सागरी तेलविहीर दुर्घटना - २

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
5 Jun 2010 - 4:58 am

पहील्या भागात आपण तेल, तेल विहीर आणि आत्ता झालेला अपघात इथपर्यंत वाचले असेल. आता परीणामांच्यासंदर्भात आधी थोडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया...

प्रदुषणाचे परीणाम दृश्य-अदृश्य अशा दोन्ही स्वरूपात असतात. त्यांची व्याप्ती ही अनेक गोष्टींवर ठरते. त्यात नुसते प्रदुषणाचे रासायनीक मिश्रणच जबाबदार नसते तर भौगोलीक परीस्थिती, वातावरणातील तापमान, पाउस/कोरडेपणा, पाणी असेल तर त्याचा वेग, घनता, जमिनीत असेल तर त्या मातीचे गूण, चढ उतार, आजूबाजूस असलेले भूगर्भातील जल त्याचे वाहणे वगैरे वगैरे अनेक गोष्टी हे ठरवत असतात.

थोडे अवांतर होईल, पण कल्पना येण्यासाठी, एक उदाहरण म्हणून सांगतो, कॅनडातील क्युबेक (त्यातील जंगलांचा) भाग हा आमच्या घरापासून साधारण ४००-४५० मैलावर रस्त्याने असेल. गेल्या रविवारी म्हणजे मे ३०, २०१० ला तेथे जंगलात बरेच वणवे पेटले. तर बॉस्टनमधे हवा काळवंडली आणि जळका वास हा दिवसभर येत होता. राज्याच्या पर्यावरण विभागाला काही भागात हवेने धोक्याची पातळी गाठली असल्याने लोकांना घरात बसायला सांगावे लागले. दुसर्‍या दिवशी पाऊस पडला तर चार्ल्स नदीवर काजळी पसरल्याचे जाणवत होते. असेच एक अजुनही मोठे उदाहरण म्हणजे चीन सध्या मोठ्या धडाक्यात औष्णीक वीज केंद्रे बांधत आहे. तर त्याचे परीणाम पॅसिफिकच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या कॅलीफोर्नियात जाणवत आहेत. थोडक्यात पर्यावरण आणि प्रदुषण हे कुठल्या राजकीय अथवा आर्थिक/सामाजीक सीमा पाळत नाही.

खनीज तेल हे प्रामुख्याने हायड्रोजन आणि कार्बन यांच्या विविध संयोगांचे मिश्रण असते. तरी देखील त्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कॉम्पाउंड्स, शिसे (लेड) वगैरे वगैरे बरेच काही, ज्याला प्रदुषण म्हणता येईल अशी घन-द्रव-वायू रुपातील रसायने असतात. एक छान वाक्य आहे, मला वाटते मी युएस फिशरीच्या संकेतस्थळावर वाचलेले होते: तेल जेंव्हा आपण गाड्या, उर्जा उत्पादन, घरं गरम करायला वापरतो, तेंव्हा ती एक मोठी गरज असते. मात्र तेच तेल जेंव्हा समुद्रात सांडते तेंव्हा तो एक मोठा प्रश्न ठरतो. प्रदुषणाच्या नेहमी वापरलेल्या (येथील) कायदेशीर (रेग्युलेटरी) ठोकताळ्यात बोलायचे तर, एका गॅलन तेलाने एक बिलीयन गॅलन्स पाणी प्रदुषित होऊ शकते!

मात्र एक गंमतशीर आलेख मला नासाच्या संस्थळावर मिळाला. अर्थात यातील विदा हा अमेरिकेचा आहे, पण इतरत्र याहून चांगली अवस्था असण्याची शक्यता कमी वाटते! याचा अर्थ असा की तेलाने होणारे प्रदुषण हे जास्त करून मोठ्या कंपनीकडून एकदाच होण्या ऐवजी व्यक्तिगत कृत्यातून दरोज, हळू हळू घडत असते! अर्थात हे स्लो पॉयझनिंग सारखे ठरत असते आणि त्यातून एकतर नद्या अथवा काही जवळचे किनारे हे खराब होतात.


Source: seawifs.gsfc.nasa.gov

याचा अर्थ बिपीकडून जे काही घडले ते विशेष नाही असा होतो का? अर्थातच नाही. एक भांडवलदार म्हणून बिपीकडून पैसे वाचवण्यासाठी आधी आणि अपघातानंतरही अनेक चुका (का गुन्हे?) झाल्या आहेत. त्यात सुरक्षायंत्रणा नीट नसणे हे प्रामुख्याने आधीचे कारण होते. तर नंतर ज्या पद्धतीने वाचलेल्या कामगारांकडून फसवून सह्या करून घेतल्या (आम्हाला काही झाले नाही वगैरे, हे एनपीआर वर ऐकले होते) त्यातून त्यांची लबाडी समजली. अर्थात आता ते सगळे बदलत आहे कारण अक्षरशः अभाळ फाटले असताना ठिगळाने स्वतःचा बचाव करणे येथे शक्य होऊ शकत नाही. सुरवातीस दिवसास १००० बॅरल्स इतकी तेलगळती सांगितली. इपिए आणि एनओएए या संस्थांनी अधिक संशोधन केल्यावर ती पाचपट अधिक म्हणजे दिवसाला ५००० बॅरल्स इतकी आढळली. न्यूजवीकच्या आजच्या बातमीत म्हणल्याप्रमाणे ४२ दिवसात साधारण दिवसाला १९००० बॅरल्स इतकी तेलगळती होत आहे. अर्थात खरा आकडा कुणालाच ठाम पणे सांगता येत नसला तरी सुरवातीस सांगितलेला आकडा फारच कमी होता.

तेल प्रदुषणाने, सागरीसृष्टी खराब होते - नुसते तेलात बुडल्यानेच नाही! तर संपूर्ण जैविकशृंखलाच खिळखिळी झाल्याने. खालील चित्र केवळ एक प्रातिनिधिक चित्र आहे. त्यामुळे मासेमारी थांबते. अर्थात मच्छिमार उद्योग असलेल्या भागांचा प्रत्यक्ष व्यवसाय जातो आणि ते विकत घेऊन विकणार्‍यांचा धंदा. त्यातूनही जर नकळत प्रदुषित पाणि, हवा अथवा मासे खाल्ले गेले तर त्याचे आरोग्यावर परीणाम होतात आणि डॉक्टरांकडे जावे लागले की आरोग्याच्या विम्यावर. सरकारी विमा असला तर त्या दुखण्यांचा काही खर्च सरकारला उचलावा लागतो तर खाजगी असला तर खाजगी क्षेत्राला. विम्यासंदर्भातील विधान हे विशेष करून अमेरिकेलाच लागू आहे. पण इतरत्रही कुठल्यानकुठल्या रुपाने आरोग्यावर पैसे जातातच. असे तेल जर किनार्‍यावर आले तर त्यातून ते किनारे हे पर्यटनासाठी खराब होतात. म्हणजे पर्यटन व्यवसाय बुडाला. व्यवसाय बुडाला याचा अर्थ माणसांचे काम/पैसे कमी झाले. सरकारी महसूल कमी झाला, वगैरे वगैरे. थोडक्यात एका कंपनीच्या पैसे वाचवण्याच्या चुकीच्या पद्धतीने आज त्या कंपनीचे देखील आर्थिक नुकसान झाले आणि राष्ट्राचे आर्थिक नुकसानही होत आहे.


Source: www.newsweek.com and Charlie Riedel , AP

भाग ३ - तेलगळती थांबावायचे प्रयत्न - तांत्रिक, सामाजीक, राजकीय पाउले, इतरत्र वापरलेली अणूबाँबसहीत वेगवेगळी तंत्रज्ञाने.

-------------

समाजजीवनमानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

5 Jun 2010 - 7:12 am | स्वाती२

>>थोडक्यात पर्यावरण आणि प्रदुषण हे कुठल्या राजकीय अथवा आर्थिक/सामाजीक सीमा पाळत नाही. >>
अगदी अगदी!
हे बघितले का?
http://lens.blogs.nytimes.com/2010/06/04/assignment-35/?ref=global-home

सुनील's picture

5 Jun 2010 - 7:25 am | सुनील

माहितीपूर्वक लेखमाला.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

5 Jun 2010 - 7:37 am | चतुरंग

तेलाचे अर्थकारण, राजकारण हे जगातल्या वेगवेगळ्या भागात अजून किती उत्पात घडवते आहे (आणि घदवणार आहे) हे बघून दिग्मूढ व्हायला होते!

चतुरंग

प्रभो's picture

5 Jun 2010 - 8:48 am | प्रभो

उत्तम लेखमाला!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jun 2010 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून एक माहितीपूर्ण भाग. पुढच्या भागाची वाट पहात आहे.
समुद्रातले प्रवाह आणि तेल पाण्यापेक्षा हलकं असण्यामुळे तेल कितपत पसरेल याचे अंदाज, हे तेल कुठे कुठे पोहोचण्याची शक्यता आहे याचाही उल्लेख लेखांमधे करता येईल का? (माझा अभ्यास नाही, हे फक्त वरवरच्या माहिती आणि वाचनातून विचारते आहे.)

अदिती

विकास's picture

5 Jun 2010 - 8:38 pm | विकास

समुद्रातले प्रवाह आणि तेल पाण्यापेक्षा हलकं असण्यामुळे तेल कितपत पसरेल याचे अंदाज, हे तेल कुठे कुठे पोहोचण्याची शक्यता आहे याचाही उल्लेख लेखांमधे करता येईल का?

हे पण मी नंतरच्या भागात अधिक लिहीन. एकदम जास्त लिहीले तर वाचायला हा विषय कंटाळवाणा होऊ शकतो असे वाटल्याने "संयम" राखतोय :)

बाकी थोडे तेलाचे हलके असणे वगैरेवर... तेल आधी म्हणल्याप्रमाणे हाय्ड्रोकार्बन असल्याने त्याचे हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड आणि इतर संयुगांमधे विभागणी होणे चालू होते. ते समुद्रातील पाण्याचे तपमान, पाण्याची हालचाल (लाटांमुळे) तिथपासून ते सूर्याचा प्रकाश कुठपर्यंत पोचतो, या सर्वांवरच (ऑक्सिडेशन आणि इतर प्रतिक्रीया) अवलंबून असते. त्यामधे काहीवेळेस तेलाची घनता ही पाण्यापेक्षा जास्त होऊन ते पाण्याच्या खाली जाऊ शकते... हलके होते तेंव्हा तो तवंग हळूहळू जमिनीवर येऊ लागतो. येथे देखील तो तसा आता लुइजियानाच्या आणि अलबामाच्या किनार्‍यापर्यंत आला आहे.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मस्त कलंदर's picture

5 Jun 2010 - 10:58 am | मस्त कलंदर

माहितीपूर्ण लेख..
अर्थातच पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन's picture

5 Jun 2010 - 11:21 am | टारझन

येस्स ... इण्डिड !!
आणि हो , अर्थातंच कोदाजींच्या अभ्यासपुर्ण प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत :)

-

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2010 - 2:39 pm | परिकथेतील राजकुमार

साध्या आणी सोप्या शब्दात दिलेली माहिती खुप आवडली आणी ज्ञानात भर टाकुन गेली.

बातम्यांमधुन काय घडले आहे त्याची थोडी कल्पना आली होती, पण तुमच्या लेखमालेतुन नक्की काय घडले आणी काय घडत आहे ह्याची सुस्पष्ट कल्पना आली. धन्यवाद.

पुभाप्र

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

भाग्यश्री's picture

5 Jun 2010 - 2:59 pm | भाग्यश्री

लेखमाला खूप चांगली लिहीत आहात. माहिती कळत आहे.
ऑईल स्पिल प्रकार भयानक आहे! इथे न्युज चॅनल्सवर किती गॅलन ऑईल गेलं, याचा काऊंट दाखवतात, तो तर प्रचंड गतीने वाढतोच आहे ४०-४५ दिवस होऊनही! :(

बिग पिक्चरवरची ही आणखी काही विदारक चित्रे. http://www.boston.com/bigpicture/2010/06/caught_in_the_oil.html

मदनबाण's picture

5 Jun 2010 - 6:29 pm | मदनबाण

बापरे !!! पार वाट लागलेली दिसतेय... आणि पर्यावरणाचे नुकसान तर भयावह दिसते !!! :(

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

माहितीपुर्ण लेख.
चीनच्या औष्णिक प्रकल्पामुळे कॅलिफोर्नियावर काय परिणाम होणार आहे?
त्याबद्दल अमेरिका चीनवर हल्ला करण्याची शक्यता किती आहे?

वेताळ