नशीब भाग ४१ ते ४५ एकत्रित
नशीब हे शिकलो - भाग ४६ 9/12/09
ओमान मधील त्या पहिल्या कंपनीतील काही अनुभवातून एखादी कंपनी फायदा किती प्रकारातून किती पटीने मिळवण्याचे प्रयत्न करते हे मी शिकलो. मी नकाशे छपाईचे साधन दुरुस्तीचे काम ६ वर्ष करीत होतो. ह्या छपाई साधनात एका मोठ्या काचेच्या नळीत ३ ते ५ फ्लोरुसेंट प्रकाश नळ्या होत्या. ती प्रत्येक नळी १४० वॉटची होती. त्या प्रकाश नळ्या दोन कारणाकरिता बदलणे आवश्यक होते. नकाश्याचा कागद आत अडकला की काचेची मोठी नळी व त्यामुळे आतील सगळ्या प्रकाश नळ्यांसकट फुटायच्या. हेच प्रमाण जास्त होते. नाहीतर प्रकाश नळीची प्रकाश क्षमता कमी झाल्याने बदलणे आवश्यक होते. त्या ६ वर्षात मी एकट्याने २०० च्या आसपास प्रकाश नळ्या व २० मोठ्या काचेच्या नळ्या बदलल्या होत्या.
ओमानची ती कंपनी ब्रिटन मधील एका नावाजलेल्या कंपनीचीच एक शाखा होती. प्रत्येक सुटे भाग, साधने व उपकरणे ब्रिटन मधल्या मुख्य कंपनीच्या निर्यात विभागाकडून आयात करीत होती. त्या नकाशे छपाई साधनातील त्या प्रकाश नळ्या ह्याच मार्गाने आयात झाल्या होत्या. ग्राहकाला प्रत्येक प्रकाश नळीची किंमत ६० रियाल होती. काही कारणाने ५ - ६ महिने त्या प्रकाश नळ्या आयात झाल्या नाहीत, १५ नळ्या बदलणे आवश्यक होते. ग्राहक मला सारखे विचारत होते म्हणून मी मस्कत मधील फिलिप्स व्रिक्रेत्याकडे गेलो त्याच्या कडून कळले की तिच प्रकाश नळी तो ६ रियालला देऊ शकेल पण २५ नळ्या घ्याव्या लागतील. मला समजेना मस्कतला ६ रियाल किमतीची प्रकाश नळी मिळते मग आमची कंपनी ६० रियालला का विकते ? त्यात एका ग्राहकाने ब्रिटनहून येताना ६ नळ्या आणल्या त्याला प्रत्येक नळी एका साध्या दुकानात फक्त २ रियालला मिळाली.
मी शोध सुरू केला. आमच्या कंपनीचा ब्रिटनमधील निर्यात विभाग ति एक प्रकाश नळी फक्त दीड रियालला विकत घेऊन मस्कतला पाठवणार्या बिलात ११ रियाल किंमत दाखवीत होता. मस्कतला त्याच नळीची किंमत हाताळणी खर्चा सकट ३३ रियाल हिशेब वही दाखवीत होती. दुरुस्ती विभाग ग्राहकाला ६० रियाल किमतीने विकत होता. दुरुस्ती सेवा खर्च वेगळा होता. वाचकहो ह्या परदेशी कंपन्या कसा पैसा लुटतात ह्याचा मी बघितलेला हा एक नमुना.
नमुना क्रमांक दोन. मस्कतला एकदा खूप जोरदार पाऊस झाला होता. विमान तळावर कस्टम विभागात पाणी शिरल्याने बरेच नुकसान झाले होते. मी ज्या कंपनीत कामाला होतो त्यांचे बरेच सामान त्या विमान तळावर पाण्याखाली होते. त्यातलेच दोन नवीन सुक्ष्मचित्र वाचक (मायक्रोफिल्म रिडर) होते. विमा असल्याने त्या दोन वाचकांच्या (रिडर) पैशाची पूर्ण परतफेड मिळाली होती. विमा कंपनी ह्याच कंपनीचा एक विभाग होता. महत्त्वाचे हे की ति पाण्यात बुडलेली दोन वाचक उपकरणे मला दुरुस्त करायला दिली व नीट स्वच्छ करून नवीन म्हणून पूर्ण किमतीला विकली. एकाच उपकरणावर दोनदा पैसा मिळवला त्यातला एक टक्का देखील मला मिळाला नाही.
नमुना क्रमांक तीन. ह्याच कंपनीत मी एक १६ मी.मी. चित्रफितीचा सुक्ष्मचित्र प्रतिमा ग्राहक दुरुस्त केला होता. हा प्रग्रा एका बॅंकेच्या अडगळीत पडलेला होता व आतल्या बर्याच वस्तू नाहीश्या झाल्या होत्या. तो प्रग्रा मी १५ दिवसात आवश्यक सुटे भाग बदलून पुन्हा कार्यरत केला होता. त्याचे ७०० रियाल फक्त मजुरीचे व २२०० रियाल सुट्या भागांचे सेवा विभागाला मिळाले होते. मी ते काम केल्याचे विसरलो होतो. परंतु सेवा विभागाच्या ब्रिटिश प्रमुखाने त्याचा उल्लेख महिना अखेरच्या बैठकीत करून किती जास्तीचा फायदा झाल्याचे कौतुक केले. मी त्याला त्याचा किती रियाल फायदा मला मिळेल असे विचारले असता त्याने मला सरळ अपमानित केले, "यू बास्टर्ड इंडियन, असे विचारण्याचे धाडस तू का केलेस?" मी चूप बसणे शक्यच नव्हते. मी - "मला माझ्या आईबाबांचे नाव माहिती आहे व त्याचा मला अभिमान आहे. मी तुझ्या सारखा अनाथ ब्रिटिश नाही ज्याला स्वत:चा बाप कोण माहीत नाही म्हणूनच बापाचे नाव लावत नाहीस."
प्रकरण चिघळले मी माझी बाजू कंपनीतल्या सगळ्या वरिष्ठांना समजावून सांगितली. मी आमच्या हिशेबनीस मित्राकडून सेवा विभागाच्या हिशेब कसा केला जातो त्याची माहिती मिळवली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या प्रग्राचे बरेच सुटे भाग आमच्याच विभागाच्या गट प्रमुखाने चुकीची कारणे दाखवून नाहीसे केले होते. मी येण्यापूर्वी तो गटप्रमुख दुरुस्तीचे काम करीत असे. ज्या बॅंकेला तो मी दुरुस्त केलेला प्रग्रा दिला होता तिथल्या ओमानी वरिष्ठाला मी जाऊन भेटलो. आमच्या कंपनीने बॅंकेची कशी फसवणूक केली हे समजावून सांगितले. त्याने लगेच निर्णय घेऊन आमच्या कंपनीबरोबर केलेले सगळे खरेदी व दुरुस्तीचे करार रद्द केले. ति ब्रिटिश कंपनी वस्तू व सेवा ह्याचा कसा हिशेब करीत होती ते बघूया पुढील भागात.
नशीब हे शिकलो - भाग ४७ 14/12/09
ओमान मध्ये परदेशिय नागरिकाला कोणताही व्यवसाय करण्याची एक मालक म्हणून परवानगी नव्हती. व्यवसायाचा मुख्य मालक ओमानी असणे आवश्यक होते. सगळे परवाने त्याच्या नावाने असणार. मग परदेशीय नागरिक त्याचा सल्लागार, निर्देशक, अधिकारी वगैरे नात्याने कामाचा परवाना घेऊन ओमान मध्ये राहू शकत होता. तसेच परदेशिय कंपनी एका ओमानी व्यावसायिकाच्या सहयोगाने व्यवसाय करीत असे, त्याला करार ठरल्याप्रमाणे सहयोग हक्काचे पैसे देत असे.
मी जिथे काम केले त्या कंपनीत हाच प्रकार होता. कंपनीत लिकर (दारू), ऑफिस ऑटोमेशन /फर्निचर, एसी / फ्रीज, घरगुती वापराच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू असे विभाग होते. दारू विभागात दोन प्रकार होते. किरकोळ विक्री दुकाने व बर्याच परदेशिय दारू कंपन्यांचे विक्री हक्क असल्याने ठोस विक्री विभाग असाच प्रकार प्रत्येक विभागाचा होता. ह्या सगळ्या विभागांचे हिशेब ठेवणारा एक विभाग होता. व्यक्तीविषेश (पर्सनल) विभाग होता. सगळ्या कंपन्या थोड्याफार फरकाने अशाच असतात. लूट किती टक्क्याने व किती प्रकाराने करायची हे ठरवण्यात प्रत्येक कंपनीचे वेगळेपण होते.
कंपनी मूळ ब्रिटनची होती, कंपनीचा निर्यात विभाग प्रत्येक वस्तूची किंमत ५ ते १५पटीने वाढवीत असे, ही वाढ वस्तूचे महत्त्व काय होते त्याला सापेक्ष होती. मागील भागात वर्णन केलेल्या प्रकाश नळीचे महत्त्व ठरवून ८ पटीने वाढीव किमतीला ओमानला पाठवली जात होती. मस्कतला ति ३ पटीने वाढलेली होती. व सेवा विभाग ग्राहकाला विकताना त्या तीन पट वाढलेल्या किमतीला दुपटीने वाढवून विकत होता. ह्याचा अर्थ मस्कतच्या ग्राहकाला एका प्रकाश नळीची किंमत ३०पटीने द्यावी लागत होती. मस्कतची फिलिप्स कंपनी तिच प्रकाश नळी फक्त ३पटीने वाढलेल्या किमतीत ग्राहकाला देत होती. ही मूळ ब्रिटिश कंपनी त्याकाळात मस्कतला ५०० ते ८०० प्रकारच्या वस्तू विकून कायदेशीर लूट करण्यात यशस्वी झाली होती. अशी लूट दर दिवशी एका कंपनीची काही हजार रियालची होती. अशा चारपाचशे परदेशीय कंपन्या त्या काळात ओमानला होत्या. दर दिवशी किती हजाराची लूट होत असावी?
मी ज्या सेवा विभागात कामाला होतो त्याचे उत्पन्न माझ्या सारख्या १० तंत्रज्ञांच्या प्रयत्नानवर होते.आम्ही कमावलेल्या पैशातून आम्हा सगळ्यांचा पगार, एक लेखनीक, ब्रिटिश विभाग प्रमुख, एक मदतनीस व एक वाहन चालक त्यांचा पण पगार त्यात होता. आम्हा ५ तंत्रज्ञांचा पगार एकट्या ब्रिटिश प्रमुखाचा होता. मी एकटा दर दिवशी कामाची मजुरी म्हणून सेवा विभागाला १०० ते २०० रियाल मिळवून देत असूनसुद्धा सात वर्षात दर दिवशी सरासरी ८ ते १५ रियालच्या पुढे गेलो नाही.
ह्या सगळ्या अनुभवातून मी १९९० ला ती कंपनी सोडली १९९१ला एका मायक्रोफिल्म सेवा कंपनीत सेवा प्रमुख म्हणून कामाला लागलो. ही कंपनी एका ओमानी सरकारी अधीकार्याची होती. मला ५०० रियाल पगार मिळत होता. त्या कंपनीत मी, एक इजिप्शियन मदतनीस व एक केरळी हिशेबनीस असे तिघेच होतो. ६ महिने काम सुरळीत झाले ८ व्या महिन्यात त्या कंपनीचे दुसर्या कंपन्यांशी केलेले मायक्रोफिल्म सेवा करार नव्याने सुरू करण्याची वेळ आली. ति करार पत्रे मला न दाखवता केरळी हिशेबनीसाने तयार करून पाठवली होती. एका संध्याकाळी मी, मालक व त्याचा बॅंकेतला मित्र एकत्र बसलो होतो. मालकाने ति करार पत्रे मला दाखवली, त्यावर अजून सह्या झाल्या नव्हत्या, त्या करार पत्रां प्रमाणे पुढील वर्षातील मिळकत निम्म्याने कमी होणार होती. बॅंकेला ते मंजूर नव्हते कारण जुन्या करार पत्रांच्या मूळ रकमेच्या आधारावरच कंपनीला कर्ज मिळाले होते.
केरळी हिशेबनीसाने खूप मोठी चूक केली होती ती मी त्या दोघांना दाखवली व समजावून सांगितली. कंपनीने प्रत्येक तयार मायक्रोफिल्म कार्डाची किंमत ०.५ रियाल दाखवली होती, पूर्वी तिच ०.८ रियाल होती. दुरुस्ती सेवा दर ताशी २० रियाल दाखवला होता. पूर्वी तो दर ३० रियाल होता. कारण कंपनीला नव्याने होणार्या स्पर्धेत टीकण्या करिता केरळी हिशेबनीसाला हाच एक उपाय सुचला होता. मुळातच सगळ्या किमती ठरवण्यात चूक झाली होती. कंपनीचा महिन्याचा संपूर्ण खर्च दर ताशी ह्या हिशोबाने ५०रियाल होता. एका तासात ३० ते ३५ कार्ड तयार होत असे. त्यातही एका महिन्याची कार्ड संख्या व दुरुस्ती सेवा कामे निश्चित नव्हती. हा हिशेब न करता केरळी हिशेबनीसाने ०.५ रियाल दर कार्डाला दाखवला होता. तेच दुरुस्ती सेवा खर्चाच्याच हिशेबाचे झाले. दर ताशी ६० रियाल मिळाले तरच महिन्याचा संपूर्ण खर्च निघून फायदा होणार ह्याचा हिशेब कधीच केला नव्हता. तो ओमानी मालक डोके धरून बसला होता.
ह्या मायक्रोफिल्म सेवा कंपनीत असताना एक धक्कादायक प्रसंग घडला. एक भारतीय मित्र सकाळी मला भेटायला आला, त्याच्या सांगण्या वरून मी अमेरिकन विमा सुरू केला त्याचे ३०० रियाल हप्त्याचे पैसे त्याने घेतले व तो दुसर्या दिवशी भेटतो सांगून गेला तो कायमचाच. रस्त्यात त्याच्या गाडीला दुसर्या बाजूने येणार्या गाडीने उडवले होते. हा जागीच खपला होता. माझे ३०० रियाल त्याच्या खिशात तसेच होते. त्याने भरलेल्या अर्जा वरून विमा कंपनीने मला तो गेल्याचा प्रसंग सांगितला होता. माझा विमा असा सुरू झाला होता.
ति मायक्रोफिल्म सेवा कंपनी वर्षभरात बंद पडली. त्या ओमानी मालकाला ६०,००० रियालची कर्जफेड करायची होती. माझा नवीन परवाना शोध सुरू झाला. योग चांगले होते १५० रियाल महिन्याला देऊन परवाना मिळाला. त्याने मला ५०० रियाल पगार देतो असे दाखवून माझ्या नावाचा दारूचा परवाना मिळवला. हिंदू व ईसाई लोकांना पगाराच्या १० टक्के दारू विकत घेण्याचा परवाना मिळत असे. दारू फक्त परवाना धारकांनाच विकत व विकण्याची परवानगी होती. ही मुस्लिम मंडळी असे हिंदू व ईसाई मित्र शोधून ठेवायचे. माझ्या परवान्याचा उपयोग माझा ओमानी मित्र ह्याच कामा करता करीत होता. त्याचा फायदा मला खूपदा झाला.
नशीब हे शिकलो – ४८ 22/12/2009
मायक्रोफिल्म सेवा कंपनीत मी १९९१ - ९२ काम केले. जून १९९२ पासून मी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला अर्थात परवाना ओमानी मित्राचा होता त्याचा १५० रियाल सहयोग हक्क दर महिना मी देणार होतो. इथून एक नवा अनुभव सुरू झाला. खिशात एक पैसा भांडवल नसताना परदेशात व्यवसाय कसा करायचा हे एकेक प्रसंगातून मी शिकत होतो. मला दर महिना ५०० रियाल कमावणे आवश्यक होते.
मस्कतच्या गणपती उत्सवात एका मुंबईकराची ओळख झाली होती. त्याने एकदा त्याच्या कंपनीचे महत्त्वाच्या छाया चित्रांचा संच बनवण्याचे काम दिले. त्याच दिवशी रात्री त्यांच्या फर्निचर शोरूम मधील फर्निचरची छायाचित्रे मी घेतली, काम रात्री एकला संपले. पाहाटे ३ ला एक फोटोलॅब काम सुरू करित असे तिथे जाऊन ५० मध्यम आकाराची छायाचित्रे तयार करून घेतली. लगेच ४० की.मी. अंतरावर असणार्या विमान तळावर त्या मित्राच्या हातात सकाळी सात वाजता मी ती छायाचित्रे दिली. त्याची वेळ मी पाळली म्हणून त्याने माझे कौतुक केले. दुबईला नव्याने ऊघडणार्या एका मोठ्या हॉटेलचे फर्निचरचे कंत्राट त्याच्या कंपनीला मिळाले. त्याच कंत्राटा करिता मी वेळेवर फोटो दिल्याने कंपनीच्या मालकाने माझे कौतुक केले.
ते काम बघून कंपनीने मला जाहिरात पुस्तिकेला आवश्यक असणारी छायाचित्रे तयार करण्याचे काम दिले. काही महिन्यांनी ह्याच कंपनीने व्यवसाय संयोजन, विलिनीकरण, आंतर्राष्ट्रीय गुणवत्ता वगैरे विषयांचे पाच दिवसाचे शिबीर आयोजीत केले होते. ह्या शिबिराला बर्याच इतर कंपन्यांचे अधिकारी प्रशिक्षण घेण्याकरिता हजर होते. प्रशिक्षण देणार्या गटात त्या त्या विषयातले तीन नामांकित सल्लागार तीन वेगळ्या देशातून आले होते. मला त्या पाच दिवसाचे रोज आठ तासाचे चलचित्र मुद्रणाचे काम मिळाले होते. हे माझे नशीब. त्या संधीचा मला फार फायदा झाला. पैशात मोबदला चांगला मिळालाच पण अनमोल सल्ला रोज ऐकायला मिळाला. तिथे एक आंतर्राष्ट्रीय व्यावसायिक कोणत्या अपेक्षेने व योजनांनी एक व्यवसाय बहूदेशिय पातळीवर कसा उभा करतो हे शिकलो.
त्या शिबिरांतल्या चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या काळात प्रशिक्षण गटातला वयस्क सल्लागार माझ्या बरोबर जेवायला येऊन बसला. त्याने माझी विचारपूस केली. मी पण संधीचा फायदा घेत त्याला एक प्रश्न टाकला. "एक आंतर्राष्ट्रीय व्यावसायिक ग्राहकाच्या भावना, स्थानिक रिती रिवाज, नीती-अनीतीला त्याच्या व्यवसाय संयोजनात किती महत्त्व देतो?" मी फक्त एक चलचित्रकार म्हणून त्या प्रशिक्षणात उभा नसून कान देऊन नीट ऐकतो आहे हे त्याला जाणवले होते. त्याने माझी पाठ थोपटली. त्याने हसत एका वाक्यात उत्तर दिले. "त्या सगळ्याचा उपयोग करून जास्त फायदा कसा मिळवता येई हाच एकमेव उद्देश असतो, असावा." वाचकहो, समझदारोको इशारा काफी है! तो वयस्क सल्लागार ब्रिटिश होता.
ह्याच कंपनीतून मला एकदा चलचित्र, छायाचित्र व ध्वनी व्यवस्थेचे काम मिळाले मी ६ चॅनल मीक्सर विकत घेतला, २०० वॉट्चा ऍम्प्लीफायर, दोन ऑडिओ टेक्नीकाचे माइक व स्टॅन्ड विकत घेतले, एक्सेलार केबल विकत घेतल्या व ते काम आम्ही - मी, बायको, दोन्ही मुलांनी मिळून पूर्ण केले. सगळ्यांनीच आमचे कौतुक केले. अजून महाजालाचे जाल मस्कतला पसरले नव्हते त्यामुळे चलचित्र, छायाचित्र व ध्वनी व्यवस्थेची माहिती फक्त मासिकातून मिळवण्याचे खूप प्रयत्न केले. बर्या पैकी माहिती मिळवली.
मी गेले काही दिवस शब्दगारवाच्या कामात व माझ्या ह्या ब्लॉगची टेम्प्लेट बदलण्यात गुरफटलेलो होतो. १२/१२/२००९ च्या रात्री महाराष्ट्राला भूकंपाचा धक्का बसला व मला जून १९९० चे दिवस एकदम आठवले. त्या वर्षी बायको दोन्ही मुलांना घेऊन ईराणला गेली होती. मी मस्कतला होतो रात्री दूरचित्रवाणीचा कार्यक्रम बघत बसलो होतो व इतक्यात इराणला भूकंपांचे हादरे बसले असून भागाचे वर्णन दाखवायला सुरुवात झाली व अभार गावाचे नाव ऐकले आणि मला काय करावे सुचेना कारण अभार गावापासून १० की. मी. अंतरावर बायकोच्या आईचे घर आहे. मला फोन करणे शक्यच नव्हते. तरीही दोनदा फोन फिरवून बघितला इराणचा कोड फिरवताच व्यस्त संदेश मिळत होता. पण बातमी पुन्हा लक्ष देऊन ऐकली जागेचा नकाशा दाखवला तेव्हा समजले अभार जवळील डोंगरात व पलीकडच्या भागात कैक गावे नाहिशी झाली होती तिथे असलेल्या मोठ्या धरणाचे बरेच नुकसान झाले होते. परंतु अभार गाव सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले होते.
मला रात्री केव्हा झोप लागली समजले नाही. पण सकाळी उठून पुन्हा दूरचित्रवाणी च्या बातमीत काही दिसेल का ह्याचा शोध घेतला. हेलीकॉप्टरने घेतलेली चलचित्रफित बघायला मिळाली त्यात तो सगळा परिचित भाग सुरक्षित दिसला तोच एक दिलासा. परंतु त्या धरणापासून एका सरळ रेषेत २०० ते ५०० वस्तीची कैक लहान खेडी नाहिशी झालेली दिसत होती. त्या खेड्यां मधून मी कितीतरी वेळेला प्रवास केला होता. आम्ही त्या झाडीतून सुटीच्या दिवशी भटकायला जात होतो. तीन दिवसा नंतर बायको-मुलांचा आवाज ऐकायला मिळाला, मी लगेच १० दिवसाची सुटी घेऊन इराणला गेलो बायको-मुलांना घेऊन परतलो, कंपनीने नोकरीतून काढण्याचा त्या महिन्यातील दुसरा हादरा दिला होता. पण मी सावरलो होतो
नशीब हे शिकलो – ४९ 25/12/2009
चलचित्र, छायाचित्र व ध्वनी व्यवस्थेचे काम करताना माझी धावाधाव व जमावाने केलेले माझे कौतुक बघून माझ्या बायकोने एकदम छायाचित्रण शिकण्याचे मनावर घेतले. सुरुवात झाली चित्र रिळाचे प्रकार प्रतिमा ग्राहकात (कॅमेरा) कसे चढवायचे. मग प्रग्राचे प्रत्येक भाग काय / कसे काम करतात. केव्हा कोणत्या भागाचा का / कसा उपयोग करायचा असे प्रशिक्षण मी तिला देणे सुरू केले. रोज एक रीळ छायाचित्रण सवयी करता संपायचे. महाराष्ट्र मंडळाचे दर दोन तीन महिन्यातून कार्यक्रम होत असत त्यातून तिला छायाचित्रण करण्याची सवय झाली. त्या छायाचित्रांचे आम्ही दोघे विश्लेषण करायचो. छायाचित्राच्या चौकटीत महत्त्व वस्तूचे की व्यक्तीचे असावे, त्या करता चौकट पूर्ण भरण्या करता प्रतिमेचा आकार चौकटीत केवढा असावा, त्या करता फेरभिंग (झूम लेन्स) कसे हाताळावे. तिला फेरभिंगाची सवय होण्याकरता ३५ - १०५ चे फेरभिंग मी विकत घेतले.
एका ओमानी लग्नात तिला छायाचित्रणाचे पहिले काम मिळाले. निकॉन एफ ४०१ प्रग्रा - प्रतिमा ग्राहक (कॅमेरा), सनपॅक क्षप्र - क्षणिक प्रकाश (फ्लॅश) आणि फुजीची १०० ए एस ए ३६ चित्रफितीची चार रिळे तिला मी दिली होती. आईच्या मदतीला १० वर्षाचा आमचा मोठा मुलगा आत बाहेर करित होता. मी व लहान ४ वर्षाचा मुलगा बाहेर गाडीत बसून होतो कारण ओमानी लग्नात कोणत्याही पुरुषाला आत मज्जाव होता. एकूण १४४ छायाचित्रां ऐवजी १०० च्या आसपास छायाचित्रांचा संच तयार झाला होता. बर्याच छायाचित्रांचा क्षप्रचा(फ्लॅश) प्रकाश कमी किंवा जास्त झाला होता. छायाचित्रातील उभ्या - आडव्या वस्तू चित्र चौकटीला समांतर नव्हत्या त्यामुळे व्यक्ती डावीकडे नाहीतर उजवीकडे झुकलेल्या दिसत होत्या. व्यक्तिचित्रात हा दोष डोळ्याला खटकतो व छायाचित्राचा दर्जा खाली घसरतो, ग्राहकाला अशी छायाचित्रे आवडत नाही. हे टाळण्याकरता बायकोने प्रग्रातून (कॅमेरा) दृश्य बघताना उभ्या - आडव्या वस्तू चित्र चौकटीला समांतर ठेवण्याचा भरपूर अभ्यास केला. क्षप्र (फ्लॅश) उपकरणाला बाहेरुन जास्तीचा वीज पुरवठा देणारा संच विकत घेतला. क्षप्र, झरोका (ऍपरचर) व पडद्याचा वेग (शटर स्पीड) ह्यांचा योग्य समतोल साधला गेला.
पुढील सहा महिन्यात ३ चित्ररिळातील १०८ छायाचित्र अचूक घेण्यात माझी बायको यशस्वी ठरली. तिला एका लग्नाच्या छायाचित्रणाचे १३० रियाल मिळत होते त्यातून ३० रियाल खर्च होता व १०० रियाल फायदा+मजुरीचे मिळत होते. महिन्यातून तिची एकटीची कमाई ५०० रियाल झाली. एका कार्यक्रमात ती छायाचित्रणाचे काम करीत असताना प्रग्राचे (कॅमेरा बॅक) मागचे झाकण एकदम उघडले. बायको अतिशय घाबरली होती. घरातला दुसरा प्रग्रा निकॉन एफ ८०१ तिला हवा होता. मी लगेच तो तयार करून १० मिनिटात त्या जागी गेलो. माझा मुलगा ८०१ प्रग्रा देऊन ४०१ कपड्यात घट्ट बांधून घेऊन आला. मी सर्वप्रथम अंधारात चित्रफीत परत फिरवून रिळात पूर्ण बंदिस्त झाल्याची खात्री केली, मग प्रग्राची तपासणी केली. मागील झाकणाला घट्ट धरून ठेवणारी प्लॅस्टिकची कळ तुटली होती. घरी न जाता काम संपेस्तोवर गाडीत बसून होतो. बायको फार काळजीत होती. त्या कार्यक्रमातल्या बायका तिला बाहेर सोडायला आल्या होत्या. दुसर्याह दिवशी निकॉन विक्रेत्याने मला एफ ५० प्रग्राचा बीना भिंगाचा भाग १८५ रियालला दिला. दोन दिवस नवीन प्रग्राचा अभ्यास केल्यावर बायको खूश होती.
छायाचित्रणाच्या बरोबरीने तिने चलचित्रणाचे काम मिळावे म्हणून माझ्या कडून चलचित्र ग्राहकाचे (व्हिडिओ कॅमेरा) प्रशिक्षण व अभ्यास सुरू केला. चलचित्र माध्यमात बर्याच गोष्टींचा अभ्यास व सराव करणे अत्यंत आवश्यक असते. ध्वनिग्रहण, तिपायी, विविध रंगाचे प्रकाश, चित्रफीत, प्रासंगिक संपादन, द्रुश्राव्य स्थिती दर्शक (एव्ही मॉनिटर). बायकोने हे सगळे शिकून घेतले व सगळ्यात कौतुक हे की एकटी मदतनीस न घेता छाया व चलचित्रण करीत होती. पहिलेच काम ६०० रियालचे मिळाले. काम छान झाले होते. चलचित्राचे शीर्षक अमीगा / कमोडोर संगणकाने मी करून देत असे. चलचित्रणा करता तीन तासाची चित्र फीत व तीन बॅटरी संच आम्ही वापरत होतो.
मला दोन वा तीन चलचित्र ग्राहक वापरण्याची कामे मिळू लागली. माझी चित्रग्राहक साधने गृहोपयोगी पद्धतीची असल्याने थेट (लाइव्ह) मिश्रण शक्य नव्हते. पण चित्रग्राहक निवड करणारे साधन (चार कॅमेरा स्वीचर) वापरून मी उर्दू मुशायरा, क्रिकेट स्पर्धा, हिंदी चित्रपट कलाकारांचे मस्कत मधील खास कार्यक्रम, मोठ्या पडद्यावर दाखवण्याची स्थानिक सेवा देणारा मस्कत मधला पहिला ठरलो. तसेच नवीन गाड्यांचे मोटर शो व घरगुती वस्तूंचे आंतर्राष्ट्रीय प्रदर्शन वर्षातून दोनदा होत असे त्याचे तीन दिवसाचे सकाळ संध्याकाळचे चित्रीकरणाचे काम मला मिळत होते ह्याचे कारण लिफ्टट्रकच्या वर बसून १५ फूट उंचावरून दोनशे - चारशे दुकानांचे व भेट देणार्या ग्राहकांचे अचूक चित्रीकरण करणारा पण मीच पहिला होतो. तसेच अशा उंचावरून छायाचित्राचा वेगळा अनुभव मी प्रेक्षकांना करून दिला होता. व्यावसायिक दर्जाचा वापरलेला चलचित्र ग्राहक कमी किमतीत मिळाला म्हणून मी विकत घेतला. त्याची जेनलॉक पद्धत वापरून गृहोपयोगी पद्धतीचे दोन चलचित्र ग्राहक जोडून प्रथमच प्रत्यक्ष (लाइव्ह ऑन लाइन) मिश्रणाचा प्रयोग करून किरण सेहगल ह्या भारतीय नृत्यांगनेचा तीन तासाचा कार्यक्रम मुद्रित केला होता त्याचे बरेच कौतुक झाले होते.
एका नव्याने सुरू झालेल्या मॉलच्या आत पाश्चिमात्य पद्धतीच्या खानपान गृहाच्या मालकाने मला खाद्य पदार्थांच्या जाहिरातीचे छायाचित्रण करण्याचे काम दिले. ते काम मी त्याच जागेत आजूबाजूला ग्राहक बसले असताना पूर्णं केले. ति छायाचित्रे त्याला खूप आवडली होती. त्याने चित्रांच्या खास दोन फूट उंचीच्या पारदर्शी चौकटी बनवून त्या मॉलच्या आत मोक्याच्या ठिकाणी लावल्या होत्या. त्यातील काही छायाचित्रे इथे जोडली आहेत. ह्या चित्रांचे अप्रूप मला आहे ह्याचे कारण महागड्या क्षप्र - क्षणिक प्रकाश (फ्लॅश अंबरेला स्ट्रोब) चा उपयोग न करता (कारण तेवढे पैसे माझ्या खिशात त्या काळात नव्हते). मी १००० वॉटचे दोन हॅलोजन फ्लड दिवे वापरून ही छायाचित्रे काढली होती. त्याचे मुद्रण करताना प्रत्येक प्रशाळेने (प्रोसेस लॅब) ती छायाचित्रे बिघडवून मला छायाचित्र तंत्राची समज नसल्याचे व्यावसायिक क्षेत्रात मुद्दाम पसरवले होते. शेवटी एका छोट्या प्रशाळेच्या तंत्रज्ञाला १०० रियाल रोख बक्षीस म्हणून देऊन हि चित्रे मुद्रित करून घेतली होती. एकूण ७० चित्रे होती. हे चार नमुने निकॉन पी ९० प्रग्राने डिजीटाइज केले आहेत.
नशीब हे शिकलो – ५० 30/12/09
माझा मोठा मुलगा पाचवीच्या वर्गात शिकत असताना शाळेच्या एका हिंदी नाटकात त्याने एक महत्त्वाची भूमिका केली होती. एका कुटुंबातील चोटीराम नावाच्या घरगड्याची ती एक विनोदी भूमिका होती. धोतर, पंचा, बनियन, मिशी, टक्कल वर एक शेंडी एक सामान्य घरगडी. पहिल्या पाच मिनिटातच त्याने प्रेक्षकांना हसवायला सुरू केले होते. त्याच्या प्रत्येक प्रवेशाला टाळ्यांनी स्वागत झाले. कार्यक्रमाच्या शेवटी त्याला उत्तम भूमिकेचे पहिले पारितोषिक मिळाले. आलेल्या पाहुण्यांनी व काही पालकांनी त्याला खूप बक्षिसे दिली. त्या प्रसंगाचा जो परिणाम माझ्या मुलावर झाला त्याने नशीब, योग वगैरे असते ह्याचा अनुभव नव्यानेजाणव ला. दोन दिवसातच त्या प्रसंगाचे परिणाम घडू लागले. हिंदीच्या शिक्षकाला वगळून इतर विषयाच्या शिक्षकांनी माझ्या मुलाला वर्गा बाहेर उभे करणे, आम्हाला मुलाविरुद्ध खोट्या तक्रार चिठ्ठ्या पाठवणे वगैरे त्रास देणे सुरू केले होते. त्या तक्रारी खोट्या असण्याचे पुरावे मी गोळा केले होते.
काही महिन्यातच शाळेच्या एका कार्यक्रमात माझ्या मुलाने काम करावे म्हणून आग्रह सुरू झाला. मी शिक्षकांनी पाठवलेल्या तक्रार चिठ्ठ्यांचा संच घेऊन मुख्याध्यापकाची भेट घेतली. तक्रार चिठ्ठ्या पाठवणारे शिक्षक म्हणण्याच्या लायकीचे नाहीत व त्यांनी पुन्हा माझ्या मुलाला कार्यक्रमात भाग घेण्याचा आग्रह करू नये. कोणताही त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई मी करणार असे ताकीद देऊन आलो होतो. सहावी - सातवी च्या वर्गात फारसे त्रास दायक घडले नाही. माझ्या मुलाची वाढ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हावी ह्या उद्देशाने त्याला मी लेगो खेळाचे सुटे भाग आणून दिले व त्याच्या बरोबरीने खेळायला सुरुवात केली त्याचा त्याला आज खूपच फायदा झाला आहे. मी ह्या खेळाचे सुटे भाग जमवण्यात १५०० रियाल खर्च केले होते. त्या लेगोचे हे काही नमुने.
माझ्या अमिगा संगणकाचा मला चलचित्राच्या शीर्षक बनवण्यापलीकडे दुसरा कोणताच उपयोग होत नव्हता. अमिगाचे दर महिन्याला येणारे मासिक वाचून त्या संगणकाने नवीन काही करता येईल का ह्याचा शोध सुरू झाला. त्या मासिकातून ऍपल मॅकिनतॉश ह्या संगणकाचा उल्लेख बर्यायच वेळेला वाचला होता. त्या संगणकाचा एक विक्रेता मस्कतला होता. हा संगणक विभाग व फुजी फिल्म हा विभाग एकाच मालकाचा असल्याने माझे संबंध वाढले कारण दर महिन्याला मी व बायको ५० पेक्षा जास्त फुजी चित्र रिळे घेणारे व छपाई करून घेणारे महत्त्वाचे ग्राहक होतो. सकाळच्या रिकाम्या वेळात मी ऍपल मॅकिनतॉश विक्री केंद्रात जास्त वेळ जाऊ लागलो. विक्री प्रमुखाची व मदतनिसाची ओळख वाढली (दोघे मुंबईकर होते). त्या काळात ऍपलचा एलसि ४७५ संगणक माझ्या खिशाला परवडणारा होता. सहा महिने एलसि ४७५ संगणकाचा मला कसा उपयोग करता येईल ह्याचा शोधमी घेत होतो, ८०० रियाल रोख एकाच वेळी जमत नव्हते. विक्री प्रमुखाने प्रयत्न करून तीन हप्त्यात पैसे घेऊन संगणक मला विकला.
माझी संगणक समजून घेण्याची रीत हटके होती. निर्देशक (माऊस) च्या आत काय आहे व त्या क्रियेने कोणत्या प्रक्रिया घडतात इथून मी सुरुवात केली. विजक शास्त्राचा (इलेक्ट्रॉनिक्स) अभ्यास व पूर्वानुभवाने संगणकाचे प्रत्येक भाग व कार्य समजणे सहज शक्य झाले. संगणकात उपलब्ध असणार्या अवजारांचा योजनाबद्ध उपयोग समजून घेतला. मी घेतलेल्या छायाचित्रांना संपादन करण्या करता फोटोशॉप हा उपायोजन संच (ऍप्लिकेशन) शिकणे आवश्यक ठरले. त्याकरता दृश्य प्रतिमेला (व्हीज्युअल इमेज) अंकित प्रतिमा (डिजीटल इमेज) बनवणारा प्रतिमा वाचक (इमेज स्कॅनर) विकत घेणे आवश्यक ठरले. त्या प्रवा - प्रतिमा वाचक (इमेज स्कॅनर) बरोबरच फोटोशॉप आवृत्ती ३ मोफत मिळाले. ह्या सगळ्या घटना माझ्या सातवीत शिकणार्या मोठ्या मुलाने इतक्या सहज पचवल्या की माझ्या आधी संगणकाचा वापर त्याने सुरू केला. त्याच्या कडून माला नेहमी ऐकावे लागे "बाबा इतके सोपे आहे, बघ असे केले की असे होते!" सांगायला अभिमान वाटतो संगणकातल्या बर्याच बारीक गोष्टी माझ्या मोठ्या मुलाने त्याच्या लहान वयात मला शिकवल्या.
बायको वापरत असलेला चलचित्र ग्राहक (व्हिडिओ कॅमेरा) बिघडला म्हणून दुबईहून दुरुस्तीकरून परत येत होतो. माझी माझदा ३२३ हॅचबॅक चारचाकी होती, गाडीत मी एकटाच होतो. गाडीचा वेग ८० ते ९० असावा व्हेन्टोलीनचा एक आवश्यक झुरका घेण्याकरता दुर्लक्ष झाले तेव्हा गाडी एका निमळूत्या वळणावर होती पण वळत नव्हती म्हणून ब्रेक दाबला काय घडते हे समजले नाही. गाडी ३६० अंशात फिरत रस्त्याच्या दोन्ही रेलींगवर दोनदा आपटली. चारही चाके तुटून लोंबकळत होती. पण मला कुठेही खरचटले सुद्धा नव्हते, कारण सुरक्षा पट्ट्याने खिळवून ठेवले होते. नशिबाने साथ दिली होती तेवढ्यात मागून एकही गाडी नसल्याने कोणी मला उडवले नव्हते. पोलीस आला ओळखीचा निघाला एका लग्नात ओळख झाली होती. आम्ही दोघांनी रस्त्याचे निरीक्षण केले. रस्त्याच्या कडेला असणार्या माती व वाळूच्या मिश्रणाने व कमी वजनाच्या गाडीने ब्रेक दाबताच हा गोंधळ झाला होता. माझदा ३२३ हॅचबॅकची मागची दोन्ही चाके मोकळी असतात म्हणजे एंजीनशी जोडलेली नसतात, फक्त पुढची दोन चाके एंनजीनला जोडलेली असतात. त्या काळात हा दोष सगळ्या असल्या पद्धतीच्या गाड्यांचा होता. ती अपघाती गाडी सोडवण्यात महिना गेला. दुरुस्ती खर्च गाडीच्या किमती पेक्षा दुप्पट होता म्हणून विमा कंपनीने नवीन गाडी घेऊन दिली. नवीन गाडी मिळवून देण्यात माझदाच्या विक्री प्रमुखाने मदत केली. ती पण माझदा ३२३ हॅचबॅकच होती पण नवीन वर्षाची गाडी होती. ह्याचे कारण त्या कंपनीचे जाहिरातीचे छाया व चलचित्रणाचे फार मोठे काम मीच करत होतो. ते काय होते बघू या.
प्रतिक्रिया
14 Feb 2010 - 2:33 pm | विसोबा खेचर
वा! ज्यूसचं चित्र सुरेख आहे! :)
तात्या.