शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
30 Jun 2017 - 7:00 pm

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश!

सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात.

महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची.

मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई.

बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो.

एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील.

आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे.

‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण.

गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो.

आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो:

१. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो!
२. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी.

आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की!

शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही!

आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल?

एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.
*****************************************************************************
( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

भाषालेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

30 Jun 2017 - 7:12 pm | उगा काहितरीच

मस्त ! वेगळ्याच विषयावर मनोरंजक लिखाण .

उगा काहितरीच's picture

30 Jun 2017 - 7:12 pm | उगा काहितरीच

मस्त ! वेगळ्याच विषयावर मनोरंजक लिखाण .

दशानन's picture

30 Jun 2017 - 10:59 pm | दशानन

जबरदस्त!
सविस्तर प्रतिसाद नन्तर देतो, ही फक्त पोच!

रुपी's picture

30 Jun 2017 - 11:12 pm | रुपी

मस्त.. लेखन आवडले..
foolscap बद्दल नवीनच माहिती समजली.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2017 - 11:24 pm | मुक्त विहारि

शब्दकोशांची सवय मला पण होती,

आमची धाव "वीरकरां" पर्यंतच आणि तरखडकर ह्यांच्या पर्यंतच.

(स्वगत : शब्दकोश आणि ज्ञानकोशांची खूपच गरज असेल तर लग्न करणे.)

ज्योति अळवणी's picture

1 Jul 2017 - 12:18 am | ज्योति अळवणी

मस्त माहिती आहे.

पद्मावति's picture

1 Jul 2017 - 1:39 am | पद्मावति

खूप छान माहिती.

सर्व प्रतिसादकांचे आभार !
आमची धाव "वीरकरां" पर्यंतच आणि तरखडकर ह्यांच्या पर्यंतच. >>> अहो, हेही नसे थोडके ! कोश वापरणे महत्वाचे.

पण सध्या तरी इंग्रजी शिकायचे बंद केले आहे.

गॅरी ट्रुमन's picture

1 Jul 2017 - 9:15 am | गॅरी ट्रुमन
गॅरी ट्रुमन's picture

1 Jul 2017 - 9:16 am | गॅरी ट्रुमन

लेख खूपच आवडला. असा शब्दांचा अभ्यास कधीतरी करावा असे नेहमी वाटते.

लेख खूपच आवडला. असा शब्दांचा अभ्यास कधीतरी करावा असे नेहमी वाटते. >>> आभार ! जरूर करा. त्यासाठी शुभेच्छा.

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Jul 2017 - 10:34 am | माम्लेदारचा पन्खा

आज माहितीत भर पडली !

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Jul 2017 - 10:34 am | माम्लेदारचा पन्खा

आज माहितीत भर पडली !

वरुण मोहिते's picture

1 Jul 2017 - 10:38 am | वरुण मोहिते

आपण भानू काळे ह्यांच्या अंतर्नाद मध्ये लिहिता का ??लेख आवडला .

नीलमोहर's picture

1 Jul 2017 - 11:41 am | नीलमोहर

मस्त लिहिलाय लेख, रिकाम्या वेळात शब्दकोश वाचत बसणं हा एक इंटरेस्टिंग तसेच माहितीत भर घालणारा उद्योग असतो, शब्दांचा अफाट खजिना समोर असतो, त्यातून नवीन शब्द शोधण्यात, त्यांचे अर्थ जाणून घेण्यात वेगळाच आनंद मिळतो.
आता सर्रास गुगल सर्च वापरले जाते, पण शब्दकोशांची मजा निराळीच.

कुमार१'s picture

1 Jul 2017 - 12:06 pm | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
वरुण, होय. तो मीच ! अंतर्नाद मधील साहित्य येथे पुन्हा प्रकाशित करताना मी तशी तळटीप देत असतो.
हा लेख येथे लिहीताना त्यात जालकोशांबद्दलचा परिच्छेद वाढवला आहे.
कालानुरुप बदल केलेले बरे असते.

नीलमोहोर , सहमत.

दुर्गविहारी's picture

1 Jul 2017 - 12:44 pm | दुर्गविहारी

खुपच माहितीपुर्ण लेख. मात्र अंतर्नादच्या कोणत्या महिन्याच्या आवॄत्तीत हा लेख आलाय ते सांगितले तर बरे होईल.

कुमार१'s picture

1 Jul 2017 - 1:15 pm | कुमार१

दुर्गाविहारी, आभार.
मात्र अंतर्नादच्या कोणत्या महिन्याच्या आवॄत्तीत हा लेख आलाय ते सांगितले तर बरे होईल. >>>> ९/२००६.

मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. अर्थात इंग्लिश-इंग्लिशच्या तुलनेत या कोशाचे स्वरूप त्रोटक वाटते, हे कबूल करावे लागेल
दाते-कर्वे यांचा ९ खंडांचा शब्दकोश " त्रोटक " वाटतो? गंमतच आहे.
शरद

जुइ's picture

3 Jul 2017 - 2:26 am | जुइ

वेगळ्या विषयावरील रजंक लेख आवडला.

कुमार१'s picture

3 Jul 2017 - 5:58 am | कुमार१

जुइ, आभारी आहे.

चांगल्याप्रकारे विषय फुलवला आहे, आवडलं.

दशानन, तुमच्यासारख्या सुजाण वाचकांच्या प्रतिसादांमुळे हा लेख फुलला आहे ! आभार.

सानझरी's picture

3 Jul 2017 - 3:02 pm | सानझरी

लेख खूप आवडला..

कुमार१'s picture

3 Jul 2017 - 8:21 pm | कुमार१

सानझरी,आभारी आहे.

>>दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. >>
! दांडगी चिकाटी आहे.

२००९ नंतर काय वेगळी शब्दकोश ,इतर साधने वापरलीत?
ललित छान!

कुमार१'s picture

3 Jul 2017 - 9:18 pm | कुमार१

कंजूस, आभारी आहे.
२००९ चा संदर्भ कळाला नाही.
सध्या इंग्लिश च्या संदर्भात online dict & thesaurus, 'Dictionary.com' s 'Word Facts', wordsmith.org इ. अभ्यासतो. मराठीसाठी घरी शब्दरत्नाकर आहे. जालावर 'मोल्सवर्थ' बघतो. मध्यम आकाराचा एखादा चांगला छापील कोणीतरी सुचवा. प्र.न.जोशींचा ऐकून आहे. अर्थात फार छापील आता घेण्यात अर्थ नाही.

सचिन काळे's picture

5 Jul 2017 - 8:28 am | सचिन काळे

@ कुमार१, आपल्याकडील ज्ञानाला माझा नमस्कार!!

कुमार१'s picture

5 Jul 2017 - 11:58 am | कुमार१

सचिन, आभार ! आपण सतत अभ्यास करीत राहायचे आणि ज्ञान वाढवायचे. बस्स एवढेच खरे.

कुमार१'s picture

4 Jul 2017 - 10:21 am | कुमार१

जालावरचे इंग्लिश- मराठी शब्दकोश तितकेसे समाधानकारक नसतात असे मला बरेचदा जाणवले आहे.
विशेषतः, अर्थाने जवळपास असणाऱ्या परंतु, सूक्ष्म फरक असणाऱ्या दोन इंग्लिश शब्दांचा मराठीत एकच अर्थ दिलेला असतो.
दोन उदाहरणे देतो:
• moral & ethical या दोघांचा अर्थ ‘नैतिक’ असा दिला आहे.
• ludicrous & ridiculous या दोघांचा अर्थ ‘हास्यास्पद’ असा दिला आहे.

माझ्या मते ही जालिय शब्दकोशांची मर्यादा असावी.
इथल्या अभ्यासकांचे काय मत आहे ?

सतिश गावडे's picture

4 Jul 2017 - 11:56 am | सतिश गावडे

ridiculous शब्दाचा मराठी अर्थ काय आहे?
मला या शब्दाचा मराठी अर्थही ridiculous हाच माहिती आहे. :)

सतिश गावडे's picture

4 Jul 2017 - 11:58 am | सतिश गावडे

किंवा मग ridiculous म्हणजे disgusting =))

रुपी's picture

6 Jul 2017 - 1:20 am | रुपी

'कैच्या कै' कसा वाटतो? :)

सचिन काळे's picture

6 Jul 2017 - 10:56 am | सचिन काळे

'कैच्या कै' कसा वाटतो? >>> लै भारी!!! *lol*

मला तो जोक आठवला ज्यात एक व्यक्ती "मला तुमचे म्हणणे समजले नाही, कृपया आपण मला पुन्हा सांगाल का?" असं इंग्रजीत म्हणते. त्या वाक्याला मराठीत पर्यायी वाक्य काय असेल? तर उत्तर होतं "आँ!?"

अभिजीत अवलिया's picture

5 Jul 2017 - 12:33 pm | अभिजीत अवलिया

छान माहिती

कुमार१'s picture

6 Jul 2017 - 7:26 am | कुमार१

अभिजित, आभार !
@रुपी : ridiculous = उपहासात्मक ( वीरकर कोशानुसार)

मराठी_माणूस's picture

7 Jul 2017 - 11:58 am | मराठी_माणूस

गभीर चा अर्थ काय आहे ? (हा शब्द "तिन्ही सांजा सखे मिळल्या" ह्या गाण्यात आहे )

कुमार१'s picture

13 Sep 2020 - 12:34 pm | कुमार१

म मा,

इथे (https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0)
असे दिले आहे :

गभीर, गंभीर
वि. १ खोल; अगाध (समुद्र, नदी)

दोन्ही शब्दांचा अर्थ एकच दिसतो आहे .

मराठी_माणूस's picture

14 Sep 2020 - 6:44 pm | मराठी_माणूस

आठवण ठेउन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

कुमार१'s picture

8 Jul 2017 - 9:52 am | कुमार१

गभीर चा अर्थ काय आहे ? >>> प्रयत्न करुनही अजून अर्थ सापडला नाही. क्षमस्व.

आता थोडी 'punch' शब्दाची गंमत बघा. त्याचा नेहमीच्या वापरातील अर्थ 'ठोसा' आपल्याला अगदी परिचित. त्याचे अन्य काही अर्थही आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'फळांच्या रसात वाइन घालून बनवलेले पेय'. या अर्थाची व्युत्पत्ती चक्क आपल्या संस्कृत मधून आहे! 'पंच', म्हणजेच 'पाच' हे त्याचे मूळ रुप. जसे आपले 'पंचामृत' तसा त्यांचा 'फळांचा पंच' !

इंग्लिशमध्ये नावाआधी लावायची जी आदरार्थी संबोधने आहेत त्यापैकी Mr, Mrs & Ms ही सर्वांनाच परिचित आहेत. गेल्या काही वर्षात या यादीत अजून एकाची भर पडली आह. ते संबोधन आहे Mx.
आता Mxचा वापर दोन ठिकाणी करता येतो:

१. तृतीयपंथी व्यक्तीच्या नावाआधी किंवा
२. जेव्हा आपल्याला एखाद्याच्या नाव/ आडनावावरून त्याच्या लिंगाबद्दल काहीच कल्पना येत नाही तेव्हा. अशी अडचण विशेषतः परदेशी व्यक्तीना पत्र लिहिताना येते.

गेल्या काही वर्षात तृतीयपंथीयांचे सामाजिक स्थान उंचावत आहे. तसेच त्यांना समाजव्यवहारात जबाबदारीची पदेही दिली जात आहेत. तेव्हा अशा वेळेस Mx चा वापर वाढता राहील.

कंजूस's picture

24 Jul 2017 - 12:05 pm | कंजूस

कुमार१,
एकूण तुमचा शब्दकोशांचा अभ्यास पाहता आता तुम्ही अडवान्सट पातळीवर गेला आहात. शब्दकोश उपयोगाचे नाहीत. या इंग्रजी अथवा इतर कोणत्याही भाषेतले साहित्य वाचून त्या विशेष शब्दांची वाक्येच आत्मसात करावी लागणार आहेत.
*२००९ चा लेख आहे,त्यानंतर नवीन काय असं विचारायचं होतं.
*ludicrous: हसू आणणारं वर्तन कृती इत्यादी
-balancing her umbrella,new dress in the heavy rain was ludicrous.
*ridiculous: हास्यास्पद,टर उडवावी असे.
-The politicians were ridiculed in the drama.
-Some of the Android games demand ridiculously large RAM.

कंजूस, अभिप्रायाबद्दल आभारी आहे. तुमचा प्रतिसाद आवडला. सल्ला ही उपयुक्त आहे.

कुमार१'s picture

29 Jul 2017 - 11:28 am | कुमार१

आपण जेव्हा समाजाची आर्थिक परिस्थितीनुसार दोन ढोबळ गटांत विभागणी करतो तेव्हा त्या गटांना 'आहेरे' व 'नाहीरे' असे शब्द वापरतो. इंग्लिश् मध्ये त्यांना 'haves' & 'have-nots' असे म्हणतात.

यातील 'haves' ला एक मजेशीर समानार्थी शब्द अमेरिकन इंग्लिशमध्ये आहे तो म्हणजे 'fat cats'.

जास्ती करून हा शब्द राजकीय पक्षांना मदत करणार्‍या धनदांडग्यांना उद्देशून वापरतात.

कंजूस's picture

29 Jul 2017 - 2:04 pm | कंजूस

अजून एक well fed people ( बहुतेक george orwell ने वापरलाय 'down and out in London'मध्ये )
पेपर कोणता वाचता?

कुमार१'s picture

29 Jul 2017 - 4:33 pm | कुमार१

कंजूस, बरोबर. मी सकाळ व Deccan Herald वाचतो.

चर्चिलचे सेकंड वल्ड वॅार,चांगले आहे.मी हल्ली एशिअन एज पेपर घेतो.

कुमार१'s picture

29 Jul 2017 - 8:55 pm | कुमार१

माहीती बद्दल आभार

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2017 - 9:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर, माहितीपूर्ण आणि रोचक मनोगत !

बॅटमॅन's picture

30 Jul 2017 - 12:49 am | बॅटमॅन

रोचक विषय निवडलाय. त्यात खालील काही शब्दकोशांचा उल्लेख केला असता तर अजून मजा आली असती वाचायला.

इंग्रजी:

हॉब्सन-जॉब्सन कोशः इंग्रजीतील फक्त भारतीय भाषांपासून उचललेल्या शब्दांचा कोश. मुळात हॉब्सन-जॉब्सन हे नावही मोहर्रममध्ये "या हसन- या हुसेन" म्हणतात त्याचे नादानुकारी इंग्रजीकरण आहे.

मराठी:

मराठी व्युत्पत्ती कोशः कृ.पां. कुलकर्णी यांनी मूळ कोश रचला, त्याला श्रीपाद जोशी यांनी पुरवणी जोडली. कैक शब्दांच्या व्युत्पत्त्या दिलेल्या आहेत, बघायला खूप मजा येते.

ऐतिहासिक शब्द कोशः न.चिं.केळकर यांचे पुत्र य.न.केळकर यांनी तयार केला. शिवकाळ आणि पेशवेकाळातील बखरी व कागदपत्रांत बरेच वेगवेगळे शब्द असतात, फक्त तशा शब्दांचा सेपरेट कोश आहे.

अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी: शं.गो. तुळपुळे आणि अ‍ॅन फेल्डहाउस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोश तयार झाला. ज्ञानेश्वरी व महानुभाव वाङ्मयात आढळणार्‍या शब्दांचा कोश.

फारसी/उर्दू - मराठी कोशः प्रसिद्ध मराठी कवी आणि फारसीचे उत्तम जाणकार माधव ज्यूलियन यांनी हा कोश तयार केला.

राज्यव्यवहारकोशः ढुंढिराज व्यास यांना शिवाजी महाराजांनी सांगितल्यावरून हा कोश रचला. याची रचना अमरकोशासारखी आहे. जुन्या संस्कृत शब्दकोशांची रचना आत्ताच्या डिक्शनर्‍यांसारखी अकारविल्हे क्रमाने नसून थीमॅटिक असे. म्हणजे त्यांमध्ये "वर्ग" असत, उदा. प्राणिवर्ग, मनुष्यवर्ग, फलवर्ग वगैरे. त्या त्या थीमप्रमाणे शब्द असत. तसराज्यव्यवहारकोशातही आहे. दुर्गवर्ग, पण्यवर्ग, इ.इ. काही श्लोक मनोरंजक आहेत, उदा.

तालीमखाना मल्लशाला मल्लो जेठी समीरितः|
कुस्ती नाम नियुद्धं स्यात् बलशिक्षा तु तालिमम् ||

दुर्गं किल्लेति विज्ञेयं गिरिदुर्गः गडः स्मृतः|
प्राकारः कोट इत्युक्तो जंजीरा द्वीप उच्यते ||

वगैरे.

तंजावरच्या मराठी राज्यातही असे काही द्राविडी-मराठी कोश रचले गेले.

कंजूस's picture

2 Aug 2017 - 6:30 pm | कंजूस

बॅटमॅन हे तुमच्याकडून येऊ द्या. देवदिवाळीपर्यंत आला लेख तरी चालेल.

मार्मिक गोडसे's picture

30 Jul 2017 - 7:40 am | मार्मिक गोडसे

माहितीपुर्ण लेख.

कुमार१'s picture

30 Jul 2017 - 8:09 am | कुमार१

डॉ सुहास व Batman , अभिप्राय व माहिती बद्द्ल आभार !

इन्ग्लिश मध्ये 'कांगारू शब्द' असा एक मजेदार प्रकार आहे. म्हणजे एका मोठ्या शब्दात साधारण त्याच अर्थाचा एक छोटा शब्द दडलेला असतो. उदा. curtail मध्ये cutआहे .
असे कांगारू शब्द बनवताना एक अट असते. मोट्या शब्दातून अक्षरे घेताना सर्व अक्षरे सलग घेता येत नाहीत. उदा. enjoy मधून joy नाही चालत.
........
जरा विचार केला की मराठीत असा प्रयोग जमेल का?
....दोन उदा. सुचलीतः
१. 'महानगरपालीका' पासून 'महापालीका'
२. 'तळागाळातील' पासून ' तळातील'.
ज्यांना अजून जमतील त्यांनी जरूर लिहा...

प्रकाश घाटपांडे's picture

4 Feb 2018 - 8:42 pm | प्रकाश घाटपांडे

जैविक विविधता वरुन जिविधा

जिविधा चांगला आणि वेगळा आहे

कुमार१'s picture

1 Jan 2018 - 12:16 pm | कुमार१

नाट्य क्षेत्रातील एक इंग्लिश 'संयोग शब्द' वाचनात आला:
Romance + comedy = romedy

चामुंडराय's picture

5 Jan 2018 - 9:37 pm | चामुंडराय

sitcom, romcom

हुच्चभ्रूंच्या सिरेल्सच्या धाग्यात sitcom (situational comedy ) आणि romcom (romantic comedy) बद्दल वाचलं.

कुमार१'s picture

6 Jan 2018 - 7:55 am | कुमार१

छान, म्हणजे romedy & romcom हे समानार्थी झाले.

कुमार१'s picture

5 Jan 2018 - 8:49 pm | कुमार१

दर वर्षाखेरीस Oxford तर्फे त्या वर्षीचा मानाचा शब्द जाहीर होतो.
2017 चा हा शब्द आहे : youthquake. त्याचा अर्थ आहे
'युवकांच्या कृतीतून घडणारा महत्वाचा सांस्कृतिक, राजकीय वा सामाजिक बदल'. ८ शब्दांच्या स्पर्धेतून याने बाजी मारली.

मुळात हा शब्द 1965 मध्ये प्रथम वापरला गेला होता- year of youthquake - या संदर्भात.

कुमार१'s picture

3 Feb 2018 - 4:38 pm | कुमार१

दर वर्षाखेरीस त्या वर्षीचा मानाचा शब्द जाहीर करणारा अजून एक कोश आहे dictionary.com.
त्यांचा 2017 चा शब्द आहे complicit. म्हणजे एखाद्या बेकायदा वा वाईट कृत्यात सहभागी असणे.
हा शब्द निवडीची दोन कारणे होती:
१. जास्तीत जास्त लोकांनी त्या वर्षात त्याचा कोशात शोध घेतला
२. जगभरात अनेकांनी complicit होण्याचे नाकारून त्या विरोधात आंदोलने केली.

ss_sameer's picture

4 Feb 2018 - 10:40 am | ss_sameer

तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अतिशय खऱ्या, पण आज काल च्या पिढीकडे पेशन्स कुठाय?
त्यांना व्हाट्स अप फेसबुक पेक्षा अजून काही वेगळा "ज्ञाना"चा मार्ग असतो हेही माहीत नाही बहुतेक.
शब्दकोश वाचन करणे साठी मुळात अंगी चिकाटी लागते आणि जिज्ञासा देखील. दोन्ही गोष्टी जन्मतः कमी माणसात सापडतात.
कुमार सर, तुमच्या चिकाटीला सलाम. वेगळ्या वाटेला सलाम.
आणि उत्तम लेखाबद्दल आभार..

स. शा.

कुमार१'s picture

4 Feb 2018 - 11:15 am | कुमार१

समीर, मनापासून आभार.
आपल्या आवडीचे छंद जोपासत राहायचे !

सालाबादप्रमाणे दोन मोठ्या शब्दकोशांनी त्यांचे यंदाचे शब्द जाहीर केले आहेत.

१. Oxford चा शब्द आहे ‘toxic’.

नेहमी हा शब्द रसायने आणि हवेच्या संदर्भात परिचित आहे. यंदा तो याव्यतिरिक्त खालील संदर्भात बराच वापरला गेला:

कामाच्या ठिकाणाचे वातावरण
माणसांतले संबंध
राजकारणी व्यक्तींचे वर्णन
पौरुषत्व
.........
२. Dictionary.com चा शब्द आहे ‘misinformation’.

म्हणजेच ‘दिशाभूल करणारी माहिती’. हे पसरवण्यामागे दिशाभूल करण्याचा हेतू असू वा नसूही शकतो. विशेषतःसध्या सोशल मिडियात जे ‘संदेश पुढे ढकलणे’ हा प्रकार चालतो त्याला उद्देशून हा शब्द आहे. काही जण जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवतात तर बरेच साधेभोळे लोक त्यांना आलेली अशी माहिती विचार न करता निव्वळ पुढे ढकलतात.

कुमार१'s picture

11 Dec 2019 - 3:56 pm | कुमार१

सालाबादप्रमाणे दोन मोठ्या इंग्रजी शब्दकोशांनी त्यांचे २०१९ चे मानाचे शब्द जाहीर केले आहेत.

१. Oxford चा शब्द आहे:
Climate emergency :
अर्थ अगदी स्पष्ट आहे - पर्यावरणातील घातक बदल खरोखर गंभीर पातळीवर पोचले आहेत; आपण तातडीने काही उपाय न योजल्यास ते अतिगंभीर होतील.
…...

२. Dictionary.com चा शब्द आहे:
Existential :
हा शब्द "आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे किंवा पणाला लागल्याचे" सुचवतो. यंदाच्या जागतिक पातळीवरील ३ प्रकारच्या घटना यात अभिप्रेत आहेत:

अ) पर्यावरणातील घातक बदल
ब) बेछूट गोळीबाराच्या घटना
क) काही देशांत लोकशाहीचे अस्तित्व

सुधीर कांदळकर's picture

13 Dec 2019 - 6:57 am | सुधीर कांदळकर

वाचनसंस्कृतीला चालना देणारा लेख.

मिपाने 'लेख ऑफ द ईयर' बक्षीस ठेवले तर याच लेखाला मिळण्याची शक्यता दिसते. आवडला हेवेसांनल.

मी तर इंग्रजी कादंबरी वाचतांनाही ऑक्सफर्डचा खिसा-शब्दकोष घेऊन बसतो. नेहमीचे शब्द वेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थच्छटा कशा दाखवतात तर कधी पूर्णपणे वेगळा अर्थ घेऊन येतात ते कळते. कधी पूर्णपणे अपरिचित संज्ञा कळतात. उदा. मोटारीच्या रस्त्यावरून स्वैर रीतीने भ्टकणे किंवा झीब्रा खूण नसलेल्या चुकीच्या ठिकाणाहून रस्ता पार करणे (जे आपल्याकडे सर्रास चालते) त्या अर्थाचा जेवॉक.

लेखन करतांना पूर्वी स्पेलिंगसाठी शब्दकोष घेऊन बसावे लागे. नंतर विंडोज ने ती गरज भागवली. व्हॅक्यूम सारख्या शब्दाची स्पेलिंगे बुचकळ्यात टाकणारी आहेतच.

हे झाले भाषिक शब्दकोष. त्यावरून काही विशिष्ट विषयावरचे काही शब्दकोष आठवले. ते देखील अलीबाबाच्या गुहा आहेत. उघडले की कालमापन तासात करावे लागते.

आयपी, बीपी, बीपीसी, यूएसपी आणि यूएसएसआरपी असे फार्माकोपिये, रसायनांची अणुरचना दाखवणारे, गुणधर्म सांगणारे मार्टिंडेल, गॅरट हे देखील शब्दकोषच. वैद्यकीय क्षेत्रातले शब्दकोष असतीलच. नोकरीत कधी गरजेखातर तर कधी रिकामा वेळ असला की कधीतरी या गुहेत जाणे होत असे.

माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात तर आयटीआयएल हा वेगळा शब्दकोष आहे आणि त्याची परीक्षा उत्तीर्ण होणे ही एक अर्हता मानली जाते.

मस्त लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

कुमार१'s picture

13 Dec 2019 - 7:48 am | कुमार१

सुधीर, धन्यवाद.

जेवॉक

शब्द झकास, आवडला !

तेजस आठवले's picture

14 Dec 2019 - 2:41 pm | तेजस आठवले

कुमारजी,
उत्तम लेख. मिपावर येण्यात फारसा अर्थ उरला नाही असे वाटायला लावणाऱ्या वातावरणात असे लेखच हे संस्थळ टिकवून ठेवतात.
काय वैविध्य आहे हो तुमच्याकडे. अनेक धन्यवाद.

अवांतर: चतुर्भुज झाल्यानंतर सगळ्यातलं सगळं कळणारी अशी व्यक्ती घरात आल्याने मी शब्दकोश आणि इन्सायक्लोपेडीया कपाटावर टाकून ठेवले आहेत.

-(निराश) शब्दकोशप्रेमी.

कुमार१'s picture

14 Dec 2019 - 3:19 pm | कुमार१

मनापासून धन्यवाद !
तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच लेखन करण्यास हुरूप येतो.
बाकी घरातल्या 'त्या' जित्याजागत्या कोशाबाबाबत सहमत !!

कुमार१'s picture

22 Apr 2020 - 5:41 pm | कुमार१

डॉ. बिरबल झा हे दिल्लीस्थित इंग्लीश भाषातद्न्य आहेत. नुकताच त्यांनी Healthsake हा नवा शब्द तयार केला. हा शब्द Collins इंग्लीश शब्दकोशाने स्वीकारला आहे.
अभिनंदन !

‘ No handshake for healthsake ‘ असा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे.

मायमराठी's picture

22 Apr 2020 - 6:12 pm | मायमराठी

आपण सर्वांनी वापरलं असेलच i.e.
अर्थात that is. मी शिकवताना वापरायचो. एक दिवस माझा मलाच प्रश्न पडला की ह्या दोघांचं नातं नेमकं काय? शोधाशोध केल्यावर कळलं की i.e ( लॅटिन) म्हणजे id est = म्हणजे . इंग्रजी अर्थ that is.
तेव्हापासून लिहिताना t.i वापरतो.
तेच 'उदाहरणादाखल' असं म्हणताना E.g वापरतात. त्यातल्या g च कूळ आणि मूळ gratia आहे( लॅटिनच) , हे फार उशीराने कळलं. पण पान पाठीवर पडलेल्या सश्यामागे धावणं काही चुकत नाही हेच खरं.

गामा पैलवान's picture

15 May 2020 - 5:48 pm | गामा पैलवान

मायमराठी,

id est हे इति अस्तु असं संस्कृत वाटतंय.

आ.न.,
-गा.पै.

कुमार१'s picture

22 Apr 2020 - 6:21 pm | कुमार१

तेव्हापासून लिहिताना t.i वापरतो.

>>> रोचक !
नव्या गोष्टी आपणच रूढ करायच्या .... चांगलंय.

कुमार१'s picture

1 May 2020 - 4:09 pm | कुमार१

१ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश महाराष्ट्र दिनी प्रकाशित

बातमी इथे
सुंदर उपक्रम .
संबंधितांचे अभिनंदन !

कुमार१'s picture

15 May 2020 - 1:35 pm | कुमार१

‘मराठी लेखन कोशा’चे शिलेदार अरुण फडके यांचे निधन.
त्यांचा परिचय इथे:

https://www.aksharnama.com/client/article_detail/4263

आदरांजली !

गामा पैलवान's picture

15 May 2020 - 5:46 pm | गामा पैलवान

आदरपूर्वक श्रद्धांजली!

साठ हे जाण्याचं वय नाही! :-(

-गा.पै.

कुमार१'s picture

15 May 2020 - 6:06 pm | कुमार१

६४. कर्करोग.....
वाईट वाटले.

कुमार१'s picture

17 May 2020 - 12:31 pm | कुमार१

Dictionary.com ने काही भारतीय इंग्लिश वाक्य अथवा शब्दांची विशेष दखल घेतली आहे ते असे आहेत :

Do the needful
Timepass
Mugging
My teacher is sitting on my head !
My friend is eating my brain !

Do one thing
Kindly adjust

…. संबंधित लेखात असेही म्हटले आहे, की आपण सुद्धा हे शब्द /वाक्य वापरून बघायला हरकत नसावी !

गामा पैलवान's picture

17 May 2020 - 1:17 pm | गामा पैलवान

कुमारेक,

ही भाषांतरं दिसताहेत.

Do the needful = नड भागवा
Timepass = वेळ घालवायला
Mugging = जोमाने अभ्यास ?
My teacher is sitting on my head ! = गुर्जी डोस्क्यावर बसलेत
My friend is eating my brain ! = मित्रं डोस्कं खातोय
Do one thing = एक काम कर
Kindly adjust = जरा (सरकून?) घ्या

आ.न.,
-गा.पै.

वामन देशमुख's picture

19 May 2020 - 12:56 am | वामन देशमुख

माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार, Do the needful = नड भागवा योग्य ती कार्यवाही करावी.

कुमार१'s picture

19 May 2020 - 10:07 am | कुमार१

अगदी बरोबर .
योग्य इंग्लिशनुसार असे न लिहिता, 'प्रत्यक्ष कामाचे स्वरूप लिहून ते करावे', असे लिहिले जाते.
असे मी एका इंग्लिश पुस्तकात वाचले होते

कुमार१'s picture

17 May 2020 - 1:33 pm | कुमार१

अशा भाषांतरातूनच आपण "भारतीय इंग्लिश" जन्माला घालतो !

कुमार१'s picture

8 Jul 2020 - 2:16 pm | कुमार१

भाषेचे गाढे अभ्यासक प्रा.एन. डी. आपटे यांचे निधन.
(https://maharashtratimes.com/editorial/manasa/nond-professor-n-d-apte/ar...)
आदरांजली.

कुमार१'s picture

17 Nov 2020 - 6:41 pm | कुमार१

ऑक्सफर्ड शब्दकोशात 'वुमन' या शब्दाला सुचवण्यात आलेले आक्षेपार्ह समानार्थी शब्द (bitch, bint, wench, baggage, इ.) तिथे उभारल्या गेलेल्या लढ्यामुळे काढून टाकण्यात आले.
चांगला लेख

कुमार१'s picture

24 Dec 2020 - 12:08 pm | कुमार१

अपेक्षेप्रमाणे यंदा प्रमुख इंग्लिश शब्दकोशांचे मानाचे शब्द असे:

केम्ब्रिज : quarantine
डिक्शनरी. कॉम: pandemic

ऑक्सफर्डने एक शब्द न निवडता बरेच निवडले आहेत. त्यात covid चा समावेश आहे.

कुमार१'s picture

5 Jun 2021 - 5:20 pm | कुमार१

हे पूर्वी लिहिले होते :
१ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश महाराष्ट्र दिनी प्रकाशित
>>
आता हा कोश विस्तारित होऊन त्यात २,०४,१४० शब्द आहेत.
त्यांनी आता ५ कोश एकत्रित केले आहेत.
https://bruhadkosh.org/

कुमार१'s picture

20 Jun 2021 - 10:02 am | कुमार१

अलीकडे प्रचारात असलेल्या अतरंगी या शब्दाची एक गंमत आहे.
सध्या तो “अंगी नाना कला असलेला’ किंवा ‘विलक्षण’ या अर्थाने वापरला जातो.

परंतु हा शब्द उपलब्ध अधिकृत शब्दकोशांत तरी सापडत नाही. मी बृहद्कोश, शब्दरत्नाकर आणि गुगलशोध हे सर्व करून पाहिले.

या शब्दाबद्दल तो हिंदी शब्दकोशात देखील सापडत नसल्याची रोचक चर्चा इथे (https://groups.google.com/g/shabdcharcha/c/E4mqGsYbM3M?pli=1)आहे.

कुणाला या शब्दाच्या मराठी उगमाबाबत अधिक माहिती असल्यास जरुर लिहा.

कुमार१'s picture

15 Jul 2021 - 5:26 pm | कुमार१

‘ट्याहां’ या शब्दासंबंधी एक रोचक लेख

Nitin Palkar's picture

15 Jul 2021 - 7:48 pm | Nitin Palkar

तुमच्या सर्वच लेखांप्रमाणे माहिती पूर्ण आणि मनोरंजक लेख.