सागरी तेलविहीर दुर्घटना - १

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
3 Jun 2010 - 10:21 pm

२० एप्रिल २०१० - अमेरिकेतील लुईजियाना प्रांताच्या किनार्‍यावरून ५० मैल् दूर असलेली "गल्फ ऑफ मेक्सिको" मधे ब्रिटीश पेट्रोलीयम (बिपी) ची असलेली तेलविहीर "डिपवॉटर होरायझॉन" मधे अचानक स्फोट झाला. त्या मध्ये ११ कर्मचार्‍यांचे प्राण गेलेच पण आज म्हणजे ३ जून २०१० पर्यंत आणि अजूनही काही दिवस यातून गळणारे खनीज तेल आणि त्याचे परीणाम त्या प्रदेशालाच नव्हे तर अमेरिकेस आणि काही अंशी उर्वरीत जगाला भोगावे लागणार आहेत. असे नक्की काय झाले आहे? : ह्यात बरेच काही लिहीण्यासारखे आहे. या निमित्ताने तेलाची थॉडक्यात माहीती पण करून घेऊया आणि पुढे जाऊया...

खनीज तेल

Ref: Source: U.S. Energy Information Administration (Public Domain)

कोट्यावधी वर्षांपुर्वी मृत्यूपावलेले सागरी सृष्टी ही मधल्या काळात पाणि आणि जमिनीच्या खाली खोलवर जात राहीली. त्यात तपमान, दबाव वगैरेचा परीणाम घडत हळूहळू त्या अवशेषांचे द्रविकरण झाले ज्याला आज आपण खनीज तेल / क्रूड ऑईल असे म्हणतो.

Ref: http://www.eia.doe.gov

मुलांसाठी आणि मोठ्यांसाथी देखील असेलेल्या युएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या संकेतस्थळावर एका तेलाच्या बॅरल मधून (साधारण ४२ युएस गॅलन्स) काय पदार्थ निघतात हे सांगणारे बाजूचे चित्र बोलके आहे. थोडक्यात बोलायचे तर त्या ४२ गॅलन्स मधून १९ गॅलन्स हे गाड्यांना लागणारे गॅसोलीन/पेट्रोल निघते तर १० गॅलन्स डिझेल, त्या शिवाय प्रोपेन गॅस निघतो. शाई, क्रेयॉन्स, डिशवॉशर फ्लुईड, सीडीज् , डीव्हीडीज्, डिओडरंट, टायर्स पासून ते अगदी हृदयासाठी लागणारे कृत्रिम हार्टव्हाल्व्ज मधे पण उरलेल्यापैकी काही तरी पेट्रॉलियम पदार्थ (प्रॉडक्ट) असतो.

या आलेखातून, २००७ साली, अमेरिकेत उत्पादन केलेल्या ६.५७ बिलियन्स बॅरल्स मधून काय मिळवले याची अधिक माहीती मिळते.

या तेलाचे सागरी उत्खनन साधारण १९व्या शतकाच्या सुरवातीस चालू झाले. रशिया, सौदी अरेबिया, अमेरिका, इराण आणि चीन हे पाच प्रमुख उत्पादक देश आहेत. अमेरिकेसंदर्भात एकूण तेल Source: Energy Information Adminstration, Petroleum Supply Annual 2007

उत्पादनाच्या एक चतुर्थांश तेल हे गल्फ ऑफ मेक्सिकोमधील सागरी तेलविहीरीतून तयार होते.

अमेरिकेच्या तेल उत्पादनाचा आणि आयातीचा अंदाज घेयचा असेल तर एनर्जी ऍडमिनिस्ट्रेशनच्या या आकडेवारीतून समजेलः एप्रिल-मे २०१० चे दर दिवसाला साधारण सरासरी खनीज तेल उत्पन्न हे ५,५००,००० बॅरल्स (*४२ गॅलन्स) आहे तर त्याच काळात अमेरिकेच्या तेलाच्या भुकेने असलेली आयात ही दर दिवसालासाधारण सरासरी १२,०००,००० बॅरल्स (*४२ गॅलन्स) इतकी आहे.

अमेरिकेतील तसेच एकंदरीतच तेलविहीरी
Source: National Energy Education Development Project (Public Domain)

अमेरिकेसंदर्भात सागरी किनार्‍यापासून ते २०० मैल समुद्राच्या आतील परीसर हा रेगन सरकारने Exclusive Economic Zone (EEZ), म्हणून जाहीर केला होता. त्या अखत्यारीत उपलब्ध असलेली जमिन/पाणी हे अमेरिकन सरकारी मालकीचे आहे. मिनरल्स डीपार्टमेंट त्याचे व्यवस्थापन करते. या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून ते खाजगी कंपन्यांना हा भाग भाडेतत्वावर देते. त्यातून खनीजे आणि खनीज तेलांचे उत्पादन होते. इतरत्र त्या त्या राष्ट्रांच्या धोरणांप्रमाणे या गोष्टी चालत असतात. भारतात इंडीयन ऑईल/ भारत पेट्रोलीयम या सरकारी खात्यांचे अशा प्रकल्पांमधे वर्चस्व असले तरी आता रिलायन्स पण कृष्णा खोर्‍यातील नैसर्गिक वायू प्रकल्पामुळे येऊ लागला आहे. तसेच, त्याच्या बर्‍याच आधीचा बाँबेहाय चा सरकारी प्रकल्प आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. असो.

"डिपवॉटर होरायझॉन"
Reference: http://www.deepwater.com

२००१ साली साउथ कोरीयातील तंत्रज्ञांनी बांधलेला हा $३५०,०००,००० किंमतीला बांधलेला तेलविहीर / तरंगता फलाट प्रकल्प लुइझियाना प्रांताच्या सागरी किनार्‍यापासून ४२ मैल दूर होता. बोलींग तसेच चित्रपटगृह असलेला हा प्रकल्प ८००० फूट खोल पाण्यात असून मध्यंतरीच्या काळात त्याने ३२००० फूट पृथ्वीच्या गर्भात भोक पाडून (ड्रिल करून) एक जागतिक विक्रम केला. बिपी या प्रकल्पाच्या वापरासाठी दर दिवशी साधारण $५००,००० देत होते.

२० एप्रिल २०१०, स्थानिक वेळेप्रमाणे (सेंट्रल डे टाईम) रात्रीचा १० चा सुमार: तेल, वायू, बाहेरील तापमान, लाटांचा वेग, वगैरे वगैरे यांचे घातक मिश्रण तयार होत होत, या वेळेस अचानक आधी पाणी उसळून वर आले आणि बघता बघता काही वेळात त्यातून चिखल, तेल, पाणी सर्वच उसळून वर आले. कामगारांनी आपत्कालीन पद्धतीचा वापर करायचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होण्याआधीच स्फोट झाला.

Source: US Coast Guard. NEW ORLEANS - Fire boat response crews battle the blazing remnants of the off shore oil rig Deepwater Horizon April 21, 2010. A Coast Guard MH-65C dolphin rescue helicopter and crew document the fire aboard the mobile offshore drilling unit Deepwater Horizon, while searching for survivors April 21, 2010. Multiple Coast Guard helicopters, planes and cutters responded to rescue the Deepwater Horizon's 126 person crew. U.S. Coast Guard photo.

११ कामगार त्यात मृत्यूमुखी पडले (मिळाले देखील नाहीत) बाकीचे साधारण ११४ कामगार सुचैवाने वाचले. २२ एप्रिल पर्यंत हा तरंगता फलाट आगीमधे जळत होता. ११ कामगार काही मिळू शकले नाहीत. सरते शेवटी त्या दिवशी आग थांबली... पण त्याच बरोबर एकूण किंमत $ ५६० मिलियन्स असलेला हा दरोजच्या गरजांसाठी महत्वाचा असलेला पण अजस्त्र राक्षस पाण्यात कायमचा बुडला आणि सोबत ५ मैल लांब खनीज तेलाचा तवंग दिसू लागला.

Source: US Coast Guard. NEW ORLEANS Ð Debris and oil from the Deepwater Horizon drilling platform float in the Gulf of Mexico after the rig sank April 22, 2010.

अमेरिकेतील माहीत असलेल्या सर्वच पर्यावरणीय अपघातातील हा एक मोठा अपघात ठरण्याची ही नुसती सुरवात होती.

(क्रमशः)

समाजजीवनमानबातमीमाहिती

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Jun 2010 - 10:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सोप्या शब्दांत उपयुक्त माहिती. पुढच्या लेखाची वाट पहात आहे.
हे तेल न्यू यॉर्कपर्यंतही पोहोचेल अशी शक्यता आता वर्तवली आहे ना?

अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2010 - 10:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>सोप्या शब्दांत उपयुक्त माहिती. पुढच्या लेखाची वाट पहात आहे.
असेच म्हणतो.

आजच्या दै.सकाळमधेही वाढत्या तेलतवंगाने ओबामा त्रस्त या बातमीबरोबर 'लष्कराकडे तेल तवंग रोखण्याचे तंत्रज्ञान नाही' हे वाचून आश्चर्य वाटले. अर्थात पुढील भागात त्यावरही माहिती मिळेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

3 Jun 2010 - 11:11 pm | चतुरंग

ही विहीर खणायला परवानगी देताना सुरक्षा यंत्रणा अद्ययावत आहे की नाही ह्याबद्दलचे तपासणी अधिकार ज्यांना असतात त्या सरकारच्या यंत्रणेने पुरेशी काळजी न घेता, बीपीने दिलेल्या ५२ पानी फॉर्म्सवर आणि विहिरीला धोका नाही थोडेफार ऑईल सांडले तरी किनार्‍यापासून ४० मैल असल्याने तितकासा धोका नाही, अशा दिलेल्या शब्दांवर विसंबून परवानगी दिली. आता त्याची चौकशी सुरु आहे.
सागरी पर्यावरणावर ह्याचे दूरगामी परिणाम अपेक्षित आहेत. इतकेच नव्हे तर किनार्‍याजवळची भात आणि उसाची शेतीसुद्धा प्रभावित होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

(ताज्या बातमीनुसार घटना घडल्यापासून बीपीची स्टॉकवॅल्यू ७० बिलियन डॉ. ने घटली आहे. पण बीपी पैशाने तशी बक्कळ असल्याने तूर्तास चिंता नाहीये.)

चतुरंग

Pain's picture

4 Jun 2010 - 9:58 am | Pain

माहिती आणि अभ्यासपुर्ण लेख. सध्या काय वाट्टेल ते धागे/ का.कू. येतात. एकाच विषयावर अनेक तर काही अर्थहीन. त्या पार्श्वभुमीवर महत्वाचा.

सोप्या शब्दांत उपयुक्त माहिती. उत्तम लेख.

मस्त कलंदर's picture

4 Jun 2010 - 10:11 am | मस्त कलंदर

खरंच साध्या सोप्या शब्दांत उपयुक्त माहिती!!!
पुढच्या भागाची वाट पाहात आहे..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मदनबाण's picture

4 Jun 2010 - 12:58 pm | मदनबाण

माहितीपूर्ण लेख... :)
पुढच्या भागाची वाट पाहत आहे.

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

आनंदयात्री's picture

4 Jun 2010 - 1:37 pm | आनंदयात्री

वा नविन माहिती कळाली. धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jun 2010 - 1:49 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय.

बिपिन कार्यकर्ते

प्रदीप's picture

4 Jun 2010 - 7:18 pm | प्रदीप

आवडला. पुढील भाग लवकर येऊ द्यात.

असे वाचनात आले की बी. पी. हे लीक बुजवू शकले नाही व तेल असेच बाहेर येत राहिले तर तो साठा ह्याच वेगाने सुमारे सात वर्षेंपर्यंत बाहेर पडत राहील!

अक्षय पुर्णपात्रे's picture

4 Jun 2010 - 7:44 pm | अक्षय पुर्णपात्रे

पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. ही गळती थांबवण्यासाठी केल्या जाणार्‍या उपायांतून दिसणारे तंत्रज्ञानाचे चित्र खेदजनक आहे. केले जाणारे उपाय बाळबोध या प्रकारात मोडणारे आहेत. थोडक्यात या उद्योगात अशा प्रकारच्या (पर्यावरण वगैर) तंत्रज्ञानात पैसे गुंतवण्याविषयी उदासिनता आढळते. अमेरिकेतील नियामक संस्थांमधील रेगनोत्तर र्‍हासही या दुर्घटनेस कारणीभूत असावा. या किनार्‍यावर फिरून लांबून या विहिरी पाहिल्याचे आठवते. तेथील जनतेचा रोजगार बहूतांश मत्स्य उद्योगातून येतो. ब्रिटिश पेट्रोलियम कितपत नुकसान भरपाई करू शकेल याविषयी साशंक आहे.

पुष्करिणी's picture

4 Jun 2010 - 7:54 pm | पुष्करिणी

लेख आवडला, पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

पुष्करिणी

विनायक पाचलग's picture

4 Jun 2010 - 8:23 pm | विनायक पाचलग

लेख उत्तम आहे.
पण त्याहुन महत्वाची गोष्ट म्हणजे अशा महत्वाच्या गोष्टीकडे मीडियाचे झालेले दुर्लक्ष
या जगावर परिणाम करणार्‍या घटना आहेत याची पुरेशी जाण त्याना नसावी असे वाटते.

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

नितिन थत्ते's picture

4 Jun 2010 - 9:38 pm | नितिन थत्ते

जबरदस्त प्रतिसाद.
मिडियाची जाण एकूणातच कमी झाली आहे.

कशाला महत्व द्यायचं आणि काय छापायचं याला काही धरबंध नाही. :)

नितिन थत्ते

प्रभो's picture

4 Jun 2010 - 9:43 pm | प्रभो

सहमत
विनायक आणी नितीन (भारी काँबिनेशन आहे ;) ) शी सहमत...

टारझन's picture

4 Jun 2010 - 9:42 pm | टारझन

जबरदस्त प्रतिसाद !! जियो !

विलायत सतसन्ग
-वाँट टु लॉक

स्वाती२'s picture

4 Jun 2010 - 11:42 pm | स्वाती२

मेडिया कवरेज होते. पण बी.पी. ने प्रॉब्लेम आहे त्या पेक्षा कमी आहे असे भासवले. आणि व्हाईट हाऊस सुरवातीला शांत बसले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Jun 2010 - 11:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिडिया म्हणजे फक्त मटा आणि सकाळ नसावेत! का हल्ली मराठी वेबसायटींमधेच मिडीयाची व्याख्या संपते?

अदिती

अक्षय पुर्णपात्रे's picture

5 Jun 2010 - 12:07 am | अक्षय पुर्णपात्रे

अमेरिकेतील मिडियामध्ये याबाबत अजिबात दुर्लक्ष झालेले नाही. लोकसत्ता, सकाळ, लोकमत (स्थानिक आवृत्त्या) या सर्व वृत्तपत्रांत तसेच इंग्रजी दैनिकांत याविषयी थोडेफार लिहून आल्याचे मी वाचले आहे.

विनायक पाचलग's picture

5 Jun 2010 - 8:43 am | विनायक पाचलग

मीडियाने कव्हरेज दिले असेल ,नाही असे नाही ..
पण माझ्या तरी वाचनात असे काही आलेले नाही..
इथे एक सांगावेसे वाटते ,नुकतेच लोकसत्ताने नवीन पेशीनिर्मितीच्या शोधावर अख्खा लोकरंग काढला होता ..
त्यामानाने ही बातमीही तितकीच महत्वाची आहे ना?
मग त्यावर लेख वगैरे काही यायला हवेत का नकोत ?
( हे लोक , आयफात अनिल कपुरची खिल्ली उडवली ही बातमी फ्रंट पेजला देउ शकतात ,आणि या विषयाला काहीच स्थान नाही /)
हा ,इंग्लिश वा अमेरिकन वर्तमानपत्रांबाबत मात्र काहीच माहित नाही...

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jun 2010 - 9:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पाचलगसाहेब, तुमचं वाचन लिमिटेड असेल म्हणून संपूर्ण प्रसारमाध्यमांना दोष देऊ नका असा काहीसा वरच्या प्रतिसादांचा उद्देश होता. ट्वीटर, फेसबुकावरूनही संबंधित बातम्यांच्या लिंका घटना घडल्यापासून फिरत आहेत.

तुमचं म्हणणं काही अंशी खरं आहेच; लोकसत्ता, मटा इ. बातमीपत्रं महाराष्ट्राच्याबाहेरच्या फारशा बातम्या देत नाहीच.

अदिती

संजा's picture

5 Jun 2010 - 8:20 pm | संजा

आदिती तै,

विनायक पाचलगांचे वाचन लिमिटेड असल्याचा आपला आरोप व्यक्तिगत वाटतो.
काळजी घेणे.

लेख ऊत्तम जमलाय. पुलेशु.
संजा

टारझन's picture

5 Jun 2010 - 10:36 am | टारझन

एकदम छप्परफाड प्रतिसाद कोदा - जी !!

कोदा-जींच्या मुद्द्यामुद्द्यांशी सहमत :)

स्वाती२'s picture

4 Jun 2010 - 11:35 pm | स्वाती२

वाचत आहे.

विकास's picture

5 Jun 2010 - 5:21 am | विकास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे तसेच प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार.

ह्या विषयावर लिहीण्याचे बरेच दिवस डोक्यात होते. त्यात काही बदल हवे असल्यास अवश्य सांगावेत ही विनंती.

ह्या विषयावर अमेरीकेत तरी भरपूर प्रसिद्धी, माध्यमांकडून मिळत आहे. मात्र भारतीय माध्यमात कदाचीत तेव्हढी दिली जात नसेल. उद्या जर ब्रॅड पिट आणि अ‍ॅन्जेलेना जोली लुइझियानाला गेले तर येईल एखादी बातमी. ;)

चतुरंग म्हणतात, "ताज्या बातमीनुसार घटना घडल्यापासून बीपीची स्टॉकवॅल्यू ७० बिलियन डॉ. ने घटली आहे. पण बीपी पैशाने तशी बक्कळ असल्याने तूर्तास चिंता नाहीये"

आज बिपी शेअरहोल्डर्सना एकूण $१० बिलियन्स डिव्हीडंड देणार आहेत म्हणून जाहीर झाले आहे. :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रदीप's picture

5 Jun 2010 - 8:58 am | प्रदीप

बी. पी. ने डिव्हिडंडबद्दल अजून काही निर्णय घेतलेला नाही, असे इथे वाचू शकता.

यू. एस. मधील काही राजकीय पुढार्‍यांनी ('आपला' बॉबीही त्यात असणारच!) बी. पी. ने ह्यावेळी डिव्हीडंड देऊ नये अशी हाकाटी केलेली आहे. ही राजकिय टाळ्याघेऊ खेळी आहे. जे झाले त्याची कारणमीमांसा नंतर होईलच, पण आता सर्वात जास्त प्रायॉरिटी लीकेज बुजवण्याकडे असली पाहिजे. त्यासाठी बी. पी. ने स्वतःकडे पैसा नाही अशी सबब सांगतानाच जर डिव्हीडंड जाहीर केले तर ते चुकिचे ठरावे. प्रत्यक्षात तसे होणे (म्हणजे बी. पी. ने पैश्याअभावी जबाबदारी घेणे नाकारणे) अनेक कारणांने असंभव आहे. एकतर कॉर्पोरेट इमेज जपणे कुठल्याही मोठ्या कंपनीस जरूर असते. दुसरे इथे एका बलाढ्य देशाच्या सरकारशी सामना आहे (तुलनेने पहा: भारत सरकार व युनियन कार्बाईडः भोपाळः १९८४). तिसरे बी. पी. कडे पैसा आहे.

आताच फा. टा. मध्ये वाचले की बी. पी. च्या चेयरमन श्री. स्वानबर्ग ह्यांनी म्हटले आहे की डिव्हिडंड देण्याचा निर्णय सर्वस्वी बोर्डाचा असून त्याबद्दद्ल घोषणा २७ जुलैच्या दुसर्‍या क्वार्टरच्या रिझल्टच्या घोषणेच्या किंचित अगोदर करण्यात येईल. बातमीत असेही पुढे म्हटले आहे की तोंवर बी. पी. ला ह्या सगळ्या दुर्घटनेची एकंदरीत किंमत किती चुकवावी लागेल ह्याचाही अंदाज आलेला असेल.

ही बातमी असेही नमूद करते की 'Tony Hayward, the chief executive, stressed that strong cash flow and low debt meant that BP could "meet its obligations to all stakeholders", including investors, employees and local communities, in spite of downgrades this week from credit rating agencies.

He said the company had hundreds and thousands of shareholders-- 40 per cent of them in the US-- who "depend on BP for part of their financial security" '.

डिव्हीडंड दिला जाईल पण तो नेहमीइतका नसेल असे मानण्यास जागा आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

5 Jun 2010 - 3:31 pm | अविनाशकुलकर्णी

५००० हजार कोटी रुपयाच्या नुकसानीचा अंदाज आहे असे ऐकले

प्रदीप's picture

6 Jun 2010 - 7:37 am | प्रदीप

ह्याची एकंदरीत किंमत--तेल गळती बंद करणे, नंतर सफाई व ह्यातून उद्भवणार्‍या कायदेशीर बाबींसाठी येईल तो खर्च (केसेस वगैरे) --- बी. पी. ला सुमारे यू. एस. डॉ. ३५ बिलियनपर्यंत जाईल असे म्हटले जाते.

अगोदरच ह्या पाश्चिमात्य देशानी पर्यावरणाची वाट लावुन ठेवली आहे.
वेताळ

विकास's picture

5 Jun 2010 - 6:11 pm | विकास

अगोदरच ह्या पाश्चिमात्य देशानी पर्यावरणाची वाट लावुन ठेवली आहे.

हे विधान (आपली जबाबदारी लक्षात ठेवूनही) जरी पूर्ण पटले तरी तेल गळतीमुळे मॉन्सूनला काही त्रास होईल असे वाटत नाही. किंबहूना पर्यावरण बदलाशी पण याचा काही प्रत्यक्ष संबंध येईल असे वाटत नाही.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)