भल्या पहाटेच तो जागा झाला आणि राहुटीबाहेर आला. भोईलोक त्याच्या चाहुलीने जागे झाले आणि गडबडीने कामाला लागले. सुर्योदय व्हायच्या सुमारास विष्णुदास जागा झाला आणि डुलत डुलत बाहेर आला, तोपर्यंत त्याने स्वत:ची ध्यानधारणा आटोपली होती. आज त्याला अतिशय हलकं आणि शरीरात अद्भुत शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटत होतं. विष्णुदासाबरोबर थोडासा फराळ करून तो पुढच्या प्रवासास सिद्ध झाला. विष्णुदासाचा मेण्यात बसण्याचा आग्रह निर्धारपूर्वक मोडून तो मेण्याच्या पुढे झपाझप चालू लागला. सकाळच्या थंड हवेत त्यांनी बरंच अंतर कापलं. पण हळूहळू सूर्य डोक्यावर येउन तळपायला लागला आणि पायाखालची चढणही आणखी तीव्र होऊ लागली. सकाळी जाणवलेली ती अनामिक शक्ती हळूहळू निघून जात आहे असं त्याला वाटू लागलं. भोईलोक इतकावेळ एका लयीत "हुम हुम" असं काहीसं उच्चारत चालत होते पण आता त्यांचीही लय बिघडू लागली होती आणि मध्येच नुस्तेच सुस्कारे ऐकू येत होते. अजून मध्यान्हीला अवकाश होता तरी ही परिस्थिती झालेली पाहून तो काळजीत पडला. रात्र होण्याआधीच मंदिरात पोचणं आवश्यक होतं. त्या दुर्गम मार्गावर रात्रीचा मुक्काम करणं अशक्य होतं आणि रात्री वादळ वगैरे झाल्यास मंदिरात पोचण्यापुर्वीच मृत्युने त्यांना गाठण्याची शक्यता होती. आता सगळीकडे बर्फाचं साम्राज्य चालू झालं होतं आणि चढण संपण्याचं नाव घेत नव्हती. उन्हाचा आणि बर्फावरून परावर्तित होणार्या प्रकाशाचा त्रास कमी होण्यासाठी तो डोळे बारीक करून चालत होता आणि हवेतील प्राणवायूचं प्रमाण कमी झाल्याने तोंडाने जोरजोरात श्वास घेत होता. प्रत्येक पाऊल टाकल्यावर त्याला धाप लागत होती आणि थंडगार हवेने त्याचे सांधे दुखू लागले होते. इतक्यात मागून गलका झाला म्हणून त्याने वळून पाहिले तर एक भोई जमिनीवर कोसळला होता आणि जीवाच्या आकांताने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होता. काही क्षणातच त्या भोयाचं तडफडणारं शरीर शांत झालं आणि बाकीचे भोई थिजल्यासारखे दगड होउन त्याच्याकडे पाहत उभे राहिले. हळूहळू भानावर येत त्यांनी मेणा खाली ठेवला आणि मेलेल्या भोयाभोवती उकिडवे बसून डोक्याला हात लावून जोरजोराने श्वास घेउ लागले. रडण्याइतकाही श्वास घेणं त्याना शक्य नव्हतं पण मृत्युची भीती त्यांच्या डोळ्यात साठलेली तेवढ्या अंतरावरुनही स्पष्ट दिसत होती. विष्णुदास खाली उतरला आणि भोयांची समजूत घालू लागला पण त्याच्याही डोळ्यात आता थोडी भीती साकार होउ लागली होती. कशीबशी त्यांची समजूत घातल्यावर आणि परत गेल्यावर दुप्पट बिदागी द्यायचं वचन दिल्यावर ते ईमानी भोई पुढे चालण्यास तयार झाले. त्या निमित्ताने थोडी विश्रांती मिळाल्याने तो थोडा हुशारला होता. पुन्हा वळून तो सर्व शक्ती एकवटून पुढे चालू लागला. विश्रांतीने आलेली हुशारी पाच-दहा पावलांतच संपली आणि पुन्हा प्रत्येक पाऊल टाकताना त्याला प्रचंड धाप लागू लागली.
थांबत थांबत एक एक पाऊल मोठ्या मुष्कीलीने चालत त्याने एका उंच सरळसोट आकाशात घुसलेल्या कड्याला वळसा घातला आणि समोरचं दृश्य पाहून जागीच रुतल्यासारखा उभा राहिला. आता तो पर्वताच्या दुसऱ्या बाजूकडे पाहत होता. समोर खूप अंतरावर आणखी एक पर्वत होता आणि त्या दोन पर्वतांच्यामध्ये सरळ खाली खोल जाणारी दरी. तो उभा असलेल्या पर्वताचा एक लांब त्रिकोणी सुळका त्या दरीवर झेपावला होता, जणू काही या पर्वताने त्या पर्वताला स्पर्श करण्याच्या प्रयत्नात हात लांबवला होता. आणि त्या सुळक्याच्या दरीत तरंगणाऱ्या टोकावर ते होतं. ओबड धोबड, चपट्या दगडांनी रचून बनवलेलं उंच मंदीर. एकाचवेळी अतीव आनंद आणि प्राणांतिक भीती यांचं मिश्रण त्याच्या मनात कालवलं जाउ लागलं आणि तो थरथरत तसाच उभा राहिला. भोईलोक आणि विष्णुदास त्याच्या बाजूला येउन उभे राहिले हे कळायला त्याला बराच वेळ लागला. हळूहळू त्याने स्वत:ला सावरलं आणि मग तो विश्रांतीसाठी खाली बसला. विष्णुदास आणि त्याचे भोई भानावर आल्यावर त्यांनी थोडंसं खाउन घेतलं. सूर्य नुकताच मध्यान्हीवरून ढळला होता. थोडं बरं वाटल्यावर सगळे निघाले. मंदीर समोर दिसत असल्याने सगळ्यांचाच उत्साह दुणावला होता. आणखी एक प्रहरभर चालून ते त्या सुळक्याच्या सुरुवातीस पोचले. सुळका चांगलाच रुंद होता. एकाचवेळी दहा-पंधरा बैलगाड्या जातील एवढा. पण सुळक्यावरून वारा इतक्या वेगाने वाहत होता की एखाद्या नदीचा प्रपात उंचावरून खोल डोहात कोसळल्यासारखा प्रचंड ध्वनी निर्माण होत होता. जीव मुठीत धरून ते सगळे मंदीराकडे निघाले. वाऱ्याने झोकांड्या जाउ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत, केवळ मंदीरावर नजर ठेवून दरी कडे न पाहण्याचा प्रयत्न करीत ते कसेबसे मंदीराच्या दारात पोचले. मंदीर भव्य वगैरे अजिबात नव्हतं पण लांबून वाटलं त्यापेक्षा नक्कीच मोठं वाटत होतं. मंदीराचा दरवाजा लाकडी होता. लाकूड सागवानासारखं जड नसून देवदाराचं हलकं असावं असं वाटत होतं. दारावर कसलीही कलाकुसर नव्हती. उत्सुकतेनं थरथर कापत त्याने दरवाजा ढकलला. दरवाजा अगदी सहज ढकलला गेला आणि एकदम सताड उघडला. आतलं मात्र काहीच दिसू नये एवढा आतमध्ये ठार अंधार होता. दबकत दबकत त्यानं आत पाऊल टाकलं. बराचवेळ उभा राहिल्यावर त्याला हळूहळू अंधाराची सवय झाली आणि अंधुक दिसू लागलं. मंदीर चौकोनी होतं आणि मध्ये धुनीसारखा एक छोटा चौकोन दिसत होता. पलीकडे दरवाजाच्या विरुद्ध बाजूला एक बंद खिडकी दिसत होती. त्याने पुढे जाउन खिडकी उघडली. अर्धापुरुष उंचीची ती खिडकी उघडताच सूर्यप्रकाश आत आला आणि मंदीर बर्यापैकी उजळून निघालं. अतीव उत्सुकतेनं तो घाईघाईने वळाला आणि इकडे तिकडे मान हलवून मंदिराचं निरीक्षण करू लागला. चपटे दगड रचून बनवल्याने मंदिराच्या भिंती आतूनही खडबडीत होत्या आणि त्यावर काही लिहिता येणं शक्य नव्हतं. जमीनही थोडीफार ओबडधोबड होती आणि त्यावरही काही चिन्ह नव्हती. खूप बारकाईने सगळीकडे पाहून झाल्यावर त्याचा चेहरा काळवंडला. विष्णुदासही दरवाजापासून थोडा आत येउन हतबुद्धपणे कमरेवर हात ठेवून उभा होता. भोई दारात उभे राहून आळीपाळीने त्यांच्याकडे आणि एकमेकांकडे पाहत उभे होते. यासाठी एवढा जीव धोक्यात घालायची काय गरज होती असे भाव त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते.
त्याला त्याच्या पायांतलं त्राण गेल्यासारखं वाटलं आणि तो गुडघ्यांवर कोसळला. पंचवीस वर्षांची त्याची तपश्चर्या फुकट गेली होती.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 8:51 am | नगरीनिरंजन
शाश्वत - ३