एखाद्या सिनेमाथेटरामधे चित्र जसं पडद्यावर दिसतं तसाच तो प्रकार होता. जनूने तो कागद इतर मंडळींच्या हातात दिला, त्यांनीसुद्धा कागद हलवून तो दगड कसा गडगडतो ते पाहिलं. एकाने त्या दगडाला, म्हणजे त्या आकृतीला, हात लावायचा प्रयत्न केला, तर तो कागदावरच्या कुठल्याही चित्रासारखाच होता. सगळे लोक डोळे फाडफाडून त्या कागदाकडे आणि त्यावरच्या दगडाच्या चित्राकडे बघत उभे राहिले !
पोरांनो! मला माहितेय की तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटत असेल की म्हातार्याचं डोकं फिरलंय ! जर तुम्हाला हे खूळ वाटत असेल तर तुमच्यावर ऐकण्याचीही सक्ती नाही. मी तुम्हाला मी स्वतःच्या डोळ्याने काय पाहिलाय तेच सांगतोय. ह्या प्रकारावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न खूप झाले. पण झाल्याप्रकाराचा मीच एकटा साक्षिदार उरलो आहे. मी स्वतः तो कागद हातात घेउन पाहिला होता. आमच्या सर्वांची तर बोबडीच वळली होती. त्या कागदावर मग जनूने दोन माणसांचे आकार काढले, अगदी लहान मुलं माणसांची चित्र काढतात ना तसे! आणि आमच्या सर्वांदेखत त्या आकारातून उमटणार्या माणसांनी तो दगड हलवायला सुरवात केली. आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! एकाने जनूला त्या जादूच्या कुंचल्याबद्धल विचारलं तर तो म्हणाला की कुठल्याश्या साधूने त्याच्यावर खूश होउन त्याला तो कुंचला बक्षिस दिला होता. "महाराज म्हणाले, ह्याचा उपयोग करून तू गावात एक चांगलं आयुष्य जगू शकशील !" हे सांगताना त्याने आमच्याकडे पाहण्याचं टाळलं. पण आम्ही त्याला जास्त खोलात जाउन विचारलं नाही. आमच्या दृष्टीने तो कुंचला त्याला कसा मिळाला यापेक्षा तो कुंचला काय करू शकतो हे जास्त महत्वाचं होतं.
"मग आता काय करायचं ठरवलं आहेस?" एकाने व्यावहारिक मुद्दा काढला. "ह्या कुंचल्याचा उपयोग करून मी जादूचे प्रयोग करणार आहे" जनू म्हणाला. "'थोडे फार पैसे तरी मिळतील!" "पण ह्यात काही धोका तर नाहि ना? हा कसला तरी भुताटकीचा प्रकार तर नाही ना किंवा चेटुक वगैरे? " कुणीतरी शंका काढली "नाही नाही, कसलाच धोका नाही, मी काढलेल्या आकृती ह्या फक्त त्या कागदापुरत्याच हालचाल करू शकतात. तेच त्यांचं जग, त्याच्या बाहेर त्या आकृत्या येउ शकत नाहीत. ही जादूच आहे पण हातचलाखी नाही. काळी जादू, चेटुक तर नक्किच नाही." त्याने आम्हाला आश्वासन दिलं. आम्हाला त्या प्रकारात आता जास्त रस वाटू लागला. त्यावेळेला आम्ही सगळेच तरूण होतो. काहीतरी नवीन करायचं ते वयच होतं. आज वाटतं, जर पुढे नशिबात वाढुन ठेवलेलं त्या वेळेला कळलं असतं तर वेळीच जनूला ह्या अघोरी प्रकारापासनं वाचवता आलं असतं ! असो, त्यावेळी आम्हाला ती कल्पना अतिशय आवडली होती. आम्ही सर्वांनी त्याला मदत करण्याचं ठरवलं. त्यानेही त्याच्या प्रयोगासाठी तयारी करायला सुरुवात केली.
लवकरच त्याने त्याच्या जादूच्या प्रयोगाची जाहिरात करण्यासाठी हँडबिलं छापून घेतली. तुमच्या शहरांमध्ये जाहिराती टि.व्ही. आणि रेडियोवर करतात. पण ह्या छोट्या गावात अजूनही हँडबिलं छापून जाहिराती होतात. आणि इतर काही वाचायला नसल्यामुळे लोकं हँडबिलं सुद्धा वाचतात. अर्थात त्या हँडबिलांवरसुद्धा जनूने एक छोट्या विदुषकाचं चित्र काढलं होतं, तो विदुषक पाहून बर्याच लोकांना हा जादूचा प्रयोग बघायची इच्छा झाली. जनूने एक छोट्या तंबूमधे त्याचा प्रयोग सुरू केला. कागदाऐवजी एका भिंतीवर चुना मारून त्याचा उपयोग तो त्याच्या चित्रांसाठी करणार होता. पहिल्या प्रयोगासाठी चांगली पन्नास्-साठ तिकिटं विकली गेली होती. आमच्या गावाच्या मानाने पहिल्या दिवशी पन्नास्-साठ ..कदाचीत जास्तच पण कमी नाहीत... म्हणजे चांगलीच गर्दी जमली होती. पहिल्याच प्रयोगात त्याने भिंतीवर सात आठ माणसांच्या आकृत्या काढल्या. त्या आकृत्या मग भिंतीवरच हलू लागल्या, एखाद्या सिनेमा सारखे त्या भिंतीवर वेगवेगळे प्रसंग उमटू लागले. अगदी मारामारीपासून ते दहिहंडी पर्यंत! जनू भान हरपून चित्र काढत होता आणि लोक त्या भिंतीवरल्या हलत्या चित्रांकडे तहान भूक विसरून पाहात होते. पुढे पुढे लोक सांगतील ते प्रसंग तो भिंतीवर काढू लागला. त्याच्या कुंचल्यातून उमटणारी माणसं, नद्या, पक्षी, प्राणी ते प्रसंग जिवंत करत होती.
जनूचे प्रयोग भलतेच यशस्वी होउ लागले. प्रेक्षकांमधलं कोणीतरी ओरडून त्याला एखादा सिनेमातला किंवा नाटकातला प्रसंग सांगत, कधी कधी अगदी रामायण महाभारतातला सुद्धा! जनूचा कुंचला झटक्यात भिंतीवरून फिरून त्या प्रसंगाची पात्रं आणि इमारती, वस्तू, प्राणी काढू लागे. आता जनूची चित्रकलाही बर्यापैकी सुधारली होती. त्यामुळे माणसांचे, प्राण्याचे आकार बरेच जमू लागले होते. त्याच्या कुंचल्यातून उमटणार्या आकृती कुठलाही प्रसंग झटक्यात साकार करून दाखवत, कधी कधी तर त्या प्रसंगामधे स्वत:चे बदल पण करून आणत. जणूकाही त्या आ़कृत्यांना स्वत:चं व्यक्तीमत्व होतं. त्यामुळे लोकांची उत्कंठा आणखीनच वाढत होती. मला आठवतं, जनू अगदी पटापट चित्र काढायचा त्यामुळे चित्रांना त्यांची करामत करण्यासाठी जास्त वेळ मिळेत असे. जनू एखादा प्रसंग काढताना फक्त त्यातील माणसंच नव्हे तर आजूबाजूची झाडं, राजवाडे, घरं सुद्धा काढायचा. त्यामुळे एखादा राजपुत्र उंच मनोर्यात राहणार्या राजकन्येला सोडवतानाचा प्रसंग पाहताना प्रेक्षकांना तो मनोरा आतूनही दिसत असे. राजपुत्र मनोर्यातल्या राक्षसाबरोबर लढाई करून राजकन्येला घेउन उडणार्या घोड्यावर बसून दूर आपल्या राज्यात निघून जातो. प्रेक्षक अगदी तल्लीन होउन जात असत. कुठलाही आवाज किंवा पार्श्वसंगित नसून, जनूची चित्रं सुद्धा अगदी खरीखुरी वाटत नसली तरी त्याचे प्रयोग लोकांना जास्त आवडत होते. अर्थात जनूच्या प्रयोगांचं नाविन्य म्हणजे भिंतींवर आपोआप उमटणारी आणि हलणारी चित्र होती. एखादा प्रसंग संपल्यावर त्यातील माणसांची आणि प्राण्यांची चित्र भिंतीच्या टोकाकडे जात व दिसेनाशी होत. किंवा मग जनू त्यावर पांढर्या रंगाचं पाणी ओतून टाकत असे. अशा प्रकारे ती भिंत पुन्हा दुसर्या प्रयोगासाठी सज्ज होत असे.
जनू आता बर्यापैकी पैसा मिळवू लागला होता. आताशा त्याच्या वाईट सवयी पण वाढायला लागल्या होत्या. जेव्हा तो गावात आला होता तेव्हा अगदी छान उमदा, तेजःपुंज असा वाटायचा. पण पैसा हाताशी आल्यासरशी आता तो बायांवर आणि बाटल्यांवर उधळायला लागला होता. अजूनही त्याच्यात खूप उत्साह होताच, आणि दिवसेंदिवस त्याला मिळणार्या यशामुळे त्याचा उत्साह वाढतच होता. हे यश त्याच्या डोक्यात जाउ लागलं होतं. हळूहळू तो जास्त मग्रूर, बेदरकार होत होता. त्याचाच परिणाम म्हणून की काय, आजकाल त्याच्या प्रयोगांमध्ये मारामारीचे किंवा युद्धाचे प्रसंग वाढायला लागले होते. त्याच्या तब्येतीवर सुद्धा थोडा फार परिणाम झाल्यासारखा वाटत होता. त्याचे डोळे बरेचदा लालसर असत. ते रात्रभर झालेल्या जागरणामुळे होते की दारू जास्त झाल्यामुळे होते हे सांगणं अवघड होतं. आता त्याच्या बरोबर नेहमी वावरणारा आम्हा मित्रांचा घोळका त्याच्यापासून जरा दूरच राहू लागला. त्याची थोडीशी भीतीच आमच्या मनात बसली होती.
जवळ जवळ दोन महिने असेच गेले. जनूचा प्रेक्षकवर्ग आता खूपच वाढला होता. आमच्या गावातच नव्हे तर आजूबाजूच्या गावातूनसुद्धा लोक त्याचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी करू लागले होते. त्याने सुद्धा आता मोठ्या तंबूत प्रयोग करायला सुरूवात केली होती. आता त्याच्या प्रयोगामधे तो बरेच नविन प्रकार करत होता. एखादा प्रसंग पूर्ण व्हायच्या आधीच दुसर्या प्रसंगाची चित्र काढत होता, त्यामुळे एका प्रसंगातील पात्र दुसर्या प्रसंगातील पात्रांबरोबर वावरायची. जणू राम आणि लक्ष्मण मिळून कौरवांशी लढताहेत आणि अर्जून औरंगजेबावर चालून जातो आहे ! लोकांना त्याचीही गंमत वाटत होती. त्याची पात्र आता जास्त क्रूर आक्रमक होत होती. त्याच्या कल्पनांना नविन पंख फुटत होते. कधी कधी तर तो आम्ही न बघितलेले प्रसंग जसे यंत्रमानवांची युद्ध वगैरे सुद्धा काढत असे. त्याचे यंत्रमानव, किंवा राक्षस म्हणूया हवं तर, खूपच हिंस्त्र वागत ! त्याच्याबद्धल जर कधी त्याला विचारलंच तर "अरे हेच लोकांना आवडतं!" असं म्हणून आम्हाला वाटेला लावत होता.
मघाशी म्हटल्याप्रमाणे जनूचा जास्त वेळ बायकांच्या आणि दारूच्या सहवासात जात होता. त्यातल्या काही बायकांच्या म्हणण्याप्रमाणे कधी कधी रात्री अपरात्री उठून जनू त्याच्या वहीत चित्र काढत बसालेला दिसायचा. ती चित्र कोणाची होती, कसली होती हे मात्र त्या बायकांपैकी कोणीच सांगू शकलं नाही. दारूच्या नादात जनूनं ती चित्र काढली असावीत असं त्यांना वाटलं. ह्या दारूपायीच पुढचं अरिष्ट घडलं.
त्या रात्री त्याचा प्रयोग होता. नेहमी प्रमाणेच हाउसफुल्ल! तुडूंब गर्दी. पडदा वर केला आणि जनू प्रेक्षकांपुढे उभा राहिला. त्याच्या झोकांड्या पाहून त्याच्या परिस्थितीची कल्पना लोकांना आलीच. मी दरवाज्यापाशी उभा होतो आणि तिथेही, जवळ जवळ दहा पंधरा फुटांवरूनही, मला त्याच्या तोंडाला मारणारा दारूचा घाण वास येत होता. त्याने नेहमीप्रमाणे त्याचा प्रयोग सुरू केला. नेहमीचे काही लोकप्रिय प्रसंग त्याने भिंतीवर चितारले. प्रेक्षक आनंदाने टाळ्या वाजवत त्या प्रसंगातील पात्रांकडे पाहात होते. मग नेहमीप्रमाणे त्याने प्रेक्षकांना त्यांची फर्माईश विचारली. कोणीतरी एक ओरडून म्हणाला "तुम्ही तुमचंच चित्र काढा ना? आत्ता जो प्रयोग चाललाय तोच प्रसंग काढा!". लगोलग जनूने त्याचा कुंचला खिशातून काढला आणि भिंतीवर रेषा उमटायला लागल्या.
त्या मोठ्या भिंतीवर त्याने त्याचं आणि पुढच्या प्रेक्षकांचं चित्र काढायला सुरवात केली. सर्वजण आतुरतेने पुढे काय होणार याची वाट पाहात होते. सर्वजण म्हणजे प्रेक्षकच नव्हे तर भिंतीवर आगोदर चितारलेली पात्र देखिल. राजपुत्र, राजकन्या, राक्षस, यंत्रमानव, वाघ, सिंह हे सुद्धा सगळेच थांबून त्याचं चित्र पूर्ण होण्याची वाट बघायला लागले होते. शेवटची रेष काढून होते न होते तोच जनूचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला. फार मोठी चूक केल्याचे भाव त्याच्या चेहर्यावर प्रगटले. घाई-घाईत तो पांढर्या रंगाचं पाणी भरलेली बादली शोधायला लागला. पण आज दारूच्या नशेत त्याने ती बादली ठेवलीच नव्हती. सगळ्याची नजर जनूच्या घामाने थबथबलेल्या चेहर्याकडे होती.
भिंतीवरच्या जनूच्या चित्राने त्याच्या खिशात हात घालून एक कुंचला बाहेर काढला. आम्ही सगळे बघत असतानाच त्याने एक दरवाजा चितारला. त्या दरवाज्याला लाथ मारून त्याने दरवाजा पूर्ण उघडला आणि दारातून चालत आमच्या देखत प्रेक्षकांच्या समोर स्टेजवर येउन उभा राहिला. त्याचं विश्व आता भिंतीपुरतं मर्यादीत नव्हतं.
नंतर तंबूत एकच गोंधळ उडाला. घाबरून ओरडत लोक सैरावैरा धावायला लागले. जनूच्या भिंतीवरची पात्र एक एक करून त्या दरवाज्यातून बाहेर पडत होती. आग ओकणारे राक्षस आणि यंत्रमानव, बंदूकी, तलवार चालवणारे सैनिक, हिंस्त्र जनावरं सगळे बाहेर पडत होते. भिंतीवर असणारेच नव्हे तर आजपर्यंत जनूने काढलेल्या जवळ जवळ सगळ्या आकृत्या भिंतीवरच्या दरवाज्यातून बाहेर पडत होत्या. मी बाहेरच्या बाहेरच पळ काढला. तो दिवस आठवला की आजही अंगावर सरसरून काटा उभा राहतो.
जनूच्या आकृत्या बाहेर येउन त्यांनी जनूलाच धरला होता. सगळ्या आकृत्यांनी त्याला घेरुन त्याच्यावर लाथा-बुक्क्यांचा पाउस पाडायला सुरवात केली. जनू पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. त्या आकृत्या जनूला अक्षरशः पायाला धरून खेचत भिंतीवरच्या दरवाज्याकडे खेचून घेउन जात होत्या. जनू जीवाच्या आकांताने किंचाळत होता.
त्या तंबूला अर्थातच आग लागली. त्यात किती लोकं मेले? जनूच्या चित्रांपैकी किती चित्र परत गेली आणि किती मागे राहिली? त्या जनूच्या स्वतःच्या चित्राचं काय झालं? नुसते प्रश्न. उत्तरं कोणाकडेच नव्हती. रात्रीच्या सुमारास कधितरी तालुक्याच्या गावातून पोलिस आणि इतर अधिकारी आले. त्यांनी पंचनामा वगैरे केला. दुसर्याच दिवशी मोठ्या शहरातून काही आणखी स्पेशल पोलीस आले. लोकांनी काय झालं ते त्यांना सांगितलं. पोलिसांनी सगळ्यांना झाल्या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याबद्धल धमकावलं. ज्यांनी विरोध केला त्या सर्वांना सरळ गाडीत घालून घेउन गेले. जनूच्या प्रयोगाची हँडबिलं आणि त्याचे इतर काही कागद त्यांनी ताब्यात घेतले. कोणीतरी विडी न विझवताच कचर्याच्या कुंडीत टाकली हे आगीचं कारण म्हणून पुढं करण्यात आलं.
दिवसा मागून दिवस गेले तसे लोकही गपचूप सगळं विसरून आपापल्या कामाला लागले. काही वर्षांनी जनू नावाचा कोणी त्या गावात होता हेही सगळे विसरले.
मी मात्र काही विसरलो नाही. उलट मला ह्या सगळ्या प्रकाराचा छडा लावायचा मी प्रयत्न केला. जनू त्याच्या कुंचल्याने साधी चित्र काढत नव्हता. चित्र कधी हलतात का? मग इतरांवर हल्ला करणं किंवा स्वतः प्रसंगामधे बदल करणं तर दूरच राहिलं. म्हणजे माझ्या मते, जनू खर्याखुर्या माणसांना एका समांतर विश्वातून ह्या जगात आणत होता. त्याला मिळालेली शक्ती ही खरोखरच अमानवी होती आणि कोणत्याही माणसाला ती सांभाळता आली नसती. दारूच्या नशेत त्याने एकच चूक केली आणि तीच त्याला फार महागात पडली.
पोलिसांनी जरी गावकर्यांना गप्प केलं असलं तरी त्यांनी दोन गोष्टींमधे दुर्लक्ष केलं. एक म्हणजे त्यांनी बरेच पुरावे नष्ट केले नाहीत. त्या तंबूचे अवशेष तसेच ठेवले होते. मी पुन्हा जाउन ते अवशेष पाहिले. तोपर्यंत त्या घटनेला बरेच महिने उलटले होते. जनू ज्यावर चित्र काढायचा ती भिंत सुद्धा पडली होती. त्या उद्ध्वस्त झालेल्या जागी, राखेत आणि धुळीत मला काहीतरी पडलेलं दिसलं. जवळ जाउन पाहिलं तर जनूचा हात त्या भिंतीतल्या दरवाज्यात अडकला होता. अगदी त्या दिवशी जसा होता तस्साच. अगदी राखेत माखलेला असला तरी मी नक्की सांगू शकतो की तो हात त्याचाच होता. त्याच्या हातात त्याच्या कुंचल्याचं मोडलेलं टोक शिल्लक होतं.
पोलिसांनी दुर्लक्ष केलेली दुसरी गोष्ट म्हणजे, मी म्हणालो त्याप्रमाणे जनूच्या सगळ्या आकृत्या काही परत गेल्या नाहीत. त्यापैकी किती पोलिसांना सापडल्या ते अर्थातच माहीत नाही. पण काही आकृत्या आजही ह्या आसपासच आहेत. माझी खात्री आहे. तिन्हीसांजा झाल्यावर कोणी कधीच गावाबाहेरच्या माळावर जात नाही. माळावरच्या पडक्या भिंतीवर ती विचित्र चित्र कसली आहेत तुम्ही विचारत होतात ना!
नाही, आमच्या गावात भुताखेतांच्या गोष्टी नाहीत.
(समाप्त)
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 12:02 am | आत्मशून्य
वीषेशतः त्या आगीच्या घटनेनंतरच्या प्रसंगामधे थोडी जास्त नाट्यमयता हवी होती.
5 Jan 2011 - 2:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही गोष्ट आवडली. मजा आली वाचायला.
ही गोष्ट संपली, पुढची कधी?
5 Jan 2011 - 4:59 am | Nile
गोष्ट आवडली. कल्पना सुंदरच. कथेबरोबरच कल्पनेला थोडे अजुन फुलवले असते तर धमाल आली असती. (म्हणजे जनूची गंमत फक्त एका पॅर्यात?)
5 Jan 2011 - 9:40 am | शिल्पा ब
एकदम वेगळी गोष्ट...आवडली.
5 Jan 2011 - 9:41 am | यशोधरा
मस्त गोष्ट. आवडली.
5 Jan 2011 - 10:11 am | मृत्युन्जय
आवडली कथा. फक्त एका भागातच टाकली असती तरी चालले असते.
5 Jan 2011 - 10:13 am | बिपिन कार्यकर्ते
आवडली. लिहित जा हो नियमितपणे.
5 Jan 2011 - 10:20 am | विजुभाऊ
अर्र गोष्ट संपली इतक्यात ! :(
मस्त उत्सुकता लागली होती.
अशीच एक कथा आहे नारायण धारपांची. त्यात एकाकडे एक पिशवी असते त्या पिशवीत एक वेगळे जग असते.
त्यातल्या एका स्त्री पात्राचे नाव होते कर्हाटटनीम्र . चंक्री नावाची एक खार आणि गुर्डुघा नावाचे एक गिधाड होते.
कथेचे नाव विसरलो. कोणाला आठवतय का?
5 Jan 2011 - 10:28 pm | सातबारा
चंकरी , शपल्या आणि गुरडुगा 'पिशवीतला खामरा' या गोष्टीतला, क्रटाटानिम्र ही न्यायमंदीर मधील.
5 Jan 2011 - 10:42 am | योगी९००
त्यातल्या एका स्त्री पात्राचे नाव होते कर्हाटटनीम्र . चंक्री नावाची एक खार आणि गुर्डुघा नावाचे एक गिधाड होते. कथेचे नाव विसरलो. कोणाला आठवतय का?
कथेचे नाव विसरलात पण त्यातल्या स्त्री पात्राचे आणि गिधाडाचे नाव नाही विसरलात...ही एक गंमतच आहे...
@मराठे
जनू जगदाळेची कथा मस्त मस्त मस्त....एक नवीन प्रकारची भयकथा वाटली.
शेवटी असे वाटत होते की पार्ट २ काढणार बहूतेक तुम्ही ...."त्याच्या हातात त्याच्या कुंचल्याचं मोडलेलं टोक शिल्लक होतं." मला वाटलं की तुम्ही असे लिहीताय की त्या हातात कुंचला तसाच होता आणि मी हळूच तो कुंचला माझ्या खिशात ठेवला...(म्हणजे वाचकांना कधीतरी पार्ट २ येणार याची उत्सुकता...)
वाचताना असेही एकदा वाटले की जनू परदेशातून जाऊन टॅब्लेट टच स्क्रिन संगणक घेऊन आला आणि सर्व गाववाल्याना त्यातले एक पेंटींगचे अॅप्लिकेशन दाखवून फसवत होता....पण तसे काही झाले नाही..
5 Jan 2011 - 11:17 pm | मराठे
मला ही कथा आयपॅड बघूनच सुचली.. मोअर स्पेसिफिकली सांगायचं तर हा विडियो बघून :)
5 Jan 2011 - 12:29 pm | मुलूखावेगळी
भन्नाट आहे गोष्ट
आवडली
5 Jan 2011 - 2:32 pm | डावखुरा
भन्नाट....अजुन यु द्या...
5 Jan 2011 - 6:59 pm | मराठे
सर्वांना धन्यवाद. कथा लिहिण्याचा माझा हा दुसराच प्रयत्न आहे. पहिला प्रयत्न जाम गंडला होता. ही कथा जरा बरी जमली आहे पण अजून चाचपडतोच आहे ह्याची जाणीव आहे.
सद्ध्या गूढकथांचं भूट मानगूटीवर बसलंय.. (त्यामुळे तसल्याच उपमा सुचताहेत).. :)
5 Jan 2011 - 7:15 pm | नगरीनिरंजन
कथा आवडली! तुमच्या कल्पना नावीन्यपूर्ण आहेत आणि उत्कंठा वाढवण्याची हातोटी पण आहे तुमच्याकडे. अजून लिहा.
5 Jan 2011 - 8:41 pm | प्राजु
कथा आवडली.
6 Jan 2011 - 5:35 am | प्रभो
गोष्ट आवडली.
3 Aug 2011 - 3:29 pm | दीप्स
छान आहे हि भयकथा !! मस्तच रंगली आहे . लिहित जा असेच छान लिहिता तुम्ही . येउद्या अशा नवनवीन भय कथा मज्जा आली वाचायला