नशीब माझे ( भाग १, २, ३ एकत्रित )

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in जनातलं, मनातलं
30 Nov 2009 - 1:32 am

प्रश्नांची उत्तर शोधून सापडली नाही की मग एक हुकमी उत्तर हाताशी येते - देव जाणे ! असंच काहीसं- नशीब माझे ! हेही एक हुकमी उत्तर असावे असाच माझा समज होता. वयाची गद्धेपंचविशी संपायला आली त्याच काळातील परिस्थितीमुळे ३ वर्ष निद्रानाशाच्या आजाराने मला पछाडले होते. त्या आजारात एखादा चित्रपट पाहावा तसे मी माझे बालपण बघत होतो, माझी ती तशी परिस्थिती होण्यास जबाबदार कोण ? प्रश्नांची उत्तर शोधली. वर्तमानातील प्रश्नांची उत्तर सहजतेने मिळायची.

अहो खरंच सांगतोय ! सतत अविश्वासात जगणारे आम्ही मराठी, कसा विश्वास ठेवणार ? हो ना!
तर पी एन पी ट्रान्झीस्टरचे कार्य, एस सी आर / थायरीस्टर त्याचे ट्रीगरींग, झेनर डायोड, व्होल्टेज स्टॅबीलायझर, ऑसीलेटरचे कार्य हे सगळे मी चित्रपट पाहतो तसे त्या निद्रानाश अवस्थेत गादीवर लोळत असताना अनुभवले आहे.

असो, तर मला डोकं नव्हतं, मी हमालंच होणार, जनावर होतो, असे ठराव पास करण्याचे जन्मसिद्ध हक्क बाहेरच्या समस्त बघे जमातीचे होते. पण घरातले ज्यांना मी आप्त म्हणायचे त्यांनीच हे असले ठराव का संमत केले होते ?

बालपण चे रस्ते कडेकडेने शोधताना धक्कादायक उत्तर सापडले. माझे वागणे, बोलणे सगळेच संशयास्पद होते, मी एक नको असलेले शेंडेंफळ होतो. सगळे धागेदोरे विणले गेले व एक पडदा तयार झाला, त्या पडद्यावर माझा रंगीत बोल पट दिसू लागला. त्याचा अभ्यासक बनलो. परिस्थितीशी झगडा हाच एक मार्ग निश्चित झाला.

"मी" ह्या व्यक्तीच्या बांधणी चा अभ्यास करताना पायाचे बांधकाम कसे असेल ह्याचा अभ्यास करणे ओघानेच आले. मग हा पाया कोणी घडवला असणार ? माझी आई ३ वर्षाची असताना, मी न बघितलेली माझी आजी देवा घरी गेलेली. आईला संस्कारांचे बाळ कडू पाजणारे त्या काळचे बघे हितचिंतक
( आपल्याला आपल्याच हिताची चिंता करायला शिकवणारे ) होते. तिच्या लग्नानंतर शेजारच्या पोक्त बायकांनी अवाजवी शेजारधर्म दाखवला, अहो, ही आपलीच सून असल्यासारखा माझ्या आईवर मानसिक ताबा मिळवला होता. आम्ही मुलांनी कोणता आहार घ्यावा, कोणते कपडे घालावे, एवढेच नाही तर केव्हा, कोठे, किती बोलायचे हसायचे हे देखील ही मंडळी ठरवीत होती.

असो, असल्या भेसळ वातावरणात मी हा असा घडत गेलो. एका आजींना मी आजवर विसरलेलो नाही. बाहेर-गावाहून आलेल्या माझ्याच वयाच्या नातवाला केळी आवडतात म्हणून मला बाजारात पाठवले, एक ताजे केळे त्याला दिले आणि मला तीन दिवसाचे काळे साल झालेले केळे खायला दिले. मी ते केळे कचर्‍याच्या टोपलीत टाकले. दुसर्‍या दिवशी ह्या म्हातारीने आईला काय सांगितले ते देव जाणे, माझ्या आईने त्या आजींच्या नातवा समोर माझ्या चेहर्‍यावर तिच्या रागाचे शिक्के उमटवले. कोणाला काय काय सांगणार, नशीब माझे !

जन्मा आधी आणि नंतर आईच्या आहाराचे महत्त्व समजण्याकरिता मीच एक चांगले उदाहरण होऊ शकेन.
ह्याचे कारण घरातील बाकी भावंड आणि मी ह्यात जाणवेल इतपत वेगळेपण होते. वयाच्या १४ वर्षापर्यंत मी रडक्या ह्याच नावाने प्रसिद्ध होतो, ते का हे मी शोधून काढू शकलो. ह्याच १४ वर्षात मला महिना दोन महिन्यात एक छोटी-मोठी जखम जरुर होत असे आणि ती जखम चिघळायची, मग वाळून बरी होण्यात महिना दोन महिने जायचे. त्यामुळे माझ्या वर प्रत्येक जण नाराज असे. त्यात ती औषध, पट्ट्या, जखमा धुताना माझे ओरडणे, मी तासनतास रडत बसत असे. तुमचाच काय कोणाचाच विश्वास बसणार नाही पण खरंच घडले होते, कमीत कमी १२ – १५ वेळा मला कावीळ झाली होती.

कावीळ झाली की आधी डॉक्टरकडे जायचे तीन दिवस ते कडवट औषध रडत, मार खात प्यायचे, मग आमची भांडी घासणारी सखूबाई एका तांत्रिकाला घेऊन यायची, त्याचा पत्ता फक्त तिलाच माहीत होता. पत्ता विचारण्याचा भोचकपणा कोणालाच मान्य नव्हता. हा बाबा कुठल्याशा तंद्रीत असायचा. मी पाटावर बसायचो तो जमिनीवर बसायचा. आई एक शेराचं भांड भरुन फक्त ज्वारी त्याला द्यायची. माझ्या समोर पाण्याने भरलेली एक थाळी असायची, बाबा त्याच्या दोन्ही हातात चिमूटभर ज्वारीचे दाणे घ्यायचा, माझ्या अंगाला स्पर्श न करता त्याच्या दोन्ही मुठी माझ्या खांद्यांपासून खाली जमिनी पर्यंत न्यायचा, त्याचे डोळे बंद व तोंडाने काहीतरी पुटपुटणे चालू असायचे. असे तीन वेळा केल्यावर मुठीतले ते ज्वारीचे दाणे माझ्या हातात टाकायचा, दोन्ही हाताने मी ते दाणे खूप रगडायचे मग त्या पाण्यात टाकून द्यायचे. थाळीतले ते पाणी गडद पिवळ्या रंगाचे होत असे. ही क्रिया तीन वेळा होत असे. बाबा त्या पाण्याचे निरीक्षण करायचा, जरूरीचे असल्यास पुन्हा त्या सगळ्या क्रिया केल्या जात असत. पण सारांश काय तर मी ठणठणीत काविळीतून बरा होत असे. डॉक्टरला ही धूळफेक वाटली म्हणून पुढील दोन कावीळ आजारात प्रयोग म्हणून औषध न देता आधी तांत्रिकाला बोलावले, मी दोन्ही वेळा बाबाच्या एकाच
बैठकीत आजारातून बरा झालो. डॉक्टरच्या औषधाने आजारातून बाहेर येण्यास जास्त वेळ लागत असे.

श्रद्धा असणारे व अंधश्रद्धा म्हणत नगारे वाजवणार्‍यांनी एकमेकांची डोकी फोडावीत, कदाचित तो त्यांचा
अस्तित्वाचा भाग असेल. परंतु त्या तांत्रिक बाबा च्या मदतीने मी काविळीतून धडधाकट बरा होणे हा माझा अनुभवलेला प्रात्यक्षिक परिणाम होता. विद्युत-चुंबकीय लहरी व रिझोनन्स ह्या शास्त्राशी ह्याचा काहीसा संबंध असावा असे माझे मत आहे, ह्या विषयी जी माहिती मी वाचली, मिळवली त्यावरूनच मला असे वाटते. संबंधीत शिकवलेल्यांनी विचार करावा.

एकदा एका घटनेने माझी रडक्या ही छबी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली. कबड्डीच्या एका खेळीत माझ्यापेक्षा ८ – १० वर्षाने मोठा असलेल्या मुलाला मी एकट्याने घट्ट पकडून बाद केले. मला हे शक्य असण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारा तो क्षण होता. खर्‍या अर्थाने आत्मविश्वासाने जगाला सामोरे जाण्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठणे हेच समोर दिसत होते.... नशीब माझे.

मी मराठी ५ वी - ६ वी (१९५८ - ६०) शिकत होतो तेव्हाची एक घटना कधीही न विसरणारी आहे. आमचा घरमालक एक राजस्थानी मारवाडी होता. त्याची दोन समवयस्क मुले आमच्या बरोबर खेळायला येत असत. त्या दिवशी मी खेळायला बाहेर गेलो, बाकीच्या मुलांनी लगेच मला विचारले, " ए रड्या आज हे गालावरचे नक्षीकाम कशामुळे ?"
मी - "गृहपाठ केला नाही म्हणून."
त्या मारवाडी पोरांना मी विचारले, तुमच्या तोंडावर नक्षीकाम का नसते ?

आम्ही जिथे शिकवणीला जातो तिथल्याच एकाला थोड्या गोळ्या, बिस्किटे दिली की आमचा गृहपाठ तयार.

पण तुम्ही बर्‍याचदा शाळेत सुद्धा जात नाही, तेव्हा काय करता ?

आम्ही शाळेला देणगी देतो, आमचे पिताजी सांगतात श्रीमंतांनी शाळा बनवायच्या, मग हे शिकवलेले लोक आपल्या कामाला येतात.

आधीच मार खाऊन डोकं सुन्न झाले होते हे असले काहीसे ऐकून जास्तच गार झाले. त्या वयात त्या वाक्यांचा अर्थ तितकासा समजू शकलो नाही, पण आज, शिक्षण क्षेत्रांतील घोळकर मंडळींचा चालू असलेला घोळ पाहून, ह्या श्रीमंतांचा शिक्षणाचा धंदेवाईक उपयोग नीट डोक्यात शिरतो आणि डोके अजून जास्त भणभणते. प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ ही सारी ह्या श्रीमंतांच्या तथाकथित आशीर्वादाने चालणारी आधुनिक संस्थाने झाली आहेत. काल परवां पर्यंत जे तथाकथित कॄषि महर्षी होते तेच आज शिक्षण महर्षी गणले जातात. अश्या संस्थानातूनच शिकवलेले पदवीधर (हातात पदवीचा कागद मिरवणारे) शिक्षण व इतर मंत्रालयातील /
कार्यालयातील पदाधिकारी होत आहेत.
झुलॉजीची डॉक्टरेट मिळवलेल्या (कशी ?) एका अधिकार्‍याला भेटणे मला आवश्यक होते, कारण कला व तंत्राच्या सत्तेत त्यांचा सहभाग होता. आमच्या भेटीचे निष्पन्न काय असेल ह्याची कल्पना तुम्हाला आली असेलच !
माझ्या मुलाला एका बॅंकेचे पत्र आले. आम्ही भेटायला गेलो. चौकशी कक्षाने आम्हाला एका तरुणीकडे पाठवले. तो चेहरा बघताच संशयाने मी इंग्रजीतून विचारले "तुमच्या बॅंकेने हे पत्र पाठवले आहे मी कोणाला भेटू ?"
त्या तरुणीने तो कागद दोनदा वर खाली बघितला आणि म्हणाली, "तुमचे खाते आमच्या बॅंकेत नाही."
मी तिला तिच्या समोर ठेवलेल्या संगणकावर शोधायला सांगितले.
ती ...मी ह्या टेबलावर नवीन आहे.
मी तडकलो ... तुम्ही पदवीधर असालच, नवीन टेबलावर असण्याचा काय संबंध ?
ती.. मी झुलॉजीची पदवीधर आहे, मला संगणक माहीत नाही.
माझी खात्री झाली की ही बया मराठी नाही. गैर मराठीच बेशरमपणाचे धाडस करू शकतो.
बाई तुमचं गांव कोणतं ?
ती... पटणा, बिहार, पण मी पुण्यात शिकले आहे.
हा तर निर्लज्जपणाचा कळसच होता. मी आवाज वाढवला, ओ, तुम्ही बिहारचा चारा संपला म्हणून इथे पुण्यात शोधायला का आलात ? जरुर ह्या बॅंकेत तुम्हाला थारा देणारा बिहारी अधिकारी असणार.
लगेच बघ्यांची गर्दी जमली. खरोखरचा एक बिहारी अधिकारी तीच्या मदतीला पुढे धावला, आणि म्हणाला...
कायद्याने आम्ही बिहारी इंडियात कुठेपण काम करू शकतो.
मी तापलोच होतो,त्याला म्हटलं... आमच्या बाबासाहेबांना कायदा तयार करताना ह्या कायद्याचा असा दुरुपयोग कोणी करेल असे वाटले नाही. हाच कायदा तुम्हाला तुमच्याच प्रदेशाची सुव्यवस्था राखण्याचे स्वातंत्र्य देतो ते कसे विसरलात?
तेवढ्यात एक मराठी तरुणी पुढे सरसावली, तीच्या छातीवर टोचलेल्या बिल्ल्यावर नाव वाचले म्हणून समजले.
माझे नाव रानडे आहे हे समजून देखील ती माझ्याशी इंग्रजीत बोलत होती.
ही मुलगी इथे नवीन आहे, मी काय मदत करू ?
मला ह्या घटकेला माझे खाते ह्या बॅंकेतून बंद करायचे आहे. कोणत्या अर्जावर कुठे स्वाक्षरी करू ते दाखवा.
तिने मला एक अर्ज दिला त्यात एक रकाना होता - खाते बंद करण्याचे कारण - मी लिहिले - बेजबाबदार सेवा.

त्या कावीळवाल्या तांत्रिकाने हात चोळून मला कावीळ मुक्त केले होते. आता मी अशा असह्य
परिस्थितीत हातावर हात चोळत बसलो असताना एका तांत्रिकाच्या शोधात आहे.
शेवटी काय तर - नशीब माझे.
- क्रमशः -

जीवनमानअनुभव