काटा वजनाचा -१
काटा वजनाचा -२
काटा वजनाचा -३
आता पर्यंत आपण पहिले कि वजन जास्त म्हणजे किती आणि कसे मोजायचे आणि जास्त वजनाचे तोटे काय आहेत.
आता आपण हे पाहणार आहोत कि काही लोकांचे वजन पटकन का वाढते आणि काही लोकांचे काहीही केले तरी का वाढत नाही.
प्रथम एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे -- केवळ जास्त वजन म्हणजे जास्त चरबी नव्हे.
जास्त वजन परंतु कमी चरबी अशी माणसे असतात( खेळाडू धावपटू किंवा पिळदार शरीराची माणसे)
आणी याच्या उलट वजन बरोबर पण अंगावर चरबी जास्त अशा माणसांचे स्नायू आणी हाडांचे वजन कमी असते आणी शरीरात चरबी जास्त.
दुर्दैवाने शरीराची प्रत्यक्ष चरबी मोजण्याचे वेगवेगळे उपाय हे फार किचकट खर्चिक आणी वेळखाऊ असून तितके अचूक हि नाहीत. त्यातल्या त्यात सोपा आणी बर्यापैकी अचूक असा निर्देशांक म्हणून शरीर वस्तुमान निर्देशांक (BMI) वापरला जातो.
एक अजून महत्वाची गोष्ट -- व्यवस्थित व्यायाम करणारी वजनदार माणसे (BMI २५-२९) ही साधारण (नॉर्मल) वजनाच्या व्यायाम न करणाऱ्या माणसांपेक्षा जास्त निरोगी असतात( आणी जास्त जगतात) असे आढळून आले आहे. याचा अर्थ असा कि वजनदार माणसांनी आटा पिटा करून अचाट आणी अफाट मिताहार ( DIET) करून वजन कमी करण्यापेक्षा चौरस आहार आणी "योग्य व्यायाम" करणे जास्त चांगले.
वजनदार असणे यात आनुवंशिकतेचा थोडा वाटा आहे.म्हणजे स्थूल आईबापांची मुले जास्त स्थूल असतात. याचे कारण चरबीच्या पेशी त्यांच्या शरीरात अनुवंशिकतेने जास्त असतात. आणी जितक्या पेशी जास्त तितकी चरबी जास्त.
परंतु सर्वसामान्यपणे वजन वाढण्यासाठी आनुवंशिकतेपेक्षा- गैरसमज आणी अति आहार जास्त जबाबदार आहे. म्हणजे बर्याच स्थूल आईबापांची अशी समजूत असते कि मूल गुटगुटीत वजनदार असेल तरच जास्त चांगले.त्यामुळे मुलाला सतत काहीतरी खायला घालणे हे त्यांचे कर्तव्य होऊन बसलेले असते. कुणी "बच्चा खातेपिते घर का है" हे म्हणाले कि यांचा उर भरून येतो.
एक उदाहरण म्हणून माझ्याकडे गोव्यात असताना एक आई आली आणी म्हणाली "हमारा बच्चा कुछ खाताही नही. " तिचा मुलगा साधारण ५-६ वर्षांचा १५-१६ किलो वजनाचा होता आणी व्यवस्थित पळत/ खेळत होता. मी तिला विचारले कि सुबह नाश्तेमे उसने क्या खाया? यावर ती म्हणाली एक ग्लास दुध और "सिर्फ" ब्रेड के चार स्लाईस बटर जाम लगाके . मी तिला म्हणालो, "बहनजी, इसमे तो मेरा भी पूरा नाश्ता हो जायेगा."
तिला चिंता होती कि शेजारणीचा मुलगा कसा "खातेपिते घर का दिखता है" तसा तो दिसत नव्हता.
सुदृढ बालक क्लिनिक मध्ये हा एक उच्छाद असतो.मुल व्यवस्थित खात पीत असेल, खेळत असेल, निरोगी असेल आणी वजनहि प्रमाणात असेल तरीही आयांचे काही समाधान होत नाही. वजन बढाने के लिये कुछ गोली/ टोनिक दे दो.
सांगण्याचा अर्थ काय कि अनादी काळापासून भारतात अन्नधान्य मुबलक प्रमाणात कधी च उपलब्ध नव्हते त्यामुळे भारतीय मनोवृत्ती अशी झालेली आहे कि वजनदार म्हणजे चांगले.मग अशी मुले लहानपणापासून भरपूर खात असतील तर तशा आहाराची सवय होऊन जाते आणी मग जेंव्हा वाढते वय संपते आणी आयुष्यात स्थैर्य येते तेंव्हा (२५-३० वयाला) हा वाढलेला आहार पुरुषांच्या पोटावर आणी स्त्रियांच्या कंबरेवर आणी नितंबावर दिसू लागतो.
दुर्दैवाने गेल्या २० वर्षात सोयीसुविधा इतक्या वाढलेल्या आहेत कि मुलांचे चालणे, व्यायाम, खेळणे कमी झाले आहे. मुले घराच्या बाहेरच स्कूल बस मध्ये बसतात आणी उतरतात. त्यानंतर व्यक्तिमत्त्व विकास ई साठी किंवा शिकवणी (ट्युशन) च्या वर्गाला जाणे यातून वेळ मिळाला तर मुले टी व्ही, भ्रमणध्वनी किंवा संगणकावरच खेळतात.कमी झोप झाल्यानेही स्थूलता येते असे आढळून आले आहे. आणी मग घरातच बसून आई वडील त्यांना हवे ते खाद्य पदार्थ देत असतात. यामुळे २५-३० ला येणारी स्थूलता आता १२-१५ वयालाच दिसायला लागली आहे.
Latest estimates show prevalence of obesity among adolescents (13-18 years) has grown from 16% to 29% over the last five years.
http://timesofindia.indiatimes.com/india/Obesity-among-Indian-teens-swel...
हि परिस्थिती भयावह आहे. मूल जन्माला येते तेंव्हा त्याच्या शरीरात असलेल्या चरबीच्या पेशी पहिल्या २ वर्षात तिप्पट होतात आणी यानंतर त्या पेशींची संख्या वयात येईपर्यंत बर्यापैकी स्थिर राहते. वयात आल्यावर या पेशींची संख्या परत वाढू लागते. परंतु स्थूल असणार्या मुलांच्या या पेशींची संख्या दुसर्या वर्षानंतरही वाढत असते त्यामुळे वयात येण्याच्या कालावधी पर्यंत त्यांच्या चरबीच्या पेशींची संख्या खूपच वाढलेली असते आणी मग एकदा पेशींची संख्या वाढली कि कितीही डाएट करा किंवा व्यायाम करा हि संख्या कमी होत नाही. भले त्या पेशीतील चरबी थोडी कमी होऊ शकते.
जे मुल पहिले सहा महिने पूर्ण आईच्या दुधावर असते अशा मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण बरेच कमी दिसते याचे कारण स्तनपान करण्यासाठी मुलाला कष्ट करावे लागतात आणी म्हणून पोट भरले कि मुल दुध ओढणे बंद करते. परंतु बाटलीने दूध पाजताना मुलाच्या तोंडात गुरुत्वाकर्षणाने दुध येत राहते आणी मुलाला ते गिळण्याखेरीज पर्याय राहत नाही. आता हे जास्तीचे दुध मुलाच्या चरबीच्या पेशी वाढवण्याचे काम करते. ( आया मुलाचे पोट "व्यवस्थित"भरावे म्हणून दुध जास्त घट्ट ठेवतात) यामुळे आईच्या दुधावर पोसलेली मुले जास्त निरोगी असतात आणी त्यांच्या स्थूलतेचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी असते.
नमनाला एवढे घडाभर तेल वापरण्याचे कारण कि आपल्या प्रत्येकाच्या घरात आपले स्वतःचे मुल, नातवंड किंवा नातेवाईकांची मुले असतील त्यांचे "सु"पोषण" करणे हे आपल्या हातात आहे.आणी हि गोष्ट मुल जन्मल्यापासून चालू होते.
या गोष्टी अगोदर सांगण्याचे मूळ कारण म्हणजे कोणतीही गोष्ट दुसर्यावर ढकलणे हा मानवी स्वभाव आहे. तेंव्हा आमचे वजन अनुवांशिकच आहे म्हणणाऱ्या लोकांना हा सावधानतेचा इशारा आहे.
एकंदर आपण जे अन्न खातो त्याचा ७० % हिस्सा हा शरीराचा चयापचय ( METABOLISM) या साठी वापरला जातो.२० % भाग हा आपल्या एकंदर हालचालीसाठी वापरला जातो आणी १० % हा शरीर गरम ठेवणे आणी अन्न पचवणे यासाठी जातो. याचा अर्थ असा आहे कि आपल्याला लागणाऱ्या ७० % ऊर्जेमध्ये आपण फेरफार करू शकत नाही. राहिलेल्या ३० % पैकी १० ते १५ % मध्ये फेरफार करू शकतो. म्हणजेच हया वापरल्या जाणार्या उर्जेतच बदल करून वजन वाढवू किंवा कमी करू शकतो.
१९७० सालानंतर जगात स्थूलतेचे प्रमाण वाढत गेले आहे याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे प्रक्रिया केलेल्या, स्वादिष्ट, सहज पचणारया आणि कॅलरीने भरगच्च अशा पदार्थांची सहज आणि सुलभ उपलब्धता. याच बरोबर माणसांची शारीरिक कष्टाची गरज कमी होत गेलेली आहे. स्वयंपाकघरातील उपकरणे आणि वाहतुकीची साधने यामुळे बरेचशी कष्टप्रद कामे सुलभ झालेली आहेत. पण त्यामुळे माणसांची कॅलरीज ची गरज बरीच कमी झालेली आहे आणि अशात स्वादिष्ट अशा सहज पचणाऱ्या पदार्थांची मुबलकता असल्यामुळे माणसांचे जगण्यासाठी खाण्यापासून खाण्यासाठी जगण्याकडे वाटचाल चालू झालेली आहे. दिवसेंदिवस आपल्या वापरलेल्या ऊर्जेपेक्षा जास्त अन्न प्रश्न केल्यामुळे आपले वजन वाढते हेच सत्य आहे.
पण मग काही माणसे स्थूल होतात आणि काही होत नाहीत असे का? पूर्वी लिहिल्ल्याप्रमाणे स्थूल माणसे आपण जास्त खातो हे मुळात मान्य करीत नाहीत स्थूल माणसे प्रत्येक घासात "जास्त" अन्न पदार्थ खाताना आढळतात. शिवाय घास पटापट गिळताना आढळतात. त्यामुळे त्यांचे पोटाकडून जास्त भरण्याचे संकेत येईपर्यंत त्यांनी जास्त खाल्लेले असते. शिवाय घास पटकन गिळल्या मुळे त्या पदार्थाची नीट चव जाणवतच नाही. मग तोंडाला स्वाद येण्यासाठी अजून घास घेतला जातो आणि हि प्रक्रिया चालू राहते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गरमागरम बटाटे वडा खाताना दिसणारी माणसे. तोंडात असलेला वाफाळलेला वड्याचा घास जिभेला स्पर्श होतो न होतो तोच गिळून होतो. याच्या विरुद्ध गरीब लोक वड्याला तोंडी लावून पोळी किंवा भाकरी खाताना मुद्दाम पहा. त्यांचा वडा गार असतो आणी ते पोळीचा घास नीट चावून चवी चवीने खाताना दिसतात. आणी वर चव येण्यासाठी मिरचीचा तुकडा तोंडी लावतात.
लहान घास घ्या आणि तो नीट चावून खा म्हणजे त्या पदार्थाचा आपल्याला नीट स्वाद मिळेल आणि फुकटचे पोटात "भरणे" कमी होईल. आपल्या जुन्या शास्त्रात एक घास बत्तीस वेळा चावून खा असे म्हटले आहे याचा अर्थहि हाच आहे.
आपले शरीर आपल्याला संकेत देत असते . उदा. तहान लागली कि आपण पाणी पितो. पण हे पाणी पोटात गेले कि लगेचच आपली तहान भागते. याचे कारण जठरात संवेदक(OSMORECEPTORS) असतात जे आपल्या मेंदूला संदेश देतात कि पोट पाण्याने भरलेले आहे. यामुळे आपण अजून पाणी पिणे थांबवतो.
पोट भरले आहे हे संदेश देणारे संवेदक (STRETCH RECEPTORS) सुद्धा जठरात असतात. दुर्दैवाने आवडीचे अन्न दिसले कि आपले पोट भरले आहे या संदेशाकडे माणूस दुर्लक्ष करत राहतो आणी मग काही काळाने हे संवेदक नीट काम करेनासे होतात किंवा मेंदू त्यांच्याकडे "दुर्लक्ष" करायला शिकतो. एकदा माणूस या दुष्टचक्रात शिरला कि जठराचे स्नायू पण ताणले जातात आणी हे ताणाची जाणीव करणारे संवेदक वरच्या पट्टीत काम करू लागतात. यामुळे जास्त अन्न खाल्ले नाही तर पोट "भरल्यासारखे" वाटतच नाही. लोक शेवटी ताक /आमटी/ दाल भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही म्हणतात ते हेच. दुर्दैवाने या "पोट भरल्या" नंतर सुद्धा लोक आईस क्रीम, गुलाब जाम ई स्वीट डिश खातातच. वर आईस क्रीमला पोटात जागा लागत नाही हे पालुपद. असे जेंव्हा बराच काळ चालू राहते तेंव्हा माणसाच्या शरीराची बोट लावीन तेथे वळकट्या अशी अवस्था होते.
तेंव्हा वजन कमी करण्याचा कोणताही उपाय करण्याच्या अगोदर आपण काय आणी कसे खातो आहे याची नीट उजळणी करा.
क्रमशः
प्रतिक्रिया
24 Jan 2016 - 1:52 am | उगा काहितरीच
लेख नेहमीप्रमाणेच चांगला . पुभाप्र ...
रच्याकने मी पहिला का ?
24 Jan 2016 - 6:27 am | एस
गुड वन. फार छान माहिती मिळतेय या लेखमालेतून.
25 Jan 2016 - 3:42 pm | नाखु
बरोबर आहे.
काय खाऊ नये किंवा टालावे/कमी खावे याबाबत पुढील भागात माहीती येईल विशेषतः १० ते १५ वयोगटासाठी
पालक नाखु
24 Jan 2016 - 7:17 am | खेडूत
आवडला..
पुभाप्र.
24 Jan 2016 - 8:15 am | चतुरंग
अतिशय मूलभूत अशा खाण्यापिण्याच्या सवयी या भागावरती अजूनही विवेचन आले तरी हवेच आहे. प्रतिसादांमधून जास्त चर्चा करता येईल.
टीवी बघत, मोबाईलवर खेळत, जेवण्याने आपण काय, किती आणि कसे जेवतो आहोत याचे भान राहत नाही आणि त्यामुळे पोट तर जास्ती भरतेच शिवाय अन्नाचे पचन नीट होत नाही.
"भुकेपेक्षा दोन घास कमी खा". हा सल्ला याच कारणासाठी दिला जात असावा.
बर्याच आधी माझ्या दुपारच्या आहारात मी भात आणि पोळी असे दोन्ही घेत असे. जेव्हापासून हे दोन्ही वेगवेगळी खाणी म्हणून काही तासांच्या अंतराने घेतोय तेव्हापासून उत्साहात कमालीचा फरक पडला आहे.
24 Jan 2016 - 3:11 pm | पद्मावति
फारच सुंदर लेख.
माहितीपूर्ण आणि मुद्देसुद.
25 Jan 2016 - 6:35 am | रेवती
वाचतिये.
25 Jan 2016 - 3:32 pm | रंगासेठ
वाचत आहे.
25 Jan 2016 - 4:43 pm | पैसा
अतिशय उपयोगी, माहितीपूर्ण लेख. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
25 Jan 2016 - 4:54 pm | सूड
माहितीपूर्ण भाग!! फाईव्हस्टार फ्रुट अँड नट्स/ डेरिमिल्क दोन घासात संपवणारे काही चेहरे आठवले.
26 Jan 2016 - 11:49 am | मुक्त विहारि
..... दोन घासात संपवणारे काही चेहरे आठवले.
व्यायाम करत असाल तर, "फाईव्हस्टार फ्रुट अँड नट्स/ डेरिमिल्क / हाय प्रोटीन फूड प्रॉडक्टस" प्रमाणात खाल्ले तर काही हरकत नसावी....
(चॉकलेट प्रेमी) मुवि
27 Jan 2016 - 2:59 pm | सूड
अहो मुविकाका, ते किती खातात त्याबद्दल नाही तर ते कसं खातात त्याबद्दल म्हणतोय मी!! जीभेवर येत नाही तोवर पोटात गेलं तर त्याची चव अशी काय घेतली असणार!!
25 Jan 2016 - 5:27 pm | सस्नेह
माहितीपूर्ण लेख.
26 Jan 2016 - 11:46 am | मुक्त विहारि
पुभाप्र.
26 Jan 2016 - 4:24 pm | अनन्न्या
पुभाप्र
26 Jan 2016 - 6:35 pm | टवाळ कार्टा
BMI कमी कसा करावा यावर काही वाचायला मिळेल का
29 Jan 2016 - 5:24 pm | सस्नेह
चावायचं कमी करा म्हणजे वाचायची गरजच राहणार नाही :D
29 Jan 2016 - 5:41 pm | टवाळ कार्टा
खिक्क...खरयं ते...पण सगळे चविष्ट पदार्थ वाकुल्या दाखवत बोल्वत रहातात त्याचे काय? :(
27 Jan 2016 - 4:27 am | रामपुरी
कुणी "बच्चा खातेपिते घर का है" हे म्हणाले कि यांचा उर भरून येतो
अगदी... असंख्य उदाहरणे डोळ्यासमोर आहेत. वर त्यांना हे सांगितलेलंही चालत/पटत नाही.
27 Jan 2016 - 4:29 am | रामपुरी
पु भा प्र
28 Jan 2016 - 2:11 am | Jack_Bauer
खूप छान लेखमाला आहे. अगदी कळीचा मुद्दा निवडलेला आहे आपण. आहाराबरोबरच व्यायामाच्या अभाव हे देखील जाडेपणाचे एक मुख्य कारण आहे असे वाचले होते.
28 Jan 2016 - 2:50 am | रुपी
माहितीपूर्ण लेखमाला. त्यातही हा भाग फारच आवडला.
मुलांच्या बाबतीत तुम्ही लिहिलेल्या बर्याच गोष्टी रोज ऐकते/ अनुभवते आहे. कुठेही मी आणि इतर भारतीय आया जमल्या किंवा अगदी फोनवर जरी बोलत असल्या की मुलांचे (कमी) खाणे हा एक चर्चेचा महत्त्वाचा विषय असतो. माझ्या ओळखीतल्या जर्मन, अमेरिकन आयांना मात्र मी त्याबद्दल चिंता करताना फारसं पाहिलं नाहीये. बाकी बाबतीत कितीही आधुनिक झालो तरी खाणे/ खाऊ घालणे यांबाबत आपण आजी/ आईच्या पिढीसारखेच आहोत असे वाटायला लागते. म्हणजे कधी कधी स्वतःला सगळ्या गोष्टी पटत असल्या तरी कधी दुसर्यांकडून ऐकून तुलना केलीच जाते!
बाटलीने दूध पिणारी मुले सुदृढ होतात, ती तरुणपणीही जास्त स्थूल होतात असे वाचण्यात आले होते, त्यात तथ्य आहे का? तसेच, बाटलीने, पण आईचे (उदा. नोकरी करणार्या) दूध पिणार्या मुलांच्या निरोगीपणा/ स्थूलता यांबाबत काही लिहाल का?
29 Jan 2016 - 5:16 pm | शेखरमोघे
लेख आवडला. ओळीने ३० दिवस फक्त MacDonalds मध्येच खाल्याने काय होइल त्याचे वर्णन वाचल्याचे आठवले म्हणून थोड्या शोधाने पुढील सन्दर्भ मिळाला जो वाचनीय आहे
https://en.wikipedia.org/wiki/Super_Size_Me
29 Jan 2016 - 5:59 pm | असंका
माझा काटा तर नुस्तं त्यावर उभं राहिलं की सांगतो बॉडी फॅट किती % आहे ते. एक दिशादर्शक म्हणून पुरेसं आहे की...
31 Jan 2016 - 11:48 am | अभिजीत अवलिया
उत्तम महिती. धन्यवाद डॉक्टर साहेब.
3 Feb 2016 - 12:25 am | अजो
माहितीपूर्ण लेखमाला.
21 Feb 2016 - 11:08 am | मोहन
काटा पुढे सरकवा डॉ. साहेब ... :-) आम्ही सगळे वाट बघतो आहोत.
25 Feb 2016 - 5:22 pm | माझीही शॅम्पेन
+ १०००
8 Mar 2016 - 2:04 pm | माझीही शॅम्पेन
अरे काय हे
विसरले कि काय ?
8 Mar 2016 - 2:11 pm | मोहन
डॉ. साहेब, त्या अफझलच्या आणि कन्हैयाच्या धाग्यावर उतारा पाहीजे आता.
पुढचा भाग टाकायचे जरा मनावर घ्याच. गेल्या १५-२० दिवसात १-२ किलो वजन वाढ्ल्या सारखे वाटत आहे हो.
10 Mar 2016 - 1:10 pm | रागो
मधुमेहावर नियंत्रणासाठी आजकाल "कमीकर्बोदके आणि उच्चचरबीयुक्त आहार" (LCHF)
यावर बरीच उलट सुलट चर्चा होते आहे. या विषयावर तज्ञांचे काय मत आहे.
11 Mar 2016 - 10:20 am | सुबोध खरे
क्षमस्व
या विषयात हात घातला तेंव्हा तो सोपा वाटला होता. प्रत्यक्ष वाचत गेलो तसे लक्षात आले कि हा एक महासागर आहे. आणी माझी बुडी मारायची क्षमता सहा फुट आहे. त्यामुळे या विषयात अजून वाचन चालू आहे. कारण एवढ्या प्रचंड विषयाचे सध्या शब्दात सुसंगत वर्णन करणे अधिकाधिक जिकीरीचे होत आहे.
असो,त्यात सध्या घर हलविणे चालू असल्याने अजूनच अडचण आहे. कार्बन लेख लिहिला कि त्यावर येणाऱ्या शंकान्ची उत्तरे देण्यास वेळ लागतो तो हाताशी येई पर्यंत थोडा धीर धरावा लागेल.
परत एकदा क्षमस्व.
17 Jun 2016 - 10:28 am | बिहाग
बरेच वर्ष प्रयत्न करूनही वजन कमी करता येत नव्हते. सगळी अवस्था ही "कळते पण वळत नाही" याप्रमाणे होती
शेवटी ह्या लेखाचे तीनही भाग वाचले आणि २ महिन्यामध्ये २ आकडी वजन केले. जरा मनाचा तोल ढळतो असे टाकले ही परत सगळे लेख वाचायचे
धन्यवाद डॉक्टर साहेब !!