✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शब्दकोशांच्या मनोरंजक विश्वात

ह
हेमंतकुमार यांनी
Fri, 06/30/2017 - 19:00  ·  लेख
लेख
माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर नजर जाई. तिथे मोठ्या व आकर्षक अक्षरात ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन लिहिलेले होते. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. मोठे होता होता मी विविध प्रकारचे तीन भाषांतील साहित्य वाचत गेलो आणि एका निष्कर्षाप्रत येउन ठेपलो. तो म्हणजे, या सर्व ग्रंथरूपी गुरूंचे गुरु म्हणजे शब्दकोश! सुरवातीला वाचनात एखादा शब्द अडला, की त्याचा अर्थ पाहण्यापुरता शब्दकोश उघडला जाई. तो जमाना अर्थात फक्त छापील पुस्तकांचाच होता. त्या वयात मी शब्दकोशाच्या जाडजूड ‘प्रकृती’कडे कुतूहलाने बघत असे. शालेय जीवनात शब्दकोशाचा उपयोग शब्दार्थ पाहण्यापुरताच सीमित होता. तेव्हा इंग्लिश–मराठी, मराठी-इंग्लिश आणि हिंदी-मराठी हे शब्दकोश हाताळले जात. महाविद्यालयीन जीवनात ‘ब्रिटीश लायब्ररी’ चा सभासद झाल्यावर काही थोर इंग्लिश लेखक वाचायला घेतले. तेव्हा इंग्लिश पुस्तकांचे वाचन म्हणजे एक अभ्यासच असायचा. हातात ते पुस्तक, टेबलावर इं-मराठी शब्दकोश आणि शब्दार्थ टिपून घ्यायला बाजूला वही-पेन. वाचलेल्या साहित्याची काही वडीलधाऱ्यांशी चर्चा होई. त्यात एका गृहस्थांनी सल्ला दिला, की आता शब्दार्थ पाहण्यासाठी तुमच्या शालेय शब्दकोशावर समाधान मानू नकोस; आता गरज आहे ती तू ‘Oxford’ ची कास धरण्याची. मग मी Concise Oxford च्या इंग्लिश- इंग्लिश कोशाची खरेदी केली. सहज म्हणून हा कोश चाळू लागलो अन पहिल्या नजरेतच लक्षात आले, की हा निव्वळ शब्दकोश नसून साक्षात ज्ञानकोश आहे. त्यात एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ देण्यासाठी पुस्तकाच्या पानाचा तब्बल एक स्तंभही खर्ची पडलेला दिसे. एखाद्या कठीण शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी म्हणून कोश उघडला जाई आणि तो अर्थ पाहता पाहता एकातून दुसऱ्या व त्यातून तिसऱ्या शब्दात मी उड्या मारत असे. कित्येकदा शब्दार्थासाठी उघडलेला कोश पाहताना वाचनाचे मूळ पुस्तक बाजूलाच राही आणि बराच वेळ मी शब्दकोशातच मनसोक्त विहार करीत असे. शब्दाच्या अर्थाबरोबरच त्याचा उगम, ऐतिहासिक संदर्भ इत्यादी माहिती वाचून छान मनोरंजन होई. बऱ्याचदा आपल्या नेहमीच्या वापरातले शब्दसुद्धा कोशात पाहण्यात मजा येते. उदाहरणार्थ ‘August’ हा शब्द पाहा. आता हे एका महिन्याचे नाव आहे हे शाळकरी पोरही सांगते. पण ते नाव रोमन साम्राज्याचा पहिला राजा ऑगस्टस सीझर याच्यावरून आहे, तसेच august चा दुसरा अर्थ ‘थोर’ असाही आहे हे ज्ञान आपल्याला शब्दकोशात डोकावल्याशिवाय कसे मिळेल? एखाद्या शब्दाला तर एकापेक्षा अनेक असे कित्येक अर्थ असतात आणि त्या अर्थांचा एकमेकाशी सुतराम संबंध नसतो. ‘set’ चे तब्बल १५६ प्रकारचे अर्थ आहेत हे जेव्हा आपल्याला कोशात दिसते तेव्हा मोठा अचंबा वाटतो. एकच उच्चार पण भिन्न स्पेलिंग व अर्थ असणारे शब्द जेव्हा आपण कोशात पाहून पक्के करून घेतो तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. सध्याच्या ‘ हॅलो, हाय’च्या युगात बहुतेकांना फोनवरचाच ‘हॅलो’ माहित असतो. पण, शब्दकोश बारकाईने पाहणाऱ्यालाच hallo, hallow & halo यांतील फरक समजलेले असतील. आपल्या देशात गेल्या पंचवीस वर्षांत इंग्लिश माध्यमातून शालेय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय दिसून येते. ही पिढी ‘स्पोकन इंग्लिश’ च्या बळावर येताजाता टूरटूर करीत असते. पण त्याचबरोबर त्यांचे स्पेलिंग व व्याकरण यांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले जाणवते. अशा काहींची फिरकी घ्यायला मला आवडते. त्यांना मी ‘फुलस्केप’ या परिचित शब्दाचे स्पेलिंग विचारतो. आतापर्यंत तरी मला हे अचूक स्पेलिंग सांगणारी व्यक्ती भेटलेली नाही. याचे स्पेलिंग आहे ‘foolscap’ आणि योग्य उच्चार आहे ‘फुल्झकॅप’. हे ज्ञान शब्दकोशाला आपला मित्र केल्याशिवाय प्राप्त होणे नाही! मोठ्या आकाराचा कागद म्हटल्यावर बहुतेकजण ‘full…’अशी सुरवात करतात अन fool होऊन बसतात! या शब्दाचा उगम तर किती मनोरंजक. Fool म्हणजे विदूषक. पुरातनकाळी विदूषक जी टोपी वापरत त्या टोपीचे चिन्ह ‘watermark’ म्हणून या कागदात उमटवलेले असे. ‘फुलस्केप’ वरून घडलेला एक किस्सा सांगतो. एका माध्यमिक शाळेत सत्राच्या पहिल्या दिवशी एक शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणाल्या, “हे बघा, सर्वांनी ‘फुलस्केप’ वह्या आणायच्या आहेत, ‘हाफस्केप’ वह्या आणलेल्या मला अजिबात चालणार नाहीत!” एखादा शब्द नीट न शिकून घेतल्याचे परिणाम एका पिढीकडून पुढच्यांकडे कसे संक्रमित होतात याचे हे उदाहरण. गडद काचांच्या चष्म्याला आपण ‘गॉगल’ म्हणतो यात नवीन काहीच नाही. पण या शब्दाचे स्पेलिंग goggles असून ते अनेकवचनी नाम म्हणूनच वापरायचे असते ही दृष्टी मला शब्दकोशानेच दिली. आपल्या समाजात एखाद्याने ‘लेस्बिअन’ हा शब्द जरी उच्चारला तर आपण पटकन चमकून त्याच्याकडे पाहतो. जर उत्सुकता म्हणून आपण हा शब्द कोशात पाहिला तर त्याचा उगम पाहून आपली करमणूक होते. ‘lesbos’ नावाच्या बेटावर ‘साफो’ नावाची कवयित्री राहत असे आणि ती समलिंगी संबंधात गुंतल्याचा लोकांना संशय होता. ही माहिती समजल्यावर या शब्दाकडे आपण अश्लील म्हणून न पाहता कुतूहलाने पाहू लागतो. आजकाल आपले एखादे कार्यालयीन काम होणे जर एखाद्या स्त्रीच्या हातात असेल तर तिच्या तेथील दर्जाचा विचार न करता आपण तिच्यापुढे सारखे ‘Madam, Madam’ करीत असतो. आता ‘madam’ चे कोशातील दोन अर्थ बघा. या शब्दाचा उगम फ्रेंचमधून आहे.त्याचा पहिला अर्थ ‘बाईसाहेब’ असा तर दुसरा चक्क ‘वेश्यागृहाची मालकीण’ असा आहे! तसेच या शब्दाचे अनेकवचन( madams असे नसून) फ्रेंच पद्धतीने Mesdames असे आहे. सध्या सर्वत्र बोकाळलेल्या मॅडमांनी हा शब्द पूर्णपणे समजून घ्यायला काही हरकत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यापासून ते डॉक्टर होऊन तीस वर्षे उलटून गेल्यावरही वैद्यकीय शब्दकोश हा तर माझा जिवलग मित्र आहे. त्याच्या पातळ पांढऱ्याशुभ्र कागदावर परदेशात केलेली सुंदर छपाई, त्याचा लठ्ठ पण मोहक आकार, त्यातील अवघड शब्दांची केलेली सुरेख फोड, शब्दार्थांचा पाडलेला कीस आणि शब्दानुरूप चित्रे ही त्याची वैशिष्ट्ये मला नेहमीच मोहित करतात. सामान्य वाचकांसाठी त्यातले दोन मनोरंजक शब्द सांगतो: १. AC/DC : खरे तर आपल्या सामान्यज्ञानानुसार हे विद्युत प्रवाहाचे दोन प्रकार आहेत. पण वैद्यकीय कोशातील त्याचा अर्थ ‘bisexual individual’ असा वाचल्यावर आपण कपाळावर हात मारून घेतो! २. Hartnup disease : हा एक आनुवंशिक आजार आहे. आता Hartnup हे बहुधा ज्या शास्त्रज्ञाने तो आजार शोधला त्याचे नाव असेल असा अंदाज आपण बांधतो. पण शब्दकोशाचा पाहा काय सांगतो ते. Hartnup हा शास्त्रज्ञ नसून, तो आजार ज्या रुग्णामध्ये पहिल्यांदा आढळला त्याचे आडनाव आहे. १९५० च्या सुमारास ब्रिटनमधील श्री. हार्टनप यांनी आपल्या cousinशी लग्न केले होते. त्या दाम्पत्याला झालेल्या आठ अपत्यांपैकी चौघांमध्ये हा आजार आढळून आला. मराठी-मराठी कोश हाताळणे ही सुद्धा एक चांगली करमणूक आहे. बऱ्याचदा मराठी कोश बघण्याच्या बाबतीत मराठी माणूस उदासीन असतो. आपल्या दैनंदिन वापरातील काही मराठी शब्दांचा खरा अर्थ हा कोश पाहिल्यावरच आपल्याला समजतो. अन्यथा त्याऐवजी काहीतरी चुकीची कल्पना किंवा अर्धवट माहिती आपल्या डोक्यात असते. एकदा एका कॉलेजच्या तरुणाला मी ‘आदिवासी’ चा अर्थ विचारला. क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, “ते म्हणजे अति मागास गरीब लोक”. त्याच्या म्हणण्यात जरी तथ्य असले तरी खरा अर्थ तो नाही. ‘आदी’= मूळ व ‘वासी’= राहणारे. म्हणजेच, एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवासी. आपल्याकडे पाटील, कुलकर्णी, कांबळे ही अगदी सर्रास आढळणारी आडनावे. एकदा सहज म्हणून ‘कुलकर्णी’ ची व्युत्पत्ती कोशात बघितली आणि स्तिमित झालो. ती बघण्यापूर्वी, ‘कुलकर्णी’ हा शब्द अस्सल मराठीच – एवढेच काय, पण पक्का पुणेरीच- या भ्रमात मी होतो. शब्दकोशाने मला सांगितले, की हा शब्द मूळ तेलुगु (कुळकरणी) आहे. कुळ = शेतकरी आणि करण = हिशेब. हे वाचल्यावर मला एका ‘कुळाचा’ शोध तर लागलाच आणि त्याचबरोबर माझ्या भाषिक अस्मितेचे कुंपण गळून पडले, हे नक्की! शब्दकोशांमध्ये काही व्यवहारोपयोगी परिशिष्टेही असतात. निरनिराळ्या लघुरुपांचे (acronyms) पूर्ण रूप देणारे परिशिष्ट हे त्यातले एक ठळक उदाहरण. सध्याच्या संगणकीय युगात कित्येक नवीन लघुरुपांचा सुळसुळाट झालेला आहे. अशी काही लघुरूपे आपल्या डोळ्यांसमोर सतत आल्याने हळूहळू आपल्याला ते जणू काही शब्दच आहेत असे वाटू लागते. एक उदाहरण देतो. सध्या कोणताही online व्यवहार करताना आपल्याला सतत भेटणारे एक लघुरूप म्हणजे ‘CAPTCHA’. त्याचे दीर्घरूप किती मनोरंजक आहे आणि त्यामागचा तांत्रिक इतिहास काय आहे, ते आपल्याला कोश पाहिल्याशिवाय कळणे नाही! आपले ज्ञान समृद्ध करतानाच आपल्यावर मनोरंजनाचाही शिडकावा करणारे विविध शब्दकोश आपल्या वापरात जरूर असावेत. माझ्याकडे विविध प्रकारचे सुमारे डझनभर कोश आहेत. आंतरजालाच्या व्यापक प्रसारानंतर आता अनेक प्रकारचे कोश जालावर उपलब्ध आहेत. त्यामुळे जाडजूड वजनाचे छापील कोश आता एखाद्याच्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात कमी दिसतात. पण, माझी पिढी ही मुळात अशा छापील कोशांवर ‘पोसली’ गेली असल्याने माझ्याकडे ते आजही आहेत. माझे त्यांच्यावर इतके प्रेम आहे की मी त्यांना माझे कुटुंबघटकच मानतो! माझ्या घरभर ते विखुरलेले आहेत. त्यापैके एक-दोघांनी तर माझ्या पलंगावर विसावण्याचा मान पटकावलाय. वेळप्रसंगी माझ्या एकटेपणात ते माझी सुरेख सोबत करतात. धष्टपुष्ट छापील कोशाला प्रेमाने उराशी कवटाळण्याची मजा काही औरच असते. त्याची सर जालकोशाच्या ‘सर्च इंजिन’ला कशी येईल? एखादे दिवशी जर हाताशी वाचण्यासारखे काही नसेल तर मी खुशाल एखादा कोश हाती घेऊन त्यात डोके खुपसून बसतो. दिवसाकाठी निदान एकतरी नवीन शब्द मी कोशांमधून शिकतो व समजावून घेतो. ग्रंथाचे गुरु असलेल्या शब्दकोशांनी मला ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही पातळ्यांवर अतीव समाधान दिलेले असल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे. ***************************************************************************** ( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
93680 वाचन

💬 प्रतिसाद (177)

प्रतिक्रिया

रोचक विषय निवडलाय. त्यात

बॅटमॅन
Sun, 07/30/2017 - 00:49 नवीन
रोचक विषय निवडलाय. त्यात खालील काही शब्दकोशांचा उल्लेख केला असता तर अजून मजा आली असती वाचायला. इंग्रजी: हॉब्सन-जॉब्सन कोशः इंग्रजीतील फक्त भारतीय भाषांपासून उचललेल्या शब्दांचा कोश. मुळात हॉब्सन-जॉब्सन हे नावही मोहर्रममध्ये "या हसन- या हुसेन" म्हणतात त्याचे नादानुकारी इंग्रजीकरण आहे. मराठी: मराठी व्युत्पत्ती कोशः कृ.पां. कुलकर्णी यांनी मूळ कोश रचला, त्याला श्रीपाद जोशी यांनी पुरवणी जोडली. कैक शब्दांच्या व्युत्पत्त्या दिलेल्या आहेत, बघायला खूप मजा येते. ऐतिहासिक शब्द कोशः न.चिं.केळकर यांचे पुत्र य.न.केळकर यांनी तयार केला. शिवकाळ आणि पेशवेकाळातील बखरी व कागदपत्रांत बरेच वेगवेगळे शब्द असतात, फक्त तशा शब्दांचा सेपरेट कोश आहे. अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी: शं.गो. तुळपुळे आणि अ‍ॅन फेल्डहाउस यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोश तयार झाला. ज्ञानेश्वरी व महानुभाव वाङ्मयात आढळणार्‍या शब्दांचा कोश. फारसी/उर्दू - मराठी कोशः प्रसिद्ध मराठी कवी आणि फारसीचे उत्तम जाणकार माधव ज्यूलियन यांनी हा कोश तयार केला. राज्यव्यवहारकोशः ढुंढिराज व्यास यांना शिवाजी महाराजांनी सांगितल्यावरून हा कोश रचला. याची रचना अमरकोशासारखी आहे. जुन्या संस्कृत शब्दकोशांची रचना आत्ताच्या डिक्शनर्‍यांसारखी अकारविल्हे क्रमाने नसून थीमॅटिक असे. म्हणजे त्यांमध्ये "वर्ग" असत, उदा. प्राणिवर्ग, मनुष्यवर्ग, फलवर्ग वगैरे. त्या त्या थीमप्रमाणे शब्द असत. तसराज्यव्यवहारकोशातही आहे. दुर्गवर्ग, पण्यवर्ग, इ.इ. काही श्लोक मनोरंजक आहेत, उदा. तालीमखाना मल्लशाला मल्लो जेठी समीरितः| कुस्ती नाम नियुद्धं स्यात् बलशिक्षा तु तालिमम् || दुर्गं किल्लेति विज्ञेयं गिरिदुर्गः गडः स्मृतः| प्राकारः कोट इत्युक्तो जंजीरा द्वीप उच्यते || वगैरे. तंजावरच्या मराठी राज्यातही असे काही द्राविडी-मराठी कोश रचले गेले.
  • Log in or register to post comments

दिवाळी अंकासाठी

कंजूस
Wed, 08/02/2017 - 18:30 नवीन
बॅटमॅन हे तुमच्याकडून येऊ द्या. देवदिवाळीपर्यंत आला लेख तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माहितीपुर्ण लेख.

मार्मिक गोडसे
Sun, 07/30/2017 - 07:40 नवीन
माहितीपुर्ण लेख.
  • Log in or register to post comments

डॉ सुहास व Batman , अभिप्राय

हेमंतकुमार
Sun, 07/30/2017 - 08:09 नवीन
डॉ सुहास व Batman , अभिप्राय व माहिती बद्द्ल आभार !
  • Log in or register to post comments

इन्ग्लिश मध्ये 'कांगारू शब्द'

हेमंतकुमार
Wed, 08/02/2017 - 17:48 नवीन
इन्ग्लिश मध्ये 'कांगारू शब्द' असा एक मजेदार प्रकार आहे. म्हणजे एका मोठ्या शब्दात साधारण त्याच अर्थाचा एक छोटा शब्द दडलेला असतो. उदा. curtail मध्ये cutआहे . असे कांगारू शब्द बनवताना एक अट असते. मोट्या शब्दातून अक्षरे घेताना सर्व अक्षरे सलग घेता येत नाहीत. उदा. enjoy मधून joy नाही चालत. ........ जरा विचार केला की मराठीत असा प्रयोग जमेल का? ....दोन उदा. सुचलीतः १. 'महानगरपालीका' पासून 'महापालीका' २. 'तळागाळातील' पासून ' तळातील'. ज्यांना अजून जमतील त्यांनी जरूर लिहा...
  • Log in or register to post comments

जैविक विविधता वरुन जिविधा

प्रकाश घाटपांडे
Sun, 02/04/2018 - 20:42 नवीन
जैविक विविधता वरुन जिविधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

जिविधा चांगला आणि वेगळा आहे

हेमंतकुमार
Sun, 02/04/2018 - 21:00 नवीन
जिविधा चांगला आणि वेगळा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

रॉ मे डी !

हेमंतकुमार
Mon, 01/01/2018 - 12:16 नवीन
नाट्य क्षेत्रातील एक इंग्लिश 'संयोग शब्द' वाचनात आला: Romance + comedy = romedy
  • Log in or register to post comments

sitcom, romcom

चामुंडराय
Fri, 01/05/2018 - 21:37 नवीन
sitcom, romcom हुच्चभ्रूंच्या सिरेल्सच्या धाग्यात sitcom (situational comedy ) आणि romcom (romantic comedy) बद्दल वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

छान, म्हणजे romedy & romcom

हेमंतकुमार
Sat, 01/06/2018 - 07:55 नवीन
छान, म्हणजे romedy & romcom हे समानार्थी झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

youthquake !

हेमंतकुमार
Fri, 01/05/2018 - 20:49 नवीन
दर वर्षाखेरीस Oxford तर्फे त्या वर्षीचा मानाचा शब्द जाहीर होतो. 2017 चा हा शब्द आहे : youthquake. त्याचा अर्थ आहे 'युवकांच्या कृतीतून घडणारा महत्वाचा सांस्कृतिक, राजकीय वा सामाजिक बदल'. ८ शब्दांच्या स्पर्धेतून याने बाजी मारली. मुळात हा शब्द 1965 मध्ये प्रथम वापरला गेला होता- year of youthquake - या संदर्भात.
  • Log in or register to post comments

complicit !

हेमंतकुमार
Sat, 02/03/2018 - 16:38 नवीन
दर वर्षाखेरीस त्या वर्षीचा मानाचा शब्द जाहीर करणारा अजून एक कोश आहे dictionary.com. त्यांचा 2017 चा शब्द आहे complicit. म्हणजे एखाद्या बेकायदा वा वाईट कृत्यात सहभागी असणे. हा शब्द निवडीची दोन कारणे होती: १. जास्तीत जास्त लोकांनी त्या वर्षात त्याचा कोशात शोध घेतला २. जगभरात अनेकांनी complicit होण्याचे नाकारून त्या विरोधात आंदोलने केली.
  • Log in or register to post comments

भन्नाट कुमार

ss_sameer
Sun, 02/04/2018 - 10:40 नवीन
तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अतिशय खऱ्या, पण आज काल च्या पिढीकडे पेशन्स कुठाय? त्यांना व्हाट्स अप फेसबुक पेक्षा अजून काही वेगळा "ज्ञाना"चा मार्ग असतो हेही माहीत नाही बहुतेक. शब्दकोश वाचन करणे साठी मुळात अंगी चिकाटी लागते आणि जिज्ञासा देखील. दोन्ही गोष्टी जन्मतः कमी माणसात सापडतात. कुमार सर, तुमच्या चिकाटीला सलाम. वेगळ्या वाटेला सलाम. आणि उत्तम लेखाबद्दल आभार.. स. शा.
  • Log in or register to post comments

समीर, मनापासून आभार.

हेमंतकुमार
Sun, 02/04/2018 - 11:15 नवीन
समीर, मनापासून आभार. आपल्या आवडीचे छंद जोपासत राहायचे !
  • Log in or register to post comments

२०१८चे मानाचे इंग्रजी शब्द.

हेमंतकुमार
Sun, 12/23/2018 - 10:16 नवीन
सालाबादप्रमाणे दोन मोठ्या शब्दकोशांनी त्यांचे यंदाचे शब्द जाहीर केले आहेत. १. Oxford चा शब्द आहे ‘toxic’. नेहमी हा शब्द रसायने आणि हवेच्या संदर्भात परिचित आहे. यंदा तो याव्यतिरिक्त खालील संदर्भात बराच वापरला गेला: कामाच्या ठिकाणाचे वातावरण माणसांतले संबंध राजकारणी व्यक्तींचे वर्णन पौरुषत्व ......... २. Dictionary.com चा शब्द आहे ‘misinformation’. म्हणजेच ‘दिशाभूल करणारी माहिती’. हे पसरवण्यामागे दिशाभूल करण्याचा हेतू असू वा नसूही शकतो. विशेषतःसध्या सोशल मिडियात जे ‘संदेश पुढे ढकलणे’ हा प्रकार चालतो त्याला उद्देशून हा शब्द आहे. काही जण जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवतात तर बरेच साधेभोळे लोक त्यांना आलेली अशी माहिती विचार न करता निव्वळ पुढे ढकलतात.
  • Log in or register to post comments

२०१९ : मानाचे शब्द

हेमंतकुमार
Wed, 12/11/2019 - 15:56 नवीन
सालाबादप्रमाणे दोन मोठ्या इंग्रजी शब्दकोशांनी त्यांचे २०१९ चे मानाचे शब्द जाहीर केले आहेत. १. Oxford चा शब्द आहे: Climate emergency : अर्थ अगदी स्पष्ट आहे - पर्यावरणातील घातक बदल खरोखर गंभीर पातळीवर पोचले आहेत; आपण तातडीने काही उपाय न योजल्यास ते अतिगंभीर होतील. …... २. Dictionary.com चा शब्द आहे: Existential : हा शब्द "आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे किंवा पणाला लागल्याचे" सुचवतो. यंदाच्या जागतिक पातळीवरील ३ प्रकारच्या घटना यात अभिप्रेत आहेत: अ) पर्यावरणातील घातक बदल ब) बेछूट गोळीबाराच्या घटना क) काही देशांत लोकशाहीचे अस्तित्व
  • Log in or register to post comments

वा! वा!! वा!!! ....

सुधीर कांदळकर
Fri, 12/13/2019 - 06:57 नवीन
वाचनसंस्कृतीला चालना देणारा लेख. मिपाने 'लेख ऑफ द ईयर' बक्षीस ठेवले तर याच लेखाला मिळण्याची शक्यता दिसते. आवडला हेवेसांनल. मी तर इंग्रजी कादंबरी वाचतांनाही ऑक्सफर्डचा खिसा-शब्दकोष घेऊन बसतो. नेहमीचे शब्द वेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थच्छटा कशा दाखवतात तर कधी पूर्णपणे वेगळा अर्थ घेऊन येतात ते कळते. कधी पूर्णपणे अपरिचित संज्ञा कळतात. उदा. मोटारीच्या रस्त्यावरून स्वैर रीतीने भ्टकणे किंवा झीब्रा खूण नसलेल्या चुकीच्या ठिकाणाहून रस्ता पार करणे (जे आपल्याकडे सर्रास चालते) त्या अर्थाचा जेवॉक. लेखन करतांना पूर्वी स्पेलिंगसाठी शब्दकोष घेऊन बसावे लागे. नंतर विंडोज ने ती गरज भागवली. व्हॅक्यूम सारख्या शब्दाची स्पेलिंगे बुचकळ्यात टाकणारी आहेतच. हे झाले भाषिक शब्दकोष. त्यावरून काही विशिष्ट विषयावरचे काही शब्दकोष आठवले. ते देखील अलीबाबाच्या गुहा आहेत. उघडले की कालमापन तासात करावे लागते. आयपी, बीपी, बीपीसी, यूएसपी आणि यूएसएसआरपी असे फार्माकोपिये, रसायनांची अणुरचना दाखवणारे, गुणधर्म सांगणारे मार्टिंडेल, गॅरट हे देखील शब्दकोषच. वैद्यकीय क्षेत्रातले शब्दकोष असतीलच. नोकरीत कधी गरजेखातर तर कधी रिकामा वेळ असला की कधीतरी या गुहेत जाणे होत असे. माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात तर आयटीआयएल हा वेगळा शब्दकोष आहे आणि त्याची परीक्षा उत्तीर्ण होणे ही एक अर्हता मानली जाते. मस्त लेखाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान शब्द ..

हेमंतकुमार
Fri, 12/13/2019 - 07:48 नवीन
सुधीर, धन्यवाद.
जेवॉक
शब्द झकास, आवडला !
  • Log in or register to post comments

कुमारजी,

तेजस आठवले
Sat, 12/14/2019 - 14:41 नवीन
कुमारजी, उत्तम लेख. मिपावर येण्यात फारसा अर्थ उरला नाही असे वाटायला लावणाऱ्या वातावरणात असे लेखच हे संस्थळ टिकवून ठेवतात. काय वैविध्य आहे हो तुमच्याकडे. अनेक धन्यवाद. अवांतर: चतुर्भुज झाल्यानंतर सगळ्यातलं सगळं कळणारी अशी व्यक्ती घरात आल्याने मी शब्दकोश आणि इन्सायक्लोपेडीया कपाटावर टाकून ठेवले आहेत. -(निराश) शब्दकोशप्रेमी.
  • Log in or register to post comments

तेजस,

हेमंतकुमार
Sat, 12/14/2019 - 15:19 नवीन
मनापासून धन्यवाद ! तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच लेखन करण्यास हुरूप येतो. बाकी घरातल्या 'त्या' जित्याजागत्या कोशाबाबाबत सहमत !!
  • Log in or register to post comments

नवा शब्द ...

हेमंतकुमार
Wed, 04/22/2020 - 17:41 नवीन
डॉ. बिरबल झा हे दिल्लीस्थित इंग्लीश भाषातद्न्य आहेत. नुकताच त्यांनी Healthsake हा नवा शब्द तयार केला. हा शब्द Collins इंग्लीश शब्दकोशाने स्वीकारला आहे. अभिनंदन ! ‘ No handshake for healthsake ‘ असा संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे.
  • Log in or register to post comments

i.e

मायमराठी
Wed, 04/22/2020 - 18:12 नवीन
आपण सर्वांनी वापरलं असेलच i.e. अर्थात that is. मी शिकवताना वापरायचो. एक दिवस माझा मलाच प्रश्न पडला की ह्या दोघांचं नातं नेमकं काय? शोधाशोध केल्यावर कळलं की i.e ( लॅटिन) म्हणजे id est = म्हणजे . इंग्रजी अर्थ that is. तेव्हापासून लिहिताना t.i वापरतो. तेच 'उदाहरणादाखल' असं म्हणताना E.g वापरतात. त्यातल्या g च कूळ आणि मूळ gratia आहे( लॅटिनच) , हे फार उशीराने कळलं. पण पान पाठीवर पडलेल्या सश्यामागे धावणं काही चुकत नाही हेच खरं.
  • Log in or register to post comments

ल्याटिन संस्कृत कनेक्शन?

गामा पैलवान
Fri, 05/15/2020 - 17:48 नवीन
मायमराठी, id est हे इति अस्तु असं संस्कृत वाटतंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मायमराठी

रोचक !

हेमंतकुमार
Wed, 04/22/2020 - 18:21 नवीन
तेव्हापासून लिहिताना t.i वापरतो.
>>> रोचक ! नव्या गोष्टी आपणच रूढ करायच्या .... चांगलंय.
  • Log in or register to post comments

सुंदर उपक्रम .

हेमंतकुमार
Fri, 05/01/2020 - 16:09 नवीन
१ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश महाराष्ट्र दिनी प्रकाशित बातमी इथे सुंदर उपक्रम . संबंधितांचे अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अरुण फडके....

हेमंतकुमार
Fri, 05/15/2020 - 13:35 नवीन
‘मराठी लेखन कोशा’चे शिलेदार अरुण फडके यांचे निधन. त्यांचा परिचय इथे: https://www.aksharnama.com/client/article_detail/4263 आदरांजली !
  • Log in or register to post comments

आदरांजली ....!

गामा पैलवान
Fri, 05/15/2020 - 17:46 नवीन
आदरपूर्वक श्रद्धांजली! साठ हे जाण्याचं वय नाही! :-( -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

असो,

हेमंतकुमार
Fri, 05/15/2020 - 18:06 नवीन
६४. कर्करोग..... वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

भारतीय इंग्लिश....

हेमंतकुमार
Sun, 05/17/2020 - 12:31 नवीन
Dictionary.com ने काही भारतीय इंग्लिश वाक्य अथवा शब्दांची विशेष दखल घेतली आहे ते असे आहेत : Do the needful Timepass Mugging My teacher is sitting on my head ! My friend is eating my brain ! Do one thing Kindly adjust …. संबंधित लेखात असेही म्हटले आहे, की आपण सुद्धा हे शब्द /वाक्य वापरून बघायला हरकत नसावी !
  • Log in or register to post comments

भाषांतरं

गामा पैलवान
Sun, 05/17/2020 - 13:17 नवीन
कुमारेक, ही भाषांतरं दिसताहेत. Do the needful = नड भागवा Timepass = वेळ घालवायला Mugging = जोमाने अभ्यास ? My teacher is sitting on my head ! = गुर्जी डोस्क्यावर बसलेत My friend is eating my brain ! = मित्रं डोस्कं खातोय Do one thing = एक काम कर Kindly adjust = जरा (सरकून?) घ्या आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

Do the needful

वामन देशमुख
Tue, 05/19/2020 - 00:56 नवीन
माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार, Do the needful = नड भागवा योग्य ती कार्यवाही करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

वा दे,

हेमंतकुमार
Tue, 05/19/2020 - 10:07 नवीन
अगदी बरोबर . योग्य इंग्लिशनुसार असे न लिहिता, 'प्रत्यक्ष कामाचे स्वरूप लिहून ते करावे', असे लिहिले जाते. असे मी एका इंग्लिश पुस्तकात वाचले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

सहमत.. गा पै,

हेमंतकुमार
Sun, 05/17/2020 - 13:33 नवीन
अशा भाषांतरातूनच आपण "भारतीय इंग्लिश" जन्माला घालतो !
  • Log in or register to post comments

एन. डी. आपटे..

हेमंतकुमार
Wed, 07/08/2020 - 14:16 नवीन
भाषेचे गाढे अभ्यासक प्रा.एन. डी. आपटे यांचे निधन. (https://maharashtratimes.com/editorial/manasa/nond-professor-n-d-apte/articleshow/76825409.cms) आदरांजली.
  • Log in or register to post comments

'वुमन'

हेमंतकुमार
Tue, 11/17/2020 - 18:41 नवीन
ऑक्सफर्ड शब्दकोशात 'वुमन' या शब्दाला सुचवण्यात आलेले आक्षेपार्ह समानार्थी शब्द (bitch, bint, wench, baggage, इ.) तिथे उभारल्या गेलेल्या लढ्यामुळे काढून टाकण्यात आले. चांगला लेख
  • Log in or register to post comments

२०२०

हेमंतकुमार
गुरुवार, 12/24/2020 - 12:08 नवीन
अपेक्षेप्रमाणे यंदा प्रमुख इंग्लिश शब्दकोशांचे मानाचे शब्द असे: केम्ब्रिज : quarantine डिक्शनरी. कॉम: pandemic ऑक्सफर्डने एक शब्द न निवडता बरेच निवडले आहेत. त्यात covid चा समावेश आहे.
  • Log in or register to post comments

प्रगती

हेमंतकुमार
Sat, 06/05/2021 - 17:20 नवीन
हे पूर्वी लिहिले होते : १ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश महाराष्ट्र दिनी प्रकाशित >> आता हा कोश विस्तारित होऊन त्यात २,०४,१४० शब्द आहेत. त्यांनी आता ५ कोश एकत्रित केले आहेत. https://bruhadkosh.org/
  • Log in or register to post comments

अतरंगी...

हेमंतकुमार
Sun, 06/20/2021 - 10:02 नवीन
अलीकडे प्रचारात असलेल्या अतरंगी या शब्दाची एक गंमत आहे. सध्या तो “अंगी नाना कला असलेला’ किंवा ‘विलक्षण’ या अर्थाने वापरला जातो. परंतु हा शब्द उपलब्ध अधिकृत शब्दकोशांत तरी सापडत नाही. मी बृहद्कोश, शब्दरत्नाकर आणि गुगलशोध हे सर्व करून पाहिले. या शब्दाबद्दल तो हिंदी शब्दकोशात देखील सापडत नसल्याची रोचक चर्चा इथे (https://groups.google.com/g/shabdcharcha/c/E4mqGsYbM3M?pli=1)आहे. कुणाला या शब्दाच्या मराठी उगमाबाबत अधिक माहिती असल्यास जरुर लिहा.
  • Log in or register to post comments

ट्याहां !

हेमंतकुमार
गुरुवार, 07/15/2021 - 17:26 नवीन
‘ट्याहां’ या शब्दासंबंधी एक रोचक लेख
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर लेख

Nitin Palkar
गुरुवार, 07/15/2021 - 19:48 नवीन
तुमच्या सर्वच लेखांप्रमाणे माहिती पूर्ण आणि मनोरंजक लेख.
  • Log in or register to post comments

मदत हवी

हेमंतकुमार
Sun, 10/17/2021 - 19:02 नवीन
सध्या bruhadkosh.org हा ऑनलाईन दिसत नाहीये. तिथे खालील संदेश येतोय : This Account has been suspended कोणी जाणकार मदत करू शकेल का ?
  • Log in or register to post comments

सुधारणा ..

हेमंतकुमार
Wed, 10/20/2021 - 13:43 नवीन
ते संस्थळआजपासून चालू झालेले आहे. इच्छुक लोक लाभ घेऊ शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बदलते इंग्लिश

हेमंतकुमार
Mon, 11/22/2021 - 17:45 नवीन
गेल्या वीस वर्षांत ब्रिटिश इंग्लिशमध्ये जो फरक पडला आहे, त्याचा एक चांगला अभ्यास इथे आहे. त्यानुसार whom, upon & shall या तीन शब्दांचा वापर बऱ्याच प्रमाणात (सुमारे पन्नास टक्के) कमी झालेला आहे.
  • Log in or register to post comments

ऑक्सफर्ड 2021

हेमंतकुमार
Sat, 12/04/2021 - 11:47 नवीन
ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशाचा यंदाचा (२०२१) मानाचा शब्द vax असून ते नाम व क्रियापद अशा दोन्ही अर्थाने वापरता येते : vax = vaccine or vaccination (नाम) = vaccinate (क्रियापद).
  • Log in or register to post comments

शिफारस

हेमंतकुमार
Sat, 12/25/2021 - 09:33 नवीन
कोशनिर्मिती संबंधी एक सुंदर लेख : त्यातले काही रंजक :
कोश-योगातला आणखी एक मोठा रंजक नमुना जरूर पाहा! भलतीच निराळी माहिती आणि भरपूर आश्चर्यकारक कथा, आख्यायिका, व्युत्पत्ती त्यामध्ये आढळतील! त्या कोशाचे नाव ‘हॉबसन-जॉबसन’! इंग्रजांना भारतीय उच्चार कधी सहज आणि नीट उमगायचे नाहीत. प्राण गमावलेल्या हसन-हुसेन यांचा शोक मोहरमच्या मिरवणुकीत दरवर्षी होतो; त्या हसन-हुसेनचा उच्चार इंग्रजी कानाला हबसन जाबसन असा ऐकू येई! तसेच ते शब्द लिहिले जात. इतके की कालांतराने हे अर्धवट किवंडे आणि बोबडे शब्द इंग्रजीत रूढावले गेले. अशा शब्दांचा एक थोराड कोश म्हणजे हबसन-जॉबसन. जगन्नाथचे जगरनॉट कसे झाले? कुप्रसिद्ध फोरासरोड या भागाचे नाव तसेच का पडले? अशा कितीतरी रंजक कथा आणि चुटक्यांनी भरलेला हा कोश!
  • Log in or register to post comments

किवंडे ?

हेमंतकुमार
Sat, 12/25/2021 - 09:38 नवीन
वरील मजकुरातील ' किवंडे' चा अर्थ कोणाला माहित आहे का ? शब्द गोड आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ढोबळ अर्थाने

जेम्स वांड
Sat, 12/25/2021 - 10:06 नवीन
किवंडे - किरकिरे, किरकिर करणारे पात्र शब्दाचा वाक्यात वापर १. काय किवंडं पोरगं आहे (उच्चारी क्युडं) २. खिडकी बंद झाली म्हणल्यावर नेमका तेव्हाच नंबर लागलेला माणूस किवंडायला लागला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

जेम्स

हेमंतकुमार
Sat, 12/25/2021 - 10:23 नवीन
धन्यवाद ! कोणाला कोश संदर्भ मिळाला तर जरूर द्या मी पण शोधत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

संदर्भ

हेमंतकुमार
Sat, 12/25/2021 - 11:40 नवीन
थोड्याफार फरकाने इथे संदर्भ मिळालाय: किंवडा-डू, किवढ्या पु. (तंजा.) बहिरा. [का. किवी = कान, किव्ड = बहिरा] दाते शब्दकोश https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%... पण त्यांनी कि वर अनुस्वार दाखवला आहे. लोकसत्तातील लेखात मुद्रणदोष झालेला असू शकेल.
  • Log in or register to post comments

पुनरुज्जीवन

हेमंतकुमार
Tue, 02/01/2022 - 18:33 नवीन
काही इंग्लिश भाषातज्ञांनी विस्मरणात गेलेल्या काही प्राचीन शब्दांचे पुनरुज्जीवन करायचे ठरवले आहे. त्यापैकी respair (नवी आशा) हे एक ठळक उदाहरण आहे. हा शब्द सन १५२५मधला आहे. तज्ञांच्या मते इंग्लिश भाषेला काहीसे नकारात्मक वळण जास्त लागलेले आहे. बऱ्याच मूळ सकारात्मक शब्दांचे नकारात्मक रूप काळाच्या प्रवाहात टिकवून ठेवले जाते; परंतु मूळ शब्दच मागे पडतात. unkempt हे पण एक ठळक उदाहरण आहे. kempt हा मूळ शब्द पूर्वी विशेषण म्हणून वापरला जायचा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा