वजनाचा काटा --भाग ९

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
2 Mar 2018 - 11:08 pm

वजनाचा काटा --भाग ९

हृदयविकार-- एक वेगळा विचार

साधारण पणे हृदयाच्या रक्तवाहिनीत कोलेस्टिरॉल/ चरबीचे अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो त्यामुळे हृदयविकार होतो.

पण लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो
आणि
वजनदार मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही?
याचा विचार आता आपण करू.

रक्तात चरबी/ कोलेस्टिरॉलचे प्रमाण वाढले कि या चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमा होऊ लागतात. अर्थात हे थर काही फक्त हृदयाच्या रक्तवाहिनीतच होतात असे नाही तर शरीराच्या सर्वच रक्तवाहिन्यांत होतात. उदा मेंदूच्या रक्तवाहिनीत असा थर जमा झाला तर आपल्याला पक्षाघात(लकवा) हा विकार होतो. पायाच्या रक्तवाहिनीत असे झाले तर गँगरीन होतो( हा बहुधा मधुमेही/ सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला होतो.) आणि शिश्नाच्या रक्तवाहिनीत झाले कि लिंगशैथिल्य (erectile dysfunction) येते

आपली रक्तवाहिनी हि अतिशय लवचिक आणि एका निमुळत्या होत जाणाऱ्या नळकांड्यासारखी असते. एखादा माणूस जेंव्हा व्यायाम करतो तेंव्हा शरीराच्या स्नायूंना अतिरिक्त रक्तपुरवठा आवश्यक असतो त्यासाठी आपल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. जसे जसे वय वाढते तसे तसे रक्तवाहिन्या कठीण होत जातात (arterioscelrosis) म्हणजेच त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांची प्रसरण पावण्याची क्षमता कमी कमी होत जाते.
आपल्या रक्तात जेंव्हा अतिरिक्त चरबी असते तेंव्हा त्याचा आपल्या रक्तवाहिन्यांच्या (यात हृदयाची रक्तवाहिनी --कॉरोनरी पण येते) आतील बाजूस थर जमा होऊ लागतो. हा थर जेंव्हा जास्त जाड होऊ लागतो तेंव्हा अवयवाचा रक्त पुरवठा कायम ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि रक्तपुरवठा सुरळीत ठेवतात . . शेवटी स्थिती अशी होते कि आता रक्तवाहिन्या प्रसारण पावू शकत नाहीत. जेंव्हा हाच माणूस व्यायाम करायला लागल्यावर जो रक्त पुरवठा आवश्यक असतो तो आता कमी पडू लागतो तेंव्हा पूर्वीसारख्या त्या रक्तवाहिन्या प्रसरण पावून रक्तपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करतात.

पण वयानुसार हि प्रसरण पावण्याची प्रक्रिया कमी झालेली असते यामुळेच जसे वय वाढत जाते तसतसे हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता वाढत जाते.

तसेच चरबीचा थर जितका जास्त तितका रक्तपुरवठा कमी होत जातो. म्हणूनच रक्तातील चरबी/ कोलेस्टिरॉल चे प्रमाण जास्त तितकि हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता वाढत जाते.

मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांत चरबी/ कोलेस्टिरॉल चे प्रमाण जास्त होते यामुळेच मधुमेही व्यक्तींना हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा जास्त असते.

सिगारेट/ गुटखा किंवा इतर कोणत्याही तर्हेने तंबाखू सेवन केल्यास तुम्हाला जी "किक" मिळते ती रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे मिळते पण हि प्रक्रिया वर आवश्यक असलेल्या प्रक्रियेच्या नेमकी उलट आहे. त्याशिवाय रक्तवाहिन्या कठीण होण्याचे प्रमाणहि निकोटिनने जास्त होते. याशिवाय तंबाखूमुळे रक्तात चरबीची पातळी वाढत जाते या तिन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून तंबाखू सेवन करणाऱ्या माणसाला हृदयविकार किंवा पक्षाघाताची शक्यता इतर व्यक्तींपेक्षा कितीतरी जास्त होत जाते.
याशिवाय ज्यावेळेस माणसाची तणाव जास्त असतो तेंव्हा आपल्या मेंदूला रक्तपुरवठा जास्त लागतो हा पुरवण्यासाठी हृदय जास्त जोरात धडकू लागते. दुर्दैवाने याच वेळेस माणसाला सिगारेट प्यायची तल्लफ येते. म्हणूनच जेंव्हा मेंदूला आणि हृदयाला रक्तपुरवठा जास्त हवा असतो नेमके तेंव्हाच या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या माणसाला पक्षाघाताचा किंवा हृदयविकाराचा झटका येतो.
स्त्रियांची जोवर रजोनिवृत्ती झालेली नाही तोवर रक्तवाहिन्या जास्त लवचिक राहतात त्यांच्या शरीरात एकंदर चरबी जास्त असूनही रक्तवाहिन्यांत जमा होत नाही.त्यामुळे स्त्रियांना सहसा पन्नाशीपर्यंत हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धक्का बसत नाही. आतापर्यंत असलेली हि कवच कुंडले रजोनिवृत्ती बरोबर काढून घेतली जातात त्यामुळे पन्नाशीनंतर स्त्रियांना हृदयविकार होण्याचे प्रमाण जवळ जवळ पुरुषांइतकेच होते.
आता वरील प्रश्नाकडे वळू.
लठ्ठ नसलेल्या( वजन प्रमाणात असलेल्या) मधुमेह नसलेल्या, तंबाखू सेवन न करणाऱ्या आणि चपळ आणि सक्रिय माणसाला पन्नाशीतच हृदय विकार का होतो
आणि
वजनदार, मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्या, सिगारेट ओढणाऱ्या एखाद्या व्यक्तीला का होत नाही?

एक उदाहरण म्हणून देतो आहे.
आपल्या घरात पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन अर्ध्या इंचाची आहे. जसा जसा काळ जातो तशी हि पाईपलाईन गंजत जाते आणि आतील व्यास कमी होत जातो. मग शेवटी शेवटी आपल्या घरातील धार फारच कमी होते. मग आपल्याला हि पाईपलाईन बदलावी लागते.
जर आपल्या घराची पाईपलाईन एक इंचाची असेल तर गंजल्यामुळे आतील व्यास कमी होण्यास काळ जास्त लागेल
आणि जर हि पाईपलाईन दीड इंचाची असेल तर आपल्या आयुष्यभरात आपल्या घराचा पाणीपुरवठा कमी होणार नाही.

हीच स्थिती मानवी शरिराची आहे. दुर्दैवाने भारतीय वंशाच्या लोकांच्या मेंदूच्या किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्या पाश्चात्य(कॉकेशियन वंशाच्या) लोकांपेक्षा जास्तच बारीक आहेत. यामुळे पाश्चात्य लोक आपल्या मानाने जास्त वजनदार असुनही त्यांचे हृदय विकाराचे प्रमाण त्याच वजनाच्या भारतीय माणसापेक्षा बरेच कमी आहे.

या कारणामुळे काही लोक जे सडपातळ सक्रिय तम्बाखू न घेणारे मधुमेह नसणारे असूनही त्यांना हृदयविकार होतो आणि दुसऱ्या टोकाला "विन्स्टन चर्चिल" सारखे लोक लठ्ठ असून चिरूट ओढूनहि ९० वर्षापर्यंत जगतात.

दुर्दैवाने आपल्या घराची पाईपलाईन अर्ध्या इंचाची आहे कि एक इंचाची कि दीड इंचाची आहे आहे हे प्रत्यक्ष अँजियोग्राफी केल्याशिवाय सांगणे अशक्य आहे. शिवाय वयानुसार आपल्या रक्त वाहिन्या किती कठीण होतील हे सांगणे आजमितीला शक्य नाही.

त्यामुळे आपली पाईपलाईन दीड इंचाची असली तरी आपल्याला हृदयविकार येणारच नाही हे छातीठोकपणे सांगणे आजमितीला शक्य नाही.

माझ्याकडे येणाऱ्या सुदृढ व्यक्तींना माझे ससंदर्भ स्पष्टीकरण असे असते.

एक पन्नास वर्षाच्या ५'१०" उंचीच्या पुरुषाचे आपले आदर्श वजन जर ६८ किलो असावे. यात जर जाड बांध्याच्या माणसासाठी १० % सूट धरली तरी ७५ किलो असावे. जर आले वजन १०१ किलो असेल तर हे वजन ३५ % जास्त आहे.
आपला ट्रक १० टन क्षमतेचा असेल आणि आपण त्यात नियमितपणे साडेतीन टन वजन जास्त भरत गेलात तर काय होईल?
आपल्या इंजिनवर ३५ % अतिरिक्त भार येईल, आपले सस्पेन्शन आणि टायरचे आयुष्य ३५ टक्क्याने कमी होईल (सस्पेन्शन लवकर खराब होईल आणि आपले टायर लवकर झिजतील) हीच स्थिती आपल्या शरीराची असेल.
आपण झोपले असताना हि हृदयाला ३५ % अतिरिक्त वजनासाठी ३५ % अधिक काम करावे लागेल. आपला पाठीचा कणा लवकर झिजेल(स्पॉंडायलॉसिस) आपले गुडघे लवकर खराब होतील.
एक वेगळा विचार -- १९७० सालच्या अगोदर भारत देशात अन्नधान्य मुबलक प्रमाणावर कधीच नव्हते त्यामुळे आपल्याकडे पाहुणे आले तर आपण त्यांना सुग्रास भोजन कसे देता येईल; हा विचार करत आहोत परंतु गेल्या ५० वर्षात स्थितीमध्ये जमीन अस्मानाचा बदल झाला आहे आणि त्यामुळे आता आपल्याकडे भुकबळी पेक्षा अतिरिक्त वजनाच्या दुष्परिणामांनि होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
आपल्या शतकानुशतके असणाऱ्या अपुऱ्या अन्नपुरवठ्याचा आपल्या संस्कृती आणि परंपरेवर इतका परिणाम झाला आहे कि आपण पंचेंद्रियांपैकी केवळ "जिभेचे चोचले" पुरवण्याकडे लक्ष देतो.
आपल्याकडे पाहुणे आले तर केवळ त्यांना सुग्रास अन्न देणे हा एकच पाहुणचाराचा मार्ग आहे असे नव्हे तर
त्यांच्या आवडीचे संगीत लावणे,
त्यांच्या आवडीचे सुगंध हवेत पसरणे,
वातानुकूलित हवेत पाहुण्यांना आवडेल अशा तर्हेची प्रकाश व्यवस्था करून बसणे,
ऐसपैस गप्पा मारणे अशा अनेक मार्गानी त्यांच्या जीभ सोडून इतर चारही इंद्रियांचा (नाक, कान, डोळे आणि त्वचा) पाहुणचार करता येईल.
पहा विचार करून.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

उपयुक्त माहिती. आपल्याला हृदयविकार होण्याची शक्यता किती आहे ह्याची विश्वासार्ह चाचणी उपलब्ध आहे का, की जेणेकरून असा मनुष्य हृदयविकार टाळण्याचा प्रयत्न करू शकेल?

सुबोध खरे's picture

6 Mar 2018 - 10:38 am | सुबोध खरे

१०० % विश्वासार्ह चाचणी कोणतीच नाही आणि केवळ भयगंड असल्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या चाचण्या करून घेतात ती गोष्ट पण बरोबर नाही.
लष्करात माणसे आरोग्यपूर्ण राहण्यासाठी काही चाचण्या वयाप्रमाणे केल्या जातात. ज्यात ४० व्या, ४५ व्या आणि ५० व्या वर्षी रक्ततपासणी, इ सी जी, छातीचा एक्स रे आणि पोटाची सोनोग्राफी केली जाते. ४५ आणि ५० व्या वर्षी हृदयरोग तज्ज्ञाकडून तपासणी होते. हि स्थिती अर्थात लष्करातील जवानांची आणि अधिकाऱ्यांची आहे जे इतर सर्व दृष्टीने सामान्य नागरिकांच्यापेक्षा जास्त निरोगी असतात.
सामान्य नागरिकांच्या साठी वयाच्या ४० व्या वर्षी आणि नंतर निदान दर पाच वर्षांनी रक्ततपासणी, इ सी जी, छातीचा एक्स रे आणि पोटाची सोनोग्राफी करून घ्यावी.
ज्याला हृदयरोगाचे कोणतेच लक्षण नाही आणि इतर कोणताहि आजार नाही त्याने वरील प्रमाणे ४० व्या वर्षी ४५ व्या वर्षी आणि नंतर दर दोन वर्षांनी इ सी जी करून घ्यावा त्यात काही बदल आढळले तर स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. या चाचणीमध्ये काही बदल आढळले तर सी टी अँजियोग्राफी किंवा कॅथेटर अँजियोग्राफी करून घ्यावी.
दुर्दैवाने आजकालच्या तणावपूर्ण वातावरणात बैठ्या जीवनपद्धतीत काम करणाऱ्या आणि सुदृढ प्रकृतीच्या लोकांना छातीत जळजळणे हे फारच मोठ्याप्रमाणावर आढळून येते. अशा लोकांनी ३५ नंतर दर वर्षी निदान इ सी जी आणि आपल्या डॉक्टर कडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
यासाठी एक मार्गदर्शक तत्व म्हणून एक दुवा देत आहे तो वाचून पहा.

खूप खूप आभार या माहितीकरिता.

तुषार काळभोर's picture

3 Mar 2018 - 12:04 pm | तुषार काळभोर

करून बघण्यासारखा आहे. (पाहुण्याला किती रुचेल माहिती नाही)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2018 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती.

मात्र, गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध होणार्‍या संशोधनांत, रक्तवाहिन्यांच्या एकंदरीत विकारांत (ज्यांच्यामुळे मुख्यतः हृदयविकार व पक्षाघात होतात) कोलेस्टेरॉलच्या सहभागावर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले गेलेले आहे.

अभिजीत अवलिया's picture

4 Mar 2018 - 12:05 pm | अभिजीत अवलिया

हेच विचारायचे आहे. कोलेस्टेरॉल हा काल्पनिक बागुलबुवा आहे असे हल्ली म्हटले गेलेय.

दुर्दैवाने ज्या संशोधनाबद्दल बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरल्या आहेत त्या संशोधनात बऱ्याच त्रुटी आहेत. यामुळे आजमितीस तरी वाढलेले कोलेस्टिरॉल हे अपायकारक नाही आणि स्टॅटिन हे निरुपयोगी आहे असे म्हणता येत नाही.
ब्रिटिश हेल्थ फाउंडेशन करवी याचे आलेले स्पष्टीकरण मी खालील दुव्यात देत आहे.
https://www.bhf.org.uk/heart-matters-magazine/news/behind-the-headlines/...
यातील माहिती भरून आपल्या हृदयाचे स्वास्थ्य कसे आहे आणि तुम्ही हृदयविकाराविना साधारण किती वर्षे जगू शकाल याचा अंदाज देणारे कोष्टक दिले आहे तेही पाहून घ्या
https://www.bhf.org.uk/heart-health/risk-factors/check-your-heart-age

Nitin Palkar's picture

3 Mar 2018 - 9:13 pm | Nitin Palkar

पाहुणचार परिपूर्ण करण्याचे उपाय भावले. वातावरण सुगंधित करणे, मंद संगीत हे उपचार बऱ्याचवेळा अवलंबतो यापुढे कटाक्षाने लक्षात ठेवत जाईन. जिव्हालौल्य नियंत्रित करण्यासाठी कठोर स्वयंशिस्तीची आवश्यकता तुमच्या या लेखामुळे जाणवू लागली.

चामुंडराय's picture

3 Mar 2018 - 11:16 pm | चामुंडराय

छान माहिती डॉक्टर साहेब.

या लेखमालेच्या प्रत्येक भागाची लिंक इथे दिलीत तर छान होईल.

पाहुणचाराचा नवा विचार आवडला. इतर इंद्रियांचे ठीक परंतु त्वचेच्या पाहुणचारासाठी मी पाहुण्याला मसाज करतो आहे हे चित्र मनचक्षू पुढे तरळले आणि पाहुणी असेल तर ... :) असो..

पाहुणचारासाठी मी थोडा वेगळा मार्ग अवलंबतो.

माझ्या कडे वेगवेगळ्या प्रकारचे युनिवर्सल अडॅप्टर्स आणि वायर्स आहेत. पाहुणा जरा बसला, स्थिरस्थावर झाला कि माझ्या कडील अडॅप्टर्स, वायर्स वापरून पाहुण्याचा भ्रध्व चार्जिंगला लावतो. पाहुण्याला गहिवरून येते.

नंतर पाहुण्यांचा भ्रध्व घरातील वाय-फाय ला जोडून देतो. ते पाहून पाहुणा आता रडायचाच बाकी असतो.

अश्या रीतीने पाहुण्यांचा आधुनिक पद्धतीने पाहुणचार केल्याचे समाधान मिळते आणि या सर्वांमुळे कित्येकदा पाहुण्याला चहा पाणी नाही मिळाले तरी तो खुश होतो हा अतिरिक्त पुणेरी फायदाही होतो.

जाजा :
>>> जसा जसा काळ जातो तशी हि पाईपलाईन गंजत जाते आणि आतील व्यास कमी होत जातो.

गंजल्यामुळे पाइपचा आतील व्यास वाढतो, कमी होत नाही. मात्र हा सुट्टा गंज पुढे कुठेतरी अडकला तर पाणी तुंबू शकते.

निशाचर's picture

4 Mar 2018 - 4:30 am | निशाचर

छान माहिती!
वेगळा विचार आवडला.

सुधीर कांदळकर's picture

5 Mar 2018 - 7:49 am | सुधीर कांदळकर

नळाच्या पाईपाचे तसेच ट्रकच्मधल्या वजनाचे ही उदाहरणे अप्रतिम. अगोदरच्या भागांचे दुवे कृपया जोडावेत. मी मिपावर नेहमी येत नाही. कधीतरी येतो. आलो तरी आमच्या ग्रामातून कधी कनेक्टीव्हिटी नाहीशी होईल त्याचा भरंवसा नसतो. कधीकधी महिने महिने नसतोच. त्यामुळे नजरेत आले नसावेत.

धन्यवाद.

दीपक११७७'s picture

5 Mar 2018 - 10:07 am | दीपक११७७

छान लेख.
अकाली र्‍हदय विकार येण्या मागे
स्फुर्ती देणारे ओषधांचा वाटा कीती?
सप्लीमेंटचा वाटा कीती?

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2018 - 7:15 pm | मराठी कथालेखक

रक्तादानाचा आणि दात्याच्या आरोग्याचा (विशेषकरुन हृदयविकाराबाबत) काही संबंध आहे का ? रक्तदानाने दात्याला काही फायदे होतात का ?

सुबोध खरे's picture

8 Mar 2018 - 10:08 am | सुबोध खरे

रक्तदानाने दात्याला काही फायदे होतात का ?
हो पुण्य मिळते. (नास्तिक असल्यास) सत्कृत्य केल्याचे आत्मिक समाधान मिळते.
आपल्या शरीरात ५ लिटर रक्त असते त्यापैकी आपण निरोगी असलात तरच ३५० मिली रक्त काढले जाते.
याचा परिणाम हा ४० अंश तापमानात १५ मिनिटे काम केल्यावर जितका थकवा येत तितकाच असतो. ( ४० अंश तापमानात तासाला दीड लिटर पर्यंत घामाच्या वाटे शरीरातील द्रव बाहेर जातो या हिशेबाने)
बाकी बरीच लोकांना रक्त पाहून चक्कर येते किंवा आपले एवढे रक्त गेले याचा मानसिक परिणाम म्हणून बऱ्याच लोकांना थकवा आल्यासारखे वाटते ते तात्पुरते असते.
एवढे रक्त आपले शरीर साधारण एक ते दीड महिन्यात भरून काढते. म्हणून परत रक्तदान साधारण तीन महीन्यानी करता येते.

मराठी कथालेखक's picture

8 Mar 2018 - 11:50 am | मराठी कथालेखक

सत्कृत्य केल्याचे आत्मिक समाधान मिळते

हो हे तर आहेच. पण शरीराला काही फायदे होतात का हे मी शोधायचा प्रयत्न करत होतो.
एक फायदा सांगितला गेलाय की दात्याच्या शरीरातील अतिरिक्त लोह कमी होते. खासकरुन पुरुषांना प्रोढ वयातरक्तात लोहाचा अतिरेक होण्याचा धोका असतो तो रक्तदानाने कमी होतो.
कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास रक्तदानाचा काही फायदा होतो का ? याबद्दल कुणी अभ्यास केला आहे का ? नियमित दात्यांना असणारी हृदयविकाराची शक्यता आणि रक्तदान न करणार्‍यांसाठी अशी शक्यता यात काही तफावत आढळली आहे का ?

रक्तदान केल्याने कोलेस्टिरॉल कमी होते किंवा कर्करोगाची शक्यता कमी होते यात बरीच अतिशयोक्ती आहे.
तुलना केली तर रक्तदान करणारे( किंवा त्याला पात्र असणारे) लोक करणारे "मुळात निरोगी" असतात त्यामुळे त्यांना कर्करोग किंवा हृदय विकार होण्याची शक्यता सामान्य माणसांपेक्षा कमी असते. याचा रक्तदान करण्याशी थेट संबंध नाही.
(जालावर हिरवा चहा प्यायल्याने कर्करोगापासुन वंध्यत्वा पर्यंत सर्व रोगावंर मत करता येत असे सांगणारे बरेच "अभ्यासपूर्ण निबंध" आढळतात तसेच हे सांगणारे पण निबंध आढळतील).
लोहाचे प्रमाण अतिरिक्त असल्यास कर्करोग होतो पण याचे प्रमाण नगण्यच्या जवळपास आहे.
तसेच लोहाची अतिरिक्त मात्रा असणारे लोक भारतात मुळात कमी आहेत. कारण भारतात पाश्चात्य देशात खाल्ले जाते तितके लाल मांस( मटण बीफ इ) अजिबात खाल्ले जात नाही ज्यामुळे आहारातून अतिरिक्त लोह शोषले जाण्याची शक्यता असते.
भारतात हिमोक्रोमॅटोसिस आजाराची शक्यता हजारात दोन इतकी कमी( किंवा याहूनही कमी) आहे
याउलट भारतात लोहाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया असण्याचे प्रमाण फारच जास्त आहे. The estimated prevalence of anaemia in developing countries is 39% in children <5 years, 48% in children 5–14 years, 42% in women 15–59 years, 30% in men 15–59 years, and 45% in adults >60 years.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2018 - 9:45 am | प्रकाश घाटपांडे

हा धागा नव्याने वाचणार्‍यांनी डॉ सुबोध खरे यांचा काटा वजनाचा ही मालिका आवर्जून वाचावी