट चालायचा .बर गुगल /याहू /स्कैप हे मेसेंगर फुकटात असताना ह्यांना बिछान्यात भ्रमण ध्वनीतून प्रणय चेष्टा करायला आवडायचा .
परकीय चलनाचा अपव्यय दुसरे काय .)
माझा मात्र त्यादिवशी पार मोरू झाला .
19 Jan 2011 - 12:55 pm | स्पंदना
>>>मला साधं दात घासायलाही सुचायचं नाही
तसेही पहाटे उठून मला फारसे दिव्य अनुभव कधी आले नाहीत.
पहाटे नाही तरी दिवसभरात एकदा व्यायाम करायचाच असं ठरलं
......दिवसभरात कधीतरी व्यायाम करायलाच हवा>>
धन्य धन्य हो रेवती! काय छान लिहिलयस! एकुण आमचे धनी म्हणतात ते काही खोट नाही, 'मन मे एक तन मे दुजा'
शेवटचा प्रसंग मात्र घाबरवुन गेला हो!
19 Jan 2011 - 1:28 pm | मदनबाण
खी खी खी... :)
रेवती "आज्जी" एकदम टरकु होत्या तर !!! ;)
बाकी क्षणभर कॅथी आणि पॅमची आठवण आली (म्हणजे त्या लेखाची बरं )... ;)
19 Jan 2011 - 1:34 pm | स्पा
मस्त मस्त मस्त ................. :)
19 Jan 2011 - 3:16 pm | स्वाती दिनेश
रेवती, मस्त खुसखुशीत लेख.. आवडला!
स्वाती
19 Jan 2011 - 3:55 pm | RUPALI POYEKAR
हा खेळ सावल्यांचा
मस्तच लेख
19 Jan 2011 - 4:13 pm | मेघवेडा
रेवतीताई, मस्त खुसखुशीत लेख.. आवडला!
19 Jan 2011 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा
शेवट एकदम भारीच.
19 Jan 2011 - 4:17 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा
शेवट एकदम भारीच.
19 Jan 2011 - 4:34 pm | असुर
ये ब्बात! मस्त लेख!
आणि लिहायची ष्टाईल तर विशेषच, एकदम साखरफुटाणे हातावर ठेवून गोष्ट सांगणारी! :-)
लेख आवडला हे वेगळं काय सांगायचं??
--असुर
19 Jan 2011 - 5:34 pm | प्राजक्ता पवार
मस्तं लिहलंय. मजा आली वाचतांना .
19 Jan 2011 - 5:34 pm | आत्मशून्य
अर्पणओळ तर मस्तच.
19 Jan 2011 - 7:42 pm | मराठे
मस्तच!
19 Jan 2011 - 7:48 pm | बिपिन कार्यकर्ते
रेवती घाबरली! घाबरली!! आम्हाला मात्र मज्जा आली वाचायला!
19 Jan 2011 - 8:22 pm | सुबक ठेंगणी
मस्त लिहिलं आहेस :)
हे विशेष भावलं.
19 Jan 2011 - 8:24 pm | शुचि
लेख मस्त! पण तो शेवट लै वंगाळ :( म्या लै घाबरली
19 Jan 2011 - 9:08 pm | पैसा
लांडगा आला रे आला म्हणता म्हणता....!
मस्त लेख. सकाळी उठून व्यायाम करणे ही किती "हवी हवीशी" गोष्ट आहे, हे पुन्हा एकदा कळलं!
20 Jan 2011 - 5:16 am | चित्रा
मस्त आहे लेख.
पोरीच्या मनावर परिणाम झाला तर उद्या तिला कोण पत्करील?
हा सावधपणा म्हणून ठीक आहे ;) पर हर एक हंसा के लिये एक प्रफुल होता है!
20 Jan 2011 - 9:00 am | नगरीनिरंजन
मस्त लेख. भास-आभासांचे किस्से आणि भास खरा ठरल्यावर उडालेली घाबरगुंडी ताज्या टवटवीत भाषेत लिहीली आहे.
पहाटेशी वाकडं असलेल्या लोकांमध्ये मीही असल्याने पहाटेच्या अनुभवांवरच्या टिप्पणीशी अत्यंत सहमत.
20 Jan 2011 - 7:25 pm | रेवती
मंडळी, आता म्हणावं तेवढं पहाटेशी वाकडं नाहीये.
सकाळी लवकर उठते आणि बर्यापैकी नियमितपणे व्यायामही करते.
आपल्या प्रतिसादांबद्दल आभार!
सर्वांना नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावो ही सदिच्छा!
(ज्यांनी प्रतिसाद देण्यास टाळाटाळ केलीये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!;))
20 Jan 2011 - 11:38 pm | मी-सौरभ
हा माझा प्रतिसाद बरं का :)
मस्त मस्त मस्त
आणि हो शतक पूर्ती साठी शुभेच्छा!!
22 Jan 2011 - 11:31 pm | रेवती
धन्यवाद!
शतक पूर्ती साठी शुभेच्छा
कुठली आलीये शतकपूर्ती.....आता मीही प्रतिसाद देताना कंजूसपणा केल्याशिवाय राहणार नाही.:(
23 Jan 2011 - 12:43 am | केशवसुमार
माझा प्रतिसाद..
ह्या वेळेस खरा खरा.. भास नाही..
(भासू)केशवसुमार
बाकी शतकाचे म्हणाल तर त्याला पाहिजेत जातीचे.. ते तुमच्या सारख्या यर्यागबाळ्याचे काम नाही..
बाकी चालू दे..
23 Jan 2011 - 1:36 pm | अवलिया
वाढदिवस नसतांना कशाला उगाच शुभेच्छा घ्यायच्या ! म्हणून प्रतिसाद.
मस्त लेखन. :)
24 Jan 2011 - 10:01 am | नाखु
गप्पांच्या फडातील आठवणी जागवणारा...
18 Mar 2011 - 2:16 am | इंटरनेटस्नेही
मस्तच! लेख अतिशय मनापासुन आवडला! रेवती ताईंनी अगदी चित्रदर्शी वर्णन केले आहे.. तर्हेतर्हेचे आकार पहाटेच्या वेळी किंवा रात्री दिसतात हे मात्र अगदीच खोटे नाही. कदाचित लहानपणी आपण जास्त संवेदनशील असतो म्हणुन असेल, त्या वेगवेगळ्या डिसाईन्समध्ये आपल्याला निरनिराळे भास होतात.
-
इंट्या.
18 Mar 2011 - 8:15 am | गणेशा
झकास लेख .. आवडला
18 Mar 2011 - 9:16 am | राजेश घासकडवी
हलकाफुलका, खुसखुशीत. शेवट मस्त. कधी भासांचा त्रास तर कधी सत्याचा...
19 Mar 2011 - 2:23 pm | पर्नल नेने मराठे
मला सकाळी मुद्दाम कोणी उठ म्हटले तर उठवत नाही .
पण जाग आलीच तर मला आवडते बाहेरचा निसर्ग पहायला.
अंधाराची भिती वैगरे कधिच वाटत नाही.
एकदा नवर्याचा जवळचा मित्र अकाली निधन पावला. त्यावेळी आम्ही गिरगावात होतो. पहाटे ह्याला विधीला जायचे होते.
तर हा मला म्हणाला मी आतुन येइपर्यन्त तु बाहेर मला सोबत म्हणुन उभी रहा =)) =)) म्हणे मला भिति वाटतेय.
मी म्हटले भिती कसली तो मित्र काही वरुन खाली येणार नाहिये. पण त्यावेळी ह्याची मनस्थितीच निट नव्हती हेच खरे :(
एकदा कोकणातुन येताना मी दादरला रात्री १२ ला उतरले. चर्नीरोड पर्यन्त येतायेता पाउण वाजला. हा घरी ढाराढुर होता. मला येताना भिती वाटत होती ति भुतांची नव्हे पण माणसांची. :(