जिम म्हटलं की तिथे गेलं, व्यायाम केला, परत आलं असं सर्वसाधारणपणे होतं. पण म्हणजे; प्रत्येकाचं नाही. किंवा अगदी प्रयत्न केला तरी तिथे काही किस्से असे घडतात की ते कायम लक्षात राहतात. जेंव्हापासून व्यायाम करायला, किंबहुना जिमला जायला सुरुवात केली तेंव्हापासून आजवर घडलेले निवडक काही किस्से सांगावेसे वाटतात. तसं व्यायामाबद्दल बोलायला #मिपाफिटनेस धागा आहेच; इथे जरा अवांतर.
ठाण्यात पूर्वी एक गोल्ड जिम नावाचं जिम होतं. तळवळकर्स त्या वेळी बरंच लोकप्रिय झालं होतं. आणि गोल्ड हे नवं आणि ठाण्यातलं दुसरं 'जिम' होतं. (बाकी व्यायामशाळा म्हणाव्या अशा) मी आणि माझा मित्र तेंव्हा कॉलेजमधे होतो आणि अर्थातच मस्क्युलर दिसण्याची मनिषा आमची होती त्यामुळे बरेच पैसे घरच्यांना मोजायला लावून गोल्ड जिम चं सभासदत्व आम्ही घेतलं. तिथे छान एसी, गाणी वगैरे चोचले होते. आम्हाला जो पहिलाच इन्स्ट्रक्टर लाभला तो जरी त्याच्या जागी भारी असला तरी जरासा यडा होता. तो जिम कम पब मधे असल्यासारखं वाटायचं. म्हणजे स्पॉट करत नसेल तेंव्हा तो एकटाच आरशात बसून पदलालित्य वगैरे करत पोजिंग चा सराव करायचा. मी आणि माझा मित्र एकमेकांकडे नुसतं बघूनही हसायला लागणार्यांपैकी होतो. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला ते जड गेलं. म्हणजे जोर मारताना मान वर झाली की हा समोरच्या आरशात फ्लेक्स करून नाचल्यासारखं काहीतरी करताना दिसायचा आणि अवसानच जायचं सगळं. आणि मग पाणी प्यायच्या निमित्ताने बाहेर जाऊन हसून घ्यायचो. अनेकदा तर तो अर्धा जोर सोडून चक्क लोळायची वेळ आलेली. या माणसाचं एक गाणं फार आवडीचं होतं. 'मुंगडा'. ते गाणं लागलं की तो चक्क धावत रिसेप्शन ला जाऊन आवाज वाढवायला लावायचा. पहिल्यावेळी आम्हाला कळलंच नाही. स्क्वॉटरॅकवरून मी भरपूर वजनी बार उचलत होतो आणि बघतो तर मागे तो नाहीच. मग काही सेकंदात आवाज वाढला आणि स्वारी थिरकत थिरकत आली. पुढे इन्स्ट्रक्टर बदलला आम्ही.
याच जिममधला एक जबर हसवलेला पण काहीसा डेंजर किस्सा. हेवी बेंचप्रेस करत होतो. त्या दिवशी एकही इन्स्ट्रक्टर नव्हता, दुपारची वेळ होती. तीन चारच जण जिममधे होतो त्यामुळे मी आणि माझा मित्र एकमेकांना स्पॉट करत होतो, सपोर्टला उभे होतो. माझा मित्र बेंचप्रेस करत होता, पन्नास किलो. त्यावेळी रिसेप्शन वर कोण बया होती ठाऊक नाही पण जुनी हिंदी गाणी लावत होती. 'आप जैसा कोई मेरी ज़िंदगी में आए' हे गाणं लावलं होतं. या गाण्यात '...तो बात बन जाए.........' या ओळीनंतर एक 'टू.....' असा आवाज आहे. जिमच्या त्या (गाण्याव्यतिरिक्त) शांततेत बेंचप्रेस मारत असताना हा 'टू..........' आवाज आला आणि आधीच हसायला कारण न लागणारे आम्ही दोघे क्षणात हसायला लागलो. वेड्यासारखा अॅटॅक! मी सपोर्ट करत होतो ते सोडून खालीच बसलो. मित्राने बार उचलला होता तो त्या 'टू....' सारखाच सेकंदात खाली आला, आणि त्याला उचलताच येईना. छातीवर तो बार बॅलन्स करत तो हसत होता, मी खाली बसून हसत होतो. पण ते खरं तर खूप डेंजर होतं. काही सेकंदानंतर 'बार उचल साल्या लवकर' असं तो ओरडला तेंव्हा हसू थांबवत मी बार उचलला. चुकलं होतं, पण हसू आवरलं नाही. पुढे ते गाणं लागलं की आम्ही बसून रहायचो आणि ते संपलं की पुढचा सेट.
नंतर आमच्या जवळच्या शाळेत जिम सुरू झालं. शाळेने जिम सुरू करणं हा फार धक्का होता. जिथे दहा वर्ष आम्हाला मधल्या सुट्टीतही क्रिकेट खेळायला बॅट आणायची परवानगी नव्हती तिथे चक्क जिम ! परदेशी व्यायाम?? असो. तर जिम सुरू झालं. बाकी जागा मोठी होती, उपकरणं ठीकठाक पण पुरेशी होती. गडबड होती ती व्यवस्थापनात. एक साठीचे सर होते. म्हणजे जिमसाठीचे आणि ते स्वतः साठीचे. ते या जिमचं सगळं बघायचे. मुळात व्यायामाला गाण्यांची जोड हवी याबद्दल मतं भिन्न असू शकतात. त्यात हे सर मागल्या पिढीतले असल्याने त्यांचं मत 'गाणी कशाला हवीत?' हे असणं अपेक्षितच होतं. तरी बरेचदा सांगून मग एक कॉम्प्युटरला योग्य अशी २.१ स्पीकर सिस्टिम आणि एक डीव्हीडी प्लेयर आणण्यात आला. इथे साधारण प्रत्येकी हजार चौफू आकाराचे लेडीज, जेंट्स वेगळे विभाग होते आणि ते वर-खालच्या मजल्यावर होते. शाळेने काय करावं?... या २.१ स्पीकर सेटचा एक स्पीकर भल्यामोठ्या जेंट्स विभागात, आणि एक खालच्या मजल्यावर तितक्याच मोठ्या लेडीज विभागात ठेवला, वायर एक्स्टेंड करून. त्याचा इवलासा सबवूफर लेडीज विभागात. आता या रचनेत गाणी ऐकू आली तरी खूप होतं. आम्ही त्या सरांना विनंती करून डीव्हीडी प्लेयर जेंट्स मधे ठेवायला लावला, जेणेकरून आवाज, गाणी हे तरी आपण नियंत्रित करू. आम्ही घरून सीडी राइट करून आणल्या निवडक गाण्यांच्या. झालं?... आता लेडीजमधल्या कुणीतरी म्हणे सांगितलं आवाज नको म्हणे आम्ही योगासनं करतोय. ते खोडून काढतो तर ते सर म्हणे बाहेरच्या सीडी अलाऊड नाहीत यापुढे. बरंं म्हटलं तुम्ही लावा मग. आणि ते चक्क भावगीतं लावू लागले! म्हणजे उषःकाल होता होता, किंवा ये रे घना ये रे घना या गाण्यांच्या पार्श्वभूमीवर आम्ही स्क्वॉट्स आणि बेंच प्रेस हे व्यायाम केलेत. त्यानंतर काही वर्ष जिम लावलंच नाही.
पुढे त्या ये रे घनातून सावरलो आणि एक उत्तम जिम मिळालं घराजवळ. जिथे अजूनतरी असं काही विचित्र प्रकरण घडलेलं नाही. किस्से अनेक झाले पण हे निवडक मात्र आजही आठवून हसतो आम्ही.
मिपाकरांकडे असे भनाट किस्से असतीलच. सांगा की.
प्रतिक्रिया
9 Apr 2017 - 11:55 pm | पिलीयन रायडर
ये रे घनावर जिम??????!!!!!
ठार मेले!!!
मस्त किस्से! लिहीते मी पण आठवुन!
10 Apr 2017 - 12:35 am | एस
हहपुवा! =))
10 Apr 2017 - 1:26 am | रेवती
मजेदार किस्से आहेत. जिमचे किस्से असे फार काही घडले नसावेत. एकदा झुम्बा डान्सला 'जय हो' गाणे लागल्यावर इंस्ट्रक्टरीण बाई जाड असूनही इतक्या सुंदर नाचत होत्या की त्यांच्याकडे बघताना पडेन की काय असे वाटले. मात्र आई ज्या योगाक्लासला पूर्वी जायची तो क्लास आमच्या यत्ता चौथीच्या शाळेत भरायचा. सर्व महिलावर्ग नऊवारी साड्या नेसून आसनं करायचा. एक काकू शीर्षासन करताना सरळ होईचनात. त्यांनी हेडस्टँड केला व पर्फेक्टली अडकल्या. पाय ताठरला की काय हे कळण्याचे वय नव्हते पण काकू शीर्षासनात व बाकीच्या महिला पटापट आपापली आसने आटोपून यांच्या भेवती कडे करून उभ्या! नुसत्या चर्चांना ऊत "अहो वहिनी, तुम्ही पाय पुढे आणा, आम्ही ओढतो तुम्हाला", "अहो ओढताय कसल्या, थांबा, तुम्हाला मानेच्या मागे उशी देऊ का?" "अहो उशी कश्याला लागतिये, त्यांच्या अहोंना बोलवा, ते काय करायचं ते करतील." इतकी गडबड की आणखी दोन पाच मिनिटांनी काकूं स्वत:च नीट झाल्या. आम्ही आधी अचंब्याने पहात होतो. त्यांच्या मुलाला म्हटलेही की आता तुझी आई मरणार वाटतं. लहान असताना एकतर धडधाकट असणे किंवा मरणे असे दोनच प्रकार माहित होते.
10 Apr 2017 - 1:37 am | कंजूस
येरे घनावर फ्युजन।
10 Apr 2017 - 11:51 am | मार्मिक गोडसे
ये रे घना सोडल्यास माझेही डिट्टो अनुभव.
जिममध्ये बेंचप्रेस करताना एकजण विचित्र आवाज काढायचा ,त्या आवाजामुळे जिममधील सगळे डिस्टर्ब झाले होते. त्याला सांगुनही काही फरक पडला नव्हता. शेवटी मीच बेंचप्रेस करताना हुबेहुब त्याच्यासारखाच आवाज काढू लागलो. त्याला कळून चुकले मी त्याची नक्कल करतोय ते. आता त्याचे ते विचित्र आवाज काढणे बंद झाले आणि मीपण त्याची नक्कल करणे बंद केले, परंतू अजुनही बेंचप्रेस मारताना आठवण येते किंवा माझा पार्टनर आठवण करून देतो तेव्हा फस्सकन हवा जाते. एकदा हसू लागलो की हसण्यावर कंट्रोल करणे मला व पार्टनरला जड जाते. तसं म्हटलं तर मला एखाद्या मौतीतही हसण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही.
10 Apr 2017 - 1:11 pm | माझीही शॅम्पेन
अरे किस्से किस्से काय करतोस , आक्खा धागा टाकलाय ना भौ (तेवढीच फुकटात जाहिरात करून घेतो)
http://www.misalpav.com/node/36482
ह्या विषयावर लिहाव तेवढ कमीच आहे :)
10 Apr 2017 - 1:17 pm | वेल्लाभट
खरतनाक धागा आहे तो ! जाम भारी. कडक.
10 Apr 2017 - 8:07 pm | दुर्गविहारी
सही आहेत किस्से. और आने दो. मजा आली.
10 Apr 2017 - 8:14 pm | स्रुजा
हा हा हा
10 Apr 2017 - 8:55 pm | गणामास्तर
कसले भारी किस्से ! लोळून लोळून हसलो पार. .अजून येउद्या.
10 Apr 2017 - 8:59 pm | पैसा
मजेशीर!
10 Apr 2017 - 9:52 pm | चतुरंग
मस्तच.
येरे घना वर व्यायाम म्हणजे कहर आहे =)) =))
(करायला खरंच अवघड जात असणार कारण मनातल्या मनात वेट वगैरे जमेल का हे करुन बघितलं ;) )
11 Apr 2017 - 6:49 am | प्रमोद देर्देकर
मस्तच वेल्ला .
मी १०/१२ ला असताना मी सकाळी ४.३० / ५ ला ऊठुन जायचो व्यायाम शाळेत. तेव्हा शिकवणारं कोणी नसायचे. दुसर्याचे बघुन बघुन आपला आपण व्यायाम करायचा. बाकीचे साथीदार मदत करायचे.
एकदा मी कीती वाजले हे बघितले नाही आणि नेहमी प्रमाणे व्यायामशाळेत जावुन व्यायाम करत बसलो. एकटाच. सगळा व्यायाम झाला तरी कोणी आलं नाही.
मला वाटले सगळ्यांनी मला आज टांग दिली काय. मी व्यायाम करुन बाहेर पडणार तेव्हा एकजण आला.
"काय रे आज व्यायाम नाही करत?"
"अरे मी केला आणि आता घरी चाललोय तुम्हीच कोण नाही आलात ."
"आँ आताशी तर ५ च वाजलेत मग तु आला तरी कधी ?"
केव्हा कुठे मला कळले मी रात्री ३.३० ला च व्यायाम शाळेत आलो होतो.
(तेव्हा ती व्यायामशाळा आवोजावो घर तुम्हारा अशी उघडीच होती. नंतर तिचे सगळं सामान चोरीला गेले.)
11 Apr 2017 - 6:57 am | अत्रे
हा हा हा!
11 Apr 2017 - 6:59 am | अत्रे
लॉल! बाकी जिम मधली स्पीकर वर लावलेली गाणी हा भिकार प्रकार आहे. ज्यांना ऐकायची ते इअर फोन लावून ऐकतील ना! ज्याला जी आवडतात ती त्याने स्वतः पुरती ऐकावीत.
11 Apr 2017 - 7:47 am | वेल्लाभट
मैफिलीसारखं असतं ते! का लावतात मग एवढाले स्पीकर? प्रत्येकाला इअरपीस द्यावा आणि ज्यूकबॉक्स द्यावा ना.
जिम मधली गाणी म्हणजे एखाद्या मैफिलीसारखं असतं प्रकरण. एक तर तो थंप तुम्हाला चार्ज अप करतो, कानाला पर्सनल त्रास न देता. शिवाय मैफिलीत कसं एकाने दाद दिली की आपोआप इतरही दाद देतात किंवा किमान लक्ष तरी देतात. तसं इथे गाण्यांसोबत ऐकू येणारे वैयक्तिक आवाज हे दिलेल्या दादीसारखे असतात. उदा. एखादा हाय हूय करत डेडलिफ्ट्स करत असेल तर ते बघून ऐकून तुम्हाला तुमच्या वर्काउटमधे लक्ष देणं भाग होतं.
जिममधे स्टिरियोवर लागलेली गाणी आणि हेडफोन यांची तुलना नाही होऊ शकत माझ्यामते.
11 Apr 2017 - 8:06 am | अत्रे
पण मला जे म्युझिक व्यायाम करताना आवडते ते तुम्हाला आवडेल असे नाही ना! उलट काही काही गाण्यांचा त्रासच होतो (तुम्हीच उदाहरण दिले आहे). प्रत्येकाची स्वतःची प्लेलिस्ट असते ती त्याने इअरफोन वर ऐकली तर प्रश्नच सुटेल.
11 Apr 2017 - 9:19 am | प्रसन्न३००१
छोटासा एमपीथ्री प्लेयर न्या बरोबर जिम मध्ये किंवा मोबाईल मध्ये प्लेलिस्ट लोड करा आणि व्यायाम करताना ऎका... you have an option not to listen to songs on speaker ;)
11 Apr 2017 - 9:23 am | अत्रे
ते आहेच हो. पण ढॅणढॅण वाजणारे स्पीकर असल्यावर आपलीच गाणी आपल्याला ऐकू येत नाहीत :)
11 Apr 2017 - 9:49 am | वेल्लाभट
ओके या बाब्तीत मतं वेगळी असू शकतात. मी उदाहरण दिलंय ते म्हणजे टोक होतं. मला नाही वाटत अशा भावगीतांवर व्यायाम कुणाचाही चांगला होईल. म्हणजे प्लीजच. हां आता एखाद्याला रॉक आवडेल, एखाद्याला पॉप एखाद्याला ट्रान्स इत्यादी, तर त्याबाबत इतकंच म्हणेन की बहुतेक जिम मधे प्ले लिस्ट ही विविध जॉनर च्या गाण्यांची एकत्रित असते, असावी. तसं नसल्यास मग एमपीथ्री किंवा मोबाईल चा पर्याय आहे पण तुमच्याशी सहमत की त्यातला आवाज बाहेरच्या आवाजाने स्पॉईल होतो.
12 Apr 2017 - 9:50 am | नि.पा
एक किस्सा ..
११ वी त असताना, कॉलेजच्या ग्रुप मधे एक नमुना होता. रोज टाईट टी-शर्ट घालून यायचा. आणि लंबी लंबी सोडायचा.. आज यांव केलं न त्यांव केलं ! ग्रुप मधे एक अतरंगी पोरगं होतं. अनेक दिवस त्याची ही बडबड त्यानं ऐकून घेतली. एकदा हा नमुना नेहमीप्रमाणे टाइट टी-शर्ट घालून काखेत कलिंगडं धरल्यागत ग्रुप मधे चालत चालत दाखल झाला.... तर हे अतरंगी त्याला विचारतंय कसं..
" तुला बरेच दिवसांपासून विचारायचं होतं... तू ओढणी का नाही वापरत... "
12 Apr 2017 - 10:09 am | वेल्लाभट
आरारा कचराच केला!