"भुताखेतांच्या गोष्टी ? नाय रे बाबांनो ! आमच्या गावात अशा भुताखेतांच्या गोष्टी नाहीत. नाही म्हणायला जनू जगदाळेचा अजब किस्सा मात्र आहे." आजोबा सांगत होते. कॉलेजात शिकणारी आणि मोठ्या शहरात राहणारी त्यांची नातवंड त्याच्या आजूबाजूला बसलेली होती. आजोबांच्या तोंडून गोष्ट ऐकण्यासाठी वयाची अट लागू होत नसते.
"खरंच ऐकायची आहे त्याची गोष्ट? खरं म्हणजे मी तुम्हाला (तुम्हालाच काय, कोणालाही) सांगता कामा नये! पण तुमची इच्छाच असेल तर ठिक आहे. पण शांतपणे ऐकायची हां! उगाच मधे मधे प्रश्न विचारायचे नाहीत ! कबूल? "
आजोबा तो प्रसंग आठवू लागले. इतक्या वर्षापूर्वीचा तो प्रसंग अगदी डोळ्यासमोर घडू लागला होता.
जनू जगदाळेबद्धल काय सांगायचं? खर्या अर्थाने कोणाच्या अध्यात न मध्यात. म्हणजे एकूणच निरुपद्रवी आणि निर्गुण. कधी कोणी काम सांगितलं तर करेल पण तेवढ्यापुरतंच. फार मोठं जवाबदारीचं काम लोकांनीही त्याला कधी दिलं नाही आणि मला काम द्या म्हणायला जनूसुद्धा कोणाकडे गेला नाही. सगळ्याप्रकारची कामं तो करायचा पण तरीही कुठल्याच कामामधे तो पारंगत नव्हता. त्यामुळे सगळ्या गावाचा तो हरकाम्या झाला होता. 'एक ना धड भाराभर चिंध्या' म्हणतात ना, तस्साच... चिंधीसारखा! पण ह्या त्याच्या परिस्थितीला तो स्वतःच जवाबदार होता. गावातल्या जवळ जवळ सगळ्या दुकानदारांकडे त्याने काम केलं होतं, अगदी वाण्यापासून ते कोपर्यावरच्या म्याकानिक पर्यंत! पण कुठेही एक दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस टिकला नाही. काही लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.. पण त्याचं ठरलेलं उत्तर होतं! "कामात मन लागत नाही भाउ!" मग लोकांनीही त्याला समजावण्याचं सोडून दिलं!
तो लहान होता तोपर्यंत त्याचं हे असं जीणं ठिक होतं. पण तो मोठा झाल्यावर मात्र त्याला कोणी जवळ करेनासं झालं. आणि मग एके दिवस तो कोणालाही न सांगता गाव सोडून निघून गेला. कधी गेला कुठे गेला कुणास ठाउक! कदाचीत त्याच्यावर प्रेम करणार्या त्याच्या म्हातार्या मावशीला माहित असेल... अर्थात तिच्याजवळ त्याची चौकशी करण्याचं गावकर्यांना काहीच कारण नव्हतं. लोकांना वाटलं की काही दिवस गेले की आपसूकच परत येइल. कोण त्याला दारात उभं करणार आहे?
तर असो, त्याला जाउन चांगली सहा... सहा की सात? वर्ष झाली. नक्की किती ते आठवत नाही. कोणी सांगू शकेल असं वाटतही नाही आता...खूपच वर्षं झाली त्या गोष्टीला. मीच तेव्हा वीस बावीसचा होतो. हं तर काय सांगत होतो? हां! तर जनू परत आला. आणि जनू चांगलाच बदललेला होता. म्हणजे तो बदलेला असेल हे सगळ्यांनाच माहित होतं पण तो बदल असा असेल हे कोणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं. तो खूपच प्रसन्न, आकर्षक आणि उत्साही झाला होता. त्याच्या चेहर्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. चालण्यात, बोलण्यात, वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आला होता. लोकांना आता तो हवाहवासा वाटत होता. त्याला समजावणारे लोक आता त्याच्यातल्या बदलाबद्धल त्याला विचारू लागले होते.
"जन्या ! लेका काय मोठी लाटरी लागली का काय तुला आं? अरे सांग तरी मर्दा!"
उत्तरा दाखल जनूने त्यांना एक कुंचला दाखवला. "आयला ! जन्या चित्रकार कधीपास्नं झाला ?" सगळ्यांना आश्चर्य वाटलं! आणि ह्या कुंचल्याचा आणि त्याच्यामधल्या फरकाचा काय संबंध ? लोकांच्या चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून जनूने न बोलता एक कागद हातात घेतला. आणि त्यावरून त्याचा कुंचला फिरवला! ना कुठला रंग ना काही. पण एखाद्या पेन्सिलीप्रमाणे त्या कुचंल्यामधून एक काळी रेघ कागदावर उमटायला लागली. त्याने कागदावर एक गोल काढला. खरंतर तो फार चांगला गोल आकार पण नव्हता. मग तो नीट दिसावा म्हणून त्याने तो कागद उचलून घेतला. आणि त्याबरोबर तो गोल एकदम धप्पकन् कागदाच्या खालच्या कडेला जाउन आपटला ! एखाद्या दगडा सारखा !! त्याने तो कागद एका बाजूने वर केला त्याबरोबर तो दगड गडगडत कागदाच्या एका कोपर्यात जाउ लागला. तो दगड कागद सोडून खाली पडला नाही! त्या दगडाचं विश्व त्या कागदापुरतंच होतं ! एखाद्या सिनेमाथेटरामधे चित्र जसं पडद्यावर दिसतं तसाच तो प्रकार होता. जनूने तो कागद इतर मंडळींच्या हातात दिला, त्यांनीसुद्धा कागद हलवून तो दगड कसा गडगडतो ते पाहिलं. एकाने त्या दगडाला, म्हणजे त्या आकृतीला, हात लावायचा प्रयत्न केला, तर तो कागदावरच्या कुठल्याही चित्रासारखाच होता. सगळे लोक डोळे फाडफाडून त्या कागदाकडे आणि त्यावरच्या दगडाच्या चित्राकडे बघत उभे राहिले !
(क्रमश:)
प्रतिक्रिया
4 Jan 2011 - 7:38 am | घाशीराम कोतवाल १.२
आयला वाचायला सुरुवात केली तर लगेच क्रमशः
न्हाई भो भाग जरा लांबलचक टंका आणि हो
कथेची सुरुवात उत्कंठावर्धक झाली आहे लवकर लिहा पुढल्ला भाग........
4 Jan 2011 - 10:21 am | नावातकायआहे
काय राव...
त्यापेक्शा नुसत (क्रमश:) लिहल आस्त तरी चालल आसत
4 Jan 2011 - 11:25 am | मुलूखावेगळी
छान लिहील आहे
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
4 Jan 2011 - 11:43 am | यशोधरा
मस्त! येऊदेत पुढचा भाग पटापट!
4 Jan 2011 - 6:50 pm | आत्मशून्य
लेख थोडासा मोठा कराच.
4 Jan 2011 - 8:08 pm | धमाल मुलगा
ही काय जादू ब्वॉ?
पुढच्या भागाची वाट बघतोय हो मराठेकाका :)
4 Jan 2011 - 8:44 pm | डावखुरा
मराठेकाका मस्त..
पण जपुलेशु.
4 Jan 2011 - 11:13 pm | बिपिन कार्यकर्ते
जबरी!!!
वाट बघतोय!
5 Jan 2011 - 2:53 am | सविता
अहो टाका की पुढचा भाग पटकन!!!
5 Jan 2011 - 4:11 am | मराठे
टाकलाय की!
इथे वाचा!
22 Jul 2011 - 2:40 pm | दीप्स
अहो आत्ता कुठे वाचण्यात रंग चढू लागला आणि तुम्ही लगेच कर्मश: अलाहो !! अहो पुढचा लेख लवकर येउदेत कारण आता पुढे काय झहले हे जाणून घेयाची उस्तुकात लागून राहिली आहे.