पॅट टिलमन : एक शोकांतिका भाग २

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
6 Nov 2010 - 4:14 am

भाग १ इथे आहे
पॅटचा धाकटा भाऊ केविन टिलमन हाही पॅटप्रमाणे उत्तम खेळाडू. पॅट आणि केविन ह्या दोघांनी ९/११ च्या हल्ल्यानंतर विचारविनिमय करुन एकसाथ सैन्यात दाखल व्हायचा निर्णय घेतला. दोघेही रेंजर म्हणूनच सैन्यात रुजू झाले. रेंजर हे अगदी थेट हातघाईच्या लढाईत भाग घेणारे लोक. अगदी जीवावरचे काम.

तर २२ एप्रिल २००४ ला दिवसा, अफगाणिस्तानमधे, पाकिस्तानच्या सीमेलगत पॅट टिलमन आणि त्याचा भाऊ केविन हे एका मोहिमेवर होते. जीप बंद पडल्यामुळे एका जवळच्या लहानशा खेड्याजवळ थांबून ते लोक वरिष्टांना पुढच्या हालचालींबद्दल विचारत होते. ही जीप विमान वा हेलिकॉप्टरने उचलून हलवता येईल का अशीही विचारणा झाली पण ती सोय होऊ शकली नाही. ह्या तुकडीच्या म्होरक्याला टेन्शन येऊ लागले. त्या खेड्याजवळ जवळपास ६ तास वाया गेले. दोन धोके होते. एक म्हणजे वेळ जाणे आणि दुसरे शत्रूला त्यांचा ठावठिकाणा माहित होणे. असल्या मोहिमेत वेगवान हालचाली, शत्रूला थांगपत्ता लागू न देणे हे अत्यंत आवश्यक असते. शेवटी ह्या गटाला दोन तुकड्यात विभागले. एकात पॅट होता तर दुसर्‍यात केविन. मूळ तुकडीच्या म्होरक्याला हे आजिबात पसंत नव्हते. त्या गटाकडे एकच मोठी मशीनगन होती. त्यामुळे ती नसणारा गट जास्त कमजोर बनत होता. पण नाईलाज होता. दुसरा गट मोडकी जीप घेऊन एका मोठ्या रस्त्यापर्यंत जाणार होता जिथे सैन्याची वेगळी तुकडी येऊन ती वाहन घेऊन जाणार होते. त्या खेड्यात एक ट्रक आणि स्थानिक ड्रायवर मिळाला ज्याच्या मदतीने ती जीप तुकडी २ घेऊन जाणार होती. तुकडी १ ठरलेल्या ठिकाणी जिथे त्यांना सायंकाळच्या आत हजर व्हायचा हुकुम होता तिथे निघाली. पण पुन्हा एकदा बिनसले. तुकडी २चा रस्ता जास्त जास्त बिकट होत गेला. आणि तो गावकर्‍याचा ट्रक चालवणे अवघड होऊ लागले. इतके की त्या ड्रायव्हरने पुढे जाण्यास साफ नकार दिला. ह्या अडचणीमुळे तुकडी २ मागे फिरली. त्यांच्या नेत्याने मूळ मार्गाने तुकडी १ च्या मागे जायचा निर्णय घेतला. काही तासाने रस्ता एका खिंडीतून जाऊ लागला. हे अर्थातच धोकादायक होते. आणि त्या जागी त्यांच्यावर गोळीबार सुरु झाला. तुकडी २ ने प्रत्युत्तर दिले आणि ही लढाई काही काळ चालूच राहिली. त्यांची मार्गक्रमणाही सुरूच होती. यथावकाश ते तुकडी १ च्या जवळ आले. त्यांनीही लढाई सुरू केली. पॅट टिलमन आणि एक सैनिक हे त्यात सगळ्यात पुढे होते. एका टेकाडाच्या माथ्यावरून गोळीबार होत असल्याचे पाहून त्या दोघांनी गोळीबार सुरू केला. त्यांच्या बरोबर एक अफगाणी सैनिकही (अफगाण मिलिशिया) होता. तो त्यांना मदत करण्यासाठीच होता. अचानक अनर्थ झाला. तुकडी दोनचा एक ट्रक त्यांच्याजवळ आला. (हे लोक किती जवळ होते ह्याविषयी वेगवेगळी मते आहेत!) त्याच्या टपावर मशीनगन चढवलेली होती. त्या सैनिकांनी त्या अफगाणाला पाहिले आणि बहुधा तो शत्रू आहे असा गैरसमज होऊन त्यांनी तुफान गोळीबार सुरु केला. तो अफगाण जागीच खलास झाला. पॅट आणि त्याचा साथीदार जीव मुठीत घेऊन पळाले. जवळच्या एका खडकामागे लपले. शक्य तेवढा आरडा ओरडा करून आपण अमेरिकन सैनिक आहोत असे सांगू लागले. पण गोळीबार थांबेना. पॅटने धूर सोडणारा बाँब फोडला ज्याच्या धुराचा रंग बघून आपण अमेरिकन आहोत हे त्या ट्रकवाल्या सैनिकांना कळेल. काही काळ गोळीबार थांबला म्हणून पॅट खडकामागून बाहेर आला. हात वर करून आरडाओरडा करत, "मी अमेरिकन आहे गोळ्या झाडणे थांबवा" असे म्हणत तो ट्रककडे धावला. अनाकलनीयरित्या त्या ट्रकमधून पुन्हा गोळीबार सुरु झाला. कित्येक गोळ्या पॅटला लागल्या. त्याचे डोके छिन्नविछिन्न झाले. तो त्या तिथेच गतप्राण झाला. एका उमद्या, कर्तृत्ववान, विचारी तरूणाचा असा करूण अंत झाला.

खरी कहाणी इथे सुरु होते. वरील वर्णनातील किती तपशील खरा आणि किती खोटा ते कळणे अशक्य आहे. कारण अमेरिकन सैन्याने इतका पराकोटीचा खोटारडेपणा केला आहे आणि माहिती दाबून ठेवली आहे की आता नक्की काय घडले ते कळत नाही. ह्याच घटनेच्या वेगवेगळ्या आवृत्ती वेगवेगळ्या प्रसंगी सांगितल्या गेल्या आहेत. कित्येकदा अगदी शपथपूर्वक!
ही घटना झाल्यावर प्रथम अशी बातमी सैन्याने पसरवली की पॅट टिलमन तालिबान सैनिकांशी लढता लढता शहीद झाला. पॅटच्या आईला आणि बायकोला हेच सांगितले गेले. हिंदी सिनेमाचा हिरो जसा एकहाती अनेक खलनायकांना मारतो तशा प्रकारची सुरस आणि चमत्कारिक कहाणी त्यांना ऐकवली गेली. ते ऐकताच त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पॅट हा बेडर आहे, लढायला घाबरत नाही पण तो असला मूर्ख आततायीपणा करणार नाही अशी त्यांना खात्री होती. काही दिवसांनी अमेरिकन सैन्याकडून अधिकृतरित्या असे कळवले गेले की पॅट टिलमन हा फ्रेंडली फायर अर्थात दोस्तांच्या गोळीबारात मारला गेला. त्याच्या कुटुंबियांना अनावर धक्का बसला. नक्की काय घडले हे आम्हाला कळलेच पाहिजे असे विशेषतः त्याच्या आईने ठरवले. आपला मुलगा तर गेला पण पुन्हा असे होऊ नये म्हणून काहीतरी केलेच पाहिजे ह्या निर्धाराने त्याच्या आईने जे जे मार्ग शक्य आहेत ते अवलंबायचे ठरवले. राजकीय नेते, अशा प्रकारे मरण पावलेल्या सैनिकांच्या आया, बायका ह्यांच्याशी संपर्क साधला. ह्यातून अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या.

एखादा सैनिक आपल्याच सैन्याकडून मारला गेला तर त्याला फ्रेंडली फायर म्हणतात. नावात फ्रेंडली असले तरी हे प्रकरण शत्रूच्या गोळीबाराइतकेच भीषण आहे. कदाचित जास्तच. कारण एक सैनिक आपल्या सैन्यासमोर निर्धास्त असतो. अलीकडच्या युध्दांची आकडेवारी बघितली तर ह्या प्रकारे मरणार्‍या सैनिकांची संख्या खूप वेगाने वाढते आहे असे दिसते. पण पॅट टिलमन प्रकरण इथेच संपत नाही. ह्यात बरेच पाणी मुरते आहे असे जाणवते.

काही अनुत्तरीत प्रश्न, अमेरिकन सैनिक दिसत असताना त्या ट्रकवरील सैनिकांनी गोळीबार थांबवला का नाही? हातघाईच्या लढाईकरता प्रशिक्षित केलेले सैनिक इतके आपल्या लोकांना मारताना इतके निष्काळजीने का वागले? ते सैनिक इतके जवळ असताना त्यांना का ओळखू आले नाहीत? हवेत सोडलेले फ्लेअर्स त्यांना का दिसले नाहीत?

मुळात त्या जीपला मागे सोडून द्यायची परवानगी का दिली नाही? ५००००० डॉलर्सच्या जीपची किंमत अमेरिकन सैनिकांच्या जीवापेक्षा मोठी आहे का? ह्याबाबतही अत्यंत हास्यास्पद स्पष्टीकरण दिले गेले.

मूळ हुकूम होता की सायंकाळच्या आत अमक्या ठिकाणी पोचायचे आहे. नंतरच्या उच्चस्तरीय चौकशीत कुठल्याही अधिकार्‍याने हे कबूल केले नाही की असा काही हुकूम होता. दिवसाढवळ्या सैनिक सहसा असे एका जागेकडून दुसरीकडे जात नाहीत. नंतर एका अधिकार्‍याने असे म्हटले की डॉन आणि डस्क (पहाट आणी सायंकाळ) ह्या दोन शब्दात घोटाळा, गैरसमज झाला. सैनिकांचे जीव धोक्यात असणार्‍या अशा मोहिमेत इतका ढिसाळपणा आणि गलथानपणा का? डॉन, डस्क असे शब्द न वापरता ११०० , २२३० अशी वेळ वापरावी असा सैन्यात संकेत आहे. तो का नाही पाळला गेला? नंतर असेही कळले की खरेतर त्या खेड्यात इतक्या तातडीने जायची काहीही गरज नव्हती. हा सगळी खबरच चुकीची होती.
बेफिकिरीने गोळीबार करणार्‍या सैनिकांना कोर्ट मार्शलही केले गेले नाही. तशी मागणी, विचारणा केली तेव्हा त्यांना साफ उडवून लावले.
एका बैठकीत पॅटच्या आईला असेही सांगितले गेले की ह्या मोहिमेचे सूत्रधार अमेरिकेतील कुठल्याशा हेडक्वार्टरमधून ऑर्डर देत होते. म्हणजे तिकडे रणधुमाळीत प्रत्यक्ष वावरणार्‍या अधिकार्‍याना धुडकावून अशा प्रकारे रिमोट कंट्रोल होत होता. नंतर असे मी काही म्हटलेच नाही असे त्या अधिकार्‍याने म्हटले.
ह्या तुकड्यांमधे आपापसातले कम्युनिकेशनही इतके कमकुवत का होते हेही कळलेले नाही. २००४ साली संदेशवहनात इतकी प्रगती झालेली असताना त्यांना एकमेकांना अपडेट का देता आले नाहीत? माहित नाही.

पॅटच्या अंगावरील युनिफॉर्म जाळून टाकला गेला. का तर म्हणे बायोहॅझर्ड आहे म्हणून. मात्र त्याचे शव अमेरिकेत पाठवले गेले. अमेरिकन गोळ्यांची टोके हिरवी असतात. त्या लागल्यावर तो रंग कपड्यांना लागतो त्यावरून एखादा मृत अमेरिकन गोळ्यांमुळे मेला हे कळते. पॅटच्या बाबतीत हे कळू नये म्हणून त्याचा युनिफॉर्म जाळून टाकला असावा.
त्याच्या शवविच्छेदनातही अनेक अनाकलनीय चुका होत्या. त्याची उंची, त्याच्या हातातल्या अंगठीचा रंग (प्लॅटिनमची अंगठी असताना सोन्याची अंगठी आहे असे लिहिले होते) सगळे चुकीचे. त्याचा जागीच मृत्यू झालेला असताना त्याला कृत्रीम श्वासोच्छ्वास दिला असा उल्लेख, त्याचे हृदय पुन्हा सुरु करण्याचे यंत्र त्याच्या छातीवर लावल्याचा उल्लेख. ज्याच्या डोक्याच्या चिंधड्या होऊन मेंदूची शकले बाहेर आलेली त्याच्यावर असे उपचार का केले गेले? डॉक्टर इतके मूर्ख असतील का? शवविच्छेदनाची तारीख नक्की वाचता येणार नाही अशा पद्धतीने खोडली होती.
असे वाटते की शवविच्छेदनाचा रिपोर्ट हा दुसर्‍या कुठल्यातरी व्यक्तीचा असावा. इतका गलथानपणा का?

आजही पॅट टिलमनच्या मृत्यूचे नक्की कारण कळलेले नाही. काही म्हणतात की पॅटचे विचार बुशच्या विरोधी होते.तो इराक युध्दाच्या विरुद्ध होता म्हणून त्याचा निकाल लावला. काही म्हणतात की त्यावेळेस इराकच्या अबू घ्रेब तुरुंगाची आणि अशीच काही प्रकरणे उघडकीस येत होती त्यांच्यावरील लक्ष हटवण्याकरता पॅटसारख्या वलयांकित सैनिकाचा जाणूनबुजून बळी देण्यात आला आणि त्याला हिरो बनवायचा प्रयत्न केला गेला. अजून एक मतप्रवाह आहे की तो निरीश्वरवादी होता. आणि बहुसंख्य सैनिक हे धार्मिक असल्यामुळे कुणीतरी वरिष्ट दुखावला गेला असेल आणि त्याने पॅटला बळीचा बकरा बनवला. थोडक्यात सैन्यातही अत्यंत नीच, स्वार्थी, पाताळयंत्री लोक असतात. जीव धोक्यात घालणार्‍या सैनिकांचा आपल्या महत्त्वाकाक्षेपायी, वैयक्तिक आकसापायी किंवा ढिसाळपणापायी बळी द्यायला उच्चपदस्थ अधिकारी कचरत नाहीत. हे ह्या प्रकरणातून कळले. एकीकडे शहीद सैनिकाला हिरोचा मान द्यायचा. पदके, सन्मान द्यायचे आणि दुसरीकडे खरे काय घडले ह्यावर, चुकांवर पांघरूण घालायचे असा दुटप्पी प्रकार.

क्रमशः

समाजमाहिती

प्रतिक्रिया

शुचि's picture

6 Nov 2010 - 4:45 am | शुचि

लेख जबरी झाला आहे. लेखामधून परिस्थितीचे गांभीर्य (ग्रॅव्हीटी) आणि संशयाचे संपूर्ण आच्छादन समर्थपणे व्यक्त झाले आहे. अवघड होतं .. इतके नानाविध पैलू समोर आणणे आणि उकलून दाखवणे ही खूप अवघड गोष्ट होती. पण छानच जमली आहे. एखादी डॉक्युमेंट्री पहात आहोत असं वाटलं.
तीसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत.

कारगिल युद्धातही अनेक सैनिक भारतीय तोफांमुळे मरण पावले असे ऐकले होते. लष्करात अनेक गोष्टी असतात ज्या कधीच बाहेर येत नाहीत त्यामुळे ज्या काही थोड्याफार गोष्टी सामान्य लोकांना कळतात त्याने फार धक्का बसतो. हे एक चक्र आहे...... जर देशासाठी लढणा-यांची अशी गत होत असेल आणि माजी लष्करप्रमुख आदर्श मध्ये खोटे उत्पन्न दाखवुन फ्लॅट घेत असतील तर लोकांनी लष्करात सामील व्हावे असे ते कसे काय सांगु शकतील. पॉलिटिक्स तर खाजगी कंपनींमध्ये सुद्धा चालते पण सहसा जीव जात नाही. लष्करात सरळ मरणच. जर उमदे तरुण अशा कारणाने लष्करात येणे बंद करु लागले आणि त्यांच्या जागी वाट्टेल त्या तडजोडी करणारे आले (पाकिस्तान लष्करासारखे) तर युद्धात काय होईल कोणास ठावे. (आत्ता भारतीय लष्करात बहुतांश अधिकारी चांगले आहेत अशी आशा.) पॅट ला लवकरात लवकर न्याय मिळो ही इच्छा.

लेख छान झाला आहे. पुढचा भाग लवकर टाका.

- सूर्य.

ओबामाच्या टकलावर हाणा हे पुस्तक कुणीतरी नेऊन ! इथं मुंबईत येतोय म्हणे आज दुपारच्याला.
आमाला पावर नाय!
विनोदाचा भाग सोडा - तो देश खूप जागरूक आहे; सगळंच जाहीर होतं तिथं.
इथे आमचा सरबजीत सुटलाय की त्याचं काय झालंय रामजाणे!

पॅटच्या फ्युनेरलच्या वेळी त्याच्या भावाची प्रतिक्रिया:

According to speakers at his funeral, he was very well-read, having read a number of religious texts including the Bible, Qur’an and Book of Mormon as well as transcendentalist authors such as Ralph Waldo Emerson and Henry David Thoreau. However, responding to religious overtones at the funeral, his younger brother Rich stated that "Pat isn't with God. He's fucking dead. He wasn't religious. So thank you for your thoughts, but he's fucking dead."[15]

(http://en.wikipedia.org/wiki/Pat_Tillman)

तुमच्या लेखांमुळं एक पुस्तक वाचल्याचं समाधान मिळालं.
पुढील अशाच लिखाणासाठी शुभेच्छा!

लेखन चांगले झाले आहे.
एका सैनिकाचा असा अंत झालेला पाहून मन कळवळले.
मध्यंतरी कुठल्याश्या मासिकात अमेरिकन सैन्यातील स्त्रियांची शारिरीक आणि मानसिक स्थितीचं वर्णन करणारं आर्टीकल वाचलं होतं, त्यामुळेही अर्धा एक तास सुन्न वाटलं होतं. माझी जी मैत्रिण अमेरिकन सैन्याचे गोडवे गात असते तिच्यासमोर ठेवावं असं वाटलं इतक्या भयानक स्टोर्‍या होत्या त्यात!

त्याना हे चित्रपट बघा म्हणावे , तसे बरेच दाखवता येतील पण हे बघाच म्हणाव ...

१) A few good men (हा हिन्दी मधे original story मधे फारच विचित्र बदल करून पण suspense theme तीच ठेवून ढापला होता शौर्य त्याचे नाव होते)
२) Generals daughter
३) Courage under fire
४) In the Valley of Elah

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Nov 2010 - 9:14 am | llपुण्याचे पेशवेll

सदर लेख कुठे ऑनलाईन वाचायला मिळेल का?

विसोबा खेचर's picture

9 Nov 2010 - 10:57 am | विसोबा खेचर

अजून लिहा साहेब..

जबरदस्त आहे लेख!
एका विषण्ण करणार्‍या घटनेबद्दल चांगलं लिहिलं आहे..
सैन्यात असे प्रकार घडतात, घडत असतात.. असं कधी नव्हतं वाटलं.
अजून लिहा...

सहज's picture

10 Nov 2010 - 7:03 am | सहज

सैन्यात असे प्रकार घडले आहेत व बहुदा अजुन होतील :-(

हुप्प्या तुम्ही या विषयावर लेखमाला लिहा.

एक दुवा.