आमच्या नाशकात एक बोली आहे. विशेषतः इथले बहुदा सर्व प्रकारचे राजकीय पुढारी उद्योगांशी संबंधित कार्यक्रमामध्ये हा डायलॉग आपल्या भाषणात ठोकतात. बहुदा सगळीच स्थानिक वृत्तपत्रे या डायलॉगचा कुठे ना कुठे वापर आपल्या लिखाणात करत असतात. म्हणे "मंत्र भूमी कडून तंत्र भूमीकडेनाशिकची वाटचाल होते आहे". नाशिकच्या मंत्रभूमी म्हणून असणाऱ्या लौकिकाचा मला आदर आहे. पण या दोनही शब्दांच्या अर्थात दडलेल्या वास्तवाचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. मंत्र आणि तंत्र या शब्दांचे फारतर यमक जुळण्यापलीकडे नाशिकच्या संदर्भाततरी या दोनही बाबी भिन्न आहेत. ज्ञात आद्य मंत्रोच्चाराचे स्थान पांडवलेणी आहेत असं जरी मान्य केलं - ज्यातील गुहा इसवी सन एकच्या सुमारास खोदल्या गेल्या - तरी त्या आधी दीडशे वर्षानुपूर्वीच नाशिक ही देशातली सगळ्यात मोठी बाजारपेठ होती. इसवी सनाच्या आधी काही वर्षांपासून नाशिक एक निर्यातक्षम उदयोगनगरी होती. सुरुवातीला मौर्य, त्यानंतर सातवाहन ( ईपू २०७-ईस १९९ ), अहिर ( सन ३७७ पर्यंत ), त्रैकूटक ( सन ४९० पर्यंत ) विष्णूकुंदन, कलचुरी ( ५७३ पर्यंत ), पुढे चालुक्य ( ७५४ पर्यंत ) राष्ट्रकूट ( सन ९५० पर्यंत ), पुन्हा चालुक्य ( ११५० पर्यंत ), त्यानंतर औरंगाबादच्या यादवांची सत्ता सुमारे १३१८ पर्यंत आणि औरंगजेबाच्या मृत्यू पर्यंत म्हणजे १७०७ सालापर्यंत नाशिकवर राज्य करणाऱ्या सर्व राजवटींच्या कालखंडात म्हणजे सुमारे दोन हजार वर्षे नाशिक हे फक्त व्यावसायिक आणि औद्योगिक शहरच होतं. कोणत्याच कालखंडात नाशिकच्या उद्यमशीलतेचा बहर ओसरला नव्हता. भारतीय भूभागामध्ये तयार होणाऱ्या वेगवेगळया कपड्यांमध्ये नाशिक सिल्कने सुद्धा देशी आणि परदेशी बाजारपेठा व्यापल्या होत्या.
सन १७०१ साली भारतातून होणाऱ्या अशा कपड्यांची आयात कमी व्हावी म्हणून इंग्लंडच्या संसदेने कॅलिकोस कायदा केला होता. तरीही इथून आणि अन्य शहरांमधून होणाऱ्या कपड्यांची इंग्लंड मधली मागणी घटत नव्हती. त्यामुळे ब्रिटिश सरकारने १७२१ साली पुन्हा जाचक अटी असणारा कॅलिकोस कायदा (२) तेथील संमत करून घेतला. सन १७२१ नंतर नाशकातल्या सगळ्याच प्रसिद्ध - त्र्यंबकेश्वर, कपालेश्वर, सुंदरनारायण आणि नंतर काळाराम वगैरे - मंदिरांची बांधणी मराठेशाही मध्ये झाली. या मंदिरांमुळे इथे लोकांच्या तीर्थयात्रा वाढल्या म्हणून नाशिक मंत्रभूमी म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला आलं. मुद्दा असा आहे की नाशिक मंत्रभूमी म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या लोकभावनेचा आदर आहेच पण नाशिकची तंत्रभूमी म्हणून असणारी ओळख, शहराची उद्यमशीलता तसेच इथल्या नागरिकांची कारागिरी आणि तिचा लौकिक हा अगदी ज्ञात इतिहासाच्या सुरुवातीपासून अधोरेखित केला गेला आहे.
त्यामुळे "मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे वाटचाल" हा डायलॉग पटणारा नाही किंवा तो खरा नव्हे. तीर्थ क्षेत्र आणि उद्योगनगरी हे नाशिकच्या सौन्दर्याचे दोन स्वतंत्र आयाम आहेत. अठराव्या शतकात बांधलेल्या मंदिरांमुळे नाशिक तीर्थक्षेत्र म्हणून लौकिकास आलं आणि अन्यान्य व्यवसायांबरोबर एका सर्व्हिस इंडस्ट्रीला ही नाशकात बहर आला - वंशावळी लिहिण्याचा व्यवसाय. दूरदूरचे लोक इथे दर्शनाला यायचे. पण त्याकाळी यात्रेकरूंना राहण्यासाठी काही हॉटेल्स नव्हती. त्यामुळे यात्रेकरूंची व्यवस्था स्थानिकांकडे व्हायची. कोणत्या भागातून आलेल्या यात्रेकरूने कुठे राहायचे याच्या सीमारेषा आखलेल्या असायच्या. त्यामुळे उदाहरणार्थ दक्षिण महाराष्ट्रातून येणारे एक कुटुंब आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्या ठराविक स्थानिकांकडे आपला मुक्काम ठोकायच्या. प्रत्येकवेळी कुटुंबांची व्यवस्थित नोंदणी व्हायची. त्यामुळे पणजोबा, आजोबा, नातवंडे, परतवंडे इत्यादी यांच्या नोंदी म्हणजे वंशावळीची नोंद इथे होऊ लागली. त्यातून वंशावळी लिहिण्याचा व्यवसाय सुरु झाला.
१७५० सालानंतर मात्र इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. त्यातुन मशिन्सची निर्मिती झाली. मशिन्सवर बनवलेल्या वस्तूंमुळे मुख्यत्वे जसे भारतातल्या अन्य कापड व्यवसायावर गंडांतर आले तसे नाशिकमध्ये सुद्धा. ब्रिटिशांनी देशभरातला उद्योगच चिरडला. संपूर्ण देशातलेच मॅन्युफॅक्चरिंग इंग्रजांना उध्वस्त करायचे होते. त्यामुळे नाशिक प्रिंटची घोडदौडही रोखली गेली. पण मराठेशाही मधल्या पेशवाईचा वरदहस्त आणि मंदिरांच्या बांधकामांमुळे तीर्थक्षेत्री गर्दीमात्र वाढू लागली आणि पितांबर, सोवळी, चोळीचे खण ईत्यादी वस्त्रांना मात्र या कालावधीमध्ये बरे दिवस आले होते. या गर्दी मुळे अठराव्या शतकात नाशकात आणखी एका उद्योगाला बरे दिवस आले होते. नाशिकला तांब्याची वेगवेगळी भांडी बनवण्याची जुनी परंपरा होतीच. पण या व्यवसायाला उभारी आली ती ओझर परिसरात स्थलांतरित झालेल्या तांबट समाजाच्या कारागिरांमुळे. हे तांबट गुजरातेतल्या चापनेर गावातले. ओझर मध्ये त्यांनी आपले बस्तान अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बसवले असेल. ओझरला ओझर तांबटच म्हणत असत. या तांबट समाजाने उत्पादन केलेल्या वेगवेगळ्या तांब्याच्या भांड्यांमुळे देखील नाशिक देशभर प्रसिद्ध होतं. तीर्थक्षेत्रामुळे नक्षीकाम असणारी, पुजेची, भेटवस्तु म्हणुन देण्यात येणारी तांब्याची भांडी आता मोठ्या प्रमाणात नाशकात बनू लागली होती. काशीला गेलेल्या यात्रेकरुनी परतताना छोट्या आकारांच्या तांब्याच्या भांड्यात गंगा नदीचे पाणी भरून आणण्याची प्रथा होती. त्या छोट्या तांब्याच्या भांड्याचा पुरवठा काही प्रमाणात नाशिकहुन सुद्धा व्हायचा.
क्रमशः
प्रतिक्रिया
16 Apr 2017 - 11:56 pm | आदूबाळ
वाचतोय! पुभाप्र.
17 Apr 2017 - 8:49 am | खेडूत
छानच माहिती..
नाशिकच्या इतिहासाबद्दल अजून एक वेगळी मालिका कुणीतरी लिहावी.
17 Apr 2017 - 7:47 pm | शलभ
छान माहिती..पुभाप्र
17 Apr 2017 - 8:01 pm | उपेक्षित
अतिशय वेगळी माहिती मिळतेय नाशिक बद्दल जी आधी माहित नव्हती.
3 May 2017 - 5:37 am | रुपी
+१
22 Apr 2017 - 4:52 pm | पैसा
इंटरेस्टिंग!