
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट.
चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो. त्यातच त्याच्या घरी एक कार्यक्रमही आहे, त्यासाठी तसेही त्याला घरी यायचंच असते. नीरजाला अंगावर, विशेषत: चेहर्यावर कोड आहे. ते जन्मजात नाही, पण नंतर उद्भवलेलं असं. तिला आताशा लोकांच्या विचित्र नजरांची सवय झालीय. आधीचा तिचा कोड असण्याबद्दलचा न्यूनगंड तिच्या पेशातल्या कौशल्याने, बुद्धीने आता झाकोळून गेलाय. तरीही कुठेतरी कधीतरी तिला ते कोड खुपतं असं जाणवतं.

अनन्यचे घर मोठे. कुटुंब मोठं उच्चविद्याविभूषित, तसेच समाजात चांगलेच स्थान असलेलं. आजोबा-आजी, आई-बाबा, काका-काकू व त्यांची दोन मुले, एक विधवा काकू-तिची मुलगी आणि एक अविवाहित आत्या असा याचा हा परिवार. घरातला मोस्ट इलिजिबल बॅचलर घरी मैत्रिण घेऊन आलाय म्हटल्यावर घरी थट्टामस्करीला ऊत येतो, पण जेव्हा नीरजा समोर येते तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. आतापर्यंत सुशि़क्षित आणि पुरोगामी विचार असलेल्यांचे खरे रूप समोर येते.

जरे प्रेम असले तरी अजून दोघांनी ते एकमेकांना बोलून दाखवलेले नाही. त्यामुळे ती त्याच्याबद्दल आणि आता घरच्यांच्या प्रतिक्रिया पाहून आता तो स्वत:ही साशंक होतो. हळूहळू घरातले सगळेजण दोघांसमोर आडून आडून आपापली मते मांडतात. आई अपेक्षेप्रमाणे ठाम विरोधात. ती अगदी नीरजाने चिरलेल्या फळांनाही केराची टोपली दाखवते. बाबांचा तितकासा विरोध नाही, पण बायकोचे मत डावलून घरात वादळ नकोय त्यांना. दोघांचीही लग्नाआधी मने इतरत्र गुंतलेली असताना एकमेकांशी लग्न करण्याचा व्यवहारिकपणा त्यांनी केलाय. पण त्यांची मने आयुष्यभर खरेच जुळली का हा प्रश्न त्यांच्या वागण्याबोलण्यातून जाणवतो. काकाने काकूला कुठेतरी पाहिले आणि तिच्या सौंदर्यावर भाळून तिच्यासोबत लग्न केले. हे अभिमानाने सांगणारी काकू लगेच तिच्या मताला घरी किंमत नाही हे आठवून व्याकुळते. आत्या ही टीव्ही मालिकांत काम करते. तिच्या दृष्टीने सौंदर्य आणखी महत्वाचे. पण तिलाही एकटेपणाचे दु:ख माहित. त्यामुळे ती प्लॅस्टिक सर्जरी किंवा मेक-अपने डाग झाकण्याचा सल्ला देते. विधवा काकू तर इतर जातीतली. (जगात दोनच तर जाती ना, एक कोकणस्थ आणि दुसरी इतर!!! ;) ) त्यामुळे ती गोरी-घारी नसण्याचा मानसिक छळ तिने सोसलाय. तिचं पूर्ण मत या दोघांना अनुकूल, पण नंतर घरचे तिला कसे वागवतील याची तिला धास्ती आहे. आजीने तर अजून तिला पाहिलेही नाही. अनुभवलाय तो तिचा स्पर्श.. आणि तो स्पर्शच तिला नीरजा किती सुंदर आहे हे सांगतो. तिच्या ऑपरेशननंतर जेव्हा ती नीरजाला प्रथम पाहाते, तेव्हाचा प्रसंग खरंच पाहण्याजोगा आहे. आजोबाही मधल्या पिढीपेक्षा समंजस आहेत. नव्या पिढीला मात्र तिच्या दिसण्याशी काही घेणंदेणं नाही. त्यांची तिच्याशी छान गट्टी जमते. आता शेवट काय होतो हे मी आता इथे सांगत नाही.

महाश्वेता कादंबरी काय आणि शासनाच्या जाहिराती काय, कुणीही कितीही सांगितले तरी प्रत्येक कोड हा लेप्रसीचा नसतो हे कितपत आपल्या गळी उतरलेय हा मोठाच प्रश्न आहे. हा चित्रपट आपण खूप काही मोठा सामाजिक संदेश देतोय असा आव आणत नाही. आणि त्यामुळेच मला तो जास्त आवडला. चित्रपटाची स्टारकास्ट मोठी तगडी आहे. माझ्यासाठी डॉ. नीरजाची भूमिका करणारी देविका दफ्तरदार व अनन्यची भूमिका करणारा शेखर कुलकर्णी हेच काय ते नवीन होते. आजोबा- विजय तेंडुलकर, आजी-दीपा श्रीराम, आई-उत्तरा बावकर, बाबा- विक्रम गोखले, काका- रविंद्र मंकणी, काकू-नीना कुळकर्णी, आत्या-रिमा लागू, विधवा काकू- ज्योती सुभाष, तर भावंडांतले उल्लेखनीय नांव म्हणजे अमृता सुभाष.. कलाकारांची ही मांदियाळीच चित्रपटाच्या अभिनयसंपन्नतेबद्दल सर्व काही सांगून जाते. संयतपणे आणि परिणामकारकतेने हाताळलेला एक वेगळा सामाजिक विषय आणि त्याला या सर्वाच्या अभिनयाची जोड असे असताना साहजिकच चित्रपटास बरीचशी पारितोषिके मिळाली नसती तरच नवल होते. http://www.nitalthefilm.com/ या दुव्यावर चित्रपटाबद्दलची माहिती तसेच पुरस्कारांची भली थोरली यादी दिसते. अवांतर: मी हा चित्रपट गाभ्रीचा पाऊस पाहिल्यानंतर लगेच पाहिला. ज्योती सुभाषना नऊवारीतून एकदम स्कर्ट्मध्ये पाहून अंमळ गंमतच वाटली होती. :)

हा चित्रपट पाहताना मला सतत महाश्वेतामधले प्रसंग आठवत होते. विशेषत: मोठ्या उमेदीने बरे होऊन घरी परतणारे जीव पुन्हा एकदा हिरमुसल्या चेहर्यांनी त्यांच्या कुष्ठरोगी निवासात परततात ते चटका लावून जाणारे क्षण पुन्हा पुन्हा आठवत गेले. माझ्या मते आजकालच्या जमान्यात भलेही या गोष्टी सून म्हणून एखादी मुलगी घरी आणताना काकदृष्टीने पाहिल्या जात असतील, परंतु सहकारी अथवा तत्सम कारणांनी संपर्कात येणार्या व्यक्तीस नक्कीच दुजाभावाने वागवले जात नसावे. माझ्या पाहण्यातल्या दोन स्त्रिया आहेत. त्यातल्या एकीला छान टापटिपीने राहण्याची सवय आहे. त्यामुळे त्या सतत लांब हातभर कपडे घालून कोड लपवतात. तर दुसर्या सध्या सत्तरीच्या घरातल्या बाई आयआयटीयन आहेत आणि बर्याच उच्चपदावर आहेत. त्या असले कोड लपवायचा प्रयत्न बिल्कुल करत नाहीत, पण त्यांचाही त्यांच्या काळचा प्रेमविवाह होता. पहिल्या बाई सतत हसतमुख असतात आणि कुणी त्यांना कोड आहे म्हणून त्यांच्याशी दुष्ट्पणे वागल्याचे पाहिल्याचे माझ्या माहितीत नाही. दुसर्या बाईंशी कुणी पंगा घेण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी भल्याभल्यांना अधिकाराने आणि त्यांच्या ज्ञानाने गारद केलेय. हा माझा स्वत:चा आणि मुंबईतला एका छोट्या समूहातला अनुभव आहे. पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान.
मला इथे हा चित्रपट पाहिला असल्यास तुम्हाला तो कसा भावला, तसेच कोडाच्या समस्यांबद्दल आणि त्याबद्दलच्या समाजाच्या एकंदर दृष्टीकोनाबद्दल इथे वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
24 Sep 2010 - 12:27 am | मस्त कलंदर
एक राहिलेच. मी हा चित्रपट पाहून दोन महिने उलटून गेले असतील. आज बहुगुणींशी बोलताना आज अचानक हा चित्रपट आठवला. यावर लिहायचे असे खूप दिवसांपासून मनात होतेच म्हणून आज बसल्या बसल्या लिहून काढले. आज अप्रत्यक्षरित्या बहुगुणीकाकांमुळे हा लेख लिहिला गेला म्हणून त्यांचे आभार!!!
24 Sep 2010 - 12:32 am | पुष्करिणी
मला आवडलाय हा सिनेमा.
नीना कुळकर्णीचा रोल मस्त आहे, तशी चारचौघांच्या भाषेत सुखी असणारी पण आंतरिक रूखरूख असलेलं व्यक्तिमत्व छान साकारलय.
24 Sep 2010 - 12:35 am | अडगळ
शांत , समंजस , पुस्तकं वाचत आराम करणारे.
बाकी पिक्चर भारीच होता.
24 Sep 2010 - 12:35 am | रेवती
मस्त सिनेमा आहे हा!
मी दोनवेळा पाहिलाय. आजकाल तूनळी किंवा आपलीमराठीवर दिसत नाही पण!:(
मला त्यातलं नितळ आरस्पानी गाणं खूप आवडलय. कुठे मिळेल हा सिनेमा?
सगळ्यांचे अभिनयही छान झालेत!
माझ्या मैत्रिणीच्या आईला कोड आहे. आधी ते माहित नव्हते. ती अशीच आईला घेउन आली आणि मला मनातल्यामनात जरा धक्का बसला. एखाद्या मिनिटात सरावले आणि नंतर काहीच वाटले नाही.
24 Sep 2010 - 12:45 am | मस्त कलंदर
माझ्या एका मैत्रिणीला पाहायला आले होते. एकदम मुलाचे बाबा साडी थोडीशी वरती धरून पाय दाखव म्हणाले. क्षणभर तिला काही संदर्भ लागला नाही. आई आणि ताई, "असे चालतेच गं, दाखव तू पाय" असे म्हणाल्या. पाहुणे गेल्यावर तिने असे का केले असे विचारल्यावरून, "पायावर काही पांढरे डाग तर नाहीत, (पक्षी: मुलगी पांढर्या पायाची तर नाही) अशी खात्री करून घेण्यासाठी असे करतात" असे तिला उत्तर मिळाले. यावर ती मैत्रिण घरच्यांवर जाम भडकली. "जर का मला असे पुन्हा कुणी करायला सांगितले तर मुलगी पाहायला येतात की जनावरे खरेदी करायला? असे सरळ त्या पाहुण्यांना विचारेन" असा तिने घरच्यांना सज्जड दम दिला होता. सुदैवाने असा प्रसंगच नंतर ओढवला नाही..
24 Sep 2010 - 1:36 am | टिउ
हाईट आहे च्यायला!
असलं काही ऐकलं की मला मुलीच्या घरच्यांचाच जास्त संताप येतो. तेव्हाच्या तेव्हा हाकलुन द्यायला पाहिजे होतं पाहुण्यांना!
24 Sep 2010 - 1:39 pm | मृत्युन्जय
बोंबला. कोड पायावर नसुन अजुन दुसरीकडेच असले असते तर किंवा त्यांना तसा संशय असला असता तर? तो माणुस खुळचट पण मला विचाराल तर तितकीच चुक तुमच्या मैत्रिणीच्या घरच्यांची पण आहे. तुमच्या मैत्रिणीला माहित नसेल कदाचित पण तिच्या घरच्यांना तर माहिती होते ना काय चाललं आहे ते. अश्या लोकांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवावा.
24 Sep 2010 - 10:09 pm | मस्त कलंदर
मलाही अगदी अस्साच राग आला होता त्या लोकांचा. अशा अमानवी प्रथा अजून चालू आहेत हे आपलेच दुर्दैव, दुसरं काय?
24 Sep 2010 - 11:59 pm | शाहरुख
तुझ्या मैत्रिणीच्या आईला आणि ताईला माझ्या वतीने चार शिव्या दे घरी जाऊन !
चित्रपट परिचय आवडला.
24 Sep 2010 - 12:58 am | सुनील
(पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!)
असे एक चित्र-विडंबन टाकायचा मोह महत्प्रयासाने आवरला!!
बाकी चित्रपट अद्याप पाहिला नाही. म्हणून - नो कमेन्ट्स!
24 Sep 2010 - 1:00 am | निखिल देशपांडे
चित्रपटाबद्दल ऐकलयं..
पाहायचा मात्र राहुन गेलाय.
24 Sep 2010 - 1:12 am | नंदन
चित्रपटाची ओळख अतिशय आवडली. अजून पाहिला नाही, पण वेगळ्या विषयासोबतच त्यातल्या अ-प्रचारकी टोनमुळे पहावासा वाटतो आहे.
>>> पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का?
--- माझ्या परिचयात अशी एक व्यक्ती आहे. भर उन्हाळ्यातल्या ट्रेकलाही लांब बाह्यांचा शर्ट आणि फुलपँट घालून येण्याइतपत ती व्यक्ती दक्षता घेत असली तरी, चेहर्यावरच्या कोडांमुळे तो प्रयत्न फारसा यशस्वी ठरत नाही. कामाच्या ठिकाणी किंवा मित्रांसोबत असताना काही फरक पडत नसला, तरी लग्न जुळताना प्रश्न येतो आहे.
यावरून आठवलं, लग्नात वराचे पाय धुण्याची प्रथा ही मुलाच्या पायावर काही कोडाचे डाग वगैरे नाहीत ना हे तपासण्याच्या उदात्त हेतूने सुरु झाली, असं एका संस्कृती-जाज्वल्य-अभिमानी व्यक्तीकडून ऐकलं होतं :). यात तर्काशी फारकत कितपत घेतली आहे, सगळ्याच परंपरांना शास्त्रीय आधार असल्याचा अट्टाहास किती आणि सत्य किती, याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकेल. त्यात भाग घेण्याची मुभा/पात्रता/इच्छा नाही.
किंचित अवांतर - नितळ शब्दाच्या रूढ अर्थासोबतच मोल्सवर्थवर दिलेला (दुवा) हा दुसरा अप्रचलित अर्थ (सात पाताळांपैकी एकाचे नाव*) देखील कदाचित इथे अभिप्रेत असू शकेल.
*अधिक अवांतर - 'अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल, पा- ताल' अशी सप्तपातालांची नावं मोल्सवर्थवरच सापडतात. त्यात नितळ कुठे आलं ते मात्र कळलं नाही. कोणी जाणकार याबद्दल अधिक सांगू शकेल का?*
24 Sep 2010 - 1:37 am | शुचि
पण लग्नात पाय धूत असताना ती गोष्ट कळून लग्न मोडायचं म्हणजे जरा जास्तच ऊशीर नाही का? जरा इल्लॉजीकलच वाटतं. ते ही अशा समाजात जिथे लग्न एकदा जमलं की सुद्धा ते मोडणं थोडं टॅबू च समजलं जातं.
24 Sep 2010 - 1:37 am | शुचि
चित्रपटाची ओळख खूप आवडली.
24 Sep 2010 - 2:19 am | चित्रा
बघूच!
24 Sep 2010 - 10:31 pm | पैसा
सिनेमाची ओळख पण तेवढ्याच नितळ भाषेत करून दिली आहेस! बघायला हवाच.
24 Sep 2010 - 2:37 am | प्रियाली
अगदी अशीच पण याही पेक्षा वाईट आणि वेगळ्या वळणाने जाणारी गोष्ट आयुष्यात पाहिलेली आहे.
मुलगी अतिशय हुशार. मेडिकलला गेली. तिथे तिचे प्रेमही जुळले पण नंतर लक्षात आले की तिच्या अंगावर पांढरे डाग येत आहेत. (हे लग्ना आधी झाले की नंतर ते आठवत नाही.) त्या मुलाने काहीही म्हटले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या घरीही काही विरोध झाल्याचे आठवत नाही. परंतु या मुलीच्या आईने (स्वतःला सुशिक्षित वगैरे म्हणवणार्या) या गुणवान मुलीला घराचे दार बंद केले. का तर मुलगी अवलक्षणी आहे म्हणून. जन्मदात्री असे करू शकते हा विचारच नकोसा वाटतो.
या मुलीचा भाऊही अतिशय शिकलेला आहे. त्याने या प्रकारामुळे घराचे नाव टाकले. सध्या मी भारतात नाही पण जेव्हा होते तेव्हा कित्येक वर्षे या मुलांना घराच्या दिशेने फिरकलेले पाहिले नव्हते. :(
---
चित्रपटाची करून दिलेली ओळख आवडली. नेटावर उपलब्ध आहे का?
24 Sep 2010 - 4:29 am | Pain
कोडासंबंधी शास्त्रीय माहिती कुठे मिळेल ? त्याला इंग्लिशमधे काय म्हणतात?
24 Sep 2010 - 5:26 am | शुचि
बहुतेक - http://en.wikipedia.org/wiki/Vitiligo
29 Sep 2010 - 10:01 am | Pain
पाहतो; धन्यवाद.
24 Sep 2010 - 6:18 am | सहज
उत्तम परिक्षण. चित्रपट यादीत टाकला गेला आहे.
24 Sep 2010 - 7:13 am | चतुरंग
चित्रपट सुरेखच आहे. आणि तू म्हटलेस तसा कोणतीही संदेशा संदेशी करण्याच्या भानगडीत न पडल्याने आपसूकच आपण जास्त अंर्मुख होऊन विचारात पडतो. कामे उत्तमच झाली आहेत. कै.विजय तेंडुलकरांचे आजोबा फार छान वठले आहेत!
जरूर पहावा असा चित्रपट.
सातवी आठवीत आमच्या वर्गात एक मुलगी होती तिला चेहेर्यावर कोड होते त्यामुळे ती सतत एकटी असे, तिला मोजक्याच मैत्रिणी होत्या पण त्यांच्याशी तिचे चांगले जमे पुढे ती बदली होऊन गेली असावी त्यामुळे पुढे काय ते माहीत नाही. एकूण आपल्या समाजात आतापर्यंत परिस्थिती बर्यापैकी सुधारली असावी. अगदी माणूस टाळून त्याला वाळीत टाकण्यापर्यंत तरी मजल नक्कीच जात नसेल. लग्नसंबंध होताना मात्र कितपत सामावून घेतले जात असावे ह्याबद्दल साशंक आहे.
24 Sep 2010 - 9:26 am | बट्ट्याबोळ
खूप सुंदर चित्रपट आहे. यातील दोन प्रसंग माझ्या नेहेमी लक्षात राहतातः
१. व्हेरिगेटेड प्लँट्स - पानांवर विविध डाग असूनही सुंदर दिसणारी झाडे, याचा कोडाशी संबंध जोडणारा प्रसंग.
२. एक गाणं: "अंधाराच्या भवती आहे नवा नवा अंधार
उजेडातल्या रखरखलेल्या, हटवादी अन् दुर्मुखलेल्या अगणित चेहे-यांच्या गर्दीला कवेत घेई अंधार .. शांत शांत अंधार ..."
१०-१५ वेळा चित्रपट बघितला आहे.
24 Sep 2010 - 10:09 pm | मस्त कलंदर
अगदी... म्हणून तर इंद्राजदाला दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलं आहे की, प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगून जाते आणि एकही गोष्ट अनाठाई म्हणून वाटत नाही..
या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल लिहायचे राहिले होते, ती उणीव तुम्ही, परा आणि रंगाकाकांनी भरून काढली. :)
24 Sep 2010 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चित्रपट ओळख आवडली. चित्रपट मिळवून जरूर बघणारच.
आमच्या शेजार्यांचा एक जावई (बहुदा) जन्मजातच संपूर्ण पांढरा आहे. वयाने तो माझ्यापेक्षा बराच मोठा असल्यामुळे मी माझ्या लहानपणापासून त्याला पहाते आहे. आधी थोडीशी भीतीच वाटली त्याची, पण एकदा त्याने गप्पा मारायला सुरूवात केली तेव्हापासून मैत्रीच झाली. त्याच्या मागे मी आईबाबांना त्याच्या अशा वर्णाबद्दल विचारलं आणि त्यांनीही जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं सांगितलं. पण मुख्य गोष्ट हीच सांगितली, "त्याच्या शरीरात रंगद्रव्य, मेलॅनिन कमी आहे म्हणून त्याचा रंग असा; हा काही रोग नाही. तुझा हातसुद्धा पहा, फ्रॉकच्या बाह्या जिथे संपतात तिथे हातावर रंगांमधे कसा फरक दिसतो ते!"
मके, तुझा प्रश्न अगदीच अस्थानी नाही. याच 'जावया'बद्दल आमच्या बिल्डींगमधलेच लोक काय काय बोलायचे ते ही आमच्या कानावर पडायचं!
24 Sep 2010 - 10:11 am | मितभाषी
चित्रपट ओळख आवडली. चित्रपट मिळवून जरूर बघणारच.
24 Sep 2010 - 1:28 pm | इन्द्र्राज पवार
"अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात...."
~~ घडू शकतात, घडत राहतात [चित्रपटातील याच कारणाने नव्हे तर इतरही अनेक पैलू असतात] प्रत्येक घरात या प्रकारची एखादी वेदना ठसठसत असतेच असते. प्रश्न आहे तो तिला शमविण्याचा ! पण दुर्दैवाने तसे करण्याचे प्रयत्न फार दुर्बल असतात (जसे या चित्रपटातील ती टीव्ही सीरिअल्समध्ये काम करणारी आत्या, जी नीरजाचा तिरस्कार करीत नाही तर योग्य मेकअप करून रूपातील ते वैगुण्य झाकण्याची प्रॅक्टीकल सूचना करते). शतकानुशतके स्त्री-पुरुषाच्या '१०० टक्के निरोगी' पणाच्या ज्या कल्पना समाजमनात भिनल्या आहेत त्यामध्ये ज्या काही दृश्य घटकांना स्थान नाही, तीत कोड बर्याच वरच्या क्रमांकावर आहे, हे नाकारून चालत नाहीच. इथे भावनेचा प्रश्न नसून 'पुढील पिढीतही उतरला, तर काय?" हा जीवघेणा प्रश्न ज्येष्ठांच्या मनात सर्पासारखा सळसळत असेल तर ते दोषास पात्र होऊ शकत नाहीत. (सहज जाता जाता >> येथील 'कौलां"च्या भाऊगर्दीत जर असा एक कौल निघाला की "तुम्ही आपल्या घरी कोड असलेली व्यक्ती जावई/सून म्हणून स्वीकाराल का?" ~~ तर होकाराची टक्केवारी किती असू शकेल?)
~~ 'नीतळ' नायिका नीरजा किमान उच्चशिक्षित आहे, डॉक्टर आहे....जरी अनन्यबरोबर ती संसार करू शकली नाही (....मी चित्रपट पाहिलेला नाही, पण धागाकर्तीने उत्कृष्ट लिखाणाद्वारे, आणि फ्रेम्सद्वारे चित्रपट असा उलगडून दाखविला आहे, की जणू प्रत्यक्ष समोर पाहातच आहे) तरी एकटीने का होईना ती या व्यवहारी जगात आपले पुढील आयुष्य बुद्धीकौशल्यावर समर्थपणे व्यतीत करू शकेल. पण समाजातील सर्वच महाश्वेतांच्या बाबतीत हे घडू शकणार नाही आणि कायमपणे डागाची ती डागणी अंगावर घेऊन कुढीत आयुष्य काढत राहण्याचा प्रवास करावा लागेल हे कटू असले तरी सत्य आहे हे मानावे लागेल.
वर एका प्रतिसादात अदिती म्हणते "....मग तर माझी त्याच्याशी मैत्रीच जुळली..." ~ असे कितीजणाच्या बाबतीत होऊ शकते? त्यात निदान 'पुरुष' असल्याने किमान तो बाहेर कामानिमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने का होईना मोकळेपणा अनुभवत असेल, पण मुलीच्याबाबतीत फार फार अडचणी येतात, आणि त्यातही दुर्दैव असे की ती आपले ते शल्य इतरांसमवेत शेअरही करू शकत नाही कारण परत तीच व्यथा....'निरोगी' समाजात मिसळण्याचा न्यूनगंड !
"दुसर्या बाईंशी कुणी पंगा घेण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी भल्याभल्यांना अधिकाराने आणि त्यांच्या ज्ञानाने गारद केलेय."
~~ हा तुम्ही पाहिलेला एक अनुभव...म्हणजेच इथे ज्ञानाचा मुद्दा किती महत्वाचा आहे ही बाब अधोरेखीत व्हावी. या व्यथेने पिडलेल्यांना खरे तर आधार आहे तो उच्च शिक्षणाचा... कारण कथेतील भावभावनांचा कल्लोळ कितीही चर्चीला तरी शेवटी या व्यवहारी जगात त्या व्यथेने पिडीत असलेल्यांना खर्या अर्थाने आधार कुठला असेल तो शिक्षणाचाच....जगण्यासाठी.
"पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान."
~~ हे शेवटचे वाक्य (निदान मला तरी...) नीटसे समजले नाही. या वाक्यातील "न" काय आहे?
इन्द्रा
24 Sep 2010 - 2:39 pm | मस्त कलंदर
टायपो हो. नंतर लक्षात आले होते पण भापो होईल म्हणून कुणा संपादकांना सांगितले नव्हते.
चित्रपटाच्या पहिल्याच दृष्यात ती पुण्याला जायची तयारी करत असताना तिच्या मनातले यावरचे काही विचार दाखवले आहेत. तिला आलेले अनुभव हळूहळू तिच्या स्वभावाला अंतर्मुख, अबोल कसे बनवत गेले हे त्यातून कळते. ती पटकन आपल्या मनातले भाव चेहर्यावर दिसू देत नाही. खरंतर मी मुद्दाम इथे प्रत्येक गोष्ट नमूद नाही केली. पण चित्रपट, पात्रे किंबहुना व्यक्तिरेखा, संवाद, प्रत्येक पात्राचे विचार, प्रत्येक फ्रेम.. सगळ्याला काही अर्थ आहे.
अर्थात. नीरजाने ही तेच केलेय. ज्ञानामुळे निदान एवढी प्रगल्भता येते की ती सौंदर्य म्हणजेच आयुष्यातली इतिकर्तव्यता नाही, त्याहीपलिकडे बरेच काही आहे हे माणसाला सांगते.
माझ्या लोकल इंट्रानेटवर लोक अगदी टेराबाईटीमध्ये चित्रपट, गाणी, पुस्तके, सॉफ्टवेअर्स शेअर करतात. त्यामुळे चित्रपट कुठून डाऊनलोडवायचा ते माहित नाही. परा, गणपा आणि माहितगारांनी इथे नंदनवावे. (सौजन्यः टिंग्या)
25 Sep 2010 - 11:51 pm | Pain
येथील 'कौलां"च्या भाऊगर्दीत जर असा एक कौल निघाला की "तुम्ही आपल्या घरी कोड असलेली व्यक्ती जावई/सून म्हणून स्वीकाराल का?" ~~ तर होकाराची टक्केवारी किती असू शकेल?
असहमत.
काही दिवसांपूर्वी आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न कराल का असा कौल होता. या धाग्यात कोडासंबंधी लिहिले आहे.
एखाद्या गोष्टीने पीडीत असणार्या गोष्टींबद्दल सहानुभूती आहे किंवा आपण त्या गोष्टी मानत नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी "लग्न करा" हा धोशा पटत नाही.
तसे असेल तर एखाद्याला/एखादीला इतर धर्म, जाती, देश, तसेच वेगवेगळ्या समस्यांनी गांजलेल्या उदा. शेतकरी आत्महत्या, दुश्काळ, पूर, सामाजिक समस्या उदा. वेश्या (ही मिपावरील लेटेस्ट हिट थीम. ज्यांच्यापासून दूर राहायचे आणि जमल्यास मदत करायची तर ते सोडून इथले लोक त्यांचा फायदा उठवतात, मैत्री करतात आणि वाचक या सगळ्याची प्रशंसा करतात ;) ), वैद्यकीय समस्या: कॅन्सर, एड्स, डिस्लेक्सिया, पा, कोड या आणि अशा प्रत्येक गटातील एकाशी/एकीशी लग्न करावे लागेल.
लग्न करणे आणि पुढचे आयुष्य त्या व्यक्तीसोबत घालवणे, कुटुंब वगैरे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असून एखाद्या व्यक्तीला योग्य वाटेल त्याप्रकारे ती तिच्या जोडीदाराची निवड करेल, ते तिचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे.
यासाठीचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. इथे तावातावाने आक्षेप घेणार्यांनी लोक साक्षरता, आरोग्य, व्यसने, धर्म, जात, शिक्षण, पगार, रंग, रूप, चष्मा, उंची, जाडी, स्वभाव यासारख्या किंवा इतर अनेक गोष्टींच्या आधारे त्यांचे जोडीदार निवडलेले आहेत/ निवडतील. त्यांना एखाद्या गोष्टीचा संशय आल्यास तपासणीही करतील/ केली असेल. ज्याने एकही पाप केले नाही त्यानेच दगड मारायला पुढे यावे.
इथे कोडाविषयी चर्चा सुरु आहे आणि वरती सांगितलेल्या एक हकीकतीत कोडाचे डाग पाहण्याला तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. ती पद्धत अयोग्य आहे, पण दुर्दैवाने त्रासदायक गोष्टी लपवल्या जात असल्याने त्यांनी त्यांच्या पद्धतीने खात्री करून घेण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येईल. आपल्या देशात कोणी उठसूठ घटस्फोट घेत नाही/ घेउ शकत नाही त्यामुळे एकदा बंधनात अड्कण्याआधीच खात्री करून घेतली तर त्यात फारसे चूक नाही. (वधुवरांची संपूर्ण वैद्यकीय तपासणीचे अहवाल* एकमेकांना दिले तर उत्तमच)
26 Sep 2010 - 1:26 am | इन्द्र्राज पवार
"आपण त्या गोष्टी मानत नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याशी "लग्न करा" हा धोशा पटत नाही."
~ तुम्ही मांडलेल्या ह्या लॉजिकशी असहमती दाखविण्याचे काहीच कारण नाही, इतके ते बिनतोड आहे. माणसाच्या आयुष्यात 'लग्न' ही एक अशी अवस्था आहे की अब्जाधिश आणि भिक्षाधिश या दोन्ही घटकांना जीवनसाथीची निसर्गनियमानुसार गरजच असते आणि त्या बंधनात राहण्यासाठी ज्या काही प्राथमिक अवस्था पार पाडाव्या लागतात (दोन्ही पक्षांना) त्यात एकमेकाची सर्वार्थाने ओळख ~ शारीरिक्+मानसिक ~ असणे हे क्रमप्राप्त असतेच असते. शेवटी मानले तर हा नशिबाचा खेळ, जुगार किंवा दैवेच्छा असेच असते. त्यामुळे ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःसाठी, अपत्यासाठी, मित्रासाठी अशा प्रकारच्या बंधनाचे कंकण घेण्यास पुढे सरसावते त्यावेळी जर ती एक्स्ट्राकॉशस राहिली तर तो तिचा दोष मानता येणार नाही. समाजात ज्या शारीरिक व्यंगाकडे एक भीतीदायक नजर लावली जाते तिच्याबद्दल सहानुभूती बाळगणारी व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर ती कितपत स्वीकारायला तयार आहे, हे पाहण्याचे मीटर म्हणजे त्या व्यंग असलेल्या व्यक्तीकडे 'लग्न' नजरेने पाहणे, इतपतच त्या लग्नाचे इररिफ्युटेबल ऑप्शन. जर 'मी ते मानत नाही' असे म्हणत व्यंग असलेल्या व्यक्तीस या अर्थाने आपल्या घरात स्वीकारले तर ती तशी कृती करणारी व्यक्ती नक्कीच वंदनीय आहे.
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या पण शैक्षणिकदृष्ट्या सातत्याने आघाडीवर असलेल्या शहरात एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्याना दोन मुली. दोघीही उच्चविद्याविभुषित, पैकी एकीचा प्रेमविवाह होणार तर दुसरीचे रितिरिवाजानुसार ठरत आले होते.. आईवडिल प्रसिध्द, निरोगी, मुलीही तशाच, होणारे नवरेही त्याच दर्जाचे....सारे काही आलबेल. कुठलीही तक्रार नाही. लग्नाची बोलणीही अगदी दहा पंधरा मिनिटात संपली. पण अशावेळी डॉक्टरांचे थोरले बंधू उपस्थित पाहुण्यांना उद्देश्यून उभे राहून बोलू लागले ~ "लग्नाची बोलणी पुढे चालू राहण्यापूर्वी मी या मुलींचा थोरला काका या नात्याने एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, आमच्या तीन भावात मी थोरला आहे. माझी दोन्ही लहान भावंडे निरोगी जन्माला आली पण मला वयाच्या १० व्या वर्षी कोडाने डसले आणि तो कायम राहिला आहे. त्यामुळे मी जरी आजन्म अविवाहित राहिलो असलो तरी दोघेही भाऊ निरोगी आहेत, त्यांची अपत्येही. भावांचे शिक्षण पूर्ण करून त्यांचा संसार उभा केला आहे आणि आत्या त्यांच्या मुलींचा विवाह आज निश्चित होत आहे. पण पुढे माझ्यावरून माझ्या पुतणीस जर बोलणार असाल तर ते आताच बोला. विचार करा आणि मगच लग्नाची पुढील बोलणी करा. ही बाब मी अशारितीने जाहीर करून सांगणार आहे याची दोन्ही मुलींना कल्पना दिली आहे, आणि त्यांचा त्याबद्द्ल होकारही घेतला आहे..." काकांच्या या बोलण्यावर फक्त तीनचार मिनिटे दोन्ही नियोजित वरांकडील मंडळींत हलक्या आवाजात चर्चा झाली....आणि पाचव्या मिनिटालाच दोन्ही पक्ष साखरपुड्याच्या तयारीला आनंदाने पुढे सरसावली. आज या घडीला त्या दोन्ही मुली आपआपल्या सासरी आणि व्यवसायाच्या जागी यशस्वी जीवन जगत आहेत.
~ म्हणजेच याचा अर्थ असा की, 'लग्न' या घटकात सत्याला त्या त्या वेळी सामोरे गेले तर पुढील कित्येक शक्यता आपोआप मोडीत निघतात.
इन्द्रा
24 Sep 2010 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय सुंदर चित्रपटाची तेवढीच सुंदर ओळख करुन दिली आहेस ग :)
कोल्हापुरला असताना हा चित्रपट बघण्याचा योग आला. अर्धा चित्रपट व्हायच्या आतच आपण बाहेर निघुन येणार असे आधी वाटले होते, पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि त्यात कसे आणि कधी हरवुन गेलो तेच कळले नाही.
नितळची वेबसाईट देखील बघणेबल आहे एकदम. आणि त्यातले हे एक मस्त गाणे :-
24 Sep 2010 - 2:20 pm | गणपा
बरेच दिवसांपुर्वी हा सिनेमा उतरवुन घेतलाय.. पण कामाच्या व्यापात राहुन गेला पहायचा.
लवकरच पहावा म्हणतो.
24 Sep 2010 - 2:45 pm | अवलिया
उत्तम परिचय.
24 Sep 2010 - 3:40 pm | स्वाती२
सुरेख परिचय.
24 Sep 2010 - 5:03 pm | प्राजक्ता पवार
मी पाहीला आहे हा चित्रपट . चित्रपट आणी तु लिहलेली ओळख दोन्ही सुरेख.
24 Sep 2010 - 5:08 pm | प्रकाश घाटपांडे
सुरेख ओळख
चित्रपट पहायचा राहुन गेला खरा. पुण्यात डॉ माया तुळपुळे यांनी श्चेता असोसिएशन द्वारा यावर खुप काम केल आहे.
24 Sep 2010 - 10:10 pm | मस्त कलंदर
हे मला माहित नव्हते. डॉ. माया तुळपुळेच बहुधा या चित्रपटाच्या निर्माती आहेत.
25 Sep 2010 - 8:33 pm | रेवती
होय, त्याच निर्मात्या आहेत.
24 Sep 2010 - 5:15 pm | अब् क
आता शेवट काय होतो हे मी आता इथे सांगत नाही.?????????????
हे अस का दिलय? पेपर मधे परिक्शन दिल्यासारख??????????
24 Sep 2010 - 10:16 pm | मस्त कलंदर
जर कुणाला चित्रपट पाहायचा असेल, तर पूर्ण माहिती वाचून त्यांचा रसभंग होऊ नये म्हणून शेवट सांगितला नाही. तरी मला अजून मुद्देसूद पुस्तक-चित्रपट परिचय लिहिता येत नाही असे माझे स्वतःचेच मत आहे. न राहवून बरेचसे कथानक लिहलं जातंच.
24 Sep 2010 - 6:59 pm | संदीप चित्रे
'नितळ' खूप दिवसांपासून आहे.
आता शक्यतो लवकवरच बघायचा प्रयत्न करतो !
सिनेमा जितका साधा-सोपा आहे (असं तू लिहिलं आहेस) तसाच तुझा लेखही साधा-सोपा पण मनापासून लिहिला गेल्याने आवडलाय.
24 Sep 2010 - 10:06 pm | मस्त कलंदर
हा सिनेमा मी तसा एकदाच पाहिला.. पण आणखी कितीही वेळा मी तो पाहू शकेन.
जर पाहिल्या पाहिल्या परिचय लिहिला असता तर त्यात मी अजून भर घालू शकले असते. हा दोन महिन्याहूनही अधिक काळानंतरचा आफ्टरइफेक्ट इतका जबरदस्त आहे, तर पाहिल्या पाहिल्यानंतरचा किती असेल कल्पना करा!!!!
24 Sep 2010 - 10:03 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त.
दे.
24 Sep 2010 - 10:19 pm | मस्त कलंदर
आपण भेटलो तर देईनच. नाहीतर श्रामोंकडे नक्कीच आणि बहुधा पराकडेही हा कॉपी करून ठेवला आहे.
24 Sep 2010 - 11:45 pm | प्रभो
मकीने पिच्चरची लिंक दिली नाहीये...आता मीच हुडकून बघतो..
25 Sep 2010 - 8:40 pm | रेवती
नाही सापडत रे!
आपली मराठीवर होता तेंव्हा दोनदा पाहिला मी!
अगदी साधा सोपा सिनेमा इतका परिणामकारक झालाय...
दीपा लागूंचे काम भन्नाट्......तशी सगळ्यांचीच कामे छान झालीयेत.
त्यातली आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अतोनात अत्याचार, अन्याय असे दिसत नसूनही माणसाच्या मानसिकतेमध्ये सुधारणा होण्याच्या जागा दिसतात. असे सिनेमे अंतर्मुख करतात तर पोलीस, अत्याचारांचे सिनेमे आवश्यक असले तरी वाईट वाटण्यापलिकडे आपल्याकडून काही होऊ शकत नाही.
25 Sep 2010 - 2:35 am | फारएन्ड
आवडले परीक्षण
25 Sep 2010 - 7:44 pm | प्रदीप
चित्रपट परिचय, व त्यावरील चर्चाही. विशेषतः नंदन व इंद्रा ह्यांचे प्रतिसाद आवडले. प्रियाली ह्यांनी लिहीलेल्या घटनेने मात्र थक्क झालो. जितके जास्त पहावयास जावे तितका माणूस कळत नाही हेच खरे शेवटी!
एका चांगल्या चित्रपटावरील उत्कट परिचय व त्यावरून घडवून आणलेली चर्चा आनंद देऊन गेली.
25 Sep 2010 - 8:53 pm | मस्त कलंदर
http://www.onlinedownloadlink.com/index.php/archives/1824
किंवा इथे http://rehmananwar.blogspot.com/2010/04/download-free-marathi-movie-nita...
दोन्ही ठिकाणी सिनेमा ८ भागांत उपलब्ध आहे.
25 Sep 2010 - 9:25 pm | विंजिनेर
नितळ माझा सुद्धा एकदम आवडता सिनेमा. सगळ्यांची कामं छान झालीयेत. उत्तम विषय, सुंदर मांडणी, सुश्राव्य गाणी, मस्त लोकेशन. :)
26 Sep 2010 - 7:02 am | राघव
बघायलाच हवा.
आणखी एक चित्रपट मी खूप शोधला पण कुठेच सापडला नाही - गंध. हाही असाच सर्वांगसुंदर चित्रपट. कधीतरी लिहावे म्हणतो त्यावर. नीना कुळकर्णींचा अभिनय निव्वळ अप्रतीम!
27 Sep 2010 - 11:33 am | रोचीन
टि. व्ही. वर लागला होता तेव्हा पाहीला. अर्धवटच पाहीला पण जे काय पाहील ते आवडलं. पण एक खटकलं ते म्हणजे कि तिच्या चेहेर्यावरचे डाग अॅक्चुअल कोडाचे डाग नसून लहानपणी तेल चेहेर्यावर उडून पड्लेले आहेत असे दाखवलेले आहे. (निदान त्या आव्रुत्तीत तरि हे कारण दाखवले होतं.) त्यामुळे थोडासा रसभ्ग झाल्यासरखा वाटतो. पण चित्रपट छानच आहे.
@रेवतीताई,
>>त्यातली आवडलेली गोष्ट म्हणजे कुठेही अतोनात अत्याचार, अन्याय असे दिसत नसूनही माणसाच्या मानसिकतेमध्ये सुधारणा होण्याच्या जागा दिसतात.
१००% सहमत.
आमच्या नात्यात एका मामींना चाळिशीनंतर हातावर थोडे कोड उठले होते. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाला खुपच प्रॉब्लेम आला होता. मुलगी दिसाय्ला चांगली, पेशाने इंजिनीअर असून सुद्धा तीचे लग्न जवळ्जवळ ३५शीनंतर झाले. ते सुद्धा एका कमी शिकलेल्या मुलाशी. पुधे तिचा संसार चांगला झाला पण सुरुवातीला झालेला त्रास खुपच होता.
8 Aug 2016 - 12:46 am | एस
आज हिच्याशी डॉ. सुमती क्षेत्रमाडेंच्या 'महाश्वेता' या कादंबरीबद्दल चर्चा करत असताना 'नितळ' हा चित्रपट आणि मस्त कलंदर यांच्या या लेखाची आठवण आली. प्रतिसादही मननीय आहेत.
8 Aug 2016 - 12:54 am | पद्मावति
खूप सुंदर चित्रपट ओळख. वाचल्यानंतर हा चित्रपट नक्कीच पाहावासा वाटतोय.
8 Aug 2016 - 1:04 am | चतुरंग
'नितळ' फारच नितळ सिनेमा आहे! कामं सगळ्याच टीमची एकसोएक झाली आहेत.
यातलं तेंडुलकरांच्या तोंडी असलेलं एक वाक्य मनात घर करुन आहे -
"सत्यदर्शनानं निर्माण झालेली इच्छाशक्ती ही नियतीपेक्षा केव्हांही श्रेष्ठ असते!"