१. गोष्ट
“पप्पा सांगा न लवकर गोष्ट.”
“ कुठली सांगू बरं… न्यूट्रोफायटा आणि लेडी अॅस्ट्रोनटची ?”
“नको ती बोअर आहे.”
“मग गुरुवरच्या चेटकीणीची ?”
“ती सांगितलीये तुम्ही चारपाच वेळा.”
“बोलकी निळी झाडं, जादुई रोबो, टेट्रोग्लॅमसचं सोनेरी अंडं ?”
“सगळ्या सांगितल्यात ओ पप्पा. एखादी नवीन सांगा न.”
नेफीसने थोडावेळ डोकं खाजवलं.
“ठिकेय एक नवीन गोष्ट सांगतो. पृथ्वीवरच्या माणसांची.”
“चालेल.”
शेनॉय गोष्ट ऐकायला सावरून बसला.
“खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ðζ सूर्यमालेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता. असं म्हणतात की हा खूप सुंदर, निळाशार ग्रह होता.”
“त्यांच्या ग्रहावरही आपल्यासारखेच निळे झाडं होते का ?” शेनॉयचा बालसुलभ प्रश्न.
“नाही, तिथली झाडं हिरवी होती. निळ्या रंगाच्या पाण्यामुळे तसा दिसायचा तो. खूप खूप पाणी होतं तिथे.”
“बापरे !”
“तिथे माणूस नावाचा बुद्धिमान प्राणी रहायचा. त्यांचे शास्त्रज्ञ हुशार होते. त्यांनी बरंच संशोधन करून एक यान तयार केलं. त्या यानात काही माणसं बसले आणि भूर्रकन उडत सूर्यमालेच्या बाहेर गेले. ते पहिल्यांदाच एवढ्या दूर गेले होते.”
“तिथे त्यांच्यावर पायरेट्स हमला करतात का ?”
“मधेमधे बोलू नको रे.”
“सॉरी.”
“तर सगळेजण खूप खुश होते. त्यांचं मिशन त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण केलं आणि परत येऊ लागले. येताना काय झालं की त्यांना दूरवर एक छोटं स्पेसशिप दिसलं. ते पृथ्वीवरचं नक्कीच नव्हतं. आपल्यासारखीच अजून कुठेतरी जीवसृष्टी आहे हे पाहून माणसांना प्रचंड आनंद झाला.”
“२७ ग्रहांवर जीवसृष्टी आहे माहीत नव्हतं का त्यांना.”
“नाही.”
“मग कसले आलेय ते हुशार.”
“बरं बाबा, हुशार नव्हते. आता पुढे ऐक… त्यांनी छोट्या यानाकडे संदेश पाठवले पण उत्तर आलं नाही. अखेर ते स्वतःच त्या यानाजवळ गेले.”
“पप्पा त्यांनी जायला नको. स्पेस पायरेट्सचं यान असेल ते. माणसांना फसवतील.” शेनॉय ओरडला. नेफीसला त्याचा अविर्भाव पाहून हसू आलं.
“मग त्यांनी काय करायला पाहिजे होतं?” त्यानेच उलट शेनॉयलाच विचारलं.
“त्यांनी मिसाईल्स सोडले पाहिजे त्या यानावर. आपण नव्हते सोडले का प्ल्याटीमोसच्या युद्धात. धडाम्म धूम… सुई SS त्याने नेफीसच्या अंगावर जेलोशा फेकायला सुरुवात केली, त्यानेही प्रत्युत्तर दिलं. थोडावेळ लुटुपुटुचं युद्ध रंगलं.
“आता सांगू का पुढची गोष्ट ?”
“ह्हो SS.”
“माणसं त्या यानाजवळ गेले. ते यान खूपच छोटं होतं.”
“या खोलीएवढं ?”
“एवढंच होतं समज. अजून एक गंमत म्हणजे त्या यानात कुणीच नव्हतं ! माणसांनी खूप शोध घेतला पण त्यांना फक्त एक छोटी डब्बी सापडली. त्यातून केशरी रंगाचा उजेड बाहेर पडत होता.”
“फक्त एवढंच सापडलं ?”
“हो. ती डब्बी घेऊन अॅस्ट्रोनट त्यांच्या ग्रहावर परत आले. त्यांचं मोठ्ठं स्वागत करण्यात आलं. दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे हे कळाल्यामुळे सगळा ग्रह खुश होता. त्यासाठी वेगळी मोहीम आखण्यात आली.”
“त्या पेटीचं काय झालं ?”
“तिचं रहस्य शास्त्रज्ञांना कळालंच नाही. त्यातून ऊर्जा निर्माण होते एवढंच काय ते समजलं. मग त्यांनी तशीच एक खूप मोठी पेटी बनवायला सुरुवात केली. त्यांना वाटलं यामुळे त्यांची ऊर्जासमस्या दूर होईल. त्यांनी खूप मेहनत घेतली. ज्या वस्तू नाही सापडल्या त्याऐवजी दुसऱ्या वापरल्या. आणि एक दिवस खूप मोठ्ठी पेटी तयार झाली.”
शेनॉय व्यत्यय न आणता ऐकत होता.
“मोठा कार्यक्रम झाला, तिकडच्या एका मोठ्या माणसाने पेटीवरचं बटन दाबलं. अन लगेचच त्या पेटीने हिरवट पिवळा धूर सोडत आकाशात झेप घेतली.”
“पेटी उडून गेली ??!!”
“ऐक तर. ती खूप उंSच जाऊन थांबली. नंतर परत दुप्पट वेगाने पृथ्वीच्या दिशेने आली. कुणी काही करण्याच्या आतच पृथ्वीवर येऊन आदळली.”
“पुढे ??”
“पुढे काही नाही. भयंकर मोठा स्फोट झाला आणि पृथ्वीवरचे सगळेजण मरून गेले. गोष्ट संपली.”
“एवढ्या लवकर संपली ?!! अजून सांगा न पुढे.”
“अरे खरंच संपली. सगळेजण मेल्यावर पुढे काय असणार आहे.”
“ते काही नाही, याचा पुढचा भाग तयार करा.” शेनॉय हट्टाला पेटला.
“ठिकेय उद्या सांगतो. झोप आता, रात्र खूप झालीये.”
शेनॉयचं समाधान झालं आणि तो पांघरुणात शिरला. नेफीस खोलीबाहेर पडणार तोच शेनॉयचा आवाज आला.
“पप्पा ते छोटं स्पेसशिप कुणाचं होतं ?”
नेफीसने थोडावेळ विचार केला
“ती तुझ्याचसारख्या एका मुलाची खेळण्यातली गाडी होती. एक दिवस तो आपली गाडी घेऊन खूप दूर भरकटला.”
“त्याला स्पेस पायरेट्स पकडून घेऊन गेले का ?”
“हो.” नेफीस हसत म्हणाला आणि लाईटावर बोट टेकवलं.
“शेनॉय बाळा, या गोष्टीतून आपल्याला काय धडा मिळतो ?”
“दुसऱ्यांची खेळणी चोरू नये.”
नेफीस लाईट बंद करून बाहेर पडला.
आपल्या खोलीत येऊन त्याने गुप्त तिजोरी उघडली. आतमध्ये छोटीशी पेटी केशरी उजेडात चमकत होती.
------------------------------------------
२. बाहुली आणि पांढरा गुलाब
The Doll and the white rose या इंग्रजी सत्यानुभवाचा अनुवाद ( परवानगीवरून )
मुळ लेखक : V.A.Bailey
अॅम्स्टरडॅमच्या त्या शांत सकाळी रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती. अजूनही हातामध्ये कुत्र्याच्या साखळ्या पकडून काही लोक परतत होते. छोटीमोठी दुकाने हळूहळू उघडायला लागली होती. मी फेरफटका मारायला सहजच घराबाहेर पडलो होतो.
रस्त्यात एक छोटी शॉपी होती. पाचसहा वर्षांचा एक गोंडस मुलगा काउंटरपाशी उभा होता. त्याच्या हातात सुंदर बाहुली होती अन तो दुकानदाराशी काहीतरी बोलत होता. ऊत्सुकतेपोटी मी जरा जवळ गेलो. दुकानदाराचे काही शब्द माझ्या कानांवर पडले.
“बेटा, तुझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. बाहुलीची किंमत जरा जास्त आहे.”
मुलगा निराश झाला अन बाजूला उभ्या असलेल्या आजीबाईंना म्हणाला, “आजी माझ्याकडे खरोखरच कमी पैसे आहेत का ?”
तिने पैसे मोजले, बाहुलीची किंमत पाहिली “हो रे बाळा, थोडे कमीच आहेत.”
एवढं बोलून ती निघून गेली.
त्या मुलाने छातीशी कवटाळलेली बाहुली नाईलाजाने काउंटरवर ठेवली.
“तुला खूप आवडते का रे ही बाहुली ?” मी त्याच्याजवळ जाऊन म्हटलं.
“नाही, ही बार्बी डॉल माझ्या ताईला खूप आवडते. तिला खात्री होती की सांताक्लॉज तिच्यासाठी ही नक्की आणेल.”
“आणेल की मग. चिंता कशाला करतोस.” मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो.
पण उलट तो जास्त दुःखी झाला
“ती जिथे आहे तिथे सांता ही बाहुली देऊ शकणार नाही. मला ती माझ्या आईजवळ द्यावी लागेल. आई जेव्हा तिथे जाईल तेव्हा माझ्या ताईला डॉल देईल.” बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून एक अश्रू खाली ओघळला. “माझी ताई देवाघरी गेली आहे. पप्पा म्हणतात की माझी आईपण लवकरच देवाला भेटायला जाणार आहे. म्हणून मी विचार केला की ती ही बाहुली ताईकडे पोहोचवू शकेल.” तो आशादायी स्वरात बोलला.
माझं ह्रुदय जवळजवळ थांबल्याचा मला भास झाला
“मी पप्पाला सांगितलंय की आईला इतक्यात जाऊ देऊ नका. मी परत येईपर्यंत तिला वाट पहायला लावा.” नंतर त्याने मला त्याचा सुंदर फोटो दाखवला. त्यात तो हसत होता. नंतर तो म्हणाला की “आईने हा फोटोपण तिच्यासोबत न्यावा असं मला वाटतं. म्हणजे ती मला विसरणार नाही. मी आईवर खूप प्रेम करतो. ती म्हणाली की तुझ्या छोटुल्या बहिणीजवळ कुणीतरी हवं ना, म्हणून मी चालले.” नंतर त्याने दुःखी नजरेने बाहुलीकडे पाहिलं.
“बघू बरं किती पैसे आहेत तुझ्याकडे.” मी त्याच्याकडून पैसे घेतले आणि बोलता बोलता माझ्याकडचे काही पैसे टाकले.
“अरे ! तुझ्याकडे तर भरपूर पैसे आहेत. मला वाटतं दुकानदार काकांनी तुझी गंमत केली.” मी नोटा आणि चिल्लर काउंटरवर रिचवत म्हणालो. मुलाने परत एकदा पैसे मोजले अन त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव हळूहळू पलटत गेले, डोळे आनंदाने चमकायला लागले.
“माझी मनी बँक फोडण्याच्या आधी मी देवाला प्रार्थना केली होती की बाहुलीसाठी पैसे निघू दे. मी त्याला पांढरा गुलाब घ्यायलापण पैसे मागणार होतो पण एवढं जास्त मागण्याची माझी हिंमत झाली नाही. पण त्याने मला इतके पैसे दिले की मला बाहुलीपण घेता येईल आणि गुलाबपण. माझ्या आईला पांढरा गुलाब खूप आवडतो.”
तिथून बाहेर पडल्यानंतर मी कितीतरी वेळ त्या मुलाचा विचार करत होतो. मी घरी जाऊन वर्तमानपत्र चाळले. दोन दिवसांपूर्वीच्या पेपरात एक बातमी होती, ट्रकने कारला धडक दिल्याची. त्यात चार वर्षांची एक मुलगी जागीच मरण पावली होती अन तिची आई अत्यवस्थ होती. कदाचित ह्या त्याच दोघी असाव्यात.
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून ती बाई वारल्याचं मला कळालं. मी लगेचच दफनविधी सुरू होता तिथे पोहोचलो. शवपेटीमध्ये एका मध्यमवयीन स्त्रीचं कलेवर ठेवण्यात आलं होतं. तिच्या हातामध्ये एक सुकलेला पांढरा गुलाब होता अन छातीवर बाहुली.
अश्रुभरल्या नेत्रांनी ती जागा सोडतांना मला जाणवलं की माझ्यातलं काहीतरी बदललंय. माझ्या आईवर मीसुद्धा प्रेम करतो पण या व्यवहारी जगात त्यातली निरागसता हरवली होती. त्या मुलाचं निर्व्याज प्रेम मला खूप काही शिकवून गेलं. त्या देवदूताने माझ्या निर्जीव नात्यांमधे जीव फुंकला.
------------------------------------------
३. प्लॅन ( शशक )
सोमवारी रात्री मला प्लॅन सुचला.
आम्ही मित्र आहोत कुणालाच माहीत नव्हतं. मंगळवारी मित्राने त्याच्या वडीलांची बंदूक चोरली, बुधवारी आम्ही उद्या काय करायचं याचं नियोजन केलं. गुरुवारी जेव्हा शाळा हॉलमध्ये कार्यक्रमासाठी जमली होती तेव्हा आम्ही त्याच हॉलच्या बाहेर उभे होतो. थोड्यावेळाने एक म्हातारा बाहेर आला. मी डायरेक्ट त्याच्या कपाळात गोळी घातली. म्हातारा जागीच खलास. मग मी बंदूक मित्राच्या हातात दिली. तो आनंदाने नाचत आत गेला अन हवेत एक गोळी चालवली. विद्यार्थी किंचाळत होते, पालकांच्या मागे लपत होते. मी लगेचच झडप मारून त्याच्या हातातली बंदूक हिसकावुन घेतली, त्याच्यावर रोखली अन… धडाम्म. तो धाडकन जमिनीवर कोसळला.
शुक्रवारी वर्तमानपत्रांनी मला हिरोचा दर्जा दिला.
------------------------------------------
प्रतिक्रिया
24 Jun 2017 - 10:43 pm | ज्योति अळवणी
तिन्ही कथा मनाला स्पर्शून गेल्या
25 Jun 2017 - 1:46 am | बोबो
लै भारी!!
27 Jun 2017 - 9:56 am | धर्मराजमुटके
१ ली आवडली नाही.
२ री खुप आवडली.
३ री कळली नाही.