एक वाक्य-उत्क्रांतीचा प्रयोग -- रामोन ल्युलचे कविता-यंत्र - भाग ३ - शब्दखेळाची चौकट

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
23 Apr 2010 - 2:53 am

अनुक्रमणिका
लेखनसार
प्रास्ताविक
शब्दखेळाची चौकट
प्रयोगनिष्पत्ती आणि विश्लेषण
भाष्य
मूळ आधारसामग्री आणि प्रयोगाचे दुवे

- - - -

शब्दखेळाची चौकट

या शब्दखेळाची चौकट व्याकरण शास्त्रातली आहे, मात्र तपशिलांची स्फूर्ती विंदा करंदीकरांच्या एका कवितेमधली आहे.

व्याकरणशास्त्रामधली चौकट
कुठल्याही भाषेतल्या वाक्यांचे काही साचे असतात, उदाहरणार्थ : नाम-हा-कर्ता + नाम-हे-कर्म + सकर्मक-क्रियापद. या साच्यामध्ये अगणित वाक्ये बसवता येतात. चौकट असली म्हणून अर्थाच्या स्वातंत्र्यावर फारशी मर्यादा पडत नाही. म्हणजे या चौकटीमध्ये "मुलगी पेरू खाते" हे साधे तथ्य, "शत्रू मातृभूमीला विटाळतो" असा ईर्षायुक्त उद्वेग, "सद्गुरू साधकाला तारतो", हा आध्यात्मिक उपदेश, "आमिर जूहीला पटवतो" हा चित्रपट-शृंगार, कितीतरी वेगवेगळे अर्थ सांगण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहाते.

रामोन ल्युल या कातालान तत्त्ववेत्त्याने यावरून एका यंत्राची कल्पना केली. वाक्याच्या पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, अशा प्रत्येक स्थानावर येऊ शकणार्‍या शब्दांची यादी करावी. प्रत्येक यादी एका-एका चक्रावर लिहावी. चक्रे फिरवली, तर प्रत्येक यादीतला कुठला-ना-कुठलातरी शब्द समोर येईल. त्या सर्व शब्दांना जुळवून अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. या यंत्रामध्ये भाषेतली सर्व अर्थपूर्ण वाक्ये बनवण्याची शक्ती असेल. या यंत्राला त्याने ""महा-सर्वसमावेशक-यंत्र" (Ars Magna Generalis)" असे नाव दिले. अर्थातच सर्व वाक्ये बनवण्यासाठी काळ बेसुमार लागेल - ते या यंत्राचे प्रयोजन नाही. यंत्रातून सत्य/मिथ्या, सुंदर/कुरूप, अशी सर्व प्रकारची अर्थपूर्ण वाक्ये तयार होतील. म्हणजे यंत्रातून जे येते, ते सत्य-शिव-सुंदर असेल, असेसुद्धा यंत्राचे प्रयोजन नव्हे. मात्र यंत्रामधून आधी कधीही न सुचलेला नाविन्यपूर्ण विचार उद्भवू शकतो. हे यंत्राचे प्रयोजन होय. या यंत्रातून निघणारे यादृच्छिक नाविन्य वाचकांच्या कौलामधून उत्क्रांत करायचा हा प्रयोग होता.

प्रयोगात खेळाडूंना रोचक वाटावी अशी कुठलीतरी चौकट निवडावी, म्हणून विंदा करंदीकरांच्या कवितेमधील एक कडवे घेतले :

पर्‍या होतात
शेवटी लठ्ठ
असे म्हणाला
एक मठ्ठ

चौकट अशी :
कर्ता (१) क्रिया-करतो (२)
क्रियेच्या तर्‍हेने (३) कर्त्याच्या तर्‍हेने (४)
त्या संदर्भात (५) क्रिया-करतो (६)
अमुक तर्‍हेचा (७) दुसरा कर्ता (८)

कोणाला व्याकरणाच्या संज्ञांची ओळख असल्यास :
(१) कर्ता१ (२) क्रियापद१ (३) क्रियाविशेषण१ (४) विशेषण१; (५) क्रियाविशेषण२ (६) क्रियापद२ (७) विशेषण२ (८) कर्ता२

यात वैशिष्ट्य असे आहे, की दोन उपवाक्ये जोडलेली आहेत : १-२-३-४; ५-६-७-८. म्हणजे दोन अवयव आहेत. रंजक जोडवाक्य हवे असेल तर प्रत्येक उपवाक्यातले तपशील परस्परांच्या सहकार्याने अर्थनिर्मिती करतील. "कर्ता-क्रियापद..." असा क्रम खेळातील नियमातच आवश्यक असला तरी उपवाक्यांमधील सहकार्य मात्र आवश्यक नाही. असे रंजक उपवाक्य तयार होण्यातच खेळातले मनोरंजन आहे. हीच प्रयोगातली चाचणीदेखील आहे.

वाक्याचे आठ घटक आहेत :


पर्‍या
गंधर्व
ढग
फूल
राजपुत्र
राणी
गाणी
किंकाळ्या
मार्दव
काठिन्य


होतात/होतो/होते
जातात/जातो/जाते
खातात/खातो/खाते
पडता...
उडता...
रडता...
जिंकता...
झोपता...
मळता...
बरसता...


शेवटी
सुरुवातीला
मध्ये
अधूनमधून
पुरते/पुरत्या
वेगाने
बळेच
आस्ते
उद्या
आताशा


लठ्ठ
सुंदर
गोल
चौकोनी
फोफसा
शूर
हलका
शेलका
वेडा
शाहाणा


असे
तसे
वेगळे
पुन्हा
जोरात
हळूच
मोहरून
रडून
चिडून
चाचपडत


म्हणाला/ली/ले/ल्या
झाला
रडला
उखडला
झोपला
उठला
निसरला
जगला
मेला
फसला


एक
दुसरा
शाहाणा
वेडा
रोडका
बुटका
तांबूस
धुरकट
लाघवी
लबाड


मठ्ठ
राजा
इंजिन
घोडा
केळे
रस्ता
आकाश
पाताळ
गोडवा
चमत्कार

(प्रत्येक रकान्यातल्या पहिल्या अधोरेखित शब्दाची स्फूर्ती विंदांकडून.) खेळात मात्र शब्द विंदांचे योजायचे नाहीत, तर यादृच्छिक योजायचे होते. कोणालाही सहज मिळतील असे जवळजवळ रँडम आकडे खेळून शब्दांची "लॉटरी" बनवायची आहे. (नाहीतर "रँडम" म्हणून प्लँचेटची वाटी प्रयोगकर्ताच मुद्दमून सरकावतो आहे, अशी कोणाला शंका यायची.) असा यादृच्छिक संख्यांचा सहज उपलब्ध क्रम मिळवण्यासाठी येथील एका सन्माननीय सदस्यांच्या नावातून स्फूर्ती मिळाली. "पाय" या गणिती संख्येचे आकडे जर दोन-घातांकात (बायनरी, बेस-२) मध्ये लिहिले, तर आकड्यांचा क्रम यादृच्छिक आहे अशी सिद्धता झालेली आहे. कुठल्याही घातांकात ही संख्या लिहिली, तरी आकड्यांचा क्रम यादृच्छिक असावा असा कयास करता येतो. म्हणून नेहमीच्या दशमानपद्धतीतला "पाय"च्या आकड्यांचा क्रम "रँडम" म्हणून घेतलेला आहे. पहिले ८-८ आकडे घेतले. पहिली ओळ अशी :
(3.)14159265
पहिल्या रकान्यातला १ला शब्द "पर्‍या", दुसर्‍या रकान्यातला ४था शब्द "पडतात", तिसर्‍या रकान्यातला १ला शब्द "शेवटी"...
(कधी ० आले, तर दहावा शब्द घ्यायचा...). त्यातून हे वाक्य मिळते :
14159265
१. पर्‍या पडतात शेवटी फोफशा चिडून झाले बुटके केळे.

प्रथम अशी चार वाक्ये जोडून बनवली. ही वाक्ये मिसळपावावर "कौलाचे पर्याय" म्हणून दिली, आणि पैकी दोन वाक्ये निवडायची विनंती मिसळपावाच्या वाचकांना केली. पुढच्या प्रत्येक कौल-पिढीत मागे निवडलेल्या वाक्यांमध्ये एका वेळेला एकच शब्द यादृच्छिक रीतीने बदललेला आहे. त्यासाठी "पाय"च्या आकड्यांची अशी २-२ची फोड केली आहे. यात समजा "३५" आकडा आला, तर ३र्‍या शब्दाच्या जागेवर तर (तक्त्यामधील ३र्‍या रकान्यातला) ५वा शब्द तितका बदलून घालायचा.

प्रत्येक वाक्याची तीन अपत्ये होतात. पहिल्या अपत्य-वाक्यात काहीही बदल केला नाही. दुसर्‍या आणि तिसर्‍या अपत्य-वाक्यांत वेगवेगळ्या यादृच्छिक आकड्यांनुसार एक-एकच शब्द बदलला. दोन वाक्यांची अशी सहा अपत्ये पुन्हा "पैकी दोन निवडा" अशा कौलात मांडून ठेवण्यात आली.
प्रत्येक कौल साधारणपणे २४ तास उघडा ठेवण्यात आला, त्या काळानंतर सर्वाधिक मते मिळालेली दोन वाक्ये पुढल्या पिढीत प्रसवण्यासाठी निवडली गेली. प्रत्येक कौलानंतर दोनच वाक्ये जिवंत राहात. पुढच्या फेरीत वरची दोन वाक्ये/पिलावळ = ६ वाक्ये उतरत. बाकी सर्व गळून पडत. त्या पुढच्या पिढीत दोन जिंकलेली वाक्ये पिलावळ प्रसवत. सहा नवी वाक्ये त्या पुढच्या कौलामध्ये मांडलेली असत. त्यातूनही दोनच निवडून जिवंत राहात...

या प्रयोगात चौकटीची वाक्ये तगवण्याची क्षमता ("कॅरिइंग कॅपॅसिटी") = २ वाक्ये
मात्र प्रत्येक वाक्याची प्रजननक्षमता = तिप्पट.

प्रत्येक पिढीतून २/६ जिवंत राहात, प्रजनन करत, तर ४/६ नि:शेष होत.
एकूण दहा पिढ्या/कौल खेळाडूंसमोर मांडण्यात आले.

(टीप १: वाक्यात आठच शब्द असल्यामुळे काही २-आकडी यादृच्छिक संख्या वापरता येत नाहीत, त्या बाद ठरतात. उदाहरणार्थ दोन-आकडी यादृच्छिक संख्या ९२ अशी आल्यास ९वा शब्द बदलायची वेळ येईल. म्हणून ती संख्या वगळून पुढली दोन-आकडी संख्या निवडली गेली. नि:संदर्भ संख्या वगळण्यामुळे रॅंडमपणात काही दोष येत नाही, अशी गणिती सिद्धता करता येते.
टीप २: यादृच्छिक आकड्यानुसार बदलूनही तोच-तोच शब्द निवडला गेला, तर पुढच्या पिढीत अनेक वाक्ये एकसारखी उपजू शकतात. ज्या पिढ्यांमध्ये तशी उपजली, तर यादृच्छिक निवडीचा मान राखून तेच वाक्य कौलामध्ये दोन-दोनदा दिले.
टीप ३: प्रयोगाच्या संकलनकर्त्याने कुठल्याही कौलात भाग घेतला नाही.
टीप ४: पहिल्या भागात संकलनकर्त्याने (मी, धनंजयने) एक चूक केली - तिथेच मी कबुली दिली होती ("एक चुकीचा शब्द - क्षमस्व"). चुकीचा शब्द दुसर्‍या वाक्यातला पहिला शब्द होता : "ढग" ऐवजी "फूल". असे तक्त्यातल्या चुकीच्या ओळीचे वाचन मी निर्हेतुकपणे केले होते. शिवाय प्रत्येक पिढीत खेळाडूंनी "फूल" हा अर्थ मनात धरूनच मते दिलीत. म्हणून विश्लेषणही "फूल" हा शब्द गृहीत धरूनच करणार आहे.)

(क्रमशः)

वाङ्मयविज्ञानअनुभवमाहिती